‘साहिर’ या शब्दाचा अर्थ ‘जादूगार’ असा होतो. नावाप्रमाणेच ते ‘शायरीच्या जगातले जादूगार’ होते
दिवाळी २०२१ - विशेष लेख
सतीश बेंडीगिरी
  • साहिर लुधियानवी (जन्म : लुधियाना, पंजाब, ८ मार्च १९२१; निधन : मुंबई, २५ ऑक्टोबर १९८०)
  • Mon , 25 October 2021
  • दिवाळी २०२१ विशेष लेख साहिर लुधियानवी Sahir Ludhianvi ताजमहल Taj Mahal शकिल बदायुनी Shakeel Badayuni ग़झल Ghazal लीडर Leader

साहिर लुधियानवी या टोपणनावाने प्रख्यात शायर आणि हिंदी चित्रपट गीतकार म्हणून प्रसिद्ध झालेले  अब्दुल हयी यांची आज पुण्यतिथी. नुकतेच त्यांचे जन्मशताब्दी वर्ष संपले.

देश स्वातंत्र्य मिळवण्याच्या आवेशाने आणि उत्साहाने  प्रेरित झालेला होता, अशा ऐतिहासिक काळात साहिर यांनी शायरी लिहायला सुरुवात केली, पण त्याच वेळी सांप्रदायिक भेदभाव हिंसक टप्प्यातून जात असतानाच सामाजिक असमानता, जातीपातींमधील अनाचार, गैरवर्तन आणि अत्याचार, भयंकर दडपशाही, भयानक शोषण असे सर्व घाव सहन करत भारत स्वातंत्र्य आणि लोकशाहीकडे वाटचाल करण्यासाठी आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत होता. अशा स्थितीत साहित्यिक, लेखक आणि विशेषतः पुरोगामी विचारसरणीचे कवी, कलाकार, पत्रकार, चित्रपट निर्माते, तरुण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने, स्पष्ट विचाराने, स्वतःचा साहित्य-धर्म आणि समाज-धर्म मेहनतीने निभावून नेत होते. भारताच्या राजकीय-सामाजिक जडणघडणींवर परिणाम साधत असतानाच जनमत तयार करून परिस्थितीवर ठसा उमटवणाऱ्या त्यांच्या योगदानाबद्दल जितके लिहू-बोलू, तरी ते कमीच पडणार.  

याला सुरुवात झाली ती सज्जाद झहीर या उर्दू कवीच्या पुढाकाराने. प्रेमचंद यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लेखक-कलावंत या चळवळीत सामील झाले. या काफिल्याची सुरुवात प्रामुख्याने जरी उर्दू कवींनी केली होती, तरी जेव्हा चळवळ विस्तारली, तेव्हा जवळजवळ सर्व भारतीय भाषांतील लेखक आणि कवींनी त्यात भाग घेतला.

..................................................................................................................................................................

असहायतेची भावना निर्माण करणाऱ्या समाजातील नेतृत्वाला साहिरचा कायम विरोध असायचा. परंतु समाजात इच्छित बदल घडवून आणण्यासाठी वेळ लागतो, हेही त्यांनी समजून घेतले. कधी कधी हा बदलसुद्धा येणार नाही. असे असूनही आपण विचार करण्याची पद्धत बदलून या असहायतेशी लढू शकतो, असे त्यांचे म्हणणे होते. ‘तेरे गिरने में भी तेरी हार नहीं, कि तू आदमी है अवतार नहीं’ आणि ‘जहां में ऐसा कौन है कि जिसको गम मिला नहीं’ या त्यांच्या ओळी हेच सांगतात. आपल्या गाण्यांप्रमाणे, साहिरनी चित्रपटांमध्ये गझल आणि नज्में यांचा वापर सामाजिक-तात्त्विक संदेश देण्यासाठी केला.

.................................................................................................................................................................

साहिरच्या आधी फैज़, मजाज़, मखदूमसारखे शायर पुरोगामी विचारांनी झळाळत आणि चमकत होते. त्यांच्यासमोर आपला दिवा लावणे तापट स्वभावाच्या साहिरसाठी सोपे काम नव्हते. पण स्वातंत्र्य  चळवळीच्या विचारधारेमुळे विद्यार्थिदशेतच आपली पुढची वाटचाल काय असावी, हे साहिर यांना  उमगले.

‘साहिर’ हे पंजाबचे एका जमीनदार चौधरी फजल मुहम्मद यांच्या बाराव्या पत्नीचे, सरदारी बेगमचे ज्येष्ठ अपत्य. वडिलांनी त्यांचा कायम तिरस्कार आणि उपहास केला. जमीनदारांनी पत्नीला दासीपेक्षा अधिक दर्जा  दिला नाही. ते एकीकडे ब्रिटिश वसाहतीला राजकीय पाठिंबा देत होते आणि दुसरीकडे स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे अधिकार किंवा हक्क देण्याच्या विरुद्ध होते. एके दिवशी सरदारी बेगम तिच्या नाममात्र पतीपासून विभक्त झाल्या आणि आपल्या एकुलत्या एका मुलाला घेऊन भावाच्या घरी राहायला गेल्या. मियां-बीवीमध्ये साहिरवर हक्क कुणाचा यावर खटला चालला. न्यायालयाने सरदारी बेगमच्या बाजूने निर्णय दिला. उदरनिर्वाहासाठी जमीनदाराची काही मालमत्ताही मिळाली.

साहिरचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी झाला. १९३६मध्ये लुधियानामधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते लुधियानाच्या शासकीय महाविद्यालयात दाखल झाले. हे वर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ‘अंजुमन-ए-तरक्कीपसंद मुसन्नीफीन’ या संस्थेच्या स्थापनेचे वर्ष होते. पश्चिमेकडे हिटलर-मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली फॅसिझम पसरत होता आणि भारतीय जनता ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामी राजवटीबरोबरच दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि दुर्दशेशी झगडत होती. जागतिक विनाशाच्या या काळात साहिर यांनी स्वतःचा मार्ग निवडला. हा मार्ग म्हणजे प्रबुद्ध विचार, शांतता-अनुकूलता, धर्मनिरपेक्षता यांची पाठराखण करण्याचा आणि गुलामी, पिळवणूक, दारिद्र्य तसेच शोषणाचा विरोध करण्याचा मार्ग होता.

‘अंजुमन-ए-तरक्कीपसंद मुसन्नीफीन’ ही संस्थादेखील हेच कार्य करत होती. हेच अल्लामा इक्बाल त्यांच्या शायरीतून सांगत होते. साहिरना हा मार्ग पसंत पडल्यामुळे ते त्यांच्या प्रभावाखाली आले. त्यांच्याच ‘सौ साहिर भी होंगे साहिबे-एजाज भी’ या ओळीतूनच त्यांनी ‘साहिर’ हे आपले टोपणनाव म्हणजे ‘तखल्लूस’ निवडले. परंतु इक्बालची धार्मिक कविता साहिरना फारशी प्रभावित करू शकली नाही. संपूर्ण भारत त्या वेळी समाजवाद आणि आधुनिकतेच्या प्रभावाखाली येत होता. भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्ला खान, राजगुरू, अजय घोष, अविश पाल यासारखे वीर एकतर फाशीवर चढले आणि शहीद झाले किंवा तुरुंगात अत्याचार सहन करत राहिले. या शहीद झालेल्या देशभक्तांची छायाचित्रे भारतातील गावे, शहरे आणि शहरांतील प्रत्येक घरांत दिसत होती. साहिर या क्रांतींमुळे आणि बंडखोरीमुळे प्रभावित झाले नसते तर नवलच!

साहिरनी जी शायरी रचायला सुरुवात केली, ती बंडखोर आणि क्रांतिकारी शायरी होती. जोश मलिहाबादी, मजाज, फैज़, हाफिज जालंध्री, नून मीम रशीद, अब्दुलमजीद भट्टी, कय्यूम नजर आणि अंजुम रोमानी यांच्या नज्म आणि ग़ज़ल यांचा साहिरवर प्रभाव पडला. ते जरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कमकुवत आणि असुरक्षित व्यक्ती होते, तरी वैचारिक पातळीवर ते नेहमी शांततेसाठी, युद्धाविरुद्ध, न्यायाच्या बाजूने, जुलूमशाहीच्या विरोधात, मानवतेच्या सन्मानासाठी, उच्च-नीचतेच्या विरोधात उभे राहिले. स्वातंत्र्य आणि साम्यवाद, गुलामगिरी आणि शोषणाविरोधात, स्त्रियांच्या आणि दुर्बल लोकांच्या समर्थनार्थ, त्यांनी अत्याचारी विचारांच्या विरोधात शायरी करणे चालू ठेवले. याच कारणामुळे त्यांच्या असंख्य कविता आजही प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त वाटतात.

अनंत पावसकर यांनी आपल्या ‘आठवणीतली गाणी’ या पुस्तकात साहिर यांना गरीब जनतेबद्दल असणारी तळमळ, त्यांना वाटणारा कळवळा याबद्दलचा एक किस्सा लिहिला आहे तो असा- “गीतकार साहिरजी म्हणजे एक मनस्वी शायर. त्यांच्या सर्वच रचना लाजवाब या पंक्तीतल्या. शशधर मुकर्जीच्या तर ते खास मर्जीतले. ‘लीडर’ची गाणी तेच लिहिणार हे शशधरजींनी सांगताच नौशादजी खूष झाले. या कथानकातील दिलीपसाहेब आणि वैजयंतीमाला निभावत असलेल्या करेक्टर्सच्या मॅच्युअर्ड इमेजसाठी योग्य असं गाणं हवंय, असं शशधर बाबूंनी आवर्जून सांगितलं. या गाण्याचं चित्रण साक्षात ताजमहालासमोरच करायची इच्छा आहे, हेही नमूद केलं. आता नौशादजी आणि मुकर्जीसाहेब साहिरजींना गाठण्याच्या प्रयत्नाला लागले, पण शशधर मुकर्जींनी अनेकदा बोलावणं धाडूनही ते गाण्याच्या सीटिंग्जना येतच नव्हते. काय प्रॉब्लेम होता कुणास ठाऊक. इकडे गाणी तयार व्हायला विलंब होत असल्याने लावलेल्या सेट्सचं करायचं काय, या प्रश्नाने प्रोड्युसर हैराण! शेवटी साहिरजी येणार नाहीत, याची खात्री झाल्यावर मुकर्जीनी त्यांच्या आवडीच्या गीतकाराकडून गाणी घेण्याविषयी सांगितलं. नौशादजींनी मग आपल्याशी ट्युनिंग असलेल्या शायर-गीतकार शकीलसाहेबांकडून गाणी लिहून घेतली. ताजमहलच्या सिचुएशनसाठी शकीलने शायरीचा कीस पाडला -

‘एक शहंशाह ने बनवा के हसीं ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है

इसके साये में सदा प्यार के चर्चे होंगे, ख़त्म जो हो ना सकेगी वो कहानी दी है’

‘लीडर’ प्रदर्शित झाला, पण ‘दोस्ती’, ‘संगम’च्या स्पर्धेत बॉक्स-ऑफिसवर त्याचा पार पालापाचोळा झाला.”

अनंत पावसकर पुढे लिहितात, “तुम्हाला आठवत असेल, चीनने त्या आसपासच्या काळात आपल्यावर आक्रमण केल्यानं लोकांना रेडिओ अगदी जिवाचा कान करून ऐकायची सवय लागली होती. लढाईच्या  बातम्या-घडामोडी ऐकता ऐकता नकळत ते रेडिओच्या भजनी लागले होते. गाणी रेडिओवर वाजायची, गाजायची असे ते दिवस. एके दिवशी मात्र आक्रित घडलं. सहज रेडिओ लावला तर एका मुस्लीम शायरचा स्वर, लोकांच्या संगमरवरी मनाच्या ठिकऱ्या करणारा ठरला होता! तो कुठलासा मुशायरा होता. शायर एकेक शब्दावर जोर देत आपली ‘ताजमहल’ ही कविता वाचून दाखवत होता-

‘इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर, हम ग़रिबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक़’

सगळेच उर्दू शब्द कळत नव्हते, पण शब्दाशब्दातला आवेश, जज़बात काळीज चिरून जात होता. ही बाग, हा यमुनेचा किनारा नक्षीकाम केलेल्या संगमरवरी भिंती, कमानी...छेss! नाही वाटत असल्या शापीत जागी प्रेमालाप करावासा. एका बादशहाने आपल्या संपत्तीच्या माजावर असली इमारत उभारून आपल्या गरिबांच्या प्रेमाची टर उडवलीय. क्रूर थट्टा केलीय… किती रोमँटिक कल्पना केल्या जातात ताजमहलबाबत, पण साहिरचा हा कलाम वाचून ध्वस्त व्हायला होतं. ते या कवितेतून सगळ्या रोमँटिक कल्पनांना सुरंग लावतात. त्यांनी नौशाद, शकीलवर सूड़ उगवला की, संगमरवरी दगडाचं पांढरेपण, विधवेच्या कपाळासारखं पांढरं फटफटीत आहे, असं सांगून बगावतभरा इल्जाम केलाय शहाजहानवर?”

..................................................................................................................................................................

आज आपण आजूबाजूला दिसणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला, तर  साहिरचा  काळ  आणि आजचा काळ यात फारसा फरक  दिसतो आहे, असे वाटत नाही. आज आपण  सामाजिक  आणि  राजकीय परिस्थितीचा ज्या तऱ्हेने सामना करत आहोत, ती आपल्याला जगभरातील मानवतावादी लेखकांचे  साहित्य  पुन्हा पुन्हा वाचण्यास प्रवृत्त करत आहे आणि  अशा साहित्यात साहिर यांच्या कवितेचा आणि लेखांचा समावेश होतो. हे साहित्य अंतहीन अंधारात आशेचा किरण बनून वाट दाखवते.

.................................................................................................................................................................

सध्याच्या युगात, तिसऱ्या जगातील बहुतेकांना केवळ युद्ध सुरू असतानाच नव्हे, तर शांततेच्या काळातही हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. शांततेच्या संकल्पना केवळ कागदावरच उरतात, जे युद्धभूमीवर हेलिकॉप्टर किंवा विमान उतरताना उडणाऱ्या धुळीत पालापाचोळ्यासारखे उडून जातात. १९८०मध्ये साहिरचे निधन झाले, त्या काळात रशियात मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा उदय व्हायला सुरुवात झालेली होती. त्यांनी ‘ग्लासनोस्त’ आणि ‘परस्ट्रोईका’ या नावाने खुलेपणाचे धोरण राबवायला सुरुवात केली, तसे रशियाचे विघटन सुरू झाले. त्याचा फायदा घेत अमेरिका विविध देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये अखंडपणे हस्तक्षेप करून जगात युद्ध आणि यादवी यासारखी परिस्थिती निर्माण करत होती, जे आजतागायत चालूच आहे.

युरोपचे पूर्वेकडील देश असो किंवा लॅटिन अमेरिकन देश किंवा आशिया अमेरिका सगळीकडे विनाश आणि दहशतवाद वाढवत होती. इराक, अफगाणिस्तान, लिबिया, व्हिएतनाम किंवा सीरिया, जिथे जिथे अमेरिकेने हस्तक्षेप केला, तिथे तिथे अजूनही शांतता नाही. आज सर्व नवीन स्वतंत्र देशांमध्ये बहिरे सरकार जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या संगनमताने मानवी संसाधनांची मुक्त लूट करत आहे. अशा  ठिकाणी भांडवलदार शक्तींना गृहयुद्ध करवण्याची गरजच पडत नाही. लोकांचे जीवन मात्र युद्धकाळात  जितके कठीण आणि यातनामय होते, तसे झाले आहे. जगातील इतर नवीन स्वतंत्र देशांप्रमाणे भारतही त्याला अपवाद नव्हता आणि नाही. अशा युद्धाच्या भयानकतेबद्दल लिहिलेल्या ‘परछाईयाँ’ या दीर्घ कवितेत साहिर म्हणतात की, भविष्यात होणाऱ्या युद्धात मानवाचे केवळ शरीरच काय, परंतु शरीराची  सावलीदेखील जाळून जाईल. या दीर्घ कवितेतील काही ओळी-

तसव्वुरातकी परछाइयां उभरती हैI

इमान की कीमत गिरने लगी,

अजनास (चीजोंके) के भाव चढ़ने लगे, 

चौपाल की रौनक घटने लगी,

भर्ती के दफ़रातिर बढ़ने लगे

बस्ती के सजीले शोख जबा,

बन-बन के सिपाही जाने लगे,

जिस राह से कम ही लौट सके,

उस राह पे राही जाने लगे

उन जाने वाले दस्तों में रैरत भी गयी,

बरनाई (जवानी) भी,

माओं के जबां बेटे भी गये,

बहनों के चहेते भाई भी

चरवाहियां रस्ता भूल गयीं,

पनहारियां पनघट छोड़ गयी

कितनी ही कुंबारी अबलाये

मां-बाप की चौखट छोड़ गयीं

अजब नहीं कि ये तनहाइयां भी जल जाये

गुज़श्ता जंग में पैकर (शरीर) जले,

मगर इस बार अजब नहीं की,

ये परछाइयां भी जल जायें

तसव्वुरात (ख़यालात) की परछाइयां उभरती हैं।

आज तालिबानच्या राज्यात अफगाणी जनतेची जी भयानक स्थिती झालेली आहे, त्याला चपखल लागू पडणारे गीत साहिरनी ६३ वर्षांपूर्वी म्हणजे १९५८ साली ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटासाठी लिहिले होते -

इन काली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा,

जब दुख के बादल पिघलेंगे, जब सुख का सागर छलकेगा

जब अम्बर झूम के नाचेगा, जब धरती नज़्में गायेगी,

वो सुबह कभी तो आयेगी ॥

जिस सुबह की खातिर जुग-जुग से,

हम सब मर-मर कर जीते हैं,

जिस सुबह के अमृत की धुन में,

हम जहर के प्याले पीते हैं

इन भूखी प्यासी रूहों पर,

इक दिन तो करम फर्मायेगी,

वो सुबह कभी तो आयेगी ॥

६३ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ओळी आजच्या घडीलाही तेवढ्याच समर्पक वाटतात. 

या निर्दयी भांडवलशाही व्यवस्थेत, लोककल्याणकारी राष्ट्राचा आदर्श साध्य करणे अकल्पनीय बनले आहे, याच्या उलट भांडवलशाहीच्या सेवेत नतमस्तक होणाऱ्या सरकारांना कमीत कमी लोककल्याणाचा मुखवटा तरी घालावा याचीही गरज भासत नाही. अगदी राजरोस आणि उघडपणे जनविरोधी धोरणे थोपली जात आहेत. अशा धोरणांवर प्रश्न विचारणाऱ्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगवास, कट्टरपंथी हिंदू राष्ट्रवादाला आणि मूलगामी प्रतिगामी विचारांना आव्हान देणाऱ्या विचारवंतांचे तोंड गप्प केले जाते. शोषणविरहित सहनशील समाज आणि मानवतावादी मूल्यांसाठी काम करणाऱ्या आणि रामराज्याची कल्पना करणाऱ्या नागरिकांचे जीवन कष्टप्रद होत आहे. ही परिस्थिती साहिरच्या काळापेक्षा अधिक भयानक आहे.

आज आपण आजूबाजूला दिसणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला, तर साहिरचा काळ आणि आजचा काळ यात फारसा फरक दिसतो आहे, असे वाटत नाही. आज आपण सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा ज्या तऱ्हेने सामना करत आहोत, ती आपल्याला जगभरातील मानवतावादी लेखकांचे  साहित्य  पुन्हा पुन्हा वाचण्यास प्रवृत्त करत आहे आणि  अशा साहित्यात साहिर यांच्या कवितेचा आणि लेखांचा समावेश होतो. हे साहित्य अंतहीन अंधारात आशेचा किरण बनून वाट दाखवते. ‘तल्खियां’ हे त्यांचे १९४४ साली प्रकाशित झालेले, उर्दूमधील सगळ्यात जास्त विकले जाणारे पुस्तक आहे.

साहिर केवळ पुस्तकी किडा नव्हते तर त्यांचा वावर सिनेमे, ग्रामोफोन, कॅसेट्स, रेडिओ, मुशायरा  मेहफिलमध्ये जितका होता आणि आहे तेवढाच वावर हिंदी, इंग्रजी, उर्दू, भारत, पाकिस्तान आणि भूतकाळात होता, तसेच वर्तमानकाळातही आहे. 

..................................................................................................................................................................

पश्चिमेकडे हिटलर-मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली फॅसिझम पसरत होता आणि भारतीय जनता ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामी राजवटीबरोबरच दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि दुर्दशेशी झगडत होती. जागतिक विनाशाच्या या काळात साहिर यांनी स्वतःचा मार्ग निवडला. हा मार्ग म्हणजे प्रबुद्ध विचार, शांतता-अनुकूलता, धर्मनिरपेक्षता यांची पाठराखण करण्याचा आणि गुलामी, पिळवणूक, दारिद्र्य तसेच शोषणाचा विरोध करण्याचा मार्ग होता. 

.................................................................................................................................................................

हिंदी सिनेमातील ज्या ज्या नायकांनी कवींच्या भूमिका साकारल्या – ‘प्यासा’, ‘बरसात की रात’, ‘गझल’, ‘एक महल हो सपने का’, ‘कभी कभी’ - त्यांनी साहिरचीच शायरी पेश केली आणि साहिरला सर्वोच्च गीतकार बनवले. त्यांना १९६४ सालच्या ‘ताजमहल’ या चित्रपटातील ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ या गाण्यासाठी एकदा, तर १९७७ सालच्या ‘कभी कभी’ या चित्रपटातील ‘कभी कभी मेरे दिल में’ या गाण्यासाठी असा दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सिनेमा-रेडिओ जुगलबंदीच्या सुवर्णकाळात, रेडिओ सिलोनवरून प्रसारित होणाऱ्या ‘बिनाका गीतमाला’च्या लोकप्रियतेचे ऐतिहासिक मोजमाप साहिरच्या गाण्यानेच व्हायचे. अमीन सयानी याना ‘चोटी के पायदानपर’ साहिरचेच गीत लावावे लागायचे.

साहिरच्या कवितेने प्रेमात मरण पत्करून होणाऱ्या हौतात्म्यापासून प्रेमवेड्या तरुणांना वाचवले. (अल्लाह-ओ-रसूल का फ़रमान इश्क है, यानि हदीस इश्क है, कुरान इश्क है, गौतम का और मसीह का अरमान इश्क है, ये कायनात जिस्म है और जान इश्क है, इश्क सरमद, इश्क ही मंसूर है, इश्क मूसा, इश्क कोहेतूर है, खाक को बुत, और बुत को देवता करता है इश्क, इन्तिहाँ ये है कि बन्दे को खुदा करता है इश्क).

सूफी-भक्तीच्या भावनेने ओतप्रोत गीते दिली. (अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान. ओ सारे जग के रखवाले निर्बल को बल देने वाले, बलवानों को, दे दे ज्ञान. मन रे, तू काहे ना धीर धरे वो निर्मोही, मोह ना जाने, जिनका मोह करे)

प्रेमात व्यावहारिकता आणि शिष्टाचार शिकवले. (चलो इक बार फिर से, अजनबी बन जाएँ हम दोनों, तार्रुफ़ रोग हो जाये तो उसको भूलना बेहतर, ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोड़ना अच्छा, वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे इक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा)

लहान मुलांचे विश्व कसे सच्चे असते ते लिहिले (तन कोमल, मन सुन्दर है, बच्चे बड़ों से बेहतर हैं इन में छूत और छात नहीं, झूठी ज़ात और पात नहीं, भाषा की तकरार नहीं, मज़हब की दीवार नहीं, इनकी नज़रों में एक है, मंदिर मस्जिद गुरूद्वारे, बच्चे मन के सच्चे.)

वाकड्या नजरेने बघणाऱ्या शेजार्यांना दम भरला (उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगेहबान है आँखें, हर तरह के जज़्बात का ऐलान हैं आँखें, शबनम कभी, शोला कभी, तूफ़ान है आँखें).

धर्मावर आधारित जातीय असमानतेचा पराभव केला. (तू हिन्दु बनेगा, न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा, नफरत जो सिखाये वो धरम तेरा नहीं है, इन्सां को जो रौंदे वो कदम तेरा नहीं है, कुरआन न हो जिसमें वो मंदिर नहीं तेरा, गीता न हो जिसमें वो हरम तेरा नहीं है, तू अम्न का और सुलह का अरमान बनेगा).

यू-ट्यूबवर साहिर शोधताना त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारे जोडल्या जाणाऱ्या गाण्याच्या व्हिडिओंचा महापूर येतो. त्याच्या प्रत्येक गाण्यावर टिप्पणी केलेल्या रसिकांची संख्या मोजली तर त्याची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच आहे, हे कळून येते. त्याच्या काही गाण्यांना यू-ट्यूबवर मिळालेल्या ‘हिट्स’ची संख्या अशी आहे-

बस्ती बस्ती पर्बत पर्बत गाता जाए बंजारा (रेल्वे प्लेटफार्म, १९५५) - ७,७६,३३३

ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है (प्यासा, १९५७) - २७,८३,६५८

जो बात तुझ में हैं (ताजमहल, १९६०) - १८,२८,७३३

ये इश्क इश्क है इश्क इश्क (बरसात कि रात, १९६०) - ४७,८९,६५९

रंग और नूर की बारात (गजल, १९६४) - १,५९,०७,१९३

तुम अगर साथ देनेका (हमराज, १९६७) - ५,१३,४८,९२२

बच्चे मनके सच्चे (दो कलियां, १९६८) - १,३६,०७,०१७

मैं पल दो पल का शायर हूं (कभी कभी, १९७६) - १,२६,३६,९६१

साहिर स्वतः म्हणतात, “चित्रपट गीतांना शक्य तितक्या सर्जनशील कवितेच्या जवळ आणण्याचा आणि त्यामुळे लोकांमध्ये नवीन सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोन देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.” साहिरच्या या दृष्टिकोनाने भारतीय समाजाला एक दिशा दिली, तसेच त्याची स्थिती बदलण्याची प्रेरणाही दिली. आपल्या गाण्यांद्वारे साहिरनी केवळ सामाजिक वाईटांवरच हल्ला केला नाही, तर सध्याच्या सामाजिक परिस्थिती, देशाची परिस्थिती आणि तिचे भविष्य, धार्मिक सलोखा, स्त्रियांची स्थिती, काळाची शक्ती, प्रेमाची संकल्पना या सर्व गोष्टी आपल्या कवेत घेतल्या. साहिर वगळता क्वचितच कोणत्याही गीतकाराने एवढा व्यापक पट रंगवला असेल.

असहायतेची भावना निर्माण करणाऱ्या समाजातील नेतृत्वाला साहिरचा कायम विरोध असायचा. परंतु समाजात इच्छित बदल घडवून आणण्यासाठी वेळ लागतो, हेही त्यांनी समजून घेतले. कधी कधी हा बदलसुद्धा येणार नाही. असे असूनही आपण विचार करण्याची पद्धत बदलून या असहायतेशी लढू शकतो, असे त्यांचे म्हणणे होते. ‘तेरे गिरने में भी तेरी हार नहीं, कि तू आदमी है अवतार नहीं’ आणि ‘जहां में ऐसा कौन है कि जिसको गम मिला नहीं’ या त्यांच्या ओळी हेच सांगतात. आपल्या गाण्यांप्रमाणे, साहिरनी चित्रपटांमध्ये गझल आणि नज्में यांचा वापर सामाजिक-तात्त्विक संदेश देण्यासाठी केला. उदाहरणार्थ, ‘हम दोनो’ चित्रपटासाठी लिहिताना साहिर म्हणतात, ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया’ असं असलं तरी साहिर नेहमीच जगाची चिंता करत राहिले.

सुप्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस हिने ‘साहिर और उसकी शायरी’ या १९६२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिले आहे - “फिल्मी गीतकारों में साहिर का दर्जा बहुत बुलंद है। उनके शेर सुनकर यूं लगता है, जैसे कि वो शायर के दिल की आवाज और उनकी जाती जिंदगी के गहरे जज्बाती तजुर्बों का इजहार हों। मुझे कुछ दुसरे शायरों की रचनाएं भी पसंद हैं, लेकिन साहिर की नज्में सीधे दिल को छूती हैं। साहिर के शेर आम लोगों की जुबान पर चढ़ जाते हैं, क्योंकि वो सुख-दुख की बात करते हैं और आम आदमी ये महसूस करता है कि ये शेर उसके ख़यालात और अहसासात के अक्स हैं।”

‘साहिर’ या शब्दाचा अर्थ ‘जादूगार’ असा होतो. नावाप्रमाणेच ते ‘शायरीच्या जगातले जादूगार’ होते. मिर्झा गालिब यांच्या नामावलीत साहिर यांचे नाव घेतले जाते, यातच त्यांची महानता दिसून येते.

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा