महाराष्ट्रातील महिला ऊसतोड कामगार गर्भाशय पिशवी काढायला का तयार होतात?
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सरोज शिंदे
  • सर्व छायाचित्रे - सरोज शिंदे
  • Tue , 19 October 2021
  • पडघम राज्यकारण ऊसतोड कामगार Sugarcane worker ऊस Sugarcane महिला Women

महाराष्ट्रात ऊसतोडणीच्या कामातला महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीचा दिसून येतो. मात्र या कामामुळे महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. गर्भाशयाची पिशवी काढणे (हिस्टेरेक्टोमी) ही त्यापैकीच एक. वर्ष २०१९च्या सुरुवातीला महिला ऊसतोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनात आले होते. त्यानंतर हा मुद्दा वेगवेगळ्या पातळीवर उचलून धरला आणि त्यावर चर्चाही घडवून आणल्या. महाराष्ट्रात खासकरून बीड जिल्ह्यामधील महिला ऊसतोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले होते.

वेगवेगळ्या चर्चांमधून गर्भाशयाची पिशवी काढण्यामागची कारणे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. काही चर्चांतून गर्भाशय काढण्यामागची कारणमीमांसा समोर आली. काही ठिकाणी असा प्रतिवाद झाला की, महिलांना ऊसतोडणीमध्ये सहभागी होण्यासाठी गर्भाशय काढावे लागणे ही अट आहे आणि ती मुकादम किंवा टोळीमालकांकडून घातली जाते. २०१९च्या एप्रिल महिन्यामध्ये अशी बातमी आली की, कंत्राटदार मासिक पाळी येणाऱ्या महिलांना ऊसतोडणीच्या कामामध्ये सहभागी करत नाहीत. त्यानंतर पिशवी काढलेल्या महिलांची काही प्रकरणे अभ्यासली गेली. त्यामध्ये नवीन बाजू मांडली गेली. ती अशी की, कंत्राटदार महिलांना पिशवी काढण्याची जबरदस्ती करत नसून, काही खाजगी डॉक्टर पिशवी काढण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करत आहेत. त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्भाशय काढण्याचा मुद्दा मानवी हक्कांशी जोडला आणि ऊसतोडीच्या कामासाठी महिलांना गर्भाशयाची पिशवी काढावी लागणे, हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, हे पटून देण्याचा प्रयत्न केला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या सर्व चर्चांमुळे वास्तव जाणून घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. ऑगस्ट २०१९मध्ये या समितीला असे आढळले की, बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ १३,००० महिला ऊसतोड कामगारांनी गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या आहेत. मासिक पाळीमुळे काम आणि त्या दिवसाचा पगार बुडू नये म्हणून महिला गर्भाशय काढतात, असे या समितीला आढळले. त्यावर या समितीने असे सुचवले की, गर्भाशय काढणे हा प्रश्न खूप गुंतागुंतीचा असून महिलांमध्ये यासंदर्भात जनजागृती करून तो सोडवला जाऊ शकतो.

ही समस्या प्रकाशझोतात येण्याआधीही काही संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला होता. परंतु त्यांच्या आरोग्याचा मुद्दा मात्र बराच काळ चर्चेतून गायब होता. गर्भाशयाच्या प्रश्नामुळे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांकडे अनेक बाजूंनी पाहण्याची संधी निर्माण झाली. असे असले तरी काही प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. उदा., कंत्राटदार महिलांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची सक्ती करत नाहीत, तरी महिला ती का काढतात? असे कोणते घटक आहेत, ज्यामुळे महिला खाजगी डॉक्टरांच्या प्रोत्साहनाला बळी पडतात? महिलांचा ऊसतोडणीमध्ये असणारा सहभाग त्यांना का आणि कसा धोक्यात आणतो? ऊसतोडणी करताना महिलांना कोणत्या प्रतिकूलतेला सामोरे जावे लागते?

एक म्हणजे या महिला त्यांचे अपेक्षित कुटुंब (मुलांना जन्म देऊन) पूर्ण झाल्यावरच गर्भाशय काढतात. दुसरे म्हणजे त्या ऊसतोडीच्या कामाला प्रत्येक हंगामाला येत असतील अथवा खूप वर्षांपासून काम करत असतील, तेव्हाच असा निर्णय घेतात. त्यामुळे असे म्हणता येईल की, महिलांना ऊसतोडणीचे काम अप्रत्यक्षपणे गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यास प्रवृत्त करते. म्हणून मुळात ऊसतोडणीच्या कामाच्या स्वरूपाकडे कानाडोळा करणे चुकीचे ठरेल.

बीड जिल्ह्यातून आलेल्या ३५ वर्षांच्या, २० वर्षे ऊसतोडणीचा अनुभव असलेल्या आणि गर्भाशयाची पिशवी काढलेल्या संगीताच्या म्हणण्यानुसार, “ऊसतोड करणाऱ्या महिलांना खूप कष्ट करावे लागतात. त्यांना मोळ्या बांधून उचलाव्या लागतात किंवा पडेल ते जड काम करावे लागते. त्यांना कधीच साधे आणि सरळ काम मिळत नाही. प्रसूतीनंतर किंवा मासिक पाळीच्या दुखण्यामध्येही विश्रांती मिळत नाही. महिलांना गैरसोयींत आणि असुरक्षितेत राहून काम करावे लागते. या कामात त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांना कंबर, ओटीपोट दुखणे, अंगावरून जाणे, मासिक पाळीचे आणि इतर बरेच आजार होतात.” 

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

संगीताच्या बाबतीतही तेच झाले. ती म्हणते- “मला पिशवी काढून बरं वाटलं असं नाही किंवा ती काढायची हौस नव्हती. पण तरासच एवढा होता- कंबरदुखी, पोटदुखी आणि अंगावरूनही जास्त (व्हाईट डिस्चार्ज) जात होतं, म्हणून काढली. डॉक्टरही म्हणले- बरं झालं दवाखान्यात आला काढायला. नसते गेले तर आतापर्यंत माझ्या अंगावर हराळी उगवली असती.” यावरून बऱ्याच गोष्टी समजतात. ऊसतोडणीचे जड काम, कामाचा अति भार, विश्रांती नसणे, कामाच्या ठिकाणी आरोग्याच्या सोयीसुविधा नसणे, या समस्या अधिक महत्त्वाच्या आहेत.

संगीताला निदान तिचा निर्णय योग्य तरी वाटतो, परंतु काही महिला अशाही आहेत, त्यांना गर्भाशय काढल्यावर पश्चाताप करावा लागतो. कारण ऊसतोडणीच्या कामात मासिक पाळीचा व्यत्यय नको म्हणून पिशवी काढणे अनेकदा चुकीचेही ठरते. कधी कधी असेही घडते की, महिला ज्या कारणांसाठी/ तक्रारींसाठी गर्भाशय काढतात, ती कारणे किंवा तक्रारी गर्भाशय काढूनसुद्धा तशीच राहतात किंवा अजूनच वाढतात. म्हणून ऊसतोडणीच्या कामासाठी गर्भाशय काढल्यास ते नव्या अडचणींला निमंत्रण देणारे ठरते, असा सूरही महिलांकडून ऐकायला मिळतो.

काही महिलांच्या बाबतीत असेही झाले आहे की, कामाच्या ठिकाणी त्या पाळीतील त्रास किंवा दुखण्यांबद्दल एकमेकींमध्ये चर्चा करतात, तेव्हा एकमेकींना ‘पिशवी काढणेच चांगले’ असे नकळत सुचवले जाते आणि ती काढली जाते. विशेषतः सासूने गर्भाशय काढले म्हणून सूनही तसाच विचार करते, असेही दिसून येते.

४५ वर्षे वय असणाऱ्या नीताबाईंची अशीच गोष्ट आहे. टोळीतल्या महिलांमध्ये झालेल्या चर्चांमधून त्यांनी १५ वर्षांपूर्वी गर्भाशयाची पिशवी काढली, परंतु आता त्यांच्यावर रडत बसण्याची वेळ आलीय. रोज अंगदुखी आणि हातपाय सुजत असतानाही त्यांना काम करावे लागते. तरीसुद्धा त्या म्हणतात- ‘ऊसतोडणीत दुखणंच तेवढं आहे, तर बाया काय करतील मग?’

अशाच प्रकारचे अनुभव गर्भाशय काढलेल्या महिलाही सांगतात. त्यातून त्यांची असुरक्षितता आणि अगतिकता ठळक होते. त्यांनी दिलेल्या माहितीवरून बहुतेक जणी खाजगी दवाखान्यांमध्येच गर्भाशय काढतात. इथे एक प्रश्न निर्माण होतो की, ते काढण्याची खरंच गरज होती का? किंवा त्याला पर्याय असतानाही ते काढण्याचा चुकीचा सल्ला डॉक्टरांनी देऊन त्यांची फसवणूक केली का? बीड जिल्ह्यात गर्भाशय काढण्याच्या प्रकरणांत काही खाजगी दवाखान्यांचाही सहभाग आहे, असे निदर्शनात आले होते. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले गेले होते, परंतु त्याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

दुसरे असे की, ऊसतोड कामगार ताडपत्रीपासून किंवा ऊसाच्या वाड्यापासून तयार केलेल्या तात्पुरत्या खोपटामध्ये राहतात. तिथे स्वच्छताविषयक साधने आणि पुरेशा पाण्याचीही सोय नसते. स्नानगृह किंवा शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधाही नसतात. महिला मासिक पाळीतील स्वच्छतेशी संबंधित गोष्टी करू शकतील, अशी कोणतीच व्यवस्था नसते. त्यामुळे मासिक पाळीबद्दल आपण कितीही व्यापकपणे बोललो, तरीही ऊसतोड कामगार महिला त्यापासून खूप दूर आहेत, हे मान्यच करावे लागेल.

सर्वांत दु:खदायक बाब अशी की, साखर कारखाने या कामगारांची जबाबदारी घेण्यात किंवा त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे असमर्थ ठरले आहेत.

महिला ऊसतोड कामगार या मुख्यत्वे खालच्या सामाजिक आणि आर्थिक स्थरातील असतात. मासिक पाळीच्या दिवसांत त्या बाजारात मिळणारे सॅनिटरी नॅपकिन किंवा पॅड विकत घेऊ शकत नाहीत. पैशाचे सोंग त्यांना परवडणारे नसते. या दिवसांत महिला एकच जुनेपुराणे कापड धुऊन परत-परत वापरतात. त्यामुळे मासिकपाळीशी संबंधित तक्रारी वाढण्याच्या शक्यताही वाढतात. विशेष म्हणजे ऊसाच्या मोळ्या घेऊन चालताना महिलांना पाचटात पाय घसरू नये म्हणून विशिष्ट प्रकारे चालावे लागते. तेव्हा त्यांच्या दोन्ही मांड्यामध्ये घर्षण होते. ते मासिक पाळीच्या दिवसांत कापड घेतल्याने अधिक होते. त्यामुळे त्यांच्या मांड्यांची सालटी निघतात, जखमा होतात. तरीही ते सहन करत, जखमांना खोबरेल तेल लावून महिला काम करतात. त्यांना विश्रांतीही घेऊ दिली जात नाही. कारण ऊसाची पात किंवा एखाद्या कामगारांचे काम मागे राहिले असेल आणि कामगार विश्रांती घेत असेल तर टोळीमालकाने शिवीगाळ, प्रसंगी मारहाण केल्याचेही अनुभव आहेत.

महिलांना ऊसाच्या मोळ्या बांधण्यासाठी कितीतरी वेळ खाली वाकावे लागते. खाली वाकूनच ऊसाचे वाडे गोळा करून त्यांचे भेळे बांधावे लागतात. त्यामुळे अनेक महिलांच्या कंबर किंवा ओटीपोटावर ताण येऊन ते दुखण्याचा त्रास होतो. एवढेच नव्हे तर बांधलेल्या मोळ्या डोक्यावर वाहाव्याही लागतात. शिवाय काम करण्याचे तास किंवा वेळ निश्चित नसल्यामुळे शारीरिक व मानसिक तणावातून जावे लागते. म्हणूनही या महिला गर्भाशय काढण्याच्या पर्यायाकडे पाहतात.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की, ऊसतोडणीच्या कामात महिला मासिक पाळीशी संबंधित आजारांचा सामना करत असल्या तरी त्यांना सुट्टी मिळत नसल्यामुळे त्या स्थानिक आरोग्यसुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. आणि खाजगी आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेणे त्यांना परवडत नाही. ऊसाचा हंगाम संपून गावाकडे जाईपर्यंत आजार बळावण्याचीही शक्यता निर्माण होते. परिणामी ‘खूप त्रास वाढला म्हणून गर्भाशय काढावे लागल्या’ची प्रकरणे पाहायला मिळतात.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शेवटी असे म्हणता येईल की, महिला ऊसतोड कामगारांमधील गर्भाशय काढण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा असला तरी त्यावर तोडगा काढता येऊ शकतो. त्यासाठी या महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत देणे, साप्ताहिक सुट्टी देणे किंवा मासिक पाळीतील आजारांवर कामाच्या ठिकाणी विनाविलंब आरोग्य सेवा पुरवणे आणि गर्भाशय काढण्याच्या प्रश्नावर जनजागृती करणे इत्यादी पर्यायांचा विचार तत्परतेने केला जाऊ शकतो.

अजून सर्वसमावेशक विचार करायचा झाल्यास, महिला ऊसतोडणीच्या कामात कोणत्या शारीरिक स्थितीत काम करतात आणि ते करताना त्यांच्या कोणत्या अवयवांवर जास्त ताण पडतो, यावर अभ्यास करून हे काम त्यांच्यासाठी किती चांगले किंवा वाईट आहे, हे ठरवता येऊ शकते. म्हणजेच अशा कष्टप्रद कामाचा ‘एर्गोनॉमिक’ (कार्याभ्यास) दृष्टीकोनातून विचार झाला पाहिजे. ते करताना कामगारांचे मूलभूत अधिकार आणि आरोग्य केंद्रस्थानी ठेवल्यास गर्भाशय पिशवीच्या प्रश्नाबरोबर ऊसतोड कामगारांचे इतर प्रश्नही सुटू शकतील.

..................................................................................................................................................................

लेखिका सरोज शिंदे यांनी ऊसतोड महिला कामगारांच्या प्रजनन स्वास्थ्यावर संशोधन केले आहे. हे संशोधन जवळजवळ ३०० महिला ऊसतोड कामगारांवर असून त्यामध्ये ६० गरोदर/ प्रसूत महिला सहभागी झाल्या होत्या.

shinde.saroj4@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा