‘समृद्धी महामार्गा’च्या वाटेत येत असल्याने ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळा बुलडोझर फिरवून जमीनदोस्त!
पडघम - राज्यकारण
 मतीन भोसले
  • ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळा
  • Mon , 20 September 2021
  • पडघम राज्यकारण प्रश्नचिन्ह आश्रमशाळा Prashnachinha Ashramshala मतीन भोसले Matin Bhosle फासेपारधी Phase Pardhi समृद्धी महामार्ग Samruddhi Mahamarg

नागपूरवरून मुंबईला जोडणारा द्रुतगती ‘समृद्धी महामार्ग’ काही लोकांचे घर भरत गेला, पण मी मोठ्या कष्टाने हाडाचे पाणी करून उभारलेल्या ‘प्रश्नचिन्ह’ या फासेपारधी मुलांसाठी बांधलेल्या शाळेला चिरतच गेला. गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र मेहनत घेऊन उभारलेली शाळा जमीनदोस्त होताना पाहून काळजाचे तुकडे होत होते. पण जेसीबी पोकलॅण्डला व ते चालविणाऱ्या व्यक्तीला आणि आदेश देणाऱ्या कंत्राटदाराला हे आईचे हृदय कसं कळणार? हो खरंच- मी त्या लेकरांची आई होतो, आहे व राहीलही. समृद्धी महामार्ग व प्रश्नचिन्ह फासेपारधी यांची शाळा हा खरं तर एका प्रबंधाचा विषय आहे. त्यावर एक स्वतंत्र पुस्तक तयार झाले आहे. माझी कहाणी महाराष्ट्रातील तळागाळातील समाजकार्य करणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचावी, यासाठी ही नुसती तोंडओळख आहे. एवढा मोठा अन्याय होऊन शासन, प्रशासन, अधिकारी- सारं कसं सामसूम. ‘तरंग नाही तलावात’ याच तालात चालत आहेत. ‘उगवला जर सूर्य, मग हा अंध:कार का? म्हणविता जर राम तुम्ही तर मग हा रावणी दरबार का?’ असेच म्हणायची वेळ आली आहे.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ रोडवरील मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी बेड्याची ही कहाणी आहे. या बेड्यातील प्रश्नचिन्ह या शाळेच्या बरोबर मध्यातून जाऊन माझ्या स्वप्नावर या समृद्धी हायवेने वरवंटा फिरवला आहे. समृद्धी महामार्गामध्ये ‘बडे लोक बडी सोच’. सोसाट्याच्या या चक्रीवादळाने फासेपारध्यांना पाला-पाचोळ्यासारखे ‘नामोनिशान’ करून टाकले आहे. साध्या पिण्याच्या पाण्यालाही मोताद करून टाकले आहे. आजच्या कॉम्प्युटरच्या युगात आमचं दुःख कळणार तरी कुणाला? ऐकणार तरी कोण? पण तुम्ही सज्जनहो! तुमच्या हृदयाचा एक कप्पा माणुसकीसाठी राखून ठेवला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मी मतीन भोसले. फासेपारधी. मुक्काम पोस्ट मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. फासेपारधी म्हणजे रानावनांत राहणारा. फासा लावून जंगली जनावरांची, पक्ष्यांची शिकार करणारा व त्यावर आपला उदरनिर्वाह करणारा. गावात आम्हांला स्थान नाही. गावकुसाबाहेर पाल (कापडाची झोपडी) टाकून राहणारा आमचा हा समाज. आम्ही सदैव पोलिसांच्या हिटलिस्टवर. गावात किंवा परिसरात चोरी झाली की, पोलिसांची पहिली वारी पारधी बेड्यावर. दोन-चार जणांना पकडणार. गाडीत बसविणार. पोलीस स्टेशनमध्ये मारझोड करणार. ही नित्याचीच बाब. जेवायची नेहमी बोंबाबोंब. लग्नसमारंभातील उष्ट्या पत्रावळ्या उकिरड्यावर फेकल्या जातात. त्या उष्ट्या अन्नावर गुजराण करणारा माझा समाज. शिक्षणाचा-स्वच्छतेचा पत्ता नाही. मिळेल त्या मार्गाने उदरनिर्वाह करणे हे आमचे ध्येय. जातीचा दाखला नाही. रहिवासाचा दाखला नाही. मतदारयादीत नाव नाही म्हणून कोणतीही सवलत नाही. काय न्याय आहे बघा!

आमच्यावर एवढा अन्याय? पण आमची मागणी काय? राहायला छोटेसे घर, खायला अन्न आणि प्यायला पाणी व मुलांना शिक्षण. जिल्हा परिषदेच्या शाळेतील चालेल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ना. मी शिकलो. मास्तर झालो म्हणूनच फासेपारधी लोकांसाठी काही तरी करतो ना. नाही तर ही जमात अजूनही अंधाराच्या पखाली वाहत बसली असती. मला शिक्षणाची आवड नव्हतीच. बाबा शाळेत टाकायचे व मी शाळेतून परत यायचो. शाळेतही पारध्याचा पोर म्हणून मुलं वाळीत टाकायची. अंगावर कपडे नाहीत. पाटी-दप्तराचा तर पत्ताच नाही. पण या वादळी वाऱ्यातही माझं शिक्षण कसंबसं होत गेलं.

माझ्या फासेपारधी बांधवांना मिळणारी वागणूक, पोलिसांचा ससेमिरा, समाजाची अवहेलना, दारिद्र्य; भूक शमवण्यासाठी चाललेली धडपड- हे सारं काही डोक्यात साठवत होतो. मास्तरकी मिळाली. पगार सुरू झाला. पण मन काही रमत नव्हतं. फासेपारधी लोकांवर होणारे अन्याय काही सहन होत नव्हते. शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस सारे काही समाजबांधवांसाठी देत होतो. कधी मोर्चा, तर कधी अर्ज-निवेदन, तर कधी ठिय्या आंदोलन करीत होतो.

या स्वतंत्र भारतात आमच्या समाजाला मुलांना पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर भीक मागवी लागत होती आणि तीही सहजासहजी मिळत नव्हती. या ना त्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत होतो. समाजाची वाईट व्यवस्था पाहत होतो. मायबापांनी तर पोरांना वाऱ्यावर सोडले होते. मेला काय अन जित्ता काय? कुठं थांगपत्ता नव्हता. काही मुलांचे आई-वडील मरण पावले होते, तर काहींचे आईवडील तुरुंगात होते. त्या मुलांना तर कोणीच नव्हतं. कुठेही राहायचे. कुठेही झोपायचे. काहीही खायचे. मन पेटून उठत होते.

या मुलांना शिक्षण दिलं तर काही तरी बदल होऊ शकेल असं वाटलं आणि त्यातून जन्म झाला तो ‘आदिवासी फासेपारधी सुधार समिती’चा आणि त्यातूनच निर्मिती झाली ती ‘प्रश्नचिन्ह’ या फासेपारधी आदिवासी शाळेची. मी चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘प्रश्नचिन्ह’चे इंद्रधनुष्य पेलण्याचे ठरवले. काहींनी मला मूर्खात काढले. फासेपारधी मुलांना गोळा करून त्यांना एका ठिकाणी बसविणे सोपे काम नव्हते. शिवाय मुलांना वेगवेगळ्या सवयी जडलेल्या. शिक्षण हा विषय त्यांना माहीत नव्हता. शाळा कुडाची. सुरुवात तर केली. ‘प्रश्नचिन्ह’समोर प्रश्नच प्रश्न होते. शिक्षण-निवास-भोजन-कपडेलत्ते हे सारेच करायचे. याचा प्रचंड खर्च. शाळेची नोंदणी. अनुदानासाठी पायपीट. येरझारा. कुठे मंगरूळ चव्हाळा आणि कुठे मुंबई. अनुदान आले नाही. मंत्री, अधिकारी, मुख्यमंत्री सगळ्यांकडे चकरांवर चकरा झाल्या.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

शाळेच्या मुलांचा खर्च भागवण्यासाठी ‘भीक मांगो आंदोलन’ सुरू केले. फक्त एक रुपया मागितला. लोक मदत करायला तयार झाले. मी, मुले व माझे सवंगडी शिक्षणासाठी भीक मागू लागलो. पण तेथेही कायदा आडवा आला. अशी भीक मागता येत नाही. तक्रारी झाल्या. अटक तर कितीदा झाली. पोलीस स्टेशन, जेल, कोर्टकचेऱ्या व मी हे समीकरणच जणू ठरून गेलं होतं. पण पुढचे भवितव्य दिसत होते. मी नाही करणार तर कोण करणार, हा ‘प्रश्नचिन्ह’चा प्रश्न सोडविता सोडविता नाकीनऊ यायला लागले.

पण पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माणुसकीचे लोक, डॉ.प्रकाश बाबा आमटे, मंदाकिनी आमटे मदतीला आल्या. जालन्याचा मित्र परिवार- त्याने तर मनापासून साथ दिली. किती किती नावं घ्यायची. सगळे मदत करायला लागले. शाळा उभारली गेली. होस्टेल झाले. ग्रंथालय झाले. ‘प्रश्नचिन्हा’मध्ये मला आता पहाटेचा उजेड दिसायला लागला होता. माझ्या प्रयत्नांना यश येत होते. विनाअनुदानित तत्त्वावर शाळा अन्‌ तीही फासेपारधी यांची? चालविणे किती कठीण, हे ज्याचे त्यालाच माहीत. पण ‘कौन कहता है कि आसमान में सुराख नही होता, एक तो पत्थर तो तबीयत से उछालो यारों।’ या नात्याने माझी लढाई सुरू होती. या नात्यानं मी पुढे पुढे जात होतो. एक एक वर्ष असेच जात होते. एक एक मार्ग निघत होता. मित्रपरिवार मदत करीत होता. आता कुठे गाडी रुळावर यायला लागली होती. थोडा जम बसायला लागला होता. उकिरड्याचे दिवस बदलतात. आपण तर माणसे आहोत, याचा प्रत्यय यायला लागला होता. आणि यातच वज्राघात झाला.

महाराष्ट्र शासनानं ‘समृद्धी महामार्गा’ची घोषणा केली. प्रकल्प सर्वांनी डोक्यावर उचलून घेतला. पण आमच्या मात्र तो मुळावरच उठला. कारण नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग ‘प्रश्नचिन्ह’ शाळेला चिरतच गेला. एका देशाचे दोन तुकडे करावे तसे झाले. लिखापढी केली. आंदोलने केली. पण पाषाणाला घाम थोडाच फुटणार आहे! ‘प्रश्नचिन्ह’च्या प्रगतीवर बुलडोझर फिरले. होत्याचे नव्हते झाले. ज्ञानाची गंगा फासेपारधी समाजात आणणाऱ्या ‘प्रश्नचिन्ह’चे ग्रंथालय उद्‌ध्वस्त करण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बुजविण्यात आल्या. वर्गखोल्यांवरून बुलडोझर-जेसीबी-पोकलँड फिरले. फासेपारध्यांच्या आयुष्याचे वासेच फिरले. पिण्यासाठी पाणीही उरलं नाही. अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री सारे आश्वासन देत राहिले. पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

‘प्रश्नचिन्ह’मध्ये ४३६ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. यांना एकत्र आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या, कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत. पण हे सारं ‘बुडती हे जन देखवेना डोळा’ म्हणोन चाललं होतं. पण समृद्धी महामार्ग ‘प्रश्नचिन्ह’ शाळेवरून जात असल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या वाटेत येणारी ही शाळा कडेलोट करण्यात आली. समृद्धी महामार्गाचा रोलर या शाळेच्या स्वप्नावरून फिरला आणि पार चुराडा करून गेला. समृद्धी महामार्गाचे यंत्र-मशिनरी ‘प्रश्नचिन्ह’ला ‘नामोनिशान’ करायला लागल्या. त्यांनी आमच्या स्वप्नाचा पार चुराडा करून टाकला होता.

४३६ मुलांचा संसार आता उघडा पडला आहे. मोठ्या मेहनतीने गोळा केलेली ही मुले जर वेळीच आटोक्यात नाही आली तर भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना त्याचे काय? आता आशेचा किरण आहे तो समाजाकडून. माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या मानवतेकडून. मदतीचे हात पुढे येत आहेत. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,’ या नात्याने ते सोबत आहेत. पण मित्रहो, हा प्रकल्प साधा नाही. ४३६ मुलांचा सांभाळ करायचा आहे. तेही फासेपारधी मुलांचा. ही १०० टक्के अशक्य गोष्ट आहे. पण मी तो विडा उचलला आहे. अनेकांची घरे भरणाऱ्या व कोट्यवधी रुपयांचा मलिदा देणाऱ्या समृद्धी महामार्गाने ‘प्रश्नचिन्ह’ शाळेच्या तोंडाला पानं पुसली. आता त्यांच्यात भर पडली ती मेट्रोची. नागपूर-मुंबई मेट्रो. समृद्धी महामार्गाने आधीच आमची स्वप्नं भंग केली. आमचं उरलंसुरलं स्वप्नही ही मेट्रो देशोधडीला लावणार आहे. ‘आम्ही आधीच मेलेले पुन्हा गळफास कशाला?’ याप्रमाणे मेट्रो मुंबईकरांच्या जीवनात प्रकाश टाकेल, पण ‘प्रश्नचिन्ह’चे प्रश्न मात्र अजून गडद करून धावणार आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

फासेपारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही धडपड सुरू आहे. त्याच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करण्यात १२ वर्षे गेली. कशीबशी शाळा सुरू झाली. पण समृद्धी महामार्गाचे चक्रीवादळ आले आणि हे कमी की काय, म्हणून आता मेट्रोची त्सुनामी लाट येणार आहे. ती किती वाटोळं करेल ते देव जाणे! हे सारं नव्याने उभारायचे आहे. विस्कळीत झालेले स्वप्न जोडायचे आहे. फिनिक्स पक्ष्यासारखं पुन्हा राखेतून उभं राहायचं आहे. और बच गया मैं तो जला ही क्या हैं! या उक्तीतून जायचे आहे. हे सारं होत असताना माझे मन लाही-लाही होत आहे. पण इलाज नव्हता. करणार तरी काय? किती? ‘हे असे आहे, परंतु हे असे असणार नाही. दिवस आमचा आहे, तोवर घरी बसणार नाही’ या आशावादावर आमचे मार्गक्रमण सुरू आहे. व राहणारही आहे.

या धरणीकंपातून सावरण्यासाठी आपण सारे माझ्यासोबत आहात याची मला जाणीव आहे. तुमच्या बळावर तर मी ही लढाई लढत आहे. हा प्रश्न इतका लवकर सुटणार नाही. संघर्ष तर  सुरूच ठेवला पाहिजे. अंधार फार झाला, पणती जपून ठेवा; या न्यायानं दाद मागितली पाहिजे. मी जिवाचे रान केले आहे. माझी एकच विनंती आहे. तुम्हांला जमेल तशी मला मदत करा. माझ्या पाठीशी उभे राहा. ‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना!’ या न्यायाने तुम्ही मला साथ दिली तर संकटांचा हा गोवर्धन पर्वत उचलणे मला सोयीचे होईल. एका उपेक्षित गावकुसाबाहेरील समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्रांनो, या माझ्या ‘प्रश्नचिन्ह’चे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे मनोबल मला हवे आहे. ते होते. आहे व राहीलही!

(शब्दांकन : प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे)

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १४ ऑगस्ट २०२१च्या अंकातून साभार)

..................................................................................................................................................................

मतीन भोसले

मु.पो.मंगरूळ चव्हाळा, ता.नांदगाव खंडेश्वर, जि.अमरावती.

Mob.- 90963  64529      

..................................................................................................................................................................

मदतीसाठी ‘प्रश्नचिन्ह’ शाळेचा बँक अकाउंट नंबर

ACCOUNT Name - AADIWASI FASE PARADHI SUDHAR SAMITI MANGRUL CHAWALA

SBI A/C - 36174604565

IFC code - SBIN0008252

किंवा 9096364529 या मोबाईल नंबरवर paytm/google pay/phone peद्वारेही जमा करू शकता.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......