जॉन स्टाईनबेक यांनी लिहिलेली ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या कादंबरीची पहिली अमेरिकी आवृत्ती १९३९मध्ये प्रकाशित झाली. पहिल्याच वर्षात तिच्या जवळजवळ पाच लाख प्रती विकल्या गेल्या. असं दणदणीत स्वागत लेखकालाही अनपेक्षित होतं. संपन्न अमेरिकेत अनेकांची अशीही विप्पनावस्था होऊ शकते, हे जाणवून वाचक हादरले. कादंबरीवर एकीकडं कौतुकाचा वर्षाव होत होता आणि दुसरीकडं अश्लीलतेचे, अतिशयोक्तीचे आणि धादान्त खोटी माहिती रेटण्याचे आरोप होत होते. मात्र या कादंबरीला १९४०चा पुलित्झर सन्मान मिळाला. एवढेच नव्हे, तर जॉन स्टाईनबेक यांच्या साहित्याच्या योगदानाची दखल घेऊन १९६२ या वर्षी साहित्यासाठी नोबेल पुरस्कारदेखील दिला गेला.
या कादंबरीला जो अमेरिकी वास्तवाचा आधार आहे, तो प्रथम थोडक्यात पाहूया.
पार्श्वभूमी
खासगी उद्योग-व्यवसाय-व्यापार यावर आणि गुंतवणुकीसाठी शेअरबाजारावर भांडवली अर्थव्यवस्था अवलंबून असते. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा शेअरबाजार १९२९ साली जबरदस्त कोसळला. त्या आधीही अशा आर्थिक आपत्ती १८७३, १८९३, १९०१, १९०७मध्ये आल्या होत्या. अमेरिका आणि युरोप यांच्या बाजारपेठा परस्परांवर खूप अवलंबून असल्यानं दोन्हीकडील अर्थतज्ज्ञ या आर्थिक संकटांच्या लाटांची कारणं आणि त्यातून सुखरूप बाहेर पडण्याचे मार्ग शोधू लागले. मध्यम आणि उच्चवर्गीय लोकांनी मात्र गेल्या अनुभवांवरून स्वतःचे पैसे गुंतवून विकत घेतलेले शेअर विकून पैसे करण्याचा सपाटा लावला. परिणामी, लहान-मोठ्या उद्योगांना आणि शेतकऱ्यांना कर्जे देण्यास बँका असमर्थ ठरल्या. उद्योग, व्यवसाय, शेती, व्यापार वेगानं बंद पडू लागले. शहरांतून नोकऱ्या मिळेनाशा झाल्या. दारिद्र्य वाढलं, महागाई होऊ लागली, उपासमार प्रचंड वाढली. तरीही लोकांच्या हाती पैसा नसल्यानं अन्नधान्यासह सर्व वस्तूंची मागणी कमी कमी होत होती. आधीच्या अनुभवांच्या तुलनेत आलेली ही आर्थिक मंदी खूप भयंकर होती. तिचे आर्थिक परिणाम अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या वसाहतींपर्यंत पोचले. या जागतिक मंदीचं नाव ‘ग्रेट डिप्रेशन’, ‘महामंदी’! जगाची अर्थव्यवस्था डळमळीत करणारी ही महामंदी अमेरिकेला जवळपास एक दशकभर पुरून उरली.
..................................................................................................................................................................
“जॉन स्टाईनबेक यांची ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही कादंबरी वाचकाला एकीकडं आकर्षित करते आणि दुसरीकडं कादंबरीतील वास्तवाविषयी घृणा किंवा तिरस्कारदेखील निर्माण करते. ती वास्तवातील भयंकरता कधी इतक्या वास्तव रूपात चितारते की, पुढील प्रकरण वाचायचा धीर होत नाही. परंतु हातातील पुस्तक खाली ठेववतही नाही. किंवा मन एखादं पान न वाचताच ते उलटवूही देत नाही. मान्य आहे की, कादंबरीतील काही शब्दचित्रं ओबडधोबड आहेत. परंतु जीवनातही ओबडधोबड जागा असतातच, नाही का? त्याच बरोबर कुणी वास्तव-जीवनातील काही जागा सर्वांगसुंदरतेनं प्रकाशित करून त्यांकडं तुमचं लक्षही वेधतं, त्याचप्रमाणं कादंबरीतील काही जागा सर्वांगसुंदरतेनं झळाळून उठतात आणि वाचकाचं लक्ष वेधून घेतात.”
.................................................................................................................................................................
याच सुमाराला महामंदीचं बोट धरून मध्यअमेरिकेतील ग्रामीण भागात मानवनिर्मित दुष्काळ थैमान घालत होता. मिसिसिपी नदी आणि पश्चिमेकडील खंडकांची पर्वतराजी या दरम्यानचा दक्षिणेकडील टेक्सास ते उत्तरेकडील नेब्रास्का या दरम्यानच्या सर्व राज्यांचा भूभाग बहुतांश सपाट गवताळ होता. समुद्रमार्गानं अमेरिकेत आलेले आणि हळूहळू पश्चिमेकडं सरकणारे युरोपी लोक मूळनिवासी लोकांच्या कत्तली करत, ते कसत असलेली जमीन आपापसात शेतीसाठी वाटून घेत होते.
त्यातूनच पुढे युरोपी देशांच्या अमेरिकेत वसाहती झाल्या. या भागातलं गवती आच्छादन हळूहळू आक्रसत गायब होऊ लागलं. साहजिकच उन्हाळी वाऱ्यांना अडवायला जवळपास ना जंगल होतं, ना मोठाल्या डोंगर-पर्वतरांगा. शेतीखालील जमिनीचं क्षेत्र वाढत गेलं, तसतसं धुळीच्या वादळांची वारंवारिता आणि तीव्रता वाढू लागली. हे बदल सावकाशीनं तीन ते चार शतकं घडत होते.
परिणामी, महामंदीच्या आसपासच्या काळात या गवताळ पठरांवरील राज्यांपैकी मुख्यत: ओक्लाहोमा आणि अर्कानसास या दोन राज्यांत आकाशात कायम दाट धूळ असल्यानं सूर्यदर्शन होईना. हा प्रदेश ‘डस्ट-बोल’ म्हणून गाजला. सूर्यप्रकाश नसल्यानं पिकं वाढणं अशक्य होतं. वाढत्या दारिद्र्याचं हे दुसरं मानवनिर्मित कारण मात्र स्थानिक होतं.
शेतीचा शोध हे वरकड संपत्ती धान्य रूपात तयार करण्याचं माणसाला सापडलेलं पहिलं तंत्र. ते सार्वत्रिक होण्यास पाच-सहा हजार वर्षं तरी लागली असावीत. त्यानंतरच्या किमान पाच-सहा सहस्त्रकांत शेतीच्या आधारानं मानवाचं भटकंतीचं जीवन संपुष्टात येऊ लागलं. समृद्ध अमेरिकेच्या वरील दोन राज्यांत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र शेती करणं अवघड झालं. मालकांची शेती खंडानं कसणारे शेतकरी हवालदिल झाले. त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ लागली. शेतकऱ्यांची ‘शेतकरी’ ही ओळख, म्हणजे अस्मिता वरील दोन मानवनिर्मित कारणांनी पुसून टाकली. साहजिकच स्थानांतरं करत फिरणारी ही कुटुंबं देशोधडीला लागली.
अमेरिका : १९३४ या वर्षातील धुळीची वादळं
या पूर्वीच कॅलिफोर्निया राज्यातील शेतीसाठी पाण्याची सोय करवून घेऊन कार्पोरेट कंपन्या यंत्रं वापरून तिथली बहुतांश शेती करू लागल्या होत्या. शेती हा भांडवली व्यवसाय बनण्याची स्वप्नं तिथं वेगानं जमिनीवर उतरत होती. सुगीसाठी वापरण्यायोग्य यंत्रं निर्माण होण्याच्या वाटेवर होती, परंतु अजून बाजारात आलेली नव्हती. त्यामुळं जेवढ्या आकाराच्या शेतासाठी इतर वेळी २० शेतमजूर पुरे होत, तिथं फळबागांच्या सुगीच्या हंगामात दोन दोन हजार शेतमजुरांची गरज जाणवू लागली. या कंपन्यांना कर्जे देणाऱ्या खासगी बँकांची भरभराट होत होती.
धुळीच्या वादळी प्रदेशातील जमीनमालकांची शेती गेल्या तीनचार पिढ्यांपासून खंडानं कसणाऱ्या कुटुंबांना शेतांवरून हुसकवून लावण्यास मालकांना सुरुवात करावी लागली. यावर राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर (Herbert Hoover) यांच्या दिशाहीन शासनानं राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरून कॅलिफोर्निया राज्यात स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी नावापुरते मोजके कॅम्प उभारले. तेथील गैरसोयी आणि स्थलांतर करून शेतमजूर होऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांची हलाखी फुफाट्यातून आगीत पडल्यासारखी झाली. हट्टानं तिथंच राहू पाहणाऱ्यांचे निवारे ट्रॅक्टरनं जमीनदोस्त करून त्यांना हुसकवून लावलं गेलं किंवा संपवलं तरी गेलं. आता कॅलिफोर्नियाप्रमाणं धुळीच्या वादळी प्रदेशातसुद्धा यांत्रिक शेती करण्यास सुरुवात करायची संधी कार्पोरेट कंपन्यांना दिसत होती. या कंपन्यांना शासनाचं मोठं आर्थिक पाठबळ होतं.
महामंदी आणि धुळीच्या वादळी आपत्तींच्या थोडे आधी म्हणजे १९०२ या वर्षी कॅलिफोर्निया राज्यातील सुपीक खोऱ्यातील सलिनास या टुमदार शहरात जॉन स्टाईनबेक (John Steinbeck) यांचा जन्म झाला. स्थलांतराच्या वरील घटना घडत असताना तरुण धडपडे स्टाईनबेक लेखक बनू पाहत होते. त्यांच्या नजरेसमोर तेव्हा अकुशल कामं मिळण्याच्या आशेनं मुख्यत: ओक्लाहोमा आणि अर्कानसस राज्यांतून हजारो लोकाचे तांडे कॅलिफोर्नियात धडकत होते. शेती करणाऱ्या कुटुंबांनी कॅलिफोर्नियात जाण्यासाठी खरीदलेली शेतीची अवजारं, कामासाठी पाळलेले घोडे आणि इतर किडूकमिडूक सामान भंगारात कवडीमोलानं विकलं. आलेल्या पैशांतून जुजबी दुरुस्ती करून चालू केलेली भंगारातील ट्रक, टेम्पो या प्रकारची वाहनं चढ्या किमतीला विकत घेतली होती. ‘परिणामकारक अक्कल नसलेले गरजवंत’ वेगानं वाढत असल्यानं त्यांच्या राज्यात विक्री-खरेदी बाजारपेठा नव्यानं उभ्या राहिल्या होत्या. रोजच्या गरजेचं समान सोबत घेऊन अशा वाहनांतून कुटुंबं मोलमजुरीच्या आशेनं मुख्यत: कॅलिफोर्निया राज्यातील मध्यवर्ती खोऱ्याच्या प्रदेशात स्थलांतरं करू लागली होती. कॅलिफोर्नियातील कॉर्पोरेट शेतीचे अधिकारी आणि तुलनेने छोटे शेतकरी यांनी दिलेल्या प्रचंड संख्येनं शेतमजुरांची गरज असल्याच्या जाहिराती ही त्यांची स्थलांतरासाठी प्रेरणा होती. तिथं गेल्यानंतर मात्र या स्थलांतरितांचा ‘ओकीज’ या हेटाळणीपूर्वक आणि तिरस्कारभरल्या नावानंच उल्लेख होई.
‘द सॅन फ्रान्सिस्को न्यूज’ या वृत्तपत्रानं मात्र भुकेनं हैराण झालेल्या या स्थलांतरितांच्या उघड्यावरील आयुष्यांचा आँखो देखा हाल अभ्यासून त्यावर लिहिण्याची विनंती स्टाईनबेक यांना केली. त्यानुसार १९३६ सालच्या ऑक्टोबरमधील ५ ते १२ या तारखांना स्टाईनबेक यांनी लिहिलेले दीर्घ निबंध ‘द हार्वेस्ट जिप्सीज’ नावाच्या सदरातून ‘द सॅन फ्रान्सिस्को न्यूज’ या वृत्तपत्रानं क्रमश: प्रसिद्ध केले.
धुळीच्या वादळांनी अमेरिकी लोकांना अमेरिकेतच असे स्थलांतरित बनवलं
‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही कादंबरी लिहिण्याची तो वृत्तपत्रीय अनुभव ही प्रेरणा होता. कादंबरी प्रथम प्रसिद्ध झाल्यावर स्टाईनबेक यांच्यावर टीकेची राळ उडवली जात असताना अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी एलेअनॉर रूझवेल्ट (Eleanor Roosevelt.) यांचे ‘माय डे’ या सिंडिकेटड सदरातून कादंबरीला प्रशस्तीपत्र मिळाले. त्यात त्या म्हणतात, “एक ग्रंथ वाचून नुकताच पूर्ण केलाय, हे मी तुम्हाला सांगितलेच पाहिजे. कारण, त्या ग्रंथवाचनानं अविस्मरणीय आनंद दिला आहे. जॉन स्टाईनबेक यांची ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ ही कादंबरी वाचकाला एकीकडं आकर्षित करते आणि दुसरीकडं कादंबरीतील वास्तवाविषयी घृणा किंवा तिरस्कारदेखील निर्माण करते. ती वास्तवातील भयंकरता कधी इतक्या वास्तव रूपात चितारते की, पुढील प्रकरण वाचायचा धीर होत नाही. परंतु हातातील पुस्तक खाली ठेववतही नाही. किंवा मन एखादं पान न वाचताच ते उलटवूही देत नाही. प्रस्तुत कादंबरी धर्मविरोधी असल्याचीही टीका वाचनात आली आहे. परंतु ‘मा’ या पात्रचं जे समंजस चित्र कायम दृढ आणि विशाल करत कादंबरी पुढे सरकत राहते, त्यातून त्यांच्या सर्वसमावेशक प्रेमाचा प्रत्ययच वाचकांची सोबत करत असतो. मान्य आहे की, कादंबरीतील काही शब्दचित्रं ओबडधोबड आहेत. परंतु जीवनातही ओबडधोबड जागा असतातच, नाही का? त्याच बरोबर कुणी वास्तव-जीवनातील काही जागा सर्वांगसुंदरतेनं प्रकाशित करून त्यांकडं तुमचं लक्षही वेधतं, त्याचप्रमाणं कादंबरीतील काही जागा सर्वांगसुंदरतेनं झळाळून उठतात आणि वाचकाचं लक्ष वेधून घेतात.”
या कादंबरीवर आधारित ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ याच नावाचा चित्रपट १९४० साली अमेरिकेत प्रदर्शित झाला. त्याचं दिग्दर्शन जागतिक कीर्तीच्या जॉन फोर्ड यांनी केलं आणि त्यातील एक प्रमुख भूमिका हेन्री फोंडा यांनी साकारली होती. या कादंबरीनं ५९ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्तानं नवी आवृत्ती १९६७ साली पेंग्विन्स क्लासिक्सनं प्रसिद्ध केली. या कादंबरीवरून फ्रँक गलाटी यांनी इंग्रजी नाटकाची संहिता तयार केली आणि त्याचा पहिला प्रयोग १९८८ या वर्षी इलिनोइस राज्यातील शिकागो येथे झाला.
अशी ही गाजलेली कादंबरी मिलिंद चंपानेरकर यांच्या वाचनात १९८०च्या आसपास आली. तिनं त्यांना झपाटलं. अमेरिकेतल्या ज्या ६६ क्रमांकाच्या महामार्गावरून गोरगरीब कुटुंबं स्वतःची ‘शेतकरी’ ही ओळख पुसून कॅलिफोर्नियात ‘ओकीज’ म्हणून जात होती, त्या महामार्गाचे फक्त अवशेष उरलेले असल्याचं माहीत असून एकेकाळाचा तो महामार्ग आणि त्याच्या आसपासचा प्रदेश अनुभवण्यासाठी चंपानेरकर अमेरिका वारी करून आले. मार्च २०२०मध्ये ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ याच नावानं इंग्रजी कादंबरीचं चंपानेरकर याचं मराठी रूपांतर रोहन प्रकाशनानं पसिद्ध केलं. मूळ कादंबरी, तीवर आधारित चित्रपट, नाटक आणि अनुवादित मराठी कादंबरी या साऱ्यांनी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ हेच नाव कायम ठेवावं, असं त्या नावात आहे तरी काय, असा प्रश्न मराठी वाचकांना पडणं स्वाभाविक आहे. चंपानेरकरांनी आपल्या ‘मनोगतात’ दिलेलं त्याचं समर्पक उत्तर (पृष्ठ १८-१९) वाचकांनी आवर्जून वाचावं आणि अभ्यासावं असं आहे. कादंबरी वाचकाला ठिकठिकाणी अनुवादात जीव ओतलेला अनुवादक भेटतो आणि जाणवतं की, गेल्या ४० वर्षांत या कादंबरीच्या अनुवादाचं बीज मनात रुजून त्याचा वृक्ष झालाय.
या मराठी कादंबरीतील प्रमुख पात्रं अशी आहेत - नोहा, टॉम, अल, रोझ ऑफ शेरॉन किंवा रोझाशर्न, रूथी (वय १२) आणि विनफील्ड (वय १०) अशी सहा मुलं असणारं जोडपं म्हणजे ‘पा’ आणि ‘मा’. अंकल जॉन हा या पांचा भाऊ. तो गावात आता एकटा राहतो. पा कसत असलेल्या शेतावरील घरात मा आणि पा, तसंच पांचे वृद्ध आई-वडील- ग्रँपा आणि ग्रॅन्मा राहतात. या शिवाय, रोझाशर्नचा नवरा कॉनी, कादंबरीत टॉमच्या घराकडील प्रवासात प्रथम भेटलेला आणि ‘मी प्रीचर होतो, पण आता मी प्रीचर नाही’ असं सांगणारा जिम कॅसी, अशी एकूण १२ जणं पोटासाठी स्थलांतराला निघतात. कॅलिफोर्नियाच्या प्रवासात पहिल्या दिवशी रात्र पडू लागल्यावर संध्याकाळी भेटलेले अॅव्ही आणि सॅरी हे विल्सन जोडपं पुढचे तीन-चार दिवस जोड कुटुंबात विरघळून जाण्याचा अनुभव गदगदून टाकणारा आहे. त्याच वेळी फ्लॉईड, कॅसी आणि टॉम यांच्यात जीवाची बाजी लावून इतरांच्या हक्कांचं संरक्षण करण्याची जिद्द कशी तयार होते, याच्या प्रक्रिया अनुभवताना ‘हो, हे या व्यक्तींच्या मध्येच शक्य आहे’, असं वाचकाला जाणवून जातं. लेखक पात्रांवर कुठंही बळजबरी करत नाही, हे जाणवून वाचकाचं मन एकाच वेळी हळहळतं आणि उचंबळूनही येतं.
स्टाईनबेक यांनी अगदी विचारपूर्वक कादंबरीची रचना केली आहे. तशीच रचना मराठी रूपांतरानं स्वीकारली आहे. या रचनेची मोजकी वैशिष्ट्यं पुढील शब्दात अशी सांगता येतील :
१) ठरवलं, तर या कादंबरीचा विषय एका वाक्यात असा सांगता येईल- ‘ही कादंबरी ‘जोड’ (Joad) कुटुंबानं ओक्लाहोमातील पॅनहँडलजवळील सालिसॉपासून ते कॅलिफोर्नियातील सॅलीनासपर्यंत पोटासाठी केलेल्या सुमारे ३-३.५ हजार कि.मी. (सुमारे २००० मैल) स्थलांतराच्या प्रातिनिधिक प्रवासाचा बहुआयामी अनुभव चितारते.’ प्रत्यक्ष कादंबरीत एकूण तीस प्रकरणं आहेत. त्यापैकी जवळपास निम्मी आणि तुलनेनं बरीच छोटी प्रकरणं आहेत. ती प्रकरणं हळूहळू बदलत्या वास्तवाची नोंद क्रमाक्रमानं वाचकांपुढं ठेवतात. उरलेली निम्मी प्रकरणं जोड कुटुंबातील व्यक्ती त्या वास्तवाला कसा प्रतिसाद देतात, त्यांच्यात कसे ताण-तणाव निर्माण होतात, ही पात्रं आपापल्या परीनं उद्ध्वस्त जीवन कसं उभारू पाहतात, त्यातून जाताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कसकसे बदल होत जातात, आणि त्यांच्या भिन्न मर्यादाही कशा प्रकटत, हे चितारतात. एखादा अपवाद वगळता दोन्ही प्रकारची प्रकरणं एकाआड एक या प्रमाणं एकमेकांना पूरक ठरत कादंबरीत येतात. लेखकानं हा जो घाट (form) कादंबरीलेखनासाठी निवडला आहे, तो जोड कुटुंबाचा अनुभव प्रातिनिधिक ठरण्याला खूप मदतकारक झाला आहे.
२) टॉमचा अपवाद वगळता कादंबरीतील बाकी सर्व पात्रं मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा वापरतात. ती सहज समजू शकते. त्यातून पात्र-चित्रणाला वास्तवता मिळते आणि बोलीभाषा वापरून त्या व्यक्तींचा मानवी सन्मान आणि प्रतिष्ठादेखील जपली जाते. फक्त टॉम हे पात्र प्रमाण मराठी भाषा वापरतं.
..................................................................................................................................................................
लॉकडाऊनमुळे मोलानं होणारी घरकामं ते अनेक उद्योग, बंद पडले. कमाई होत नसताना शहरात राहणं अनेकांना अशक्य झालं. त्यापायी माणसांचे तांडेच्या तांडे शहरातून जिथं कुठं त्यांचं लहानपण अकाली हरवलं होतं, तिथं पोटासाठी काही शेकडो ते हजारभर किलोमीटरची पायपीट करत परतत होते. हे लॉकडाऊननं कुणालाच न पेलणारं दुसरं उलट-विस्थापन घडवलं होतं. मूळं रुजली तिथं तरी त्याचं परतणं कुणाला पसंत होतं, हे कळायलाही मार्ग नव्हता. स्टाईनबेक यांची कादंबरी हातात असताना अनेकांच्या संवेदनशील मनात या विस्थापनाचीही आठवण माझ्याप्रमाणं जागी होत असेल. दिल्लीच्या सीमा ओलांडून राजधानीत येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांत कसला रोष धुमसतो आहे, तो कोणत्या प्रक्रियांतून इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे, याचं अंतरदर्शन घडवायला जॉन स्टाईनबेक यांची प्रतिभा, प्रामाणिकपणा आणि वंचितभल्याची नजरही आवश्यक आहे.
.................................................................................................................................................................
३) उदध्वस्त जीवन पुन्हा उभारण्याच्या अस्सल प्रयत्नांच्या भावनिक प्रवाहांचं चित्रण लेखकानं सर्व पात्रांना न्याय देत केलं आहे. त्यामुळं लेखकानं एखादं गद्य महाकाव्य रचण्याचा घाट घातला असावा असं जाणवत राहतं. परिस्थितीला तोंड देणारी, तिच्या दबावाखाली चिरडली जाणारी, तिच्याशी मानहानीकारक तडजोडी करणारी ही सारी पात्रं हाडां-मांसाची माणसं म्हणून कादंबरीत उभी राहातात. जोड कुटुंबातील व्यक्तींचा म्हणजेच पात्रांचा प्रातिनिधिक भावनिक प्रवास, त्यानं घेतलेली वळणं, आणि पात्रांच्या आशा-निराशां, धर्म-पंथ, परंपरा, अनौपचारिक विचारधारा (आयडिऑलॉजी) यांच्या संस्कारातून पात्रांना प्राप्त झालेलं बळ, आलेलं परावलंबित्व, बोलण्या-वागण्यातील उघडी आणि बंद मनं आणि त्यांचे परिणाम, यांचं दर्शन कादंबरी घडवते. कधी पात्रांच्या भावनिक प्रवाहानं घेतलेली वळणं वाचकाला अनुभवाच्या उत्तुंग पातळीवर कधी घेऊन जातात.
या ६७१ पृष्ठांच्या मराठी कादंबरीचा विषय एक-दोन पानात सांगायचं ठरवलं, तर कादंबरीची विभागणी तीन भागांत करून एकेका भागाचे स्थूल वर्णन असं करता येईल:
भाग एक (०१ ते ११ प्रकरणं) : खुनाच्या गुन्ह्याखाली कैदेत चार वर्षे इमानदारीत घालवलेला पॅरोलवर सुटून कधी लिफ्ट घेत, तर कधी पायी प्रवास करत आपल्या घरी जायला निघलेला तरुण वाचकांना प्रथम भेटतो. त्याचं घर आहे ओक्लाहोमा राज्याच्या पूर्व पॅनहँडल भागातील सॅलीसॉन जवळच्या भागात. एका मालकाचं ४० एकर शेत ‘जोड’ नावाचं एक कुटुंब तीन पिढ्या कसत आहे. या तरुणाच्या कुटुंबाचं घर त्याच शेतात आहे. शेताच्या मातीत त्यांचा घाम मुरला आहे. हा प्रवास करताना आपल्या तरुणाला त्याचा प्रदेश त्या ऋतूत जसा आठवेल, तसं या प्रदेशाचं सर्वसाधारण वर्णन पहिल्या प्रकरणात आहे. वाटेत त्याला झाडाखाली बसलेलं कुणीसं दुरून दिसतं.
जवळ आल्यावर ती प्रौढ व्यक्ती थोडी बातचीत झाल्यावर त्या तरुणाला ‘टॉम जोड’ या नावानिशी ओळखते. ओळख करून देताना प्रौढ व्यक्ती स्वतःचं नाव जिम कॅसी (हे नाव आणि जिझस ख्राइस्ट हे नाव दोन्हींचं ऱ्हस्व रूप समान असणं हा योगायोग म्हणायचा का?) सांगते. टॉम लहान बाळ असताना कॅसी प्रीचर होता आणि त्यानंच लहान टॉमला बाप्तिस्मा दिल्याचं सांगतो. त्यानंतर ती दोघं मिळून गप्पा करत करत सकाळी उन्हं तापाच्या आधी टॉमच्या घरी पोहोचतात. त्यांच्या प्रवासातील गप्पांचा मुख्य विषय त्यानं एकांतात चिंतन करून प्रीचरचं काम का सोडलं, हा होता. त्यात टॉमला प्रचंड रस वाटू लागला. घरी गेल्यावर त्या कुटुंबाला शेतावरून बेदखल केल्याचं त्या दोघांनाही कळतं.
या दशकात अमेरिकेच्या पूर्वभागात ती प्रसिद्ध धुळीची वादळं (डस्ट बाऊल) शेतीची धूळधाण करत होती. आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेत महामंदी (ग्रेट डिप्रेशन) आलेली होती. त्यामुळे कादंबरीचा उरलेला पहिला भाग शेत कसणाऱ्या शेतकऱ्याचं जोड कुटुंब जुळवाजुळाव करून स्थलांतरासाठी निघेपर्यंतचा भाग टिपतो. या भागातच शेत कसणाऱ्या शेतकऱ्याची ओळख किंवा आयडेंटिटी म्हणजेच अस्मिता पुसली जाण्याची वेदना हा भाग टिपतो. तसेच, जिम कॅसी हा एके काळचा प्रीचर जोड कुटुंबाचा भाग बनत जातो आणि तो आदर्शाकडेही वाटचाल करू लागतो. हा भाग प्रवासाला निघणाऱ्या या १२ जणांची व्यक्तिमत्त्वंदेखील मोठ्या कौशल्यानं चितारतो.
भाग दोन (१२ ते २१ प्रकरणे) : हा कुटुंबाच्या प्रत्यक्ष स्थलांतराचा प्रवास आहे. प्रवासात आलेल्या अडचणी, त्यातून काढलेले मार्ग, असलेल्या अस्मिता पुसल्यामुळं झालेल्या वेदना आणि ट्रक प्रवासाची वयामुळं झालेली दगदग न झेपल्यानं पहिल्याच दिवशी विल्सनच्या तंबूत झालेला ग्रान्पाचा मृत्यू, त्या वेळी विल्सन कुटुंबानं मदत करणं, त्यामुळं ते कुटुंब जोड कुटुंबात विलीन होणं, पुढील तीन-चार दिवसांत सॅरी विल्सनची तब्येत फार बिघडते. परिणामी विल्सन कुटुंबाचं जोड कुटुंबापासून विलग होणं, ग्रान्माचा पतीवियोगानं झालेला मृत्यू, नोहानं प्रवासादरम्यान कुटुंब सोडणं. यातून कुटुंबाचं एकीकडं विखुरणं आणि कुटुंब कशाला म्हणायचे यातच त्याच्या परिणामांमुळे बदल होत जाणं हा भाग टिपतो.
शेवटचा भाग तीन (२२ ते ३० प्रकरणे) : ही प्रकरणं जोड कुटुंबाला कॅलिफोर्नियानं कशी वागणूक दिली, त्याचं चित्रण घडलेल्या पुढील महत्त्वाच्या घटना मांडत करतो : अलला या प्रवासात एक जोडीदारीण मिळते. तिच्यासाठी अल कुटुंब सोडून निघून जातो. जिमी कॅसी हा प्रीचरगिरी करणं सोडलेला एकेकाळचा प्रीचर शेतकामगारांचं लढाऊ नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरतो. असं सद्विवेकी नेतृत्व खून करून संपवलं जातं. कॅसीला गुरू मानणारा टॉम शेतकामगारांच्या पाठीशी उभा राहतो. रोझाशर्नचा नवरा, कॉनी याला स्थलांतराचे अनुभव न झेपल्यानं कुणालाच न सांगता तो परागंदा होतो. रोझाशर्न मृत बाळाला जन्म देते. या प्रवासात पा-चा आत्मविश्वास बराच ढेपाळतो. या भागात मा पांची जागा घेऊन कुटुंबप्रमुख बनत गेल्याचं आणि मा-च्या लेखी कुटुंबाची व्याख्या खूपच विस्तारल्याचंदेखील जाणवतं. स्वतः आणि होणाऱ्या बाळात आणि नवऱ्याशी गुलुगुलू बोलण्यात मग्न असणारी रोझाशर्न शेवटी मरणपंथाला लागलेल्या कुणा अनोळखी माणसासाठी कशाकशाचा त्याग करते, हे अनुभवून तर घशात आवंढा दाटून येतो.
स्टाईनबेक यांची कादंबरी हातात असताना अनेकांच्या संवेदनशील मनात या विस्थापनाचीही आठवण माझ्याप्रमाणं जागी होत असेल
एका पातळीवर कादंबरीतील या अशा घटना जोड कुटुंबाची प्रातिनिधिक वाताहत दाखवतात, तर दुसऱ्या पातळीवर काही जणांचं मानसिक उन्नयनदेखील दाखवतात. उरलेल्या पात्रांच्या ताणांखालील उन्नयनाचा हा मानसिक प्रवास देखील कादंबरीनं अत्यंत तपशिलानं चितारला आहे. तो तपशीलानं समजून घेण्यातच त्याची खुमारी आहे.
कादंबरीवाचन वाचकाचा भवताल जागा करत जातं... उत्तम साहित्य एकसंधपणे मला वाचताच येत नाही. वाचता वाचता मनात काही संदर्भ जागे होतात आणि त्यांची चित्रफित मनात चालू होते. ‘ग्रेप्स ऑफ रॉथ’ वाचत असताना मला खानोलकरांच्या ‘अजगर’ या कादंबरीतील आंबेकरांच्या चाळीत राहणारी काही पात्रांची व्यक्तिमत्त्वं खुणावत होती. पुन्हा एकदा ‘अजगर’ वाचायची जणू माझ्या ओळखीच्या त्या व्यक्ती मला आर्जवं करत होत्या. मनाचं असं भरकटणं मला आवडतं. त्यामुळं मी त्याला सहसा लगाम घालत नाही; घालू शकतही नाही. परंतु असा मी जगात एकटा नाही. थोड्याफार फरकानं या प्रकृतीचे काही मित्र माझ्याही माहितीचे आहेत. प्रस्तुत कादंबरी वाचताना ग्रामीण भागात पोट भरत नसल्यानं तिथं रुजलेल्या आपल्याच मुळांपासून स्वतःला तोडून आठवणींची ओझी मनात वागवत अनेक जण दरदिवशी शहरात, महानगरांत येतात. त्यांचं पाहिलं विस्थापन पाहिलेल्या वाचकांच्या मनात त्यांची अशी अनेक चित्रं उमटतात:
काही वर्षांपूर्वीच्या दुष्काळातून जगण्यासाठी मुंबईत आलेला एखादा वारकरी कुर्ला स्टेशनच्या फलाटावर शेवटची लोकल गेल्यानंतर उत्तररात्री तुकोबाचे अभंग एकतारीच्या साथीनं आर्जवी स्वरात गाताना एका मित्राला भेटतो. गायक उत्तररात्री मिणमिणत्या ट्यूबलायटी प्रकाशात आयुष्यातली सारी दु:खं निर्जन फलाटाला कसलाही आडपडदा न ठेवता सांगत असतो. मध्येच अलुमिनी गिलासातून पाणी पिण्यासाठी गायक थांबतो, तेव्हा त्याला समोर एक व्यक्ती बसलेली दिसते. गायक म्हणतो, ‘तुम्ही चांगल्या घरातलं दिसता. माझं येड्या गबाळ्याचं गानं ऐकत कशा पायी बसला जी?’ समोरचा मित्र त्याला सांगतो, ‘तुम्ही गाण्यात जीव ओतून गात होता. मला छान वाटलं. एका संगीत मैफलीला जाऊन येत होतो, त्याच तोडीची ही दुसरी मैफल ऐकली,’ असं म्हणून त्या मित्रानं फलाटावर राहणाऱ्या गायकाला दीडशे रुपयांची बिदागी दिली होती. मित्रानं मला ऐकवलेला हा पंचवीसएक वर्षांपूर्वीचा किस्सा, डोळे पाणावलेला संगीत प्रेमी मित्र, त्या गरिब गायकानं मोठ्या गदगदल्या मनानं भेट दिलेली ती त्याची एकतारी हे सगळं आठवलं. माझेही डोळे पाणावले. प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठी हात धुवून दुष्काळ लागला आहे. राजे बदलले, शतकं उलटली, स्वातंत्र्य मिळालं, भरपूर धरणं झाली, साखर कारखाने निघाले, महाराष्ट्रातील सत्तेनं अनेक पक्षांची सरकारं पाहिली परंतु दर दुष्काळानंतर मराठवाड्यातून मुंबईत स्थलांतरित येतच आहेत.
राहायला निवारा नसणारे, हातावर पोट असणारे, खासगी आरोग्यसेवेचा खर्च न परवडणारे लोक आपल्या देशाचे नागरिक आहेत आहेत, या वास्तवाचा विसर पडून पसरत्या करोनाला पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान अचानक लॉकडाऊन जाहीर करतात. ज्यांना निवाऱ्यासाठी घर नसतं, त्या भुकेल्या पोटांना रस्त्यावर आल्याबद्दल पोलिसी लाठ्यांचा प्रसाद मिळतो. तो प्रसाद घराचा निवारा आणि कुटुंबाची सोबत असणाऱ्यां अनेकांच्या गावीही नसतो.
लॉकडाऊनमुळे मोलानं होणारी घरकामं ते अनेक उद्योग, बंद पडले. कमाई होत नसताना शहरात राहणं अनेकांना अशक्य झालं. त्यापायी माणसांचे तांडेच्या तांडे शहरातून जिथं कुठं त्यांचं लहानपण अकाली हरवलं होतं, तिथं पोटासाठी काही शेकडो ते हजारभर किलोमीटरची पायपीट करत परतत होते. हे लॉकडाऊननं कुणालाच न पेलणारं दुसरं उलट-विस्थापन घडवलं होतं. मूळं रुजली तिथं तरी त्याचं परतणं कुणाला पसंत होतं, हे कळायलाही मार्ग नव्हता. स्टाईनबेक यांची कादंबरी हातात असताना अनेकांच्या संवेदनशील मनात या विस्थापनाचीही आठवण माझ्याप्रमाणं जागी होत असेल.
८ नोव्हेंबर २०१६च्या मध्यरात्रीनंतर चलनातील रु.५०० आणि रु.१०००च्या सर्व नोटा बाद ठरतील. त्यामुळे या नोटांच्या रूपात साठवलेला काळापैसा बाद होईल. दीर्घकाळ चाललेला आर्थिक भ्रष्टाचार संपेल. शिवाय, काळा पैसा दहशतवादाला खतपाणी घालत असल्यानं देशाच्या विकासातील दहशतवादाचा अडथळा दूर होईल, असे नोटबंदीचे अनेक फायदे सरकरानं वेळोवेळी बदलून सांगितले. परंतु त्यातील एकही उद्देश सफल झाल्याचं दिसलं नाही. भ्रष्टाचार, काळाबाजार, दहशतवाद चालूच राहिले. उलट, नोटा बदलण्यासाठी बँकेतून आपलेच पैसे काढण्यासाठी रांगेत तासंनतास ताटकळत उभं राहून काही गरीब वृद्धांचे मृत्यू झाल्याचं काहीना आठवेल.
२६ नोव्हेंबर २०२०पासून ऑगस्ट २०२१च्या शेवटच्या दिवशी २७९ दिवस पूर्ण केलेल्या शेतकरी आंदोलनामागची जिद्द कादंबरी वाचताना मनात उजागर होते. तर कधी ते आंदोलन बातम्यांच्या नजरेआड जाऊ लागल्याची खंत प्रकर्षानं होते.
२६ नोव्हेंबर २०२० या भारतीय घटना दिवसापासून शेतकरी आंदोलन सुरू झाले
कोविड साथीच्या काळात देशभर जाहीर केलेल्या टाळेबंदीचा फायदा उठवत संसदेत जवळपास चर्चा घडू न देता कामगार कायद्यात बदल केले आणि शेतकऱ्यांशी संबंधित तीन नवे कायदेही घाईघाईत पारित करून टाकले होते. ‘हे बदल आणि नवे कायदे कामगार आणि शेतकरी यांच्या हिताचे आहेत’, अशी त्यांची पाठराखण सत्तेनं वारंवार केली होती. कामगार कायद्यातील हे बदल कामगारांच्या हिताचे आणि शेतीसंबंधित तीन नवे कायदेही शेतकरी हिताचे असतील, तर त्यावर संसदेत चर्चा का घडवून आणली नाही? देशातील प्रमुख कामगार संघटना आणि शेतकरी संघटना यांच्याशी औपचारिक-अनौपचारिक चर्चा का केल्या नाहीत, हे कामगार-शेतकरी मनातले प्रश्न अनुत्तरीत राहिले. उलट, या कायद्यांना आणि त्यांच्या विशिष्ट भागांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी कलमं या नव्या कायद्यांत आहेत. या प्रकारचे कायदे १५ वर्षापूर्वी बिहारमध्ये आल्यानंतर छोट्या शेतकऱ्यांचा आवाज क्षीण झाल्याच्या बातम्या आंदोलक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. या मार्गानं शेतीचं यांत्रिकीकरण बिनाविरोध घडेल ही धास्ती शेतकऱ्यांना आहे. अंबानी-अदानी या अति श्रीमंत उद्योगपतींशी पंतप्रधानाचे घनिष्ट संबंध आहेत, हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना माहीत आहे.
म्हणून घटनेची पायमल्ली करणारे हे तीन कायदे मागे घ्यावेत, या प्रमुख लोकशाही मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर मोठ्या तयारीनिशी २६ नोव्हेंबर २०२० या भारतीय घटना दिवसापासून शेतकरी आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन मुख्यतः ‘सरकारच्या घटनाविरोधी वृत्तीच्या विरोधात’ आहे.
या आंदोलनापूर्वी झालेली अनेक विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनं, शाहीन बाग आंदोलनं, आणि पुढील तीन विधेयकं- १) नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA - Citizenship Amendment Bill), २) राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (NRC- नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स) आणि ३) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (NPR - नॅशनल रजिस्टर ऑफ पॉप्युलेशन) संमत करून लोकशाही पद्धतीनं चालणारी सर्व आंदोलनं शासनानं आपलं कौशल्यं आणि ताकत वापरून बेदखल केली आहेत. ते नव्या शेतकरी आंदोलनाला माहीत आहे.
परंतु दिल्लीच्या सीमा ओलांडून राजधानीत येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांत कसला रोष धुमसतो आहे, तो कोणत्या प्रक्रियांतून इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे, याचं अंतरदर्शन घडवायला जॉन स्टाईनबेक यांची प्रतिभा, प्रामाणिकपणा आणि वंचितभल्याची नजरही आवश्यक आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर विरोधाभास दर्शवणाऱ्या बातम्या आहेत. पहिली बातमी दोन घटनांची आहे. पाकिस्तान निर्मिती दिन १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणीचा वेदना दिवस’ म्हणून पाळण्याचं आवाहन आहे आणि शेजारी २८ तारखेला नुतनीकरण झालेलं जालियानवाला बाग संकुल देशार्पण करणारी बातमी आहे. शेजारची दुसरी बातमी ‘कोणीही निदर्शक सभेच्या मैदानाभोवतालचं कुंपण (कॉर्डन) ओलांडून आत आला, तर मला त्याचं डोकं फुटलेलं दिसलं पाहिजे’ असा जनरल डायरला शोभणारा आदेश हरयाणातील पोलिसांना देणाऱ्या आयुष सिन्हा’ यांची आहे. या बातम्यांनी मला ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या कादंबरीच्या काही भागांची उजळणी करायला प्रवृत्त केलं.
अशा या कृत्यांच्या पार्श्वभूमीवर २०१४ या वर्षीच्या निवडणुकानंतर संसदभवनात प्रथम प्रवेश करताना संसदेच्या पायरीवर माथा टेकवणं, तसंच स्वतःला ‘प्रधानसेवक’ म्हणवून घेणं, करोना जाण्यासाठी भाषण करून जनतेला टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगणं आणि ‘गो करोना गो’ अशा बालिश घोषणा द्यायला सांगणं किंवा ‘२६ जानेवारी’ हा ‘प्रजासत्ताक दिन’ १९५० या वर्षीपासून साजरा होत असताना ‘२६ नोव्हेबर’ हा ‘घटना स्वीकृती दिन’ नव्यानं साजरा करण्याच्या घोषणांना दांभिकतेच्या लक्षणांचा उग्र दर्प आहे. लोकांचा रोष वाढतो आहे. त्याला वाट करून द्यायला लोकशाहीशी प्रामाणिक नातं असणारा पर्यायी सबळ राजकीय विरोधी पक्ष मात्र सध्या तरी क्षितिजापर्यंत दिसत नाही. परंतु ‘वो सुबह कमी तो आयेगी’ अशी आशा माणसाला असते, तिच्याच आधारानं माणूस जगतो, नाही का?
‘The Grapes of Wrath’ : John Steinbeck
मराठी अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
प्रकाशनगृह : रोहन प्रकाशन
पहिली आवृत्ती : मार्च २०२०
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
पाने : ६७१
मूल्य : ७०० रुपये
..................................................................................................................................................................
लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.
prakashburte123@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment