भारतात ‘शीत(पेय)युद्ध’ अजून सुरूच आहे! नव्हे, आता कुठे त्यात इथल्या मातीतल्या स्पर्धकांचे पदार्पण होत आहे!!
दिवाळी २०२१ - विशेष लेख
आदित्य कोरडे
  • भारतातील काही शीतपेयं
  • Mon , 25 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख शीतपेय Cold Drinks कोकाकोला Coca-Cola पेप्सी Pepsi थम्सअप Thums Up स्प्राईट Sprite फंटा Funta अर्देशीर Ardeshir

इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठा, शीख, मोगल अशा एतद्देशीय सत्तांना हरवून. पण नंतर त्यांच्या सत्तेला आव्हान देणारे वासुदेव बळवंत फडके, चापेकर, सावरकर असे क्रांतिकारक किंवा टिळक, गांधी, पटेल यांच्यासारखे पुढारी मात्र समाजातल्या सर्वसामान्य वर्गातून, म्हणजे पूर्वी सत्ताधारी नसलेल्या वर्गातून पुढे आले. भारतातल्या शीतपेयांच्या इतिहासाचे स्वरूप काहीसे असेच आहे. १९४७ साली इंग्रजांनी हा देश सोडल्यानंतर स्वातंत्र्यलढा संपला असे जर घटकाभर गृहीत धरले, तर त्या अर्थाने भारतातले शीतपेयांचे युद्ध अजून सुरूच आहे, नव्हे आता कुठे त्या लढ्यात इथल्या मातीतल्या स्पर्धकांचे पदार्पण होत आहे.

शीतपेयांचा इतिहास फार काही जुना नाही. साध्या पाण्यात कार्बन डाय ऑक्साइड (मराठीत याला ‘कर्बद्वी प्राणील वायू’ असे संस्कृतप्रचुर नाव आहे म्हणे!) हा वायू विरघळवून ते पाणी बाटलीबंद केले आणि थंड करून ठेवले की, लाक्षणिक अर्थाने (अगदी प्राथमिक अवस्थेतील) शीतपेय तयार होते. फळांचा रस, अर्क, सरबते यांना त्या अर्थी ‘शीतपेय’ म्हणता येत नाही, म्हणत नाहीत. म्हणजे तसा प्रघात नाही आणि तो प्रतिपाद्य लेखाचा विषयही नाही.

१७८४ साली ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रीस्टलीने प्रथम सध्या पाण्यात कार्बन डाय ऑक्साइड विरघळवून शीतपेय तयार करण्याची पद्धत शोधली. या पेयाला ‘कार्बोनेटेड वॉटर’ किंवा ‘सोडा वॉटर’ असे म्हटले गेले. काही वर्षांनी म्हणजे १८३७ साली भारतामध्ये हेन्री रॉजर्स नावाच्या इंग्रज रसायनतज्ज्ञ आणि व्यावसायिकाने ‘रॉजर्स सोडा’ या नावाने भारतातील पहिली ‘कार्बोनेटेड वॉटर’ किंवा ‘सोडा वॉटर’ बनवणारी कंपनी काढली. ब्रिटिश सोजिरांना दारूत मिसळायला हा सोडा, साध्या पाण्यापेक्षा जास्त पसंत पडला आणि पाहता पाहता त्याचे लोण भारतीयांतदेखील पसरू लागले. मागणी वाढली तशी अनेक पारशी व्यावसायिकानी या नव्या धंद्यात उडी घेतली आणि आपली शीतपेयं बाजारात आणली. पालनजी (स्थापना १८६५), मेरवानजी (१८६६), अर्देशीर (१८८४), दिनशाजीचा ड्युक सोडा (१८८९) ही काही ठळक नावे.

..................................................................................................................................................................

आजही भारतीय तरुणात थम्सअप आवडणारे आणि पेप्सी किंवा कोकाकोला आवडणारे असे स्पष्ट दोन वर्ग आहेत. ‘टेस्ट द थंडर’ नावाचं वादळ अजूनही चालूच आहे. २००० साली लिम्कादेखील परत आला किंवा आणावा लागला. आजदेखील मूळ अस्सल भारतीय, पण सध्या कोकाकोला या परकीय कंपनीच्या मालकीचं ‘थम्सअप’ हे शीतपेय कोकाकोला किंवा पेप्सीपेक्षा अधिक खपतं. लिम्काचीदेखील तीच गत आहे. जनता त्यांना विसरली नाही, पण जनतेचं काय हो... तिला कायम गृहीतच धरलं होतं… पूर्वी पार्लेने आणि आता पेप्सी व कोकाकोलाने.

.................................................................................................................................................................

थोड्याच कालावधीत हा प्रकार इतका लोकप्रिय झाला की, सगळ्या भारतात लहान-मोठे उद्योगी आणि हिकमती लोक आपापली शीतपेयं बनवू लागले. आजही तालुका किंवा खेडेगावीदेखील स्थानिक लोकांनी बनवलेली ‘गोटी सोडा’ किंवा उत्तर भारतात ज्याला ‘बंटा’ म्हणतात, ती पेयं सर्रास मिळतात. तिकडे अमेरिकेत १८८६ साली कोकाकोला आणि पेप्सी (१८९३ – त्या काळी त्याचे नाव ‘ब्राड्स ड्रिंक’ होते) हेदेखील सुरू होऊन चांगलेच नावारूपाला आले. पण त्यांचा शिरकाव भारतात झाला नव्हता. इंग्रजांनी त्यांना परवानगी दिली नाही की, त्यांनी काही प्रयत्न केला नाही, याबाबत नक्की माहिती मिळत नाही.

तर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि लगेचच पार्ले (प्रसिद्ध पार्ले ग्लुकोज बिस्कीटवाले) यांनी १९४८-४९ साली आपला ‘ग्लूको कोला’ बाजारात आणला. त्याच वेळी ‘कोकाकोला’ भारतात यायच्या तयारीत होता. त्यांनी आधीच भारतीय बाजारापेठेत आपला ट्रेड-मार्क रजिस्टर केला होता. त्यामुळे त्यांनी पार्लेच्या ‘ग्लूको कोला’ या नावाला आणि त्या नावाच्या डिझाईनला आक्षेप घेतला. त्यावर पार्लेने ‘ग्लूको’ काढून फक्त ‘पार्ले कोला’ असे नाव ठेवले. यालादेखील कोकाकोलाने आक्षेप घेतला. भारताला नवीनच स्वातंत्र्य मिळाले असल्याने आणि ट्रेडमार्क, लोगो आणि नामसाधर्म्य याबाबत फारशी माहिती नसल्याने असे झाले असावे. दोन वर्षे न्यायालयात केस चालली आणि त्यात हरल्यावर पार्लेने आपले पेय बाजारातून हटवले.

१९५० साली दिल्ली इथल्या आपल्या नव्या ‘प्युअर ड्रिंक्स लिमिटेड’ नावाच्या बॉटलिंग प्लांटमधून भारतात कोकाकोलाने आपला कोला बनवून विकायला सुरुवात केली. त्याच सुमारास पेप्सीने आपले शीतपेय भारतात आणले. पार्लेचे पेय बाजारातून हटल्यावर आणि दुसरा कोणी मोठा प्रतिस्पर्धी भारतात नसल्यामुळे या दोन शीतपेयांचीच मक्तेदारी असणार होती, हे उघड होते. पण पार्लेनेदेखील पराभव मान्य केला नव्हता. १९५२ साली त्यांनी आपले ‘गोल्डस्पॉट’ हे नारिंगी रंगाचे आणि संत्र्याच्या स्वादाचे पेय बाजारात आणले. हे पेय भारतीयांना विशेषत: मुलांना भलतेच आवडले आणि अल्पावधीत ते प्रचंड लोकप्रिय झाले. कोकाकोलाचादेखील भारतीय बाजारात चांगलाच जम बसला होता, पण पेप्सीला मात्र म्हणावे तसे यश मिळाले नाही. १९६२ साल येईतो पेप्सीची भारतातली अवस्था बिकट झाली होती. त्या सालीच त्यांनी भारतीय बाजारातून आपला गाशा गुंडाळला.

आता बाजाराची सत्ता स्पर्धा कोकाकोला आणि पार्ले यांच्यात होती. १९७१ साली पार्लेने ‘लिम्का’ हे लिंबाच्या स्वादाचे पेय बाजारात आणले. ते तरुण विशेषत: तरुण मुलींमध्ये लोकप्रिय झाले. ग्राहकांना-मुख्यत्वे तरुण पुरुषांना आकर्षित करण्यासाठी पार्लेने मोठी जाहिरात मालिका सुरू केली आणि रेखासारख्या नवोदित आणि सनसनाटी चेहऱ्यांना घेऊन जाहिराती केल्या. त्याचा त्यांना फायदा झाला, पण कोकाकोला भारतात नंबर होता आणि त्याला अजून तरी कुठलाही धोका दिसत नव्हता.

१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले, नंतर मोठा दुष्काळ पडला. त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला. त्यामुळे भारतातून पैसा बाहेर जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी १९७३ साली तत्कालिन इंदिरा सरकारने परकीय चलन नियंत्रण कायदा आणला. या कायद्यान्वये कोणत्याही परदेशी कंपनीला भारतीय उद्योगातील हिस्सा ४० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवता येणार नव्हता. याचा कोकाकोलालावर विपरीत परिणाम होणार होता. मग त्यांनी आपले लागेबांधे वापरून यात खोडे घालायचे प्रयत्न केले. त्यामुळे हा प्रस्ताव संसदेत दोन-तीन वर्षे तरी रेंगाळला. शिवाय त्यांना आपला भारतीय कंपनीतला हिस्सा ४० टक्क्यांवर आणायला दोन वर्षांची मुदतही दिली गेली.

अशात १९७५ साल आले आणि आणीबाणी लागू झाली. त्यामुळे हे प्रकरण काहीसे मागेच पडले. पार्ले कंपनीला या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता. १९७६ साली त्यांनी भारतीयांचे अत्यंत लाडके फळ असलेल्या आंब्याच्या स्वादाचे ‘माझा’ हे शीतपेय बाजारात आणले. त्यापूर्वी मुंबईस्थित ‘ड्युक्स’चा मँगोला लोकांचा अतिशय आवडता आणि प्रसिद्ध होता. ड्युक्सचीच ‘सोडा’ आणि ‘लेमोनेड’ ही पेयंदेखील प्रसिद्ध होती आणि ड्युक्सचा तसा पार्लेशी काही झगडा नव्हता. पण पार्लेला बाजारात दोन नंबरची जागा पक्की करायची होती.

१९७७ साली आणीबाणी हटली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान, तर जहाल कामगारनेते, भांडवलशहा आणि ‘भांडवलशाहीचे शत्रू’ जॉर्ज फर्नांडिस हे उद्योगमंत्री झाले. त्यांना कोकाकोलाला धडा शिकवून सगळ्या भांडवलशहांना दमात घ्यायचे होते. म्हणून मग ते कोकाकोलाच्या मागे हात धुवून लागले. १९७३च्या परकीय चलन नियंत्रण कायद्याबरोबरच (Foreign exchange Regukations Act-FERA1971) १९७०च्या भारतीय पेटंट कायद्यातील (Indian Patents 1970 Act-IPA70) तरतुदीचा आधार घेत त्यांनी कोकाकोलाला आपला शीतपेयाचा ‘तथाकथित’ गुप्त फॉर्म्युला उघड करायला सांगितले. याला कोकाकोला कधीही तयार होणार नाही, हे जॉर्जना माहिती होते. कोकाकोलाने यातून मार्ग काढायचा बराच प्रयत्न केला. पण इरेला पेटलेल्या जॉर्जसमोर त्यांचे काही चालले नाही. अखेर त्यांनी भारतातून आपले चंबूगबाळे हलवले. त्यामुळे त्यांच्या मालकीचे २२ बॉटलिंग प्लांट बंद पडले आणि जवळपास १० हजार लोक बेकार झाले. बेकार आणि संतप्त कामगारांनी जॉर्ज यांच्या घरासमोर निदर्शनेदेखील केली, पण ‘भांडवलशहां’चे हस्तक ठरवून त्यांची संभावना केली गेली. या काळात जॉर्ज यांचे एक विधान बरेच गाजले होते- ‘भारतातल्या ९० टक्के खेड्यात लोकांना साधे प्यायचे स्वच्छ, शुद्ध पाणी उपलब्ध नाही, पण कोकाकोला, पेप्सी उपलब्ध आहे. आपल्याला याची गरज आहे का?’ (जणू कोकाकोलामुळे खेड्यात प्यायला पाणी मिळत नव्हते अन आता कोकाकोलाला भारतातून हाकलल्याने खेड्यात शुद्ध पेयजल उपलब्ध होणार होते! असो.)

भारतातून गेला तरी लोकांना कोकाकोला हवा होता. त्याची चटक लागली होती म्हणा ना! मग काय लवकरच पाकिस्तानातून कोकाकोलाची चक्क तस्करी सुरू झाली. स्फोटके, शस्त्रास्त्रे, सोने-चांदी, अंमलीपदार्थ यांच्या जोडीला कोकाकोलासारख्या य:कश्चित शीतपेयाची तस्करी! सरकार, पोलीस आणि प्रशासनाच्या डोक्याला हा नवीनच ताप सुरू झाला. यावर उपाय काय! तर सगळे कामधंदे आपल्याच अखत्यारीत सुरू करण्याच्या आवेशात सरकारने चक्क कोकाकोलासारखाच एक कोला भारतात बनवून विकायचे ठरवले.

मग भारत सरकारने आपल्या म्हैसूर इथल्या केंद्रीय खाद्य प्रौद्योगिक अनुसंधान संस्थान (CFTRI - Central Food Technological Research Institute at Mysore)ला कोकाकोलाच्या धर्तीवर शीतपेयाचा एक फॉर्म्युला बनवायला सांगितला. (या संस्थेने पूर्वी अमूल करता दूध पावडर बनवण्याचे तंत्र विकसित केले होते.) त्यावरून १९७७ साली भारत सरकारने स्वत:च्या मालकीच्या ‘मॉडर्न फुड इंडस्ट्रीज’मार्फत ‘डबल सेव्हन’ या नावाने एक कोला बाजारात आणला. त्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केले. या कोलाचे नाव ‘डबल 7’ हे खास होते. १९७७ साली आणीबाणी हटली होती. इंदिराजींचा आणि त्यांच्या काँग्रेसचा पराभव झाला होता. ते साल अधोरेखित करणारे म्हणून ‘डबल 7’. या कोलाच्या जाहिरातीसाठी वापरलेली टॅगलाईनदेखील मोठी रोचक होती- ‘For the good times’ म्हणजे ‘अच्छे दिन के लिये’. एकंदरीत बिगर काँग्रेसी सरकारांना ‘अच्छे दिन’चे भारीच आकर्षण असते! (आजचा भाजप म्हणजेच तेव्हाचा जनसंघ या जनता सरकारात सामील होता.)

अर्थात लोकांना हा नवा कोला काही फारसा पसंत पडला नाही. त्यामुळे तो हळूहळू मागे पडला. पुढे लवकरच म्हणजे १९८० साली जनता पक्षाचे सरकारही पडले आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. त्यांनी आपल्या पराभवाचे अन जनता पक्षाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या ‘डबल 7’मध्ये फार रुची दाखवली नाही, जनतेलाही नव्हती. पण हा कोला सरळ बंद केला तर त्यात विरोधकांना खुनशीपण दिसले असते. म्हणून मग त्यांनी ‘प्युअर ड्रिंक्स’ या पूर्वाश्रमीच्या कोकाकोलाच्या बॉटलिंग करणाऱ्या कंपनीला या ‘डबल 7’चा कारभार हाती घ्यायला सांगितले. पण प्युअर ड्रिंकचा स्वत:चाच एक कोला बाजारात आणायचा मानस होता, त्याचे नाव होते ‘कॅम्पा कोला’. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. हळूहळू ‘डबल 7’ मागे पडला, बंद पडला, आणि विस्मृतीतही गेला.

प्युअर ड्रिंकचा ‘कॅम्पा कोला’ चवीला, दिसायला आणि नाव-लोगो-जाहिरातबाजी या बाबतीत कोकाकोलाचीच सहीसही नक्कल होता, पण त्यावर आक्षेप घ्यायला आता कोकाकोला भारतात नव्हता. त्यामुळे हा कॅम्पाकोला भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला. ‘डबल 7’च्या तुलनेत तरी तो नक्कीच उजवा ठरला, लोकांच्या पसंतीस उतरला. 

या सगळ्या गदारोळात पार्ले कंपनी स्वस्थ बसलेली नव्हती. त्यांची इतर पेयं बाजारात धडाक्यात खपत होती आणि कोकाकोला बाहेर गेल्यामुळे भरपूर वाव होता. पण त्यांना आता कोला हेच नाव धारण करणारे पेय नको होते. त्यांनी बरेच प्रयत्न करून, निरनिराळ्या चाचण्या करून, भारतीय मसाले वापरून (?) म्हणजे थोडक्यात अनेक खटपटी-लटपटी करून एक कोला बाजारात आणला. त्याचे नाव – ‘थम्ब्सअप!’ हो, सुरुवातीला त्याचे नाव असेच होते, पण मग लिहायला-वाचायला आणि उच्चारायला सोयीचे व्हावे म्हणून त्यातला ‘b’ काढून टाकून फक्त ‘थम्सअप’ केले गेले. या पेयाची चव खरोखर वेगळी होती, आहे. आणि मुख्य म्हणजे ती लोकांना आवडली. मी लहान होतो. बाजारात कोकाकोला, पेप्सी परत आले होते. तेव्हा ‘चित्रलेखा’ साप्ताहिकात अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, बाळासाहेब ठाकरे यांना कोकाकोला, पेप्सी थम्सअप एका ग्लासात ओतून दिले होते आणि डोळे बांधून फक्त चवीवरून कोणते पेय कोणते आहे, ते ओळखायला सांगितले होते आणि सगळ्यानी ‘थम्सअप’ अगदी सहज ओळखले होते.

आता बाजारात स्पर्धा होती पार्लेच्या ‘थम्सअप’ची आणि प्युअर ड्रिंकच्या ‘कॅम्पा कोला’ची. आपले पेय जास्त खपावे म्हणून कॅम्पा कोलाने आपल्या पेयाची किंमत १० टक्क्याने कमी केली. त्यावर उत्तर म्हणून पार्लेने ‘थम्सअप’च्या बाटलीची क्षमता वाढवून २५० मिली केली. तेव्हा सगळी शीतपेयं २०० मिलीच्या बाटलीत मिळत. त्या पेयाचे नाव केले ‘थम्सअप महा कोला’. याबरोबरच त्यांनी सुनील गावस्कर, कपिल देव अशा लोकप्रिय खेळाडूंना घेऊन जबरदस्त जाहिरातबाजी सुरू केली. पार्लेला या युद्धात सुरुवातीला तरी मोठेच यश प्राप्त झाले. हळूहळू या धंद्यात अनेक नवे भिडू उतरू लागले. डीक्सी कोला, किंगफिशरच्या विजय मल्ल्याचा थ्रिल कोला, बॉवोटो, सास्स्यो, टेरीनो इत्यादी इत्यादी. पण निर्विवाद राजा होता पार्ले. कॅम्पा कोला हळूहळू मागे पडला. आजही हरियाणामध्ये हा कोला बनतो आणि खपतो म्हणे, पण अगदीच नगण्य प्रमाणात.

असे असले तरी आपल्या या विजयाचे खरे श्रेय पेयाच्या चवीला नसून जाहिरातबाजीला आहे, हे पार्लेला माहीत होते. म्हणून मग त्यांनी आपल्या निरनिराळ्या पेयासाठी जाहिरात-मोहिमा चालवल्या. मोठ्या सिनेतारका-ताऱ्यांना, खेळाडूना घेऊन चटकदार, चुटचुटीत जाहिराती, जिभेवर रेंगाळतील अशी टॅगलाईन यांचा धडाका लावला. ‘थम्सअप’साठी ‘टेस्ट द थंडर’, ‘गोल्ड स्पॉ’साठी ‘द झिंग थिंग’ किंवा ‘लिम्का’साठी ‘लाईम एन लेमनी लिम्का’. या स्लोगन लोकांच्या आजही लक्षात आहेत, नव्हे ओठांवर आहेत!

१९८० साली पार्लेने ‘सिट्रा’ म्हणून अजून एक पेय बाजारात आणलं. त्याला त्यांनी ‘सुपर कुलर’ असं म्हटलं. हा प्रकार देखील लोकांना जाम आवडला. १९८५ साली पेप्सीने परत एकदा भारतात शिरकाव करायचा प्रयत्न केला. गोयंका उद्योगसमूहाशी हातमिळवणी करून त्यांनी भारतात परत आपलं पेय उतरवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण तो अयशस्वी ठरला. थोडक्यात भारतातल्या शीतपेय बाजारात १९८० ते साधारण १९८७-८८ पार्लेचाच वरचष्मा होता आणि त्यांचं ‘थम्सअप’ हे सगळ्यात जास्त खपणारं पेय होतं.

थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगायचं म्हणजे या शीतपेयांचा आणखी एक उपयोग म्हणजे ते दारूत मिसळूनही पितात. हा प्रकार भारतात जास्त प्रमाणात आढळतो किंवा आढळत असावा. परदेशी, विशेषतः युरोपियन आणि अमेरिकन, अगदी जपान-कोरिया अशा देशातील लोकांशी कंपनीच्या कामानिमित्तानं माझा संपर्क आला. बहुतेक वेळा ते लोक दारूत काहीही मिसळत नाहीत, क्वचित प्रसंगी साधं पाणी, बर्फ किंवा सोडा घेतात. भारतात मात्र कोणत्या प्रकारच्या दारूत काय मिसळावे याचे संकेत ठरलेले आहेत. व्हिस्कीमध्ये थम्सअप किंवा पेप्सी, रममध्ये सोडा, पाणी किंवा थम्सअप, जीन, व्होडकामध्ये स्प्राईट किंवा लिम्का इत्यादी. म्हणजे हेच मिसळावं असं नाही, पण बहुतांश वेळा ते पाळलं जातं. सिंगल माल्ट किंवा उत्तम प्रकारच्या स्कॉचमध्ये पेप्सी, थम्सअप मिसळून पिणारे महाभाग मी पाहिले आहेत. का कोण जाणे, पण कोकाकोला मात्र यासाठी फारसा कोणी वापरत नाही, निदान माझ्यातरी फारसं पाहण्यात नाही.

१९८५ साली अपयश आलं तरी पेप्सी अजून भारतात शिरकाव करायच्या प्रयत्नात होती. त्या काळी पंजाब खलिस्तानप्रणीत फुटीरतावादी चळवळीनं पेटलेलं होतं. तिथं बेरोजगारी आणि उद्योगधंद्यांची कमतरतादेखील होती. तेव्हा भारत सरकारची पंजाब अग्रो, टाटाची वोल्टास आणि पेप्सी यांनी मिळून पंजाबमध्ये शेतीविषयक अनुसंधान करणं, बॉटलिंग प्लांटस उभारणं आणि अन्नप्रक्रिया उद्योगांची साखळी उभी करण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला. पेप्सी पहिल्या वर्षी दीड कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार होती, तर एकूण प्रकल्पात तिचा हिस्सा ३९ टक्के असणार होता. या बदल्यात पेप्सीला संपूर्ण भारतात आपलं शीतपेय विकण्याचा परवाना हवा होता. भारतात या बाबतीतल्या लालफीतशाही, नोकरशाही आणि निरनिराळ्या परवानग्या, राजकारण्यांचे आरोप-प्रत्यारोप या दिव्यातून जात जात १९८८ साली त्यांना परवानगी मिळाली.

तेव्हा विरोधी पक्षात असलेले जॉर्ज फर्नांडिस यांनी खरमरीत पत्र लिहून पेप्सीला चक्क धमकीच दिली- “मी मागे कोकाकोलाला भारतातून हाकलून लावलं. लवकरच आम्ही परत सत्तेत येऊ आणि मग तुमचीही तशीच वासलात लावू.” त्या वेळी अखिल भारतात वर्षाकाठी सुमारे तीन अब्ज इतक्या शीतपेयांची विक्री होत असे. इतक्या मोठ्या बाजारात हिस्सा मिळवण्याची संधी पेप्सी सोडणार नव्हती. १९८९ साली मात्र खरोखरच काँग्रेसचं सरकार पडलं आणि व्ही. पी. सिंग यांनी राष्ट्रीय आघाडीचं सरकार बनवलं. त्याला भाजपने बाहेरून समर्थन दिलं. या नव्या सरकारात जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री होते (पेप्सीने सुटकेचा नि:श्वास टाकला असणार!)

या वेळेपावेतो पेप्सीने पंजाबात बरीच गुंतवणूक केली होती आणि आता त्याचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. पण अशा वेळी अमेरिकन सरकार (नेहमीप्रमाणे) पेप्सीच्या पाठीशी उभं राहिलं. सरकार बदललं म्हणून धोरण आणि निर्णय पूर्ण उलट फिरवून आधी गुंतवणूक केलेल्या परदेशी कंपन्यांचं नुकसान केलं जाणार असेल, तर जागतिक बाजारपेठेत चांगला संदेश जाणार नाही, आपली पतदेखील चांगली राहणार नाही, याची जाणीव व्ही. पी. सिंग यांना होती. दहशतवाद, अलगाववाद आणि हिंसाचार यामुळे होरपळून निघालेल्या पंजाबला पेप्सी, पंजाब अग्रो आणि वोल्टास यांच्या प्रकल्पाचा फायदा होणार होता. त्यामुळे पेप्सीला भारतात व्यवसाय करण्याची परवानगी दिली गेली.

यावर पार्लेने कायद्याची पळवाट शोधत एक अडचण निर्माण करायचा प्रयत्न केला. परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय करताना एखाद्या भारतीय व्यवसायाशी भागीदारी करणं गरजेचं होतं. त्यातल्याच एका तरतुदीनुसार त्या कंपन्यांना आपलं मूळ नाव जसंच्या तसं वापरता येत नसे. त्यामुळे त्यांनी ‘पेप्सी’ या नावाला आक्षेप घेतला. तोपर्यंत पेप्सीने साधारणत: एक कोटी बाटल्या बनवल्या होत्या. त्या सगळ्या त्यांना वितळवून परत नव्यानं तयार कराव्या लागल्या. त्याचा साधारण दहा लाख अमेरिकन डॉलर्स इतका भुर्दंड त्यांना बसला. वेळ गेला ते वेगळंच. अखेर ‘लेहर पेप्सी’ या नावानं पेप्सी भारतात धुमधडाक्यात आली.

याच सुमारास पार्लेने ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ सुरू केलं. भारतीय लोकांनी केलेल्या जागतिक विक्रमांची दखल आणि नोंद ही संस्था करते. त्याला भारतात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. अर्थात हा लोकप्रियता आणि आपली बाजारातील ओळख टिकवून ठेवण्याच्या डावपेचाचाच एक भाग होता.

या सगळ्या घडामोडी, विशेषत: पार्ले-पेप्सी स्पर्धा आणि डावपेचांवर कोकाकोला बारीक नजर ठेवून होता. १९९०च्या दशकाचा सुरुवातीचा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत बिकट होता. १०० टन सोनं गहाण ठेवण्याची वेळ येणं, परकीय गंगाजळी आटणं, वर्ल्ड बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणं जिकिरीचं होऊन बसणं, थोडक्यात अर्थव्यवस्था गर्तेत जाणं  हे सगळे आपल्याला चांगलंच लक्षात आहे. हा काळ १९९१चं ‘आर्थिक महासंकट’ म्हणून ओळखला जातो. १९९१च्या मध्यावर हे आघाडी सरकार कोसळलं आणि परत एकदा काँग्रेस सत्तेवर आली. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले, तर पूर्वी रिझर्व बँकेचे गव्हर्नर असलेले मनमोहन सिंग या अर्थमंत्री. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेसाठी खुली करण्याचं सूतोवाच केलं. पूर्वीची परदेशी कंपन्यांची भारतीय उद्योगातील भागीदारीची कमाल मर्यादा ४० टक्क्यांहून ५१ टक्के केली. ही संधी कोकाकोला हातची जाऊ देणं शक्यच नव्हतं. त्यांनी पुन्हा एकदा भारतात व्यवसाय करायची परवानगी मागितली आणि अक्षरश: काही महिन्यांत त्यांना परवानगी मिळाली. काळ कसा आणि किती झपाट्यानं बदलला होता पहा!

इकडे तोपर्यंत पेप्सी आणि पार्ले यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा आता युद्धमय झाली होती. पेप्सीकडे प्रचंड भांडवल आणि आर्थिक बळ होतं. ते वापरून त्यांनी मोठमोठ्या सिनेतारका आणि तारे, खेळाडू, गायक, गायिका यांना आपल्या जाहिरात मोहिमेत सामील करून घेतलं. रेमो फर्नांडिस, जुही चावला, अमीर खान, शाहरूख खान, सलमान खान, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिल देव असल्या मोठमोठ्या कलावंतांना घेऊन चालवलेली ‘यही हैं राईट चॉइस बेबी- आहा!’ ही जाहिरात-मालिका अनेकांना आजही  आठवत असेल.

अशात कोकाकोलाही आता आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरला. त्यांच्या लक्षात आलं की, आपल्यापुढे अनेक कंपन्या आहेत. तेव्हा भारतात पार्लेचे सगळ्यात जास्त म्हणजे ६२ बॉटालिंग प्लांट कार्यान्वित होते, पण त्यापैकी फक्त ४ त्यांच्या स्वत:च्या मालकीचे होते, बाकीचे ५८ पार्लेचे फक्त पुरवठादार होते. त्यांना कोकाकोलाने आपल्या कच्छपी लाऊन पार्लेऐवजी कोकाकोलाच्या पेयांचे बॉटलिंग करायला राजी केले. बाजारात त्यांची मक्तेदारी असताना पुरवठादारांशी त्यांचे वर्तनही ठीक नव्हते. त्यामुळे पार्लेच्या पेयांचे बॉटलिंग करायला नवा पुरवठादार मिळेना, (तशी व्यवस्था कोकाकोलाने केली. कोकाकोला, पेप्सीसारखे अमेरिकन उद्योगसमूह अमेरिकेबाहेर व्यवसाय करताना न्याय्य, कायदेशीर, श्रेयस्कर मार्ग चोखाळतातच असा काही त्यांचा लौकिक नाहीच.) हा घाव मात्र पार्लेला वर्मी बसला. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोतच आटला. त्यांच्या पेयांना बाजारात चांगली मागणी होती, पण ते पुरवठा करू शकत नव्हते. अनेक प्रयत्न करूनदेखील ते यातून मार्ग काढू शकले नाहीत. ज्याच्याशी संगनमत करून, भागीदारी करून या परदेशी स्पर्धकाचा सामना करता येईल, असा (ड्युक्ससारखा) प्रादेशिक प्रतिस्पर्धीदेखील उरला नव्हता, नव्हे त्यांनीच शिल्लक ठेवला नव्हता. सरकारी धोरण आणि कायदे आता त्यांच्या फारशा उपयोगाचे राहिले नव्हते. जनतेत त्यांची पेयं लोकप्रिय होती, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग कोकाकोलाने रोखून धरले होते. अखेर हार मानत सप्टेंबर १९९३मध्ये पार्लेने आपला ‘थम्सअप’, ‘गोल्डस्पॉट’, ‘लिम्का’, ‘सिट्रा’, ‘माझा’ हा सगळा व्यवसाय सहा कोटी अमेरिकन डॉलर्स इतक्या क्षुल्लक किमतीला कोकाकोलाला विकून या धंद्याला कायमचा रामराम ठोकला.

..................................................................................................................................................................

१९७७ साली आणीबाणी हटली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान, तर जहाल कामगारनेते, भांडवलशहा आणि ‘भांडवलशाहीचे शत्रू’ जॉर्ज फर्नांडिस हे उद्योगमंत्री झाले. त्यांना कोकाकोलाला धडा शिकवून सगळ्या भांडवलशहांना दमात घ्यायचे होते. कायद्यातील तरतुदींचा आधार घेत त्यांनी कोकाकोलाला आपला शीतपेयाचा ‘तथाकथित’ गुप्त फॉर्म्युला उघड करायला सांगितले. याला कोकाकोला कधीही तयार होणार नाही, हे जॉर्जना माहिती होते. कोकाकोलाने यातून मार्ग काढायचा बराच प्रयत्न केला. पण इरेला पेटलेल्या जॉर्जसमोर त्यांचे काही चालले नाही. अखेर त्यांनी भारतातून आपले चंबूगबाळे हलवले. त्यामुळे त्यांच्या मालकीचे २२ बॉटलिंग प्लांट बंद पडले आणि जवळपास १० हजार लोक बेकार झाले.

.................................................................................................................................................................

आता कोकाकोला भारतात सगळ्यात मोठा शीतपेयांचा उत्पादक होता आणि त्यानंतर पेप्सी. कोकाकोलाने हळूहळू पार्लेची एकएक पेयं बंद करून त्याजागी आपली पेयं आणणं सुरू केलं. पहिला बळी गेला ‘गोल्डस्पॉट’चा. त्याजागी आला ‘फंटा’. (हा फंटा म्हणजे मूळ जर्मन ब्रॅण्ड! अगदी नाझी जर्मनीत उदयाला आलेला! म्हणजे झालं असं की, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर व्यावसयिक निर्बंध आणल्यानं जर्मनीतील कोकाकोला कंपनीला आपला धंदा करता येईना, म्हणून मग जर्मनीतील कोकाकोलाचा मुख्य व्यवस्थापक मॅक्स कीथने फंटा हे पेय बनवलं. आज ते जगात सगळ्यात जास्त खपणाऱ्या शीतपेयांपैकी एक आहे.) नंतर नंबर लागला ‘लिम्का’चा, मग ‘सिट्रा’चा. त्यांच्या जागी आलं ‘स्प्राईट’. आणि शेवटी ‘थम्सअप’. अर्थात ते पूर्ण बंद कधीच झालं नाही.

पार्लेची पेयं हळूहळू बंद करत त्याजागी कोकाकोलाची पेयं लोकांच्या गळ्यात बांधायचा किंवा घशात ओतायचा कोकाकोलाचा मूळ प्लॅन. पण त्यांच्या लक्षात आलं की, थम्सअपचा भारतीय कोला पेयाच्या बाजारात ८५ टक्के हिस्सा होता. तो पूर्णपणे आपल्याला मिळत नाहीये, मिळणारही नाही. उलट पूर्वी थम्सअप पिणारे लोक आता तो मिळेनासा झाल्यावर कोकाकोलाऐवजी पेप्सीकडे वळताहेत. भारतीय स्पर्धक न उरल्यानं आता स्पर्धा होती पेप्सी आणि कोकाकोला या दोन महाकाय कंपन्यांमध्ये.

१९९४ साली खूप जुनी अशी पारशी शीतपेयाची कंपनी ‘ड्युक्स’ ही पेप्सीनं विकत घेतली आणि आणखी एका भारतीय कंपनीचा बळी गेला. १९९६ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या वेळी ही स्पर्धा अधिक हिडीस झाली. कोकाकोला क्रिकेटचा ‘ऑफिशियल स्पॉन्सर’ बनली, तर स्वत: ‘ऑफिशियल स्पॉन्सर’ बनण्याचे प्रयत्न करणारी पेप्सी लगेच ‘नथिंग ऑफिशियल अबाउट इट’ म्हणत जोरदार जाहिरातबाजी करू लागली. यात पैसा घालवून हात शेकून घेतले कोकाकोलाने, पण खरं तर या जाहिरात युद्धात हात धुवून घेतले जाहिरातदारांनी, सेलिब्रेटींनी आणि वितरकांनी. थम्सअपचा पारंपरिक ग्राहक आपल्याऐवजी पेप्सीकडे वळतो आहे आणि आपण ते थांबू शकत नाही, हे पाहून कोकाकोलाने थम्सअपला परत बाजारात जोरदारपणे उतरवलं आणि बऱ्याच प्रमाणात पेप्सीकडे वळणारा ग्राहक परत आपल्याकडे खेचला.

आजही भारतीय तरुणात थम्सअप आवडणारे आणि पेप्सी किंवा कोकाकोला आवडणारे असे स्पष्ट दोन वर्ग आहेत. ‘टेस्ट द थंडर’ नावाचं वादळ अजूनही चालूच आहे. २००० साली लिम्कादेखील परत आला किंवा आणावा लागला. आजदेखील मूळ अस्सल भारतीय, पण सध्या कोकाकोला या परकीय कंपनीच्या मालकीचं ‘थम्सअप’ हे शीतपेय कोकाकोला किंवा पेप्सीपेक्षा अधिक खपतं. लिम्काचीदेखील तीच गत आहे. जनता त्यांना विसरली नाही, पण जनतेचं काय हो... तिला कायम गृहीतच धरलं होतं… पूर्वी पार्लेने आणि आता पेप्सी व कोकाकोलाने.

मल्टिप्लेक्सच्या, मॉल्सच्या जमान्यात कोकाकोला, पेप्सी आपली पेयं अनेक मल्टिप्लेक्स मालकांना नाममात्र किमतीत देत असताना, ते मात्र एक कपभर पेय ८०-८५-१०० वाटेल त्या किमतीला विकतात. घरून नेलेलं पाणी चालत नाही, तिथलंच बाटलीबंद पाणी विकत घ्यावं लागतं. तिथं बायकांच्या पर्समध्येही हात घालून सिक्युरिटी पाण्याची बाटली तर नाही ना, हे तपासतात. साधा हॉटेल-रेस्टॉरंटवाला किंवा किराणा दुकानदार शीतपेयांचा फ्रीज कंपनीनं दिलेला असूनही आणि काही प्रसंगी त्याचं विजेचं बिलदेखील वितरक कंपनी भरत असतानाही शीतपेय थंड करायचे दोन-अडीच रुपये जादा लावतो… छापील किमतीपेक्षा जास्त किंमत आकारायची नाही, असा कायदा असतानासुद्धा. आणि आपली फसवणूक होते आहे, असं ग्राहक राजालादेखील वाटत नाही. हे ग्राहकराजे रस्त्यावरच्या भाजीवालीकडून भाजी घेतल्यावर कडीपत्ता किंवा मिरची फुकट मिळावी म्हणून भांडतात, पण शीतपेयं निमूटपणे दुकानदार सांगेल त्या किमतीला घेतात. असो.

आताशा अनेक लहान लहान प्रादेशिक ब्रॅण्ड्स या स्पर्धेत उतरू लागलेत. जरी ते लहान, स्वत:च्या प्रदेशापुरते मर्यादित असले तरी सगळे मिळून भारतीय शीतपेयांच्या बाजारातला २४ टक्के इतका हिस्सा काबीज करून आहेत.

या प्रकरणाचा आता कुठे दुसरा अध्याय संपतो आहे. तिसऱ्या अध्यायात काय घडेल हे पाहणे मोठे रंजक असणार आहे हे नक्की.

मी पुणेकर असल्याने या शीतपेय आणि पुण्याबाबत एक महत्त्वाची आणि रंजक माहिती देण्याचा मोह आवरत नाही. अमेरिकेत कोकाकोला (१८८६) सुरू व्हायच्या दोन वर्षं आधी पुण्यात एक शीतपेय सुरू झालं होतं आणि आजही ते आपलं अस्तित्व टिकवून आहे. ते म्हणजे ‘अर्देशीर’. आज १३६ वर्षांनंतरदेखील सुरू असणारी ही पुण्याची शीतपेय बनवणारी कंपनी. त्यांची दहा प्रकारच्या चवीत उपलब्ध असणारी शीतपेयं भारतात (आणि कदाचित जगातदेखील) सगळ्यात जुनी, अजूनही चालू असलेली आणि मुख्य म्हणजे आपली मूळ मालकी टिकवून असलेली छोटेखानी शीतपेयं आहेत. या कंपनीचे संस्थापक अर्देशीर खोदादाद मूळचे इराणी. मुस्लीम धर्मछळाला घाबरून/कंटाळून १८६५ साली ते इराणच्या यझद प्रांतातून भारतात आले. सुरुवातीला ते इतर पारशांप्रमाणे मुंबईत आपले बस्तान बसवू इच्छित होते, पण काही कारणाने त्यांची डाळ मुंबईत शिजेना. मग ते पुण्यात आले आणि पुण्यातल्या लष्कर भागात (आजचा कॅम्प एरिया) राहिले. तिथं त्यांना जाणवलं की, या भागातले ब्रिटिश सोजीर दारूत मिसळायला सोडा म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड विरघळवून बनवलेलं, फसफसणारं, जिभेवर चुरचुरणारं पाणी साध्या पाण्यापेक्षा जास्त पसंत करतात. पण भारतात तेव्हा तयार बाटलीबंद सोडा मिळण्याची सोय नव्हती आणि इंग्लंडवरून येणारा सोडा महाग आणि सहज मिळेलच, याची शाश्वती नसे. अर्देशीर यांनी ही संधी हेरून असा सोडा बनवण्याचा धंदा चालू केला. त्या काळी कार्बन डाय ऑक्साईडचे सिलिंडर वगैरे नसत. त्यामुळे अर्देशीर कोळसे जाळून त्यापासून कार्बन डाय ऑक्साईड तयार करत. मग तो व्यवस्थित फिल्टर वगैरे करून त्यापासून सोडा बनवत. हे सगळं ज्ञान त्या काळी त्यांनी कसं मिळवलं, कोण जाणे! पण त्यांचा हा बाटलीबंद सोडा ब्रिटिश सोजिरांना एकदम आवडला. मागणी वाढली तशी घरात चालू असलेला हा उद्योग त्यांनी कॅम्पातल्याच गफार बेग रस्त्यावर सेठना या पारशी कुटुंबाची मालकी असलेल्या मोठ्या जागेत हलवला. या त्यांच्या उद्योगानं तिथल्या चौकाचं नाव ‘सरबतवाला चौक’ असं पडलं. आजतागायत ही ‘अर्देशीर अँड सन्स’ ही शीतपेयांची कंपनी इथूनच कारभार करते.

पारशी लोक भारतात खूप आधीपासून म्हणजे कमीत कमी १०००-१२०० वर्षांपासून आहेत, पण १९-२०व्या शतकात इराणमधून जे पारशी आले, त्यांनी मुख्यतः हॉटेल, कॅफे, शीतपेय असले खाद्य, पेय पदार्थांचे उद्योग चालू केले. त्यांच्या हॉटेलांना ‘इराण्याचे हॉटेल’ असं म्हणत आणि त्यांना स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पुण्या-मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळंच स्थान होतं. कॅफे नाझ, कॅफे गुडलक, लकी, येझदान अशी पुण्यातली तर ब्रिटानिया, मेरवान, याझदानी, कयाणी अशी मुंबईतली इराणी हॉटेलं आजही अनेकांच्या मनात आठवणींचे धागे धरून आहेत. पुण्यातलं सगळ्यात जुने दोराबजी (१८७४) हे त्या अर्थानं इराणी हॉटेल नव्हे, ते पारशी हॉटेल आहे, हेही जाता जाता सांगायला हवं.

तर कुठल्याही अस्सल सणकी/विक्षिप्त पारशाप्रमाणे या गृहस्थाचं आपल्या मुलाशी पटत नसे. मुलगा फ्रामजीही स्वभावानं तसाच. म्हणून मग त्यानं बापापासून वेगळं होऊन स्वत:चा पुन्हा शीतपेयाचाच उद्योग सुरू केला, फ्राम्स नावानं. ही कंपनीदेखील त्या काळी पुण्यात नावारूपाला आली. (आज मात्र ती बंद पडली आहे.) बापाचं मुलाशी पटत नसलं तरी आजोबांचं नातवाशी पटे. त्यामुळे आजोबांचा म्हणजे अर्देशीर यांचा उद्योग फ्रामजीच्या मुलानं म्हणजे गिलानी इराणीने पुढे चांगला सांभाळला. आज मर्झबन इराणी यांचं वय ४८ आहे. म्हणजे त्यांची चौथी पिढी हा छोटेखानी उद्योग सांभाळते आहे.

दोराबजी, जॉर्ज, रुस्तमस, कॅफे याझदान, कॅफे वोहुमन, ब्ल्यू नाईल अशा जुन्या इराणी/ पारशी हॉटेलातच फक्त ही शीतपेयं मिळतात. शिवाय अनेक पारशी समारंभात, सोहळ्यात, मेळाव्यात यजमान ही शीतपेयं आवर्जून मागवतात. अन्य बाजारात, रिटेल दुकानात ती मिळत नाहीत. ही पेयं फक्त काचेच्या बाटल्यातच मिळतात. त्यामुळे जुन्या शिरस्त्याप्रमाणे १० रुपये डिपॉझिट ठेवावे लागतात अन रिकामी बाटली परत करून पैसे घ्यावे लागतात. त्यामुळे ते आज कुणी दुकानदार मान्य करत नाही. मी स्वत: पेप्सी किंवा कोकाकोला स्प्राईट असं कोणतंही पेय पित नाही, पण कधी कॅम्पात गेलो तर ‘अर्देशीर’ नक्की घेतो.

साधा सोडा, आईसक्रीम सोडा (हा प्रकार मला ट्राय करायचा आहे), ग्रीन ऍपल, पीच, पायनॅपल, ऑरेंज, लेमन (निंबूसोडा) जीरा मसाला, जिंजर सोडा आणि सगळ्यात प्रसिद्ध आणि फक्त पारशी इराणी शीतपेयातच सापडणारे ‘रास्पबेरी’ अशा दहा प्रकारच्या चवीत शीतपेयं पुरवणारी ‘अर्देशीर अँड सन्स’ पुण्याचा मानबिंदू म्हणणं जरा जास्त होईल, पण ती हृद्य ओळख नक्कीच आहे.

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

VINOD SATVE

Wed , 27 October 2021

आणि आणखी एक. मुंबईहून अलिबाग ला रस्त्याने जाताना मधे कुठेतरी एक खूप जुनी कोल्ड्रिंक्स ची फॅक्टरी आहे, आणि तिथेच त्याची विक्री होते. मी फक्त एकदाच तिथे गेलो होतो, पण त्याची प्रखर आठवण तुमचा लेख वाचताना आली.


VINOD SATVE

Wed , 27 October 2021

तुमचा हा लेख खूप माहितीपूर्ण तर आहेच, पण काही काही ठिकाणी ती माहिती आपण रंजक पद्धतीने प्रस्तुत केली आहे. खूप खूप धन्यवाद. मुळात थम्सअप ला आमची पिढी विदेशी कोकाकोला ची औलाद (क्षमस्व ब्रँड) समजत होतो, पण त्याचे मूळ भारतीय असल्याचे या लेखातून समजले आणि अभिमान वाटला. तरीपण आम्ही ज्या क्रिकेटर्स, अभिनेते यांचे चाहते असतो, ते या विदेशी कंपन्यांच्या "जाहिरातीसाठी वाट्टेल ते" बोलतात ते पाहून वाईट वाटते. खरे म्हणजे आता आपल्या मातीतल्या ब्रॅण्डना जास्त मोठे करणे महत्वाचे होऊन बसले आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा