अजूनकाही
उद्या ‘अक्षरनामा’ला पाच वर्षं पूर्ण होतील. २४ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर्स पोर्टल सुरू करताना आम्ही जी तत्त्वं ठरवली होती, ती आजतागायत आम्ही आमच्या परीनं सांभाळत आलो आहोत, यापुढेही राहूच. सध्याच्या जमाना ‘पोस्ट ट्रुथ’, ‘फेक न्यूज’, ‘पेड न्यूज’ आणि ‘गोदी मीडिया’ यांचा आहे. अशा काळात पत्रकारितेच्या नीतीमूल्यांशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ‘सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा!’ हा गौतम बुद्धाचा बाणा अंगी बाणवून तो आपल्या वाचकांपर्यंत पोहचवणं हे अतिशय दुष्कर काम होऊन बसलं आहे. तरीही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं आपलं काम प्रामाणिकपणे करत आहे, हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.
त्याचबरोबर आम्हाला हे अभिमानानं सांगायला आवडेल की, गेल्या पाच वर्षांत ‘अक्षरनामा’ने एकही पेड न्यूज, फेक न्यूज छापलेली नाही. यापुढेही आमचा हाच प्रयत्न राहील. त्याशिवाय कुणाहीविषयी ‘बायस’ व्यक्त केलेला नाही. सत्योत्तर सत्याला (पोस्ट ट्रुथ) कधीही थारा दिलेला नाही. काही व्यक्ती किंवा समूह क्वचितप्रसंगी नक्कीच दुखावले असतील, पण आम्हाला हे नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगायला आवडेल की, त्यामागे आमचा कुठल्याही प्रकारचा ‘बायस’ नव्हता आणि कलुषित दृष्टीकोनही.
‘अक्षरनामा’ने गेल्या पाच वर्षांत पाच हजारांहून अधिक लेख प्रकाशित केले आहेत. तळागाळातल्या, शोषित-पीडित समाजाच्या प्रश्नांपासून राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक मूल्यमापनापर्यंत आणि ग्रंथव्यवहारापासून अर्थकारणापर्यंत अनेक विषयांवर सातत्यानं अभ्यासपूर्ण लेखन देण्याचा प्रयत्न केला आहे. या काळात ‘अक्षरनामा’ने हाताळलेले, सातत्यानं पाठपुरावा केलेले विषय यांची भलीमोठी जंत्री होईल. तरुण पत्रकार-लेखकांपासून मान्यवर संपादक-अभ्यासकांपर्यंत अनेकांचं अभ्यासू लेखन उपलब्ध करून दिलं आहे.
अर्थात हेही तितकंच खरं असतं की, तुम्ही ज्या प्रकारची पत्रकारिता करता, त्याच प्रकारचे पत्रकार, लेखक तुमच्याकडे येतात. तुमच्या पत्रकारितेचा दर्जा ज्या प्रकारचा असतो, त्याच दर्जाचं लेखन तुमच्याकडे अधिक्यानं येतं. ‘अक्षरनामा’ त्याबाबत सुदैवी म्हणायला हवा. महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्याही अनेक अभ्यासू लेखक, पत्रकार, संपादक, अभ्यासक, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींचं लेखन-सहकार्य आम्हाला सातत्यानं लाभलं आहे. ‘अक्षरनामा’ची आर्थिक स्थिती सुरुवातीपासूनच नाजूक आहे. अक्षरक्ष: पदरमोड करून आम्ही हे पोर्टल चालवत आहोत. याची कल्पना आमच्या लेखकांना असल्यानं मोबदल्याची फारशी अपेक्षा न ठेवताही आपलं बहुमोल लेखन ते आम्हाला सातत्यानं उपलब्ध करून देत आहेत. गेल्या पाच वर्षांतली ही आमची सर्वांत मोठी कमाई आहे, हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे.
सुरुवातीच्या काळात ‘अक्षरनामा’ने आपल्या नियमित लेखकांना अल्पस्वल्प मोबदला देण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. पण करोनानं गेल्या दोन वर्षांच्या काळात इतकी पडझड केली आहे की, तेही आम्हाला शक्य झालेलं नाही. तरीही आमच्या लेखकांचा आमच्यावरील लोभ कायम राहिला आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या सर्व लेखकांचे मनापासून, ‘तहे दिल से’ ऋणी, आभारी आणि कृतज्ञ आहोत.
हे ऐश्वर्य अभिमानानं मिरवावं असं नक्कीच आहे. पण व्यावहारिक पातळीचा विचार करता फारसं स्पृहणीय मात्र नक्कीच नाही. आधी जीएसटी, नंतर नोटबंदी आणि गेल्या दोन वर्षांपासून करोना, अशा संकटांच्या मालिकेनं केवळ आमच्यापुढीलच नाही तर एकंदरच पत्रकारितेपुढील आव्हानं खूप जटील केली आहेत. त्यामुळेच पत्रकारिता आपल्या सर्वाधिक वाईट काळातून जात आहे. छापील आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना करोनाकाळाचा सर्वाधिक फटका बसला असला तरी ऑनलाईन माध्यमांनाही तो बसलेला आहेच.
याच काळात सोशल मीडियाचा प्रभाव, प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे २०००नंतर जसा डॉट कॉम कंपन्यांची लाट आली होती, तशी सध्या ऑनलाईन माध्यमांची लाट आली आहे. गेल्या पाच वर्षांत इतकी वेगवेगळी न्यूज-फीचर्स पोर्टल्स सुरू झाली आहेत की, विचारता सोय नाही. ‘रॅटरेस’ सुरू झाली की, व्यावसायिक गुणवत्तेपेक्षा अहमहमिकेला आणि गल्लाभरूपणाला प्राधान्य दिलं जातं. या धबडग्यात चांगली पत्रकारिता करू पाहणाऱ्या ऑनलाईन माध्यमांकडे दुर्लक्ष होण्याच्या किंवा स्पर्धेतून बाहेर फेकली जाण्याच्या शक्यता वाढत जातात. तसं होऊ नये यासाठी आम्ही ‘अक्षरनामा’च्या वाचकांना पुन्हा एकदा विनंती करतो की, चांगल्या पत्रकारितेला तुमच्या पाठबळाची नितांत निकडीची गरज आहे. तुम्ही ‘घटने’ला ‘घटना’ म्हणून, ‘वास्तवा’ला ‘वास्तव’ म्हणून आणि ‘सत्या’ला ‘सत्य’ म्हणून सांगणाऱ्या पत्रकारितेला सहकार्य करावं आणि प्रोत्साहन द्यावं.
सध्याचा काळ किती विचित्र आहे नाही! अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही प्रकारच्या समस्यांचा सामना पत्रकारितेला करावा लागत आहे. तरीही काही महिन्यांपूर्वी सत्याची मशाल हातात घेऊन अक्राळविक्राळ अंधाराच्या काळ्या कभिन्न भिंतीला धडका देणाऱ्या रवीशकुमारसारख्या पत्रकाराला रॅमन मॅगसेसेसारखा आशिया खंडातील अतिशय मानाचा पुरस्कार मिळाला आणि नुकतंच फिलीपाइन्सनमधील मारिया रेस्सा (Maria Ressa) आणि रशियातील दिमित्री मुरातोव्ह (Dmitry Muratov) या दोन पत्रकारांना २०२१चं शांतता नोबेल पारितोषिक जाहीर झालं. या दोन्ही घटनांमुळे प्रामाणिकपणे आणि प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांना नक्कीच बळ येईल. पण ही गोष्टही तितकीच खरी आहे की, जात-धर्म-पक्ष-हितसंबंध-द्वेष-तिरस्कार-बुद्धिभेद अशा अनेक प्रकारच्या उन्मादांचा प्रवाह इतका बळकट आणि जोरकसपणे पसरवला जातो आहे की, तिथं चार-दहा चांगल्या पत्रकारांचा किंवा त्यांच्या मूल्यप्रधान पत्रकारितेचा फारसा पाड लागू शकत नाही. रोजच्या रोज मुख्य प्रश्नांना बगल देणाऱ्या आणि बुद्धिभेद करणाऱ्या फेक न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ‘व्हायरल’ केल्या जात आहेत. छापील, इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाईन या तिन्ही प्रकारची पत्रकारिता त्यापुढे हतबल होऊ लागली आहे.
सोशल मीडियाच्या प्रवर्तकांची सरकारधार्जिणी धोरणं, नफ्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची वृत्ती, विशेषत: द्वेषाला आणि हिंसाचाराला उद्युक्त केल्या जाणाऱ्या पोस्टस-व्हिडिओंकडे जाणूनबुजून केलं जाणारं दुर्लक्ष आणि लोकांना सतत ‘व्हर्च्युअल’ कैफात डुंबवून स्वत:ची ‘टेक्नो-एकाधिकारशाही’ प्रस्थापित करण्याच्या सोसानं इतकं पछाडलं आहे की, व्यक्तीमन, समाजमन आणि राष्ट्रमन यांच्यातील परस्पर सद्भाव, सामंजस्य आणि तारतम्य लोप पावत चालल्यासारखं वाटू लागलं आहे.
कुठलीही कंपनी केवळ गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या जोरावर ‘महाकाय’ वा ‘अजस्र’ होत नाही. त्यासाठी तिला अनेक प्रकारच्या लांड्या-लबाड्या, जुगाड करावे लागतात. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना नामोहरम करावं लागतं, अनेक छोट्या कंपन्यांना गिळंकृत करावं लागतं. ‘महाकाय’ अवस्था व्यक्तीची असो की, कंपनीची, ती कधीच निर्भेळ असत नाही. सोशल मीडिया चालवणाऱ्या टेक्नो-कंपन्यांना दिवसेंदिवस येत चाललेलं महाकाय स्वरूप लोकशाहीच्या, वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या आणि माणसांच्या संतुलनासाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाही ना, अशी भयशंका वाटू लागली आहे.
आयटी सेल, ट्रोलर्स, बॉटस, फेक न्यूज, पेड न्यूज, कृत्रिम बुद्धमत्ता, अल्गोरिदम आणि प्रपोगंडा ही संकटं पत्रकारितेपुढे अजस्त्र आव्हानांसारखी उभी ठाकली आहेत. त्यांचा सामना पत्रकारितेला करावा लागणारच आहे, पण हा सामना निदान सध्या तरी ‘डेव्हिड अँड गोलिएथ’सारखा भासतो आहे. पत्रकारिता हे मुळात एक प्रकारे ‘असिधारा व्रत’च असतं. त्यामुळे या संघर्षातही अंतिमत: पत्रकारिता जिंकेल हे नक्की. पण तो जिंकण्याचा काळ कमीत कमी कसा राहील, हे पाहण्याचं काम वाचकांचंही आहे, हे नक्की.
जग पैशापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आशेवर, भरवशावर चालतं. त्यामुळे यापुढेही आम्ही अशीच, किंबहुना यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे पत्रकारिता करत राहूच. पण ही गोष्टही तितकीच खरी आहे की, कुठलीही यंत्रणा चालवण्यासाठी, कार्यरत ठेवण्यासाठी पैसा लागतोच. त्याचं सोंग आणता येत नाही. अर्थात आम्हाला याचीही पूर्ण जाणीव आहे की, केवळ आमच्यापुढेच आव्हानं आहेत, असं नाही, तुमच्यापुढेही ती आहेतच. करोनानं आपल्या सगळ्यांचीच जगण्याची लढाई तीव्र केली आहे. पण तरीही शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं- तुम्हाला ‘अक्षरनामा’ आवडत असेल, त्याची पत्रकारिता आवडत असेल, तर तुम्ही तुम्हाला शक्य ते सहकार्य करावं.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment