अजूनकाही
हिंदीतील मसाला चित्रपट पाहताना प्रेक्षकांनी सहसा आपले डोके तिकिट खिडकीपाशीच सोडून यायचे असते, हा नियम आपणांस ठाऊक असतो. तशा चित्रपटांत मूर्खपणा शिगोशिग भरलेला असला, तर्काशी नशशिखांत फारकत घेतलेली असली, तरी ते बनवणारे फार हुशार असतात. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’मधील लॉर्ड पोलोनियसच्या तोंडात एक वाक्य आहे. तो म्हणतो - ‘दाऊ धीस बी मॅडनेस, यट देर इज मेथड इन इट.’ हिंदी सिनेमांतील येडेपणातही अशीच एक व्यवस्था असते. पण कधी कधी असा एखादा चित्रपट येतो की, वाटते- प्रेक्षकांनी डोके काढून ठेवण्याची प्रथा आता निर्माते-दिग्दर्शक यांनीही स्वीकारली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे - अक्षयकुमार अभिनित आणि रणजीत तिवारी दिग्दर्शित ‘बेलबॉटम’ हा चित्रपट.
हा चित्रपट रॉ या गुप्तचर संस्थेच्या एका यशस्वी मोहिमेवर बेतलेला आहे. तो ‘सत्य घटनांवरून प्रेरित’ आहे, हे निर्मात्यांचे म्हणणे. ही अर्थातच कलात्मक स्वातंत्र्य या नावाखाली हवा तो मसाला पेरण्याची पळवाट आहे. हिंदीत तशी ही मळवाटच म्हणावयाची. ‘बेलबॉटम’मध्ये ती यशेच्छ तुडवलेली आहे. जरा अतिच मानव असा नायक, त्याची प्रेमळ मातोश्री, सुंदरशी नायिका, तेवढीच सुंदर खलनायिका, कौटुंबिक प्रेमाचा गाजर का हलवा, ‘नेत्रसुखद’ गाणी, यानंतर मग कौटुंबिक दुःखाची फोडणी, बदले की ढणढणती आग आणि अखेरीस दुष्टांची हार, सुष्टांचा विजय ही सर्व फोडणी तमाम जिरे-मोहरी-हळदीसह ‘बेलबॉटम’ला दिलेली आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
शिवाय त्यावर राष्ट्रवादाची पखरण आहेच. यामुळे हा चित्रपट प्रेक्षकप्रिय होईल, असा लेखक-दिग्दर्शकांचा होरा असावा. परंतु केवळ फोडणीमुळे कालवण चवदार होत नसते आणि मातीच्या लाडवावर सुका मेवा पेरला तरी त्याने मातीची चव बदलत नसते. ‘बेलबॉटम’ची पटकथा ही त्या प्रकारची आहे. ती केवळ चवहीनच नाही, तर वाईट चवीची आहे. याची कारणे दोन.
एक म्हणजे या चित्रपटाची पटकथा ही अत्यंत विसविशीत आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध हा नेहमीचा मसाला घोळण्यात वाया गेला असून, उत्तरार्धात ज्याला उत्कर्षबिंदू म्हणतात तो भाग कधी आला आणि गेला हेच कळेनासे व्हावे, इतका तो छोट्या टिंबाएवढा आहे. परिणामी हा चित्रपट कोणत्याही पातळीवर मनाची पकड घेत नाही. हे एक वेळ माफ करता आले असते. हिंदीतील अनेक चित्रपटांना आपण असे ‘माफीवीर’ बनवलेले आहे. परंतु नायकाला मोठे बनवण्याच्या नादात या चित्रपटाच्या पटकथेने रॉ या संस्थेची आणि त्याच बरोबर आर. एन. (रामेश्वरनाथ) काव आणि ‘कावबॉईज’पैकी एक म्हणून ओळखले जाणारे नौशेरवान फ्रामजी (एन. एफ.) संतूक यांची घोर टवाळी केलेली आहे.
आपल्याकडे पूर्वीही (तथाकथित) गुप्तहेरपट बनत असत. त्यात नायकाचा सहकारी हेर हा हमखास बावळट दाखवला जात असे. परंतु अवघी हेरसंस्थाच बावळट आणि नायक तेवढा अतिहुशार हे मात्र ‘बेलबॉटम’मध्येच पाहावयास मिळते. हा मूर्खपणा पहिल्या काही मिनिटांपासूनच सुरू होतो. या चित्रपटाची सुरुवात विमान अपहरणाच्या घटनेने होते. ती खबर मिळताच रॉचे प्रमुख एन. एफ. संतूक तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ती माहिती देतात. म्हणजे ते रॉच्या कार्यालयातून निघून स्वतः पंतप्रधान कार्यालयात येतात. अपहरणाचे समजताच इंदिरा गांधी त्यांना आदेश देतात - कॉल काव. म्हणजे रामनाथ काव यांना बोलवा.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
..................................................................................................................................................................
काव हे रॉच्या संस्थापकांपैकी एक. पाकिस्तानची फाळणी करण्यात, सीआयए आणि चीन यांच्या कारवाया हाणून पाडत सिक्किमच्या विलिनीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे, फ्रेंच गुप्तचरसंस्थेचे तत्कालिन प्रमुख ले कॉम्ट अलेक्झांद्रे दे मॅरेन्शेज यांनी, सत्तरच्या दशकातील जगातील पहिल्या पाच थोर गुप्तचर प्रमुखांपैकी एक म्हणून नावाजलेले. अनेक देशांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांशीच नव्हे, तर गुप्तचर प्रमुखांशीही ज्यांचे वैयक्तिक मैत्रीचे संबंध असे हे थोर गुप्तचर. मोरारजी देसाई, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांमुळे त्यांना रॉचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर इंदिरा गांधी यांनी त्यांची पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यांना या वेळी पाचारण केल्यानंतर पुढे काय होते? तर पूर्ण सिनेमाभर ते पंतप्रधानांच्या बाजूच्या खुर्चीत मुखस्तंभासारखे बसून राहतात.
अपहरणाची समस्या कशी सोडवावी यासाठी पंतप्रधानांनी बोलावलेली बैठक हा तर हास्यास्पदतेचा नमुना. त्यात एक तर सर्व संबंधित मंत्री आणि अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असतात. आणि ते झाल्यानंतर रॉचे प्रमुख सांगतात की, रॉचा एक एजंट या अपहरणाशी संबंधित सर्व माहिती - म्हणजे त्यामागे कोण आहे वगैरे - देऊ शकेल. तो सर्वज्ञानी एजंट कोण - तर आपला बेलबॉटम. हे त्याचे सांकेतिक नाव. त्याचे खरे नाव खुद्द पंतप्रधानांनाही माहीत नाही. आणि रॉचे प्रमुख ते सांगत नाहीत. कारण काय, तर म्हणे ‘प्रोटोकॉल’!
मग त्या एजंटाला पंतप्रधानांच्या बैठकीस बोलावले जाते. हे लेखक-दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य. वस्तुतः तो जे सांगणार होता, ती माहिती संतूकही देऊ शकले असते. परंतु लेखक-दिग्दर्शकाला नायकाची प्रतिमा मोठी करायची होती. यात संतूक यांच्यासारख्या नावाजलेल्या गुप्तचराची प्रतिमा एखाद्या हेडक्लार्कसारखी होऊन जाते, याची फिकीरही या मंडळींना नाही. पण ही टिंगल काहीच नाही, असा प्रकार पुढे करण्यात आला आहे.
प्रसंग असा की, बेलबॉटम कौटुंबिक कार्यक्रमासाठी लंडनला जातो. तो ज्याच्या शोधात इतकी वर्षे असतो, असा दहशतवादी त्याला तेथे चुकून दिसतो. मग बेलबॉटम ते संतूक यांना कळवतो. ते समजताच संतूक तातडीने लंडनला येतात. तेथे एका रेस्तराँत बसून बेलबॉटम त्यांना आयएसआयच्या काय योजना आहेत, जनरल झिया यांचे ‘ऑपरेशन टोपाझ’ म्हणजे काय हे सारे समजावतो. अगदी पेपर नॅपकिनवर भारताचा नकाशा वगैरे काढून आणि आपले रॉ प्रमुख एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे ते सारे ऐकत असतात. हे सांगत असताना बेलबॉटम त्यांना सूचनाही करतो की, कोक मागवा. तो कशासाठी ते आपल्याला नंतर समजते. भारताच्या नकाशासारखी गोपनीय माहिती शत्रूच्या हाती जाऊ नये म्हणून बेलबॉटम महोदय एका ग्लासात तो नकाशा काढलेला कागद टाकतात आणि त्यावर कोक ओततात. किती भारी ते तंत्र! कहर म्हणजे ‘ऑपरेशन टोपाझ’ हे तेव्हा सुरूही झालेले नव्हते. ते १९८७-८८चे. पण बेलबॉटम यांना त्याची खबर लागली होती १९८४मध्येच. अशा गोष्टींचा सुकाळच या चित्रपटात दिसतो.
२४ ऑगस्ट १९८४च्या सकाळी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी त्या बोईंग विमानाचे अपहरण केले. ‘रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकात त्याची सविस्तर कहाणी आहे. या अपहरण प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे या वेळी प्रथमच भारताने अपहरणकर्त्यांना आणि पर्यायाने त्यांच्या पाकिस्तानी मायबापांना तडाखा दिला होता. दुबई विमानतळावर अत्यंत चलाखीने त्या सर्व अपहरणकर्त्यांना भारतीय सुरक्षादलांनी अटक केली होती. रॉ आणि आयबीचे गुप्तचर यांच्याबरोबरीनेच त्या संपूर्ण घटनेचे श्रेय जाते परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांनाही. परराष्ट्र राज्यमंत्री ए. ए. करीम आणि परराष्ट्र सचिव रोमेश भंडारी यांचे दुबईच्या राजघराण्याशी चांगले संबंध होते. त्याचा या कामी उपयोग झाला होता. पण बेलबॉटमने गुप्तचर यंत्रणांबरोबरच या दोघांनाही अत्यंत हास्यास्पद करून टाकले. मंत्र्यांना काही अक्कल नसते आणि सनदी अधिकारी हे कारकुनी मनोवृत्तीचे असे सर्वसाधारीकरण हिंदी चित्रपटांनी करून ठेवलेलेच आहे. त्याचा चकारीवरून बेलबॉटमची गाडी जाते. अत्यंत उथळ अशी पात्रे, ‘क्लिशें’चा उबगवाणा वापर, तर्काशी फारकत हीच त्याची वैशिष्ट्ये. गलथानपणा, भोंगळपणा आहे तो वेगळाच.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
भूतकाळातील घटनांवर बेतलेल्या चित्रपटात, वास्तू, वस्तू, वेश, भाषा आदींतून तो भूतकाळ दिसावा, अशी एक अपेक्षा असते. पण तिचा निर्माता-दिग्दर्शकाला बहुधा पत्ताच नसावा. त्यामुळे १९८४मध्ये अपहृत विमानाची सुटका करण्यासाठी निघालेले बेलबॉटमसाहेब त्यांच्या पत्नीला फोन करतात, तेव्हा त्यांच्या कार्यालयातील खुर्चीमागे असलेल्या दिनदर्शिकेवर साल दिसते १९८३. त्यांची पत्नी एमटीएनएलची कर्मचारी दाखवलेली आहे. कदाचित एमएटीएनएलच्या कारभारानुसार ती दिनदर्शिका बदलायची राहून गेली असेल, असे मानून घेता येईल. पण त्यात समस्या एकच आहे, की १९८४मध्ये अजून एमटीएनएल जन्माला यायचे होते. त्याची स्थापना झाली १९८६मध्ये.
अशीच एक गंमत अपहृत विमानातील प्रवाशांची. त्यात महिला कबड्डी संघाचा समावेश आहे. त्या मुली विश्वचषकासाठीच्या सराव शिबिरास चाललेल्या असतात. फार लौकर सुरू केला त्यांनी सराव. कारण त्यानंतर तब्बल २० वर्षांनी कबड्डी विश्वचषकास प्रारंभ झाला. काही चित्रपट काळाच्या पुढे असतात, असे म्हणतात. यात सॅटेलाईट फोन वापरणारी पाकिस्तानी व्यक्ती दिसते म्हटल्यावर बेलबॉटम हाही वेगळ्या अर्थाने तसाच म्हणावा लागेल. ट्विटरवर अनेक जणांनी अशा चुका दाखवल्या आहेत. निर्माता-दिग्दर्शक यांच्या अप्रामाणिकपणाचा हा नमुना. एका बाबतीत मात्र ते बऱ्यापैकी प्रामाणिक दिसतात. ते म्हणजे प्रोपगंडा.
चित्रपटकला आणि प्रोपगंडा यांचे नाते जुनेच. आपल्याकडे अतिराष्ट्रवादाचा प्रचार करण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर वापर होताना दिसतो. बेलबॉटमनेही त्यात छोटेसे योगदान दिलेले आहे. यात दिग्दर्शकाचे आभार एवढ्यासाठीच मानावे लागतील की, त्यांनी इंदिरा गांधी यांना पाकिस्तानी नेत्यांपुढे रडताना वगैरे दाखवले नाही. त्यांची ‘पोलादी प्रतिमा’ यातून नक्कीच समोर येते. मात्र त्याचबरोबर हा चित्रपट सतत जुने नेते, प्रस्थापित व्यवस्था, जुने नियम यांच्याविरोधात उभी असलेला नवा, ‘नव्या भारता’तला तरुण प्रेक्षकांसमोर ठेवत राहतो. हा तरुण आहे ‘आम्ही गांधींच्या भूमीतून आलो आहोत, पण आम्ही सुभाषचंद्र बोस यांच्या भूमीतूनही आलो आहोत,’ असे सांगणारा ‘आजचा’ तरुण आहे. आणि म्हणूनच तो ‘अब की बार, उनकी हार’ यासारखे टाळ्याखाऊ वाक्य फेकत असतो.
प्रोपगंडाचे यश तो न दिसण्यात असते. ‘बेलबॉटम’ याबाबत नक्कीच यशस्वी झालेला आहे. तो तिकिटबारीवरही यशस्वी झाल्याचा प्रचार समाजमाध्यमांतून सुरू आहे. ते कदाचित खरेही असेल. आणि तसेच असेल, तर अतिराष्ट्रवादही प्रेमाप्रमाणेच माणसाला आंधळा करतो, हे मात्र शतशः खरे ठरेल. तसे नसते, तर एक चित्रपट म्हणून तो अत्यंत सामान्य तर आहेच, पण त्याने रॉची, रॉच्या थोर गुप्तचरांची बदनामीही केलेली आहे, हे सर्वांच्याच लक्षात आले असते.
..................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment