राजकारण्यांनी ‘आक्रमक’ व्हावं, ‘अ-सुसंस्कृत’ नाही!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • जहरी टीका होऊनही सुसंस्कृतपणा न सोडणारे यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक आणि आक्रमक, पण मुळीच असुसंस्कृत नसलेले जांबुवंतराव धोटे आणि बबनराव ढाकणे
  • Sat , 25 September 2021
  • पडघम राज्यकारण जांबुवंतराव धोटे बबनराव ढाकणे यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक

महाराष्ट्राच्या राजकारणातले एक ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्याशी नुकत्याच फोनवर गप्पा झाल्या. जुन्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला आणि विषय आताच्या राजकारणावर आला. ‘काय वाटतं, सध्याच्या राजकारणावर?’ या प्रश्नाला उत्तर देताना बबनराव ढाकणे म्हणाले- ‘चिंता वाटते’. राजकारण्यांची भाषा, वागणं, राहणी आणि मग्रुरी यावर मग बबनराव बराच वेळ बोलत राहिले. त्यात कळकळ होती, तळमळ होती आणि चिंताही. सध्याच्या राजकारणाचा स्तर खरंच इतका खालावला आहे की, बबनरावांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. राजकारण म्हटलं की, आरोप–प्रत्यारोप होणारच, सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगणारच, पण मनुष्य आणि प्राण्यांचे अवयव, तसंच असंसदीय भाषा तेव्हाच्या राजकारणात खरंच नव्हती.

बबनराव ढाकणे यांच्याबद्दल तरुण पिढीला थोडं सांगायला हवं. राजकारणातला त्यांचा प्रवास पाथर्डी पंचायत समितीचे सदस्य ते केंद्रीय मंत्री अशा भरारीचा आणि चार दशकांचा आहे. ते राज्यातही काही काळ मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. आवर्जून सांगायचा मुद्दा म्हणजे अतिशय आक्रमक म्हणून बबनराव ओळखले जात. अहमदनगर जिल्ह्यातल्या दुष्काळी पाथर्डी तालुक्यात विकास कामे सुरू व्हावीत म्हणून बबनरावांनी विधान सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली होती. जनतेच्या प्रश्नासाठी असं काही करणारे बबनराव देशातले पहिलेच. उडी मारून ज्या सभागृहात त्यांनी प्रवेश केला, त्याच विधानसभेचं सदस्यपद आणि उपाध्यक्षपद त्यांनी नंतर प्रदीर्घ काळ भूषवलं. विधानसभेत मंडल आयोगाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार राजी होत नव्हतं, तेव्हा बबनराव चक्क सभापतींच्या आसनासमोरील राजदंड घेऊन पळाले होते. तेव्हाचे राज्यकर्तेही सुसंस्कृत होते. बबनराव ढाकणे यांनी विधानसभेत उडी मारली ती तारीख होती ८ जुलै १९६८. (तो संदर्भ काढला, तेव्हा आता पंचाऐंशी वर्षांच्या बबनरावांनी पटकन ही तारीख सांगितली!) त्यांना पाच दिवसांच्या कारागृहाची शिक्षा झाली, पण महत्त्वाचं म्हणजे सभागृहात त्यावर फार गंभीर चर्चा झाली आणि प्रशासनाला खडबडवून जाग आणण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

लक्षात घेतलं पाहिजे की, बबनरावांची ही आक्रमकता जनतेच्या प्रश्नासाठी होती, स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी नाही. शब्दांच्या धडाडत्या तोफांतून मारा करून सभागृह आणि मैदानी सभा गाजवणारे आचार्य अत्रे, जांबुवंतराव धोटे, केशवराव धोंडगे, प्रमोद नवलकर, एन. डी. पाटील, छगन भुजबळ, मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर असे अनेक नेते पाहता आले. 

आठवल्या म्हणून या निमित्तानं आणखी काही जुन्या आठवणी सांगायला हव्यात. विदर्भवीर म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे हेही खूप आक्रमक नेते होते. स्वतंत्र विदर्भाची त्यांची भूमिका मला साफ अमान्य होती तरी आमच्यात चांगलं सूत जुळलेलं होतं. जांबुवंतरावांचं नेतृत्व जनतेच्या कळवळ्यानं ओसंडून वाहणारं होतं. वारांगणांच्या समस्या ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. त्या समस्यांच्या निराकरणासाठी जांबुवंतराव धोटे हे पहिलेच राजकीय नेते.

तेव्हा विधिमंडळाच्या सभागृहात सदस्याच्या मेजावर लांब दांडी असणारा ध्वनिक्षेपक तसंच पेपर वेटसह कागद, पेन्सिल अशी स्टेशनरी असे. विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर जांबुवंतरावांच्या आक्रमकतेचा फटका माईक तुटण्यातही झाला होता. एकदा तर त्यांनी जनतेला न्याय मिळत नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं पेपरवेटही भिरकावला होता. ते प्रकरण खूप गाजलं. त्यांचं सदस्यत्व काही काळासाठी निलंबित करण्यात आलं. या घटनेनंतर  सदस्यांच्या मेजावरचे माईक पक्के करण्यात आले. तसंच स्टेशनरीसारख्या सहज उचलता येण्याजोग्या वस्तूही गायब करण्यात आल्या.

सरकार आणि विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री, जांबुवंतराव यांच्याच यवतमाळ जिल्ह्याचे वसंतराव नाईक हे त्यांचं आवडत लक्ष्य होतं. अतिशय कडक आणि जहरी शब्दांत जांबुवंतराव त्यांच्यावर हल्ले चढवत. मात्र वसंतराव नाईक यांनी त्यांचा सुसंस्कृतपणा कधीच सोडला नाही, म्हणजे जांबुवंतरावांना विरोधकच मानलं, शत्रू नाही. त्यांच्या मात्रोश्री गंभीर दुखणं घेऊन रुग्णालयात दाखल झाल्या, तेव्हा त्यांची विचारपूस करायला कोणताही गाजावाजा न करता जाण्याचा सुसंस्कृतपणा वसंतराव नाईक यांनी दाखवला, तेव्हा जाबुवंतराव चकीतच झाले होते.

वरील दोन्ही घटनांच्या आधीची ही हकीकत आहे आणि ती माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून अनेकदा ऐकलेली आहे– विधानसभेत यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध विशेषत: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी जुगलबंदी त्या काळात रंगलेली होती. आचार्य अत्रे अति आक्रमक आणि सरस्वती पुत्र. त्यामुळे त्यांच्या भात्यातून एक एक जहरी शाब्दिक बाण असा काही सुटत असे की, सत्ताधारी प्रतिवादही करू शकत नसत.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

एकदा बोलण्याच्या ओघात यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भात एक वावगा शब्द आचार्य अत्रे यांच्या तोंडून निघून गेला. तो शब्द यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणूताई यांच्या जिव्हारी लागला. आपण निपुत्रिक का आहोत आणि त्याला स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी कशी आहे, हे यशवंतरावांनी (का, यशवंतरावांच्या वतीने) आचार्य अत्रेंना कळवलं. ते ऐकल्यावर अत्रे खजिल झाले. तडक उठून यशवंतरावांच्या घरी जाऊन यशवंतराव आणि वेणूताई यांच्या प्रति आचार्य अत्रे यांनी (असं म्हणतात की हात जोडून) दिलगिरी व्यक्त केली.

या पुढची हकीकत अत्यंत हृद्य आहे, चव्हाण दाम्पत्यांनी त्यांना माफ तर केलंच, पण पुढे जाऊन वेणूताई चव्हाण यांनी ‘मला एक भाऊ भेटला’, अशा शब्दांत त्या कटू प्रसंगावर कायमचा पडदा टाकला.

हा सुसंस्कृतपणा, वर्तनातला दर्जा हा असा एकेकाळी आपल्याकडच्या राजकारण्यात वैपुल्यानं होता. कारण आक्रमकता म्हणजे आततायीपणा, उतावीळपणा, उठावळपणा, वाचाळपणा एवढंच नाहीतर कंबरेच्या खाली वार करणं नव्हे, याचं पक्कं भान राजकारणातल्या लोकांना होतं. यातले अनेक राजकारणी अल्पशिक्षित होते, पण त्यांची सुसंस्कृतपणाची पातळी अतिशय उच्च दर्जाची होती. काही राजकारणी अतिशय निश्चितपणे ‘माडी’ चढणारे आणि ‘ताडी’ चढवणारेही होते, पण त्या संदर्भात बोभाटा न होऊ देण्याचं भान त्यांच्यात होतं. ‘द्वितीय पात्र’ समाजात उघडपणे मिरवण्याचा आणि त्याचं समर्थन करण्याचा निलाजरेपणा त्यांच्यात आलेला नव्हता.

थोडक्यात नैतिकता, मानवी मूल्यं आणि सुसंस्कृतपणा असा त्रिवेणी संगम त्या काळच्या बहुसंख्य राजकारण्यात होता आणि त्या नेत्यांच्या वर्तनाची मोहिनी लोकांच्या मनावर होती. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली होणारं आंदोलन असो की, सभा पैसे न देता लोक हजारांनी सहभागी होत. बबनराव ढाकणे, जांबुवंतराव धोटे, केशवराव धोंडगे, एन. डी. पाटील, मृणाल गोरे, अहिल्याताई रांगणेकर, अशा अनेक नेत्यांनी काढलेल्या मोर्च्यात अनेकदा दहा-वीस हजार लोक असत, पण त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना कधी दंडुका उभारावा लागला नाही. नेत्यानं  उच्चारलेला एक शब्द आणि बोटाने केलेला इशारा ती गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी पुरेसा असायचा.

अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते, हे खरं असलं तरी, जेव्हा अध:पतन व्यक्तिगत किंवा सामूहिक पातळीवर इतक्या प्रचंड वेगानं होतं, तेव्हा कुणीही विवेकी आणि संवेदनशील माणूस साहजिकच अस्वस्थ होतो, पण यापेक्षाही जास्त गंभीर असतं ते येणार्‍या/नवीन पिढीच्या मनात त्याविषयी निर्माण होणारी तिरस्कार किंवा घृणा. मतदानाच्या न वाढणार्‍या टक्केवारीला हेही एक कारण असावं\आहे. निवडणुकीच्या रिंगणात सुसंस्कृत, शिष्टाचारी आणि विवेकी उमेदवार अभावानंच दिसत असल्यानं संवेदनशील, विचारी माणूस आणि तरुण वर्ग जर मतदांनापासून जर दूर राहिला, तर त्यांना दोष देणार तरी कसा? तेव्हाचं म्हणजे सुसंस्कृत राजकारण का लोप पावलं यांची दोन कारणं आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एक - राजकारण करियर झालं. निवडणूक इव्हेंट झाली आणि ती इव्हेंट यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक आले. दुसऱ्या भाषेत त्यांना ‘मॅन्युप्लेटर्स’ म्हणता येईल. सत्ता प्राप्ती हाच मूळ उद्देश झाला. सत्ता आली म्हणून  पैसा आला. त्यासाठी लपवाछपवी, ‘तोडपाणी’ आलं. त्यापाठोपाठ आला तो सत्ता आणि पैशाचा माज. या माजामुळे कर्कश एकारलेपणा आणि टोकाचा कडवेपणा आला. यात सुसंस्कृतपणाला जागा उरली नाही आणि मग त्या  माजातून आली ती मग्रुरी. एक मारेन, थोबाड फोडेन, कानपटात लगावेन, कुणाचे तरी गाल, अमुक एक नेता म्हणजे देवाला सोडलेले वळू आणि त्याला प्रत्युत्तर देताना म्हसोबाला सोडलेले बोकड,  अशी भाषा आली. ही आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय  संस्कृतीची वाटचाल.

राष्ट्रीय पातळीवर खुनी, तू चोर-तुझा बाप, चोर, दरोडेखोर, जल्लाद, मांड्या, महिला उमेदवाराच्या अंतर्वस्त्राचे रंग, अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या पोलिसांचा आणि जवानांच्या हुतात्म्यांची खिल्ली व अक्षम्य अवमान, झालेला अतिरेकी हल्ला सरकारनेच घडवून आणल्याचे दावे... अशी किती उदाहरणे द्यायची? सत्ताधार्‍यांनी जात आणि धर्माचा वापर प्रचार आणि उमेदवार निवडताना केला, असा दावा करणार्‍या विरोधी पक्षांनी काय कमी दिवे पाजळले आहेत?

नागपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीला कुणबी व कोष्टी विरुद्ध ब्राह्मण, शिरुर मतदारसंघात मराठा विरुद्ध माळी असा रंग देणारे, यज्ञ आणि धार्मिक विधी जाहीरपणे करणारे ‘वाचाळेश्वर’ दिग्विजयसिंह शहारोशहरी दिसू लागले आणि अशांमुळे अब्रू गेली ती काँग्रेसची. भाजपनं साध्वीला उमेदवारी दिली म्हणून टीका करणार्‍या काँग्रेसनं रत्नागिरीत ‘सनातन’च्या समर्थकाला उभं करण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? एका मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला ‘पप्पू’ म्हणणं जितकं प्रचंड अशोभनीय व अवमानकारक आहे, तेवढंच अशोभनीय व अवमानकारक देशाच्या पंतप्रधांनांना ‘फेकू’ आणि ‘चोर’ म्हणणं आहे. कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याची गाठलेली ही अशी पातळी, हे आपल्या राजकीय अध:पतनाचं केवळ राज्यस्तरीयच नव्हे तर राष्ट्रीयही कुरूप स्वरूप झालेलं आहे.

कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्यापर्यंत आपलं राजकरण खाली गेलं आहे, याचं आणखी उदाहरण दररोज देशात घडणारे नृशंस बलात्कार. आपल्या एका राज्यापेक्षा इतर राज्यातल्या अशा घटना आणि बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची उदाहरणं दिली जाणं, हाही असुसंस्कृतपणाचा कळसच आहे. असे असंवेदनशील दाखले देणारे राजकीय या देशात आहेत, हे काही त्यांच्यातल्या सुसंस्कृतपणाचं लक्षण मुळीच नाही. 

दोन- आपण बहुसंख्य मतदारांच्या मनात बहुसंख्य राजकारण्यांविषयी तिरस्कार आहे, काहींच्या मनात घृणाही, पण आपण या दिव्य लोकांना मतदान का करतो, चांगल्या उमेदवारांना निवडून का देत नाही, यासंदर्भात आपण बहुसंख्य कधीच किमानही गंभीर नसतो. आपण अनेक तर मतदानालाही जात नाही आणि राजकारणी कसे वाईट आहेत, यांच्या पोस्ट समाजमाध्यमांवर टाकण्यात धन्यता मानतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जाता जाता - याच संदर्भात आहे म्हणून – उद्धव ठाकरे यांचा कायम ‘सुसंस्कृत राजकारणी’ असा उल्लेख मी आजवर केलेला आहे. आजवर जो काही संपर्क आला त्यावरून त्यांची ती प्रतिमा माझ्यासह अनेकांच्या मनात निर्माण झालेली आहे. केंद्रीय मंत्री नारायण यांनी वापरलेल्या कथित अपशब्दाबाबत जी काही कारवाईची भूमिका त्यांनी घेतली, ती या प्रतिमेला तडा देणारी आहे. नारायण राणे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी साफ दुर्लक्ष करायला हवं होतं. त्यामुळे त्यांचा सुसंस्कृतपणा आणखी उजळून निघाला असता, असं ठामपणे वाटतं.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......