अजूनकाही
१. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन कुणी हिंदुत्ववादी होत नसतं. उत्तर आणि दक्षिण भारतातील हिंदूंना झोडपणाऱ्यांना हिंदुत्ववादी म्हणणं म्हणजे हिंदुत्वावर अन्याय करण्यासारखं आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे सहसरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते डॉ. सुरेंद्र जैन यांनी केली. शिवसेनेत एवढीच हिंमत असेल तर त्यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध लढावे. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू.
याला म्हणतात, गरज सरो आणि शिवसेना मरो. शिवसेना हे उद्योग करत असताना यांचं एक पिल्लू सेनेच्या कळपात शिरून मुंबई आणि महाराष्ट्रात धष्टपुष्ट झालं, तेव्हा हे झोपले असणार बहुतेक गाढ. आपल्याच हिंदुबांधवांना झोडपणारी शिवसेना बाबरी मशीद पाडायला अग्रेसर होती, तेव्हा चाललं यांना. आता भाजपच्या नाकातोंडात पाणी जाण्याची भीती वाटू लागली, तेव्हा हे स्वघोषित ठेकेदार शिवसेनेच्या हिंदुत्वाचं माप काढणार? आणि जैनकाका, तुम्ही बांगलादेशी घुसखोरांविरोधात काय दिवे लावले आहेत, ते तरी सांगा.
……………………………….……………………………….
२. अभिनेते अमिताभ बच्चन हे गुजरातच्या पर्यटनाचे सदिच्छादूत आहेत. त्याचा संदर्भ देत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘गुजरातच्या गाढवांची जाहिरात करू नका, हे माझे या शतकातील सर्वांत मोठ्या महानायकाला सांगणे आहे,’ असे वक्तव्य नुकतेच केले होते. त्यावर ‘अखिलेश यांच्यापेक्षा गाढव निष्ठावान आहे. अखिलेश यांनी गाढवाकडून निष्ठा शिकायला हवी,’ अशी टीका गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी केली.
गाढवाबद्दल एवढ्या अधिकारवाणीने कोण बोलू शकतं? एकतर स्वत: निष्ठावान गाढव किंवा गाढवाच्या निष्ठेचा अनुभव असलेला मालक. वाघानी यांच्याबाबतीत कोणता पर्याय योग्य मानायचा? ते त्यांच्या पक्षाचे आणि पक्षमालकांचे निष्ठावान सेवक तर असणारच ना?
……………………………….……………………………….
३. फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वादग्रस्त लेखिका शोभा डे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबईत निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचं छायाचित्र ट्विट केलं. त्या पोलिसाच्या अवाढव्य आकारावरून 'हेवी पोलिस बंदोबस्त' अशी खिल्ली उडवणारी कोटी त्यांनी केली होती. मुंबई पोलिसांनी हा कर्मचारी आपल्या दलाचा नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देताना पातळी सोडून टीका केल्याबद्दल त्यांचा शेलक्या शब्दांत समाचारही घेतला.
डे बाई, डे बाय डे तुमची विनोदबुद्धी घसरत चालली आहे. एरवी कोणी कोणाच्या शारीरिक स्थितीवरून टिंगलटवाळी केली असती, तर तुम्ही कडक शब्दांत त्याची हजेरी घेतली असती. या पोलिसाच्या आकारमानावरून त्याची टर उडवताना त्याची अशी स्थिती होण्याला काही आजार कारणीभूत असू शकतो, त्याच्या कामाच्या अनियमित वेळा, मिळेल ते कदान्नच खावं लागणं, आनुवांशिक दोष अशी काही कारणं असू शकतात, याचा विचारही नाही आला तुमच्या मनात? की तुमच्या सहानुभूतीसाठी पात्र ठरायला सेलिब्रिटीच असावं लागतं?
……………………………….……………………………….
४. देशातील सर्वाधिक प्रदूषित ९४ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश असून त्यांत मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर आणि पुण्याचा समावेश आहे. २०११ ते २०१५ दरम्यानच्या कालावधीमध्ये केलेले सर्वेक्षण आणि चाचण्यांमधून या शहरांमधील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (पीएम १०) या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा किती तरी अधिक असल्याचे आढळून आले आहे.
तरी नशीब हे सर्वेक्षण आता, गेल्या महिन्याभरात झालेलं नाही. त्यात पीएम १० आणि नायट्रोजन ऑक्साइडबरोबर पराकोटीच्या विखाराचे आणि विद्वेषाचे कणही प्रचंड प्रमाणात आढळले असते. शिवाय ध्वनीप्रदूषणाच्या पातळीने तर त्यांचं मापन करणारी यंत्रंही मोडून पडली असती… निवडणूक प्रचार सुरू होता ना या काळात?
……………………………….……………………………….
५. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे दहावी आणि बारावीतील शिक्षणाविषयीचे दस्तवेज तपासू देण्याच्या माहिती आयोगाच्या आदेशाला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली असून त्यामुळे पदवीच्या सत्यतेवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इराणी यांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक लढवताना दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये स्मृती इराणी यांनी शिक्षणाविषयी चुकीची माहिती दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
हा स्मृतीबाईंना त्रास देण्याचा प्रकार आहे, असा न्यायालयाचा तर्क आहे. असा तर्क कशाला असायला हवा. तशी खात्रीच असायला हवी. पण, त्यावर त्यांच्या शिक्षणविषयक चौकशीला स्थगिती देणं हा 'दिलासा' कसा असू शकतो. स्मृतीबाईंनी कागदपत्रं दडवण्याचं कारण काय? त्यांनी पारदर्शकपणे खरं काय ते उजेडात आणलं पाहिजे ना. ती दडवल्याने दिलासा मिळत असेल, तर आरोप खरेच मानायला हवेत.
……………………………….……………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment