रॉय किणीकर उमर खय्यामच्या रुबायांकडे ओढले गेले. आणि इंग्रजीप्रमाणे मराठी साहित्यातसुद्धा एक ‘लास्टिंग ब्यूटी’ निर्माण झाली!
ग्रंथनामा - झलक
श्रीनिवास जोशी
  • ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि रॉय किणीकर
  • Tue , 21 September 2021
  • ग्रंथनामा झलक घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ Ghartyat Fadfade Gadad Nile Abhal श्रीनिवास जोशी Shriniwas Joshi रॉय किणीकर Roy Kinikar रुबाया Rubaiya लास्टिंग ब्यूटी Lasting Beauty उमर खय्याम Omar Khayyam एडवर्ड फिटझ्-जेरल्ड Edward Fitz-Gerald

भाग एक

निरजंनआणि गोते खाणारा फाटका पतंग

रॉय किणीकर यांच्यावर अनेक लेख लिहिले गेले. त्या लेखांमध्ये त्यांच्याविषयी अनेक विशेषणे वापरली गेली. ती लक्षात घेतली की, किणीकर कसे होते, याची फार ओळख करून द्यावी लागत नाही.

अचपळ पारा, आभाळाचा तुकडा, घरटे शोधणारे एक पीस, विलक्षण आसामी, अवलिया, चतुरस्र, एक खोडकर मूल, मौला, एक तल्लख फकीर, चौकटीबाहेरचा, झपाटलेलं झाड, बेहिशोबी, बेजबाबदार, मनस्वी, अद्भुत कलंदर, लहरी, चक्रम, एककल्ली, अफाट, मिश्किल, वल्ली, बेफाट, बेहोश, नामानिराळा, ताज्यातवान्या प्रतिभेचा मालक, एक विलक्षण दगडफूल, स्वच्छंदी, एक विदग्ध द्रष्टा, निरिच्छ, विरागी, साधक, विभुती - असे अनेक शब्द किणीकरांचे वर्णन करताना महाराष्ट्राने वापरले आहेत.

लेखक किंवा कवी जे लिहितो, ते त्याचे आत्मचरित्रच असते, असे किणीकर म्हणत. त्यानुसार स्वतः किणीकरांनी स्वतःला ‘निरंजन आणि गोते खाणारा फाटका पतंग’ असे म्हटलेले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अवघ्या महाराष्ट्राला जे तीस विशेषणे वापरून जमले नाही, ते किणीकरांनी दोन उपमा वापरून साध्य केले. निरंजन म्हणजे ज्याच्यावर काळिमा येऊ शकत नाही असे. शुद्ध! किणीकरांच्या प्रतिभेवर कधी काळिमा आली नाही. कोणी आणू शकले नाही. ना गरिबी, ना हालाखी, ना उपेक्षा, ना अपयश, ना विश्वासघात, ना साक्षात मृत्यूची चाहूल! किणीकर माणूस म्हणून रडले असतील, काही क्षणी हवालदिलसुद्धा झाले असतील, पण त्यांची प्रतिभा कधी म्लान झाली नाही.

त्यांची अवस्था फाटक्या पतंगासारखी होती ती व्यवहारात आणि संसारात. त्या गोते खाणाऱ्या फाटकेपणाकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही. व्यवहारात किणीकरांनी स्वतःला फाटका पतंग म्हणून घेतले तरी साहित्यात त्यांना स्वतबद्दल विश्वास होता.

मी व्यास वाल्मिकी ज्ञानाई मी लिहिली

पाण्यात परंतु ओवी वाहुनि गेली

जरी काच तडकली वात जळे आतील

मी जाईन जेथे चंद्र - सूर्य येतील ।।

हे सर्व बघितल्यावर इथे एक प्रश्न उभा राहतो, आणि तो असा की, किणीकर एवढे मोठे व्यक्तिमत्त्व होते, आणि त्यांच्याकडे इतकी मोठी प्रतिभा होती, तर ते आयुष्यभर उपेक्षित का राहिले? याला माझ्या मते दोन कारणे आहेत. एकतर किणीकरांची कविता १९७०नंतर लिहिली गेली आहे. त्यांच्या प्रतिभेला बहरच मुळी त्यांच्या साठीनंतर आला. त्यानंतर ते वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी, १९७८ साली गेले.

दुसरे कारण असे की, किणीकरांच्या कवितेला खूप सखोल असे आध्यात्मिक संदर्भ आहेत. आध्यात्मिक संदर्भ आणि आधुनिक अभिव्यक्ती अशी रॉय किणीकर यांच्या कवितेची धाटणी आहे. यातल्या आध्यात्मिक थीमची सखोल ओळख किणीकरांच्या काळातील ‘सेक्युलर’ अभिरुचीला नव्हती. अध्यात्म वेगळे आणि साहित्य वेगळे असा सगळा आव होता. त्या वातावरणात किणीकरांच्या कवितेची श्रीमंती ‘सेक्युलर’ साहित्यात रमलेल्या महाराष्ट्राला कळणे अवघड झाले.

 

रॉय किणीकरांची कविता हा एक नवा वाण आहे, हे एक नवे 'ब्रीड' आहे, हे लक्षात घ्यायच्या भानगडीत कुणी पडले नाही. एक विश्राम गुप्ते आणि दुसरे विजय कार्येकर सोडले तर रॉय किणीकरांच्या कवितेतील आध्यात्मिक आशयाकडे कुणी फारसे लक्ष दिलेले माझ्या वाचनात आलेले नाही. पण या दोघांचा प्रयत्न एखादा लेख लिहिण्याच्या पलीकडे गेला नाही. रॉय किणीकरांची कविता हे एक नवे ‘ब्रीड’ आहे, हे लक्षात घ्यायच्या भानगडीत कुणी पडले नाही. याला कारण असे आध्यात्मिक विचार हा एक बकवास प्रकार आहे, अशीच सार्वत्रिक भावना त्या काळी होती.

रॉय किणीकर ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कविता पु.ल. देशपांडे, व. दि. कुलकर्णी, जयवंत दळवी अशा मान्यवरांच्या वाचनात आली. त्यांनी अशी कविता लिहिणारे किणीकर आपल्याला माहीत नव्हते अशी खंत सुद्धा व्यक्त केली आहे. पण, ह्यातल्या कुणीही रॉय किणीकर ह्यांच्या आध्यात्मिक कवितेकडे किंवा त्यांच्या कवितेतील आध्यात्मिक संवेदनशीलतेकडे लक्ष दिलेले नाही.

इथे एक सांगावेसे वाटते की, मर्ढेकर आणि विंदा करंदीकर ह्यांच्यासारख्या सर्वमान्य कवींच्या बाबतीतसुद्धा हेच घडलेले आहे. मर्ढेकर आणि तुकाराम यांच्या काव्यप्रवासातील साम्य दत्ता दंडगे यांनी दाखवून दिले आहे, पण ते एका व्याख्यानाच्या स्वरूपात.

अध्यात्म म्हटले की, महाराष्ट्रातील साहित्यिक आणि समीक्षक कावरेबावरे होतात. आपण असे काही लिहिले की, आपली प्रतिष्ठा खाली जाईल असे या लोकांना वाटत असावे. भारतातील अध्यात्मविचार हे एक दर्शन आहे. ती एक तर्काधिष्ठित तत्त्वप्रणाली आहे, हे भान आधुनिक मराठीमधील मोठ्या मोठ्या लेखकांकडे आणि समीक्षकांकडे नाही, असे म्हणावे लागते.

भारतीय तत्त्वज्ञानाची बांधणी किती लखलखत्या तर्कावर झाली आहे, याचे भान किणीकरांना होते. बर्गसाँ, नीत्शे, काफ्का, कम्यू, सार्त्र, स्टीफन झ्वाइग, असे सगळे चालतात, त्यांची नावे घेणे प्रतिष्ठेचेही होते. डोस्टोव्हस्कीने ख्रिस्त मांडला तर चालतो, टॉलस्टॉयने वेदांत मांडला तर चालतो, नव्हे आवडतो. पण किणीकरांनी ‘रुबाई’मधील ओळीत गीतेतील एखादा श्लोक वापरला, तर तो वापरला गेला आहे, हे कुणाच्या का लक्षात येत नाही? मर्ढेकरांतील तुकारामाचा शोध कुणाला का लागत नाही? विंदा करंदीकर यांच्या कवितेतील अध्यात्म कुणाला का सापडत नाही? मर्ढेकर पहिल्यापासून आध्यात्मिक होते, पण किणीकर आणि विंदा यांचा कम्युनिझम ते अध्यात्म हा प्रवास कसा झाला, याचा मागोवा घ्यावा, असे कुणाला का वाटत नाही?

सध्याच्या वातावरणात तर अध्यात्म विचार, समाजाची फसवणूक करण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे तर अध्यात्म अजूनच बदनाम होत आहे. एका बाजूला गावठी सेक्युलर आणि दुसऱ्या बाजूला गावठी आध्यात्मिक अशी समाजाची विभागणी झाली आहे. या गोंधळात अध्यात्म विचार हा प्रचितीचा आहे की नाही, या वादात न पडता, ती एक तत्त्वज्ञानात्मक बांधणी कशी आहे, त्यात मानवी जीवनाला सखोल स्पर्श कसा केला जातो, त्यात सखोल मानसशास्त्र कसे लपलेले आहे - या गोष्टींकडे कुणाचे लक्ष जाईनासे झाले आहे.

किणीकर तरुणपणी कम्युनिस्ट होते. नंतर ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावाखाली ‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ झाले. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रेमापोटीच त्यांनी आपले ‘रघुनाथ किणीकर’ हे नाव सोडून ‘रॉय किणीकर’ हे नाव घेतले. त्यांनी त्या काळी शस्त्रात झालेली प्रगती लक्षात घेतली. त्यापुढच्या काळात त्यांनी टॉलस्टॉय, डोस्टोव्हस्की, आणि इतर मोठ्या लेखकांचे परिशीलन केले. त्यानंतर त्यांनी गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर संत वाङ्गमय वाचले. तुकारामाने ‘एकनाथी भागवता’ची हजार पारायणे  केली. किणीकरसुद्धा जन्मभर ‘एकनाथी भागवत’ वाचत राहिले. संपूर्ण अध्यात्मविचार त्यांनी समजून घेतला.

हे सर्व चिंतन त्यांच्या रुबायांमध्ये उतरले आहे. आणि हे सगळे करत असताना, जीवन जसे सामोरे येत राहील तसे त्याच्याशी ते झुंज घेत राहिले. एक मंतरलेले आयुष्य जगत गेले. जे साठले ते त्यांनी आयुष्याच्या शेवटी त्यांच्या रुबायांमध्ये ढाळले.

सोनार जसे मुशीमध्ये सुवर्ण ओततो तसे, तत्त्वज्ञानाच्या मुशीत हा अवलिया आपल्या जीवनातील अनुभव ओतत गेला. एक एक रुबाई सुवर्णाची झाली. एकेका रुबाईचा मागोवा घेता घेता आपण समृद्ध होत जातो. अध्यात्म आणि जीवन यांची सांगड आपल्याला उलगडत जाते. हे थोडे आहे काय? अध्यात्मविचाराची प्रचिती आली काय आणि नाही आली काय, काय फरक पडतो? किणीकरांसारख्या प्रतिभावंताला अध्यात्मविचारात काय सापडले, हे पाहायला काय हरकत आहे? या त्यांच्या शोधाला महाराष्ट्र सारस्वताच्या अभिजात परंपरेत स्थान मिळायला काय हरकत आहे? किती दिवस रॉय किणीकर यांची रुबाई पोराटोरांच्या काव्यवाचनाची बळी ठरणार आहे?

‘हाय फिलॉसॉफी’ला, ‘हाय फिलॉसॉफी’चे स्थान मिळायला नको का?

केशवसुत, मर्ढेकर, सुर्वे, ढसाळ यांचे आशयासंबंधातील प्रयोग मोठे ठरत असतील, तर रॉय किणीकर यांनी आशयासंबधात केलेल्या प्रयोगांकडे दुर्लक्ष का करायचे? त्यातला अध्यात्मविचार समजून घ्यायला आपण कोते पडतो म्हणून, का साहित्यात अध्यात्म कसे आणायचे, या गावठी किरटेपणामुळे? मग ज्ञानेश्वर कसे चालतात? तुकारामला साहित्यिक का म्हणायचे? संसार आणि संन्यास ही ओढाताण फक्त अध्यात्मातच असते का? देव बघायच्या नशेत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत संन्यास घेऊन गेले. नियतीने त्यांना परत संसारात अडकवले. प्रचंड जीवघेणी ओढाताण!

साहित्याच्या आणि वर्तमानपत्रांच्या ओढीपोटी रॉय किणीकर संसाराकडे दुर्लक्ष करून बाहेर पडले. त्यांच्यासारख्या प्रकांड विद्वान माणसाला एक फालतू नोकरी मिळणे अवघड होते का? देव मिळावा म्हणून जंगलात गुरू शोधायला जाणाऱ्या विठ्ठलपंतांना शेती करणे अवघड होते का?

जॉर्ज बर्नार्ड शॉ ला हे द्वंद्व कळले होते. त्याच्या ‘मॅन अँड सुपरमॅन’ या नाटकातला जॅक टॅनर खऱ्या कलावंताबद्दल म्हणतो – ‘खरा कलावंत आपल्या बायका-पोरांकडे कलेसाठी दुर्लक्ष करतो. एक पेंटिंग चांगले व्हावे, ‘हॅम्लेट’मधली एक भूमिका चांगली व्हावी, कवितेची एक ओळ चांगली लिहून व्हावी, या इच्छेपोटी तो कुटुंबाचे कितीही हाल झाले तरी पर्वा करत नाही.’

श्री विठ्ठलपंतांचे हे द्वंद्व किणीकरांनी रुबाईमध्ये आणले तर केवळ अध्यात्माची परिभाषा वापरली गेली आहे म्हणून त्या साहित्याकडे, त्या भावनेकडे दुर्लक्ष करायचे का?

विठ्ठलपंत, किणीकर आणि शॉ हे एक नाहीत का? कला ही भावनेला जवळची असते हे मान्य केले तरी तिचा आत्मा तत्त्वज्ञानाचा असतो हे कसे विसरता येईल? तत्त्वज्ञानाचे साहित्य करणाऱ्या लेखकांना मान का नाही मिळत? महाराष्ट्रातील अनेक नामवंत फक्त भावनेची भाषा बोलतात म्हणून? या नामवंतांना तत्त्वज्ञानाची संवेदनशीलता साहित्यात आणता येत नाही म्हणून?

विठ्ठलपंतांना देव बघायचा होता. तीच इच्छा त्यांच्या पोरांमध्ये उतरली. ‘ज्ञानेश्वरी’सारखा ग्रंथ लिहून झाला. ‘ज्ञानेश्वरी’ हे अध्यात्म आहे. पण ती कुठेतरी एक कलाकृतीसुद्धा आहे. किणीकर, मर्ढेकर आणि विंदा कला करायला निघाले, पण ते कुठेतरी अध्यात्म लिहून बसले. शॉ चा जॅक टॅनर सुपरमॅन बनायच्या प्रयत्नात आहे. म्हणजे त्याला सिनेमातल्या सुपरमॅनसारखे उडायचे वगैरे नाहिये. त्याला ‘सुपर नैतिक’ बनायचे आहे. देवाच्या संकल्पनेच्या जवळ जायचे आहे. देवासारखे बनायचे आहे.

विठ्ठलपंत असो वा इतर कुणीही असो, प्रवास वरच्या दिशेने सुरू आहे. कला असो वा अध्यात्म, प्रवास नैतिकतेकडे सुरू आहे. नामदेव ढसाळ अभद्र भाषा बोलतात, पण त्यांना न्यायाकडे जायचे आहे. सुर्वे सामाजिक भाषा बोलतात, पण त्यांना समानतेकडे जायचे आहे.

महाराष्ट्र सारस्वतात भावनिक आणि सामाजिक कडकड खूप झाली आहे, आता थोडे तत्त्वज्ञानात्मक आणि आध्यात्मिक गहराईकडे जायला हवे, असे अनेकांना वाटू लागले आहे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

वर्ड्सवर्थ आणि कोलरिज यांनी निसर्गपूजा साहित्यात आणली. आपण ‘निसर्गपूजक’ नसताना ती समजून घेतली. त्याचे परिणाम चांगले झाले. वर्ड्सवर्थची ‘डॅफोडिल्स’ वाचून सर्वदूर पसरलेल्या डॅफोडिल्सचे रान डोळ्यापुढे येते. त्यानंतर सह्याद्रीच्या पठारांवर पसरलेले सोनकीचे रान आपल्याला वेगळे दिसायला लागते. आपल्यात लपलेला निसर्गपूजक वर्ड्सवर्थने बाहेर आणलेला असतो.

आता मर्ढेकर, विंदा आणि किणीकर यांची तत्त्वज्ञानपूजा आपण समजून घ्यायला हवी. तत्त्वज्ञान आणि अध्यात्म ह्यांच्यातील सांधा आपण समजून घेतला पाहिजे. जन्मभर शॉपेनहॉवर, प्रुधाँ आणि सॉक्रेटिस यांच्या तत्त्वज्ञानाच्या सहवासात राहिलेला टॉलस्टॉयसारखा पाखंडी माणूस एक ‘कन्फेशन’ लिहून शेवटी श्रद्धेकडे का वळला, यावर विचार झाला पाहिजे.

‘ब्रदर्स कॉरोमॉझॉव’मध्ये डोस्टोव्हस्कीने स्वतःवरून तीन पात्रे तयार केली आहेत. यातला दिमित्री भावनाप्रधान आहे. आयव्हन बुद्धिवादी आहे आणि अल्योशा आध्यात्मिक आहे. अल्योशाचे सखोल अध्यात्म साहित्यात प्रतिष्ठा पावते, तर आधुनिक मराठी साहित्यातील अध्यात्म का नाही समजून घ्यायचे?

अध्यात्मावरील साहित्य हे फक्त मराठी किंवा भारतीय खुळ आहे या विचारातून आपण बाहेर आले पाहिजे.

किणीकरांचे आयुष्य म्हणजे एक आध्यात्मिक तडफड होती, हे त्यांच्या रुबाया वाचून समजून घेतले पाहिजे. ते लिहितात - घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ

पृथ्वीच्या या मायावी घरट्यात शुद्ध निळे चैतन्य कसे फडफडत राहिले आहे, हे किणीकरांच्या विचारांशी आणि त्यांच्या शब्दांशी मैत्री करून समजून घेतले पाहिजे.

भाग दोन

उमर खय्याम, एडवर्ड फिटझ्-जेरल्ड आणि रॉय किणीकर

उमर खय्याम अकराव्या-बाराव्या शतकातला कवी. त्याचा जन्म सन १०४८चा आणि मृत्यू ११३१चा. तो पर्शियामधील म्हणजे सध्याच्या इराणमधील खोरासान प्रांतातल्या निशापूर या गावी जन्माला आला. उमर खय्याम नुसताच कवी नव्हता, तर उच्च प्रतीचा तत्त्वज्ञसुद्धा होता, आणि मोठा गणितज्ञसुद्धा होता. तत्त्वज्ञ म्हणून त्याने अ‍ॅरिस्टॉटलमधील बुद्धिप्रामाण्य आणि इस्लामी जीवनदृष्टी यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत तो इब्न सीना उर्फ अ‍ॅव्हिसेना या तत्त्ववेत्त्याचा चेला होता. इस्लामी परंपरेतील अजून एक मोठा तत्त्ववेत्ता अल गझाली हा उमर खय्यामचा शिष्य होता.

उमर खय्यामने कोती धर्म दृष्टी आणि कोती जीवनदृष्टी नेहमीच नाकारली. खय्यामच्या काळात पर्शियावर सेल्युक तुर्कांचे राज्य होते. हे सुलतान उदार जीवनदृष्टी असलेले होते. हे स्वतः मद्याचे भोक्ते होते. उमर खय्याम हा सुलतान मलिक शहा याचा ‘ड्रिंकिंग बडी’ होता.

या मलिक शहाने इश्फहान या शहरात त्या काळी वेधशाळा बांधली. उमर खय्यामची गणितातील गती पाहून मलिक शहाने इश्फहानला जाऊन नवे कॅलेंडर तयार करायची विनंती केली. उमर खय्यामने तिथे जाऊन ‘जलीली’ कॅलेंडर तयार केले. हे कॅलेंडर आपण सध्या वापरतो, त्या ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा जास्त अचूक आहे. उमर खय्यामच्या कॅलेंडरमध्ये दर ३३ वर्षांनी एक लीप ईयर येते. जलीली कॅलेंडर इराणमध्ये आजही वापरले जाते. याशिवाय एक गणिती म्हणून उमर खय्यामचे ‘क्यूबिक इक्वेशन्स’च्या वर्गीकरणाचे काम सर्वमान्य आहे. त्रिमितीमध्ये म्हणजे जॉमेट्रीमध्ये ‘इन्टरसेक्शन ऑफ कोनिक्स’वरील त्याचे कामसुद्धा मान्यता पावलेले आहे.

असा हा सर्वंकष प्रतिभा असलेला कवी आणि त्याची कविता मध्ययुगातील जग विसरून गेले होते. एकोणिसाव्या शतकात पर्शियात काम करणारा ब्रिटिश अधिकारी विल्यम ऑउज्लीच्या हाताला उमर खय्यामच्या रुबायांचे एक हस्तलिखित लागले. हे हस्तलिखित तेराव्या शतकात बनवले गेलेले होते. त्याने ते पुढे ब्रिटिश लायब्ररीमध्ये जमा केले.

 

उमर खय्यामच्या रुबाया इंग्रजीमध्ये आणण्याचे काम एडवर्ड फिटझ्-जेरल्डने केले. एडवर्ड फिटझ्-जेरल्डचा जन्म १८०७चा. हा प्रतिभावंत एका अतिश्रीमंत घरण्यात जन्माला आला. लहानपणापासून त्याला साहित्याची आवड. पुढे हा केंब्रिजमध्ये गेला, तेव्हा त्याची ओळख कवी अल्फ्रेड टेनिसनशी झाली. दोघांचेही इंग्रजी भाषेवर असामान्य प्रभुत्व होते. इंग्रजी भाषेची लय आणि तिच्यात लपलेले संगीत याची तीव्र जाण दोघांनाही होती.

अशा या भाषाप्रभूला पुढे पर्शियन भाषा शिकावी वाटली. फिटझ्-जेरल्डचा मित्र एडवर्ड कॉवल हा पर्शियन भाषेचा पंडित होता. त्याच्याकडे पर्शियन भाषा शिकत असताना १८५२च्या सुमारास फिटझ्-जेरल्डच्या हाती ऑउज्लीने आणलेले उमर खय्यामच्या रुबायांचे हस्तलिखित पडले. ती कविता सुंदर तर होतीच पण तत्त्वज्ञानाने संपृक्तसुद्धा होती.

फिटझ्-जेरल्डने त्या कवितांचे असे काही भाषांतर केले की, सगळे जग त्या कवितेच्या सौंदर्याने हुरळून गेले. खरं तर ‘भाषांतर’ हा शब्द फार कोता आणि अपुरा आहे. फिटझ्-जेरल्डने उमर खय्यामच्या  पर्शियन कवितेला इंग्रजी भाषेत जिवंत केले.

आज १७० वर्षांनंतर उमर खय्याम आणि फिटझ्-जेरल्डच्या कवितेची भूल जगावरून उतरलेली नाही. १९३० पर्यंतच फिटझ्-जेरल्डच्या पुस्तकाच्या ५४० आवृत्या निघाल्या होत्या. पुढे किती निघाल्या त्याला गणतीच नाही. फिटझ्-जेरल्डने आपले भाषांतर जेव्हा एडवर्ड कॉवलला पाठवले. ते वाचल्यावर कॉवल म्हणाला की, फिटझ्ने कवितांमधील एक ‘लास्टिंग ब्यूटी’ तयार केली आहे.

अशी ही ‘लास्टिंग ब्यूटी’ विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या भागात मराठी साहित्यकारांच्या नजरेत भरली नसती तरच नवल होते. मराठीमध्ये १९३० दशकात माधव ज्युलियन यांनी रुबाई हा प्रकार मराठीत आणला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

रॉय किणीकर यांचा जन्म १९०७ चा. म्हणजे फिटझ्-जेरल्डच्या जन्मानंतर बरोब्बर शंभर वर्षांनंतरचा. किणीकरांकडे साहित्याच्या संदर्भातली सौंदर्यदृष्टी जन्मजात असावी. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रतिभेला तत्त्वज्ञानाची ओढ होती. असे हे किणीकर फिटझ्-जेरल्डच्या रुबायांकडे ओढले गेले. आणि इंग्रजीप्रमाणे मराठी साहित्यातसुद्धा एक ‘लास्टिंग ब्यूटी’ निर्माण झाली.

एक बाराव्या शतकातील पर्शियातील कवी, एक एकोणिसाव्या शतकातील इंग्लंडमधील कवी आणि एक विसाव्या शतकातील मराठी कवी अशी सांगड कशी जुळली?

फिटझ्-जेरल्डच्या जगात ‘बायबल’मधील जीवनदृष्टीला ‘सायंटिफिक’ जीवनदृष्टीने शह दिला होता. ग्रीक आणि लॅटिन तर इंग्लंडमधील शाळा-कॉलेजांमध्ये आवर्जून शिकवल्या जात होत्या. ग्रीकांच्या बुद्धिप्रामाण्याला नव्या विज्ञानाची जोड मिळाली होती. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत १८५९ साली मांडला गेला. फिटझ्-जेरल्डचे भाषांतरसुद्धा १८५९ सालीच प्रसिद्ध झाले. धर्माचा आधार गेला होता. वर्डर्सवर्थ आणि कोलरीज यांनी आणलेली निसर्गपूजा पुरेशी वाटत नव्हती.

रॉय किणीकरांच्या तारुण्यातल्या जगातसुद्धा विविध तत्त्वज्ञाने आशाच प्रकारे एकमेकांना भिडली होती. एकीकडे नवा मानवतावाद होता, त्याच्या विरोधात सनातनी धर्मवाद होता. तिसरीकडे मार्क्सवाद होता. विज्ञानाने उत्तुंग झेपा घेतल्या होत्या. नव्या औद्योगिकीकरणाने एक भकास जीवनशैली आणली होती.

तिघेही कवी आपल्या आपल्या काळातील कलहांमधून स्वतःला पार नेत राहिले. त्या कलहांमुळे जी स्पंदने मनात उमटली, त्यांच्या कविता करत राहिले. या प्रकारातच फिटझ्-जेरल्ड खय्यामकडे ओढला गेला आणि रॉय किणीकर खय्याम आणि फिटझ्-जेरल्डकडे ओढले गेले. तिघांचीही कविता ही मंथनाची कविता आहे. हे मंथन नुसते भावनांचे नाही, ते विरोधी तत्त्वज्ञानांनी तयार केलेल्या भावनांच्या कल्लोळाचे मंथन आहे.

अ‍ॅरिस्टॉटल आणि इतर ग्रीकांवर प्रेम करता करता खय्याम इस्लामी श्रद्धेवर प्रेम करत होता. इस्लाम मधील कडवेपणाशी लढत होता. त्या गोंधळात तो मद्य आणि मदिराक्षींवर प्रेम करत होता. आणि आयुष्याच्या शेवटी सूफी बनता बनता तो - मद्य म्हणजे भक्ती आणि मद्यधुंद अवस्था म्हणजे तीव्र भक्तीमधून आलेला प्रेमोन्माद (ecstasy) - अशी रूपके तयार करून कविता लिहू लागला होता.

नव्या युगात धार्मिक आयुष्य संपल्यावर कोरडा बुद्धिप्रामाण्यवाद उरतो. त्या कोरडेपणाशी लढता लढता माणूस दारू आणि इतर सुखे अंतिम मानू लागतो. एक अस्तित्ववादी किंवा शून्यवादी भरकटलेपण त्याच्या आयुष्यात येते. फिटझ्-जेरल्डला उमर खय्यामच्या कवितेत एपीकोरस आणि ल्युक्रेशस यांचे तत्त्वज्ञान सापडले.

 

एपिकोरस (इसवी सनपूर्व - ३४१ ते २७०) हा ग्रीक तत्त्वज्ञ होता. त्याच्या मते तत्त्वज्ञानाचे मुख्य काम मानवाच्या जीवनात शांतता आणणे हे आहे. त्याच्या आयुष्यात स्वातंत्र्य आणणे हे आहे. तत्त्वज्ञानाचे अजून एक काम म्हणजे मानवाच्या आयुष्यातून वेदना पळवून लावणे. त्याचे म्हणणे असे की, मानवाच्या आयुष्यात दुःख आणि वेदना मृत्यूचे सत्य नाकरल्यामुळे येतात. मानवाला वाटत असते की, मृत्यू ही फार वेदनादायक आणि भीतीदायक गोष्ट आहे. या अशा संकल्पनांमुळे माणूस वेदनांच्या कचाट्यात सापडतो. त्याचे म्हणणे असे की, देव वगैरे जगात असले तरी त्यांना मानवात रस नसतो. त्यामुळे देव वगैरे भानगडीमध्ये माणसाने पडू नये. त्याच्या मते माणसाच्या संवेदना हाच ज्ञानाचा अंतिम स्रोत आहे. त्याच्या पलीकडे जाण्यात काही हशील नाही.

एपिकोरसच्या मते हे जग अणूंपासून बनलेले आहे. अणू एकत्र आले की, गोष्टी तयार होतात, त्यांचे विघटन झाले की गोष्टी विघटित होतात.

ल्युक्रेशस (इसवी सनपूर्व ९९ ते ४४) हा एपिकोरसचे तत्त्वज्ञान पुढे नेणारा तत्त्वज्ञ. सूर्यप्रकाशाच्या झोतात जसे धुळीचे कण हलताना दिसतात तसे हे जग एक अणूंचा झोत आहे. त्या कणांच्या हालचालीमध्ये जसा गोंधळ असतो तसा गोंधळ ह्या जगात आहे. याला कसलाही अर्थ नाही. या जगात जो सक्षम आहे तोच तरून जातो.

एपिकोरसच्या तत्त्वज्ञानाला ‘एपिक्युरिअ‍ॅनिझम’ म्हणतात. ‘एपिक्युरिअ‍ॅनिझम’ने काढलेल्या निष्कर्षांमुळे आहे ते आयुष्य आनंदात जगण्याला महत्त्व येते. सुंदर मैत्री असावी, चर्चा असाव्यात, मद्य असावे, आपल्याला आवडणाऱ्या स्त्रीबरोबर प्रेमाचे आयुष्य असावे, माणसाने अतिरेक न करता साधे, पण आनंदी आयुष्य जगावे, असे एपिक्युरिअ‍ॅनिझम सांगतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

धर्म भावना परास्त झाल्यामुळे फिटझ्-जेरल्ड एपिक्युरिअ‍ॅनिझमकडे वळला. उमर खय्यामच्या अनेक रुबायांमध्ये एपिक्युरियन जीवनदृष्टी प्रतीत होते. साकी, मद्य, सौंदर्य, जीवनातली अर्थहीनता हे सर्व कवितेचे अलंकार लेवून उमर खय्यामच्या कवितेत आले आहे.

पुढे रॉय किणीकर यांच्या तारुण्यात म्हणजे १९३० आणि १९४०च्या दशकात महायुद्धे, विज्ञानातील प्रगती यामुळे एक भयाण अर्थहीनता संवेदनशील लोकांच्या आयुष्यात आली. त्या अर्थहीनतेतील भयाणपणा ऊमर खय्याम-फिटझ्-जेरल्डच्या कवितेने काढून टाकला. मानवी जीवनातील अर्थहीनता किती सुंदर पद्धतीने हाताळाता येते, याचा धडा रॉय किणीकरांच्या पिढीला खय्याम-फिटझ्-जेरल्डच्या कवितेने दिला. किणीकरांची कविता त्यामुळे मर्ढेकरांच्या कवितेसारखी उदास होत नाही. ती कधी कधी त्रागा करते. पण एकूण सूर सर्व स्वीकारायचा आहे. एपिकोरसची अर्थहीनता माणसाला शून्यवादात ढकलत नाही.

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

फिटझ्-जेरल्ड स्वतः त्याच्या आयुष्याच्या अंतापर्यंत या ‘स्पिरिच्युअ‍ॅलिझम’पासून दूर राहिलेला दिसतो.

सुन्नी आणि शिया हे दोन्ही पंथ सूफी पंथाच्या विरोधात होते म्हणून उमर खय्याम त्याच्या सूफी शोधाबद्दल फार लिहिताना दिसत नाही. रॉय किणीकर मात्र या विषयावर भरभरून लिहिताना दिसतात.

उमर खय्यामची रुबाई महाराष्ट्रात कशी आली, याचा असा हा इतिहास आहे. रुबाईत साकी आहे, मद्य आहे आणि सौंदर्य आहे. कधी ईश्वर साकी बनून येतो, मद्य भक्ती बनून येते, मद्यधुंदी प्रेमभावनेचा कल्लोळ बनून येते. रुबाईत तत्त्वज्ञान काव्याचा घुंघट लेवून उतरते.

ऊनपावसाचा खेळ असावा, तसा किणीकरांच्या रुबाईमध्ये सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर भावनांचा आणि तत्त्वज्ञानाचा खेळ आपल्याला दिसत राहतो. या खेळाची काही शब्दचित्रे काढण्याचा प्रयत्न या पुस्तकात मी केला आहे…

..................................................................................................................................................................

‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ - श्रीनिवास जोशी,

सत्यव्रत प्रकाशन, पुणे,

पाने - २०३, मूल्य - २५० रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Umeshrao K

Thu , 30 September 2021

मुर्ख आणी विक्रुत माणसाचा अजुन एक लेख, लेख वाचा कशाचा कशाला संबध लागतो का पहा... अक्षरनामा सारखी साईट असल्या सुमार लेखनाला प्लँटफाँर्म कसे काय देती?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......