‘अनुनाद’ हे अरुण खोपकर यांचे पुस्तक नुकतेच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. खोपकर सिनेदिग्दर्शक आणि सिनेअध्यापक आहेत. चित्रपट-दिग्दर्शन व निर्मिती यासाठी त्यांना तीन राष्ट्रीय पारितोषिकांनी व काही आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका’ या त्यांच्या पुस्तकास १९८६ साली सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार, ‘चलत चित्रव्यूह’ या पुस्तकास २०१५ साली साहित्य अकादमी पुरस्कार आणि ‘चित्रव्यूह’ या पुस्तकास २०१४ साली महाराष्ट्र फाउंडेशनचा सर्वोत्कृष्ट अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.
खोपकरांनी चित्रकला, सिनेमा, संगीत, पुस्तके अशा विविध कलांचा मनसोक्त आस्वाद घेतला आहे. प्रस्तुत पुस्तकात कलाक्षेत्रातले अनुभव, भेटलेली माणसे, त्यांच्याबद्दल वाटणारा आदरभाव, या गोष्टी त्यांनी व्यक्त केल्या आहेत. ही व्यक्तिमत्त्वे नादिष्ट आहेत, आपल्या ध्येयाने झपाटलेली आहेत. म्हणून ती प्रेरणादायीही आहेत.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या पुस्तकातील लेख ‘शब्द’, ‘शब्दचित्रे’ आणि ‘अनुनाद’ अशा तीन भागांत विभागले आहेत. लेखकाचे शब्दावर मनापासून प्रेम आहे आणि त्याचमुळे पुस्तकाची सुरुवातच ‘शब्द’ या लेखाने होते. आपल्या या आवडीचे श्रेय ते इंग्रजी शब्दकोशाचे लेखक श्री सोहनी यांना देतात. त्यांचा सहवास खोपकरांना लहानपणापासून लाभला. ‘काय सांगायचे आहे’ यापेक्षा ‘काय सांगायची गरज नाही’ हे सोहनी सरांकडून शिकल्याचे आवर्जून सांगितले आहे. आपल्या म्हणण्याला दुजोरा देताना खोपकरांनी रसेल यांच्या लेखातील ‘ओकामचा वस्तारा’ या शब्दप्रयोगाचा संदर्भ दिला आहे. त्याचा अर्थ आहे- ‘जर एका गोष्टीचे वर्णन दोन प्रकारे करता येत असेल तर त्यात कमी शब्द, सुटसुटीत स्पष्टीकरणे असतील तोच प्रकार वापरावा.’ शिक्षण हे आनंदासाठी असते, कुणावरही इम्प्रेशन मारण्यासाठी नसते. कोणतीही भाषा, मग ती मातृभाषा का असेना, ती आपली करण्याकरता खतपाणी घालावे लागते. जागतिक पातळीवरील विविध भाषा खोपकरांनी भविष्यात आत्मसात केल्या. त्याचे श्रेय सोहनी यांच्याकडून मिळालेल्या संस्कारात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या पुस्तकातील दुसरा लेख आहे- ‘वितळणाऱ्या बर्फावर तरंगणाऱ्या पुस्तकाची कहाणी’. शब्दावर जसे लेखकाचे प्रेम आहे, तसेच पुस्तकांवरही. पुस्तकप्रेम, रशियाबद्दल वाटणारे आकर्षण आणि तेथील त्यांचा मित्रपरिवार याबाबतचा आढावा या लेखात घेतला आहे. लहानपणासून गुळगुळीत पाने, सुंदर चित्रे आणि उत्तम कथा असणारी रशियन पुस्तके त्या देशातील संस्कृतीचा परिचय खोपकरांना करून द्यायची. तेथील लहान मुलांवर चांगले संस्कार ही पुस्तके करतात, याचा त्यांना हेवा वाटायचा. पण आपल्या महाराष्ट्रात आचार्य अत्रे, साने गुरुजी आणि विंदा करंदीकर असे अपवाद वगळता फारसे कुणी नाही, याची खंतही त्यांना वाटते. पुढे खोपकरांना रशियाला जायची संधी मिळते. तिथे गेल्यावर नौमान नावाचा मित्र त्यांना भेटतो. त्याच्याकरवी अनेक पुस्तके मिळवण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आणि खोपकरांचे पुस्तकप्रेम, त्यांना आलेले अनुभव याचे सविस्तर वर्णन या लेखात आलेले आहे. रशियात गेल्यावर कुलेशोफ या लेखकाच्या पुस्तकांचा खोपकर शोध घेत होते. पण ही दुर्मीळ पुस्तके जेव्हा त्यांना मिळत नव्हती, तेव्हा कुलेशोफची नात त्यांची पुस्तके घेऊन खोपकरांना भेटायला आली होती. पुढे नौमानने लेखकाच्या आवडीची पुस्तके मिळवून ती खोपकरांना सुखरूप मिळावीत म्हणून पोस्टाने न पाठवता अभिनेत्री दीप्ती नवलमार्फत कशी पाठवली, या घटना रंजक पद्धतीने सांगितल्या आहेत.
वास्तवात जशी पुस्तकांची जगे असतात, तशीच कल्पिलेल्या पुस्तकांचीही असतात. शब्दावर, पुस्तकावर खोपकरांचे प्रेम आहे, कदाचित म्हणूनच त्यांचे शब्दकोशांवरसुद्धा तितकेच प्रेम आहे. ‘शब्दकोशातील फुलपाखरे’ या लेखातून ते व्यक्त होते. त्यांच्या इच्छित ग्रंथसंग्रहालयात अनेक शब्दकोश आहेत. त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख डूडेन प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘दास बाईल्डवर्थबंच’ या शब्दकोशाने दिले. या कोशाची रचना कल्पकरित्या केली आहे. विमानास समानार्थी असा शब्द या कोशात पाहिला तर त्यात केवळ विमानाचे चित्रच नाही, तर त्याच्या विविध भागांना बाणाने विद्ध केलेले असते. प्रत्येक भागाच्या टोकाला त्या भागाकरता वापरण्याचा योग्य शब्द दिलेला असतो. ‘दास बाईल्डवर्थबंच’ या शब्दकोशाप्रमाणेच मराठीतही शब्दकोश असावा असे खोपकरांचे स्वप्न आहे. हा शब्दकोश भाषेच्या संपन्न भूतकाळात डोकावेल, तसेच त्यात चित्रकोश आणि ध्वनिकोशसुद्धा असतील. हत्तीची सोंड दाबल्यावर हत्तीचा आवाज किंवा विमानाच्या चित्रावर अलगद टप्पल मारली की, तो सुरू होतानाचा आवाज...
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
भाषेवरचे प्रेम व्यक्त करताना खोपकर केवळ स्वप्नातच रमत नाहीत, तर वास्तवाशीसुद्धा तितकेच समरस होतात. बांगला देशात गेलेले असताना त्यांनी बंगाली भाषेवरील तिथल्या लोकांच्या प्रेमाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. भाषेकरता जशी प्राण घेणारी माणसे असतात, तशी प्राण देणारीसुद्धा असतात.
‘रूप पाहता लोचनी’ या लेखात पुस्तकाचे बाह्यरूप कसे असावे, हे खोपकरांनी सांगितले आहे. वेगवेगळ्या प्रसंगाचे वेगवेगळे वेश असतात. पुस्तकांचे डिझाईनसुद्धा तसेच वेगवेगळे असावे, असे त्यांना वाटते. हातात सोबत घेऊन जायचे पुस्तक, खुण करून पुन्हा पुन्हा वाचायचे पुस्तक, रहस्यकथा या सगळ्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनची पुस्तके असावीत. कागद हा पुस्तकाचे हृदय आहे. शरीरसौंदर्यात बांध्याला जे महत्त्व आहे, तेच पुस्तकाच्या बांधणीला आहे. आणि म्हणून पुस्तकाचे रूप आकर्षक असायला पाहिजे.
‘आपले आणि परके’ या लेखाची सुरुवात विश्वनाथपंत राजवाडे यांच्या ‘मराठी भाषा मुमुर्षु आहे काय?’ या प्रसिद्ध भाषणाने केली आहे. स्वातंत्र्य- प्राप्तीनंतरच्या काळात ग्रंथनिर्मितीला आणि भारतीय भाषात परस्परसंवाद सुरू व्हावा, याकरता विविध भाषांचे इतिहास, वाड्मयकोश या योजना कशा धडाडीने सुरू झाल्या, हे विदित करत असतानाच नंतरच्या काळात मराठी भाषेचा झालेला ऱ्हास, भाषिक दंगली याबाबत खोपकर काळजी व्यक्त करतात. आपल्या प्राचीन मराठी भाषेचा प्रसार डिजिटल युगात अधिक वेगाने व्हायला पाहिजे आणि आपली भाषा समृद्ध व्हायला पाहिजे, ही त्यांची तळमळ आहे.
‘शब्दचित्रे’ हा या पुस्तकातील दुसरा भाग आहे. या भागातील सर्वच लेख वाचनीय आहेत. हे लेख वाचत असताना विस्मृतीत गेलेल्या, पण जागात्तिक दर्जाच्या काही कलाकारांचे अंतरंग आपल्याला कळतात.
‘पर्शियन मिनीएचर’ या लेखात इराण संस्कृती, तेथील फारसी भाषा, आणि मराठी भाषा याचा प्रामुख्याने आढावा आहे. देशाच्या जशा सीमा असतात, तशा संस्कृतीच्या नसतात. इराण या देशाला प्राचीन संस्कृती आहे. पर्शियन संस्कृतीत उपयुक्तता आणि सौंदर्य नेहमी हातात हात घालून जातात. ही दृष्टी भारतीय संस्कृतीत होती, पण ती आपण विसरून गेलो, याची खंत व्यक्त केली आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
‘बी फोर डब्लू, बी फॉर बर्वे’ या लेखात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार प्रभाकर बर्वे यांचे व्यक्तिचित्रण आणि त्यांच्या चित्रांचा आढावा घेतला आहे. तत्कालीन मूर्तीकार श्री करमरकर हे श्री बर्वे यांचे चुलत आजोबा. त्यांच्यामुळे कलेला उत्तेजन देणाऱ्या वातावरणात त्यांची वाढ झाली. बर्वे यांची दुसरी प्रेरणा म्हणजे जे. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होणारी जे. कृष्णमूर्ती यांची होणारी व्याख्याने. भूतकाळाच्या ओझ्यातून बाहेर पडण्याच्या आणि प्रत्येक क्षण नव्याने जगण्याच्या विचाराचा श्री बर्वे यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या कामाचे सिंहावलोकन करताना त्यांच्या प्रतिमांतील शांतता, मितभाष्य आणि प्रत्येक तपशिलामागचा शोध यातून जी स्तब्धता अनुभवास येते, त्याचा परामर्श घेतला आहे.
‘अॅनिमेटर’ या लेखातून विसाव्या शतकातले भारतातले प्रतिभावंत अॅनिमेटर राममोहन यांच्या कलेचे अंतरंग कळतात. विसाव्या शतकाच्या शेवटच्या तीन दशकांत ज्या ज्या चित्रपटांत अॅनिमेशनचा कल्पक वापर केला जातो, त्याचे श्रेय बहुतांशी राममोहनचे. आज भारतात हजारो अॅनिमेटर्स आहेत. त्यातले बरेचसे राममोहन यांचे विद्यार्थी आहेत.
‘साधू साधू’ या लेखात मराठीतील साहित्यिक आणि इंग्रजीतील पत्रकार अरुण साधू यांचे व्यक्तिचित्रण आहे. ज्या काळात ‘शब्द’ हा पत्रकारितेचा सर्वांत भक्कम अधिकार होता, त्या काळी साधूंनी आपली कीर्ती कमावली. कारण त्यांचे शब्द जगलेल्या व अभ्यासलेल्या तत्त्वांचा पाया असे. ज्या वातावरणात आपण सध्या जगत आहोत, त्यात अरुण साधूंसारख्या लेखकाची गरज होती, असे खोपकरांना प्रकर्षाने जाणवते.
‘मृणाल सेन’ या लेखात त्यांच्याशी असलेले संबध, त्यांच्या सहवासात असणारी स्निग्धता, त्यांचे चित्रपट यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. मृणाल सेन जरी खोपकरांशी बरोबरीच्या नात्याने बोलत, तरीसुद्धा त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव असल्याचे दिसून येते.
‘तीव्र मध्यम’ या लेखात फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना कुमार गंधर्व यांच्याशी पार्श्वगायनाच्या निमित्ताने आलेल्या संपर्काबद्दल लिहिले आहे. कुमार गंधर्व मोठे गायक असतानाही किती विनम्र होते आणि त्यांनी आपल्याला कसे सांभाळून घेतले, याचा खोपकरांनी विनम्र उल्लेख केला आहे. तसेच अभ्यास म्हणून त्यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांत स्मिता पाटीलने काम कसे केले आणि त्याच निमित्ताने स्मिता पाटीलची शाम बेनेगल व केतन मेहता यांच्याशी मैत्री होऊन ती अभिनेत्री कशी झाली, याचा उल्लेख लेखकाने केला आहे.
‘सिनेमा मजनू’ हा लेख ‘नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडिया’चे माजी संचालक पी.के. नायर यांच्यावर आहे. नायरसाहेब जरी संचालक असले तरी खोपकरांच्या दृष्टीने ते सिनेमजनू होते. क्युरेटर ते संचालक असा त्यांचा प्रवास, संस्थेच्या जडणघडणीत असणारे त्यांचे योगदान, सिनेमाविषयी असणारे त्यांचे वेड, वेगवेगळे चित्रपट विद्यार्थ्याना दाखवून, त्यावर चर्चा करून त्यांच्या जाणीवा समृद्ध करण्याचे कार्य नायरसाहेबांनी केले. त्यांच्या जीवनावर ‘सेल्युराईड man’ हा सव्वादोन तासांचा माहितीपट आहे.
‘अनुनाद’ हा पुस्तकातील शेवटचा भाग. त्यातला ‘ध्वनीमहात्म्य’ हा लेख दीर्घ स्वरूपाचा आहे. ध्वनीची सुरुवात कुठून झाली, चार्ली चाप्लीन, हिचकॉक, ऋत्विक घटक, सत्यजित राय या दिग्दर्शकांनी चित्रपटांत ध्वनीचा वापर कसा करून घेतला, संगणक आल्यावर नवीन ध्वनियुग कसे सुरू झाले, याची सखोल माहिती या लेखात वाचावयास मिळते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘दूरचे प्रतिध्वनी’ या लेखात कलेचा आस्वाद घेण्यासाठीच्या चार प्रमुख सूत्रांचा परामर्श घेतला आहे. पहिले सूत्र उच्च कलानंद - हा शारीरिक, भावनिक आणि त्याचबरोबर बौद्धिक अनुभव आहे. दुसरे सूत्र कलानुभवाचे साहित्य, संगीत, चित्रकला असे विभाजन किंवा विभागीकरण करता येत नाही. प्रत्येक कला इतर कलांशी निगडीत असते. तिसरे सूत्र म्हणजे कोणतीही श्रेष्ठ कला ही संस्कृतीची मक्तेदारी असू शकत नाही. आणि चौथे सूत्र म्हणजे कलातिहासाचा अभ्यास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नसतो, तो वर्तमानाचा भूतकाळाशी संवाद असतो.
हे पुस्तक वाचताना खोपकरांचा कलाक्षेत्राविषयीचा व्यासंग आपल्या लक्षात येतो. आणि त्यांच्या कलासक्त जीवनाचा आवाका आपल्याला चकित करतो. चौफेर वाचनामुळे त्यांचे लेखन सखोल झाले आहे. पण तरीही त्यांची भाषा कुठेही क्लिष्ट नाही, हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हे पुस्तक साहित्यप्रेमी, भाषाप्रेमी यांना जितके उपयुक्त आहे, तितकेच प्रेरणादायी सिनेमाप्रेमी व सिनेअभ्यासकांना आहे.
‘अनुनाद’ - अरुण खोपकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
मूल्य – ५०० रुपये.
..................................................................................................................................................................
सतीश कुलकर्णी
satishkulkarni2807@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment