१.
“नव्वदनंतर उद्भवलेली परिस्थिती मानवी इतिहासात कधी उद्भवलेली नव्हती. खाजगीकरण असेल, उदारीकरण असेल, मुक्त अर्थव्यवस्था असेल, दहशतवाद असेल, व्हर्च्युअल रिॲलिटी असेल. मोबाईल नावाची संकल्पना १९९०नंतर आली आणि तिच्यामुळे ‘काल’ आणि ‘अवकाश’ यांची व्याख्याच बदलली. आज मी इथं असताना कोणाशी तरी सतत कनेक्टेड आहे आणि ‘कनेक्टेड’ असून ‘डिसकनेक्टेड’ आहे. म्हणजे आपल्याला वाटतं संवादाची माध्यमं वाढली, पण तसं झालेलं नाही. आपण अधिकाधिक एकाकी पडलो. काल आणि अवकाश यांना तडे गेलेलं संपूर्ण नवं जग अस्तित्वात आलंय.”
जवळपास दहा वर्षांपूर्वी म्हणजे ११ डिसेंबर २०११ रोजी नाशिकमध्ये झालेल्या ‘नाटक’ या विषयावरील ‘साधना साहित्य संमेलना’त नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातला हा उतारा आहे.
पेठे यांचं म्हणणं एकाअर्थी खरं आहे. सध्याच्या करोना काळानंही जग अभूतपूर्व म्हणाव्या अशा पद्धतीनं बदललं आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
जागतिकीकरण किंवा करोना महामारी या जगाला वेढणाऱ्या गोष्टी. त्यामुळे त्यांनी जगात मोठी उलथापालथ घडवून आणली ही गोष्ट खरीच आहे. पण जगातल्या कुठल्या ना कुठल्या राष्ट्राला सतत कुठल्या ना कुठल्या अतर्क्य परिस्थितीचा सततच सामना करावा लागतो. ते संकट त्यांच्यासाठी तेवढंच मोठं असतं, मग ते पारतंत्र्य असेल किंवा मोठी आपत्ती असेल.
१९९०नंतर बदललेल्या जगाशी जुळवून घ्यायला आपल्याला तसा बराच वेळ लागला, त्याच्याशी जुळवून घेत, त्याच्या गतिमानतेची लय पकडत आणि त्या सुसाट गतीलाच आपलं सर्वसामान्य आयुष्य मानत आपण जगायला लागतो, ही अगदी अलीकडचीच गोष्ट. खरं तर त्यात आपण नुकते कुठे स्थिरस्थावर झालो होतो. त्यात ही करोनाची जागतिक महामारी उपटली. तिनं तर आपलं जग पुन्हा एकदा उदध्वस्त करून टाकलं आहे.
करोनोत्तर काळाशी भविष्यात आपल्याला जुळवून घ्यावंच लागेल. त्याचा सामना करत, संघर्ष करत पुढे जावंच लागेल. कारण आपल्यासारख्या मनुष्यप्राण्यांना उत्क्रांतीच्या, बदलाच्या, विध्वंसाच्या, उत्पाताच्या, प्रलयाच्या, महामारीच्या अशा कुठल्याही समस्येचा सामना करावाच लागतो. त्यानुसार बदलावंच लागतं. काळापुढे गती नाही, असं आपल्याकडे म्हणायची पद्धतच आहे. पण आपण तो नीट समजून न घेतल्यामुळे आपण काळाबरोबर धावत राहतो. मागे पडण्याची, नामुष्की-पराभव स्वीकारण्याची आपली तयारी नसते. आधुनिक विज्ञानानं अनेक रोगांवर रामबाण उपाय शोधून काढले आहेत. इतकंच नव्हे तर माणसाला अमर करण्यासाठी जारीनं प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे आपली आयुर्मर्यादा वाढली आहे. पण काळ कधीतरी आपल्या घेऊन जातोच. मात्र जोवर आपण गलितगात्र झालेलो नसतो, तोवर आपल्या काळाच्या उदरात गडप व्हायला आवडत नाही. तसं होऊ नये म्हणून आपण सतत संकटांशी, स्पर्धेशी आणि ताणतणावांशी संघर्ष करत, झगडत राहतो.
आणि म्हणूनच ‘कालाय तस्मै नमः’ म्हणत काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न करतो. पण आधुनिक काळ आपल्याला त्याच्याबरोबर सहजासहजी राहू देत नाही. तो त्याच्या ‘टर्म अँड कंडीशन’वर आपल्याला नाचायला लावतो. त्यातून आपलं काय होतं, याचा एक मासला नाटककार मकरंद साठे यांनी त्यांच्या ‘गोळायुग’ या नाटकातून २००० साली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकातल्या पात्रांसाठी ‘जगण्याचे दिवस’ हाच पगार, हीच सर्वांत मौल्यवान गोष्ट आणि हेच आयुष्य असतं. त्यासाठी ते काम करतात आणि आपले ‘जगण्याचे दिवस’ विकत घेत राहतात. आधुनिक काळासाठी साठे यांनी ‘गोळा’ हे रूपक वापरून चांगलंच भाष्य केलं आहे. त्यानंतर २००४ साली आलेल्या त्यांच्या ‘चौक’ या नाटकातही आधुनिक काळात गोंधळलेल्या, भांबावलेल्या सामान्य माणसाच्या संभ्रमावस्थेचं प्रतीकात्मक चित्रण आहे.
साठे यांनी आधुनिक काळाचं स्वरूप आपल्या या दोन नाटकांतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तर अरुण टिकेकरांच्या ‘सारांश’ या पुस्तकानं आधुनिक काळानं आपल्यामध्ये निर्माण केलेल्या विकृतींचा सविस्तर आढावा घेतला आहे. याशिवाय अरुण काळेंसह नवदोत्तर कविता, विलास सारंगांच्या कथा-कादंबऱ्या, नंदा खरेंच्या कादंबऱ्या, जयंत पवारांच्या कथा यांतही आधुनिक काळाने निर्माण केलेल्या हलकल्लोळाचा इतिहास समजून घेता येतो. ‘आधुनिक काळ’ खरोखरच ‘काळपुरुष’ म्हणून आपल्यासमोर उभा ठाकला आहे.
पण खरंच असं आहे का? काळाला गती असते? खरं म्हणजे काळ गतिमान नसतो. तो संथपणे, सावकाश आणि योग्य त्या वेगानंच वाहत असतो, असं इव्हा हॉफमन ही लेखिका म्हणते. केवळ एवढंच नव्हे तर काळ हा अखंड प्रवाही असतो. त्याची गती कुणालाही थांबवता येत नाही. तुम्ही कसे जगता यावर तुमचा काळाबाबतचा अनुभव आधारलेला असतो, असंही तिचं म्हणणं आहे.
खरं तर किती साधी गोष्ट आहे, पण आपल्या ती सहजपणे लक्षात येत नाही, नाही का?
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
‘काळ ही वास्तवाची अंतिम अशी अजिंक्य सीमा आहे…’ असं नेमकेपणानं सांगणाऱ्या इव्हा हॉफमन या लेखिकेनं या काळाचं आपल्या छोट्याशा पुस्तकाद्वारे चरित्रच लिहिलंय. एकेकाळी मराठीत समाजसुधारकांची चरित्रं ‘काळ आणि कर्तृत्व’ अशा शीर्षकाखाली लिहिली जात, तसंच हे काळाचं एक संकल्पना, स्वरूप आणि व्यापकता सांगणारं पुस्तक आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचं नाव आहे – ‘टाइम’. ते प्रकाशित झालं २००९मध्ये. त्याचा प्रा. पुरुषोत्तम देशमुख यांनी ‘कालाय नम:’ या नावानं केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने सप्टेंबर २०१५मध्ये प्रकाशित केलाय. अवघ्या १६० पानांचं हे पुस्तक नितांत सुंदर म्हणावं असं आहे. त्याची निर्मिती चांगली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ नेमकेपणानं पुस्तकाचा आशय सांगतं. अनुवाद उत्तम आहे. अच्युत गोडबोले यांची प्रस्तावनाही चांगली आहे. आणि मुख्य म्हणजे मजकुरात शुद्धलेखन-व्याकरणाच्या फारशा चुका नाहीत.
लेखिका मूळची पोलंडची. तिथल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिचं बालपण अतिशय अस्थिर, जीवघेण्या अनुभवांतून गेलं. नंतर तिने शिक्षणाच्या निमित्तानं अमेरिकाला स्थलांतर केलं. त्यामुळे तिच्या काळाच्या जाणिवेत कटुता निर्माण झाली. नंतर तिने अमेरिकेहून इंग्लंडला स्थलांतर केलं. तेव्हा अमेरिकेतला काळ आणि इंग्लंडमधला काळ यांमुळे तिच्या जाणिवेत फरक पडला. ‘दुसऱ्यांच्या संस्कृतीच्या काळाचा अर्थ समजून घ्यायला वेळ लागतो,’ असं तिनं म्हटलंय. पण तिला स्वत:चा भूतकाळ समजावून घेतानाही बराच त्रास झाला, नंतर अमेरिकन संस्कृती समजून घेताना आणि त्यानंतर इंग्लंडची. अशा वेगवेगळ्या काळांतून गेलेली ही लेखिका आपल्या पुस्तकाची सुरुवातच ‘मी नेहमीच काळाचा विचार करत आले आहे. ही माझी स्वाभाविक प्रवृत्तीच आहे की, मी ज्या ठिकाणी आणि ज्या ऐतिहासिक क्षणी लहानाची मोठी झाले, त्याचा हा परिणाम आहे, हे मला नक्की सांगता येणार नाही; पण ही प्रवृत्ती फार वर्षांपूर्वीच निर्माण झाली आणि वाढत्या वयातही ती सतत कायम आहे, हे मात्र मला माहीत आहे,’ अशी करते.
या पुस्तकात उपोद्घात आणि ‘काळ आणि शरीर’, ‘काळ आणि मन’, ‘काळ आणि संस्कृती’, ‘काळ आणि आपला काळ’ अशी मोजून पाच प्रकरणं आहेत. त्यातून लेखिकेनं काळ या जगङ्व्याळ संकल्पनेचं चित्र, चरित्र, चारित्र्य आणि तिचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम व प्रभाव यांची अतिशय उत्तम प्रकारे उकल करून दाखवली आहे.
‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ असं एक जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं पुस्तक आहे. आपल्या शारीरिक दुर्बलतेवर मात करून करत संशोधनात मोठं काम करून ठेवलेल्या या शास्त्रज्ञानं या पुस्तकात विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याचं भवितव्य काय, अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. १९८८ साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक सलग २३७ आठवडे ‘लंडन संडे टाइम्स’च्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत झळकलं, जगभरातील ४०हून अधिक भाषांत अनुवादित झालं आणि त्याची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद झाली आहे. त्याच्या आजवर एक कोटीपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. ‘काळाचा छोटासा इतिहास’ या नावानं हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे. आपण ज्या अवकाशात राहतो, त्यातलं काळाचं महत्त्व समजावून सांगण्याचं काम हे पुस्तक करतं.
तर ‘कालाय नम:’ हे पुस्तक काळाचं आपल्या, माणसांच्या आयुष्यातलं महत्त्व सांगतं. त्याचा आपल्या शरीरावर, मनावर, संस्कृतीवर आणि आपल्यावर कसा परिणाम होतो, हे उलगडून दाखवतं. ते करताना लेखिका भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, संस्कृती, मनोविश्लेषण, चेतामानसशास्त्र यांच्यापासून कथा-कादंबऱ्या-कविता अशा अनेक संशोधनांचे व संदर्भांचे हवाले देते. व्लादिर नोबोकोव्ह हा रशियन-अमेरिकन कादंबरीकार-कवी तर तिचा या पुस्तकातला सहप्रवासीच आहे.
उपोद्घातात ती म्हणते - “काळ ही सर्वांत अस्पर्श आणि अविचल अशी वस्तू आहे आणि ते तिचं एक आकर्षण आहे. एका पातळीवर संस्कृती आणि मानवी मन यांनी वेगवेगळे आकार दिलेला तो एक लवचिक पदार्थ आहे. पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काळ ही एक श्रेष्ठ देणगी आहे, असं नेहमी मानलं जातं. वस्तुस्थितीचा असा प्रकार – अदभुताच्या किंवा कल्पनेच्या पलीकडचा – तो बदलता येत नाही, त्याचं विश्लेषण करता येत नाही किंवा त्याचं अस्तित्वही नाकारता येत नाही. मानवानं त्याच्याशी सतत संघर्ष केला आहे, त्याच्याविरुद्ध आवाज उठवला आहे; पण तरी त्याच्या निष्ठुर प्रवाहापासून आपली सुटका नाही किंवा त्यानं आपल्याला मृत्युचं दान देऊन आपल्याला स्वत:च्या प्रभावाखाली ठेवलंय, हेही नेहमीच मानवानं गृहीत धरलं आहे.”
काळ आपल्या जीवनशैलीवर, संवेदनशीलतेवर, अनुभवांवर परिणाम करतो. आपण आपल्या काळात राहतो, पण त्यातून बाहेर पडू शकत नाही. त्याला उलट फिरवूही शकत नाही. त्यामुळे त्याचा स्वभावधर्म आणि कार्यपद्धती समजून घेणं हेच आपल्या हातात असतं. काळ आपल्याला जगण्याचा आधार देतो आणि त्याच्याशी जुळवून घेणं, म्हणजे अवघड प्रश्न सोडवण्यासारखंच आहे, हे सांगतानाच लेखिका आधुनिक काळानं निर्माण केलेल्या समस्या, विकार आणि ताणतणाव यांचाही आढावा घेते. आणि मुख्य म्हणजे हे करताना तिने कुठेही जागतिकीकरण, भांडवलशाही, बाजारपेठ यांचा साधा उल्लेखही केलेला नाही. हा या पुस्तकाचा एक प्रधान विशेष आहे.
आपण ज्या काळात जगतो आहोत, तो काळ नेमका कसा आहे, त्याचा स्वभाव आणि शैली कशी आहे, यासाठी हे पुस्तक वाचायला हवं. आधुनिक युगाने फक्त आपल्यापुढेच आव्हानं निर्माण केली आहेत, असं नाही, तर काळापुढेही केली आहेत. तोही आपल्यासारखाच प्रभावशाली आणि त्रासदायक बदलांमधून जातोय. आपण काळ तर काही थोपवू, रोखू शकत नाही, पण स्वत:ला मात्र नक्कीच थांबवू, रोखू शकतो. काळ नेमका कुठे जातोय किंवा त्याला नेमकं कुठं जायचंय, हे आपल्यापैकी कुणालाच माहीत नाही. आपण त्याच्याबरोबर फार काळ जाऊही शकत नाही. पण आपल्याला कुठे जायचंय, हे आपण नक्की ठरवू शकतो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
ज्यांनी ते अजून ठरवलेलं नाही, त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं. खरं तर स्टीफन हॉकिंग यांचं ‘काळाचा छोटासा इतिहास’, इव्हा हॉफमन यांचं ‘कालाय नम:’ आणि अरुण टिकेकर यांचं ‘सारांश’ ही तिन्ही पुस्तकं एकसलग वाचली पाहिजेत. त्यातून आपल्याला आपण जगत असलेल्या काळाचं यथार्थ दर्शन व्हायला मदत होऊ शकते.
२.
मूळ ‘टाइम’ या शीर्षकाचा ‘कालाय नम:’ हा मराठी अनुवाद मात्र या पुस्तकाच्या लौकिकाला फारसा साजेसा नाही. या पुस्तकाचा आशय ‘टाइम’ या मूळ इंग्रजी शब्दातून जसा प्रतिबिंबित होतो, तसा ‘कालाय नम:’ यातून होत नाही. ‘काळाचं छोटंसं चरित्र’ असा त्याचा अनुवाद करता आला असता. याशिवाय ‘काळ’महिमा, ‘काळा’ची किमया, काळ-वेळ, काळ आणि माणूस, अशा काही पर्यायांचाही विचार करता आला असता. असो. शीर्षकाच्या अनुवादातल्या या चुकीकडे या पुस्तकाच्या गालावरची काळी तीट म्हणून पाहायला हरकत नाही.
इव्हा हॉफमन ‘काळ आणि शरीर’ या पहिल्या प्रकरणात काळाचा आपल्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, याचं अगदी शरीरशास्त्राचे, निसर्गनियमाचे आणि विज्ञानाचे कितीतरी दाखले देत जे चित्र रेखाटते, त्यातून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतात. ती म्हणते- “आपण घड्याळं थांबवू शकतो, पण काळ थांबवू शकत नाही. जिंवत असल्याची जाणीव मनावेगळी करणं, हाच शरीरातील काळाचा प्रवास थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे. शरीराच्या सगळ्या क्रिया उलट्या पद्धतीनं निश्चितपणे थांबवणं, हाच मृत्यू. जिवंत राहणं म्हणजे काळाचं वहन जाणवणं, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आणि अवयवामध्ये आपल्याद्वारे कार्य करण्यासाठी काळ असायला हवा, कारण तो त्याच्यासोबत आपल्याला त्याच्या वेगानं घेऊन जातो. आपल्या शरीरांमध्ये त्याची मर्त्य, पण जोमदार धून वाजवतो.”
काळ ही मानवाने तयार केलेली अमूर्त संकल्पना असली तरी तो तिला कुठलंही वळण देऊ शकत नाही आणि थांबवूही शकत नाही. काळ त्याच्या एका निश्चित लयीत, गतीत भूतकाळाकडून वर्तमानकाळाकडे आणि वर्तमानकाळाकडून भविष्यकाळाकडे जात राहतो. त्याची ती गती आपल्याला पकडता येत नाही. निसर्गातल्या इतर कुठल्याही प्राण्याला माणसासारखं काळाचं भान नसतं. ती जन्माला येतात, त्यांचं ठरलेलं आयुष्य जगतात आणि मरतात. पण ती कधी काळाचा विचार करण्याची किंवा त्याचा प्रत्येक सेकंद स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्याची धडपड करत नाहीत. माणूस मात्र करतो. पण भविष्यकाळाचा वेध घेईपर्यंत तो वर्तमानकाळ होतो आणि वर्तमानकाळाचा अन्वयार्थ लावेपर्यंत तो भूतकाळात जमा होतो. माणसाला भूतकाळाचा वर्तमानकाळ काळ करता येत नाही आणि वर्तमानकाळाचा भविष्यकाळही. माणूस फक्त काळाचा उपभोगकर्ता असतो. त्यामुळे काळाचं निरकुंश सामर्थ्य समजावून घेणं हेच आपल्या हिताचं आहे, असा लेखिकेचा निर्वाळा आहे. तसं केलं तरच आपल्याला काळाशी वास्तववादी तत्त्वावर जुळवून घेता येतं आणि आपल्या उद्दिष्टांनुसार, पात्रेनुसार त्याचा उपयोग करण्याची संधी आपल्याला मिळते, असंही लेखिका स्पष्ट करते.
‘काळ आणि मन’ हे या पुस्तकातलं दुसरं प्रकरण सर्वांत मोठं आहे. मानसिक पातळीवर काळाचे कसे पडसाद उमटतात, त्याचं अतिशय उत्तम विश्लेषण या प्रकरणात लेखिकेनं केलं आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच ती म्हणते – “काळाचं भान आपल्याला असल्यामुळेच त्याच्याशी असलेले आपले व्यवहार गुंतागुंतीचे होतात. सर्व प्राण्यांद्वारे काळ काम करत असतो; पण फक्त आपल्याला माहीत असतं की काळ आहे. आपल्याशिवायही त्याला अस्तित्व आहे – मग ते कितीही बिनमहत्त्वाचं असो, आपल्याला ते माहीत असतं. म्हणजे मनातल्या मनात आपण त्याचा विचार करतो आणि जैविक दृष्टीनं त्याच्याकडून घडवलेही जातो.”
आधुनिक काळानं आपल्या सर्वांची शरीरं, मनं व्यापून टाकली आहेत. आपण मोबाईल, सोशल मीडिया यांच्यावर माणसाला माणसापासून तोडण्याचं खापर फोडत असतो. पण संवेदना आणि भावना जोपासण्याचं काम तंत्रज्ञानाचं नाही, तर कलांचं आहे. त्यामुळे आपण खरा दोषारोप सिनेमा, संगीत, चित्रकला, साहित्य यांच्यावर करायला हवा. कारण आधुनिक काळातल्या आपल्या जीवनशैलीमुळे आपण नेमकं काय गमावतो आहोत, ते या कलांनी नीटपणे पकडून, बांधून, आपल्यापुढे मांडायला हवं. पण तसं होताना दिसत नाही, आपल्या देशात, आपल्या राज्यात तरी नक्कीच नाही.
इव्हा हॉफमन प्रकरणाच्या शेवटी म्हणते - “मानसशास्त्रीय कथानकं काळाला वाकवतात, त्यामुळे आपल्या संवेदना आणि भावनांना अर्थ प्राप्त होतो; मात्र विज्ञानकथांमध्ये तसं होत नाही. अशा कथा-कादंबऱ्या, आकलनाच्या सर्व पद्धती आणि काळाच्या सामर्थ्याचं भान valences of time संवेदनशील तपशिलात, त्यांचे रंग आणि ‘क्वालिया’सह आपल्याला देऊ शकतात… आपण आपल्या आत काळ सोबत घेऊन वावरतो आणि आपल्या स्वत:च्या अंधार आणि प्रकाशाच्या सामग्रीतून मानवी काळ निर्माण करतो. तटस्थ काळाला आपल्या अर्थाचा आकार देण्यासाठी, आपल्या अनुभवाच्या आशयावर चिंतन करायला हवं आणि आपल्या स्वत:च्या संवेदनशीलतेतून त्याला गाळून घ्यायला हवं.”
हे वाचलं की, वाचनाच्या बाबतीतला आपला प्राधान्यक्रमच चुकतोय हे अनेकांच्या लक्षात येईल. कारण आज आपल्याला वर्तमानातल्या धुवांधार गजबजलेल्या कोलाहलात उभं करणाऱ्या कथा-कवितांपेक्षा माणसाच्या मनाचे, मनोव्यापाराचे पापुद्रे नीट उलगडून सांगणाऱ्या साहित्याची जास्त गरज आहे. असं साहित्य मराठीत कोणाचं आहे? या संदर्भात दोन नावं पटकन आठवतात. एक, नवकथेचे एक शिल्पकार अरविंद गोखले आणि दुसरं, अलीकडच्या काळातले राजन खान. यांच्या कथांच्या वाचनातून आपल्याला आपल्या संवेदना आणि भावनांना अर्थ देता येईल, हे लक्षात येईल.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
‘काळ आणि संस्कृती’ या तिसऱ्या प्रकरणात जगभरातल्या वेगवेगळ्या मानवी संस्कृतींवर काळाचे कसे वेगवेगळे परिणाम होतात, याचा मागोवा लेखिकेनं घेतला आहे. या प्रकरणाचा शेवट तिने मोठ्या मार्मिकपणे केला आहे. ती म्हणते - “आधुनिकतेचं जसं जबरदस्त आकर्षण आहे, तशी त्याची जबरदस्त किंमतही मोजावी लागते. अतिशय कार्यक्षमतेनं काळाच्या संघटित प्रकारात पाऊल टाकणं उत्तेजित करू शकतं आणि आर्थिक दृष्टीनं हवं-हवंसंही वाटू शकतं. तरी संस्कृतीचा प्रभाव मानवी मनात अतिशय खोलवर रुजलेला असतो आणि कदाचित काळाच्या प्रभावासारखा कुठलाच प्रभाव नसतो. एखाद्याला त्याच्या आंतरिक इच्छेपासून आणि अभिमान-आदर्शांपासून बळजबरीनं परावृत्त करणं घातक ठरू शकतं. विविध सांस्कृतिक कालिकतांमधील वादविवाद घातक ताण-तणाव निर्माण करू शकतात; पण त्याच्या तीव्र आणि अनपेक्षित प्रकारांमुळे त्यातून अधिक हिंसक प्रतिक्रिया आणि विरोधी वातावरण तयार होऊ शकतं.”
‘काळ आणि आपला काळ’ हे या पुस्तकातलं शेवटचं प्रकरण. हे तुलनेनं छोटंसं प्रकरण आधुनिक काळानं निर्माण केलेल्या समस्यांचा आढावा घेतं आणि त्यावर उपायही सुचवतं. लेखिका म्हणते -“भांडवलशाहीच्या शेवटी शेवटी निमित्तमात्र ठरलेल्या काळाच्या प्रकाराची आपण अजूनही काटछाट करत आहोत. प्रत्येक क्षणाची जी काय किंमत असेल, ती वसूल करण्याचा आणि त्यातून जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो… आपण जणू काही अर्थाऐवजी गतिमानतेलाच महत्त्व दिलं आहे… काळाच्या अशा रचनेत, प्रत्येक क्षणावरचं दडपण प्रचंड प्रमाणात वाढतं. अंतर्गत दडपणाची स्थिती त्यामुळे वाढते. सत्वरतेच्या सुखलोलुपतेमधून तिची स्वत:ची असंतुष्टता निर्माण होते… हाच मूलभूत विरोधाभास आहे. आपण आपल्या काळात खूप अनुभव भरून घेतले, तर आपल्या स्वत:तून ते प्रसंग झिरपल्यावर आपले स्वत:चे होईपर्यंत, त्यावर प्रक्रिया करण्याची आणि अनुभव घेण्याची क्षमता आपण गमावून बसतो.”
खरंच आहे तिचं म्हणणं. आपण सतत धावतो, सुख-समृद्धीच्या-ऐषोरामाच्या पाठीमागे जीव तोडून पळत आहोत. त्यामुळे संथपणा, आस्वादात्मकता, रेंगाळत-रमतगमत चालणं अशा अनेक गोष्टी आपण विरून गेलो आहोत. याचा अर्थ आपण आधुनिक प्रवाहाशी जुळवून घेणं सोडून द्यायला हवं असंही नाही. लेखिका म्हणते – “प्रमाणाबाहेर वेग कमी करणं, हा प्रमाणाबाहेर वाढलेल्या वेगावरचा उपाय निश्चितच नाही. संथपणा कधी कधी हवाहवासा असू शकेल आणि योग्य प्रमाणातला निरुद्योगीपणा, हा देवत्वासारखा असू शकेल; पण फाजील निष्क्रियतासुद्धा काळ विस्कळीत करू शकते आणि कालिकतेचं स्वरूप नाहीसं करू शकते.”
आपल्याला निरर्थकपणे जगायचं नसेल, तर कधी कधी आपण अंतर्मुख होण्याची, चिंतन करण्याची, सहसंवेदना जपण्याची आणि सौंदर्यानं स्तिमित होण्याची गरज आहे. आपण गंभीरपणे विचार करायला, एकाग्र व्हायला हवं. आपण घेतलेल्या अनुभवावर चिंतन करून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायला हवा. नपेक्षा काय होईल? लेखिकेचं म्हणणं आहे - “आपण आपल्या मानवी कालिकतेचा अधिक दुरुपयोग केला, तर आपल्या अनुभव-वस्त्राचं तेवढंच नुकसान आणि अवमूल्यन होईल. तंत्रज्ञान आणि नवं ज्ञान आपल्याला आणखी चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य, आणखी अधिक पर्याय आणि अधिक लवकर समाधान देऊ शकतात; पण साधन म्हणून आपला स्वत:चा आपण उपयोग केला आणि आपल्या आंतरिक स्तरांची मशागत केली नाही, आपण अजरामर राहणार आहोत, अशा विश्वासानं आपण आपली काळजी घेतली नाही, आपण आपला सगळा वेळ डिजिटल परिणामांनी भरून टाकण्याचा प्रयत्न केला, तर आपलं आयुष्यच वाया जाण्याचा धोका पत्करल्यासारखं होईल किंवा आपल्याला देण्यात आलेला काळ वाया घालवण्यासारखं होईल.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आधुनिक काळात आपल्या पायांना भिंगऱ्या लावून आपल्याला कशाच्या ना कशाच्या मागे धावायला लावण्याचं काम बाजारापासून जीवनशैलीपर्यंत अनेक घटक करत आहेत. आणि आपण धावत आहोत. जणू काही जगण्याचीच रॅटरेस चालू आहे. पण स्पर्धा म्हणजे काही आयुष्य नाही. तर आधुनिक काळानं ज्या काही संकल्पना आपल्या देणगी म्हणून दिलेल्या आहेत, त्यातल्या दोन म्हणजे ‘लोकशाही शासनप्रणाली’ आणि ‘न्याय्य समाजरचना’. ही दोन शस्त्रं आजच्या काळानं निर्माण केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वांत उपयुक्त आहेत. जरी त्यांचा उल्लेख लेखिकेनं आपल्या पुस्तकात केलेला नसला तरी. त्यामुळे त्या अस्तिवात येण्यासाठी, टिकून राहण्यासाठी आणि प्राणपणानं जपण्यासाठी प्रयत्नरत राहणं, ही आपली आधुनिक काळातली सर्वांत मोठी जबाबदारी आहे.
जेव्हा खरं तर महाराष्ट्रात पूर्ण वेळ लेखन करणारे लोकदेखील नव्हते, तेव्हाच इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी आयुष्यभर कुठलंही एकच काम करण्यातला धोका सांगितला होता - “आज जी कांही माणसांनी सर्व आयुष्य वाचन, लेखन व मनन यांत घालविण्याची प्रथा रूढ आहे, ती समाजविकृति होय. तसेंच कांहीजणांनी सर्व जन्म एकच एक काम कारखान्यांत करण्यांत घालविणें हीहि समाजविकृति होय. ज्या वेळीं न्याय्य समाजरचना अस्तित्वांत येईल, तेव्हा या विकृति नाहींशा होतील. तेव्हा सर्वांनाच शारिरीक काम, बौद्धिक काम, वाचन, लेखन, मनन, खेळ, करमणूक, यथाभाग थोडथोडीं करावीं लागतील. तो धन्य काळ आणण्यासाठी कामास लागणें हें सर्वांचे आजचें पहिले कर्तव्य आहे.”
तीसच्या दशकात शेजवलकर ज्या समाजविकृतींबद्दल सांगत होते, आज त्यांना वैयक्तिक आणि सामाजिक असं दुहेरी स्वरूप आलं आहे.
आणि हे सगळं महाभारत घडलं आहे, ते आपण ‘काळा’ला कधी नेमकेपणानं समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही त्यामुळे…
..................................................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ravi Go
Fri , 08 October 2021
फार सुंदर आढावा. शेजवलकर यांना उद्घृत करून लेख फार छान रीतीने संपवलायत. धन्यवाद!
Ravi Go
Fri , 08 October 2021
फार सुंदर आढावा. शेजवलकर यांना उद्घृत करून लेख फार छान रीतीने संपवलायत. धन्यवाद!