वसंत गुर्जरांच्या कवितेचं भविष्य काय, याची चिंता तुम्ही-आम्ही केली पाहिजे!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
अलका धुपकर
  • वसंत दत्रात्रेय गुर्जर, त्यांच्या ‘गांधी मला भेटला’ या पोस्टर कवितेचं आणि ‘कोलाहल’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Thu , 21 October 2021
  • ग्रंथनामाग्रंथनामा वाचणारा लिहितो वसंत दत्तात्रेय गुर्जर Vasant Dattatreya Gurjar कोलाहल Kolahal अशोक शहाणे Ashok Shahane गांधी मला भेटला Gandhi Mala Bhetla

नुकताच वसंत दत्रात्रेय गुर्जर यांचा ‘कोलाहल’ हा नवा कवितासंग्रह ‘तुला प्रकाशन’ने प्रकाशित केला आहे. त्यासाठी चंद्रकान्त पाटील यांचे आभार. ज्या कवीच्या कवितेला सर्वोच्च न्यायालय अश्लीलतेच्या (खोट्या) आरोपांतून मोकळीक करू देत नाही, त्या कवीचा कवितासंग्रह प्रकाशित करण्याचं धाडस त्यांनी दाखवलंय. “वसंत गुर्जर हे साठोत्तरी पिढीतील एक महत्त्वाचे अग्रेसर (avant-garde) कवी आहेत. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘गोदी’ १९६७मध्ये, दुसरा संग्रह ‘अरण्य’ १९७२मध्ये आणि तिसरा ‘समुद्र’ १९७९मध्ये निघाला होता. त्यानंतर ४१ वर्षे झाली तरी त्यांचा एकही संग्रह आला नाही. इतक्या आघाडीच्या कवीचा सुमारे ४१ वर्षे संग्रह निघू नये आणि त्याविषयी कुणाला साधी खंतही वाटू नये, हे आपल्या साहित्यिक संस्कृतीच्या हलकेपणाचंच लक्षण आहे”, असं चंद्रकान्त पाटील ‘प्रकाशकाची दोन पानं’मध्ये लिहितात. सर्वार्थाने आत्मपरीक्षण करायला लावणारी सुरुवातीची ही दोन पानं गुर्जरांच्या ११६ कवितांचं वजन तोलून धरतात.

अशोक शहाणे यांच्या प्रास प्रकाशनाने काढलेली ‘गांधी मला भेटला’ ही पोस्टर कविता ज्येष्ठ आणि प्रसिद्ध पत्रकार सुनील तांबे यांच्यामुळे २००६मध्ये ‘बेळगाव तरुण भारत’च्या मुंबई कार्यालयात मला पहायला-वाचायला मिळाली होती. त्यानंतर थेट २०१५ साली सर्वोच्च न्यायालयाने या कवीला अश्लीलतेच्या आरोपांसाठी खटल्याला सामोरं जायचे आदेश दिले, तेव्हा कवीला भेटायची इच्छा झाली. कमलेश देवरूखकर या मित्राने केलेल्या मदतीमुळे गुर्जरांच्या घरी गेले. गिरगावातल्या साध्या घरात एवढा मोठा कवीमाणूस खरंच जमिनीवर पाय ठेवून कसा जगतो, ते पाहिलं. ‘गांधीजींच्या विचारांची नासाडी आपण समाज म्हणून कशी करतोय, हे मी त्या कवितेत मांडलं. मी माफी मागणार नाही’, असं गुर्जरांनी मला सांगितलं. मी घेतलेली त्यांची मुलाखत ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून आली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गुर्जर ठणकावून बोलत नाहीत, हे त्यांना ओळखणाऱ्यांना सर्वांना माहीत आहे. त्यांच्या कवितेत जो मिश्किलपणा आहे, तो त्यांच्या चेहऱ्यावरही असतो. त्यांच्याजवळ मोठेपणाचा कसलाच भपकारा नाही. त्या मुलाखतीत ते दृढनिश्चयाने बोलले. गंमत अशी की, त्यांच्या ज्या कवितेवरून त्यांना उजव्या विचारसरणीच्या संघटनेने तेव्हा टार्गेट केलं, ती पोस्टर कवितादेखील त्यांच्याकडे नव्हती. बरोबर आहे, कवीने कविता लिहिली आणि जणू तो रीता झाला. त्यांचं त्या पोस्टर कवितेच्या छायाचित्रासोबत मी छायाचित्र काढलं. त्यांची मुलाखत आम्हाला छापता आली, हा आमच्या वृत्तपत्राचा सन्मानच होता.

साहित्य संमेलनं आणि पुरस्कारांच्या सोहळ्यात रंगलेल्या भारतीय साहित्य विश्वानेही सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची अचूक दखल घेतली नाही. गुर्जरांच्या मुलाखती कुठल्याही टीव्ही न्यूज चॅनेल्सवर दिसल्या नाहीत की, त्यांना साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित करण्यात आलं नाही. ते परदेशात स्थायिक असते, उत्तम इंग्रजी बोलणारे असते, तर सगळीकडे झळकले असते. त्यांच्या घराबाहेर मुलाखतीसाठी रांगा लागल्या असत्या..

या सगळ्याची मला खंत वाटते, कारण तामिळ लेखक पेरूमल मुरगन यांच्या ‘मधोरूबगन’ कादंबरीवरून जो वादंग उसळला होता, त्यानंतर ‘पेरूमल मुरगनचा मृत्यू झालाय’, असं त्यांनी स्वत:चं जाहीर केलं होतं, ते याच वर्षाच्या सुरुवातीला २०१५ला. कॉम्रेड गोंविद पानसरे यांच्या विचारांना विरोध म्हणून त्यांची हत्याही याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाली होती.

मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयात जे घडलं, ते मराठी वृत्तपत्रांना आणि चॅनेल्सना नीटसं कळलं नाही. (गुगलवर उपलब्ध असलेल्या बातम्या) त्यांच्या बातमीचे मथळे होते- ‘गांधी मला भेटला’ कविता वादातून मुक्त. भालचंद्र नेमाडे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, तुषार गांधी आणि इतर अनेकांनी गुर्जरांच्या कवितेला उचलून धरलं, हेही नमूद केलं पाहिजे.

देवीदास तुळजापूरकर यांनी या कवितेचं पुन:प्रकाशन केलं, तेव्हा या कवितेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. प्रकाशकांनी १९८४मध्ये मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरली गेली, हे सर्वांनी लिहिलं, पण तुळजापूरकर गुर्जरांच्या कवितेला मोकळं करण्यासाठी धडपड करत आहेत, लातूरमध्ये हा खटला २०१५पासून आजपर्यंत सहा वर्षांत सुरू झाला नाही, याकडे ते सतत लक्ष वेधतात. कवीच्या - देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा हा लढा आहे, पण ती केस अधांतरी आहे. 

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

तुळजापूरकर म्हणतात, “ही कविता हे एक राजकीय प्रहसन आहे. महात्मा गांधी व्यक्ती आणि विचार या दोहोंचा भारतीय राजकारणात तसेच समाजकल्याणात कसा सोयीस्कर वापर करून घेतला जातो, यावर कवीने खूप उत्कृष्ट प्रकाश टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकाशकांच्या बाजूनं ख्यातनाम वकील गोपाळ सुब्रमण्यम यांनी बाजू मांडली. दहा तासांपेक्षा अधिक काळ तोंडी युक्तिवाद मांडताना त्यांनी भारतीय राज्यघटनेतील अभिव्यक्ती-स्वातंत्र्य या प्रश्नावर काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत एक मोठी चर्चा घडवून आणली. पण सर्वोच्च न्यायालयाने गाभ्याला हात न घालता मूळ मुद्द्याला बगल दिली, त्यामुळेच ही कविता अजूनही अंधारात अडकली आहे.

वस्तुत: हा प्रश्न केवळ त्या कवीचा, त्या कवितेचा नाही, तर साहित्या जगताचा आहे आणि म्हणून तो मोठ्या परिदृश्यावर हाताळला जायला हवा. पण आज साहित्य जगतात ही जाणीवच बोथट झाली आहे. तो अधिकार असलेले साहित्यिकही खूप दुर्मीळ आहेत. मराठी साहित्य आणि साहित्यिकांचा खुजेपणाच यामुळे अधोरेखित होतो.”

गुर्जर म्हणतात, ‘मला बोलावणं आलं न्यायालयाचं तर जाईन, पण मी कविता मागे घेणार नाही आणि माफीही मागणार नाही.’ फली नरिमन हे या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ‘अॅमिक्यूस क्यूरी’ होते. पण अभिव्यक्ती-स्वातंत्र्याला तेही न्याय देऊ शकले नाहीत. अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची गळचेपी ही काही फक्त तोडफोड करून, हिंसक पद्धतीनेच होत असते असं नाही. ‘कोल्ड ब्लडेड’ पद्धतीनं अभिव्यक्तीची कशी गळचेपी केली जाऊ शकते, त्याचं उदाहरण म्हणजे हा संपूर्ण खटला आहे. पोलिसांनी ८०च्या दशकात असल्या तक्रारीची तातडीनं दखल घेऊन केसं करणं, सर्वोच्च न्यायालयानं कवीला ट्रायलला सामोरं जायला सांगणं, हे दुसरं काय आहे?

‘माणसांशी बोलता बोलता

मी भिंतीशी बोलू लागलो

प्रत्येकजण ओकाबोका ओक्साबोक्शी

एकमेकांना गाठून

रिता झाला यात्रेसाठी

माणसं पसार होत गेली

आरशातून खिडकीतून दरवाजातून

पुढून न पाठून

आरसे खिडक्या दारं

भिंती

माणसांशी बोलता बोलता

मी भिंतींशी बोलू लागलो

‘माणसांशी बोलता बोलता’ ही कविता वसंत गुर्जर यांनी १९८२ साली म्हणजे खरं तर ‘गांधी मला भेटला’ प्रकाशित व्हायच्या आधी लिहिली आहे. पण आता नव्यानं वाचताना ती समकालीनच वाटते. त्यांच्या कवितेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर तर त्यातला गडदपणा उठून येतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गुर्जर चिमटे काढत नाहीत, कोपरखळ्याही मारत नाहीत. ते तुम्हाला चिमटीत पकडतात. फडफडवतात, मिश्किल हसतात आणि अलगद सोडून देतात, फेकून नाही देत. त्यामुळे तुम्ही अवाक होता. त्या फडफडवण्यात जी काही जादू हा कवी करतो, त्याने तुम्ही अंतर्बाह्य हलता - डुचमळता. गुर्जर हादरेही देतात. मग गिअर बदलतात आणि पुढे नेतात.

त्यांच्या कविता कोरड्या नाहीत आणि भळभळत्याही नाहीत. त्यांच्या कवितेत प्रेम, रोमान्स, राजकारण, सामान्य स्त्री-पुरुषांची अगतिकता, राजकारण्यांची स्वार्थी वृत्ती येते. माणूस एक प्राणी म्हणूनच चितारतात ते. गाढव, डुकर, घोडे सारखं माणूस... इतकं अध:पतन झालंय या मनुष्यप्राण्याचं, असं पण वाटून जातं. १९९५च्या ‘सार्वभौम’ कवितेच्या शेवटी ते म्हणतात -

मी एक मुंगी

तू एक उंदीर

 

मी हा माणूस

प्राणिमात्रांच्यात वावरणारा

सार्वभौम पसाऱ्यात लाथा

स्वत:वर झाडणारा…

दररोजच्या वाचण्यात - ऐकण्यात जे शब्द ऐकून वापरून आपण शब्द बधीर झालोय, त्याला एकाखाली एक रचून वेगळाच प्रभाव गुर्जर त्यांच्या कवितेतून साधतात. १९९६ सालची ‘चौखूर’ ही कविता यासाठी जरूर वाचा. पेपरात छापून आलेल्या शब्दांची नजाकत अशी साधतात ते की, गुळगुळीत वाटणारे शब्द पुनर्जन्म घेतात. गुर्जरांच्या कवितेतून बॉलिवुड झिरपत राहतं पार्श्वसंगीतासारखं.

अजून एक, देशाला स्वातंत्र्य मिळायच्या तीन वर्षं आधी ते जन्मले. त्यामुळे गुर्जरांच्या कविता आणि स्वतंत्र भारताचा प्रवास हा समांतर आहे, असा भास होतो. जणू काही रेल्वे धावत आहे आणि गतकाळातील चलत्चित्र आपण बघतोय, असं वाटतं. कितीतरी बदल त्यांनी बारकाईनं टिपले आहेत. अरे, हो की, हे असं होतं आणि आता किती बदललंय, आपल्याला माहीत आहे पण जाणवलंच नाही, असं वाटून जातं वाचताना. ‘पर्यवसन’ ही त्यांची कविता त्यासाठी जरूर वाचा.

‘संत सखू’ ही त्यांची कविता ‘आहे रे - नाही रे’ वर्गातली विषमता मांडते. त्यांच्या कविता जळजळीत असल्या तरी आक्रमक किंवा विद्रोही नाहीत आणि बोथटही नाहीत. बलवीर पाशा ते खोमेनी व्हाया वन ट्री हिल सगळीकडे हाताला धरून फिरवतात ते आजोबांसारखे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

‘लगोरी’ ही २०१७ची कविता वाचायला हवी, कारण त्यात त्यांची तिरकस वृत्ती दिसते, पण तुसडेपणा कुठेच नाही. देश चालवणाऱ्यांनी खेळ मांडलाय, असं ते त्यांच्या स्टाईलमध्ये सुनावतात.

शहाबानो

भंवरीदेवी

बाबरी

लाल किल्ला

संसद

गोध्रा

स्वामीनारायण

एकावर

एक

ठेवून

खेळ लगोरी

१९८२ची अजून एक ‘बातमी’ नावाची कविता वाचून वाटतं की, ही आजची कविता की काय!

बातमी

कानावर

आली

खातरजमा

करून

घेऊ

 

देश संकटात आहे

 

देश संकटात आहे

आणि कवि कविता लिहितायत

वटहूकूम

देशभरच्या कवींना गिरफ्तार

एका रात्रीत

 

बातमी

सेन्सॉर.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गुर्जरांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता ही खरं तर महाविद्यालयांमध्ये शिकवली पाहिजे. पण प्रश्न असा आहे की, जर कायद्याच्या कचाट्यातून सुटलीच नाही तर? कुसुमाग्रजांच्या ‘शहरातील पाच पुतळे’ कवितेत गहिवरलेले गांधी म्हणतात...

माझ्या पाठीशी मात्र

फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती

गुर्जरांना भेटलेले गांधी त्या भिंतीच्या बाहेरचे आहेत. त्यांना पुन्हा सरकारी कचेऱ्यांत अडकवायचं नसेल, तर आपण काहीतरी केलं पाहिजे!

‘कोलाहल’ – वसंत दत्तात्रेय गुर्जर,

तुला प्रकाशन, औरंगाबाद,

पाने – १८४ (मोठा आकार),

मूल्य – ३०० रुपये.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

इतक्या आघाडीच्या कवीचा सुमारे ४१ वर्षे संग्रह निघू नये आणि त्याविषयी कुणाला साधी खंतही वाटू नये, हे आपल्या साहित्यिक-संस्कृतीच्या हलकेपणाचंच लक्षण आहे

..................................................................................................................................................................

लेखिका अलका धुपकर ‘टाईम्स इंटरनेट मीडिया’च्या सहायक संपादक आहेत.

alaka.dhupkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......