शब्दांचे वेध : पुष्प एकोणपन्नासावे
आजचे शब्द : Zenzizenzizenzic, Polymth, Inchoate
मी एक ‘अ-गणित’ माणूस आहे. म्हणजे ज्याला गणितातलं ओ की ठो काही कळत नाही, असा ठोंब्या. पण तरीही मी आज गणितावर लिहिणार आहे. त्यामुळे चूकभूलद्यावीघ्यावी, ही विनंती.
गणित आणि माझा अगदी सुरुवातीपासूनच छत्तीसचा आकडा आहे. प्राथमिक शाळेत शिकलेल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या प्रक्रिया, तसंच एक ते दहापर्यंतचे पाढे, या पलीकडे माझी या विषयात फारशी प्रगती कधी झालीच नाही. माझ्या सर्व शिक्षकांनी आणि आई-वडिलांनी जंग जंग पछाडूनही मी गणितात जवळपास कोराच राहिलो. शाळेत यासाठी अनेकदा सपाटून मारदेखील खाल्ला. पण वार्षिक परीक्षेत (इतर विषयांत चांगले गुण मिळत असल्यामुळे बहुधा माझ्यावर दया दाखवून) मला गणितात वरपास करून दरवर्षी पुढे ढकललं जात असे. हा सिलसिला पाचवी ते आठवी चालला. नववीत आम्हाला गणिताऐवजी जीवशास्त्र हा पर्यायी विषय निवडता येत होता. त्यामुळे या सुवर्णसंधीचा लगेच फायदा घेऊन मी गणिताला कायमचा रामराम ठोकला.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
गणिताला माझ्याशी काय दुश्मनी होती, हे मला आजवर कळलेलं नाही. पण मीही यथावकाश त्याच्यावर सूड उगवलाच. तुझ्यावाचून माझं काही अडत नाही, हे गणिताला दाखवून देण्यासाठी मी एका गणितज्ञ मुलीशी लग्न केलं. आपला नवरा गणितात ‘सब-झीरो’ आहे, हे तिच्या बरंच उशीरा लक्षात आलं, पण इलाज नव्हता.
ते असो. मी गणित शिकत असतानाच्या काही गमतीजमती मला आजही आठवतात. BODMAS हा क्रम ‘बदमाश’ या ‘निमॉनिक’ (mnemonic, स्मृती-सहायक) शब्दानं लक्षात ठेवायचा, हे सरांनी सांगितलं होतं. अल्जेब्रा (बीजगणित) शिकताना माहीत नसलेल्या संख्येसाठी X किंवा क्ष हेच अक्षर का वापरायचं (Q किंवा W का नाही), असा प्रश्न मी वर्गात विचारल्यामुळे ‘निमखेडकर, तू किती आगाऊ आहेस रे!’ असं म्हणून सरांनी मला डस्टर फेकून मारलं होतं. मी काढलेल्या वर्तुळाच्या आणि त्रिकोणाच्या वेड्यावाकड्या आकृत्या बघून माझी वही सर स्टाफ रूममध्ये घेऊन गेले होते आणि तिथे त्यांनी सहकारी मित्रांच्या मनोरंजनासाठी त्या वहीचं दोन दिवस खास प्रदर्शन भरवलं होतं, असंही मी ऐकून आहे.
सगळ्यात कहर झाला होता, तो आठवीच्या शेवटी शेवटी. मी पुन्हा एकदा आगाऊपणा करून सरांना दोन प्रश्न भर वर्गात विचारले होते. ‘Vulgar’ या शब्दाचा अर्थ ‘घाणेरडं, गलिच्छ’ असा होतो, हे मला तेव्हा(ही) माहीत होतं. त्यामुळे ‘vulgar fraction’ (व्यवहारी अपूर्णांक) शिकताना हे असे घाणेरडे, गलिच्छ फ्रॅक्शन आम्हाला का शिकवले जातात, हा माझा पहिला प्रश्न होता. आणि ‘raised to the power of’ याला ‘घात’ असं का म्हणतात, हा माझा दुसरा प्रश्न होता. कारण या पॉवरचा हिशोब करता करता विद्यार्थ्यांना त्यांच्या मेंदूवर काहीतरी आघात झाल्यासारखं वाटतं, अशी विनोदी पुस्तीही मी जोडली होती.
सरांनी माझ्याकडे अर्धा मिनिट रोखून पाहिलं आणि मग मला त्यांनी भर वर्गात चांगलाच बुकलून काढला. पु.लं.च्या शब्दांत ‘अगदी कुबल कुबल कुबलला’. बाकीची पोरं फिदी फिदी हसत तो नजारा एन्जॉय करत होते. (एवढं करूनही या प्रश्नांची उत्तरं तेव्हा मिळाली नाहीत, ती नाहीतच. खूप नंतर माझी मीच ती शोधून काढली.)
त्यानंतर काही महिन्यांतच मी गणिताशी कायमची फारकत घेतली. पण गणित येणाऱ्या, गणित शिकवणाऱ्या आणि गणिताचा आनंद घेणाऱ्या लोकांविषयी मला तेव्हापासूनच कायमचं आदरयुक्त कुतूहल वाटत आलेलं आहे. पुढे रामानुजनसारख्या बाप माणसाबद्दल वाचायला मिळालं. अगदी भारावून गेलो मी त्यामुळे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
माझी बायको संजीवनी गणितावर मनापासून प्रेम करते. पण गणितासोबतच भाषा आणि साहित्य यांच्यावरही तितकंच प्रेम असणारे चार वेगळे लोक जेव्हा पुढे माझ्या आयुष्यात आले, तेव्हा तर मी अगदी चकित झालो होतो. यातले दोघं तर आमच्या गावातलेच म्हणजे नागपुरचे आहेत- डॉ. सुभाष पाटील आणि प्रकाश एदलाबादकर. हे माझे दोन्ही सन्मित्र गणितात प्रवीण तर आहेतच, पण त्याचसोबत ते मराठीतले उत्कृष्ट लेखक आणि वक्ते आहेत. पोटापाण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना गणित शिकवलं. आणि भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे साहित्यसेवाही केली. त्यांचं मला फार कौतुक वाटतं. त्यांच्यासारखेच इतर अनेक असे दुपदरी, चौपदरी विद्वान जगात आहेत. पण हे दोघे माझ्या मित्रपरिवारातले असल्यानं मला त्यांचा खास उल्लेख करावासा वाटला.
गणितासोबतच भाषा आणि साहित्य यांच्यावरही तितकंच प्रेम असणारी माझ्या आयुष्यातली तिसरी व्यक्ती म्हणजे रामानुजनसारखाच आणखी एक बापमाणूस Bertrand Arthur William Russell किंवा बर्ट्रंड रसल. अर्थात रसलची माझी ओळख ही त्यांच्या पुस्तकांपुरतीच मर्यादित आहे. १९७० साली ते गेले, तेव्हा मी जेमतेम सातवी-आठवीत होतो. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा काही प्रश्नच नव्हता. पुढे जेव्हा त्यांची पुस्तकं वाचली, तेव्हा या माणसाला ‘polymath’ का म्हणतात, हे समजलं. ‘polymath’ म्हणजे एकाच वेळी अनेक कला आणि शास्त्रांमध्ये पारंगत असलेला अत्युच्च दर्जाचा विद्वान. रसल भाषातज्ज्ञ होते, तत्त्वज्ञ होते, लेखक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गणितज्ञही होते. आणखीही बरंच काही. त्यांनी लिहिलेल्या अनेक मौलिक ग्रंथांमध्ये ‘Principia Mathematica’ या गणितावरील भाष्याचाही समावेश आहे. आल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड हा त्याचा सहलेखक आहे. अनेक लोकांनी हा ग्रंथ वाचला आहे, पण खऱ्या अर्थानं ज्यांना तो समजला, अशांची संख्या फार कमी आहे, असं म्हणतात.
माझा इंग्रज मित्र (आता दिवंगत) टेरी उर्फ टेरेन्स मॉर्ड्यू हा या फार थोड्या विद्वानांपैकी एक होता. टेरी एक गज़ब की चीज होती. एकदा नाही तर अनेकदा जगभर हिंडलेला आधुनिक पॉलीमॅथ म्हणजे टेरी. त्याला काय येत होतं, हे विचारण्यापेक्षा त्याला काय येत नव्हतं, हे विचारा. पंधरा-वीस भाषा त्याला मातृभाषेसारख्या अवगत होत्या. पेशानं तो सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) होता. त्याशिवाय संगीत, ऑपेरा, संगणक आणि मुख्य म्हणजे गणित, तर्कशास्त्र, आणि तत्त्वज्ञान हे त्याच्या आवडीचे विषय होते. इंग्रजीचं व्याकरण, पी. जी. वुडहाऊस, जेन ऑस्टेन, ब्रिटनचा सामान्य इतिहास, ब्रिटिश लष्कराचा इतिहास यांच्यावर तो अधिकारवाणीनं लिहीत-बोलत असे. इतरही अनेक गुण त्याच्या अंगात होते. अशा
या हरहुन्नरी टेरीनं रसलचं ‘Principia Mathematica’ अनेक वेळा वाचलं होतं आणि त्यावरही तो भाष्य करायचा.
मला गणित न येण्याचं वैषम्य मी या माझ्या आयुष्यातल्या पाच व्यक्तींकडे बघून अप्रत्यक्षपणे दूर करत असतो.
आज हे सगळं पुराण सांगण्याचं कारण म्हणजे आपला आजचा पहिला शब्द गणिताशी संबंधित आहे. या लेखमालेची सुरुवात मी ‘Zugunruhe’ या जर्मन शब्दानं केली होती. आज पुन्हा एकदा झेडची बारी. हा शब्द आहे - Zenzizenzizenzic. या इंग्रजी शब्दाचा उच्चार zens-is-ens-iz-ens-ic (झेन्सिसेन्सिझेन्सिक किंवा झेंझीझेंझीझेंझिक) असा होतो.
झेन्सिसेन्सिझेन्सिक म्हणजे काय? ही गणितातली एक संज्ञा आहे. एखाद्या संख्येला त्याच संख्येनं एकदा गुणलं तर येणाऱ्या फलसंख्येला आपण स्क्वेअर किंवा वर्ग म्हणतो. दोनदा गुणलं तर येणारी फलसंख्या क्यूब किंवा घन असते. याच्यापुढच्या सगळ्या अशाच फलसंख्यांना मराठीत घात आणि इंग्रजीत ‘raised to the power of’ असं म्हणतात. उदाहरणार्थ, 2 raised to the power of 4 किंवा दोनचा चतुर्थ घात म्हणजेच २ x २ x २ x २ = १६ असं उत्तर येतं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
याच प्रकारे दोन या संख्येचा आठवा किंवा अष्टम घात काय होईल?
२ x २ x २ x २ x २ x २ x २ x २ = २५६.
तर हा जो अष्टम घातांक किंवा 2 raised to the power of 8 ची संख्या आहे, तिला इंग्रजीत एक खास शब्द आहे, आणि तो म्हणजे ‘झेन्सिसेन्सिझेन्सिक’.
यावर अधिक काही लिहिण्याआधी हे सांगायला हवं की, हा काही रोजच्या वापरातला शब्द नाही. इतकंच नव्हे तर एक ऐतिहासिक भाषिक ठेवा (historic linguistic curiosity) या पलीकडे त्याला कोणतीही किंमत नाही. तो ना कोणी उपयोगात आणत, ना कोणाला त्याची आठवण येते. खूप थोड्या शब्दकोशांत तुम्हाला त्याची नोंद सापडेल. आतापर्यंत फारच थोड्या ठिकाणी तो वापरला गेला आहे. त्यानंतर तो कधीचाच बाद झाला. त्यामुळे तुम्हाला तो माहीत नसेल तर उगीच दुःख करून घेऊ नका.
१५५७मध्ये रॉबर्ट रेकॉर्ड (Robert Recorde) या वेल्श गणितज्ञानं लिहिलेल्या ‘The Whetstone of Whitte’ या ग्रंथात या शब्दाची पहिली नोंद आढळते. कारण रॉबर्ट रेकॉर्ड हाच त्याचा जनक होता. त्यानं त्याचं स्पेलिंग ‘zenzizenzizenzike’ असं केलं होतं. त्याच्या शब्दांत ‘zenzizenzizenzike doeth represent the square of squares squaredly’.
या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे- लॅटिन भाषेतल्या ‘census’ या शब्दापासून इटलियन भाषेत ‘censo’ हा शब्द तयार झाला आणि त्यापासून पुढे जर्मन भाषेत ‘zenzic’ हा धातू बनला, ज्यातून आपला हा इंग्रजी शब्द तयार केला गेला. इटलियन भाषेत ‘censo’चा खरा अर्थ स्क्वेअर म्हणजे चौरस हा आकार. आणि असं मानलं जातं की, लॅटिन ‘census’ हा जरी त्याचा नातलग असला तरी त्याचा मूळ आधार अरेबिक भाषेतला ‘माल’ हा शब्द आहे.
भारतात आपण माल हा शब्द ‘सामान, चीजवस्तू, धनदौलत’ या अर्थानं सर्रास वापरतो. कोणे एके काळी भारतीय आणि युरोपिअन लोकांप्रमाणेच अरबी लोकदेखील फार निष्णात गणितज्ञ होते. शून्याचा (झीरोचा) शोध भारतात लागला खरा, पण आज जगभर १ ते ९ हे जे आकडे वापरले जातात, ते अरबांनीच पहिल्यांदा तयार केले आहेत.
या शब्दाचा आणखी एक अर्थ अरेबिक भाषेत होतो, तो म्हणजे कोणत्याही संख्येचा वर्ग (स्क्वेअर). या ‘वर्गा’तून एखाद्या वस्तूच्या, विशेषेकरून जमिनीच्या आकारमानाची कल्पना करता येते, असा या जुन्या अरबांचा समज होता. हा अरबी ‘माल’ इटलिअन भाषेत ‘censo’ बनून आल्यावर त्या लोकांनी त्यावर अनेक प्रयोग केले. त्यातला एक म्हणजे ‘censo di censo’ किंवा चतुर्थ घात किंवा वर्गाचा वर्ग (square of a square). म्हणजेच ‘zenzizenzic’.
Leonardo of Pisaनं १२०२मध्ये लिहिलेल्या ‘Liber Abaci’ या प्रसिद्ध ग्रंथात ‘censo di censo’ ही संज्ञा पहिल्यांदा वापरली होती. जर्मन भाषेत या इटलियन ‘censo’चा ‘zenzic’ बनला आणि गणितातली पॉवर (घात) अशा अर्थानं तिथे वापरला जाऊ लागला. याच जर्मन ‘zenzic’ आणि ‘zenzizenzic’पासून इंग्रजीत नंतर ‘zenzizenzizenzic’ हे रूप बनलं.
आजच्या काळात आपण कोणत्याही संख्येचा घात superscript म्हणजेच शिरांक किंवा शीर्षांक लिहून दाखवतो. उदाहरणार्थ, 106 म्हणजे ten raised to the power of six. परंतु पूर्वी हेच 10 x 10 x 10 x 10 x 10 x 10 (= 1,000,000) असं लिहावं लागायचं, कारण तेव्हा ही superscriptची पद्धत अस्तित्वात आली नव्हती. या जुन्या पद्धतीनं खूप जास्त संख्येची गणितं करणं, हे अवघड आणि किचकट काम होतं. त्यावर उपाय म्हणून ही superscript पद्धत शोधून काढली गेली. त्याच काळात आपला हा शब्द जन्माला आला.
उच्चाराला अतिशय कठीण अशा काही निवडक शब्दांत Zenzizenzizenzicचा समावेश होतो. त्याच्या स्पेलिंगमध्ये सहा Z आहेत, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एवढे सारे झेड एकत्र असणारा हा एकमेव इंग्रजी शब्द आहे, असं मानलं जातं. शेक्सपिअरला ‘Z’ या अक्षराची चीड होती. ‘तू अनावश्यक आहेस, तू रांडलेक आहेस’ (Thou whoreson zed, thou unnecessary letter!), अशा शेलक्या शब्दांत त्यानं ‘Z’ची हेटाळणी केली होती. (बघा - किंग लिअर, २.२.६५). त्याच्या रागाचं कारण हा शब्द असावा, असा मला दाट संशय आहे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
या शब्दाच्या धर्तीवर तेव्हाच्या गणितज्ञांनी आणखीही काही संज्ञा तयार केल्या होत्या, पण त्या साऱ्या केव्हाच्याच विस्मृतीत गेल्या आहेत. ‘झेन्सिसेन्सिझेन्सिक’ हा मात्र एकटाच ‘स्मृतीशेष’ बनून शिल्लक राहिला.
..................................................................................................................................................................
‘पॉलीमॅथ’ (polymath) म्हणजे एकाच वेळी अनेक कला आणि शास्त्रांमध्ये पारंगत असलेला अत्युच्च दर्जाचा विद्वान. हा इंग्रजी शब्द ग्रीक भाषेतल्या πολυμαθής (polymathēs किंवा having learned much)पासून बनला आहे. लॅटिनमध्ये homo universalis, universal person म्हणजेच वैश्विक ज्ञान असलेली व्यक्ती, म्हणजेच पॉलीमॅथ. एखादी बिकट समस्या सोडवण्यासाठी असा माणूस आपल्या प्रगाढ ज्ञानाचा वापर करतो. हॅंबुर्ग शहरातल्या Johann von Wowern या जर्मन तत्त्वज्ञानं १६०३ मध्ये De Polymathia tractatio: integri operis de studiis veterum नावाच्या आपल्या ग्रंथात ‘पॉलीमॅथी’चं वर्णन पहिल्यांदा केलं. तो म्हणतो- पॉलीमॅथी म्हणजे “knowledge of various matters, drawn from all kinds of studies ... ranging freely through all the fields of the disciplines, as far as the human mind, with unwearied industry, is able to pursue them.” पॉलीमॅथीमध्ये प्रवीण तो पॉलीमॅथ.
सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात हा शब्द इंग्रजीमध्ये पहिल्यांदा वापरला गेला. ही अशी माणसं खरोखरची जिनिअस असतात. जगभरातल्या अनेक विद्वानांना या उपाधीनं गौरवांकित केलं गेलेलं आहे. कोणकोणत्या भारतीय प्रबुद्धांना पॉलीमॅथ हे विशेषण लावता येईल, असं तुम्हाला वाटतं? एका निर्बुद्धाच्या या शंकेचं समाधान तुम्ही नक्की कराल, अशी खात्री आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आजचा पस्तुरी (lagniappe) शब्द : Inchoate. म्हणजे अर्धोन्मिलित किंवा अपूर्णावस्थेतलं काहीतरी. Imperfectly formed or formulated.
या शब्दाचा उच्चार ‘इन्कोअ(ए)ट’ असा होतो. आपल्या मनात अनेक कल्पना वेळोवेळी येत असतात. त्यातल्या साऱ्याच पूर्णत्वास जातात, असं नाही. पण त्यांच्यावर चिंतन करणं, अमूर्त स्वप्नांना मूर्त रूप कसं मिळेल, यावर विचार करणं, हे काम जवळपास प्रत्येकच व्यक्ती करते. एखादी कळी जशी लहानाची मोठी होते आणि पुढे एक एक पाकळी उमलत जात तिचा पुष्परूपात पूर्ण विकास होतो, तोपर्यंतची ही जी ती अर्धोन्मिलित अवस्था असते, तिला ‘inchoate stage’ असं म्हणतात.
या शब्दाच्या व्युत्पत्तीतला उल्लेखनीय भाग असा आहे की, गाडीला जुंपलेल्या बैलांच्या गळ्याभोवती जो चामड्याचा किंवा दोराचा पट्टा (वादी) बांधलेला असतो, त्यावरून हा शब्द बनला आहे. या वादीला मराठीच्या बोलीभाषांमध्ये अनेक शब्द आहेत. मराठी विश्वकोशात तिला ‘आरूशा’ असं म्हटलेलं आहे. (यवतमाळ जिल्ह्यातल्या) माझ्या गावाकडे तिला शिवळ बेड्डी/बेरडी म्हणतात. काही ठिकाणी जुंपणी, जोत आणि बेल्ड्या असंही म्हणतात. यालाच लॅटिन भाषेत ‘कोहम’ (cohum) असा शब्द आहे. या cohumला in हे पूर्वपद (उपसर्ग) लावून तिथे inchoare हा शब्द तयार झाला. याचा लाक्षणिक अर्थ (कशावर तरी) काम सुरू करणं. पण खरा अर्थ गाडीला किंवा नांगराला बैल जुंपणं.
आता हे बैल असे कशासाठी जुंपतात? एक तर वावर नांगरायला किंवा प्रवासाला जायला. म्हणजेच काही तरी मोठं काम करायला. थोडक्यात, एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात ही अशी बैल जुंपण्यापासून होते. जोवर बैल नीटपणे जुंपले जात नाहीत, तोवर ते काम सुरू झालं असं म्हणता येत नाही. तर हे जे कोणत्याही मोठ्या कामासाठी विचारमंथन करण्याचं पहिलं पाऊल उचललं जातं, ते महत्त्वाचं असतं. ते पूर्ण होत नाही, तोवर ही सगळी तयारी ‘inchoate stage’मध्ये आहे, असं मानलं जातं.
शब्दांची मुळं ही अशी कुठून कुठे पसरली असतात, हे यावरून लक्षात येऊ शकतं.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment