‘नाथपंथी डवरी गोसावी’ या भटक्या जमातीतील कालिदास शिंदे यांचं ‘झोळी’ हे आत्मकथन नुकतंच समीक्षा पब्लिकेशनने प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचे हे पुनर्मुद्रण...
..................................................................................................................................................................
राईनपाडा जि. धुळे येथे २०१८मध्ये भिक्षेसाठी गेलेल्या पाच नाथपंथी डवरी समाजाच्या माणसांची गावकऱ्यांनी मुले चोरणारी टोळी समजून दगड व इतर हत्यारांनी अक्षरश: ठेचून भर रस्त्यात केलेल्या क्रूर हत्येने केवळ महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देश हादरून गेला होता. पण त्यामुळे एक भटका समाज देव-धर्माच्या नावे काखेत झोळी घेत भिक्षेवर आजच्या एकविसाव्या शतकातही जगतोय, हे विदारक सत्य समाजासमोर आले. पण दोन वर्षांनंतरही या समाजाच्या विकासासाठी काही योजना शासनाने आखल्याचे दिसून आले नाही. अशा उपेक्षित आणि वंचित घटकांच्या जगण्याकडे लक्ष वेधून घेत समाजपुरुषाच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालणारे, एक प्रकारची नाथपंथी डवरी समाजाच्या ‘अन्नासाठी दाही दिशा आम्हां फिरविशी जगदिशा!’ असा विपन्न अवस्थेतील जगण्याची नमुनेदार केसस्टडी कथन करणारे आत्मचरित्र मराठी साहित्यात ‘झोळी’ या डॉ. कालिदास शिंदे यांच्या आत्मचरित्राच्या रूपाने अतवरले आहे.
सत्य व प्रवाही स्वरूपाची जीवनकथा या साहित्य कसोटीवर ‘झोळी’ ही आत्मकथा पूर्णपणे उतरते, पण त्याचे महत्त्व त्याहीपेक्षा कितीतरी अधिक अशा एका सामाजिक दस्तावेजाचे आहे. एक लेखक म्हणून व सामाजिक समस्येकडे आस्थेने पाहणारा एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या लेखी ‘झोळी’ या आत्मचरित्राचे मोल अधिक आहे. म्हणून मी सर्वप्रथम डॉ. कालिदास शिंदे यांनी अत्यंत प्रांजळ व कमालीच्या तटस्थ प्रामाणिकपणे लिहिलेल्या तरीही दाहक-स्फोटक अशा आत्मचरित्राचे स्वागत करतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
ज्या भागात कालिदास शिंदेचे वाडवडील व त्यांचा नाथपंथी डवरी समाज जगण्यासाठी भिक्षा मागत हिंडण्याचे जे तपशील व भूभाग प्रदेश आले आहेत, त्या माणदेशात, दिघंची - आटपाडी व सातारा परिसरात मी प्रशासनात असताना काम केले होते आणि माझ्या परीने काही सामाजिक प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला होता. पण नाथपंथी डवरी समाजाचं ‘भिक्षांदेही’ जगणं व त्यातली समाजाची आगतिकता ‘झोळी’ वाचून जेवढी समजली, तेव्हा ध्यानात आली नव्हती, हे मला अपराधी मनानं कबूल केलं पाहिजे.
खरं तर भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत अधिकार - तोही सन्मानाने दिला आहे; पण ज्या प्रमाणे कवी यशवंत मनोहर ‘कालचा पाऊस आमच्या गावी आलाच नाही’ म्हणतात, त्या धर्तीवर धर्माच्या नावाने भिक्षा हाच व्यवसाय समाजानं दिलेल्या या समाजाच्या पालापर्यंत या संविधानिक अधिकाराचा ओलावा पोहोचलाच नाही. उलट प्रसंगी केसेसचा कोटा पूर्ण करण्यासाठी भिक्षा प्रतिबंधक कायद्याचा - जो दिल्ली उच्च न्यायालयाने जगण्याचा शेवटचा पर्याय म्हणून भीक मागणाऱ्या वंचित समाज घटकाचा जगण्याच्या अधिकाराला बाधा आणते, म्हणून असंविधानिक ठरवला आहे. त्याच्या वापर करून डवरी समाजातील देवाच्या नावाने भीक मागणाऱ्यांना अटक सर्रास केली जाते, हा पोलिसांचा असंवेदनशीलतेचा कळस म्हणावा अशी आहे. आणि त्याप्रती समाजाची डोळेझाक करण्याची प्रवृत्ती ही अधिक खेदकारी आहे. ही जाणीव वाचकांना ‘झोळी’ हे आत्मचरित्र परिणामकारक रीतीने करून देते, हे या पुस्तकाचे यश मानले पाहिजे.
भुकेसाठी चोरी न करता भिक्षेचा मार्ग स्वीकारलेल्या व झोळी, डवर, त्रिशूळ, गुलालाची डबी आणि रक्तात भिजलेली पारंपरिक गोंधळाची कला असलेल्या नाथपंथी डवरी समाजात जन्मास आलेल्या कालिदास शिंदे यांच्या पालात राहत, भिक्षा मागत जगत व जीवनसंघर्ष करीत असताना आश्रमशाळा ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथे पीएच.डी. होण्यापर्यंतच्या अवघड आणि विदारक प्रवासाचा कहाणी ‘झोळी’द्वारे त्यांनी तटस्थ प्रामाणिकतेने कथन केली आहे.
दया पवारांच्या १९७८मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मकथनास प्रस्तावना लिहिताना पु. ल. देशपांडे यांनी ‘स्वत:च्याच विश्वात मग्न असणाऱ्यांसाठी ‘बलुतं’ हे आत्मकथन एक प्रकारचा आरसा आहे’, असं म्हणलं होतं. असाच आरसा कालिदास शिंदे ‘झोळी’च्या रूपाने आत्ममग्न समाजापुढे धरला आहे. त्यामुळे या डवरी समाजाकडे बघण्याचा समाजमनाचा दृष्टीकोन काही अंशी का होईना उदार आणि स्वत:प्रती अपराधी भाव जागृत करणारा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यातूनच उद्या भविष्यात या समाजाच्या अभ्युदयाचा मार्ग खुला होईल. त्या दृष्टीने ‘झोळी’ हा समाज उपयोगी दस्तावेज ठरू शकतो, इतका तो प्रभावी आहे व स्वानुभव आणि संशोधनाद्वारे डॉ. कालिदास शिंदे यांनी सविस्तर मांडला आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
‘झोळी’ हे आत्मचरित्र पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत दोन पातळीवर समांतर चालते. एक कालिदासच्या जन्मापासून त्यांची, त्यांच्या कुटुंबियांची जगण्याची दररोजची लढाई, त्यातील ताणेबाणे आणि पालावरचं जगणं हा भाग आहे. ‘लोकांची हगणदारी ती आपली वतनदारी’ मानणारा आणि हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य समाजरचनेचा ज्या विकृत्या आहेत, त्यातील एका विकृतीचा म्हणजे सबंध एका वर्गसमूहाला जगण्यासाठी झोळी हेच साधन हाती धर्माच्या नावानं दिलं, त्या समाजाच्या चालीरीती, धर्म समजूती आणि रीतीरिवाजाचे दर्शन हा दुसरा समांतर भागही या आत्मचरित्रात नेमक्या आणि विस्तृत तपशिलाने आला आहे.
स्वत:चं जीवन कथन करणं तसं सोपं असतं. कारण त्यातून ती व्यक्ती गेलेली असते. पण आपल्या समाजाची स्थितीगती नेमकी मांडणं कठीण असतं. पण आपल्या नाथपंथी डवरी समाजावर संशोधन केलेल्या कालिदास शिंदे यांना ते सोपं गेलं. त्यामुळे हे आत्मचरित्र केवळ एका कालिदासाची मागील तीन-चार दशकांची कहाणी राहत नाही, तर धर्म - परंपरेच्या नावाखाली भिक्षेखेरीज दुसरा पर्याय समाजाने न ठेवलेल्या समाजाची ती प्रातिनिधिक कहाणी ठरते - समाजाचा इतिहास ठरतो. मराठीत अनेक प्रत्ययकारी दलित तसंच भटक्या व विमुक्त समाजाची आत्मकथनं आली आहेत व त्यांनी त्यांच्या समाजाची स्थितीगती रेखाटली आहे, पण एका संशोधकाच्या नजरेतून व संशोधकीय शिस्तीनं - प्रचंड अभ्यास, चिंतन आणि विश्लेषणानं ‘झोळी’मधून नाथपंथीय डवरी - गोसावी समाजाचं जे समग्र जीवन आलं आहे, त्याला तोड नाही. त्यामुळे या आत्मकथनाचे मराठी व एकूणच भारतीय साहित्यात ‘भाषांतरीत झाल्यावर’ मैलाचा दगड सिद्ध होणारं आहे, हे निविर्वाद.
‘झोळी’मध्ये कालिदासाच्या आत्मकथनाची सुरुवात त्याच्या बालपणी दिघंचीच्या पालात जीवन कसं होतं, यानं खास बोलीभाषेच्या लहेजात सुरू होते आणि चौथीला असणाऱ्या कालिदासाच्या पायात तोवर चप्पल आली नव्हती, या कथनानं वाचकाला वाचताना जो धक्का बसतो, तो पूर्ण पुस्तकात चढत्या श्रेणीनं एकामागून दुसरा तीव्र धक्का त्याच्या वाट्याला जो संघर्ष आला, त्यानं बसत राहतो. आश्रमशाळेतलं शालेय शिक्षण ते ‘टीआयएसएस’मधील पीएच. डी. हा त्याचा प्रवास सोप नव्हता. त्याच्या आयं-दादांनी झोळी फिरवत भिक्षा मागून स्वत:ला तोशिश लावीत कालिदासला शिकवलं. जेव्हा ‘टीआयएसएस’ मुंबईमध्ये कालिदासला पीएच.डी. प्रदान करण्याचा दीक्षांत समारंभ झाला, तेव्हा आयं-दादांना घेऊन जाण्याची त्याची इच्छा होती, पण ते आले नाहीत. कारण? ‘ते भिक्षा मागायला गेले नाहीत तर आमची संध्याकाळची चूल पेटणार नव्हती’, हे कारण वाचकाच्या अंगावर येतं.
याहीपेक्षा मोठा हादरा वाचकांना ‘झोळी’च्या शेवटच्या प्रकरणात पुढील वाक्यांनी बसतो. ‘आमच्या तरुणांना पोटाची भूक लाज सोडून भीक मागायला लावते.’ ‘आज माझे पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेऊनही हाताला काम नाही. उद्या मलासुद्धा त्यांच्या पंगतीत बघ{तले तर नवल वाटू देऊ नका.’ यापेक्षा सामाजिक व आर्थिक विषमता दुसरी कोणती आहे? ती भारताच्या नादान राज्यकर्त्यांनी दलित, भटक्या-विमुक्त समाज आणि वंचित घटकांवर एक प्रकारे लादली आहे. जोवर डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असणारी सामाजिक व आर्थिक न्याय आधारित लोकशाही खèया अर्थाने अमलात येणार नाही, तोवर डवरीची ‘झोळी’ फिरतच राहील, पारधी समाज चोरीचा - गुन्हेगारीचा शिक्का वागवत जगत राहील व दलित-वंचित आणि खास करून भटके-विमुक्त समुदायांच्या नशिबी अभावाचं आणि विपन्नतेचंच जगणं कायम राहील!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
हे बदललं पाहिजे, याचा इशारा ‘झोळी’ हे आत्मकथन देतं. शिक्षण नाही, रोजगाराची कौशल्ये शिकण्याची व्यवस्था नाही, एवढंच नाही तर राहायला पक्की घरं नाहीत, घरात पाण्याचा नळ व वीज नाही... अशा परिस्थितीत जाण्यासाठी नाथपंथी डवरी समाजाला फिट बसणारं व त्यांची अपेक्षा व्यक्त करणारं १९६०च्या दशकात उर्दू शायर साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या एका गीतातले शब्द आठवतात, ‘ऐसे बने समाज, सबको मिले अनाज’.
डॉ. कालिदान शिंदे हे संशोधक वृत्तीचे पीएच.डी. धारक आहेत, खऱ्या अर्थानं जगणं आणि शिक्षणातून डोळस भान असणारे समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ‘झोळी’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने आपलं अभावाचं भुकेसाठी व शिक्षणासाठी केलेल्या भटकंतीचं चित्रण करताना, डवरी समाजाचं जीवन उलगडून दाखवलं आहे. आणि समाजापुढे आरसा धरून समाजाचा व राज्यकर्त्यांचा चेहरा हा गरीबविरोधी, कुरूप कसा व किती आहे, हे जगापुढे आणलं आहे.
‘त्याचा व इतर गरीब समाज आधुनिक काळात ‘आदिमानव’ गणले जातील, तसेच नवीन गुलामगिरीचं जीणं जगावं लागेल’ असं स्पष्ट प्रतिपादन करून जो इशारा देश-राज्य व समाजाला दिला आहे, त्याचा एक भाग उद्धृत करीत ‘झोळी’ आत्मचरित्र हे साहित्य म्हणून महत्त्वाची कलाकृती आहे, तशीच तो एक धगधगता समाजानुभव आहे - सामाजिक दस्तावेज आहे आणि ‘भूकमुक्त’ महाराष्ट्रासाठी पुकारलेला एल्गार आहे, हे मी येथे अधोरेखित करू इच्छितो.
‘‘जंगलात असताना माणूस अन्नाच्या शोधात होता. आजही अन्नाच्या शोधात आहे. अंगावर कापडं नव्हती,
तशीच आजही आपली परिस्थिती आहे. भिक्षा मागूनही कुणी जुने-पाने देणार नाही. आधुनिक काळातले ‘आदिमानव’ म्हणून आपली गणना होईल. आता तरी नागरी अवस्थेत या देशाच्या नागरिकांसारखे जगू या, नाही तर नागारिकत्व हरवून बसण्याची वेळ आपणावर येईल. आपला एका गुलामांचा गट तयार होईल. गुलाम म्हणून आपल्याला विकत घेतील. आपण गुलामगिरीतच जगू. त्यामुळे ही मानसिक गुलामगिरी फेकून देऊन नवीन आव्हाने पेलण्याची कुवत, क्षमता आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी स्वत:ला तयार केले पाहिजे.’’
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ज्याप्रमाणे महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ उगारून विषमता व शोषणाविरुद्ध एल्गार पुकारला होता, तसाच आता भटक्या-विमुक्त वर्गसमूहानं डॉ. कालिदास शिंदे यांसारख्या लोकांना बळ देत त्यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक गुललाल नाही, तर विचार आणि संघर्षाचा गुलाल उधळला, तर आणि तरच ‘झोळी’ बंद होईल आणि भीकमुक्त महाराष्ट्र निमाण होईल!
तो शिक्षणातून, विचारातून आणि संघर्षातून होईल, हा दिलासा डॉ. कालिदास शिंदे हा समाजशास्त्रज्ञ आणि त्याचं ‘झोळी’ हे आत्मचरित्र निशिचतपणे देतं!
..................................................................................................................................................................
झोळी - डॉ. कालिदास शिंदे
समीक्षा पब्लिकेशन,पंढरपूर
पाने - ३५२
मूल्ये – ५०० रुपये.
कालिदास शिंदे यांच्या ‘झोळी’ या आत्मकथनासाठी संपर्क क्रमांक - 9823985351
kalidasmsw@gmail.com
..................................................................................................................................................................
लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment