प्रारंभीचे निवेदन
‘Religious Notions’ या चिवट व्यवस्थेचा निर्माता ब्राह्मण वर्ण-जात आहे. ब्राह्मणी धर्म तिचा धर्म आहे. त्याचे कायदे-नियम ‘मनुस्मृती’त शब्दबद्ध केले गेले आहेत. तो तिची आर्थिक व्यवस्थाही जपत आहे. आणि सर्व बाजूंनी या ‘नोशन्स’ही लादत आहे. जे मला ओळखत नाहीत व माझ्या भूमिका जाणत नाहीत; त्या वाचकांना यातून मी ब्राह्मण विरोधाचा सूर लावत आहे, असे वाटेल. पण प्रथमच प्रामाणिकपणे हे स्पष्ट करत आहे मी ब्राह्मण, मराठा वा अन्य कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधी नाही. मी सच्च्या फुले-शाहू-आंबेडकरी, अहिंसावादी वारकरी आहे. मुळात फुले उभयता, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण विरोधी कधीच नव्हते. ते या ‘Religious Notions’ व्यवस्थेच्या म्हणजे ब्राह्मण्याच्या विरोधी होते. ते कोणत्याही जातीचे असो. माझे अनेक मित्र-मैत्रिणी, सहकारी ब्राह्मण आहेत. ब्राह्मण जातीत जन्माला येणे, हा कुणाचाही दोष नाही. किंबहुना माझा विश्वास आहे, जेव्हा कधी अशा ‘Religious Notions’विरोधी विविधांगी कार्यक्रम-उपक्रम सुरू होतील, तेव्हा हेच माझे ब्राह्मण सहकारी यात अग्रेसर राहतील असे वाटते. पुढे जाण्यापूर्वी एवढेच म्हणेन की, ही ‘Religious Notions’ची शोषणकारी व्यवस्था उदध्वस्त होणे ही ब्राह्मणांसह सर्व समाजाच्या हिताचेच आहे, असे मी मानतो.
बाबासाहेब आणि ‘जातीव्यवस्था निर्मूलन’
संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्याला एकसष्ठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सहा दशकांचा कष्टकरी बहुजन स्त्री-पुरुष समूहांच्या संदर्भात वास्तवातील सामाजिक-आर्थिक-राजकीय प्रश्नांपैकी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘Annihilation of Caste’ या १९३६ सालच्या न झालेल्या भाषणातील ‘Religious Notions’१ या संकल्पनेबाबत अधिक विचार करण्याचा येथे प्रयत्न करत आहे. बाबासाहेबांच्या या भाषणाला आज ८६ वर्षे झाली. २७ एप्रिल १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हर भगवान यांना लिहिलेल्या पत्रात ‘जातीव्यवस्था निर्मूलना’चा एक प्रभावी मार्ग सांगितला आहे. ते म्हणतात, “the method of breaking up the Caste System was not to bring about inter-caste dinners and inter-caste marriages but to destroy the religious notions on which Caste was founded.”२ याचे अधिकृत मराठी भाषांतर माझे सहकारी प्रा. प्रकाश सिरसट यांनी केले आहे. ते लिहितात, “आंतरजातीय सहभोजन किंवा आंतरजातीय विवाह नव्हे, तर ज्यावर जातिव्यवस्था उभारलेली आहे, त्या धार्मिक कल्पनांचा विनाश करणे ही जातिव्यवस्था उदध्वस्त करण्याची पद्धत आहे.”३
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
श्री. संत राम यांना उद्देशून बाबासाहेब पुढे लिहितात, “I have discussed the ways and means of breaking up the Caste System. It may be that the conclusion I have arrived at as to the best method of destroying Caste is startling and painful.” पण त्याच वेळी स्वत:च्या विश्लेषणाविषयी ते खुलेही होते. ते म्हणतात, “You are entitled to say that my analysis is wrong. But you cannot say that in an address which deals with the problem of Caste it is not open to me to discuss how Caste can be destroyed.” ४ मराठी भाषांतरात प्रा. प्रकाश सिरसट लिहितात, “भाषणाच्या त्या भागातच मी जातिव्यवस्था मोडण्याचा मार्ग आणि साधने या संबंधी चर्चा केली आहे. जाती विध्वंसनाची पद्धती सर्वोत्कृष्ट पद्धती म्हणून मी ज्या निष्कर्षाप्रत आलो आहे, तो बहुतेक धक्कादायक आणि दु:खदायक ठरला असावा. माझे विश्लेषण चुकीचे आहे असे म्हणण्याचा आपल्याला जरूर अधिकार आहे. परंतु जातीच्या प्रश्नासंबंधी भाषणात जात कशी नष्ट करायची, हे सांगण्याची मला मुभा नाही, असे आपण म्हणू शकत नाही.”५
या संदर्भात माझे ज्येष्ठ सहकारी, फुले-आंबेडकर विचार व चळवळीचे अन्वयार्थी, विचारवंत आणि शासनाचे समिती-सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी ‘रिलिजीअस नोशन’ या संदर्भात अधिक स्पष्ट केले आहे. या अनुवादाच्या निमित्ताने त्यांनी केलेले विवेचन लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. ते म्हणतात, “जगामध्ये विषमता आहे. उच्चनीचतेचा एक संघर्ष आहे. पण त्याला भारतातल्यासारखी ‘पावित्र्याची’ जोड नाही. त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे.” ते पुढे म्हणतात, “परंतु भारतात ती जन्मजात असल्यामुळे व तो दैवी व धार्मिक आदेशानुसार असल्याची एक मानसिकता भारतीय व्यक्तीमध्ये असल्यामुळे त्यात बदल नाही... जेथे जेथे ही विषमता धर्माधिष्ठित पावित्र्याच्या कल्पनेत अडकली, तेथे अधिकार मिळूनही मानवीसमूह पंगू बनतो.”
..................................................................................................................................................................
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘Annihilation of Caste’ या ग्रंथाच्या पहिल्याच पानावर तथागत गौतम बुद्धाचे वचन दिले आहे- “Know truth as truth and untruth as untruth.” (सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा). याचा अर्थ कोणतीही आर्थिक-राजकीय व्यवस्था आणण्याचा विचार मांडा; स्त्रीदास्य-वर्ण-जाती व्यवस्थेचे नागडे-उघडे सत्य नाकारून हा प्रश्न आता राहिला नाही, असे खोटा समज करून त्याचा गुंता कधीच समजणार नाही आणि तो सुटणारही नाही. त्यासाठी मानवी जीवनाला स्पर्श करणा-या सर्व अंगात एकाच वेळी जाणीवपूर्वकच परिवर्तन करत जावे लागणार आहे.
.................................................................................................................................................................
यावर बाबासाहेब जो उपाय सांगतात, त्याविषयी डोळस सर म्हणतात, “त्यासाठी केवळ समतेवर आधारित समाजरचना उभी करणे पुरेसे ठरत नाही, तर धर्माच्या नावाने झालेले संस्कार व त्यातून निर्माण झालेली मानसिकता हटवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोदाहरणे देऊन स्प्ष्ट केले आहे. अस्पृश्यता, भेदभाव, उच्च-नीच या भावना नष्ट करण्यासाठी त्यांची निर्मिती करणारे घटक व ती संस्कारित करणारी यंत्रणा आपल्याला नष्ट करावी लागेल. जातिव्यवस्थेचा हा पाया स्पष्ट करून तो उध्वस्त करण्याची गरज त्यांनी येथे प्रतिपादन केली आहे.”६
‘Religious Notions’वर एवढी चर्चा का?
हे तपशिलात देण्याची गरज आहे. कारण या ‘Religious Notions’ म्हणजे नेमके काय, त्यांची वास्तवातील रूपं काय, त्या कोणत्या प्रक्रियेतून कशा पद्धतीने कमी करत जायच्या, यावरील चर्चा म्हणजे केवळ धर्म चिकित्साच आहे काय? या अंधश्रद्धा मानून तसे कार्यक्रम-उपक्रम घ्यायचे का, यांचे मूळ वाहक कोण, या प्रक्रियांचे नेतृत्व कुणी करायचे, राज्यसत्ता-प्रशासन व सत्ताधारी, शासकीय-निमशासकीय कर्मचारी युनियन्स, कामगार संघटना, प्रसिद्धी माध्यमे, विचारवंत-साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्र, आदी घटकांच्या यांच्या भूमिका (Role & Responsibilities) कोणत्या आहेत? या सर्वांवर गांभीर्याने विचारविनिमयाची गरज आहे. त्यातील काहीच मुद्द्यांची चर्चा पुढे आहे. जातीवर्चस्वाविरुद्धच्या सर्व परिवर्तन चळवळींचे समतेच्या चळवळीतील योगदान नक्कीच मोठे आहे. पण या सर्वांविषयी आदर ठेवून म्हणेन की, भांडवलशाही शोषणधारित व्यवस्थेच्या विरुद्ध लढत असतानाच पुरोहित-ब्राह्मण वर्ण-जातीचे ‘पावित्र्य व जातीवर्चस्वपणाची सर्वांच्याच मनातील भावना’ कशी दूर करायची, याचे धोरण आणि कार्यक्रम कोणते, कसे, कुणी करायचे; कुणाची काय जबाबदारी याची सविस्तर-सामायिक चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२-१३ फेब्रुवारी १९३८ रोजी रेल्वे कामगारांसमोर खूपच महत्त्वाचे भाषण केले होते. त्या वेळी त्यांनी ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही’ कामगारांचे हे दोन मुख्य शत्रू आहेत असे स्पष्टपणे सांगितले आहे. तर बाबासाहेब याबाबत अधिक स्पष्ट करत २७ सप्टेंबर १९५१ रोजी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देताना म्हणाले, “हिंदू समाजातील वर्गावर्गातील उच्चनीच भेद व लिंग भेद तसेंच कायम ठेवून केलेले कोणतेही निव्वळ आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे कायदे म्हणजे घाण न काढता त्यावरच उभारलेले पत्त्यांचे बंगले होत.”७
‘Religious Notions’विरोधाची प्रदीर्घ परंपरा
भांडवलशाहीच्या उदयानंतर ब्राह्मणी व्यवस्थेची ही ‘Religious Notions’ कमी झालीच नाही. तर ती नवनव्या तंत्रज्ञानाबरहुकूम साजेशी रूपं घेत समोर येत आहे. जाती-वर्ग-पुरुषीवर्चस्ववादी व्यवस्था व त्यामधील मानसिकता इतकी जटील आहे की, या साऱ्यांचा परस्परसंबंध समजण्यासाठी एकच एक परिवर्तनकारी-क्रांतिकारक विचारसरणी-सिद्धांत पुरेसा आहे असे वाटत नाही. त्यासाठी मार्क्स-एंगल्स, लेनिन, सूफी-वारकरी संप्रदाय, जोतीराव-सावित्री फुले उभयता, शाहू महाराज, महात्मा गांधी, गो.ग. आगरकर, वि.रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, डॉ. लोहिया, हमीद दलवाई आदींचे विचार समजून घेऊन वरील संदर्भात प्रदीर्घ चळवळीचे धोरण, कार्यक्रम-उपक्रम ठरवायला हवेत. हा एवढा गुंता आहे की, त्यासाठी व्यवस्थाविरोधी समतेच्या वरील विचारवंतांचे सहकार्य घ्यावेच लागणार आहे. त्यात आपापले अभिनिवेश बाजूलाच ठेवावे लागणार आहेत.८
त्याच वेळी हेही लक्षात घ्यायला हवे की, येथे भारत राष्ट्र उभारणीच्या दोन समांतर विचारधारा आहेत. त्यापैकी एक आहे रा.स्व. संघाची आणि दुसरी आहे भारतीय राज्यघटनेची. सरसंघचालक श्री. मा. स. गोळवलकर यांची ‘मुसलमानांचा प्रश्न’ यावर एक मुलाखत घेतली गेली होती. त्या वेळी ते ‘अल्पसंख्याक’ या संदर्भात बोलताना म्हणाले, “अनुसूचित काही लोकांनी डॉ. आंबेडकरांचे अनुयायित्व पत्करून बौद्ध मताचा स्वीकार केला. आता ते म्हणतात की, आम्ही हिंदू समाजापासून वेगळे आहोत. आपल्या देशात अल्पसंख्याकांना काही विशेष राजकीय हक्क असल्यामुळे प्रत्येक गट स्वत:ला अल्पसंख्य ठरवून त्या आधारावर ते विशेष हक्क मिळवण्याची खटपट करत असतो. परंतु त्यामुळे आपल्या देशाचे अनेक तुकडे होतील आणि त्यातून आपला सर्वनाश ओढवेल.”९
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
संघाच्या ब्राह्मणी धर्माप्रमाणे बुद्ध हा विष्णूचा अवतार मानणाऱ्या संघाला बाबासाहेबांची प्रथमासूनची खास करून १९३२च्या येवल्याच्या घोषणेनंतरची भूमिका व सर्व पावले प्रचंड जाचणारी वाटत होती. आणि १४ ऑक्टोबर, १९५६ला नागपूरला बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांसोबत ब्राह्मणी-हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची स्विकृती केली. जगाच्या आधुनिक इतिहासात संघाच्या धर्म-संस्कृती-राजकारण व त्यांच्या १९२५च्या कटाला एवढे मोठे ठोस आव्हान अन्य कुणीच दिलेले नव्हते. त्यामुळे हैराण संघाचे हैराण सरसंघचालक श्री. मा. स. गोळवळकर वरील उद्गार काढत आहे.
दुसऱ्या भाषेत सांगायचे तर ते बाबासाहेबांना सरळ सरळ ‘देशद्रोही’ म्हणत आहेत. पण त्यांची उघड बोलायची हिंमत नाही. त्यात भर म्हणजे स्वतंत्र भारताने ‘मनुस्मृती’ नाकारून राज्यघटनेचा स्विकार केला. राज्यघटनेच्या २७ नोव्हेंबर, १९४९मध्ये उद्देशिकामध्येच “आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करत आहोत.” असे स्पष्टपणे म्हटले आहे. म्हणून हा दोन समांतर विचारधारांमधील संघर्ष आहे. त्यासाठी या उद्देशिकाविरोधी ब्राह्मणी धर्माच्या ‘Religious Notions’ नष्ट करणे हे अपरिहार्य ठरते. काही अपवाद सोडल्यास आजही विज्ञान, साहित्य-संस्कृती, आदी क्षेत्रांसह सर्वत्र या ‘Notions’ सांभाळत राहणारा एक मोठा ऊच्चवर्ण-जातीय समाज आहे. तोच येथे विचारवंत म्हणून वावरत आला आहे. तो आणि अन्य समूह संगणकाचा शोध लावतात आणि यातील ब्राह्मणी माणसं त्याची पूजाही करतात! या सर्वाला सत्तेचे पाठबळ मिळाले आहे. म्हणूनच त्याचे आंधळे अनुकरण करणारा सर्वाधिक वंचित बहुजन समाजच आहे, हेही नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर ‘Religious Notions’ तोडण्याच्या प्रदीर्घ परंपरेकडे परत एकदा पाहण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या २०२१च्या विधानसभांच्या निवडणुका आणि त्यानंतरचे तामिळनाडू राज्य सरकार! डी.एम.के.चे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन सरकारने १०० दिवसांत २०० ब्राह्मणेतर पुजारी नियुक्तीची घोषणा केली. लवकरच ‘शैव अर्चक’ कोर्स सुरू केला जाईल. तो पूर्ण केल्यानंतर कोणीही पुजारी होऊ शकतो. ‘तामिळनाडू हिंदू रिलीजियस अँड चॅरिटेबल इंडॉमेंट डिपार्टमेंट’ (एचआर अँड सीई) नुसार ३६००० मंदिरांत नियुक्त्या होतील. लवकरच ७० ते १०० ब्राम्हणेतर पुजार्यांची पहिली यादी होईल. यावर मद्रास विद्यापीठाचे प्रा. मणिवन्नन म्हणाले की, ब्राह्मणेतर पुजार्यांची लढाई जुनी आहे. १९७० मध्ये पेरियार यांचा हा मुद्दा; तेव्हा द्रमुक सरकारने नियुक्तीचे आदेश दिले. १९७२मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. १९८२मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री रामचंद्रन यांनी आयोग स्थापन केला होता. आयोगाचे सर्व जातीच्या व्यक्तींना प्रशिक्षण दिल्यानंतर पुजारी नियुक्ती करण्याचे आदेश होते.
यावेळी संघ-भाजपच्या भूमिका पाहून जोतीराव, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्णय व कृतींची आठवण झाली. १८७३ साली जोतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केल्यानंतर समाज भूमिकेच्या ‘असंमत वैधव्य’ यात ते म्हणतात, “ब्राह्मण विधवांना इतक्या दयनीय निर्लज्ज मार्गावर खेचून नेणारी आर्यसंस्था इतकी शिसारी आणणारी आणि नीच आहे… दुर्दैवी ब्राह्मण विधवांचे केशवपन करण्यास कोणत्याही न्हाव्याला परवानगी देण्यात येऊ नये…. गरीब विधवांनाही पुनर्विवाहाची परवानगी मिळाली पाहिजे. स्त्री जीवनाकडे पहाण्याच्या दुष्ट बुद्धीमुळेच लबाड, विकृत शास्त्रकारांनी अशा अन्याय्य आणि बाष्कळ अटी त्यांच्या शास्त्रात घुसडल्या असल्या पाहिजेत.”
एवढेच नाही तर जोतीरावांनी ब्राह्मण लग्नादी विधी पूर्णपणे नाकारले आणि पुरोहितशाही संस्थेला आव्हान देवून समांतर ‘सत्यशोधक लग्नविधी’ आणले. तशी लग्नं लावायलाही सुरुवात केली. ब्राह्मण वर्ण-जातीचे लादलेले पावित्र्य संपूर्णत: कसे बोगस आहे, हे सिद्ध करून दाखवले. म्हणून चिडलेल्या ब्राह्मणांनी फुले उभयताना अखेपर्यंत किती त्रास दिला, हे सर्वज्ञात आहेच.
कोल्हापूरचे डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू स्मारकग्रंथा’त शाहूंच्या कार्याचा आढावा घेताना लिहिले आहे. फुले यांची परंपरा पुढे नेत शाहूंनी ठोस पावले उचलली. “वेदोक्तांच्या संघर्षात करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी कर्मठ ब्राह्मणांची बाजू घेतल्यामुळे शाहू महाराजांनी पिठाचे उत्पन्न सरकारजमा केले होते. शेवटी संघर्षात शंकराचार्य विद्यानरसिंह भारती यांना हतबल व्हावे लागले. त्यांना १९०५ साली महाराजांसमोर शरणागती स्वीकारावी लागून कोल्हापुरातील ब्राह्मवृंदांनाही शरण जाण्याचा आदेश द्यावा लागला. राजवाड्यातील देवदेवतांच्या व पूर्वजांच्या समाधींच्या पूजा तोवर ब्राह्मण पुरोहितांकडून होत होत्या. १९२० साली शाहू महाराजांनी त्या बंद करून मराठा पुरोहितांकडून सुरू करण्याचा हुकूम दिला. दुसऱ्या एका हुकमाने महाराजांनी क्षात्रजगद्गुरूंच्या पाटगांव संस्थानातील आणि वाडी रत्नागिरी येथील जोतीबाच्या देवस्थानातील ब्राह्मण पुजारी यांना काढून टाकून त्या जागी मराठे पुजारी नेमले. त्याचबरोबर मराठा पुरोहित तयार करण्यासाठी खास प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचाही निर्णय घेतला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
१९३६च्या ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या न झालेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म सुधारणेसाठी एक ठोस रूपरेषा मांडतात. त्यातील दोन होत्या, “…पुरोहितपद वंशपरंपरागत नसावे. स्वत:ला हिंदू म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला पुरोहितपदासाठी पात्र मानले पाहिजे. सरकारने ठरवून दिलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आणि त्याला तो व्यवसाय करण्याची सनद असल्याशिवाय पौराहित्य करता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद करावी.” एवढेच नाहीतर ते पुढे म्हणतात, “सनद नसलेल्या पुरोहिताने केलेला कोणताही समारंभ विधिसंमत मानण्यात येऊ नये. तसेच सनद नसताना पौराहित्य करणे शिक्षापात्र गुन्हा ठरविण्यात यावा.”
तर एका पत्रकाराने पेरियार यांना विचारले, “पेरियार साहब, आप भगवान वगैरे नहीं मानते I फिर भी आप चाहतें हैं की, सभी जातियोंके लोग मंदिरों में पुजारी बनें I ऐसा क्यों?” यावर पेरियारांनी उत्तर दिले, “जिस दिन हर जाति के लोग पुजारी बनने लगेंगे, उस दिन ब्राह्मण भी ये कहने लगेंगे की मंदिर के अंदर जो है वह पत्थर हैं, भगवान नहीं I इस तरह मेरा काम आसान हो जाएगा I इसलिए मैं चाहता हूं सभी जातियों के लोग पुजारी बनें I” परंपरेने लादलेले, खोटे ब्राह्मणी पावित्र्य व त्याविषयीची जनसामान्यांची समज-भावना व त्यांची लुटारू व्यवस्था नष्ट करण्यासाठी या अंमलात आणलेल्या विविध ठोस पध्दती व मार्ग आहेत. पावित्र्यावर आधारलेल्या व सर्व सामान्य हिंदूंवर लादलेल्या “Religious Notions” कशा खोट्या आहेत, हेच यातून सर्व विचारवंत-नेत्यांना सिद्ध करायचे होते.
केवळ ‘Religious Notions’ स्वतंत्रपणे, सुट्या सुट्या बघून चालणार नाही. ती एक घट्ट व्यवस्था आहे. ब्राह्मण-पुरोहितशाहीबरोबर तिची एक निश्चित उत्पन्न देणारी आर्थिक व्यवस्था आहे. ही तिची दुसरी बाजू आहे. याचा असाही विपरीत परिणाम दिसत आहे. या ‘नोशन्स’ वर आधारीत ‘जातिव्यवस्था हे फक्त श्रमविभाजन नाही. ते श्रमिकांचेही विभाजन आहे,’ असे डॉ. आंबेडकर त्यांच्या ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या भाषणात म्हणतात. त्यामुळे वरील दोन्ही बाजू एकाच वेळी ध्यानात घ्याव्या लागतील. हे वरील प्रदीर्घ परंपरेत दिसून येत आहे.
‘Religious Notions’ उदध्वस्त : मुख्य भूमिका-जबाबदारी?
तरीही या ‘Religious Notions’ उदध्वस्त का होत नाहीत? ज्याला नवनव्या तंत्रज्ञानावर आधारित विकसित आधुनिकता विकास व्यवस्था म्हणतात. आज अमेरिकासह जगभर भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. काहीतर नोकऱ्या करता करता तेथेच स्थायिक होत आहेत. त्यांच्या स्वतंत्र कॉलनीज उभ्या राहिल्या आहेत. तेथे येथील शास्त्रिय संगीत गायक-गायिकाही स्थायिक होत आहेत. तिथे त्यांना भारतापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आर्थिक उत्पन्न मिळत आहे. या वसाहतींमधून विधीपूर्वक लग्नादी कार्ये जोरात सुरू आहेत. त्यासाठी डिजिटल टेक्नॉलॉजीचा पूरेपूर उपयोग केला जात आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ नावाची सिरिअलही सुरू आहे. तेथे नवरा-बायको व त्यांचे दोन्ही घरची सर्व मंडळी शरीराने समोरासमोर असायची गरज नाही. आता सर्व काही ‘ऑनलाईन’च! इथेही पुरोहित ब्राह्मण यज्ञ करत याच ‘Religious Notions’ नवीन, आकर्षक स्वरूपात पुढे नेत आहेत! म्हणजे निव्वळ अर्थव्यवस्था बदलत गेली, विकसित तंत्रज्ञान, विवेक-बुद्धीवादी-विज्ञानवादी दृष्टिकोन आला म्हणजे बाकी प्रश्न सोडाच, पण केवळ या चिवट-चिकट ‘Religious Notions’ कशा नष्ट होत जाणार आहेत? आणि मग मुख्य प्रश्न उभा राहतो, यात मुख्य भूमिका-जबाबदारी कोणाची?
..................................................................................................................................................................
नुकतेच एप्रिल २०२१ मध्ये ‘The struggle to preserve, BR Ambedkar’s writing’ हा ‘THE CARVAN’ आणि ‘50 DALITS Remembering India’ हा ‘Outlook’चा ‘Ambedkar Anniversary Special’ हे बहुचर्चित नियतकालिकांचे अंक प्रसिद्ध झाले. प्रथमदर्शनी अंक छानच वाटतात. पण तुम्ही अंक वाचलेत तर एक खास बाब लक्षात येईल की, यातील सर्व क्षेत्रातील हिरो-हिरॉईन्स आणि डॉ. आंबेडकर यांना ‘दलित’च मानले गेले आहे. जणू काही भारतातील हे अलगच उपराष्ट्रातील नागरिक आहेत असेच जाणवते. आणि अशा ‘नोशन्स’बाबत वृत्तपत्रे, सोशल मीडियांतून कोण कोण बोलत होते?
.................................................................................................................................................................
या बाबतीत बाबासाहेब जळजळीत, कदाचित न पटणारे कटू वास्तव सांगतात, “राजकीय आणि काही प्रमाणात आर्थिक सुधारणांसाठी लढण्यात ब्राह्मण बिनीचे सैनिक आहेत. परंतु जातीचे अडथळे मोडण्यासाठीच्या सैन्यासोबत ते बाजारबुणगे म्हणूनही सामिल नाहीत. या बाबतीत भविष्यात ब्राह्मण कधी पुढाकार घेण्याची काही आशा आहे का? माझे उत्तर ‘नाही’ असे आहे.”
पुढे म्हणतात, “तुम्ही युक्तिवाद कराल की, ब्राह्मण निधर्मीही आहेत आणि पुरोहितही आहेत. जाती मोडणाऱ्यांच्या वतीने दुसऱ्याने हातात दंडुका घेतला नाही तर पहिला घेईल. हे सर्व ऐकताना छान वाटते… यात हे विसरले गेले आहे की, जाती मोडण्याचा ब्राह्मणांवर प्रतिकूल परिणाम होणे क्रमप्राप्त आहे… जिचा अंतिम परिणाम ब्राह्मण जातीची सत्ता आणि प्रतिष्ठा नष्ट करणे आहे, अशा चळवळीचे नेतृत्व करण्यास ब्राह्मण कधीतरी संमती देईल अशी अपेक्षा करणे वाजवी आहे का?” शेवटी बाबासाहेब म्हणतात, “—निधर्मी ब्राह्मण आणि पुरोहित ब्राह्मण असा फरक करणे निरुपयोगी आहे. ते दोघे सगे-सोयरे आहेत.”१०
हे १९३६चे निरीक्षण व ही सामाजिक-राजकीय विधाने आणि आज २०२१चे वास्तव यात नेमका किती, कुठे, कसा फरक पडला आहे, या प्रक्रियांचाही विचार होण्याची गरज वाटते.
२०२१ मध्ये कुठे आहोत?
नुकतेच एप्रिल २०२१मध्ये ‘The struggle to preserve, BR Ambedkar’s writing’ हा ‘THE CARVAN’ आणि ‘50 DALITS Remembering India’ हा ‘Outlook’चा ‘Ambedkar Anniversary Special’ हे बहुचर्चित नियतकालिकांचे अंक प्रसिद्ध झाले. प्रथमदर्शनी अंक छानच वाटतात. पण तुम्ही अंक वाचलेत तर एक खास बाब लक्षात येईल की, यातील सर्व क्षेत्रातील हिरो-हिरॉईन्स आणि डॉ. आंबेडकर यांना ‘दलित’च मानले गेले आहे. जणू काही भारतातील हे अलगच उपराष्ट्रातील नागरिक आहेत असेच जाणवते. आणि अशा ‘नोशन्स’बाबत वृत्तपत्रे, सोशल मीडियांतून कोण कोण बोलत होते? यंदा १५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक, लेखक श्री. द्वारकानाथ संझगिरी यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. नुकत्याच झालेल्या ऑलिंपिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या केळाडूंची जात पाहिली गेली. अपमानकारक लिहिले गेले. तोच अनुभव त्यांना पुण्यातील एका जुन्या, प्रसिद्ध क्लबमध्येही आला. हे ऐकले, अनुभवले व निरीक्षण केले, त्यांनी ‘जाति न पूछो खेल की...’ या शीर्षकाखाली ती लिहिली आहेत. लेखाच्या शेवटी ते म्हणतात, “जगात तिचं कौतुक होतं याची मळमळ त्या गावात अनेकांना वाटत असावी. ती मळमळ याच्यातून व्यक्त झाली. जातीय भावना संपलेली नाही, मनातली उच्च-नीचता संपलेली नाही. ती फक्त दबलेली होती. आणि ती अशी अधूनमधून उसळते. हे पुन्हा सिद्ध झालं.” शेवटी ते लिहितात, “स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी ही स्थिती असेल, तर सामाजिक स्वातंत्र्य अजून किती दूर आहे ह्याची कल्पना येते.”११
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गावातील सार्वजनिक विहिरीवर बौद्ध, दलितांनी पाणी भरण्याचा हक्क मागितला तर त्यांना त्यांच्याच वस्त्यांत स्वतंत्र विहीर वा नळाचे खंबे दिले जातात. एकूण अर्थ काय तर वादच टाळले. तेच विद्यापीठ नामांतराबाबत केले गेले. मराठवाड्याचे विभाजन करून नांदेडला स्वतंत्र ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ आणि बौद्ध, दलित खूपच मागणी करतात म्हणून औरंगाबादला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामांतर नाहीच, पण नामविस्तार केला गेला. सत्ताधाऱ्यांचे हे लबाड राजकारण आहे. येथे कुठे आली सामाजिक समता? यालाच सत्ताधारी व साहित्यिकांच्या ब्राह्मणी ‘Religious Notions’ म्हणतात. त्या नष्ट करणारी ठोस पावले उचललीच जाणार नाहीत, हे नक्की आहे!
साखर कारखाने : पुरोहित काय संबंध?
सहकारी साखर कारखाने व सर्व संस्था यांचे मुख्य घटक आहेत लाखोंचा बंजारा, भिल-ठाकर आदिवासी, आदी जातीजमातींमधील ऊस तोडणी व वाहतूक मजूर, ऊस उत्पादक मराठादी शेतकरी सभासद, कारखान्यांतील कामगार, सफाई कामगार, तंत्रज्ञ आणि कारखाना उभारणीत पुढाकार घेणारे काही शेतकरी नेते. इथे कुठेही पुरोहितांचा काडीचाही संबंध येत नाही. तरीही प्रथमपासूनच करखान्यांच्या प्रत्येक शुभारंभ प्रसंगी पुरोहित ब्राह्मण बोलावलेच जात आहेत. हे सत्ताधारी जाती-वर्गाचे खास वैशिष्ट्यच राहिले आहे! याच ‘ब्राह्म-क्षत्रिय’ युतीच्या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत जोतीराव फुले यांचा ‘कुणबी राजा शिवाजी’ऐवजी मुस्लीम-दलितविरोधी संघांच्या ब. मो. पुरंदरेंच्या ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी’ला लादले गेले. नाटककार गडकरी यांचा पुतळा बसवला आणि ‘सोयीचा’ नव्हता तेव्हा पाडलाही! आणि सोयीचे असेल तेव्हा पुण्याची ऐतिहासिक भांडारकर संशोधन संस्था जाळली. या साऱ्या बाबी गनिमी काव्याने करायला लावल्या.१२ त्यांच्या अशाश्वत सत्तेने भारतीय राज्यघटना धुडकावत मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या संघ साहित्य, इतिहास, प्रशासन, साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रांतील ‘शाश्वत ब्राह्मणी सत्ते’ला ते अजिबात हात लावू शकले नाहीत. टिप उलट त्यांच्या पुरोहितशाहीला सत्तेचे अभय देतच राहिले. काँग्रेस, भाजप मराठा पुढाऱ्यांच्या घरीदारी, सहकारी संस्था, शासनापर्यंत संघाला हुकमी उत्पन्नाचे स्रोत देत राहिले. घटनेप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी जातीजमातींच्या राखीव जागांची प्रामाणीकपणे अंमलबजावणीही केली नाही. किंबहुना ती कशी होणार नाही, हेच पाहिले जात आहे. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक आणि प्रशासनातील संघाच्या स्थानाला अजिबात धक्का लागला नाही. एकापरीने शाहूंनी त्यांच्या संस्थानातील सर्व सत्ता वर्चस्ववादी ब्राह्मणी धर्म परंपरा व सत्तेला आव्हान देवून खिळखिळी करण्यास न्यायपूर्वक वापरली. एवढे धाडस येथील सत्ताधारी मूठभर मराठा घराण्यांनी आजवर कधीच दाखवले नाही!
संयुक्त महाराष्ट्र राज्य : अभिवचन आणि...
१३ ऑक्टोबर १९६० रोजी महाराष्ट्र राज्याविषयी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या ध्येय व धोरणविषयक संमत झालेल्या मसुद्यात सांगितलेल्या उद्देशांमधील एक होते – ‘सामाजिक, आर्थिक व राजकीय समता स्थापन करून महाराष्ट्राच्या जीवनाची सहकारी तत्वावर उभारणी करणे.’१३ ७३व्या घटना दुरुस्तीनंतर पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के, ओबीसींना २७.५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमातींना आधीपासूनच राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रथमपासून आणि आता मिळून तुलनेने अधिक प्रतिनिधीत्व सर्व जाती-जमाती व महिलांना समूहांना मिळाले आहे. लोकशाही अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने ही खरोखरच चांगली बाब आहे.
लोकशाहीतील पहिला विश्वास : शहाणपणासुद्धा केंद्रित नाही!
५८ वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायती राज’ यावरील परिसंवादात या संदर्भात भारतातील एक अर्थतज्ज्ञ, सहकाराचा पाया घालणारे एक तज्ज्ञ डॉ. धनंजय गाडगीळ म्हणतात, “लोकशाही विकेंद्रीकरणाच्या भूमिकेतील खरा मुद्दा लोकशाहीबाबतचा आहे. लोकशाही ही विकेंद्रितच असली पाहिजे. नाहीतर ती ‘लोकशाही’ नाहीच. खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणजे समाजाचे व्यवहार प्रत्यक्षांत चालवायला, त्यातील प्रत्येकाला समान संधी मिळते अशी परिस्थिती. ती पद्धत किंवा तो समाज लोकशाही आहे की, ज्यांत शक्य तितक्या जास्त प्रमाणांत, सर्व लोकांना राज्यकारभार, राजकारण, समाजकारण करण्यात सहभागी होता येते व त्यातून लोकांचे नेतृत्व तयार होते. लोकशाहीच्या प्रसिद्ध व्याख्येप्रमाणे, थोडक्यात, लोकशाही म्हणजे ‘लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य’ होय.”
डॉ. गाडगीळ पुढे म्हणतात, “राज्यघटनेप्रमाणे लोकशाहीची मूल्ये स्वीकारली आहेत. याचा अर्थ लोकशाहीचा कारभार अधिक विश्वासाचा, हुकूमशाही इत्यादींपेक्षा जास्त चांगला असा आहे. मूठभर माणसे कितीही शहाणी असली तरी त्यांना सर्व समजते असे नाही. शहाणपणासुद्धा केंद्रित नाहीं, सर्वत्र विखुरलेला आहे हा लोकशाहीतील पहिला विश्वास आहे.”१४
महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील मूठभर सत्ताधारी घराण्यांच्या आशीर्वादाने खालपर्यंत आणि संघाचे शासन-प्रशासन मिळून मजबूत ‘राजकीय यंत्रणा’ उभी केलेली दिसत आहे. शेकडो वर्षांच्या पारंपरिक ‘धार्मिक कल्पना-भावनां’च्या घट्ट व्यवस्थेचे बळी असलेल्या वंचित बहुजन समूहांना त्यातच अडकवून ठेवण्याचे एक षडयंत्र आहे असेच वाटत आहे. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास सांगतो की, ब्राह्मण वर्ण-जातीचे पारंपरिक तथाकथित पवित्र मानले गेलेले अधिकार-कामं कोणत्याही सरकारांनी कायदे-नियम करून रोखलेच नाहीत. उलट विविध पातळीवर अस्पृश्यता सांभाळत सांभाळत त्यांची सत्ता शाबूत राखत आले आहेत. जेव्हा समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्या ८०च्या दशकांत ‘एक गाव, एक पाणवठा’ या कार्यक्रमाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळू लागला. यातील समतेची धग वाढण्याआधीच सरकारने ‘एक गांव, एक पाणवठा’ हा कार्यक्रम ताब्यात घेतला. आणि जि.प., जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर याचे बोर्ड्स लावून त्याचे बिनदाताच्या वाघासारखे ‘सरकारीकरण’ केले! आणि त्यातील धगच विझवून टाकली. कारण ते लोण वाढत वाढत राजसत्तेला धडकले तर या ‘Religious Notions’ उदध्वस्त करण्याची ठोस धोरणे सरकारला घ्यावी लागतील; या भीतीपोटी अशा प्रकारचे कार्यक्रम-उपक्रम-छोट्या-मोठ्या प्रतिक्रिया येथील पुरोगामी म्हणवून घेणारी सत्ता स्वत:मध्ये सामावून घेते. आणि हा तर कोणत्याही राजसत्तेचा गुणधर्म असतोच. तो समजून घेऊन तशी धोरणे व व्यापक जनाधार होत जाणारे कार्यक्रम, नेतृत्व नसेल तर हेच घडत जाणार आहे.
एका बाजूला खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाउजा) आणि खुल्या बाजारपेठेवर आधारित अर्थ आणि राजकीय व्यवस्था स्विकारल्यावर भारतासह जगाचे सर्व प्रश्न सुटतील, असा दावा करीत हा विकासाचा घोडा तुफान वेगाने चालला आहे. त्यासाठी सम्यक परिवर्तनाचे तत्त्वज्ञान नको. ‘जग मेरे मुठ्ठी में! माहिती तंत्रज्ञान सारे प्रश्न सोडवील!!’ हा नारा लावला जात आहे. त्यामुळे वर्ण-जात-जमात वर्चस्व, पुरुषप्रधानता, शोषण-कुपोषण, शिक्षणाचा अभाव, स्त्री-शुद्रादिशूद्रांवरील अमानुष अन्याय-अत्त्याचार, पर्यावरणाचा जात चाललेला समतोल, वातावरणातील बदल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निरंतर वाढणारी जीवघेणी महागाई आदी प्रश्न सहज सुटतील असा दावा या मागे आहे. मागिल नऊ दशकांत साधारपणे तीन स्वरूपाची मुख्य स्थलांतरे झालेली पाहत आहोत. ‘चातुर्वण्याधिष्ठीत व्यवस्थेने पूर्वास्पृश्यांवर लादलेली पारंपारिक कामं नाकारा, शहराकडे चला आणि कामं करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली. त्यानंतर हाजारो कुटुंब जिथे जिथे नवनवे उद्योग उभे रहात होते; तिथे तिथे सामावून घेतली गेली. त्यामुळे भारतात इगतपुरी, मनमाड, परभणी, पूर्णा, नांदेड, सिकंदराबाद, आदी रेल्वे जंक्शन्सजवळ या स्थलांतरीत कुटुंबांच्या वसाहती उभ्या राहिलेल्या दिसतात. हा एक नमुना आहे. मात्र या स्थलांतराचे सर्वात ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या कुटुंबांनी ‘ब्राह्मणी धर्माच्या नोशन्स’ झुगारून दिल्या होत्या. ही कुटुंबं जेथे गेली तेथे फुले-आंबेडकरी विचार-चळवळ वाढवली. शेवटी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरला बाबासाहेबांच्या उपस्थितीत ब्राह्मणी हिंदू धर्माला अधिकृतपणे सोडचिठ्ठी दिली. आणि बौद्ध धम्म स्वीकारला. आजवर ती लढाई जारीच ठेवली आहे.
त्यानंतर १९४८ला नथुराम गोडसे या ब्राह्मण विद्वेषाने महात्मा गांधींची हत्या केली. त्यावेळी विशेषत: प. महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या हत्या झाल्या. त्या दरम्यान सर्वत्र ब्राह्मण कुटुंब शहरांत आली व वस्त्या करून राहिली. मात्र त्यांनी त्यांच्या ‘ब्राह्मणी धर्माच्या नोशन्स’ सांभाळत, वाढवत प्रशासनावर घट्ट पकड बसवली. त्यांचे टार्गेट होते वंचित बहुजन. त्यांच्यावर शिवाजी-फुले-शाहू आंबेडकरी विचार व चळवळीची सावली पडू नये, हे कटाक्षाने पहात आहेत. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेनंतर शहर-उद्योग केंद्रीत विकास मॉडेल स्वीकारल्यामुळे गावागावांतून बलुतेदार, दुष्काळी भागातून शेतकरी-शेतमजूर कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर चालू आहे. तसेच ऊस तोडणी-वहातूक, वीटभट्ट्या, बांधकाम, हमाल-मापाडी, आदी विभागातही हे स्थलांतर झालेले मजूर आले आहेत. मात्र ते येताना त्यांच्या डोक्यातील सर्व प्रकारच्या ‘नोशन्स’ घेऊनच आले. आणि हेच संघपरिवाराचे टार्गेट आहे!
‘सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा!’
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘Annihilation of Caste’ या ग्रंथाच्या पहिल्याच पानावर तथागत गौतम बुद्धाचे वचन दिले आहे- “Know truth as truth and untruth as untruth.” (सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा). याचा अर्थ कोणतीही आर्थिक-राजकीय व्यवस्था आणण्याचा विचार मांडा; स्त्रीदास्य-वर्ण-जाती व्यवस्थेचे नागडे-उघडे सत्य नाकारून हा प्रश्न आता राहिला नाही, असे खोटा समज करून त्याचा गुंता कधीच समजणार नाही आणि तो सुटणारही नाही. त्यासाठी मानवी जीवनाला स्पर्श करणा-या सर्व अंगात एकाच वेळी जाणीवपूर्वकच परिवर्तन करत जावे लागणार आहे.१५
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
केवळ १९७८ ते १९८८ या दशकात अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या होत्या. यातील बऱ्याच घटना एक कार्यकर्ता जवळून पहिल्या. अनुभवल्या. त्यापैकी फक्त दहाच घटनांचे काही तपशील समोर घेत आणि इतरत्रच्या कित्येक घटना समोर ठेवून काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला आहे. मी एक सामाजिक-राजकीय कार्यकर्ता आहे. त्यामुळे केवळ इतिहासात रममाण होऊन त्यातच सतत चिंतन करत राहणे मला पटत नाही. कार्ल मार्क्सचे जे म्हणणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पटते, त्यातील एक तत्त्व - “तत्त्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे. विश्वाच्या उगमाचे स्पष्टीकरण देत वेळ वाया घालवणे नाही.” त्यानुसार ‘मराठा व दलित संबंध’ या माझ्या लेखाच्या शेवटी पुढे कसे जाता येईल या विषयी काही सुचवायचा प्रयत्न केला आहे. “आजवर महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या मराठा नेतृत्वाने क्षत्रियकरणाचा त्याग करून कुणबी शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणून आणि फुले-शाहू-आंबेडकरी परंपरा चालवणाऱ्या दलित-बौद्ध नेतृत्वाने स्वतःचे शेतीसंस्कृतीशी नाते प्रस्थापित करून एकत्र यायला हवे. या दोघांनी मिळून राज्यातील अन्य बहुजन समाज आणि अन्य धार्म-जातीय सामाजिक नेतृत्वाला पुढे आणले व बरोबरीच्या नात्याने राज्याच्या नव्या उभारणीची हांक दिली, तर आपापल्या कर्तृत्वाला पडलेल्या मर्यादा आपोआप गळून पडतील, मग प्रश्न उरेल शाश्वत सत्तेवरील ब्राह्मणी परंपरावाद्यांचा. त्यांनी ही सत्ता उध्वस्त करून या ‘महासागराच्या जागर दिंडी’त सहभागी व्हावे.”१६
शेवटी फुले-आंबेडकरी साहित्यातील एक श्रेष्ठ विचारवंत, लेखक आदरणीय बाबुराव बागूल यांचे एक विधान देवून इथेच थांबतो. ‘दलित साहित्य : आजचे क्रांतिविज्ञान’ हा त्यांचे लेख, भाषणं, स्वगत असलेला संग्रह आहे. यातील ‘दलित साहित्य : हे तर माणसाचे साहित्य!’ या लिखाणाच्या प्रारंभीच “मानवी इतिहासातील दु:ख निर्मिती, मुक्ति आणि सम्यक दृष्टी” हे त्यांचे बहुधा स्वगत असावे.१७ यात व्यापक चर्चा केल्यावर ‘शूद्र कोण?’ या मुद्द्यात ते कायद्याचे राज्य आल्यामुळे काय काय महत्त्वाचे बदल झाले या विषयी ऐतिहासिक सत्य सांगतात. ते म्हणतात, “नवे उद्योगधंदे व हुद्दे प्राप्त झाल्यामुळे ब्राह्मणवर्गामध्ये फूट पडलेली होती. सुधारणावादी ब्राह्मण आणि पुराणमतवादी ब्राह्मण असा संघर्ष इतिहासात पहिल्यांदा उद्भवला होता. आता स्त्रीच्या पाठोपाठ शूद्राला साहित्यात स्थान मिळायला काही अडचण नव्हती. एवढेच नाही तर इंग्रजी वाङ्मयात शूद्र-अतिशूद्राप्रमाणे असलेल्या गरीब दुबळ्यांची चरित्रेही नॉव्हेलांत आलेली होती.”
पुढे ते आपल्याकडील साहित्यिक-लेखकांना प्रश्न करत आहेत. ते विचारतात, “इतकी अनुकूलता असूनही शूद्र अतिशूद्रांना साहित्यांत स्थान प्रवेश मिळाला नाही, असे का? हे लेखक कलावादी होते? त्यांना प्रबोधन नको होते? दैन्य, दास्य, दु:ख, दुर्दैव मांडण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नव्हते?” याची सखोल चर्चा केल्यावर शेवटी यामागील ‘सूर्यसत्य’ सांगताना खूपच समतोल विचार-चिंतन करणारे बाबुराव म्हणतात- “ते असमर्थ होते असे म्हणता येणार नाही. त्यांना सामाजिक सुधारणा हवी होती. प्रबोधनही हवे होते. परंतु त्यांना शूद्र-अतिशूद्र दिसले नाहीत व त्यांनी ते साहित्यात मांडले नाहीत. याचे कारण त्यांचे संस्कार, त्यांचे मन आणि त्यांची पौराणिकता हे होय.”१८
टिप :
औपचारिक सत्ता आणि शाश्वत : संसदीय लोकशाहीतील मताच्या अधिकारामुळे जनतेला पाच वर्षांनंतर सत्ता बदलता येते. ती औपचारिक सत्ता. पण प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी निवृत्ती वयाच्या ६०-६२ व्या वर्षांपर्यंत शासन-प्रशासन सत्तेवर अधिराज्य गाजवत असतात. एखाद्या सरकारला वाटले तर निवृत्तीनंतरही त्यांचे अनुभव-कौशल्याच्या नावाखाली त्यांना पुढे ७०-७२ वर्षांपर्यंत सेवेत परत बोलावले जाते. आज २०२१मध्येही यातील बहुसंख्य ब्राह्मण वर्ण-जातीतील आहेत. परत त्यातीलही बहुसंख्य संघीय आहेत. आयुष्यभर सुरक्षित जीवन जगत असताना ते त्यांची पारंपरिक संस्कृती, मूल्ये सभोवतालच्या सर्व प्रशानाला देतच राहतात. ही या समूहाची शाश्वत सत्ता! या शाश्वत सत्तेला काँग्रेस कधीच हात लावू शकली नाही. त्यांच्या औपचारिक सत्तेने कायम या शाश्वत सत्तेशी हातमिळवणी केलेली आहे. ते दोघे मिळून वंचित बहुजनांना शोषत, छळत आहेत. आता २०१४पासून तर संघ-भाजपच्याच निरंकूश दोन्ही सत्ता आहेत. त्यामुळे असे आजी-माजी नोकरशहा संघ-भाजपच्या सत्तेत आमदार-खासदार, मंत्री, राज्यपाल आदी मोक्यांच्या पदावर नेमले जात आहेत.
संदर्भ -
१) Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches, Vol-I, Annihilation of Caste with a reply to Mahatma Gandhi by Dr. B.R.Ambedkar, special issue on the occasion of Diamond Jubilee (1936-2012) published by Higher Education Department, Govt. of Maharashtra, 14th April 2013,
२) वरील प्रमाणे, पान- ८
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, जातिव्यवस्थेचे निर्मूलन- महात्मा गांधींना दिलेल्या उत्तरासह -डॉ. बी.आर. आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी अनुवाद - प्रा. प्रकाश सिरसट, पान- ८,
४) Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches, Vol-I, Annihilation of Caste with a reply to Mahatma Gandhi by Dr. B.R.Ambedkar, special issue on the occasion of Diamond Jubilee (1936-2012) published by Higher Education Department, Govt. of Maharashtra, 14th April 2013, पान- ९
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, जातिव्यवस्थेचे निर्मूलन- महात्मा गांधींना दिलेल्या उत्तरासह -डॉ. बी.आर.आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी अनुवाद- प्रा. प्रकाश सिरसट, पान- ९,
६) वरील प्रमाणे, प्रा. अविनाश डोळस, सदस्य-सचिव, समिती, अनुवादाच्या निमित्ताने, पान-तीन, चार,
७) Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches, Vol-२०, डॉ. बी.आर. आंबेडकर यांची पत्रकारिता, १९२९ ते १९५६, पान, ४२१,
८) “जातीअंत आणि वर्गअंत : गंभीर आणि जटील प्रश्न. उत्तरेही तशीच!”-- शांताराम पंदेरे, *जातीअंत आणि वर्गअंत* यांचा समग्र समन्वय* कॉम्रेड आर. बी. मोरे यांच्या स्मृतीनिमीत्ताने प्रकाशित ग्रंथ, कॉ. सुबोध मोरे, संदीप सारंग, मुंबई,
९) विचारधन, मा.स.गोळवलकर, भारतीय विचार साधना, पुणे, द्वितीयावृत्ती, पुनर्मुद्रण : १९८७, पान-४४०-४४१,
१०) जातिव्यवस्थेचे निर्मूलन, डॉ.बी.आर. आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, डॉ.बा.आं. चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी अनुवाद- प्रा.प्रकाश सिरसट, प्रथम आवृत्ती, २०१५, special issue on the occasion of diamond Jubilee (1936- 2012), पान : ५५.
११) जातीअंत आणि वर्गअंत : गंभीर आणि जटील प्रश्न. उत्तरेही तशीच!”-- शांताराम पंदेरे, *जातीअंत आणि वर्गअंत* यांचा समग्र समन्वय* कॉम्रेड आर. बी. मोरे यांच्या स्मृतीनिमीत्ताने प्रकाशित ग्रंथ, कॉ. सुबोध मोरे, संदीप सारंग, मुंबई,
१२) वरील प्रमाणे,
१३) महाराष्ट्राचे महामंथन, लालजी पेंडसे, प्रकाशक- विश्वासराव, लोकवाङ्मयगृह, मुंबई, पान- ३९.
१४) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत राज –परिसंवाद-पुणे ता. २७-८-१९६२ ते २१-१०-१९६२, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे-४, पान- २२.
१५) २१ व्या शतकातील जातिनिर्मूलन : एक चिंतन, शांताराम पंदेरे, जातिअंत, संपादक- .डॉ. शैलजा बरूरे, योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई, प्रवर्तन पब्लिकेशन्स, लातूर, २०१४, पान- ८९,
१६) मराठा व दलित संबंध, शांताराम पंदेरे, मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा, संपादक : राम जगताप, सुशील धसकटे, प्रस्तावना : डॉ. सदानंद मोरे, राजहंस प्रकाशन, पुणे, पान- १२३,
१७) दलित साहित्य : आजचे क्रांतिविज्ञान, बाबुराव बागूल, बुध्दिस्ट पब्लिशिंग हाऊस, नागपूर, संपा.: मधुकर ताकसांडे, प्रथम आवृत्ती, १९८१, पान- १४,
१८) वरील प्रमाणे, पान- २०-२१,
..................................................................................................................................................................
लेखक शांताराम पंदेरे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
shantarampc2020@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment