प्रवासवर्णन हा एक शिळा होणारा साहित्यप्रकार आहे. जो कोणी आपले प्रवासातील अनुभव लिहितो, ते प्रकाशित होईपर्यंत राजकीय, आर्थिक असे काही संदर्भ जुने होण्याचा संभव असतो. त्यामुळे लेखकाला पाहिलेल्या ठिकाणांची कालातीत गुणसूत्रे घट्ट पकडावी लागतात. उदा., ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, स्वाभाविक, सांस्कृतिक इ. त्यामुळे लिखाण प्रकाशित झाल्यावर ते कालबाह्य ठरण्याचा धोका उणावतो.
प्रवासवर्णनपर लिहिताना लेखकाला स्वतःला फिरताना आलेला अनुभव सार्वत्रिकपणे वाचकांना अनुभवता येईल, अशा शब्दांत मांडावा लागतो. लेखकाने वाचकाला आपल्यासोबत तो देश, ती जागा, ती संस्कृती, तो इतिहास वा भूगोल यांची सफर घडवून आणावी लागते… वाचकाच्या डोळ्यासमोर एकेक प्रसंग, दृश्य उलगडत. हे सामर्थ्य मीना प्रभु यांच्या लेखनात आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
त्यांनी कित्येक देशांची सफर करून आपले अनुभव शब्दबद्ध करत वाचकांपर्यंत पोचवले आहेत. मराठीत उत्तम अभिरुचीचे प्रवासवर्णनपर साहित्य निर्माण करून त्यांनी ‘भटक्या’ वाचकांसाठी एक समृद्ध दालन उघडले आहे. काही वाचक आपल्या प्रवासात या पुस्तकांचा मानदर्शकासारखा उपयोग करतात, तर ज्यांना फिरणे शक्य नसते ते घरबसल्या जगातील वैविध्याचा ‘चित्रदर्शी’ अनुभव घेतात. आपण साधारणतः ‘भटकणे’ हा शब्द ‘विहरणे’ या अर्थाने जर वापरला तर मीना प्रभु या आपली ‘भटकी निष्ठा’ जपणाऱ्या लेखिका आहेत.
समर्थ रामदास स्वामींच्या ‘दासबोधा’त ‘पृथ्वीस्तवननिरूपण’ नावाचा समास आहे. त्यात ‘अवघी पृथ्वी फिरोन पाहे | ऐसा प्राणी कोण आहे |’, असा प्रश्न ते विचारतात. तसेच ‘नाना वल्ली नाना पिकें | देशोदेशी अनेकें | पाहों जातां सारिख्या सारिखें | येकहि नाहीं ||’, असेही वर्णन आहे. याचा अधिकात अधिक प्रत्यय ज्या लेखिकेने घेतला आणि स्वतःचे समृद्ध अनुभव आपल्यापर्यंत पोचवले आहेत, त्यापैकी एक म्हणजे मीना प्रभू. हे सगळे मराठीत घडून आले, हा मराठी वाचकांसाठी सुवर्णयोग.
त्यांनी आपल्या लेखनातून ‘मी अमुक तयारी केली, इथून तिथे गेले, हे ठिकाण पाहिले, त्याचे वेगवेगळे संदर्भ, याच्याशी बोलले, इथे राहिले, इथे जेवण केले, नंतर परत आले’ अशा अपरिहार्य घटितांवर नानारंगी अनुभवाचे आणि अभ्यासातून घडलेल्या व्यासंगाचे आल्हाददायक चांदणे पांघरले आहे. आपल्यासोबतच वाचकाला तो रोमांच अनुभवायला लावतात. त्यांच्याकडे प्रचंड अनुभववैविध्य, भाषाचैतन्य, विदग्ध साहित्याचा भक्कम गाभा, ललित साहित्याचा हळुवारपणा आणि इतिहास, भूगोल, भू-राजकीय, सांस्कृतिक जाण आहे. शिवाय माणसा-माणसांतील संबंधांना दृढ करणारी परिपक्वताही आहे. या कोंदणामुळे त्यांच्या प्रवासाचा अनुभवगर्भ अधिक झळझळीत होतो.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
‘खडक आणि पाणी’ या समीक्षेच्या पुस्तकात गंगाधर गाडगीळ म्हणतात- ‘झाडाची सावली जेवढ्या सहजतेने पडते, तेवढ्या सहजतेने लिहावे.’ फिरस्तू लेखक इतर लोक प्रवासात त्याचे सांगाती असतानादेखील जे बारकावे टिपू शकतो, ते सहसा त्याच्यासोबत असणाऱ्यांच्या ध्यानात आलेले नसतात. कित्येक वेळा परतल्यावर त्याचा लेख वाचून सोबती विचारतात ‘हे आमच्या कसे लक्षात नाही आले?’ खरे तर आपण श्वासोच्छवास जेवढ्या सहजतेने करतो, तेवढ्या सहजतेने लेखक असे बारकावे टिपत असतो. ही सहजता मीना प्रभु यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. त्यांनी एकलपणे जे प्रवास केले, त्यात तर त्यांचा स्वतःशी एक आत्मानुभूती देणारा संवाद होत राहिला असावा. तोच त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत राहिला आहे.
प्रवासात काही ठिकाणी लेखिकेला मनाजोगता वेळ मिळाला, काही ठिकाणी मिळाला नाही; तरी त्यांनी स्वतःचे अनुभव वाचकांपर्यंत पोचवताना अनेक संदर्भांचा पाठपुरावा करून, कित्येक लोकांशी चर्चा करून समाधान झाल्यावर सुटलेला एखादा दुवा शोधून खात्रीशीर माहिती पुरवली आहे. हे खूप कष्टाचे काम असते. एकेक संदर्भ तपासून पाहावा लागतो आणि ते कोणाला काय वाटेल, या भावनेतून होत नसते, तर स्वतःला एक लेखक म्हणून ‘आता माझ्याकडे माझे म्हणून वाचकांना सांगण्यासारखे काही उरले नाही’, ही संतृप्ती लाभावी म्हणून होत असते. तो त्याच्या अंतरीचा ध्यास असतो. त्यामागे कोणती बाहेरील ‘सहाय्यक शक्ती’ (ऑक्सिलरी फोर्स) असत नाही.
‘इजिप्तायन’ या पुस्तकात इस्रायल, जॉर्डन आणि इजिप्त या तीन देशांचा प्रवास लेखिकेने मांडला आहे. प्रवास सरळमार्गी होता, असे नव्हे. तो काही ठिकाणी सुखाचा आणि काही ठिकाणी साहसाचा झाला आहे, अगदी जिवावर उदार होऊन काही अनुभव घेतले आहेत. एका स्त्री-लेखिकेने एकटीने नित्य-संघर्षातून धुमसणाऱ्या या भूमीचा प्रवास केला आहे आणि तो अनुभव वाचकांपर्यंत ताकदीने पोचवला आहे.
लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे संपत्ती आणि मेधा एकत्र नांदत नाहीत, अशी साधारण समजूत; पण त्या एकत्र आल्या तर त्यांच्या शक्तीचा कसा सदुपयोग करता येऊ शकतो, हे मीना प्रभुंनी मराठी वाचकाला आपल्या साहित्य रचनांतून दाखवले आहे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
त्या जगभर फिरल्या असल्यामुळे काही साम्यस्थळे त्या वाचकाला सहज पुरवून जातात. त्या अर्थी ते केवळ पुस्तकात घेतलेल्या देशांच्या पलीकडे नेणारे वर्णन होते. उदा. ‘मृत समुद्र’ हा जॉर्डनच्या पश्चिम किनाऱ्यावरून इस्त्रायलपेक्षा अधिक आनंदस्पर्शी होतो, हे दोन्ही किनारे अनुभवल्यावाचून लिहिता येत नसते. तसेच, एखादा वैयक्तिक अनुभव आपल्या मातृभाषेत उलगडण्यासारखे सुख नसते; तिथे मग त्यांची मराठी साहित्याची, भारतीय संस्कृतीची, संगीताची जाण दृगोचर होते. आपल्या मातृभाषेशी आपली नाळ पक्की असली की, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी उत्तम मराठी बोलू-लिहू शकता, याचा परिपाठ ‘माझं लंडन’ लिहिणाऱ्या आणि तिथेच वास्तव्यास असणाऱ्या लेखिकेच्या भाषासौंदर्यातून व्यक्त होतो. त्याशिवाय का- धेनुवल्लभ, अटकर, रासवट, ओठंगून, दीपमाया, उसासत, बहुदेशिक, खांदून, खालाटीत, चर, अळंग, असे शब्द पुस्तकातून सहज ओसंडत राहतात.
“आपण मंडळी खरोखर सुदैवी आहोत. मराठी उच्चार सुस्पष्ट. जसं बोलतो तसं लिहितो. मूळाक्षरंही कंठव्य, मूर्धन्य, तालव्य, दंतव्य, ओष्ठ्य अशी तोंडाच्या रचनेप्रमाणे मागून पुढे क्रमवार बाहेर येणारी. स्वच्छ बारा स्वर. त्यांच्या संयोगानं आपण शास्त्रशुद्ध बोलू शकतो. प्रत्येक शब्द सुटा, चोख ऐकू येतो... मराठीत फार्सी, अरबी आणि उर्दू शब्दांची रेलचेल आहे. आपल्या रोजच्या वापरातले ‘दुकान’, ‘साबुन’, ‘हवा’, ‘पंखा’, ‘मस्करी’ असे पुष्कळ शब्द कानी येत होते. ‘अजनबी’, ‘मस्जिद’ मराठी नसले तरी असलेले. पण मजा वाटली ती ‘मंदील' या शब्दाची”, अशी पारिभाषिक शब्दांमध्ये आपलेपण शोधण्याची लेखिकेची जिज्ञासा भाषाप्रेमाशिवाय उगाच जागृत राहत नाही.
लेखिकेने दिलेल्या तपशिलांतून कित्येक अज्ञात कोपरे उजळून जातात. द लेसेप्स या फ्रेंच इंजिनीअरने ‘सुवेझ’चा कालवा बांधला हे माहीत असले तरी त्यानेच ‘पॅनामा’चादेखील कालवा बांधला. तसेच ‘कालवा खोदताना अटलांटिक आणि पॅसिफिक या दोन समुद्रांच्या उंचीत फरक आहे, हे भौगोलिक सत्य शोधून काढलं होतं.’ सुवेझच्या कालव्यातून एका बोटीमागे पन्नास हजार अमेरिकन डॉलर घेतले जात असत. त्यामुळे त्याचे १९५६ साली राष्ट्राध्यक्ष नासरनी राष्ट्रीयीकरण केले. लेखक नसलेल्या प्रवाशाला या गोष्टींची मातब्बरी असली किंवा नसली तरी ती इतरांपर्यंत पोचवण्याचा ध्यास आणि ऊर्जा असतेच असे नाही.
याच पुस्तकातून प्रसंगानुरूप इजिप्तच्या राजांचा, ‘फेरों’चा थोडा गुंतागुंतीचा इतिहास उलगडतो. “प्राचीन काळापासून इजिप्तचे अपर (पपायरस हे प्रतीक) आणि लोअर (लिलीचे फूल हे प्रतीक) असे भाग होते. ‘पेपर’ शब्द इथूनच आला. ‘इजिप्टॉलॉजी’ नावाचं नवं शास्त्र ‘रोझेटा स्टोन’मुळे जन्माला आलं,” इत्यादी शब्दांमागचा अर्थ उलगडतो. ‘तेल’ म्हणजे ‘टेकडी’ आणि ‘अव्हीव्ह’ म्हणजे ‘झरा’. ‘लैला’ म्हणजे ‘रात्र’. ‘बार्मिट्झवा’ म्हणजे ज्युइश मुंज. ‘उम् केस’ म्हणजे जकात. ‘पेट्रो’चा अर्थ दगड. ‘बदायुनी’ नव्हे ‘बेदूवेन’. ‘काहिरा’ म्हणजे ‘विजय’, तेच आजचं ‘कैरो’. ‘नाइल’ला अरबी भाषेत ‘नील’ म्हणतात. ‘शाली’चा अर्थ पॅलेस. उंटाला संस्कृतमध्ये ‘आकाशमुनी’ म्हणतात.
“नगीब महफूज अरबी भाषेचा एकमेव नोबेल विजेता. त्याची ‘कैरो ट्रिलजी’ ही प्रसिद्ध कादंबरी. उम् कुल्तुम ही इजिप्तची सर्वांत मोठी, लोकप्रिय गायिका… ती इजिप्तच्या गळ्यातला गांधार बनली. हसन फाथी, इजिप्तचा एक वास्तुशास्त्रज्ञ. ओएसिस म्हणजे इजिप्तची ‘ब्रेड बास्केट’.” तुतनकामेनची कबरमधून अगणित सोनं मिळालं आणि दिगंत कीर्तीही. ती शोधून काढण्यासाठी हॉवर्ड कार्टरने किती कष्ट घेतले, याचा पाठच त्यांनी वाचला आहे. त्यांच्या सफरनामामधून जगातील विविध आश्चर्यांची माहिती मिळते. झेराशच्या झुलत्या खांबांविषयी अधिक माहिती मिळवण्याची उत्सुकता जागृत होते. ‘द ग्रेट पिरॅमिड ऑफ खुफू’... सुमारे सेहेचाळीस शतकांपूर्वी बांधलेलं... सेहेचाळीस मजल्याइतकं उंच.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
लेखिकेला अधूनमधून काही आठवणी येतात. त्रिंबक नारायण अत्रे यांच्या ‘गावगाडा’ पुस्तकाचा उल्लेख होतो. पुलंची ‘अपूर्वाई’ आठवते. संवादाच्या निमित्तानं या पुस्तकात काही औपपत्तिक उतारे येतात, जसे ‘ब्रह्मं जानातीऽति ब्राह्मणः, ब्रह्म म्हणजे काय याची ज्याला थोडाफार कल्पना आहे तो ब्राह्मण’... “ब्रह्माची हीच कल्पना ज्युइश लोकांनी हिंदूंकडून हजारो वर्षांपूर्वी उचलली आहे, ते तुला माहीत आहे का? त्याच्यावरून त्यांचा ‘एब्राहम’ हा शब्द, नाव आलेलं आहे. तो ज्युइश धर्माचा आद्य संस्थापक. त्याच्यावरूनच आमचा ‘इब्राहिम’ हा शब्द आला आहे,” यासर म्हणाले. ‘संस्कृत’मध्ये ‘ब्रूहि’ म्हणजे ‘बोल’. ज्युइश लोकांची भाषा ‘हिब्रू’. या दोन शब्दांचा काही औपपत्तिक संबंध असेल का, असं माझ्या मनात येऊन गेलं."
एकूण प्रवासवर्णनं लिहिणाऱ्या लेखकांना त्यांच्या प्रवासात जाणता-अजाणता घडलेल्या संवादातील शक्तीस्थानं पकडता आली पाहिजेत. त्याचं मानक काय असावं, हे मीना प्रभुंचं कोणतंही पुस्तक वाचलं की, लक्षात येतं. ‘इजिप्तायन’ तर अनेक संदर्भांनी नटलेलं आहे. जगाच्या पाठीवर कितीएक देशात लोक किती अनिश्चिततेच्या सावटाखाली जगत आहेत, त्यांच्या मानानं आपण भारतीय किती नशिबवान आहोत, याची जाणीवही करून देते.
‘इजिप्तायन’ - मीना प्रभू
पुरंदरे प्रकाशन, पुणे
मूल्य - ४०० रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment