भारतीय जलिकट्टू पार्टी
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 21 February 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi नगरपालिका नगरपंचायती Municipal council polls Municipal Corporation election भाजप BJP देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

सत्ता माणसाला भ्रष्ट करते, अहंकारी आणि दमनकारी बनवते. हुकूमशहा आणि स्वस्तुतीच्या रोगानं पछाडते. आजवर ही विशेषणं काँग्रेसला लावली जात होती. काळाच्या ओघात त्यांचा प्रवास मुलायम, मायावती, लालूप्रसाद, जयललिता, करुणानिधी आणि अगदी ममता बॅनर्जी यांच्या खुर्चीपर्यंतही झालेला आपण पाहिला. नरेंद्र मोदी गुजरातेत मुख्यमंत्री असताना याच विशेषणांसह वावरत होते.

अडीच वर्षांपूर्वी देशात सर्वंकष सत्ता मिळाल्यानंतर पंतप्रधानपदी बसलेले नरेंद्र मोदी यांनी वर्षभरातच वरील सर्व विशेषणं स्वत:ला येऊन लगडतील असं पाहिलं. आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. उलट आता नरेंद्र मोदींच्या बरोबरीने संपूर्ण भाजप या राष्ट्रीय पक्षाला वरील विशेषणांनी घेरलं आहे आणि एखाद्या रोगाची प्राथमिक लक्षणं दिसावीत, तशी ती आता महाराष्ट्र भाजप, मुंबई भाजप आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही दिसू लागलीत. रविवारी २५ जिल्हा परिषदा आणि दहा महानगरपालिकांचा प्रचार थंडावला आणि धुरळा खाली बसल्यावर चित्र जसं स्पष्ट दिसतं, तसं भाजप नावाच्या पक्षाचं एक वेगळं रूप पाहायला मिळतंय.

देशातल्या पाच राज्यातल्या विधानसभांच्या प्रचाराची रणधुमाळी या घरच्या लढाईमुळे फारशी समोर आलेली नाही. पुढच्या पंधरा दिवसांत तीही येईल. पण राज्यासह देशात सर्वसामान्यपणे जे दिसतंय ते- भाजपची प्रचंड पैसा ओतून केलेली जाहिरातबाजी. सध्या देशात आम्हाला कुणी प्रतिस्पर्धीच नाही, आमच्या कारभारासारखा कारभार गेल्या ७० वर्षांत झाला नाही. गेल्या अडीच वर्षांपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची दखल घेतली जातेय, अशा पद्धतीचे ‘गर्वगीता’चे अखंडच लिहिले जाताहेत.

हे सर्व प्रकार पाहिल्यावर महिन्याभरापूर्वी तामिळनाडूच्या जलिकट्टू नामक एका बैलाच्या खेळानं राष्ट्रीय बातम्यांमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयातही स्थान मिळवलं, त्याची आठवण झाली.

त्या खेळात बैलाला उचकवून (त्यासाठी अमली पदार्थ पाजणं वगैरे किंवा शस्त्रांनी ढोसणं, शेपटी पिरगाळणं किंवा समूहाने अंगावर जाणं असे अघोरी म्हणता येतील असे प्रकार केले जातात, अशी प्राणीमित्रांची तक्रार होती, आहे.) त्याला समूहानं येऊन, चवताळायला लावणं आणि मग त्याच्या रागानं सैरावैरा पळण्याकडे खेळ म्हणून पाहत, खेळत, या एकूणच पशूपातळीवर नेणाऱ्या बेहोशीचा आनंद घेणं म्हणजे जलिकट्टू अशी त्या खेळाची ढोबळ व्याख्या करता येईल.

इतर प्राण्यांसोबत उत्क्रांत होत असताना मेंदूच्या क्षमतेनं मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा झाला. तरीही या उत्क्रांतीत आजही म्हणजे माणूस चंद्रावर जाऊन पोहचल्यालाही आता ५० वर्षं झाल्यानंतर जंगली श्वापद, जनावर आणि पाळीव प्राणी हे मनुष्यप्राण्याचे सहचर, सहोदर राहिलेत. वाढत्या नागरीकरणात, शहरीकरणातही जंगली श्वापदांसाठी, पक्ष्यांसाठी अभयारण्यं राखून ठेवण्याची संवेदनशीलता माणसानं जपली. बाकी गाय, बैल, म्हैस, रेडा, बकरी, कोंबड्या, कुत्रा, मांजर यांना तर मानवी जीवनाचा, घराचा, अंगणाचा भाग बनता आलं. माणसाच्या आहारात त्यांचा जिवंत अथवा मृत सहभाग आला. शेती, प्रवास, संरक्षण यासाठी त्यांचा उपयोग झाला, तर कबुतर, पोपट, मोर, कावळे, चिमण्या, घोडा यांना मानवी भावभावनात प्रतीकांचं स्थान मिळवलं. ते साहित्य, चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य अशा विविध कलांमधीलही एक एक पात्रं, प्रतीक, संकेत झाले. त्यामुळे हे सर्व सहचरच माणसाचे.

यातूनच पोपटाचे मिठू बोलणं, मोराचं नाचणं, कावळ्याचं संकेत देणं सुरू झालं. उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर हे प्राणीच त्याचे सोबती असल्याने बैलांच्या शर्यती, कोंबड्यांच्या झुंजी, नवसाचे बोकड आणि कोंबड्या यांच्या आहुती आदि प्रकार टोळी संस्कृतीकडून नागरी संस्कृतीकडे संक्रमित होत असताना रूढी, परंपरा, सार्वजनिक खेळ म्हणून रुजत गेले. जंगली श्वापदांना वचकून घाबरून किंवा त्यांच्या शिकारीत आनंद मानणारा माणूस बैल, बकरी, कोंबडी, कुत्री, मांजरं यांना आपल्या धाकात ठेवण्यात, त्यांना पाळीव करण्यात यशस्वी झाला. त्यातूनच या प्राण्यांचं पूजन करून बळी चढवण्यापासून ते नांगराला आणि खटाऱ्याला जुंपण्यापर्यंत माणसाने या प्राण्यांचा उपयोग केला. पोळा, वसूबारस, नवस इ. प्रकारात त्यांची पूजाही केली आणि स्वत:च्या मनोरंजनासाठी, गाड्यांच्या शर्यती किंवा जलिकट्टूसारख्या खेळांची निर्मितीही केली. हे असे खेळ म्हणजे विजय तेंडुलकरांच्या भाषेत माणसातलं जनावर जागवण्याची आदिम चिन्हंच.

आता जलिकट्टू निमित्तानं या धांडोळ्याचा आणि जलिकट्टू व भाजप यांचा बादरायण संबंध आम्ही जोडतोय असं कुणाला वाटेल, पण तसं नाही. जलिकट्टू जसा एकाच वेळी कायम जोखडाखाली मुंडी घालून हिंडणाऱ्या बैलाला दिलेली मोकळीक आणि त्या मोकळीकीत त्याच्यातलं जनावर जागं करण्यासाठी माणसाने गाठलेली जनावराची पातळी असा खेळ आहे... तद्वतच सध्याचा भाजप, सरकार आणि निवडणुका यांच्याकडे पाहता येईल. निवडणुका म्हणजे पाळीव बैलाला चौखूर उधळून, त्याला शरणागत करणं असंच सध्या भाजप नावाच्या पक्षाला वाटत असून, त्या बैलाला खेळवताना माणसात जसा उन्माद चढतो, तसा हल्ली कुठल्याही निवडणुकीत भाजपला उन्माद चढतो.

मग निवडणूक नगर पंचायतीची असो, शिक्षक मतदारसंघ, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा की, पोटनिवडणुका भाजपचा उन्मादी स्वर पहिल्यापासूनच चढा लागतो. भाजप तसाही शब्दच्छलासाठी नवे नवे शब्द पाडणारी टाकसाळच आहे. मागच्या निवडणुकीत भ्रष्टाचार, काळा पैसा, विदेशातला पैसा आणि काँग्रेसमुक्त भारत या घोषणा कान किटेस्तोवर आणि तोंड फाटेस्तोवर दिल्या. त्यावेळी वातावरणच इतकं काँग्रेस विरोधाचं होतं की, हा कर्णकर्कशपणा मतदारांना गगनभेदी गर्जना वाटल्या. त्यामुळे आणि नरेंद्र मोदींच्या भाषणबाजीमुळे जनता मंत्रमुग्ध झाली. जाहीरसभा ऐकावी, पाहावी असं अनेक वर्षांनी घडलं. याचा परिपाक सर्वंकष सत्तेसह काही नवी राज्यं भाजपच्या हाताशी लागली.

मागच्या लोकसभा निवडणुकांपासूनच भाजपचे वाल्याचा वाल्मिकी करण्याचे प्रयोग सुरू झाले होते. एकीकडे काँग्रेसमुक्त भारत म्हणताना काँग्रेसच्या बड्या बड्या धेंडांपासून गल्लीतल्या खिसेकापूपर्यंत सर्वांना टिळे लावून पवित्र करून घेण्यात आलं. त्यासाठी राजकीय गुन्हे, दखलपात्र गुन्हे, फौजदारी गुन्हे, आरोप आणि शिक्षा असा कायद्याचा किस पाडण्यात आला. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेताना सोवळ्यातील पूजा उरकावी तसा आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकत आपादधर्म आणि शाश्वतधर्म अशा दोन नव्या कार्यकारी धर्मांची निर्मिती करण्यात आली. आणिआता या जिल्हा परिषदा, नगरपालिका व पाच राज्याच्या निवडणुकीत आत्मविश्वासाच्या जागी अहंकार आणि रणनीतीच्या जागी अहंकार व प्रचाराच्या जागी दर्प दिसून आला. हे सगळं उबगवाणं होतं, आहे आणि राहील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या दोन वर्षांतील रुजुता, संयम, समन्वय, तार्किक, मुद्देसूद अशी प्रतिमा त्यांनी स्वत:च रसातळाला नेऊन ठेवली. मोदींप्रमाणे संपूर्ण निवडणूक फडणवीसकेंद्री करताना बेंबीच्या देठापासून ओरडत सुरू केलेली भाषणं, शेवटच्या टप्प्यात मोदींच्याच नाटकी शैलीची, तितकीच नाटकी नक्कल करताना बेंगरूळ होत गेली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्यांदाच इतका केकाटताना पाहिला. बेभान झालेले आशिष शेलार आणि शेरलॉक होम्सचा बाप असल्याच्या थाटात तथाकथित घोटाळे बाहेर काढणारे किरीट सोमय्या म्हणजे एकाच तिकिटात दोन तमाशे! (खरं तर हा तमाशा कलेचा अपमान आहे! तमाम तमासगिरांनी माफ करावं.)

हातातील सत्ता, पैसा, गृहखातं या सगळ्याचा सुनियोजित वापर करतानाच, निवडणुका काय आम्हीच जिंकणार, आता बाकीचे बिचारे करताहेत प्रयत्न असा एकाच वेळी अहंकारी व छदमी भाव, जाहीर विधान करताना वाट्टेल त्या उपमा, उदाहरणं आणि सर्वांत म्हणजे खोटं बोल, रेटून बोल याच तालावर पारदर्शकता या शब्दाचा इतका अतिरेकी वापर भाजपने केला की, त्या पारदर्शकतेतून दिसणारं त्यांचं भूतकालीन नागवेपण अधिक अधोरेखित झालं!

पारदर्शकतेवर बोलणारा भाजप हा देशातला एकमेव पक्ष आहे, ज्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष लाच घेताना इन कॅमेरा पकडला गेला होता.

पारदर्शकतेवर बोलणारा भाजप हा देशातला एकमेव पक्ष आहे, जो विरोधी पक्षात असताना, संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणारे जे खासदार सापडले, त्यात सर्वाधिक खासदार या पक्षाचे होते ज्यात महाराष्ट्राचेही एक खासदार होते.

पारदर्शकतेची भलावण करणारा भाजप हा पक्ष कर्नाटक विधानसभेत सभागृह चालू असताना या पक्षाचे आमदार मोबाईलवर ब्ल्यू फिल्म बघताना आढळले.

पारदर्शकतेचा डिंडोरा पिटणाऱ्या भाजपच्या एका खासदाराला परदेशी जाताना, बायकोच्या नावावर दुसरीच बाई घेऊन जाताना विमानतळावर पकडण्यात आलं.

पारदर्शकता, सबका साथ सबका विकास म्हणताना काल नरेंद्र मोदींना युपीमध्ये रमजान इतकी वीज दिवाळीत आणि कब्रस्तान इतकीच जागा स्मशानभूमीस हे बोलण्याची वेळ आली, याचा अर्थ एकतर पायाखालची वाळू सरकतेय किंवा जलिकट्टूच्या बैलाची शेपटी पिरगाळून तो जास्तीत जास्त उधळण्याची उन्मादी वेळ आलीय.

सत्तेनं अंगात शिरलेला हा जलिकट्टू भाजपलाच कधीतरी जमीनदोस्त करेल आणि खेळ अंगाशी आणेल. तोवर लगे रहो भारतीय जलिकट्टू पार्टी!

 

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Sat , 25 February 2017

1 no. !!!


Rohit Deo

Tue , 21 February 2017

Not upto the mark...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......