‘द प्रिन्स’ वाचल्यावर ‘उपाधींमुळे माणसं नाही, तर माणसांमुळे उपाधींना अर्थ प्राप्त होतो’, असं बिनदिक्कत सांगणारा निकोलो मॅकियावेली आजही लोकांना का प्यारा वाटतो, याचं उत्तर मिळतं!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जीवन तळेगावकर
  • निकोलो मॅकियावेली आणि त्याच्या ‘द प्रिन्स’च्या वेगवेगळ्या आवृत्त्यांची काही मुखपृष्ठे
  • Thu , 23 September 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो निकोलो मॅकियावेली Niccolò Machiavelli द प्रिन्स The Prince चाणक्य Chanakya कौटिलीय अर्थशास्त्र Kauṭilya Arthashastra

निकोलो मॅकियावेली हा १५व्या शतकातील इटालियन प्रशासक, राजकीय मुत्सद्दी, लेखक आणि कवी होता. त्याचं ‘द प्रिन्स’ हे पुस्तक खूप गाजलं, ते त्याच्या प्रांजळ मध्ययुगीन राजकीय निवेदनामुळे आणि राजकीय लेखनात अति-नीतीचा आव न आणल्यामुळे किंवा या प्रकारचा आभासी मुखवटा उतरवल्यामुळे.

आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात ‘कपटीपणा’ला ‘मॅकियाव्हेलियन’ असं विशेषण प्रायः लावलं जातं. त्याच्या मूळ लेखनांत जिथं कुठे राज्यव्यवस्था कशी लावावी, याबद्दल विचार आले आहेत; तिथं सरळ-सरळ ‘कपटीपणाचा’च केवळ पुरस्कार केला आहे, असं आढळत नाही. त्याने सद्विचारदेखील मांडला आहे. ‘क्रूरता’ ही त्या काळातील ‘बळी तो कान पिळी’ या राजव्यवस्थेच्या साहचर्यातून त्याच्या विचारांत आली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याला आजूबाजूला जे दिसलं, त्यानुसार त्याने आपलं प्रांजळ निवेदन, ‘भावी राजांना एक मार्गदर्शन’ या भूमिकेतून केलं आहे.  

निकोलोच्या विचारांची तुलना त्याच्या १९०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ या ग्रंथातील आर्य चाणक्याच्या (कौटिल्याच्या) विचारांशी केली जाते. ही दोन्ही पुस्तकं ज्यांनी वाचली नाहीत, असेच ‘विचारवंत’ (?) हे धाडस करू शकतात. कारण विचारांच्या परिपक्वतेच्या दृष्टीनं मॅकियावेली कौटिल्याच्या पासंगालाही पुरत नाही. ‘कौटिलीय अर्थशास्त्र प्रदीप’ हे गो. गो. टिपणीस आणि ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हे ब. रा. हिवरगावकर यांचं पुस्तक आणि डब्ल्यू. के. मॅरीयॉटने केलेलं ‘द प्रिन्स’ या मूळ इटालियन पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर वाचल्यानंतर हे स्पष्टच होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

निकोलोचे राजकीय विचार एका सत्ताक्षेत्रात वावरणाऱ्या अधिकाऱ्यानं मांडलेले विचार आहेत, राज्यकर्त्याने वा राज्य-संपादकाने नव्हे. त्यामुळे त्यांना सत्ता-स्पंदनांचं महत्त्व नाही, केवळ सत्ता-स्पर्शाचं आहे. स्वानुभवाचा स्पर्श नसल्यामुळे ते थोडे उथळ वाटतात. ते नेमकी सत्ताशक्तींची पकड घेऊ शकत नाहीत, केवळ सत्ताकेंद्राच्या जवळ जाण्याचा एक ‘फ्लो-चार्ट’ देऊ शकतात.     

फ्लॉरेन्समधील लॉरेंझो-द-मेडिचीच्या काळातील ‘गणराज्या’चा त्याने आपल्या पुस्तकात गौरव केला आहे आणि आपले पुस्तक या महान राजाला अर्पण केलं आहे. आपण हे पुस्तक किती प्रामाणिकपणे लिहिलं आहे, याच्या समर्थनार्थ तो म्हणतो, ‘माझी गरिबी माझ्या प्रामाणिकपणाचं प्रमाण आहे.’

आपल्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त होताच पुस्तकं लिहिण्याची प्रथा आहे. त्याचं गंमतीशीर उत्तर निकोलोच्या लेखनात मिळतं. ‘एखादा हुशार राजनेता वा अधिकारी सेवानिवृत्त होताच मोठ्या अशा देवमाशासारखा (व्हेल) उलथापालथ करू शकतो. त्याच्या ऊर्जेला नियंत्रित ठेवण्यासाठी एखाद्या रिकाम्या, वेळकाढू खेळण्याची व नशेची आवश्यकता असते,’ असं स्वानुभवातून उमगलेलं सत्य तो सहज सांगून जातो. ‘जोपर्यंत युरोपमध्ये सत्ताकांक्षा नीतीपेक्षा वरचढ असेल, तोपर्यंत हे विचार अनाठायी वाटणार नाहीत,’ असा त्याला विश्वास आहे. पुढे तो हेदेखील अधोरेखित करतो की, ‘गुन्हेगारीच्या सन्निधानं किंवा अनीतीनं साम्राज्य मिळू शकतं, पण त्याला कीर्ती लाभू शकत नाही.’ थोडक्यात, आपण जे विचार मांडतोय, ते जिंकण्या आणि जगण्यासंबंधी आहेत; नीतिमत्तेच्या कसोटीवर १०० टक्के उतरणारे नाहीत, पण तत्कालीन राजकीय घडामोडींवर आधारलेले ते उपचारमात्र आहेत; याची त्याला जाणीव आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही.   

‘रिपब्लिक’ म्हणजे ‘प्रजासत्ताक’ (‘लोकराज्य’, ‘गणराज्य’) आणि ‘प्रिंसिपॅलिटी’ म्हणजे ‘साम्राज्य’ वा ‘अधिनायकता’. या दोन सत्ताप्रकारांपैकी ‘अधिनायकते’वर निकोलो भाष्य करतो. त्याचे विचार क्वचित माझ्या प्रतिक्षिप्त टिप्पणीसोबत पुढे सलगपणे मांडले आहेत.   

‘वारसाहक्काने मिळणाऱ्या साम्राज्याच्या धन्याला लोकांचा अनुराग लाभलेला असतो. पण नवी साम्राज्यं समस्यांना जन्म देतात’, असं त्याला वाटतं. “बदल हवा म्हणून लोक सशस्त्र क्रांती करतात आणि नवा राजा घेऊन येतात, पण जुनाच बरा होता, हे न संपणाऱ्या नव्यानं येणाऱ्या वाईट अनुभवांच्या जंत्रीवरून त्यांना ध्यानात येतं, म्हणून संघर्ष सुरू राहतो. नवा राजादेखील जुन्या अशांत लोकांना शांत करू शकत नाही आणि आपल्याला मदत करणाऱ्या सहकाऱ्यांना धड खूश ठेवू शकत नाही. त्यामुळे त्याला त्वरेनं मिळालेलं राज्य तेवढ्याच त्वरेनं गमवावं लागतं.” त्यामुळे राजांना यशस्वी शासनकर्त्यांची गुणसूत्रं समजून घेणं आवश्यक ठरतं.

“ज्या राज्याला अधिनायकतेची सवय आहे, त्याला आपल्या साम्राज्याच्या पंखाखाली घेणं नव्या जेत्या राजाला सहज शक्य होतं… जर ते लोक एकाच संस्कृतीचा भाग असतील तर. कारण सामान्य माणसाला त्याचे कर आणि कायदे-कानून बदलले गेले नाहीत, तर कोणत्याही राजाच्या नियंत्रणात राहायला काहीच अडचण नसते; फक्त त्यांच्या जुन्या राजाच्या परिवाराचा शिरच्छेद करून त्यांच्या स्मृती कायमच्या मिटवाव्या लागतात. त्यांना नवी राज्यपद्धती, जसं ‘लोकराज्य’ देण्याचा मात्र प्रयत्न करायचा नसतो, कारण त्यांना त्याची सवयच नसते.”    

“जर जेत्या राज्याची संस्कृती, नियम, कायदे, करप्रणाली जितांपेक्षा वेगळी असली, तर मात्र तिथं हा नियम लागू होत नाही. तिथं जेत्या राजानं एक तर स्वतः जाऊन राहावं आणि नव्या लोकांना विश्वासात घ्यावं, किंवा सैन्य पाठवावं आणि काही अल्प गरीब स्थानिकांची घरं, जमीन बळकावून सैन्याला द्यावी. त्यामुळे इतर लोक उठाव करण्याचा विचारदेखील करणार नाहीत. जितांना खूप चांगल्या पद्धतीनं वागवून किंवा अति-वाईट वागवूनच ताब्यात ठेवता येतं.” 

“नाही तर रोमनांसारखे वागावं, जिंकलेल्या भागातील काही जमीनदारांना सवलती द्याव्यात, मोठं करावं पण एवढं मोठं कधीच होऊ देऊ नये की, ते उठाव करतील. त्यांना कायम लाचार ठेवावं, परकीय शक्तीपासून दूर ठेवावं. एखादा उठाव नजरेच्या टप्प्यात येताच त्याला चिरडून टाकावं. तो लक्षात न आल्यास किंवा त्याचा उपचार करण्यात वेळ लावल्यास तो दुर्धर रोगाप्रमाणे आवरायला कठीण होऊन बसतो.”

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

निकोलोने फारसं सखोल विश्लेषण केलेलं नाही. त्याने त्याच्या काळापर्यंत घडलेल्या घडामोडींवर आधारित राजसत्तांच्या संघर्षाचा आणि परिपाकांचा आढावा घेतला आहे. त्यात जे राजकीय विचारांचं आणि आचारांचं द्वंद्व त्याला दिसलं, त्यात ‘विजयी झालेल्यांचं वागणं योग्य’, असं गृहीत धरून त्याने भावी राजांसाठी परिपाठ घडवला आहे. कोणता सत्ताव्यूह दीर्घकाळ सत्ता प्रदान करू शकतो, याचा त्या-त्या काळातील उदाहरणांसह ऊहापोह केला आहे.

निकोलो या सर्व सत्तासंघर्षात सहभागी होता, असंही नव्हे. म्हणून त्याने एक विचारवंत या नात्यानं जे सांगितलं, ते एका ‘दूरस्थ विचारवंताचं मनोगत’ ठरतं. यात त्याची ‘इन्व्हॉल्व्हमेंट’ होती, पण ‘कमिटमेंट’ नव्हती.

हाच फरक निकोलो आणि चाणक्य यांच्या लेखनात आहे. चाणक्याचं राजपद्धतीचं आणि कर्तव्य-अधिकारांचं विश्लेषण त्याच्या वैयक्तिक अनुभवांमुळे आणि जित्याच्या भूमिकेमुळे सत्तास्पंदनाचं प्रतीक ठरचं, तर निकोलोचं विश्लेषण सत्तास्पर्शाचं!

निकोलोचे आज आधुनिक व्यवस्थापनात चर्चिले जाणारे विचार, बऱ्याच अंशी ‘जिंकायचं कसं’ यासंबंधी आहेत. पण ते मध्ययुगीन मानसिकतेवर आधारलेले आहेत. त्याचा मूळ मुद्दा असा की, ‘राजाकडे निर्णयक्षमता असावी. त्याने दोन्ही पगडींवर हात ठेवून चालू नये. जे तटस्थ राहतात, त्यांना जेता पक्ष विचारत नाही; आणि जीतांचा (शत्रूकडून जिंकला गेल्यावर), पर्यायानं त्यांच्याच जनतेचा विश्वास ते गमावून बसतात.’

“तसंच केवळ चांगला, सज्जन राजा राज्यासाठी दीर्घकालीन यश मिळवू शकत नाही, तर उचित निर्णय घेणारा प्रभावी राजा असं यश मिळवू शकतो. यासाठी त्याला प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. जे त्याच्या दीर्घकालीन हिताचे कठोर निर्णय असतील, ते त्याने लगेच एकापाठोपाठ एक घ्यावेत. त्यासाठी अधिक काळ घालवू नये; कारण जनता असे निर्णय आवडले नसले तरी काही काळ जाताच कटू अनुभव विसरते. मग त्यांना अशा कटु-अनुभवांची आठवणच येऊ नये, यासाठी राजाने जनहितकारी निर्णय घ्यावेत. ते मात्र सगळे एकदाच घेऊ नयेत; हळूहळू घ्यावेत, म्हणजे त्यांचा जनमानसावरील सकारात्मक बदलांचा परिणाम दीर्घकाळ राहतो आणि राजाला त्याचा अनुकूल प्रत्यय येत राहतो.” लोकशाही शासनपद्धतीतल्या राज्यकर्त्यांना निकोलोच्या तत्त्वज्ञानाचं बाळकडू मिळालेलं आहे की काय, अशी शंका येते, एवढे ते हा विचार आपल्या आचरणातून साकारत असतात.

‘लोकशाहीत सुधारणा लवकर का होत नाहीत?’, या सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर निकोलोने दिलेलं आहे- “राजाने प्रतिकूल परिस्थितीत कामी येतील म्हणून तरी प्रजेचा विश्वास संपादन केला पाहिजे. त्यासाठी त्याने असं काही केलं पाहिजे की, त्याच्या प्रजेला त्याची कायम आवश्यकता भासली पाहिजे, तो आपला तारणहार वाटला पाहिजे, म्हणजे त्यालादेखील हवं तेव्हा ते विश्वास देतील.”

“आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी राजानं तटबंदी उभारावी. ज्या राज्याला तटबंदी आहे आणि ज्याची प्रजा राजावर प्रेम करते, ते राज्य जास्त काळ सुरक्षित राहतं. त्यावर हल्ला करण्यापूर्वी शत्रूला खूप मंथन करावं लागतं.”

“ज्या फौजांच्या बळावर राजे युद्ध जिंकतात, त्या फौजा त्यांनी स्व-बळावर निर्माण केलेल्या असाव्यात. कारण त्या राजासाठी नसल्या तरी राष्ट्रासाठी जीवावर उदार होऊन लढतात. किरायाच्या किंवा साहाय्यक फौजा काही कामाच्या ठरत नाहीत. त्या केव्हा विश्वासघात करतील याचा नेम नसतो. चांगले कायदे आणि चांगल्या फौजा हे राज्याचं बळ असतं, पण चांगल्या फौजा नसतील तर चांगले कायदे कुचकामी ठरतात. कारण त्यांचं संरक्षण राजा करू शकत नाही.” असे काही त्याचे विचार कालातीत आहेत.  

“राजानं शस्त्रपारंगत असलं पाहिजे, अन्यथा त्याचं सैन्य त्याचा सन्मान ठेवत नाही. त्याने आपला भूप्रदेश तंतोतंत अभ्यासला पाहिजे किंवा प्रत्यक्ष अनुभवला पाहिजे. नेहमी आपल्या सेनापतींसोबत विविध सैनिकी डावपेचांविषयी चर्चा केली पाहिजे, म्हणजे त्याचं सैन्य कोणत्याही प्रसंगासाठी कायम तत्पर राहतं. आपल्या पूर्वजांकडून आणि त्यांच्या इतिहासापासून त्याने काय केलं पाहिजे, काय नाही, याचा धडा गिरवला पाहिजे… शांततेच्या काळात राजानं आपली शक्ती वाढवली पाहिजे; विशेषतः संसाधन आणि उद्योग, जे त्याला संकटकाळी उपयोगी पडतील.”

हे वाचल्यावर हिटलरने नेमकं असंच केल्याचं लक्षात येतं.     

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

“युद्धकाळात अटीतटीच्या प्रसंगी राजाने सद्गुण आणि दुर्गुण याचा विचार केवळ, काय आपल्याला सुरक्षा आणि सुकाळ प्रदान करू शकतं, या संदर्भात करावा (नीतितत्त्वांचा अधिक विचार करू नये). कारण शेवटी तुम्ही जिंकलात तर आचरलेला मार्गच ‘राजमार्ग’ ठरत असतो.” 

“राजानं एवढंही उदार असू नये की, खजिना रिता झाल्यामुळे पुन्हा लोकांवर अतिरिक्त कर लादून तो भरण्याची वेळ येईल. तसं झाल्यास त्याच्या उदारतेची वाहवा करणारेच त्याला कोसू लागतील. त्याला कोणी शांतता काळात कृपण म्हटलं तरी अडचण नसावी, कारण उदारतेतून कफल्लक होण्यापेक्षा ते बरं! दुसऱ्या राज्यांतून मिळवलेली संपदा वाटून राजाने आपल्या उदारतेचे गोडवे गाऊन घ्यावेत, पण स्वतःच्या आणि आपल्या प्रजेच्या संपदेबाबत दक्ष असावं, त्यावर डोळा ठेवू नये. लोक पित्याचा मृत्यू कालांतरानं विसरू शकतात, पण त्याचा (सांपत्तिक) वारसा विसरू शकत नाहीत.”

“राजानं आपली ‘दयाळू’ प्रतिमा कवटाळू नये. त्यातून अराजक उद्भवू शकतं आणि अधिक हानी होऊ शकते. क्रूरता आवश्यक असल्यास जरूर अंगीकारावी. प्रजेच्या मनात राजाबद्दल आदरयुक्त भीती असणं त्याच्याबद्दल अतिप्रेम असण्यापेक्षा बरं; फक्त त्याच्याबद्दल तिटकारा असू नये, एवढी काळजी मात्र त्याने घ्यावीच लागते. कारण (दुष्टांबद्दल किंवा प्रतिकूल शक्तींबाबत) क्रूरता कायद्याचा सांभाळ करण्यासाठी अपरिहार्य असते.” त्याच्या सद्गुणांच्या यादीत क्रूरतेला सत्तेचं शहाणपण, व्यूहात्मक निर्णयक्षमता, शक्ती आणि साहस यांसोबतच महत्त्वाचं स्थान आहे.

“राजानं ‘चांगलं’ म्हणून मिरवण्यापेक्षा ‘प्रभावी’ असणं अधिक महत्त्वाचं ठरतं.” नेमका हाच विचार, आधुनिक व्यवस्थापनशास्त्राने ‘कालाय तस्मै नमः’ या भावनेतून उचललेला दिसतो. 

“राजाला मानव आणि दानव या दोन्हीप्रमाणे वागता आलं पाहिजे, केवळ एक गुणच शिरोधार्य मानून चालत नाही. त्याने अवगुण कुठे वापरला पाहिजे, याचं पारंपरिक शिक्षण घेतलं पाहिजे. कारण माणसातल्या दोन्ही प्रवृत्तींना कायद्यानं वा बळानं कसं जोखायचं, हे दीर्घकालीन शासनकर्त्यांचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. सगळी माणसं चांगलीच असती, तर असं करावं लागलं नसतं, पण वस्तुतः असं नसतं. कोल्ह्यासारख्या चातुर्याची त्यामुळे आवश्यकता असते. पण हे करण्याच्या नादात राजानं स्वतःला उघडं पाडायचं नसतं. त्याला मुखवटे चढवता आणि बदलता आले पाहिजेत. त्यासाठी फसवेगिरीदेखील करावी लागली तरी मागेपुढे पाहायचं नसतं. प्रजेला राजा मुख्यतः दयाळू, विश्वासार्ह, मानवीय, सरळमार्गी, धार्मिक वाटला पाहिजे. त्यामुळे त्याच्या कावेबाजपणाद्दल त्याने गुप्तता पाळली पाहिजे, आपल्या तोंडावर ताबा ठेवला पाहिजे. त्याच्या प्रजेला आणि शत्रूंना तो गरज पडल्यास सद्गुणांचा मुखवटा उतरवून रूप पालटू शकतो, याची जाणीव तेवढी असली पाहिजे, म्हणजे ईप्सित साध्य होतं. आपल्या धार्मिकपणाचे जे त्याला दर्शन घडवता येतं, ते त्याने घडवत राहिलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा त्याच्या इतर गुणांवर आपसूक विश्वास बसतो.”    

“राज्याला आतले आणि बाहेरचे शत्रू असतात. आतल्या शत्रूंचा बिमोड करण्यासाठी प्रजेला सुखात ठेवलं पाहिजे आणि बाहेरच्या शत्रूंशी लढण्यासाठी स्वबळावर सैन्य उभारलं पाहिजे. त्यासाठी प्रजेच्या धनाला आणि धनिणीला राजानं जपलं पाहिजे. न्याय करताना एकदा घेतलेला निर्णय कधीही बदलला जाता नये, याची काळजी घेतली पाहिजे.”

“राजाने दोषारोपण करण्याचं काम सरदारांकडे सोपवावं आणि सत्कार करण्याचं काम मात्र जातीनं करावं, म्हणजे त्याची प्रतिमा चांगली राहते. सरदारांना किंवा उच्चभ्रूंना सहसा दुखावू नये, थोडी ढील द्यावी.”

“राजाने स्त्रीच्या सांगण्यावरून राज्य करू नये, त्याच्या लढवैय्या सैन्याच्या ते पचनी पडत नाही. राजा सिंहासारखा लढवैय्या आणि कोल्ह्यासारखा चतुर असला पाहिजे.” यातून त्या काळच्या युरोपातील स्त्रीदाक्षिण्य (?) प्रकट होतं.

“एखाद्या राज्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजाने तेथील काही निवडक लोकांच्या हाती शस्त्र दिलं पाहिजे. उलट त्यांच्याकडे शस्त्र न दिलं तर अविश्वास दाखवल्यासारखं होतं; आणि अशा निःशस्त्र लोकांचा विश्वास राजा संपादन करू शकत नाही. नव्या राजाने आधी ज्यांच्यावर अविश्वास दाखवला तेच सहकारी कालांतरानं अधिक विश्वासपात्र ठरतात.”

“आपण बांधलेले किल्ले आपले संरक्षण करतील असं ज्या राजांना वाटतं, त्यांना प्रजेचं जर प्रेम संपादन करता आलं नाही, तर किल्ले बांधणाऱ्या वा न बांधणाऱ्यांना एकाच परिणामाला सामोरं जावं लागतं.”

“आपल्या सतत उद्योगीपणातून मनोराज्य वास्तवात उतरवणारा राजा सगळ्यांना हवाहवासा वाटतो. तटस्थपणाची भूमिका राजाला दीर्घकालीन यश देत नाही. त्याने स्पष्टपणे एक बाजू घ्यायला शिकलं पाहिजे. त्यात त्याचा मरातब राहतो. एका जेत्याची बाजू घेऊन उगाच त्याला मदत करणाऱ्या दुसऱ्या राजाने मिंधेपणा स्वीकारू नये. विजय एवढा परिपूर्ण कधीच असत नाही की, त्यामुळे जेत्याने न्याय्य बाजूकडे दुर्लक्ष करावं. म्हणून मदत करणाऱ्या राजाने कणा ताठ ठेवून वागावं, अन्यथा दुबळ्या बाजूकडून लढावं.”

“एकदम सुरक्षित, असा काही मार्ग नसतो, राजाला त्यातल्या त्यात कमी असुरक्षित मार्ग निवडता आला पाहिजे. राजाने स्वतःच्या प्रतिमेची काळजी घेऊन लोकोत्सवात सामील झालं पाहिजे आणि लोकांच्या आस्थांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.”       

“राजाने आपल्या आजूबाजूला कसे सहकारी ठेवले आहेत, ते समर्थ आणि विश्वासार्ह आहेत का? याचा कानोसा प्रजा घेत असते. त्यावरून ती राजाचं मूल्यमापन करत असते. लोक मूलतः तीन प्रकृतीचे असतात. एक, स्वतःची आकलनशक्ती वापरून अनुमान लावणारे. ते अत्युत्तम होत. दोन, दुसऱ्याच्या आकलनशक्तीचा आदर करून त्याचे अनुमान मानणारे असतात. ते उत्तम होत. तीन, जे वरील दोन्ही करत नाहीत. ते निरुपयोगी होत. आपले सहकारी निवडताना राजानं हे ध्यानात ठेवलं पाहिजे.”

“केवळ स्तुतिपाठकांना राजाने दूर ठेवलं पाहिजे. सत्य न सांगणाऱ्या सहकाऱ्यांना फटकारलं पाहिजे. त्याने स्वतः चौकस राहून नाना प्रश्न विचारले पाहिजेत, उलट सत्य मांडणाऱ्यांना अभय देऊन पदरी बाळगलं पाहिजे, पण निर्णय मात्र स्वतःच घेतला पाहिजे.”    

“सगळे आलबेल असतानादेखील निकट भविष्यात कधीतरी विपरीत परिस्थितीचा सामना करावा लगणार आहे, हे गृहीत धरून शांत काळात राजाने त्यासाठी पूर्वसिद्धता करायला हवी, इथंच बहुतांश राजे चुकतात. लोकांनाही दूरदृष्टी नसते, त्यांना वर्तमान छान दिसत असलं म्हणजे, भूतकाळाचा विसर पडतो आणि भविष्य त्यांच्या गावीही नसतं.”

“दैव बलवत्तर असतं, असं मानलं तरी आपलं विहित कर्म मनगटाच्या बळावर पार पडावं लागतं, सगळं काही दैवावर सोडून चालत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रसंग व कालावधान बाळगणं क्रमप्राप्त असतं, म्हणून भिन्न मार्गांनी काम करणारे दोन लोक सारखाच परिणाम देऊ शकतात किंवा एकच मार्ग अवलंबणाऱ्या दोन लोकांपैकी एक यशस्वी आणि एक अयशस्वी होऊ शकतो.”

“विवेकी माणसाला जर संधीचं सोनं करता आलं नाही किंवा कालपरत्वे बदलता आलं नाही, तर त्यात त्याचं मोठं नुकसान होतं. आपण आधी या एकाच मार्गाने येथवर विजयी होत आलो आहोत, असं समजून काळाची गरज असताना आपल्या स्वभावाला मुरड न घालणाऱ्याच्या नशिबी निराशा येते. स्वभाव आणि नशीब साथ देत असेल तर यश मिळतं, पण जर नशीब साथ देत नसेल तर यशस्वी होण्यासाठी स्वभावाविपरीत प्रसंगानुरूप काही अगदी वेगळं करता आलं पाहिजे.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

“सतर्क असल्यापेक्षा निर्भय असणं कधीही चांगलं. नशीब चंचल स्त्रीसारखं असतं, प्रसंगी राबवून घेतली तरी (मूळ शब्द beat and ill-use) तिला तरुणाचा कैफ आणि निडरपणा आवडतो, नेमस्ताचा तोचतोचपणा नाही. (यातून पुन्हा एकदा निकोलो स्त्रियांबद्दल काय विचार करतो, ते दिसतं. त्याच्या मध्ययुगीन युरोपातील काळाला साजेसं असेच ते आहेत!)    

भावी राजांना व राजपुत्रांना मार्गदर्शन करताना निकोलो म्हणतो, “नव्यानं दिलेल्या आमिषांमुळे लोक जुन्या जखमा विसरतील, असं मानणं म्हणजे आत्मवंचना आहे.” पोप ज्युलिअस २, हा ‘लढवैय्या पोप’ म्हणून प्रसिद्ध होता. त्याला उद्देशून निकोलो म्हणतो, “भाग्य आणि भाग्यश्री दोन्ही साहसी माणसाच्या मुठीत आणि मिठीत असतात, केवळ सतर्क माणसाच्या नाही.”

या पुस्तकातील प्रमुख विचारांचा आढावा घेतल्यावर ‘उपाधींमुळे माणसं नाही, तर माणसांमुळे उपाधींना अर्थ प्राप्त होतो’, असं बिनदिक्कत सांगणारा निकोलो आज लोकांना का प्यारा वाटतो, याचं उत्तर मिळतं.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......