शब्दांचे वेध : पुष्प अठ्ठेचाळिसावे
आजचे शब्द : ‘Lopado… terygon’, ‘निरन्तरान्धकारितदिगन्तर... पथिकलोकान्’ आणि Schmutzwortsuche
माझ्या शेजारी बारा-तेरा वर्षांचा एक चुणचुणीत आणि स्मार्ट मुलगा राहतो. त्याला अनेक गोष्टींबद्दल खूप कुतूहल असतं. कुठून कुठून माहिती शोधून काढून तो मला सांगत तरी असतो किंवा प्रश्न तरी विचारत असतो. परवाच त्यानं मला सर्वांत जास्त अक्षरं असलेल्या (सर्वांत लांब) शब्दाबद्दल विचारलं. त्यामुळे मला आजच्या लेखाची कल्पना सुचली. चला, त्याच्यासोबत तुम्हालाही एका अनोख्या शब्दाची मेजवानी देतो. हे एका ग्रीक खाद्यपदार्थाचं इंग्रजी नाव आहे.
ही डिश तुम्हाला आवडेल की नाही, हे माहीत नाही, पण तिचं नाव वाचून आणि उच्चारून तुमचं पोट नक्कीच भरेल, इतकं ते लांबलचक आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हे नाव वाचा-
“Lopadotemachoselachogaleokranioleipsanodrimhypo
trimmatosilphioparaomelitokatakechymenokichlepikossyphophatto
peristeralektryonoptekephalliokigklopeleiolagoiosiraiobaphetraganopterygon.”
अरे, हो! म्या काई तुमचीवाली थट्टा नाई करून रायलो, राजे हो. (आमच्या वऱ्हाडात असंच बोलतात, बरं.) देवाच्यान खरं सांगतो, हे एका पदार्थाचं नाव आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
‘अॅरिस्टोफेनीज’ (Aristophanes) नावाच्या प्रसिद्ध ग्रीक विनोदी नाटककारानं (जीवनकाल ख्रिस्तपूर्व ४४६ ते ३८६) ‘एक्लेझिआझाऊझाई’ (κκλησιάζουσαι Ekklesiazousai) या नावाचं एक नाटक ख्रिस्तपूर्व ३९१मध्ये लिहिलं होतं. इंग्रजीत या शीर्षकाची ‘Assemblywomen’, ‘Congresswomen’, ‘Women in Parliament’, ‘Women in Power’, ‘A Parliament of Women’ अशी भाषांतरं केली जातात. या नाटकात त्यानं या डिशचा उल्लेख केला होता. आता हा पदार्थ काल्पनिक होता की, त्या काळी खरंच ग्रीसमधल्या बायका हा पदार्थ शिजवून आपल्या नवऱ्यांना खाऊ घालत होत्या का, हे नक्की माहीत नाही. पण रेसिपीच्या वर्णनावरून तरी यात असंभव असं काही वाटत नाही.
याची दोन वर्णनं मला सापडली. एक असं आहे- A goulash composed of all the leftovers from the meals of the leftovers from the meals of the last two weeks. गेल्या दोन आठवड्यात प्रत्येक जेवणानंतर उरलेल्या अन्नावर ताव मारल्यावर जे अन्न आणखी उरेल, ते एकत्र करून त्याच्यापासून केलेला ‘गुलॅश’ (Goulash) म्हणजे हा पदार्थ. Goulash म्हणजे खूप तिखट घातलेला एक प्रकारचा सामिष काढा, कढी, रस्सम, सांबार, असं काही तरी. इंग्रजीत ‘स्ट्यू’ (stew).
दुसऱ्या वर्णनानुसार या स्ट्यू किंवा फ्रिकासे (fricassee)मध्ये किमान सोळा तिखट आणि आंबट पदार्थ मिळवले जातात. त्यातले काही असे-
- Fish slices (माशाच्या चकत्या),
- Fish of the elasmobranchii subclass (a shark or ray, शार्क किंवा रे जातीचे मासे),
- Rotted dogfish or small shark's head (डॉगफिश किंवा छोट्या शार्क माशाचं कुजलेलं डोकं),
- A generally sharp-tasting dish of several ingredients grated and pounded together (मीरपूड आणि तशाच अतिशय जहाल, तिखट मसाल्यांपासून केलेली पेस्ट किंवा पावडर),
- Silphion, possibly a kind of giant fennel, now believed extinct (आता बहुधा नष्ट झालेली- सिल्फिअन नावाच्या प्रजातीची बडीशोप),
- A kind of crab, shrimp, or crayfish (खेकडा, श्रिंप, किंवा क्रेफिश या पैकी एखादा समुद्री जीव),
- Honey poured down (मध)
- Wrasse (or thrush) (रास नावाचा सागरी मासा किंवा थ्रश नावाचा पक्षी),
- A kind of sea fish or blackbird as topping (आणखी एखादा सागरी मासा किंवा ब्लॅकबर्ड नावाचा पक्षी),
- Wood pigeon (वुड पिजन नावाचं कबुतर),
- Domestic pigeon (आपलं नेहमीचं कबुतर),
- Rooster (कोंबडा),
- The roasted head of dabchick (पनडुब्बी किंवा लिटल ग्रीब जातीच्या पक्ष्याचं भाजलेलं डोकं),
- Hare, which could be a kind of bird or a kind of sea hare (जंगली ससा किंवा समुद्री हेअर नावाची समुद्रात सापडणारी गोगलगाय),
- New wine boiled down (नवीनच बनवलेली वाईन (उकळलेली) ),
- Wing and/or fin (एखाद्या पक्ष्याचा पंख किंवा माश्याचा कल्ला).
बघा बरं, किती सरळ साधं आहे. तुम्हाला मांसाहारी भोजन आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा. मी नैतिक शाकाहारी (moral vegetarian) असल्यानं मला तर ही डिश चाखता येणार नाही, पण तुमच्या आनंदात मी जरूर सहभागी होईन.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
तुम्हाला या डिशचा तपशील तर कळला. आता तुम्ही म्हणाल, हा शब्द वाक्यात कसा वापरायचा? अगदी सोपं आहे. हे बघा-
Nobody in their right mind would ever use
Lopadotemachoselachogaleokranioleipsanodrimhypo
trimmatosilphioparaomelitokatakechymenokichlepikossyphophatto
peristeralektryonoptekephalliokigklopeleiolagoiosiraiobaphetraganopterygon.
in a sentence, ever.
म्हणजे, जिला थोडीफारही अक्कल आहे अशी कोणतीच व्यक्ती हा शब्द कधीच कोणत्याही वाक्यात वापरणार नाही.
याचं एक कारण असं आहे की, या शब्दाचा उच्चार कसा करायचा हेच मुळात आपल्याला ठाऊक नाही. मी काय म्हणतो, तुम्ही तुम्हाला आवडेल तसा, जसा जमेल तसा उच्चार करून बघा ना. कोणी रागावणार नाही. एक हिंट देतो. हा मूळ जुन्या ग्रीक भाषेतला (आणि सगळ्यात लांब) शब्द आहे. तिथे तो असा लिहिला जातो-
λοπαδοτεμαχοσελαχογαλεοκρανιολειψανοδριμυποτριμματοσιλφιοκαραβομελιτοκατακεχυμενοκιχλεπικοσσυφοφαττοπεριστεραλεκτρυονοπτοκεφαλλιοκιγκλοπελειολαγῳοσιραιοβαφητραγανοπτερύγων
यात १७५ अक्षरं आहेत आणि त्यांचे ७८ शब्दावयव, तुकडे (syllables) पाडता येतात. रोमन लिपीत या शब्दाचं इंग्रजी रूप लिहिताना १८३ अक्षरं वापरावी लागतात. काही रासायनिक पदार्थांना मुद्दाम देण्यात आलेली विशेषनामं सोडली, तर इतर कोणताही इंग्रजी शब्द या लांबीचा नाही, असं ‘गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’वाल्यांनी १९९० साली सांगितलेलं आहे.
तर हिंट अशी आहे की, आपण इंग्रजीतही या शब्दाचे वर दिल्याप्रमाणे तुकडे करून हा शब्द उच्चारायचा प्रयत्न करून बघू-
Lopado-temacho-selacho-galeo-kranio-leipsano-drim-hypo-trimmato-silphio-parao-melito-katakechy-meno-kichl-epi-kossypho-phatto-perister-alektryon-opte-kephallio-kigklo-peleio-lagoio-siraio-baphe-tragano-pterygon
(लोपॅडो टेमॅको सिलॅझो गॅलिओ क्रॅनिओ लेइप्सॅनो ड्रिम हायपो ट्रिमॅटो सिल्फिओ पॅरॅओ मेलिटो कॅटॅकेझी मेनो किच्ल एपि कोसिफो फॅटो पेरिस्टर अलेकट्रायन ऑपटे केफॅलिओ किगक्लो पेलेइओ लॅगॉइओ सिराइओ बॅफे ट्रॅगॅनो टेरायगॉन)
हुश्श! तुम्हाला हे वाचताना किंवा उच्चारून बघायला जर इतका त्रास होत असेल तर अॅरिस्टोफेनीजच्या मूळ नाटकात ज्या ‘कोरस’च्या तोंडी हा शब्द होता, त्यांची काय अवस्था झाली असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.
या शब्दाचं पर्यायी रूप देखील आहे-
λοπαδοτεμαχοσελαχογαλεοκρανιολειψανοδριμυποτριμματοσιλφιοτυρομελιτοκατακεχυμενοκιχλεπικοσσυφοφαττοπεριστεραλεκτρυονοπτεκεφαλλιοκιγκλοπελειολαγῳοσιραιοβαφητραγανοπτερυγών.
वेळ मिळेल तेव्हा दोन्ही रूपांमधला फरक शोधून काढा.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या ग्रीक नाटकाची इंग्रजीत बरीच भाषांतरं आजवर झाली आहेत. त्यातली तीन उल्लेखनीय आहेत. त्यांत हा लांब शब्द कसा अनुवादित केलेला आहे, हे बघा.
रेव्ह. राओलंड (Rowland) स्मिथ (१८३३) लिहितात-
Limpets, oysters, salt fish,
And a skate too a dish,
Lampreys, with the remains
Of sharp sauce and birds' brains,
With honey so luscious,
Plump blackbirds and thrushes,
Cocks' combs and ring doves,
Which each epicure loves,
Also wood-pigeons blue,
With juicy snipes too,
And to close all, O rare!
The wings of jugged hare
बेंजमिन बिकले रॉजर्स (१९०२) म्हणतात-
Plattero-filleto-mulleto-turboto-
-Cranio-morselo-pickleo-acido-
-Silphio-honeyo-pouredonthe-topothe-
-Ouzelo-throstleo-cushato-culvero-
-Cutleto-roastingo-marowo-dippero-
-Leveret-syrupu-gibleto-wings
आणि लिओ स्ट्रॉस (१९६६) लिहितो-
oysters-saltfish-skate-sharks'-heads-left-over-vinegar-dressing-laserpitium-leek-with-honey-sauce-thrush-blackbird-pigeon-dove-roast-cock's-brains-wagtail-cushat-hare-stewed-in-new-wine-gristle-of-veal-pullet's-wings
आता या तिघातलं कोणतं रूप तुम्हाला भावतं, हे तुम्हीच ठरवा.
..................................................................................................................................................................
भरलं पोट? की अजून काही पाहिजे? हे घ्या…
तुमच्या मते संस्कृत भाषेतलं सर्वांत लांब वाक्य कोणतं असेल?
विकीपिडिआनुसार-
“निरन्तरान्धकारितदिगन्तरकन्दलदमन्दसुधारसबिन्दुसान्द्रतरघनाघनवृन्द-सन्देहकरस्यन्दमानमकरन्दबिन्दुबन्धुरतरमाकन्दतरुकुलतल्पकल्पमृ-दुलसिकताजालजटिलमूलतलमरुवकमिलदलघुलघुलयकलितरमणीय-पानीयशालिकाबालिकाकरारविन्दगलन्तिकागलदेलालवङ्गपाटलघनसा-रकस्तूरिकातिसौरभमेदुरलघुतरमधुरशीतलतरसलिलधारानिराकरिष्णुत-दीयविमलविलोचनमयूखरेखापसारितपिपासायासपथिकलोकान्”
(निरन्तरान्धकारित दिगन्तर कन्दलदमन्द सुधारस बिन्दु सान्द्रतर घनाघनवृन्द- सन्देहकर स्यन्दमान मकरन्द बिन्दु बन्धुरतर माकन्द तरु कुल तल्प कल्प मृदुल- सिकता जाल जटिल मूल तल मरुवक मिलदलघु लघु लय कलित रमणीय-पानीय शालिका बालिका करार विन्द गलन्तिका गलदेला लवङ्ग- पाटल घनसार कस्तूरिकातिसौरभ मेदुर लघुतर मधुर शीतलतर सलिलधारा निराकरिष्णु तदीय विमल विलोचन मयूख रेखापसारित पिपासायास पथिक लोकान्)
‘तुंदिर’ प्रदेशाचं (आताच्या तामिळनाडूमधल्या तोंडाईमंडलमचं) वर्णन करणाऱ्या या वाक्याचा अर्थ साधारणपणे असा करता येईल-
“(त्या मध्ये) तहानेनं व्याकुळ झालेल्या प्रवाशांचा त्रास मुलींच्या तेजस्वी डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या किरणपुंजांमुळे कमी होत होता; प्रकाशझोतांनाही लाजवतील असे हे नेत्रकिरण होते; वाळा आणि मरवा या वनस्पतींच्या जाड मुळांनी बनवलेल्या सुरेख आकाराच्या पाणपोयांमध्ये बसलेल्या सुंदर मुलींच्या कमळाच्या आकाराच्या हातांमध्ये धरलेल्या माठांमधून वेलदोडा, लवंग, केशर, कापूर, आणि कस्तुरीच्या सुवासानं दरवळणारं गोड आणि थंड जल बाहेर पडत होतं; तळाशी मऊ वाळूनं आच्छादलेल्या जमिनीतून आंब्याची रोपं बाहेर पडत होती, तिथे सावली होती, आणि खाली पडणाऱ्या पुष्परसाच्या थेंबांमुळे हे सारं अतिशय मनोहारी वाटत होतं; असा भास होत होता की, जणू काही अमृतानं ओतप्रोत भरलेल्या दाट पावसाळी ढगांनीच तिथे गर्दी केली आहे.”
हे भाषांतर कामचलाऊ आहे, हे मला माहीत आहे. कवी-हृदयाचा एखादा संस्कृत पंडित याला अधिक उत्तम आणि रसपूर्ण शैलीत लिहू शकेल, याची मला खात्री आहे. पण यावरून तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल.
देवनागरी लिपीतल्या १९५ अक्षरांनी बनलेलं उपरोक्त संस्कृत वाक्य ‘वरदंबिका परिणय चंपू’ या ग्रंथात सापडतं. दक्षिण भारतातल्या विजयनगरची राणी तिरुमलांबा हिनं सोळाव्या शतकात त्याची रचना केली आहे. रोमन लिपीत ते तसंच लिहायला ४२८ अक्षरांचा वापर करावा लागतो. त्यामुळे जगातल्या अन्य कोणत्याही भाषेतल्या वाङ्मयात एवढं प्रदीर्घ वाक्य दिसून येणार नाही, असा दावा केला जातो. पहा-
https://www.guinnessworldrecords.com/world-records/longest-word
या विषयावर अजून खूप काही लिहिण्यासारखं आहे, पण सध्या एवढंच पुरे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
आजचा पस्तुरी (lagniappe) शब्द - Schmutzwortsuche
डॉ. सॅम्युअल जॉन्सन हे नाव न ऐकलेला इंग्रजी भाषाप्रेमी सहसा मिळणार नाही. इंग्रजीची पहिली सविस्तर, पद्धतशीर डिक्शनरी तयार करण्याचं श्रेय जॉन्सनला जातं. त्याचा ‘A Dictionary of the English Language’ हा शब्दकोश १७५५मध्ये प्रकाशित झाला. तोपर्यंत उपलब्ध असलेले शब्दकोश सदोष होते. इंग्रजीची खऱ्या अर्थानं पहिली डिक्शनरी जॉन्सनचीच होती.
हा ग्रंथराज प्रसिद्ध झाल्यावर मिसेस डिग्बी आणि मिसेस ब्रुक या नावाच्या दोन घरंदाज, कर्मठ स्त्रिया जॉन्सनला भेटायला आल्या. त्यांनी दोन कारणांसाठी त्याचं अभिनंदन केलं. एक तर हा ग्रंथ फारच उत्कृष्ट होता आणि दुसरं म्हणजे या महिलांना त्यात एकही अश्लील, वाईट अर्थाचा शब्द सापडला नाही. त्यावर फाटक्या तोंडाच्या जॉन्सननं त्यांना पटकन विचारलं, “म्हणजे मॅडम, असे शब्द शोधून काढायला तुम्ही माझा शब्दकोश वाचला की काय?” यावर काही न बोलता त्या बायकांनी तिथून पळ काढला. (या आख्यायिकेच्या अनेक आवृत्त्या आहेत, पण त्या साऱ्या याच अर्थाच्या आहेत.)
शब्दांना वाईट, अश्लील, गावराण, ग्राम्य, अशी लेबलं लावणारे अनेक लोक या जगात आहेत. तुम्ही शिवी देत नाही, ‘खराब’ शब्द उच्चारत नाही, इथवर ठीक आहे. पण शब्दकोशातही या शब्दांना स्थान मिळू नये, ही अपेक्षा चुकीची आहे. शब्दांच्या अभ्यासकाला असं सोवळंओवळं नसतं. तो सर्वच शब्दांना समान न्याय देतो.
आजचा पस्तुरी शब्द याच्याशीच संबंधित आहे- Schmutzwortsuche
Schmutz (श्मुट्झ) घाण, wort (व्हट), suche (सच) शोध
कळलं? शब्दकोशातून ‘घाणेरडे’, ‘वाईट’, ‘अश्लील’ शोधून काढणं, त्यांचा जाणिवपूर्वक शोध घेणं, या क्रियेला ‘Schmutzwortsuche’ (श्मुट्झव्हटसच) असं म्हणतात. हा शब्द तीन जर्मन शब्दांचा मिळून बनला आहे. अनेक मुलं तरुणपणात असे चावटपणाचे उद्योग करत असतात.
या पलीकडे या शब्दाविषयी जास्त काही सांगता येणार नाही.
तुम्हाला सॅम्युअल जॉन्सनची मूळ डिक्शनरी वाचायची, चाळायची असेल, तर या दुव्याला भेट द्या, तिथे ती online आहे-
https://johnsonsdictionaryonline.com/index.php
तोवर मी माझ्या लायब्ररीतला एखादा जुना शब्दकोश उघडून त्यात किती ‘डर्टी वर्ड्स’ आहेत, हे शोधून काढतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
जाता जाता थोडी गंमत.
आजच्याप्रमाणेच पूर्वीच्या काळीदेखील लेखकांना आपली पुस्तकं लोकप्रिय व्हावीत, त्यांचा खप व्हावा, आणि त्यातून आपल्याला नाव, प्रसिद्धी, आणि पैसा मिळावा, अशी अपेक्षा असायची. हे स्वाभाविकच होतं. सॅम्युएल जॉन्सनसुद्धा याला अपवाद नव्हता. त्या काळात यासाठी लेखक एखाद्या बड्या, वजनदार, श्रीमंत पॅट्रन किंवा स्पॉन्सर म्हणजे पाठीराख्याच्या किंवा प्रायोजकाच्या शोधात असायचे. साधारणपणे अशी व्यक्ती म्हणजे त्या गावातला कोणी खानदानी उमराव, पिढीजात जमीनदार, किंवा मग एखादा नामांकित राजकारणी असायची. तिनं लेखकाचा ‘पॅट्रन’ व्हायचं कबूल केलं की, मग लेखक कृतज्ञतापूर्वक आपला ग्रंथ त्या व्यक्तीला अर्पण करायचा आणि या बड्या हस्तीचं नाव वापरून त्याची विक्री करायचा. अमीर उमरावानं ज्या पुस्तकाचं कौतुक केलं आहे, ते विकत घेण्याकडे लोकांचा सहसा कल असायचा. पुढे केव्हा तरी हा प्रकार बंद झाला.
‘ब्लॅकअॅडर’ नावाच्या एका जुन्या आणि अतिशय गाजलेल्या इंग्रजी टीव्ही कॉमेडी मालिकेच्या एका भागात चक्क जॉनसन आणि त्याची डिक्शनरी यांच्यावरच या प्रथेवरून जबरदस्त विडंबन केलं गेलं आहे. आपल्या सर्वांचा परिचित रॉवन (मिस्टर बीन) अॅटकिन्सन यात एका नोकराचं काम करतो. आपल्या डिक्शनरीला ‘पॅट्रन’ मिळवायला आलेल्या जॉन्सनची तो नवे, विचित्र आणि जॉन्सनलाही माहीत नसलेले शब्द वापरून विकेट घेतो. आपल्या शब्दकोशात इंग्रजीतले सर्व शब्द संग्रहित केलेले आहेत, हा जॉन्सनचा गर्व जेव्हा दूर होतो, तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा होतो. हा एवढा एकच प्रसंग आपण या दुव्याला भेट देऊन ऑनलाईन बघू शकता-
(पी. जी. वुडहाऊसनंही या प्रथेवर छान विडंबन केलं आहे. पण ते लेखी होतं.)
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment