अजूनकाही
जागतिक क्रमवारीत ब्राझीलनंतर ऊस उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्याशिवाय युरोप, चीन, थायलंड, रशिया, अमेरिका, मेक्सिको या ठिकाणीही उस उत्पादन घेतले जाते. काही ठिकाणी ऊसतोड यंत्राद्वारे (हार्वेस्टर) केली जाते. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी यंत्राद्वारे ऊसतोडणी केली जाते, परंतु जास्त ऊसतोड कामगारांद्वारेच होते. काम किंवा व्यवसायाच्या (एर्गोनॉमिक) दृष्टीकोनातून पाहिले, तर ऊसतोडीचे काम सर्व ठिकाणी सारखेच मानले जाऊ शकते. जसे की, कोयत्याने ऊस तोडणे, त्याच्या मोळ्या बांधणे, त्या उचलून आणि वाहून मोठ्या वाहनात भरणे आणि वाहतूक करणे इत्यादी. या कामांत देशागणिक थोडाबहुत फरक मान्य केला तरी ऊस तोडण्यापासून ते वाहनामध्ये भरण्यापर्यंत कामगारच मुख्य भूमिका बजावतात.
भारतातच ऊसतोड कामगारांच्या समस्या आहेत आणि इतर देशांमध्ये नाहीत असे नाही. परंतु बाहेरील देशांत काही सकारात्मक आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांचे अनुकरण करणे भारतातातील, विशेषत: महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचे काही प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
बाहेरच्या देशांमध्ये ऊसतोडणीसारखे धोकादायक काम कोण करत असेल, असे आपणास वाटू शकते. महाराष्ट्रात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. ते अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असतात आणि गरीब असतात. महिलांचा जवळजवळ पुरुषांच्या बरोबरीने सहभाग असतो. परंतु बाहेरील देशांमध्ये ऊसतोडणीच्या कामात महिलांचे प्रमाण अगदी तुरळक आहे. काही ठिकाणी तर अजिबातच नाही. विशेषतः गरोदर किंवा नुकत्याच प्रसुत झालेल्या मातांचा सहभाग असण्याचा संदर्भ कोणत्याच संशोधनात आढळत नाही.
महाराष्ट्रामधील आणि इतर देशांमधील उपलब्ध संशोधनांचा आढावा घेतला तरी खूप महत्त्वाचा फरक दिसून येतो. तो म्हणजे या कामगारांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा संशोधकीय दृष्टीकोन आणि त्यात असणारा बदल. आपण कितीतरी वर्षांपासून ऊसतोड कामगारांची गरिबी, सामाजिक पार्श्वभूमी, कामगार हक्क, वेतन, त्यांच्या राहण्याच्या गैरसोयी, याबद्दलच आपली समज वाढवत आहोत. महाराष्ट्रामधील या अभ्यासाचे मुद्दे तर कामगारांचे आर्थिक-सामाजिक प्रश्न आणि त्यांची उपजीविका इथपर्यंतच सीमित आहेत. अर्थाच याला काही महत्त्व नाही, असे इथे अधोरेखित करण्याचा मुळीच उद्देश नाही. या दृष्टीकोनातून अभ्यास करणेही महत्त्वाचे आहेच, कारण अजूनही ते प्रश्न तितकेच ज्वलंत आहेत. मात्र आपण ऊसतोडणीचे काम धोकादायक मानत असू, तर ते कामगारांबाबत कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकते, हेही बघणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
ब्राझील, कोस्टा रिका, साल्वाडोर इत्यादी देशांनी ऊसतोड कामगारांबद्दल खोलात जाऊन विचार केला आहे, असे दिसते. त्यामध्ये मुख्यत्वेकरून, कामगारांसाठी संरक्षणात्मक हातमोजे, उष्माघात किंवा उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी उपायोजना, कामगारांची पोषण स्थिती जपण्यासाठी प्रथिने आणि ऊर्जेचा पुरवठा, ऊसतोडणीआधी आणि नंतरची कामगारांची जीवन गुणवत्ता, किडनीवर होणारे परिणाम, कामगारांसाठी पाणी, विश्रांती, ऊर्जादायी पेये आणि पोषण उपाययोजना इत्यादी गोष्टींचा प्राधान्याने विचार केला जातो.
ब्राझीलमधल्या ऊसतोड कामगारांच्या काम आणि स्वास्थ्याबाबत केल्या गेलेल्या वेगवेगळ्या संशोधनांमधून बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडतो. तिथं ऊसतोड कामगार ऊसतोडणीच्याच परिसरामध्ये राहतात. त्यांना दररोज कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची सोय उपलब्ध करून दिलेली असते. प्रत्येक कामगाराला वाहनामधूनच कामाच्या ठिकाणी पोहोचवले जाते. शेतात आठ तासाच्या कामानंतर परत वाहनानेच घरी पोहोचवले जाते. कामगारांना फ्रीज, शुद्ध पाणी, अल्पोपहार, मीठ आणि इलेक्ट्रोलाईट असणारी ऊर्जादायी पेये पुरवली जातात. ऊसतोडणीच्या जड कामामुळे कामगारांच्या शरीरामधून पाणी कमी होऊ नये, हा त्यामागे उद्देश असतो. ऊसतोड कामगारांकडे ग्लोव्हज, सुरक्षा चष्मा, गुडघ्यापर्यंत लेदरचे बूट इत्यादी संरक्षणात्मक उपकरणे वापरतात. तिथंही ऊसतोडणीच्या कामामुळे कामगारांमध्ये अनेक प्रकारच्या स्वास्थ्य समस्या जाणवतात, परंतु त्यांना उपचार मिळतात, हेही तितकेच खरे.
याउलट महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगारांना कामाच्या ठिकाणी जाण्याची कोणतीच सोय नसते. ऊसतोडणीसाठी दोन दोन किलोमीटरपर्यंतही चालत ये-जा करावी लागते. त्यामुळे कष्टाचे काम करून आणि कामाच्या ठिकाणी ये-जा करून, अशी दोन्ही बाबतींत या कामगारांना शारीरिक ऊर्जा खर्चावी लागते. आपल्याकडे कामगारांसाठी अल्पोपहार, ऊर्जादायी पेये, प्रथिने हे तर स्वप्नच आहे. प्रकिया केलेले पाणीही लांबचीच गोष्ट. साधे पिण्याचे पाणीही कामगारांना दिले जात नाही. कित्येकदा कामगार दुपारच्या कामानंतर हंडा किंवा बादली घेऊन पिण्याचे पाणी आजूबाजूला शोधतात. शेतातल्या विहिरीतले किंवा नदीतले पाणी पिण्यासाठी वापरतात. ते पाणी स्वच्छ असतेच असे नाही.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
थोडक्यात इतक्या वाईट पद्धतीने या कामगारांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जाते. या कामगारांना संरक्षक उपकरणे देणे तर लांबच, परंतु टोळीमालक राहण्यासाठी दिलेल्या ताडपत्रीचे आणि ऊसतोडणीसाठी दिलेल्या कोयत्याचेही पैसे वसूल करतात. हे कामगार फाटके आणि जुनेपुराणे कपडे घालून काम करतात. त्यांची मुले बऱ्याचदा उसाच्या पाचटात बिनाकपड्यानिशी आणि उघड्या अंगावर ऊसाचे पाचट कापून पडलेल्या चिरा घेऊन फिरत असतात. विंचू, साप चावणे, कोयता लागणे, वाहन भरती करताना खाली पडणे, उलटी होऊन मृत्यू होणे, यांसारख्या घटनांचा तर ना टोळीमालक विचार करत, ना साखर कारखाने. या सगळ्या गोष्टी कामगारांच्या वैयक्तिक समस्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांचे उत्तरदायित्व कामगारांवरच ढकलले जाते.
बाहेरच्या देशांत ‘ऊसतोडणीच्या कामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन त्याचा कामगारांच्या किडन्यांवर विपरीत परिणाम होतो’ असे सांगणारे बरेच अभ्यास आहेत. कारण ऊसतोडणी करताना कामगाराच्या शरीरातील पाणी कमी होणे, हे खूप सामान्य आहे. म्हणूनच त्याचे कामगारांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेणे निकडीचे वाटते. महाराष्ट्रात तर या ऊसतोड कामगारांचे जीवनमान इतके गृहीत धरले जाते की, त्यांना साधे पिण्याचेही पाणी पुरवले जात नाही. त्यांना कोणताच ठोस असा पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध करून दिला जात नाही किंवा पिण्याजोगे प्रक्रिया केलेले पाणी पुरवले जात नाही. ऊसतोडणीसाठी या कामगारांना अनेक गावे बदलावी लागतात. परिणामतः उपलब्ध अशुद्ध पाण्याचे स्रोतही बदलतात. बऱ्याच वेळा पाणी बदलामुळे कामगारांना आणि त्यांच्या मुलांना सर्दी-पडसे, जुलाब- हगवण यांसारखे त्रास होतात. यामुळे त्यांच्या किडन्यांवर काय परिणाम होतो अथवा नाही, हे संशोधनातून बघणेच उचित ठरेल. अमेरिकेमध्ये ऊसतोड कामगारांमध्ये किडनीच्या विकारांनी अनेक कामगारांचे बळी घेतले आहेत, अशा प्रकारचे संशोधनात्मक पुरावे आहेत. त्यामुळे या समस्या भारतातील\महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांमध्ये असतील, याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, ऊसतोडणीमुळे कामगारांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. याचबरोबर त्यांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताणतणावांतून जावे लागते. जळालेल्या ऊसाची तोड करताना कामगारांवर होणारे परिणामही अनेक अभ्यासांमधून समोर आले आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ऊसतोड कामगारांमध्ये अति कामामुळे शारीरिक तणाव येतो, शरीरातील पाणी कमी होते, स्नायू दुबळे होतात. यामुळे त्यांना विशेष पोषण आवश्यक असते, हे सर्वश्रुत आहे. साल्वाडोर, मध्य अमेरिकेमध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ऊसतोड कामगारांना जर पाणी, विश्रांती आणि सावली दिली, तर त्यांच्या शरीरातून होणाऱ्या पाण्याचा नाश कमी होतो, त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षमतेतही परिणामकारक वाढ होते. या अभ्यासापूर्वी कामगार साधारणपणे पाच टन प्रतिदिन ऊस तोडायचे, परंतु पाणी, विश्रांती आणि सावली या प्रयोगामुळे कामगार सात टन प्रतिदिन ऊस तोडू लागले. याचा अर्थ असा की, कामगारांचे हित जपण्यातून साखर उद्योगाचाही फायदा होतो.
काही ठिकाणच्या संशोधनात ऊसतोडणीचे काम करताना कामगारांच्या शारीरिक हालचालींच्या नोंदी घेऊन त्यांच्या शरिरातील कोणत्या अवयवांवर जास्त ताण पडतो, तो कसा कमी करता येईल किंवा त्यांच्यावर असणारा ताण कसा कमी करता येईल, याचाही विचार केलेला आहे. परंतु आपल्याकडे याच्या उलट अवस्था दिसते. महाराष्ट्रात कधी कधी असेही ऐकायला मिळते की, कामगार जितके जास्त (रात्रंदिवस) काम करतील, तेवढा जास्त त्यांनाच आर्थिक फायदा होतो. परंतु सत्य हे आहे की, कंत्राटदार आणि टोळीमालकांना आणि त्यायोगाने साखर कारखान्यांना जास्त फायदा होतो. (इथे कामगारांना फायदा होणे म्हणजे फक्त उचल फिटणे किंवा कर्जमुक्त होणे असा आहे)
ऊसतोड कामगारांना कामाच्या आधी आगाऊ रक्कम मिळते, साखरपट्ट्यात काम मिळते, राहायला आणि मोफत पिण्याचे पाणी मिळते, कसेतरी सहा महिने जातात म्हणून ते समाधानी असतात. परंतु ऊसतोडणीसारखे जीवघेणे काम करून त्यांचे आरोग्यच धोक्यात घालत असतात.
ऊसतोड कामगारांबद्दलच्या या स्थूल तुलनात्मक आढाव्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की, आपल्याकडे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांकडे संशोधनाच्या पातळीवरही सर्वाथाने बघितले गेलेले नाही. या कामगारांच्या सामाजिक-आर्थिक प्रश्नांबरोबरच या कामामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर होणारा प्रत्येक परिणाम अभ्यासण्याची गरज आहे. उदा. ऊसतोड कामगारांनी किती तास काम करावे, कसे करावे, सुट्टी कधी घ्यावी, आरोग्यविषयक तपासण्या कधी, कोठे, कशा कराव्या, याबद्दल वैज्ञानिक मार्गदर्शिका तयार करणे महत्त्वाचे ठरू शकते. अजून खोलात जायचे झाले तर ऊसतोडणीच्या हंगामाआधी कामगारांच्या शारीरिक तपासण्या करून हंगामानंतर त्यांच्यात कोणते बदल होतात, हे तपासून त्यानुसार आवश्यक त्या उपयोजना करता येऊ शकतात. अर्थात हे सर्व कामगारांच्या हिताचा विचार साखर कारखान्यांकडून होईल, तेव्हाच शक्य आहे.
उसाचा पट्टा हंगामी, स्थलांतरित कामगारांच्या हाताला काम देतो, ही बाब सकारात्मक असली तरी या कामगारांची स्थिती, त्यांना मिळणारा मोबदला, त्यांची होणारी पिळवणूक आणि या कामाचे त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम असे अनेक मुद्दे नकारात्मक आहेत. त्यांचा विचार करण्याची गरज आहे.
..................................................................................................................................................................
लेखिका सरोज शिंदे यांनी ऊसतोड महिला कामगारांच्या प्रजनन स्वास्थ्यावर संशोधन केले आहे. हे संशोधन जवळजवळ ३०० महिला ऊसतोड कामगारांवर असून त्यामध्ये ६० गरोदर/ प्रसूत महिला सहभागी झाल्या होत्या.
shinde.saroj4@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment