२०२१मधील लोकप्रिय नेते आणि तत्कालीन भारताचे पंतप्रधान २०२१ सालच्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आणि मोदीभक्त आणि मोदी विरोधक यांच्यात जुंपली. मोदीभक्तांचे म्हणणे असे की, मोदी अमेरिकेत गेले म्हणून अमेरिका उपकृत झाली. एक विश्वगुरू आपल्या मातीला आपले पवित्र पाय लावतो म्हणजे काय? मोदी विरोधकांना हा आत्मवंचनेचा भाग वाटत होता. जो देश एखादी व्यक्ती कितीही सक्षम असली तरी तिला दोनपेक्षा जास्त वेळा अध्यक्ष बनू देत नाही, तो देश कुठल्याही परक्या देशातील पंतप्रधानाची व्यक्तिपूजा का बांधेल, असा प्रश्न मोदीविरोधक विचारू लागले.
पण मोदी भक्त काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांच्या दृष्टीने मोदीजी हा परमेश्वराचा अवतार होता. सगळ्या जगाला त्यांचे महत्त्व कळले होते. अमेरिका स्वतःच्या मातीला त्यांचे पाय लागले म्हणून स्वतःला भाग्यवान समजत होती. आणि, देशातील करंटे मोदीविरोधक अशा थोर भाग्याचा विरोध करत होते.
तेवढ्यात सोशल मिडियावर ‘न्यू यॉर्क टाईम्स’मध्ये छापली गेलेली फ्रंट पेज बातमी येऊन थडकली. या पोस्ट मध्ये ‘न्यू यॉर्क टाईम’च्या पहिल्या पानावर मोदीजींचा फुलपेज फोटो दिला होता आणि वर लिहिले होते – ‘Last Best Hope Of The Earth : World's Most Loved And Most Powerful Leader Is Here To Bless Us’.
मोदी भक्तांमध्ये आनंदाची तीव्र लाट उसळली. त्यांनी सकाळी सकाळी ती बातमी सगळीकडे प्रसारित केली. ‘न्यू यॉर्क टाईम्स’मधील बातमीचा स्क्रीन शॉट आणि खाली आचरट कॅपशन्स लिहून सगळीकडे ती पोस्ट व्हायरल झाली.
‘लिब्रांडूंच्या बुडाला आग लागेल अशी बातमी’, ‘सगळ्या जगाला पूज्य असलेल्या नेत्याला विरोध करणाऱ्या माकडांवर नियतीचा प्रहार’, अशा कॅप्शन्स लिहिल्या गेल्या होत्या. अविनाश आणि अच्युत हे पराकोटीचे मोदीभक्त होते, हे आपण या बखरींच्या पहिल्या तीन प्रकरणांत पाहिलेच आहे. आज शंभर वर्षांनंतर हे वाचताना फार मौज वाटते. चांगली सुशिक्षित माणसे, अशी कशी वागू शकतात याचे आज आपल्याला आश्चर्य वाटते.
शिरोजीने हे सगळे किस्से बखर स्वरूपात लिहून ठेवले म्हणून आज आपल्याला ही सारी गंमत कळते तरी आहे. नाहीतर ही मौज कायमसाठी काळाच्या उदरात गडप झाली असती. खरं तर ही नुसती मौज नाहिये. मानवातील कुठल्या कुठल्या वृत्ती लोकशाहीसाठी अत्यंत नुकसानकारक ठरू शकतात, हे भारतीय जनतेला या काळाने शिकवले. व्यक्तिपूजा ही लोकशाहीसाठी कशी घातक असते, हे भारतीय राज्यव्यवस्थेला या काळाने शिकवले. लोकशाहीसाठी अत्यंत आव्हानात्मक असा काळ शिरोजी आपल्यासाठी आपल्या बखरीत जिवंत करतो.
श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर. (२ ऑक्टोबर २१२१)
..................................................................................................................................................................
‘न्यू यॉर्क टाईम्स’ने मोदीजी अमेरिकेला आशीर्वाद देण्यासाठी अमेरिकेत आले, ही बातमी दिल्याची पोस्ट अच्युतला पहाटे पाच वाजता आली. अच्युत पाणी पिण्यासाठी उठला होता. तेवढ्यात ही पोस्ट दिसली. अच्युत आनंदताशियाने वेडा झाला. त्याने अविनाशला, भास्करला आणि समरला ती पोस्ट फॉरवर्ड केली.
केवढा मोठा प्रसंग! ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने एका भारतीय पंतप्रधानाचा एवढा सन्मान करावा! अच्युतला राहवले नाही. त्याने अविनाशला फोन केला. तोसुद्धा एक्साइट झाला होता. अचंबित झाला होता. मोहरला होता.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
दोघे खूप वेळ बोलत राहिले. केवढा मोठा सन्मान, केवढा मोठा सन्मान, असे परत परत बोलत राहिले. अच्युतच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. समर आणि भास्करचे चेहरे आज पाहण्यासारखे होणार असे भाकित अविनाशने केले. त्यांचे ते चेहरे पाहण्यासाठी सकाळी समर आणि भास्कर चहा पिण्यासाठी ज्या चहाच्या टपरीवर जातात, तिथे जायचे त्यांनी ठरवले.
इकडे भास्करला ती पोस्ट बघूनच कळले की, ही पोस्ट खोटी आहे. आम्हाला आशीर्वाद द्यायला मोदीजी अमेरिकेत आले आहेत, असे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ कशाला म्हणेल? आणि मोदीजींनी जगासाठी असे नक्की काय केले आहे, म्हणून जग त्यांना ‘जगाची अखेरची आशा’ म्हणेल? त्याला हसू यायला लागले.
त्याने बारकाईने ती पोस्ट बघितली. त्यात २६ सप्टेंबर अशी तारीख होती. म्हणजे त्याच दिवसाची. गंमत म्हणजे सप्टेंबर या शब्दाचे स्पेलिंग चुकले होते. भास्करला भयंकर हसू आले. अविनाश आणि अच्युत आज ही पोस्ट मिरवत चहाच्या टपरीवर येणार हे त्याने ओळखले. आज मजा येणार होती.
चहाच्या टपरीवर समर आणि भास्कर भेटले, तेव्हा त्यांना भयंकर हसू येत होते. समर ‘न्यू यॉर्क टाईम्स’चा सब्स्क्रायबर होता. त्याने ‘न्यू यॉर्क टाईम्स’ फोन अॅपवर भास्करला उघडून दाखवला. मोदीजींविषयीची ती बातमी कुठेही नव्हती.
इतक्यात अविनाश आणि अच्युत आले. त्यांनी आल्या आल्या भास्कर आणि समरचे फोटो काढले.
ती पोस्ट नाचवत अविनाश म्हणाला – ‘हाऊ इज द जोश?’ (त्या काळात भारतात देशभक्तिपर बेगडी हिंदी सिनेमे निघत. त्यात ‘हाऊ इज द जोश?’ अशी अत्यंत बेगडी वाक्ये असत. बालबुद्धीच्या प्रेक्षकांना ही असली वाक्ये त्या काळात अत्यंत उत्साहित करत. - संपादक.)
अच्युत, समर आणि भास्करचे फोटो काढून त्यांना म्हणाला की, तुम्हा दोघांचे चेहरे पडलेले फोटो इतिहासात अमर झाले आहेत.
अविनाश – ‘न्यू यॉर्क टाईम्स’सारख्या प्रतिष्ठित पेपरनेसुद्धा आज मान्य केलं की, मोदीजी इज द लास्ट बेस्ट होप ऑफ द वर्ल्ड. मोदीजी हीच या जगाची शेवटची आशा आहे.
अच्युत - तुम्ही मोदी विरोधक असाल तर असेच हाल होत राहणार तुमचे.
भास्कर आणि समरला हसू आवरेना.
अच्युत - असं केविलवाणं हसू बळजबरीनं आणताय तोंडावर. काय वेळ आली आहे तुमच्यावर.
भास्कर – अरे, पण तारीख बघ की, त्या पोस्टमध्ये आहे ती.
अविनाश - २६ सप्टेंबरच आहे.
भास्कर - सप्टेंबरचं स्पेलिंग चुकलं आहे.
अच्युत - असेल.
समर – ‘न्यू यॉर्क टाईम्स’ कसा चुकेल स्पेलिंग?
अविनाश - तुला म्हणायचं काय आहे?
समर - स्पेलिंग चुकलं आहे सप्टेंबरचं इतकंच म्हणायचं आहे आम्हाला.
अच्युत - ही पोस्ट खोटी आहे, असं म्हणायचं आहे का तुला?
अविनाश - किती रे जळकुटे आहात तुम्ही लोक!
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
अच्युत - तो ‘न्यू यॉर्क टाईम्स’ सूर्याला नमन करतो आहे आणि तुम्ही भारतीय भूमीत जन्मलेले असून थुंकता आहात सूर्यावर!
समर - (फोनमध्ये बघत) अरे, आजची तारीखसुद्धा चुकलाय ‘न्यू यॉर्क टाईम्स’.
भास्कर - (हसत) म्हणजे?
समर - हे बघ आजच्या २६ सप्टेंबरच्या ‘न्यू यॉर्क टाईम्स’मध्ये आपल्या मोदीजींची बातमीच नाहिये.
अच्युत - ही पोस्ट खोटी आहे असं म्हणायचं आहे का तुला?
भास्कर - सप्टेंबरचं स्पेलिंग चुकीचं आहे का बघ बरं तिथं.
समर - (फोन मध्ये बघत) बरोबर आहे.
अच्युत - ही पोस्ट खरी आहे. शंभर टक्के खरी!
भास्कर - (हसत) असणारच आहे.
समर - आम्ही फक्त ‘न्यू यॉर्क टाईम्स’ आज तारीख चुकला आहे असे म्हणत आहोत.
अच्युत – ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने उतरवली असेल बातमी. बयाडनला सहन झालं नसेल.
(ज्यो बायडन तत्कालीन त्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते.)
अविनाश - बरोबर आहे. त्याला सहन झालं नसेल ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने मोदीजींना मोठं म्हटलेलं.
अच्युत - मी सकाळी बघितला ‘न्यू यॉर्क टाईम्स’, तेव्हा होती ही मोदीजींची बातमी.
समर - सर्च हिस्टरी दाखव तुझ्या फोनची.
अच्युत - मी माझ्या कॉम्पवर बघितला.
समर - चल घरी. त्यातली सर्च हिस्टरी दाखव.
अच्युत - मी डिलीट केली आहे कॉम्पची सर्च हिस्टरी आज सकाळीच.
भास्कर - म्हणजे तू पाहिली नाहियेस ही बातमी.
अविनाश - हे बघा, ही पोस्ट खरी आहे की खोटी आहे, हा प्रश्नच नाहिये.
भास्कर - (हसत) मग कुठला प्रश्न आहे?
अविनाश - प्रश्न हा आहे की, सगळ्या जगाला मोदीजींचे मोठेपण पटलेले आहे, हे तुमच्यासारख्या लोकांना का पटत नाहिये.
भास्कर - ही पोस्ट खरी आहे की, खोटी एवढंच सांग.
अविनाश - ही पोस्ट खोटी असल्याने काही फरक पडत नाही. मोदीजी यांना जगातले सगळे नेते मानतात हे सत्य आहे.
भास्कर - २०१३ साली ग्रीसमध्ये आर्थिक संकट आले होते. ग्रीस गोत्यात आल्यामुळे सगळा युरोप आर्थिक संकटात आला होता. त्या वेळी जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मेर्केल यांनी मनमोहन सिंग यांना फोन करून त्या प्रश्नाबाबत चर्चा केली होती. मनमोहन सिंग यांचे मत घेतले होते. अशी एक तरी बातमी तू मोदीजींबद्दल दाखव.
(मनमोहन सिंग हे नरेंद्र मोदी यांच्या आधी भारताचे पंतप्रधान होते. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञही होते. - संपादक)
अच्युत - हे खोटे आहे.
त्यावर भास्करने थोडेसे गूगल सर्च करून ‘हिंदुस्तान टाईम्स’मध्ये ११ सप्टेंबर २०१३ रोजी आलेली बातमी दाखवली. युरोपात उद्भवलेल्या आर्थिक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मला वेळ द्या, अशी विनंती श्रीमती मेर्केल यांनी मनमोहन सिंग यांना त्या बातमीत केली होती. त्यानंतर अर्थातच श्री सिंग यांच्या बरोबर त्यांनी चर्चाही केली होती, असा उल्लेख त्या बातमीत होता.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
ती बातमी बघून अच्युत खूप चिडला.
अच्युत - खोटी आहे ती बातमी.
समर - म्हणजे पेपरमध्ये आलेली बातमी खोटी आणि ‘न्यू यॉर्क टाईम्स’मध्ये न आलेली बातमी खरी?
अविनाश - त्या मनमोहन सिंगाला काही येत नव्हते.
भास्कर - कमाल आहे! बरं ते जाऊ द्या. मोदीजींबद्दल आलेली अशा स्वरूपाची एक तरी बातमी दाखवा.
अच्युत - मोदीजींशी सगळे जण गुप्त चर्चा करतात. त्याच्या बातम्या कशा दिल्या जातील?
अविनाश - आजच्या घडीला मोदीजी सगळे जग चालवत आहेत.
तेवढ्यात समरने गूगल सर्च करून एक बातमी काढली. ती २८ जून २०१०च्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’मधली बातमी होती. त्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते - मनमोहन सिंग जेव्हा बोलतात, तेव्हा सगळे जग लक्षपूर्वक ऐकते.
अविनाश - मनमोहन सिंग बोलतच कुठे होते, तेव्हा जगाने त्यांचे ऐकावे?
यावर अच्युत जोरात हसला.
अच्युत - काय शॉट मारला आहेस अविनाश! चेहरे पडले बघ यांचे.
भास्कर - अशा प्रकारची एक तरी बातमी २०१४ नंतर आली आहे असे दाखवा.
(नरेंद्र मोदी २०१४मध्ये सत्तेवर आले होते. - संपादक)
अच्युत - मोदीजी गुप्तपणे चर्चा करतात. सगळे वर्ल्ड लीडर्स त्यांचे ऐकतात. हे सत्य आहे. आणि याबद्दल बातम्या येऊ शकत नाहीत. मोदीजींचे मोठेपण मनायचे असेल तर माना नाहीतर खड्यात जा.
अविनाश - मोदीजी होते म्हणून अमेरिकेला इतिहासात पहिल्यांदा भारताकडून कर्ज घ्यावं लागलं.
भास्कर - कधी घेतलं अमेरिकेने कर्ज?
अच्युत - तुम्ही मोदीद्वेष्टे आहात, तुम्ही कशाला वाचाल अशा बातम्या?
समर – अरे, कधी घेतलं ते सांग ना. अमेरिकेने कर्ज घेतलंच नसेल तर ‘अमेरिकेने भारताकडून कर्ज घेतले नाही’ अशी बातमी येणार आहे का पेपरात?
अच्युत - (फोन दाखवत) हा बघ मेसेज. मोदीजींच्या नेतृत्वात भारताने इतकी प्रगती केली आहे की, अमेरिकेला इतिहासात प्रथमच भारताकडून कर्ज घ्यावे लागले आहे. भरताच्या रिझर्व्ह बँकेने १८२ अब्ज डॉलरचे कर्ज अमेरिकेला दिले. त्या बदल्यात अमेरिकेने त्यांचे बाँड भारताकडे ठेवायला दिले आहेत. मोदी हैं तो मुमकिन हैं!
यावर भास्कर हसायला लागला. अविनाश चिडला.
अविनाश - हसतोस काय? केवढी मोठी घटना घडली आहे आणि दात काय काढतो आहेस?
भास्कर - तुमचा बंगला विकला तेव्हा त्या पैशातून तुम्ही आरबीआयचे बाँड घेतले होते ना?
अविनाश – हो, एक कोटी रुपायचे बाँड घेतले होते, इन्कम टॅक्समध्ये सूट मिळावी म्हणून. आमच्या सीएनं सांगितलं होतं तसं करायला.
भास्कर - म्हणजे तुमची गरज होती म्हणून तुम्ही बाँड घेतलेत.
अविनाश - हो.
भास्कर - म्हणजे तुम्हाला आरबीआयला कर्ज वगैरे दिलं नव्हतंत?
अविनाश - आम्ही कोण आरबीआयला कर्ज देणार?
भास्कर - पण आरबीआयने तुम्हाला त्या बाँडवर व्याज दिलं असेलच.
अविनाश – हो, दिलं की.
भास्कर - म्हणजे तू एका अर्थानं म्हणू शकतोस की, मी आरबीआयला कर्ज दिलं.
अविनाश – हो, म्हणू शकतो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
भास्करने त्यावर २१ ऑगस्ट २०२०च्या ‘इकॉनॉमिक टाईम्स’मधली बातमी दाखवली. त्या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेने १२.८ अब्ज डॉलर्सचे अमेरिकेचे सरकारी बाँड घेतल्याची बातमी होती. रिझर्व्ह बँकेकडे गंगाजळी वाढली म्हणून तिने अमेरिकेच्या बाँडमध्ये गुंतवला होता. गरज पडेल तेव्हा लगोलग तो पैसा उपलब्ध व्हावा, अशी रिझर्व्ह बँकेची इच्छा होती. आता अमेरिकेच्या बाँडमधली भारताची एकूण इनव्हेस्टमेंट १८२ अब्ज डॉलर झाली होती.
अच्युत – बघ, म्हणजे कर्ज चढले आहे ना अमेरिकेवर?
त्यावर समर हसायला लागला.
अच्युत - दात नको काढूस.
भास्कर - हसू नको तर काय करू? तुम्ही तुमचा पैसा सुरक्षित राहावा आणि पाहिजे तेव्हा लगेच परत मिळावा म्हणून अमेरिकेकडे ठेवायला देताय आणि म्हणताय आम्ही अमेरिकेवर कर्ज चढवले.
समर - ते कशाला घेतील कर्ज तुमच्याकडून?
अविनाश - पैशाची गरज सगळ्यांना पडते.
भास्कर - हे बघ असं आहे की, अमेरिकेची अर्थव्यवस्था २३ ट्रिलियन डॉलरची आहे. आणि आपली आहे २.३ ट्रिलियन डॉलरची. ते कशाला आपल्याकडून पैसे घेतील?
समर - तुला सोप्या भाषेत सांगतो. तुझ्या शेजारी एक घर आहे. त्यांच्याकडे २३ लाख रुपये आहेत. त्या घरात तीन माणसे आहेत. तुझ्या शेजारी दुसरे घर आहे. त्यांच्याकडे २.३ लाख आहेत आणि त्यांच्या घरात १३ माणसे आहेत. या दुसऱ्या घराकडून पहिल्या घरातील लोक कशासाठी कर्ज घेतील?
भास्कर - शिवाय एक लक्षात घे, अमेरिका गरज पडेल तेवढे डॉलर छापू शकते. तुम्ही कितीही रुपये छापू शकत नाही. त्यांच्या डॉलरला जगभर डिमांड आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास आहे.
अच्युत - भारत का नाही छापू शकत पाहिजे तेवढे रुपये?
अविनाश - आता मोदी आलेत म्हणून बसेल भारतावर जगाचा विश्वास.
भास्कर – अरे, २ लाख आणि १३ लोक असलेले घर मोदीजींनी चालवायला घेतले म्हणून ते २२ लाखवाल्या घराला कर्ज कसे देऊ शकतील?
अविनाश - का नाही देऊ शकणार? तुमचे निगेटिव्ह थिंकिंग आहे ते हेच.
भास्कर - आता यात काय निगेटिव्ह थिंकिंग आले?
अविनाश - पॉझिटिव्ह थिंकिंगचे पहिले तत्त्व आहे - या जगात आपण प्रयत्न केला तर काहीही करणे पॉसिबल असते.
भास्कर - मग तू दोन वर्षात मुकेश अंबानी एवढा श्रीमंत होऊन दाखव.
(मुकेश अंबानी तत्कालीन भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. - संपादक)
अच्युत – अविनाश, तू या निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नकोस. पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्या लोकांनी निगेटिव्ह लोकांपासून दूर राहावे असेही एक तत्त्व आहे.
अविनाश - (चिडचिड करत) भारताने मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला कर्ज दिलेले आहे. त्याचे व्याज भारताच्या तिजोरीत जमा होणार आहे. विषय संपला. मोदी हैं तो मुमकिन हैं.
समर - (मोबाइलमध्ये बघत) पण मग ती ‘न्यू यॉर्क टाईम्स’मधील बातमी खरी आहे की खोटी?
अविनाश - खरी, खरी खरी! १०० टक्के खरी! अच्युतने सकाळी बघितली आहे कॉम्पवर.
समर - हे बघ, ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने ट्वीट केले आहे - सर्वत्र व्हायरल झालेली मोदीजींविषयीची बातमी आम्ही छापलेलीच नाही म्हणून.
भास्कर - जगात सर्वत्र या बातमीची चेष्टा होत आहे, अशा बातम्या येऊ लागल्या आहेत.
अच्युत – ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने छापली होती ही बातमी. आता काढली असणार आहे. कट आहे मोदीजींविरुद्धचा हा.
अविनाश - आधी बातमी द्यायची आणि नंतर म्हणायचं - आम्ही छापलीच नाही.
अविनाश - हरामखोर आहे ‘न्यू यॉर्क टाईम्स’.
भास्कर - मघाशी हा प्रतिष्ठित पेपर आहे असे तू म्हणाला होतास.
अविनाश - मी असे कधीही म्हणालेलो नाही.
समर - का कुणी मोदी-विरोधकाने व्हायरल केली ही खोटी पोस्ट?
भास्कर - (हसत) केलीही असेल. लिबरल लोक भयंकर चावट आहेत. त्यांना माहीत असतं मोदीजींविषयी काहीही चांगलं लिहिलं की, मोदीभक्त कसलाही विचार न करता ती पोस्ट व्हायरल करतात.
समर - (जोरात हसतो.)
अच्युत - आम्ही पूर्ण विचार करून पोस्ट करतो, जे काही पोस्ट करायचे आहे ते.
अविनाश - हा ‘न्यू यॉर्क टाईम्स’चाच कट असणार. त्यांना सहन नाही झालं की, मोदीजींच्या भारतानं अमेरिकेला कर्ज दिलं आहे ते.
अच्युत - मोदीजी आहेत म्हणून आज आपण हे दिवस बघत आहोत.
भास्कर - कसले दिवस?
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अच्युत - आज ‘न्यू यॉर्क टाईम्स’ला मोदीजींविरुद्ध कट करायला लागतो आहे.
अविनाश - नाहीतर पूर्वी मनमोहन होते, तेव्हा तोंडदेखलं चांगलं लिहून बोळवण करायचे.
भास्कर - मोदीजी परत निघाले, तेव्हा त्यांना निरोप द्यायला एकसुद्धा अमेरिकन आला नाही म्हणे.
अच्युत - कशाला येतील? आपल्या देशाला कर्ज घ्यायला लावणाऱ्या माणसाचा राग येणारच अमेरिकेला.
अविनाशने रागाच्या भरात स्कूटर चालू केली आणि चहाचे बिल न देता अच्युत आणि अविनाश एका क्षणात निघून गेले. जाताना अच्युत मागे बघून ओरडत होता – ‘तुम्ही कितीही बडबड केलीत तरी आयेगा तो मोदीही!’
..................................................................................................................................................................
खरं तर ती पोस्ट कुणी व्हायरल केली होती, हे आजपर्यंत कुणालाही कळलेले नाही. मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या माहिती आणि प्रसारण विभागाने ही पोस्ट व्हायरल केली, असा संशय पहिल्यांदा व्यक्त केला जात होता. पण जसजशी त्या पोस्टची जगभर चेष्टा व्हायला लागली, तसतशी ती पोस्ट मोदीविरोधकांनी व्हायरल केली, अशी चर्चा सोशल मीडियावर व्हायरला व्हायला लागली. या पोस्टसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माहिती विभागाने पहिला बेत उलटल्यावर व्हायरल केल्या, अशीही चर्चा पुढे झाली. सोशल मीडिया नावाच्या समुद्राच्या पोटात नक्की काय घडते आहे, हे कळणे त्या काळी अगदीच अशक्य होते. त्यामुळे कुठल्याही पोस्टच्या खरे-खोटेपणाविषयीसुद्धा काहीही कळणे त्या काळी अगदीच अशक्य होते. पुढे तंत्रज्ञान सुधारले आणि कुठलीही पोस्ट खोटी असेल तर परस्पर ‘फॅक्ट चेक’ होऊन आपोआप डिलीट व्हायला लागली. पण ही सुधारणा २०४२मध्ये झाली. या सुधारणेनंतर जगभरचे राजकारण एकदम सुधारले. ‘लोकशाही-विरोधी’ नेत्यांना खोट्या गोष्टी पसरवून सत्ता काबीज करणे या सुधारणेनंतर अगदीच अशक्य झाले. आपण किती सुखी काळात राहतो, ही भावना आज २१२१ साली या ‘शिरोजीच्या बखरी’मुळे आपल्या मनात पुन्हा पुन्हा तीव्र होत राहाते आहे.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment