गांधी : नाकारता येतो, धिक्कारताही येतो, पण तरीही आडवा येतोच!
सदर - गांधी @ १५०
राम जगताप
  • महात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Wed , 22 February 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं काल व आजपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. कारण २२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन आहे. या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर यापुढे दर महिन्याला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जाईल…

---------------------------------------------------------------------------------------

गांधीजी म्हणत मी १२५ वर्षं जगणार आहे, पण दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर जेमतेम वर्षभरातच त्यांची हत्या झाली. गांधीजींविषयी आजवर जगभरच्या पत्रकार, लेखकांनी आणि त्यांच्या सहवासातल्या अधिकारी व्यक्तींनी असंख्य पुस्तकं लिहिली आहेत, आजही त्यांच्याविषयी लिहिलं जात आहेच.  गांधीजी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचं गारूडच असं आहे की, त्याची मोहिनी भल्याभल्यांना पडल्यावाचून राहत नाही.

सत्याग्रह आणि अहिंसा या दोन शस्त्रांच्या बळावर गांधीजींनी बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी लढा दिला. तिला सळो की पळो करून सोडलं. सत्याचा आग्रह आणि अहिंसात्मक कृती या दोन गोष्टी गांधीजींनी भारतीय राजकारणात आणल्या, तशाच त्या भारतीय जनामानसातही रुजवण्याचा प्रयत्न केला. गांधीजींचे गुरू नेक नामदार गोखले म्हणत माणसाला सज्जनपणा न सोडता राजकारण करता आलं पाहिजे. तसं त्यांनी स्वत:च्या कृतीतून दाखवूनही दिलं. गांधीजींनी त्यांचाच वारसा पुढे चालवला. भारतीय राजकारणाला त्या दिशेनं वळण देण्याचा प्रयत्न केला.

गांधीजी म्हणतात - ‘‘सत्य आणि अहिंसेच्या मार्गाला वस्तऱ्यासारखी तीक्ष्ण धार असते. दैनंदिन आहारापेक्षा देखील तिचे रोजचे आचरण अधिक महत्त्वाचे असते. योग्य आहाराने शरीराचे पोषण होते, अहिंसा योग्य रीतीने आचरली तर आत्म्याचे सामर्थ्य वाढते... अहिंसा हे आत्म्याचे अन्न असल्यामुळे ते सतत घेणेच योग्य असते. त्या बाबतीत तृप्ती ही होऊच शकत नाही... अहिंसेचे पहिले पाऊल घालणे म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनात परस्परांच्या बद्दल सत्यवादित्व, नम्रपणा, सहिष्णुता आणि प्रेमळ दयाभाव यांची जोपासना करणे होय.’’

नेमस्तपणा आणि जहालपणा हे दोन्ही उपाय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अपुरे आहेत, हे गांधीजींनी ओळखलं असावं, म्हणून त्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला. कारण नेमस्तपणाला सर्वसामान्यांचा फारसा पाठिंबा मिळत नाही. त्यांना तो नेभळटपणा वाटतो. तर जहालपणातल्या क्रांतिकारकात्वामुळे त्यात सर्वांचंच जगणं पणाला लागतं. त्यामुळे सर्वसामान्यांना हाही पर्याय मानवत नाही. शिवाय सामान्यांचं समुदायात रूपांतर झालं की, त्यांची झुंड व्हायला वेळ लागत नाही. अशा झुंडीकडून काही सकारात्मक कृती घडवून आणायची असेल तर अहिसेंचं आचारशास्त्रच नितांत निकडीचं ठरतं. गांधीजींनी याच शस्त्राचा नेमकेपणानं वापर करत तमाम भारतीयांना स्वातंत्र्यलढ्याशी जोडून घेतलं. ब्रिटिश सत्तेपुढे आपलं काहीच चालत नाही, या विचारानं नैराश्य आलेल्या, तिच्या जोर-जुलमानं असहाय्य झालेल्या भारतीय जनतेमध्ये गांधीजींनी चैतन्य निर्माण केलं. बलिदानाच्या प्रेरणेनं शहरं आणि खेड्यापाड्यांतील लाखो लोक गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीत सहभागी झाले. त्यातून अहिंसक प्रतिकाराची एक तेजस्वी परंपरा निर्माण झाली.

त्याविषयी रवींद्रनाथ टागोर एके ठिकाणी म्हणतात - ‘‘मानवजातींमधील युद्ध हे जरी धर्मयुद्ध किंवा नैतिक स्वरूपाचे युद्ध म्हणून मानले गेले असले तरी, या धर्मयुद्धातही निर्दयतेचा अंगीकार केल्यावाचून चालत नाही हे आम्हाला गीतेत आणि महाभारतातही ठिकठिकाणी दृष्टोपत्तीस येते. आता त्यामध्ये शारीरिक शक्तीला स्थान आहे किंवा कसे यासंबंधीच्या शास्त्रात आम्हाला या ठिकाणी शिरण्याचे कारण नाही. परंतु त्याचे उलट हा जो एक नीतिधर्म की, ‘आम्ही मरू पण मारणार नाही; आणि याच मार्गाने विजय संपादन करू’ हा मात्र आम्हाला एखाद्या महावाक्याप्रमाणे वाटल्यावाचून राहावत नाही. किंबहुना ही संदेशवाणी आहे...असल्या प्रकारचे धर्मयुद्ध हे बाह्यजग जिंकण्याकरता नसते, तर युद्धात हार खाल्ल्यानंतरही परत विजयश्री संपादन करण्याकरता असते. अधर्मयुद्धात मरण येणे म्हणजे खरोखरीच मरणे. धर्मयुद्धात मात्र मेल्यावरही काही बाकी शिल्लक उरते; ती म्हणजे पराजयापलीकडल जय, आणि मृत्यूच्या पलीकडील अमृतत्व! ज्यांनी या तत्त्वाचा आपल्या जीवनात साक्षात्कार करून घेऊन त्याचा पूर्ण अंगीकार केला, त्याचे म्हणणे आम्हाला मान्य केल्यावाचून गत्यंतरच नाही!’’

गांधीजींच्या अहिंसात्मक संघर्षाच्या या अभिनव मार्गानं जगाचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकेतील निग्रो, पोलंडचे कामगार, फिलिपाइन्सची जनता यांनी गांधीजींच्या याच मार्गाचा स्वीकार करत आपलं स्वातंत्र्य मिळवलं. १९८२ साली जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट जगभर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा जगाचं लक्ष गांधीजींचं जीवन आणि शिकवण यांकडे गेलं. पण याचबरोबर गांधीजींच्या विचारांवर तेवढीच टीकाही होत आली आहे. अहिंसा म्हणजे नेभळटपणा, दुर्बलपणा असं तर गांधीजींच्या हयातीतच म्हटलं गेलं होतं. गांधीजींनी त्याला सडेतोड उत्तरही दिलं होतं. व्यक्तिगत पातळीवर अहिंसेचं पालन ठीक आहे, पण सामुदायिक पातळीवर ते कसं शक्य आहे, यासारखे प्रश्नही सुरुवातीपासून उपस्थित केले जात आहेत.

त्याविषयी गोपाळराव कुळकर्णी ‘गांधीवादावरील काही आक्षेप’ या आपल्या १९४४ सालच्या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात -‘‘अहिंसा जर व्यक्तिजीवनाला उन्नत करणारं तत्त्व आहे, तर ते समाजजीवनालाही पोषक होणारच. अहिंसा जर व्यक्तीला शक्य आहे तर ती समाजालाही विशिष्ट प्रमाणात शक्य होणारच. महावीर, बुद्ध किंवा येशुख्रिस्तासारख्यांनी अहिंसेचं उच्चतम आचरण केलं. अहिंसेची तेवढी मात्रा समाजाला शक्य झाली नाही तरी समाजाला उपकारक वस्तु अहिंसाच राहणार. गांधीवादात सामाजिक अहिंसेचं जे स्वरूप आखलेलं आहे ते महावीर किंवा ख्रिस्ताच्या कोटीच्या अहिंसेचं नसून कोणताही पामर समाज झेलू शकेल इतकं सोपं आहे.’’

गांधीजींनी अहिंसा आणि सत्य या शस्त्रांचा सत्तापरिवर्तनासाठी वापर करायचा ठरवला तेव्हा जगभर हिंसेचा न्याय प्रस्थापित झालेला होता. फॅसिझम, भांडवलशाही, साम्राज्यशाही, वसाहतवाद, वर्णवाद, वंशवाद, पंथवाद यांचा बोलबाला होता. अशा काळात साध्याइतकंच साधन महत्त्वाचं आहे हे सांगत गांधीजींनी हिंसेचा मुकाबला अहिंसेनंच केला जाऊ शकतो, या तत्त्वाचा हिरीरीनं पुरस्कार केला. इतकंच नव्हे तर त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं. त्यांच्या या निश्चयात विलक्षण धैर्य होतं, ठासून भरलेला आत्मविश्वास होता आणि तत्त्वाशी असलेली असिधाराव्रताच्या तोडीची बांधीलकी होती.

गांधीजींनी आपल्या आत्मचरित्राला ‘सत्याचे प्रयोग’ असं विज्ञानयुगाला साजेसं असं नाव दिलं. आयुष्यभर ते सत्याचे प्रयोग करत राहिले. सत्याला वेगवेगळ्या पद्धतीनं भिडत, भेटत राहिले. त्यामुळे त्यांचं पहिल्यापासून असं मत होतं की, जे एकाला शक्य आहे ते सर्वांना शक्य आहे. आणि ते त्यांनी बऱ्याच प्रमाणात सिद्धही करून दाखवलं.

‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात शेवटी गांधीजी म्हणतात - ‘‘शस्त्रयुद्धाने सारे जग जिंकण्यापेक्षा मनाचे विकार जिंकणे मला अधिक कठीण वाटते. हिंदुस्थानात आल्यानंतरसुद्धा माझ्यामध्ये दडून राहिलेले विकार माझ्या उघडकीला आले आहेत. त्याची मला शरम वाटत आहे, पण मी प्रयत्न मात्र सोडत नाही. सत्याचे प्रयोग करताना मला रसाचे घुटके मिळाले आहेत, आजही मिळत आहेत. मला माहीत आहे, की मला अजून कठीण मार्ग कापायचा आहे. त्यासाठी मला शून्यवत बनले पाहिजे. मनुष्य जोपर्यंत आपण होऊन स्वत:ला सर्वांच्या शेवटी नेऊन बसवीत नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. अहिंसा ही नम्रतेची पराकाष्ठा होय; आणि या नम्रतेविना मुक्ती कधी काळी शक्य नाही, ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे.’’

गांधीजींना काही लोक आध्यात्मिक, अलौकिक पुरुष मानतात. प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी ‘गांधी ही व्यक्ती नसून चमत्कृति आहे’ असं म्हटलंच आहे. गांधीजींना ‘महात्मा’ अशी पदवीही त्यांच्या हयातीतच दिली गेली. पण ती त्यांना मान्य नव्हती. आपण संत आहोत, देवाचे अवतार आहोत, या भाकडगोष्टींवर तर त्यांचा काडीमात्र विश्वास नव्हता. आध्यात्मिक विशेषणाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गांधीजींच्या दृष्टीनं आध्यात्मिकता म्हणजे नैतिकता होती. त्या नैतिकतेला सत्याचं, विवेकाचं अधिष्ठान होतं. म्हणूनच तर जगभरातल्या अनेक देशांचे, तेथील नेत्यांचे आणि जनतेचे गांधीजी स्फूर्तिस्थान होते, आहेत आणि राहतील. गांधीजींचा विचारवारसा माहीत नाही असा जगातील एकही देश नाही.

गांधीजींच्या निधनानंतर जगभरातून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. हिंदुस्थानचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन म्हणाले की - ‘गांधीजींसारखा पुरुष जगाला कित्येक शतकातही दिसणार नाही. आता फक्त त्यांच्या तत्त्वाचं आचरण झालं तर जगाचं दु:ख कमी होण्याचा संभव आहे.’

आपल्या आजूबाजूला आणि जागतिक पातळीवर आजही जे संघर्ष पाहायला मिळत आहेत, ते पाहता गांधीजी, त्यांचं तत्त्वज्ञान ही संबंध जगासाठीच नितांत निकडीची गोष्ट आहे, याची साक्ष पटल्यावाचून राहत नाही. पुन्हा एकदा वर्णवाद, वंशवाद, पंथवाद यांनी जगाचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. अशा वेळी गांधीजींच्या तत्त्वविचारांशिवाय तरणोपाय नाही.

गांधींना नाकारता येतं, धिक्कारताही येतं, पण तरीही सन्मार्गाचा, चांगुलपणाचा, माणुसकीचा, उदात्तेचा, नि:स्वार्थतेचा, स्वावलंबनाचा, शारीरिक कष्टांचा, शांतीचा, सुख-समृद्धीचा, ऐशोषारामाचा, भ्रष्टाचाराचा, अन्याय-अत्याचाराचा, नीतीमत्तेचा, लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा, देशभक्तीचा, परमत सहिष्णुतेचा विषय आला की, गांधी आडवे येतात. मार्ग दाखवतात. गांधी शाश्वताचा यात्रिक आहेत, ते कायम आपल्यासोबतच राहू इच्छितात. भलेही मग आपण त्यांच्या सोबत असू नसू, त्यांचे समर्थक असू नसू. गांधी ही अशी सावली आहे, जी आपल्याला आपल्यापासून कधीच झटकून टाकता येत नाही, वेगळी काढता येत नाही.

editor@aksharnama.com

Post Comment

Harish Navale

Fri , 22 February 2019

राजकारणात गांधीना स्वीकारून पुढे जावे लागते. आणि समाजकारणात नाकारून. हे भारताचे वैशिष्ट्य आहे. म्हणून गांधीवाद आडवा येतो हे योग्य. राजकारणात bjp गांधी स्वीकारून पुढे जाते आहे पण त्यांच्या सोबत असलेले समाजकारण गांधी नाकारते. हेच आंबेडकर वाद्यांचे देखील आहे. आणि काँग्रेस चे देखील. करण एकच आहे , गांधींनी स्वीकारलेला आयाम कोणी ध्यानात घेत नाही. तो भौतिक नव्हता तर भारतीय पध्द्तीचा अध्यात्मिक होता. त्यांना नकार येतो तो भौतिकतेतून. हे गांधी जाणत होते.


megha dhavale

Thu , 23 February 2017

सुमार लेख. "१९८२ साली जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट जगभर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा जगाचं लक्ष गांधीजींचं जीवन आणि शिकवण यांकडे गेलं." अॅटनबरोच्या चित्रपटामुळे गांधी जगभर पोचले, हा आपला अनुभव म्हणावा की निरीक्षण की आपल्या जगाची मर्यादा? "पण याचबरोबर गांधीजींच्या विचारांवर तेवढीच टीकाही होत आली आहे. अहिंसा म्हणजे नेभळटपणा, दुर्बलपणा असं तर गांधीजींच्या हयातीतच म्हटलं गेलं होतं. गांधीजींनी त्याला सडेतोड उत्तरही दिलं होतं. व्यक्तिगत पातळीवर अहिंसेचं पालन ठीक आहे, पण सामुदायिक पातळीवर ते कसं शक्य आहे, यासारखे प्रश्नही सुरुवातीपासून उपस्थित केले जात आहेत."- बरं, गांधींजींनी दिलेली सडेतोड उत्तरं उदाहरणादाखल तरी लिहायची की हो! निव्वळ टीका झाली, उत्तरं दिली, ही माहिती संपादकांकडून आम्हाला कशाला हवी आहे महाशय!


Saee Kodolikar

Wed , 22 February 2017

उत्कृष्ट लेख. शेवटचा परिच्छेद मर्मग्राही आहे. पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......