ख्रिस्ती समाज कसा आहे, याविषयी इतरांना कुतूहल असते. या समाजाच्या लोकांमध्ये घरी कोणती भाषा बोलली जाते, चालीरीती, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा काय आहेत, याविषयी तर अनेक गैरसमज आहेत. खरे तर भारतातील आणि महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज हा या मातीतीलच एक समाजघटक आहे. एक धार्मिक श्रद्धा सोडली तर इतर कुठल्याही बाबतीत हा समाज इतर स्थानिक समाजघटकांपासून वेगळा नाही. महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज हा बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक आहे. पत्रकार कामिल पारखे यांनी ‘क्रुसाभोवतालचा मराठी समाज’ या लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातून महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजाची ओळख करून दिली आहे. या पुस्तकातील हा एक लेख…
..................................................................................................................................................................
‘कम इन...!’ मी त्या अर्धवट खुला असलेल्या ग्रिलच्या दरवाज्यावर खटखटकले, तसे हे उत्तर आले. दरवाजा खोलून मी आत गेलो, तेव्हा आपल्या खुर्चीवर निवृत्त बिशप व्हॅलेरियन डिसोझा बसले होते. हा दिवस होता अगदी अलीकडचा म्हणजे ६ फेब्रुवारी २०२०चा. बिशप आपल्या नेहमीच्या सवयीनुसार अगदी टापटीप पोशाखात होते. शर्ट, त्यावर जाकिट, डोक्यावर कॅप, मोजे घातलेले दोन्ही पाय एका छोट्याशा स्टुलावर ठेवून बसलेल्या बिशपांच्या एका हातात रोझरीची माळ होती. बिशप व्हॅलेरियन हे भारतीय कॅथोलिक बिशपांच्या जुन्या पिढीतील, मात्र आधुनिक जगाच्या तंत्रज्ञानाशी पूर्ण जूळवून घेतेलेले ख्रिस्तमंडळाचे शेवटचे धर्माधिकारी होते.
‘ओ, कामिल..!’ मला पाहताच ते म्हणाले. प्रत्येक भेटीत मी भेटल्यावर त्यांनी मला अशी नावाने हाक मारली की, मी सुखावत असे. कारण गेली ३० वर्षे ते मला ओळखत असले तरी आमची भेट काही वर्षांच्या अंतराने होत असे आणि त्यामुळे प्रत्येक वेळी ते मला ओळखतील की नाही, याची मला शंका वाटायची. बिशपांची आता नव्वदीच्या दिशेने वाटचाल चालू असली तरी अजूनही त्यांची स्मरणशक्ती अगदी तल्लख होती.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
पुण्यातील रेस कोर्सच्या जवळ असलेल्या सेंट पॅट्रिक कॅथेड्रलच्या आवारात काही कामानिमित्त आल्यावर तेथेच असलेल्या व्हियानी होम या निवृत्त धर्मगुरूंच्या निवासस्थानात असलेल्या बिशप व्हॅलेरियन यांना भेटण्यासाठी मी आलो होतो. बिशपांना निवृत्त होऊन आता दहा-अकरा वर्षे झाली होती. त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या रोडावत चालली होती. मी त्यांच्याकडे कसलेही काम नसताना खास त्यांना भेटण्यासाठी तेथे आलो, याचा बिशपांना नक्कीच आनंद झाला होता, तसे त्यांनी बोलूनही दाखवले. एक-दीड वर्षापूर्वी कुठल्या तरी मोठ्या आजारात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, हे मी ऐकले होते. तरीही पहिल्या मजल्यावरच्या आपल्या निवासस्थानासमोरच्या पॅसेजमध्ये हातात काठी घेऊन चालण्याचा व्यायाम करण्याचा शिरस्ता त्यांनी कायम ठेवला होता.
विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे आज मी बातमीदार म्हणून त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो नव्हतो. केवळ एक ‘कर्टसी कॉल’ म्हणून मी त्यांच्या भेटीसाठी आलो होतो. खूप वर्षांपूर्वी छातीत पेसमेकर बसवलेल्या शहाऐंशी वर्षांच्या पण स्वत:ला एकदम तंदुरुस्त ठेवलेल्या बिशप व्हॅलेरियन यांच्याशी गप्पा मारताना ही माझी त्यांच्याशी शेवटची भेट असेल आणि त्यांना अशा प्रकारे सदिच्छा भेट देणाऱ्यापैकी मी त्यांचा एक शेवटचा चाहता असेल, असे मला वाटलेही नाही.
गोव्यातील ‘नवहिंद टाइम्स’ची नोकरी सोडून पुण्यात स्थायिक झाल्यावर ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९९०च्या सुमारास बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांना पहिल्यांदा ‘इंडियन एक्स्प्रेस’चा बातमीदार मी म्हणून भेटलो होतो. श्रीरामपूरसारख्या छोट्याशा शहरात राहताना पुणे-स्थित बिशपमहाशय म्हणजे अगदी पोपमहाशयांसारखे खूप मोठे व्यक्तिमत्त्व वाटायचे. मी शाळेत असताना फक्त दृढीकरण किंवा कन्फर्मेशन साक्रामेन्तासाठी त्या वेळचे बिशप विल्यम गोम्स त्या काळच्या अवाढव्य आकाराच्या म्हणजे अनेक महसुली जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे धर्मप्रांतातील शहरांना आणि गावांना दोन वर्षांतून एकदा भेट द्यायचे. याचे कारण म्हणजे बाप्तिस्मा, ख्रिस्तशरीर, कम्युनियन, लग्न आणि अंत्यविधी वगैरे कॅथोलिक सप्त स्नानसंस्कारांपैकी बहुतेक सांक्रामेंतांचे पौराहित्य धर्मगुरू म्हणजे फादर करत असले तरी कन्फर्मेशन सांक्रामेंत देण्याचा अधिकार केवळ बिशपांना असतो. निदान या निमित्ताने तरी प्रत्येक कॅथोलिक भाविकांची आयुष्यात किमान एकदा तरी बिशपांशी म्हणजे वरच्या पातळीच्या धर्माधिकाऱ्याशी थेट संबंध येत असतो.
गोव्यात १४-१५ वर्षे राहून आणि बातमीदार असूनसुद्धा तेथील गोवा, दमण आणि दीव या प्रदेशाचे आर्चबिशप पॅट्रियार्क असलेले राऊल गोन्साल्वीस यांच्याशी त्यांच्या पणजीतील अल्तिनो येथील बिशप्स पॅलेसमध्ये मुलाखत वा वैयक्तिक भेट कधीही झाली नव्हती. बिशपांना त्या काळात पत्रात किंवा औपचारिकरित्या संबोधित करताना ‘युवर लॉर्डशिप’ असे म्हणण्याची पद्धत होती. गोव्यात ‘नवहिंद टाइम्स’चा बातमीदार म्हणून कराचीचे आर्चबिशप कार्डिनल जोसेफ क्वॉर्डेरो यांची मी १९८३च्या दरम्यान मुलाखत घेतली होती. ख्रिस्तमंडळात पदश्रेणीत आर्चबिशप कार्डिनल हे बिशपांच्या वरचे आणि पोपमहाशयांच्या खालच्या श्रेणीचे. तेव्हा रुढ पद्धतीनुसार कार्डिनल जोसेफ क्वॉर्डेरो यांना मी आता कालबाह्य झालेल्या सरंजाम पद्धतीनुसार ‘युवर एक्सलन्सी’ म्हणूनच संबोधले होते, याची आता मला गंमत वाटते.
परमगुरु स्वामींना किंवा पोपमहाशयांना आजही ‘होली फादर’, ‘युअर होलीनेस’ असेच संबोधले जाते. त्यामुळे बिशप व्हॅलेरियन यांच्या पुण्यातील पत्रकार म्हणून माझ्या पहिल्याच पहिल्याच भेटीत एक श्रद्धावंत म्हणून प्रचलित शिष्टाचार पाळत बिशपांचा उजवा हात हातात घेऊन त्यांच्या बोटातील अंगठीचे मी आदराने चुंबन घेतले होते. बिशप व्हॅलेरियन यांच्याशी झालेली माझी ही पहिली भेट आजही माझ्या चांगली स्मरणात आहे.
या आमच्या भेटीपूर्वी जवळजवळ एक दशकापूर्वी तेव्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या जॅकलिनला १९८०च्या आसपास बिशप व्हॅलेरियन डिसोझा भेटले होते. वसईचे सुपुत्र फादर नेल्सन मच्याडो यांची तेव्हा हरेगावच्या सेंट तेरेझा स्कुलचे प्रिन्सिपल म्हणून बिशपांनी नेमणूक केली होती. शाळेतील गणवेशातील जॅकलीनचा बिशप व्हॅलेरियन यांच्याबरोबरचा कृष्णधवल फोटो आजही जपून ठेवला आहे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
हरेगावच्या नेमणुकीआधी फादर नेल्सन मच्याडो हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील रोझरी स्कुलचे प्रिन्सिपल होते. आजऱ्याहून ते कराड येथे येशुसंघीय फादर प्रभुधर यांना भेटण्यासाठी येत असत तेव्हा म्हणजे १९७६-७७ साली मी तेथे येशूसंघीय प्री-नॉव्हिस म्हणून अकरावीला शिकत होतो. फादर नेल्सन मच्याडो आणि माझी अशी पहिली मुलाखत झाली. त्यानंतर १६ वर्षांच्या कालावधीनंतर फादर मच्याडो आणि मी पुन्हा भेटलो. त्या वेळी ते पुण्याच्या विद्या भवन स्कुलचे प्रिंसिपल होते. ताडीवाला रोडवरील चर्चमध्ये माझे आणि जॅकलिनचे झालेल्या लग्नाचे बिशप व्हॅलेरियन यांनी पौराहित्य केले होते! त्या वेळी परंपरेनुसार मिस्साविधीमध्ये मंगळसुत्राला आशीर्वाद देऊन, आमच्या दोघांच्या अंगठ्यांना आशीर्वाद देऊन त्या नवदाम्पत्याने एकमेकांच्या बोटांत घातल्यावर मग चर्चच्या लग्नाच्या रजिस्टरवर सह्या होऊन हे लग्न पार पडले होते. यानंतर बिशप व्हॅलेरियन यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध वाढत गेले.
कुठल्याही कार्यक्रमात वा प्रसंगांत मी समोर आल्यावर ‘ओ कामिल’ असे बिशप व्हॅलेरियन म्हणत तेव्हा त्यांच्या वडिलांचेही नाव कामिल होते, याची मला न चुकता आठवण व्हायची. बिशप व्हॅली यांचा जन्म पुण्यातला असला तरी त्यांचे कुटुंबिय मूळचे पार्रा या गोव्यातील पोरवोरीम जवळच्या गावचे. कामिल हे नाव ऐकून महाराष्ट्रात माझ्याकडे अनेक जण विचित्र नजरेने पाहत असले तरी गोव्यात हे नाव सर्वपरिचित असते. पणजीतल्या आमच्या ‘नवहिंद टाइम्स’ या इंग्रजी दैनिकातच कामिल या नावाचे तीन कर्मचारी होते. गोव्यात सिटी बसमध्ये कामिल म्हणून कुणी हाक मारली तर त्या दिशेने वळून पाहण्याचे साधे कष्टही मी त्यामुळे घेत नसायचो. श्रीरामपूरचे त्या वेळचे जर्मन धर्मगुरू फादर आयवो मायर यांनी माझ्या बाप्तिस्म्याच्या वेळी मला हे नाव दिले, याचे कारण माझ्या जन्माच्या दिवशी म्हणजे १८ जुलैला संत कामिल - सेंट कामिलस - याचा सण होता. कॅथोलिक चर्चचे किंवा खिस्तमंडळाचे स्वतःचे पूर्ण वर्षाचे कॅलेंडर असते, या कॅलेंडरनुसार त्या दिवशी सण असेल त्यानुसार त्या संताचे नाव बाप्तिस्म्याच्या वेळी मुलाला वा मुलीला देण्याची प्रथा होती. उदाहरणार्थ, कामिल - कामिला, व्हॅलेंटाईन - व्हॅलेंटीना इत्यादी
या दरम्यान पत्रकार या नात्याने बिशप व्हॅलेरियन यांच्याशी माझे आणि पुण्यातील इतरही अनेक पत्रकारांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. याचे कारण म्हणजे दरवर्षी २३ डिसेंबरला बिशप हाऊसमधून त्यांचे सचिव सॅमसन डॉसन यांच्याकडून पुणे शहरातील सर्व इंग्रजी दैनिकांना आणि सकाळ, लोकसत्ता आणि लोकमत यासारख्या मराठी दैनिकांना लिफाफ्यातून ‘बिशप्स ख्रिसमस मॅसेज’ पाठवला जायचा. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये हा संदेश टाइप करून बिशप व्हॅलेरियन यांच्या फोटोसह बातमीसाठी न्यूज डेस्ककडे पाठवण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. पुण्यातील सर्व इंग्रजी दैनिके आणि प्रमुख मराठी दैनिके बिशपांचा हा संदेश नाताळाच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरच्या अंकांत सर्रासपणे अगदी आवर्जून ठळकपणे वापरत असत.
ही परंपरा कशी सुरू झाली याची एक गंमतीदार पार्श्वभूमी आहे. पुण्यात नव्यानेच सुरू झालेल्या ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या आवृत्तीत मी बातमीदार म्हणून १९८९च्या नोव्हेंबरला रुजू झालो तेव्हा ‘महाराष्ट्र हेराल्ड’ (पूर्वाश्रमीचे ‘पूना हेराल्ड’ आणि आताचे ‘सकाळ टाइम्स’) हे पुण्यातील सर्वाधिक खपाचे इंग्रजी दैनिक होते. पुणे कॅम्पात राहणाऱ्या सिंधी, पारशी आणि मूळचे गोवन, तामिळ, तेलगू आणि केरळी ख्रिस्ती समाजामध्ये हे इंग्रजी वृत्तपत्र प्रामुख्याने वाचले जायचे. आपल्या या ख्रिस्ती वाचकांसाठी बिशपांचा ख्रिसमस मॅसेज महाराष्ट्र हेराल्ड दरवर्षी न चुकता छापत असे. हे ख्रिस्ती वाचक आपल्याकडे वळवून घेण्यासाठी आमच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुणे आवृत्तीतही १९८९पासून बिशपांचा नाताळाचा संदेश छापू जाऊ लागला.
वृत्तपत्रे एकमेकांचे वाचक पळवण्याचा उद्योग सतत करत असतातच. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ची पुणे आवृत्ती २००० साली सुरू झाली, तेव्हा ‘इंडियन एक्सप्रेस’ सोडून मी तेथे रुजू झालो आणि तेथेही ख्रिस्ती वाचकांसाठी बिशपांचा ख्रिसमस मॅसेज वापरणे अलिखित संकेत बनला, तो याच कारणाने.
बिशप व्हॅली यांचा हा संदेश तीन ते पाच छोट्या पॅराग्राफचा असायचा, आणि त्यात एखादा छोटासा चुटकुला असायचा. शब्द अगदी मोजके मर्यादित असल्याने त्यात उपलब्ध जागेत कुठलीही काटछाट करायला उपसंपादकाला निमित्त वा कारण नसायचे. माझ्या माहितीनुसार बिशपांचा असा संदेश दैनिकांत वापरण्याची प्रथा भारतात वा इतरत्र कुठेही नसावी. व्हॅलेरियन डिसोझा बिशप झाल्यानंतर पुण्यात ही परंपरा सुरू झाली आणि ती आजतागायत चालू राहिली आहे हे मात्र खरे.
‘ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ हे पुस्तक लिहून मी हातावेगळे केले, तेव्हा या पुस्तकाच्या छपाईचा खर्च कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. नवागत लेखकाला प्रकाशक दारात उभा करत नाही, हे माहीत असल्याने मी बिशप व्हॅलेरियन यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी या मराठी पुस्तकाचे हस्तलिखित फादर सायमन अल्मेडा या मराठीभाषक फादरांना वाचायला सांगितले. त्यांच्याकडून पसंती आल्यावर बिशपसाहेबांनी छपाईसाठी पूर्ण निधी तात्काळ मिळवून दिला! त्या वेळी मी ‘टाइम्स ऑफ इंडिया’त काम करत होतो. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन बिशप व्हॅलेरियन डिसोझा, ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक रवि श्रीनिवासन, ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक सदा डुंबरे आणि लेखक अनिल दहिवाडकर यांनी केले.
या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘कंट्रीब्युशन ऑफ ख्रिश्चन मिशनरीज इन इंडिया’ गुजरातमधील आणंद येथील गुजरात साहित्य प्रकाशनने प्रसिद्ध केली. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम सोन्याबापू वाघमारे आणि जे. डी. आढाव यांच्या नेतृत्वाखालील प्रगत पदवीधर संघटनेने २००७ साली आयोजित केला होता. तेव्हा माझ्या या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशनसुद्धा बिशप व्हॅली यांनीच केले होते!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
एक गोष्ट इथे मुद्दाम सांगायला पाहिजे. बिशप व्हॅलेरियन यांच्याशी माझा पत्रकार आणि एक लेखक म्हणून गेली ३० वर्षे अनेकदा संबंध येत असला तरी माझ्या धार्मिक पुर्वायुष्याची त्यांना कल्पना होती, असे मला वाटत नाही. मी स्वतः एक कॅथोलिक धर्मगुरू होण्यासाठी आपले घर पंधराव्या वर्षी सोडले होते आणि पाच वर्षे येशूसंघीय प्री-नॉव्हिस म्हणून गोव्यात शिकत होते, हा विषय कधी आमच्या दोघांच्या बोलण्यात आला नाही. मी मूळचा मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा आणि श्रीरामपूरचे माझे कौंटुंबिक धागे याविषयीच त्यांना अधिक आत्मीयता होती आणि ते तसे अनेकदा खासगी संभाषणात आणि सार्वजनिक व्यासपीठावरूनही बोलून दाखवत असत. या पुस्तक प्रकाशनावेळीही त्यांनी माझ्या या सांस्कृतिक वारशाविषयी कौतुकास्पद टिपण्णी केली होती.
कॅथोलिक खिस्तमंडळाच्या कारभारासाठी तसेच कॅथोलिक भाविकांच्या वैयक्तिक जीवनाच्या कायदेकानूंसाठी (लग्न, घटस्फोट वगैरे) स्वतंत्र कॅनन लॉ आहे. या कॅनन लॉ नुसार बिशप व्हॅलेरियन वयाच्या ७५व्या वर्षी बिशपदावरुन निवृत्त झाले. यादरम्यान त्यांची मी एकदा मुलाखत घेतली होती तेव्हा ते गंमतीने म्हणाले होते- “कामिल, आय बिलिव्ह द गुड लॉर्ड इंजेक्टस अ स्पेशल डीएनए ऑफ अ लॉन्गर लाईफ व्हेन एव्हर अ न्यु बिशप इज अपाँइंटेड फॉर द पूना डायोसिस!” (पुण्याच्या नव्या बिशपांची नेमणूक झाली की, दयाळू परमेश्वर त्यांच्या मानेत दीर्घायुष्याच्या डीएनए चे इंजक्शन टोचत असतो!)
१८५४ मध्ये स्थापन झालेल्या पूणे धर्मप्रांतात २००८पर्यंत फक्त पाच बिशप झाले होते, याचे कारण यापैकी सर्वच बिशपांना लाभलेले दीर्घायुष्य! मराठीतील शतायुषी ठरलेल्या आणि आजही प्रसिद्ध होणाऱ्या मोजक्या नियतकालिकांपैकी एक असलेल्या ‘निरोप्या’ या मराठी मासिकाचे संस्थापक-संपादक जर्मन आर्चबिशप हेन्री डोरिंग हे चार दशके पुणे धर्मप्रांताचे बिशप होते आणि त्यांना ९८ वर्षांचे आयुष्य लाभले होते.
व्हॅलेरियन डिसोझा हे २५ सप्टेंबर १९७७ रोजी पुणे धर्मप्रांताचे बिशप झाले, तेव्हा त्यांचे वय केवळ ४२ वर्षे होते, त्यामुळे त्यांना तब्बल ३१ वर्षे या धर्मप्रांताचे मेंढपाळ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या काळच्या पुणे धर्मप्रांताची भौगौलिक सीमा कोकणातील रत्नागिरीपासून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यांपर्यंत होती. दृढीकरण सांक्रामेंतासाठी महागुरु स्वामींना विविध जिल्ह्यांचा दौरा करावा लागायचा. ‘या काळात मी केलेला प्रवास हा पृथ्वीला चार वेळेस प्रदक्षिणा केल्यासारखा होता’ असे बिशप व्हॅलेरियन गंमतीने म्हणायचे ते यामुळेच.
व्हॅटिकनने या विशाल पुणे धर्मप्रांतातून प्रथम नाशिक आणि नंतर सिंधुदुर्ग धर्मप्रांतांची निर्मिती केली. तेथे नव्या बिशपांची नेमणूक झाली आणि पुणे धर्मप्रांताचा भौगोलिक आकार, या धर्मप्रांताची शाळा-दवाखाने आणि इतर संस्थांची संख्या आणि भाविकांचीही संख्याही खूप कमी झाली. जगभर पसरलेल्या खिस्तमंडळातर्फे विविध शाळा-कॉलेजेस, दवाखाने, सामाजिक आणि परोपकारी संस्था चालवल्या जातात. धर्मप्रांताचे प्रमुख म्हणून साहजिकच या सर्व संस्थांचे प्रमुख बिशप असतात. अविभिक्त पुणे धर्मप्रांतातील किती संस्थांचा डोलारा बिशप व्हॅलेरियन यांनी सांभाळला असेल, किती नवे पॅरिशेस किंवा धर्मग्राम उभारले असतील, किती नवी देवळे आणि शाळांच्या, इतर संस्थांच्या इमारती बांधल्या असतील, किती विविध प्रकल्प सुरू केले असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी. एके काळी भारतातील सर्वच क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्ती या कधी ना कधी चर्चतर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळा-कॉलेजातील असत असे यामुळेच म्हटले जाई.
पुण्याचे बिशप म्हणून त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील एक महत्त्वाची घटना म्हणजे पोप जॉन पॉल दुसरे यांची १९८६ सालची पुणे भेट. वैश्विक कॅथोलिक चर्चच्या दृष्टीने पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे डी नोबिली कॉलेज आणि पेपल सेमिनरीसारख्या थेट व्हॅटिकनशी संबंध असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या संस्था आहेत, चर्चच्या अधिपत्यातील सेंट व्हिन्सेंट आणि लोयोला स्कुलसारख्या अनेक शाळा आणि इतर अनेक संस्था-संघटना येथे कार्यरत आहेत. त्यामुळे पोपमहाशयांच्या दहा-दिवसीय भारत दौऱ्यात पुण्याचा समावेश होणे साहजिकच होते.
पोप जॉन पॉल यांचे स्थानिक प्रतिनिधी या नात्याने बिशप व्हॅलेरियन डिसोझा पोपमहाशयांच्या पुणे भेटीचे यजमान होते. सर्व जगभरच्या आपल्या दौऱ्यात पॉप जॉन पॉल आपल्या भाषणाची सुरुवात स्थानिक भाषेतील एकदोन वाक्याने करत. पुण्यातील अहमदनगर रोडवर रामवाडी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पोपमहाशयांनी मराठीतून दोन वाक्ये म्हटली. रोममध्ये राहात असलेल्या मदर तेरेसांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या वसईच्या सिस्टर वीरा मच्याडो यांनी परमगुरु स्वामींसाठी ही मराठी वाक्ये लिहून दिली होती! मात्र बिशप व्हॅलेरियन यांनी जॉन पॉल यांचे त्यांच्याच मातृभाषेत म्हणजे पोलिश भाषेत स्वागत करून या वेळी पोपसाहेबांनाच सुखद धक्का दिला होता!
उंचेपुरे आणि देखणे व्यक्तिमत्त्व असलेल्या बिशप व्हॅलेरियन यांना प्रभावी वक्तृत्त्वाची देणगी लाभली होती. विशेष म्हणजे व्हॅलेरियन यांनी आपले धार्मिक शिक्षण जर्मनी येथे पूर्ण केले होते आणि तिथेच त्यांची धर्मगुरू म्हणून गुरुदीक्षाही झाली होती. कॅथोलिक चर्चमधील फादर, बिशप, आर्चबिशप, कार्डीनल आणि पोप या सर्वांनी संन्यासीव्रत स्वीकारले असल्याने ते आयुष्यभर अविवाहित राहून देवळातील फादर, शाळांमध्ये शिक्षक वा प्रिन्सिपल अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत समाजाची सेवा करत असतात. या धर्मगुरुंमधून एकाची बिशप या वरच्या पदावर नेमणूक होते. बिशप नेमण्याची ही पद्धत खूप किचकट आणि गुंतागुंतीची असते. धार्मिक जीवन, चारित्र्य, व्यवस्थापन कौशल्य, सचोटी वगैरे निकषांवर उत्तीर्ण होणाऱ्या धर्मगुरुची या पदावर स्थानिक आणि राष्ट्रीय पातळींवरच्या शिफारशीच्या आधारावर रोममधून व्हॅटिकनतर्फे नेमणूक केली जाते.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
..................................................................................................................................................................
वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी महागुरुपदावर नेमणूक झालेल्या बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांनी आपल्या इंग्रजी, लॅटिन, जर्मन आणि इतर युरोपियन भाषांच्या प्रभुत्वाच्या, वक्तृत्त्वाच्या जोरावर राष्ट्र पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला होता. पुरेपूर तयारी करूनच ते प्रवचन किंवा तप देत असत याची सहभागी झालेल्या लोकांना अनुभूती मिळायची. हरेगावला सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मारिया मातेच्या म्हणजे मतमाऊलीच्या यात्रेला त्यांनी अनेकदा हजेरी लावली होती. भाविकांना, धर्मगुरूंच्या आणि सिस्टरांच्या धार्मिक तप किंवा रिट्रीट देण्यासाठी त्यांना वेळोवेळी आमंत्रित केले जायचे. अगदी अलीकडेपर्यंत तप किंवा रिट्रीट देण्यासाठी वर्षांतून एकदोन महिने युरोपात विशेषतः जर्मनीत त्यांचा मुक्काम असायचा.
भारतात म्हणजे कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या वर्तुळात आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर बिशप व्हॅलेरियन यांना सिंगिंग बिशप या उपाधीने ओळखले जायचे. याचे कारण म्हणजे कुठल्याही धार्मिक उपासनेच्या वेळी गिटारच्या तारा छेडत बायबलमधील गायने गाण्याची त्यांची सवय. मुलांच्या दृढीकरणाचा सोहोळा असो वा तप किंवा रिट्रीट सारखा आध्यात्मिक कार्यक्रम असो, बिशप व्हॅली यांच्या हातात गिटार सोपवून देऊन त्यांच्याकडे गाण्याची फर्माईश हमखास व्हायची. बिशपमहाशयसुद्धा कुठलेही आढेवेढे न घेता गिटार वाजवत ‘द मॅन ऑफ गॅलिली’ हे येशू ख्रिस्तावर आधारीत प्रसिद्ध गीत गात असत. याशिवाय इतर दुसरे कुठलेही गीत गिटार वाजवत म्हणत नसत. ‘मला खरंच हे एकच गाणं गिटारवर वाजवता येतं!’ असे ते मला एकदा म्हटले होते.
निवृत्त बिशप व्हॅलेरियन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सकाळ टाइम्ससाठी मुलाखत घेण्यासाठी मी त्यांना २ ऑक्टोबर २०१३ रोजी भेटलो, तेव्हा पांढरा झगा, त्यावर जॅकेट, गळ्याभोवती बिशपपदाचा क्रूस आणि डोक्यावर कॅप या आपल्या नेहेमीच्या पेहेरावात ते आपल्या लॅपटॉपवर काम करत होते. त्यांचा हॉल अगदी पाहण्यासारखा होता. आपल्या निवृतीआधीच व्हियानी होममध्ये पहिल्या मजल्यावर या आपल्या वातानुकूलित निवासस्थानाची त्यांनी बांधणी केली होती. काचेच्या कपाटात असंख्य धार्मिक आणि इतर पुस्तके, संगीताच्या सीडीज, त्यांना मिळालेली पदके आणि टेबलावर लॅपटॉप! अशा प्रसन्न वातावरणात सुहास्य मुद्रेने ८०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या बिशपांचा हा फोटो दै. ‘सकाळ टाइम्स’चे फोटोग्राफर आनंद चैनी यांनी टिपला होता.
त्या वेळी फेसबुक नुकतेच सामान्य लोकांपर्यंत पोहोचत होते आणि या फेसबुकच्या माध्यमातून सहस्त्रदर्शनाचा सोहोळा पूर्ण करणारे हे बिशपमहाशय आपल्या फ्रेंडलिस्टवर असणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी दर रविवारी एक छोटुकले प्रवचन म्हणजे ‘संडे सर्मन’ लिहीत होते! त्याशिवाय या सर्व फेसबुक फ्रेंडसना ते न विसरता हॅपी बर्थडे, हॅपी अनिवर्सरी असे संदेशही पाठवत असत. मला स्वत:ला माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला “डियर कामिल, लेट मी बी द फर्स्ट टू विश यु अ हॅपी बर्थ डे!” असा मॅसेज त्यांनी पाठवला होता! त्या काळात फेसबुकवर त्यांना दर दिवशी किमान दहा तरी नव्या फ्रेंड रिक्वेस्टस येत होत्या, हे ऐकून मी उडालोच होतो. प्रसारमाध्यमांत असूनही त्या वेळी माझ्या फेसबुक फ्रेंडच्या संख्येने शंभरीही ओलांडली नव्हती.
‘सकाळ टाइम्स’चे त्या वेळी संपादक असलेल्या राहुल चंदावरकर यांनी ‘८० वर्षीय बिशप व्हॅलेरियन यांची फेसबुकगिरी’ अशा शीर्षकाची मी घेतलेली मुलाखत आमच्या इंग्रजी दैनिकाच्या पहिल्या पानावर अँकर म्हणून छापली होती. (चंदावरकर हेसुद्धा बिशप व्हॅलेरियनप्रमाणे येशूसंघीयांच्या पुण्यातील सेंट व्हिन्सेंट स्कूलचे ओल्ड बॉइज होते!)
या फेब्रुवारीत मी बिशप व्हॅली यांना भेटलो, तेव्हा मी त्यांना कुठलेही काम नसताना त्यांना मुद्दाम भेटायला आलो, याचे त्यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे नेहेमीप्रमाणे जॅकलीनची आणि चिंचवडच्या सेंट अँड्रयूज स्कुलच्या तिच्या सुपरवायझरच्या कामाचीही त्यांनी आवर्जून चौकशी केली. तेव्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या जॅकलीनला चाळीस वर्षांपूर्वी आपण भेटलो होतो, पुणे डायोसिसन एज्युकेशन सोसायटी (पीडीसीसी)चे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून आपणच तिची पिंपरी-चिंचवडच्या सेंट अँड्रूज स्कुलमध्ये शिक्षिका आणि नंतर सुपरवायझर म्हणून नेमणूक केली होती, हे ते कधीही विसरले नव्हते.
बिशप व्हॅली यांनी तीन दशकांपूर्वी आपल्या धर्मप्रांतासाठी ‘लाईफ’ हे मुखपत्र सुरू केले. बिशप निवृत्त होण्याआधी काही वर्षांपूर्वी मला त्यांचे सहाय्यक सॅमसन डॉसन यांचा फोन आला – ‘कामिल, बिशपांचे संपादकीय मराठीत भाषांतर करून देतोस का?’ एका क्षणाचाही विचार न करता मी ‘हो’ म्हटले. पुणे धर्मप्रांतात मराठी मातृभाषा असणारे अनेक फादर्स आहेत असा मी विचार केला नाही. त्यानंतर बिशप व्हॅली आपला कार्यभार बिशप थॉमस डांबरे यांच्याकडे सोपवीपर्यंत ‘लाईफ’मध्ये मराठीतही संपादकीय यायचे आणि त्याखाली अनुवादक म्हणून कामिल पारखे असे नाव यायचे!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
का कुणास ठाऊक या भेटीत मी भावुक झालो होतो हे माझ्या लक्षात आले होते. ज्यांच्यामुळे माझे बिशप व्हॅली यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले त्या फादर नेल्सन मच्याडो यांचे वयाच्या ७४व्या वर्षी नुकतेच निधन झाले होते. मी बिशपांना त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याची परवानगी मागितली, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी मी माझ्या मोबाईलवर झटपटत होतो, तेव्हा नव्वदीकडे वाटचाल करणाऱ्या बिशपांनी शांतपणे माझा मोबाईल आपल्या हातात घेऊन तो योग्य पद्धतीने सेट केला आणि माझ्याकडे परत दिला.
मी शरमलो होतो, तरी मी त्यांच्याबरोबर पटापटा दोन-तीन सेल्फी घेतल्या. त्यांचा मी निरोप घेतला तेव्हा आमची ती शेवटची भेट असेल अशी कल्पनाही मनाला शिवली नव्हती. आता राहून राहून वाटते की, आमच्या पहिल्यावहिल्या भेटीसारखेच तेथून निघण्यापूर्वी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी बिशपांच्या त्या अंगठीचे पुन्हा एकदा शेवटचे चुंबन घ्यायला हवे होते!
‘क्रुसाभोवतालचा मराठी समाज’ - कामिल पारखे
चेतक बुक्स, पुणे
मूल्य - २३० रुपये
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment