सोयाबीनचा बाजारात नेण्याआधीच बाजार उठलाय... पुराच्या पाण्यात सोयाबीन त्याच्या धन्याला सोबत घेऊन बुडालंय...
पडघम - राज्यकारण
विलास बडे
  • सर्व छायाचित्रे - रमेश भट
  • Mon , 11 October 2021
  • पडघम राज्यकारण मराठवाडा सोयाबीन शेतकरी शेती

हा आहे मराठवाड्यातील पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीचा रिपोर्ताज… आँखो देखा हाल… प्रत्येक नैसर्गिक आपत्तीनंतर मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या गळ्याभोवती आवळला जाणारा फास घट्ट होत जातो, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे त्याला वेळीच मदत मिळायला हवी. आज शेताचा मसणवटा झालाय.…

..................................................................................................................................................................

२८ सप्टेंबरला ड्रोनच्या दृश्यांसह व्हॉट्सअॅपवर बातमी येऊन धडकली. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाची. त्याचे सर्व १८ दरवाजे उघडले होते. ७० हजार ८४५ क्युसेकनं नदीपात्रात पाणी सोडलं. पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांसाठी ही तशी नेहमीची बातमी, पण मराठवाड्यासाठी मात्र धडकी भरवणारी होती. त्याच क्षणी मराठवाड्यातल्या पावसाच्या तांडवाचा अंदाज आला.

मांजरा धरणाचा इतिहास बोलका आहे. १९८०मध्ये धरण कोंडलं गेलं. ४२ वर्षांच्या इतिहासात तिसऱ्यांदा १८ दरवाजे उघडले. याआधी १९८९ आणि २००५मध्ये असं घडलं होतं. बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांची तहान भागवणारं मांजरा धरण नुसतं भरणं हीच ‘ब्रेकिंग न्यूज’ असते. गेल्या दशकभरात कधीतरीच ती ऐकायला मिळाली. धरण कोरडं पडलं म्हणून लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. त्याचा १८ दरवाजांतून असा ऊर फुटला असेल, तर आभाळ किती फाटलं असेल, हे सांगायला हवामान खात्याची गरज नाही. ऑफिसमधल्या रोजच्या बैठकीमध्ये याची दाहकता सांगितली, तेव्हा संपादकांनीही हिरवा कंदील दिला. भल्या पहाटे मराठवाड्याच्या दिशेनं निघालो.

मुंबईपासून साधारण ५०० किलोमीटर अंतरावरच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीच्या काठावरील कळंबच्या दिशेनं कूच केलं. पुरानं वाहून गेलेल्या रस्त्यावरून वाट काढत पोहोचता पोहोचता दिवस मावळतीला गेला. संध्याकाळी ७:३० वाजता ‘लाईव्ह शो’ होता. कळंब शहराच्या बाजूनं वाहणाऱ्या मांजराच्या पात्राजवळ पोहोचलो. समोर होती महापुरानं कवेत घेतलेली, पाण्यात बुडालेली हजारो एकर शेती. मधोमध शांतपणे वाहत असलेली मांजरा नदी आणि पलीकडे पाण्यात बुडणारा सूर्य. दृश्य जितकं सुंदर, तितकंच विदारक.

काही वेळात सूर्यानं निरोप घेतला. अंधार दाटू लागला. अशा वेळी पाण्यात उतरणं शक्य नव्हतं, म्हणून पूर ओसरलेल्या वावरात शिरलो. बाजूलाच एका शेतकऱ्याची काढलेल्या सोयबीनची दहा फूट उंचीची घायाळ गंज उभी होती. पुराच्या तडाख्यातही तग धरून राहिलेली. तिच्यासोबतच्या अनेक गंजींना जलसमाधी मिळालेली. गंजीच्या जवळ जाताच उग्र वास आला. कारण दोन दिवस चार-पाच फूट पाण्यात ती भिजली होती. गंजीत हात घातून चार धाटं उपसली, तर थेट वाफाच निघाल्या. हातात आलेल्या धाटांना शेकड्यानं शेंगा लगडलेल्या, पण पाण्यानं नासून गेलेल्या. शेंगांनाच मोड फुटलेले. म्हणजे मळणी करून बाजारात नेण्याआधीच त्यांचा बाजार उठला होता. पुराच्या पाण्यात सोयाबीन त्याच्या धन्याला सोबत घेऊन बुडालं होतं. हे सगळं बघणं, लाईट्स लावणं, लाईव्ह करणं सुरू होतं. तोवर एकएक करत शेतकरी जमले.

‘जैसा देस, वैसा भेस’ म्हणत इन केलेला शर्ट बाहेर काढला. एका शेतकऱ्याच्या खांद्यावरचा गमछा गळ्यात घातला. पीसीआरमधून आलेल्या थ्री… टू… वन…च्या कमांडसह शेतीच्या बांधावरून सुरू झाला मराठवाड्याच्या बरबादीचा लाईव्ह पंचनामा.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बाळासाहेब धस नावाचे शेतकरी बोलले. त्यांच्या आवेशपूर्ण शब्दांनी अंगावर काटा आला.  ते म्हणाले, “या वर्षी जून महिन्यापासून चांगला पाऊस झाला. असं वाटत होतं साल चांगलं लागलं. आम्ही २४-२४ तास शेतात राबराब राबलो. सोयाबीनही दृष्ट लागावं असं खुलत होतं. वाटलं यंदा कष्टाचं सोनं झालं. आपण सुखानं सणवार करू. घरदार लखलखून जाईल. लेकरा-बाळांना चार कापडं आणू. पण २० सप्टेंबरपासून अचानक वारं फिरलं. सोयाबीन काढणीला आलं आणि एवढा पाऊस लागला की, त्यानं सगळं धुवून गेलं. आमचं सोयाबीन, आमची स्वप्नं आणि शेतंही धुवून नेली. आमच्या आनंदावर नांगर फिरवला. लेकरा-बाळाचा घास गेला.” शेतकऱ्यांचा आक्रंदणारा आक्रोश अस्वस्थ करणारा होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरमध्ये पोहोचलो. चॅनेलवाले आलेत, ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. येडगेमामाच्या शेतात गाव गोळा झाला. एका आशेनं, आपलं शेत टीव्हीवर दाखवल्यावर तरी कुणी पंचनाम्याला येईल, मदत करेल म्हणून. शेतकरी हाताला धरून धरून विनंती करू लागले- ‘एकदा माझ्या शेतात चला. बघा आणि दाखवा सरकारला. शेतात काहीच उरलं नाही. आमच्याकडे कुणीच आलेलं नाही.’

उथळ पात्राच्या तेरणेला महापूर आला होता. नदी पात्र सोडून उभ्या पिकातून वाहिली. पुराच्या पाण्यानं काठावरची हजारो एकर शेती वाहून नेली, अगदी मातीसकट. तेरणेच्या काठावर जिकडे बघावं तिकडे, गुडघाभर पाण्यानं डबडबलेली सोयाबीनची शेती. जमलेले शेतकरी सांगत होते- ‘हे काहीच नाही. याच्यापुढे अजून भयानक परिस्थिती आहे.’ जिथवर जाणं शक्य आहे, तिथवर आम्ही जात होतो. चिखलात चप्पल, बुटानं पावलं टाकणं शक्य होईना. म्हणून त्यांना रामराम करत नागव्या पायांनीच चिखल तुडवत पंचनामा सुरू केला. ब्रॅंडेड शूजच्या कुशननं सोकावलेल्या पायांना खडे, काटे रूतत होते. ते जणू जाणीव करून देत होते नागव्या पायांनी रोज राबणाऱ्या पोशिंद्याची व्यथा. 

तेरमधल्या बालाजी देशमुखांनी सात एकरावर सोयाबीनचं पीक घेतलं. या वर्षी सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यांनीही मोठ्या आनंदानं कष्टाला कसूर केला नाही. त्यांनी सांगितलं. “बियाणे, खतं, फवारण्या, अंतर्गत मशागत सगळ्याला एकरी साधारण २३ हजाराचा खर्च केला. कष्टाला फळ मिळालं. झाडाला पानापेक्षा जास्त शेंगा लागल्या. गेल्या कित्येक वर्षांत असं जोमदार पीक आलं नव्हतं. सोयाबीन काढणीची तयारी सुरू होती. तिकडे बाजारात भाव पडले आणि इकडे मंगळवारच्या पुरानं डोळ्यादेखत घात केला. पुराच्या पाण्यानं भरल्या ताटात माती कालवली.”

त्यांच्या तोंडून मुखर झालेल्या वेदना आमच्या डोळ्यासमोर होत्या. सात एकरात दाणाही उरला नव्हता. संपूर्ण प्लॉट उद्ध्वस्त झालेला. नजर जाईल तिथवर फक्त बरबादीचं चित्र. काळीज पिळवटून टाकणारं. शेतीत पीक उरलंच नव्हतं. शेताचा, पोशिंद्याच्या कष्टाचा आणि स्वप्नांचा मसणवाटा झाला होता. टीव्हीच्या स्क्रीनवरून जगाला, सरकारला त्याची दाहकता कळावी म्हणून ‘बर्ड आय व्ह्यू’साठी ड्रोन कॅमेरा वापरला. ड्रोन जसजसा आकाशात झेपावत होता, तसंतसं हेलावून टाकणारं दृश्य कॅमेऱ्यात दिसत होतं. म्हणून ठरवलं, तिथूनच पीटीसी करायचा.

आकाशात उड्डाणासाठी सज्ज झालेल्या ड्रोनच्या कॅमेऱ्यात पाहून बोलायला सुरुवात केली. कोरड्या दुष्काळाची भळभळती जखम वागवणाऱ्या मराठवाडा नावाच्या अश्वथाम्याला आता गुलाब चक्रीवादळाच्या काट्यांनी घायाळ केलं. रानोमाळ पसरलेल्या भळभळत्या जखमा डोळ्यात कैद करणाऱ्या ड्रोनच्या कॅमेऱ्यात जर जीव असता, तर तोही धायमोकलून रडला असता.

ड्रोन खाली आला, तेव्हा मनोमन वाटलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवडणारी ‘एरियल फोटोग्राफी’ इथं येऊन करायलाच हवी. किमान सरकारी बाबूंना पंचनाम्याच्या फुकाच्या कर्मकांडाची गरज तरी पडणार नाही.

ड्रोन खाली उरला. पण मन थाऱ्यावर येईना. ज्या बालाजी देशमुखांच्या शेतात उभा होतो ते म्हणाले, “आमचं आता काहीच उरलं नाही. जे केलं ते पाण्यात गेलं. साहेब, सहा महिने काम करून पगाराच्या दिवशी तुमचं चॅनेल बंद पडेल, तेव्हा तुम्हाला जसं वाटेल तसंच आम्हाला वाटतंय.”

चिखल्यात ओल्या झालेल्या पायात बाभळीचा काटा घुसावा तसे शब्द काळजात घुसले.

सरकारी पंचनाम्याच्या सोपस्कारांबद्दल विचारलं, तेव्हा शेतकऱ्यांनी व्यथा बोलून दाखवली- “पाहणी करायला येणाऱ्या साहेबांच्या पायाला मातीही लागत नाही. आले कधी तर रोडवरून येतात-जातात. माणसं मात्र आशाळभूत नजरेनं दिवस दिवस बसून आहेत शेत नावाच्या मसणवाट्यात. कुणीतरी येईल रानातल्या प्रेताचा पंचनामा करायला म्हणून. पण कुणी फिरकायला तयार नाही. तुम्हीच सांगा कशी धरावी आशा?”

तेर गाव आणि तेरणेचा काठ सोडताना गाडल्या गेलेल्या पिकांच्या रूपातला आणखी थर कॅमेऱ्यात आणि नजरेत कैद पुढे निघालो.

बाहेर पडताना बहुरूपी अर्थात राईंदर शेगर  बाप-लेक भेटले. अटक करायला आलोय असं सांगून त्यानं क्षणभर मनोरंजन केलं. दारोदार फिरून दुःखी झालेल्या माणसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ही माणसं अस्सल मनोरंजनाच्या परंपरेचे पाईक. पण त्यांच्यावर आधी करोनामुळे आणि आता महापुराने उपासमारीची वेळ आलीय. गावखेड्यात शेतकऱ्याच्या खळ्यावरच्या सुगीवर वासुदेवपासून, पोतराजापर्यंत आणि पांगुळापासून राईंदरापर्यंतच्या माणसांच्या पोटाची खळगी भरते. पण शेतकऱ्याचंच खळं उठल्यानं हे लोक देशोधडीला लागलेत. उरलेसुरले गावातले पोतराज, डोंबारी, वासुदेव, बहुरूपी हे भटके शहरातल्या रस्त्यावर फिरताहेत. खेळ मांडून पोटाची खळगी भरताहेत.

आम्हीही आमचा अर्ध्यातासाचा लाईव्ह ‘खेळ’ सोफिस्टिकेटेड भाषेत संपवून लातूरच्या दिशेनं निघालो. शहरापासून पाच-सात किलोमीटरवर असलेल्या भातखेडा गावातून मांजरा नदी वाहते. या वर्षी आलेल्या पुरानं या परिसरात मोठं नुकसान केलंय. मांजरा नदीवरील भातखेड्याच्या पुलावर उभा असताना जे चित्र दिसलं, ते विषण्ण करणारं होतं. मांजरा कोरडी ठाक पडली, तेव्हा लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. आज तिला पाणी आलं तर सगळं वाहून गेलं. गेल्या काही वर्षांत लातूरकरांच्या वाट्याला मांजराचे अश्रूच आले.

त्यांचा एक वाटेकरी म्हणजे भातखेड्याचा तरुण शेतकरी मैन्नूद्दीन शेख. यांच्या एका वावरात माती वाहून आल्यानं पीकं गाळात रुतली, तर दुसऱ्या वावरातील सुपीक मातीच वाहून गेली. ज्या मैमुद्दिनच्या शेतात उभे होतो, त्यांनी आमच्या माध्यमातून सरकारला विचारलं, ‘जर ७२ तासाच्या आत क्लेम करा, असा फतवा या पीक विमा कंपन्या काढतात? तर मग ७२ तासाच्या आत शेतकऱ्याला मदत का नाहीत करत? नोकरदारांना कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा आहे. त्यांना लगेच पैसे मिळतात. मग आम्हालाच आमच्या हक्कासाठी का भांडावं लागतं?’

आता दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो होतो. बीडला निघालो. माहिती घेतली तेव्हा कळलं, बीडमधल्या वडवणी परिसरात ११ वेळा अतिवृष्टी झाली. तीनच दिवसांपूर्वी धानोऱ्यात सोयाबीनच्या शेतात एका २५ वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केलीय. प्राथमिक माहिती घेऊन धानोऱ्याकडे निघालो. गावात पोहोचलो. लोकांनी घर दाखवलं. अंगणात अनेक माणसं बसलेली. त्यातली स्मशान शांतता बरीच बोलकी होती. घरातल्या कर्त्या पोरानं आत्महत्या केल्यानं अवसान गळालेल्या त्या माऊलीला दोघांनी धरून अंगणात आणलं.

सकाळी आईकडून डब्बा घेऊन गेलेला योगेश गेला तो परत आलाच नव्हता. म्हणून त्या माऊलीला विचारलं, ‘योगेश जाताना काही बोलला का?’

“नाही. त्या दिवशी तो काहीच बोलला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून तो गप्प गप्प होता. खोदून विचारलं तर म्हणायचा, ‘आपलं कसं होईल? माझं कसं होईल? दीड एकर शेतीत काही होत नाही.’ माझे विषय गेले. घरी पैसे कसं मागू? आतातर शेतातलं सगळंच गेलंय. शिक्षणाचं कसं होणार? बहिणीचं लग्न कसं होणार? मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज कसं फिटणार? पैशांच्या अडचणीनं त्यानं हाय खाली बघा,” त्या माऊलीनं हुंदक्यासह दुःख गिळलं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

घरात योगेशच्या फोटोपुढे दिवा जळत होता. त्यातलं तेल आणि कापसाची वात कुणाच्या तरी शेतातच पिकली असेल. पण वास्तव हे आहे की, ते पिकवणाऱ्या पोशिंद्यालाच ती जगवू शकत नाही.

योगेशने केलेली आत्महत्या शेतकरी आत्महत्या की, नुसती आत्महत्या यावर खल होऊ शकतो. पण नैसर्गिक संकटानं इथल्या माणसांच्या आयुष्यात अनेक आर्थिक प्रश्न निर्माण केलेत. प्रपंचाचा गाडाच बंद पडलाय. त्याची सोडवणूक होत नाही म्हणून त्याच्यापुढे हतबल होऊन तरणीबांड पोरंही गुडघे टेकताहेत. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीनंतर मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या गळ्याभोवती आवळला जाणारा फास घट्ट होत जातो, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे त्याला वेळीच मदत मिळायला हवी. आज शेताचा मसणवटा झालाय...

..................................................................................................................................................................

लेखक विलास बडे टीव्ही पत्रकार आहेत.

vilasbade1@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......