दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातल्या सिल्व्हासामधील ‘अवर लेडी ऑफ पायटी’ (Our Lady of Piety)च्या सणाआधी नऊ-दहा दिवस होणाऱ्या ‘नॉव्हेना’चा परवा शेवटचा दिवस होता. आज सणाची मोठी ‘संगीत मिस्सा’ होऊन या चर्चच्या वार्षिक उत्सवाची सांगता होणार आहे. ज्या संताचे नाव एखाद्या चर्चला दिले गेले आहे, त्याचा सण ‘चर्चचा सण’ किंवा ‘फेस्त’ म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ‘अवर लेडी ऑफ पायटी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मदर मेरीचा सण ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसांत नोव्हेना प्रार्थना आयोजित केल्या जातात.
या नोव्हेना दसऱ्याच्या आधी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्री उत्सवाप्रमाणेच असतात. नवरात्रोत्सवाची सांगता दसरा किंवा विजयादशमीने होते, तशी नोव्हेनाची सांगता त्या त्या विशिष्ट संताच्या सणाने होते. उदा., मदर मेरीचा सण, सेंट फ्रान्सिस झेव्हियरचा सण, सेंट अँथनीचा सण इत्यादी. याला अपवाद आहे फक्त येशू ख्रिस्ताशी संबंधित असलेल्या ख्रिसमस आणि गुड फ्रायडेच्या सणांचा. येशू ख्रिस्ताशी संबंधित असलेल्या कुठल्याही सणाअगोदर नॉव्हेना प्रार्थना नसतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे गोव्याशी खूप जुने म्हणजे पाच शतकांपासूनचे नाते आहे. एकमेकांपासून शेकडो मैल दूर असल्याने बोलीभाषा, पेहराव, संस्कृती भिन्न असली तरी या प्रदेशांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे तेथे साडेचार शतके असलेली पोर्तुगीज सत्ता.
भारतातील जनमताच्या रेट्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिणामाची चिंता न करता पंतप्रधान पंडित नेहरू यांनी १९ डिसेंबर १९६१ रोजी केलेल्या लष्करी कारवाईनंतर गोवा, दमण आणि दीव इथली पोर्तुगीज सत्ता संपली. त्याआधी म्हणजे १९५४मध्ये दादरा-नगर हवेली हे गुजरातच्या सीमेलगतचे चिमुकले प्रदेश भारतात सामिल झाले होते. काश्मीरप्रश्नी चूक केल्याबद्दल पंडित नेहरूंना सतत धारेवर धरले जाते, मात्र गोवा, दमण आणि दीव विना रक्तपात रातोरात पोर्तुगिजांच्या सत्तेतून मुक्त करून भारतात सामिल केल्याबद्दल मात्र त्यांचे कधी कौतुक केले जात नाही.
सिल्व्हासा हे नगर हवेलीमधले मुख्य शहर. पोर्तुगीज काळात दादरा-नगर हवेलीची ती राजधानी होती. विशेष म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दमण हे समुद्रकाठी असल्याने समुद्रमार्गे पोर्तुगीजांचा या शहराशी थेट संपर्क असे. दादरा-नगर हवेली मात्र समुद्रकिनारी नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या ताब्यातील भारतातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय भूमीवरून या पोर्तुगीज प्रदेशात जाणे-येणे भाग असायचे. तरीसुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अगदी १९५४पर्यंत दादरा-नगर हवेली हा छोटासा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला, हे विशेषच.
वास्तविक पाहता दमणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले दादरा-नगर हवेली हे प्रदेशसुद्धा गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे भाग झाले असते, मात्र गोवा मुक्तीआधी केवळ सात वर्षांपूर्वी दादरा-नगर हवेली भारतात सामील झाले आणि गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश लष्करी कारवाईनंतर १९६१ साली.
पणजीतल्या धेम्पे कॉलेजातून मी १९७८ साली बारावीची परीक्षा दिली. त्यामुळे माझ्या बारावीच्या बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आणि प्रमाणपत्रावर गोवा, दमण आणि दीव बोर्डाचे नाव आणि शिक्का आहे. भारताच्या नकाशावर एक नजर टाकून गोव्याचे आणि दमण व दीवचे भौगोलिक स्थान पाहिले तर कुणालाही धक्काच बसेल. गोवा हे एका जिल्ह्याच्या आकाराचे आहे, तर दमण व दीव हे तालुक्याच्या आकाराचे आहेत. हे तीन चिमुकले प्रदेश एकमेकांपासून शेकडो किलोमीटरच्या अंतरावर आहेत.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
..................................................................................................................................................................
१२ तालुक्यांचा मिळून एक जिल्हा बनलेल्या गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे दमण व दीव हे दोन तालुके असायचे. या केंद्रशासित प्रदेशाचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेल्या दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर, त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर आणि प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून कधी या दोन तालुक्यांना भेट दिली असेल, याबद्दल शंका वाटावी इतके ते गोव्यापासून दूर आहेत. दमण हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यापाशी आणि गुजरातच्या सीमेशेजारी आहे. गोव्याहून रस्तामार्गे दमणला येण्यासाठी १५ तास लागतात, तर दमण येथून दीव येथे जाण्यासाठी आणखी १५ तास लागतात. ते गुजरातच्या दुसऱ्या टोकाला आहे.
गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे अस्तित्व जेमतेम २५ वर्षांचे म्हणजे डिसेंबर १९६१ ते जून १९८७पर्यंतचे. या काळात माझे गोव्यात उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. माझ्या पत्रकारितेचा पाया तेथेच घातला गेला. त्यामुळे गोवा, दमण आणि दीव माझ्या भूतकाळाचा नव्हे तर आयुष्याचाच एक भाग बनला. गोवा स्वतंत्र राज्य झाल्यावर या केंद्रशासित प्रदेशाचे १९८७ साली विभाजन झाले, हे तीन प्रदेश एकमेकांना परके झाले. त्यानंतर तब्बल ३५ वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी (२०२०) मी दमण येथे पाऊल ठेवले. सिल्व्हासा येथे पोहोचलो, तेव्हा मी भावूक होणे साहजिकच होते.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
गोवा आणि दमण येथे खूप जुनी म्हणजे ३००-४०० वर्षांपूर्वी बांधलेली चर्चेस असली तरी सिल्व्हासातले ‘अवर लेडी ऑफ पायटी’ हे त्या मानाने अलीकडच्या काळातले म्हणजे केवळ १२५ वर्षांपूर्वी, १८९७ साली बांधलेले चर्च आहे. पोर्तुगीजांनी दादरा-नगर हवेलीची राजधानी दादराहून सिल्व्हासाला हलवली, त्यानंतर लगेचच हे चर्च बांधण्यात आले.
या चर्चचे युरोपियन गॉथिक शैलीचे बांधकाम अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. चर्चच्या एका लांबलचक आडव्या आणि उघडताना घडी करता येण्यासारख्या पाच-सहा मीटर अंतराच्या लाकडी कोरीव दारावर येशू ख्रिस्ताचे आपल्या बारा शिष्यांबरोबरच्या शेवटच्या भोजनाचे म्हणजे ‘द लास्ट सपर’चे अप्रतिम चित्र आहे. या चर्चचे नूतनीकरण आणि विस्तार करण्यात आला, तेव्हा आल्तार म्हणजे वेदी, जुने प्रवेशद्वार आणि इतर काही भाग जसाच्या तसा ठेवण्यात आला. वास्तुशास्त्रीय आणि ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत कॅथोलिक चर्चचा हा सगळीकडे आढळणारा गुण निश्चितच कौतुकास्पद वाटतो.
‘ला पिएता’ हे नाव ऐकल्यावर जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलो यांच्या नावाजलेल्या कलाकृतीची आठवण येते. त्यांच्या खूप गाजलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश होतो. ‘पायटी’ (Piety) हा मूळचा लॅटिन शब्द, ‘ला पिएता’ म्हणजे करुणा. ‘अवर लेडी ऑफ पायटी’ या नामाधिनाचे मराठी रूपांतर ‘करुणामय माता’ असे होईल.
रोममधील व्हॅटिकन सिटीच्या सेंट पिटर्स बॅसिलिकामधील तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. युरोपच्या सहलीवर असताना व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पिटर्स बॅसिलिकाच्या भव्य प्रवेशदारात मी पत्नी-मुलीसह पोहोचलो होतो. अनेक वर्षे ज्या ऐतिहासिक वास्तूविषयी खूप काही वाचले-ऐकले होते, तेथे पोहोचल्यावर प्रचंड औत्सुक्य होते. उंच खांब असलेल्या प्रवेशदारातून आत शिरलो, उजव्या बाजूला नजर गेली आणि मी थबकलोच. माझा विश्वासच बसत नव्हता. पत्नीचा हात पकडून तिचेही मी तिकडे लक्ष वेधले. तेथे अँजेलोचे ‘ला पिएता’ हे संगमरवरातले शिल्प होते. आपल्या पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे कलेवर मांडीवर घेऊन मारियामाता बसली आहे, असे हे शिल्प.
आपल्या पुत्राचे मृतशरीर न्याहाळणाऱ्या आईचे शिल्प म्हणून ‘ला पिएता’ हे त्याचे नाव. वयाच्या २३व्या वर्षी अँजेलोने संगमरवरी दगडातून ही कलाकृती साकारली. आपल्या तरुण पुत्राचे निस्तेज, अचेतन कलेवर मांडीवर घेऊन शोक करणाऱ्या मारियामातेची भावमुद्रा याविषयी खूप काही लिहिले गेले आहे. जगातील सर्वांत सुंदर आणि अत्यंत मौल्यवान असणाऱ्या कलाकृतींमध्ये या शिल्पाचा समावेश होतो. मात्र १९७२ साली एका माथेफिरू इसमाने हातोड्याच्या साहाय्याने हे शिल्प तोडण्याचा प्रयत्न केला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हे शिल्प असलेल्या आल्तारासमोर आता बॅलेटप्रुफ काच बसवण्यात आली आहे.
‘द लास्ट सपर’ किंवा येशू ख्रिस्ताचे आपल्या शिष्याबरोबरचे शेवटचे भोजन हा प्रसंग अँजेलोचा समकालीन असलेल्या लिओनार्दो दा व्हिन्सी या चित्रकारानेही रेखाटला आहे. ‘द लास्ट सपर’ या घटनेला अनेक चित्रकारांनी रेखाटले आहे, अनेक ख्रिस्ती कुटुंबांत जेवण्याच्या खोलीत ‘द लास्ट सपर’ हे चित्र असते. त्याचप्रमाणे या घटनेवर आधारित अनेक चित्रे आणि शिल्पे अनेक चर्चेसमध्ये दिसतात. सिल्व्हासामधील चर्चमध्येही आल्तारावर एक वेगळ्या शैलीतले शिल्प आहेच.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
गोवा, दमण, दीव आणि दादरा, नगर हवेली येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाजाचा धर्म, पेहराव, आहारपद्धती, भाषा आणि संस्कृती पोर्तुगीज राजसत्तेचा वारसा आहे. गोव्याचे दमणशी साडेचारशे वर्षे असलेले नाते संपलेले असले तरी त्याचा एक बारीकसा धागा अस्तित्वात आहे. तो म्हणजे गोव्यातील कॅथोलिक चर्च. आजही दमण आणि दादरा, नगर हवेली हे प्रदेश गोवा आर्चडायोसिस म्हणजे महाधर्मप्रांताचा भाग असून गोव्याचे आर्चबिशप व पॅट्रियार्क दमण आणि दादरा, नगर हवेली येथील चर्चमधील धर्मगुरूंची नेमणूक करतात. गोव्याचे आर्चबिशप यांच्या या प्रदेशात वेळोवेळी भेटी होत असणार. कारण कॅथोलिक पंथामध्ये कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार किंवा सांक्रामेंत या विधीचे पौराहित्य फक्त बिशपच करू शकतात.
कॅथोलिक चर्चअंतर्गत ज्युरिसडिक्शन म्हणजे सीमाहद्द हा नेहमीच गंमतीदार आणि तितकाच वादग्रस्त विषय राहिलेला आहे. यासंदर्भात दुसरे माधवराव पेशवे यांनी दिलेल्या जमिनीवर १७९२ साली बांधण्यात आलेल्या पुण्यातल्या सिटी चर्चचे उदाहरण देता येईल. मराठा सैन्यात असलेल्या गोव्यातल्या पोर्तुगीज किंवा कॅथोलिक सोल्जरांसाठी हे चर्च बांधण्यात आले होते. भारतावर ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यातील चर्चचा या सिटी चर्चवरचा मालकीहक्क कायम राहिला. या चर्चच्या धर्मगुरूंची नेमणूक गोव्यातल्या बिशपांकडून व्हायची. हा प्रकार १९५३पर्यंत चालू होता. त्यानंतरच हे चर्च पुणे धर्मप्रांताचा भाग बनले.
दमण आणि सिल्व्हासा येथील अल्पसंख्य ख्रिस्ती समाज आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक वारसा टिकवून धरण्याचा एक क्षीण, केविलवाणा प्रयत्न या नॉव्हेना प्रार्थनेच्या दरम्यान करत होता. त्याचा परवा मी अनपेक्षितपणे साक्षीदार होतो. तो प्रसंग खरे तर खूप आनंददायी होता. तरी पण ऐतिहासिक वारशासंदर्भातला जुना इतिहास, गेल्या काही दशकातील त्याबाबतचा अनुभव आणि भविष्यातले अटळ सत्य यांची जाणीव होऊन माझे मन गलबलून गेले होते.
नॉव्हेनाच्या वेळी दररोज रोझरी प्रार्थना म्हणजे पवित्र माळेची प्रार्थना होते. त्यात येशू आणि आई मारिया यांच्या जीवनासंबंधीच्या पाच घटनांची (रहस्यांची) उजळणी केली जाते. त्यातल्या चार प्रार्थना इंग्रजीत झाल्यानंतर पाचवी प्रार्थना गायनाने सुरू झाली. आणि ती चक्क पोर्तुगीज भाषेत होती.
‘आवे मारीया...’ अशी सुरुवात ऐकताच ती ‘नमो मारीया’ किंवा इंग्रजीतील ‘हेल मेरी’ ही प्रार्थना होती हे माझ्या लक्षात आले. पोर्तुगीज आणि लॅटिन भाषेतील काही शब्द माहीत असल्याने ती मला समजत होती.
पाचही कवने पोर्तुगीज भाषेत म्हणण्याऐवजी केवळ शेवटचे कवन म्हणण्याचे कारण सहज समजण्यासारखे होते, तेथे जमलेल्या सर्वच कॅथोलिक भाविकांना पोर्तुगीज अवगत नव्हती. बहुधा गोव्यातून नेमणूक होणाऱ्या त्या चर्चच्या धर्मगुरूंनासुद्धा पोर्तुगीज येत असेल याचीही मला शंकाच आहे. कारण गोवामुक्तीनंतर १०-१५ वर्षांतच तिथून पोर्तुगीजचे उच्चाटन करण्यात आले. दमण, दादरा आणि नगर हवेली येथे मात्र आजही कॅथोलिक समाजात पोर्तुगीज बोलली जाते.
दमणमध्ये पोर्तुगीज भाषा ख्रिस्ती शाळांतून अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे २००५पर्यंत दुसरी भाषा म्हणून शिकवली जायची. दादरा, नगर हवेली, दीव आणि दमण येथली स्थानिक भाषा गुजराती आहे. मात्र दमण आणि सिल्व्हासा इथल्या कॅथोलिक कुटुंबांत आजही पोर्तुगीज भाषेतच संवाद होतो. ‘आम्ही पोर्तुगीज’ असा स्वतःचा अभिमानाने उल्लेख करणारे अनेक जण येथे आढळतात.
डिसेंबर १९६१च्या आधी दमणमध्ये जन्मलेल्या सर्वांना पोर्तुगीज पासपोर्ट मिळायचा. या सुविधेचा लाभ घेऊन अनेकांनी पोर्तुगालमार्गे युरोपियन राष्ट्रांचे नागरिकत्व मिळवले आहे, आजही त्या प्रयत्नात शेकडो जण असतात. गोव्यातही असाच प्रकार मी अनुभवला आहे. आपण फार वेगाने अल्पसंख्य होत चाललो आहोत आणि काही काळानंतर या प्रदेशातील आपले अस्तित्व व संस्कृती दखल घेण्यासारखी राहणार नाही, अशी भावना गोव्यातील कॅथोलिक लोकांमध्ये आढळते. कारण या समाजातील लोक मोठ्या संख्येने युरोपात आणि इतर पाश्चात्य देशांत स्थायिक झाले आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
दमण आणि दादरा, नगर हवेलीमध्ये नेमणूक झालेल्या फादरांना पोर्तुगीजचे धडे शिकावे लागायचे. कारण येथील कॅथोलिक भाविक पोर्तुगीज बोलणारे, त्यांच्या प्रार्थना आणि इतर धार्मिक व्यवहार पोर्तुगीजमध्येच असायचे. मात्र गोव्यात आता या भाषेचा मागमूसही दिसत नाही. त्यामुळे ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ या न्यायाने गोव्यातून नेमणुकीवर येणाऱ्या धर्मगुरूंना पोर्तुगीजचे ज्ञान नसते. परिणामी दमण आणि सिल्व्हासामधील चर्चमध्ये मिस्सा आणि सर्व प्रार्थनाही इंग्रजीतच होतात.
कुठलीही भाषा नाहीशी होते, तेव्हा ती बोलणाऱ्यांची संस्कृतीही नामशेष होते, असे म्हटले जाते. गोव्यातून पोर्तुगीज कधीच हद्दपार झाली आहे. पोर्तुगीज संस्कृती आणि इतिहासाचे अनेक अवशेष मात्र गोव्यात आजही आढळतात. दमण आणि दादरा, नगर हवेली येथील परिस्थितीसुद्धा काहीशी अशीच आहे. येथील कॅथोलिक समाजाची संख्या अगदीच कमी असल्याने पोर्तुगीज भाषा आणि इतरही अनेक वारसे येत्या काही वर्षांतच नाहीसे होणार आहेत, असे मला इथे आल्यापासून वाटते आहे. त्यामुळेच रोझरी माळेचे पोर्तुगीजमधले ते शेवटचे कवन मधुर सुरात गायले जात असताना पोर्तुगीज संस्कृतीची ती शेवटची घरघर अस्वस्थ करत होती.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment