अजूनकाही
‘फिन्द्री’ ही सुनिता बोर्डे यांची नवीकोरी कादंबरी. १९७६ ते २००२ या काळात ही कथा घडते. एक कुटुंब केंद्रस्थानी असलेली ही सामाजिक कादंबरी आहे.
मिरु दलित समाजातील स्त्री. तिच्या वाटणीला खडतर आयुष्य आलेले असते. दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणे हा तिचा दिनक्रम. तिच्या वाट्याला हे भोग आले आहेत, ते तिच्या दारुड्या नवऱ्यामुळे, दिनकरमुळे. रोज दारू पिऊन घरी येणे आणि आपल्या बायको-मुलांना मारणे हा त्याचा दिनक्रम.
या कादंबरीची नायिका आहे, मिरुची मुलगी, संगीता. मिरु गरोदर असते, पण दिनकरला मुलगी नको होती. मात्र मिरूला मुलगीच होते. दिनकर कमालीचा संतापतो आणि दारूच्या नशेत मुलीला, संगीताला रागाने उचलून फेकून देतो. मिरु संगीताला जवळ घेऊन आक्रोश करते. संगीता मेली म्हणून लोक तिला पुरायला जातात. अचानक संगीताचे हात-पाय हलू लागतात. ती जिवंत असते. अशा प्रकारे संगीताच्या जन्मापासून सुरू झालेला हा संघर्ष शेवटपर्यत चालू राहतो. मिरु आणि संगीता यांचा संघर्ष प्रामुख्याने शिक्षणासाठी असतो. मिरु अडाणी असली तरी बाबासाहेब आंबेडकर हे तिचे श्रद्धास्थान असते. संगीताने खूप शिकावे ही तिची इच्छा असते. पण दिनकरचा तिच्या शिक्षणाला विरोध असतो. आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी मिरु दिनकरचा विरोध मोडून काढते. अखेर एक दलित आणि अडाणी घराण्यातील मुलगी एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेऊन प्राध्यापिका होते. त्याचबरोबर या कादंबरीतून दलित समाजातील विषमता, दारिद्र्य, जातपात, धर्म, पुरुषसत्ता, शिक्षणाचा अभाव या समस्या अधोरेखित होतात.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
संगीताच्या लहानपणापासून तरुणपणापर्यंतचा प्रवास लेखिकेने चांगल्या पद्धतीने चितारला आहे. लहान असताना संगीताला शाळा नकोशी वाटणे, बोर्डिंगमध्ये जाण्याच्या आधी आणि गेल्यावरची तिची मानसिकता, झाडावरच्या कैऱ्या चोरून खाल्याबद्दल आईचा खाल्लेला मार, थोडी मोठी झाल्यावर नाक टोचून घ्यावेसे वाटणे किंवा चांदीच्या चैनपट्या घालाव्याशा वाटणे किंवा वयात आल्यावर शेजारचा मुलगा आवडणे, अशा अनेक प्रसंगांतून संगीताचे व्यक्तिमत्त्व उभे राहते.
काही प्रसंग हृद्य झाले आहेत. उदा. दारुड्या दिनकरचा शिक्षणाला असलेला विरोध पाहून मिरु संगीताला आजीकडे शिकायला ठेवते. एक दिवस आईची आठवण आली म्हणून आपल्या आजीला न सांगता ती आईला भेटायला येते. पण संगीताला गावात बघितल्यानंतर दिनकर तिला व तिच्या आईला बेदम मारतो. संगीताचा बारावीचा पेपर असतो, तेव्हा ती परीक्षेला बसू नये म्हणून दिनकर तिची सर्व पुस्तके विहिरीत टाकून देतो. संगीता महाविद्यालयामध्ये पहिली येते, तेव्हा सर्वजण तिचे कौतुक करतात, पण दिनकर मात्र तिच्या थोबाडात मारतो. संगीता एका मैत्रिणीकडे चहासाठी गेलेली असते, तेव्हा तिची जात कळल्यावर ती तिला वेगळी वागणूक देते.
मिरुची व्यक्तिरेखाही संगीताइतकीच महत्त्वाची आहे. तिची सोशिकता, प्रामाणिकपणा, कोणत्याही शाळेत न शिकता केवळ अनुभवातून घेतलेले ज्ञान, या शिदोरीवर ती संगीताच्या शिक्षणासाठी प्रचंड धडपड करते. त्यासाठी दारुड्या नवऱ्याशी, स्वत:च्या आर्थिक परिस्थितीशी झगडत राहते. मिरु आणि संगीता यांच्या संघर्षाच्या प्रसंगांत आशा आणि निराशा, दु:ख आणि आनंद यांची गुंफण लेखिकेने चांगली केलेली आहे. संगीताने रेल्वेवर मोलमजुरी करून आईसाठी मिळवलेले पैसे सुखाची चाहूल निर्माण करतात. पण जेव्हा तेच कष्टाच्या कमाईचे पैसे दिनकर दारूच्या गुत्त्यावर उडवतो, तेव्हा तिला खूप दु:ख होते.
कादंबरीच्या सुरुवातीला संगीता आपल्या पोटातल्या बाळाला तिच्या जन्माची कहाणी सांगते आहे, अशी कल्पना केली आहे. पण संगीताने खडतर आयुष्य सहन केल्यावरसुद्धा तिला मुलगीच व्हावी असे वाटत असते, हे बदलत्या काळाचे, तसेच प्रगल्भ विचारसरणीचे द्योतक आहे. या कादंबरीची भाषा मराठवाडा बोलीची आहे. त्यातील काही शब्दांचा अर्थ कादंबरीच्या शेवटी दिला आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
..................................................................................................................................................................
काही गोष्टी मात्र खटकतात. कादंबरीच्या सुरुवातीला मिरु छोट्या संगीताला घेऊन बाजारात जाते असा प्रसंग आहे. तेव्हा ओझ्याने थकून गेलेल्या आईचे चालणे बघून संगीताच्या मनात विचार येतो- ‘आईच्या डोक्यावर जर कोणतेच ओझं नसतं तर ती किती वेगाने पुढे गेली असती.’ अद्याप जी मुलगी शाळेतही गेली नाही, तिच्या निरागस मनात असे विचार येणे शक्य नाही, असे वाटते. किंवा संगीता वयात आल्यावर स्वत:चे मोकळे आणि लांब केस बघितल्यावर गाणे गुणगुणते-‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’. या कादंबरीचा एक बाज आहे. संगीता हे व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर एका वेगळ्या पद्धतीने उभे राहते. त्यामुळे हे गाणे काहीसे विसंगत वाटते.
काही प्रसंगही संदर्भहीन वाटतात. संगीताच्या बोर्डिंगमध्ये गुणमती नावाची नवीन महिला स्टाफ येते. गुणमतीला भेटायला दिनकर तिथे नेहमी येतो आणि गुणमती, संगीता व दिनकर बाहेर बाजारात जातात. गुणमती आणि दिनकर यांचे संबंध असतात. गुणमतीची व्यक्तिरेखा अचानक येते आणि जाते. जर दिनकरला बाहेरख्याली दाखवायचाच होता, तर तो अजून वेगळ्या पद्धतीनेही दाखवता आला असता.
मिरुला दिनकर रक्तबंबाळ होईपर्यंत मारतो. तीही त्याचा राग करत असतेच. तडजोड म्हणून ती आयुष्य ढकलत राहते. अशा नवऱ्याचा मिरुला अभिमान का वाटावा? एका प्रसंगात आपल्या नवऱ्याचे गुणगान ती संगीताजवळ करत असते. दिनकरला ढोलकी आवडते आणि तो आपल्या धाकट्या मुलाला कॅसिओ घेऊन देतो. पण दुसऱ्या एका प्रसंगात दिनकर आपल्या मुलांना कुल्फी घेऊन न देता रस्त्यावरच्या मुलांना घेऊन देतो. यात सरळ सरळ विसंगती दिसते.
दिनकर इतका अन्याय करत असतानाही मिरु कधीच पोलिसांकडे का जात नाही? जी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धास्थान मानते, तिने पोलिसांकडे जाणे स्वाभाविक होते. मिरु कदाचित अडाणी म्हणून जात नसेल, पण संगीता मोठी होत होती, तेव्हा तिने कायद्याचा आधार घ्यायला काहीच हरकत नव्हती. कादंबरी संपता संपता पोलीस पाटलाचा उल्लेख येतो, पण तोही पुसटसा.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
संगीता आणि मिरु दोघीही संघर्षमय आयुष्य जगतात. किंबहुना त्या दोघी लढाऊ आहेत. असे असताना संगीता तिच्या शिंदे सरांशी बोलताना तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगते. त्यानंतर शिंदे सर तिला वाचनाचे महत्त्व पटवून देतात. केवळ पुस्तके हीच आपली कवचकुंडले आहेत, हे पटवून देण्यासाठी आत्महत्येच्या उल्लेखाची आवश्यकता नव्हती, असे वाटते.
मिरुच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगतो. मात्र त्यात जरा अलंकारिक भाषेचा अतिरेक झाल्यासारखे. मात्र या तशा किरकोळ गोष्टी आहेत. एक वेगळा अनुभव, वेगळे विश्व अनुभवण्याच्या दृष्टीने ही कादंबरी वाचनीय आहे.
फिन्द्री – सुनीती बोर्डे
मनोविकास प्रकाशन, पुणे
मूल्य – ३५० रुपये.
..................................................................................................................................................................
सतीश कुलकर्णी
satishkulkarni2807@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment