अजूनकाही
१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जाईल की राहील?
२) का फक्त फडणवीस जातील आणि दिल्लीतून नितीन गडकरी मुख्यमंत्री म्हणून येतील?
३) की यापैकी काहीच होणार नाही आणि सगळं मागच्या पानावरून पुढे सरळसोट सुरू राहील?
४) भाजप-शिवसेनेचं भांडण तुटेपर्यंत ताणेल की, दोन्ही पक्ष परत गळ्यात गळे घालून चिडीचूप सत्ताभोगात रमतील?
५) मुंबई महानगरपालिकेत निवडणूक निकालानंतर सेना-भाजप एकत्र येतील की नाही?
राज्यात हे प्रश्न सध्या राजकीय मंचावर ऐरणीवरचे झाले आहेत.
यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न फडणवीस जातील की नाही, त्यांचं भवितव्य काय? हा असणार आहे.
स्वत:फडणवीस निवडणुकीच्या जाहीर सभांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतींमध्ये ठणकावून सांगत होते की, ‘मला १२२ आमदारांचा पाठिंबा आहे आणि इतर १० अपक्ष आमदार सोबत आहेत. आणखी १५ आमदार इकडेतिकडे करणं अवघड नाही. असे १४४ आमदार झाले की झालं बहुमत.’
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘फडणवीसांना घालवू’ असा पहिला इशारा दिला. मुंबईत महानगरपालिका निवडणुकीमध्ये हवी तशी युती करायला भाजप तयार होईना. शिवाय सेना भ्रष्ट आहे असा थेट आरोप आशिष शेलार, किरीट सोमय्या यांनी करून सेनेला घायाळ केलं. ‘शिवाजीमहाराज, भगवा झेंडा घेऊन हे खंडण्या गोळा करतात. हे खंडणीखोर म्हणजे आजच्या काळातले साक्षात कौरव आहेत. आम्हीच खरे पांडव. अहंकारी सेना कौरवांना घालवू,’ अशा भाजप नेत्यांच्या गर्जनांनी सेना नेते दुखावले गेले. त्यांनी या आरोपांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ले चढवले, भाजप अध्यक्ष अमित शहांना टार्गेट केलं. फडणवीसांच्या खुर्चीवरही थेट हल्ला केला. सेना नेते खासदार संजय राऊत ‘सामना’तून आणि जाहीर मुलाखतींतून ‘फडणवीस सरकार नोटीस पिरिअडवरचं सरकार आहे,’ अशा डरकाळ्या फोडताना दिसत होते.
२० फेब्रुवारीला वृत्तवाहिनीला मुलाखत देताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर असलेल्या मनी लँडरिंगच्या आरोपांची चौकशी होईल, अशी घोषणा केल्याने तर सेनेच्या गोटात भयंकर अस्वस्थता पसरली. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर मनी लँडरिंगचा आरोप केला आहे. छगन भुजबळांनी ज्या दोन कंपन्यांतून मनी लँडिंरग केलं, त्याच कंपन्यांतून उद्धव ठाकरे आणि इतर सेना नेत्यांनी मनी लँडरिंग केलं आहे, असा आरोप होणं हे खूप गंभीर आहे. या आरोपांची चौकशी झाली आणि त्यात तथ्य आढळलं तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतचे सेना नेते मोठ्या कायदेशीर संकटात अडकतील. ठाकरे घराण्यासाठी तो सर्वांत मोठा धक्का ठरेल.
‘मातोश्रीवर खंडणीचा पैसा जातो’ हा आरोप आजवर अनेकांनी केला आहे. ‘मातोश्रीवरून तिकिटांची विक्री होते’ हा आरोपही करून झाला आहे. उद्धव ठाकरेंची संपत्ती किती, त्याची मोजदाद व्हावी, ही संपत्ती कुठून येते याचीही चर्चा झाली. या निवडणुकीतही सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी स्वत:ची संपत्ती, उत्पन्नाचे स्रोत, भाग जाहीर करावेत असं आव्हान दिलं होतं. अशा आरोप-प्रत्यारोपांना आता सेना नेते, मातोश्री सरावली आहे. पण मनी लँडरिंगचं प्रकरण साधंसुधं नाही. या मुद्द्यावर मातोश्रीलाच सुरूंग लागू शकतो.
फडणवीसांनी मनी लँडरिंगच्या चौकशीची गोष्ट काढल्याने उद्धव ठाकरे दुखावले जाणं स्वाभाविक आहे. त्यामुळे आता फडणवीस-ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक दुरावा वाढत जाणार असं दिसतं. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप-सेना भांडणावर, सरकार पडणार की राहणार, यावर खूप मार्मिक विश्लेषण केलं आहे. पवार म्हणाले, ‘मुंबईत सेना दोन नंबरची भूमिका कधीच घेणार नाही. शिवाय केंद्रातील मोदी-शहा यांचा सेनेबद्दल आकस वाढतो आहे. पूर्वी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे मुंबईत आले की, मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना भेटत. आता उद्धव यांची ती किंमत भाजप नेत्यांनी ठेवली नाही. फडणवीस यांचा आत्मविश्वास खूप वाढतो आहे. ते आता स्वत:ला ‘महाराष्ट्राचे मोदी’ समजू लागले आहेत. केंद्रात जे जे मोदी करतात तसं तसं फडणवीस महाराष्ट्रात कॉपी करत आहेत. त्यामुळे सेना-भाजपमध्ये दुरावा वाढणार, हे उघड आहे.’
स्वत: शरद पवार यांची भाषा, भूमिका आणि देहबोली खूप काही स्पष्ट करत होती. फडणवीसांचा आत्मविश्वास पवारांना टोचताना दिसत होता. फडणवीस हे फक्त मोदी-शहा जोडीचं ऐकतात, बाकी कुणाचंही नाही. यापूर्वी युतीचे दोन मुख्यमंत्री मनोहर जोशी व नारायण राणे हे पवारांशी संवादी होते. केंद्रात वाजपेयी पंतप्रधान असताना पवारांना मान होता, पण आज ते चित्र नाही. राज्यात तर फडणवीस पवारांना मोजत नाहीत, हे चित्र त्यांना दुखावणारंच आहे.
फडणवीसांनी स्वत: स्वत:ची आत्मविश्वासू शैली निर्माण करत इतर पक्षांतून बडे बडे नेते भाजपमध्ये आणले. पक्षाचा नगरपालिकांत बेस विस्तारला. नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याबाबतीत भाजप नंबर एकवर आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजपने सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर वरताण प्रचार केला आहे. जाहिरातींमध्ये तर खूपच बाजी मारली. इतकी की, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या महानगरपालिकांमध्ये भाजपचा प्रचार, जाहिरातबाजी खटकावी एवढी प्रचंड खर्चिक होती.
ही प्रचारबाजी शरद पवारांना खुपली. पवार म्हणाले की, ‘आमच्याकडे नोटबंदीनंतर पैसा राहिला नाही आणि भाजपकडे एवढा पैसा कसा आला?’ जाहिरात तंत्रात माहीर असणारे राज ठाकरेही या जाहिरातबाजीपुढे हबकलेले दिसले. काँग्रेसच्या अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे आणि संजय निरुपम यांनीही तोंडात बोटं घातली. अबब केवढा हा पैसा आणि केवढ्या या जाहिराती, याची चर्चा घराघरांतही झाली!
पक्षाचा विस्तार करण्यात फडणवीसांची बाजी; आक्रमक प्रचार, जाहिराती करण्यात बाजी; सेनेला धोबीपछाड करण्यात बाजी; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक फोडण्यात बाजी; या सगळ्यामुळे फडणवीस पडो ही सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वांची इच्छा नसली तरच नवल!
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘हे सरकार गेलंच पाहिजे.’ शरद पवार म्हणाले, ‘हे सरकार पाडू. राष्ट्रवादी मागच्यासारखा पाठिंब्याचा विचार करणार नाही.’ त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पवारांचा काय भरवसा?’ तर त्यावर पवारांना या वयात म्हणणं भाग पडलं की, ‘मी लिहून देतो- पाठिंबा देणार नाही. सरकारविरोधी मतदार करणार.’
फडणवीसांची ही बाजी भाजपमध्येही अनेकांना खुपत असणार हेही स्पष्ट आहे. खुद्द नितीन गडकरी केंद्रातून राज्यात येण्यासाठी उत्सुक आहेत. गडकरींना मुख्यमंत्री म्हणून पवारांची पसंती असेल. कारण पवार-गडकरी यांची मैत्री जगजाहीर आहे.
फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही सारं काही आलबेल नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत फडणवीस-शेलार सेनेला अंगावर घेत असताना शिक्षणमंत्री विनोद तावडे मात्र गुळमुळीत प्रचार करत होते. सेनेवर फारसं बोलताना ते दिसले नाहीत. विरोधकांची खोड काढून घायाळ करण्याची त्यांच्याकडे चांगली खुबी आहे. तो गुण (की अवगुण?) या निवडणुकीत तावडे लपवून गुडीगुडी भाषणं करत होते. आपल्या अंगावर सेनेला, विरोधकांना घ्यायचं नाही, असा त्यांचा स्पष्ट उद्देश दिसत होता.
दुसरे मंत्री चंद्रकांतकादा पाटील. इकडे फडणवीस-ठाकरे तणातणी शिखरावर असताना, सेनेचे मंत्री ‘आम्ही राजीनामे खिशात ठेवून हिंडतोय’, असं निर्वाणीचं बोलत असताना पाटील म्हणाले, ‘सेना-भाजप सरकारचं अजिबात फाटणार नाही. सरकार पडण्याचा तर प्रश्नच नाही. आम्ही बोलू सेनेशी आणि सर्व सुरळीत होईल.’ चंद्रकांत पाटील बोलले त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमित शहांनी ‘सेना आमच्याबरोबरच राहील’ असं ठामपणे सांगितलं. हा योगायोग मानता येणार नाही. ‘हे सरकार वाचवायचं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा’ हा अजेंडा उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे. ‘कर्जमाफी कराल तर तहहयात पाठिंबा देतो,’ असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
निवडणुकांचे निकाल २३ तारखेला म्हणजे उद्याच लागणार आहेत. निकालानंतर सेना-भाजप यांच्यामध्ये संवाद होऊन सरकार वाचवायचं तर फडणवीसांना घालवा, असा तोडगा पुढे आला तर…? संजय राऊत म्हणाले आहेत की, ‘२३ नंतर फडणवीस माजी मुख्यमंत्री होतील!’
सत्तेचं वर्तुळ हे खूप खुनशी, अनाकलनीय आणि अनपेक्षित असतं. फडणवीस पडो ही ज्यांची ज्यांची इच्छा आहे, त्यांना त्यांना २३ नंतर काय होईल, त्यानंतर सत्तेचं वर्तुळ कोणतं वळण घेईल, याकडे डोळे लावून बसायला लागणार आहे.
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
jitendra sakpal
Wed , 22 February 2017
काय फालतू लेख आहे विकासावर भाष्य करायचे सोडून तूम्ही त्या सडलेल्या कुजलेल्या राजकारणावर बोलतआहात. तूम्हाला पण पाकीटे पोचलीत वाटत