शिवाजी विद्यापीठात १९७० साली सुरू झालेल्या तेव्हाच्या रशियन व आत्ताच्या विदेशी भाषा विभागाला ऑगस्ट २०२०मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘विदेशी भाषा : शिक्षण आणि करिअर’ (संपादक : डॉ. मेघा पानसरे) हे पुस्तक २० सप्टेंबर २०२१ रोजी प्रकाशित होत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी-युवक आणि पालकांना करिअरच्या रूढ मार्गापेक्षा वेगळ्या अशा या क्षेत्राची माहिती व्हावी, या उद्देशाने हे पुस्तक प्रकाशित करत आहोत. त्यामध्ये सुरुवातीलाच ‘विदेशी भाषा शिक्षण : इतिहास आणि दिशा’ या लेखातून एकूणच मानवी भाषेच्या निर्मितीचा इतिहास, मातृभाषा आणि शिक्षणाची माध्यम भाषा, वसाहतवाद, बहुभाषिकता, विदेशी भाषा अध्यापन-अध्ययन, २१व्या शतकातील नव्या पिढीचा दृष्टीकोन, भाषा आणि ओळख अशा विविध संकल्पनांवर भाष्य आहे. त्याचा एकूणच भाषा आणि विदेशी भाषा याबाबत एक व्यापक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होते. तसेच या पुस्तकात रशियन, जर्मन, जपानी, फ्रेंच व पोर्तुगीज या भाषांचे अभ्यासक्रम आणि करिअर संधी यांची माहिती देणारे तज्ज्ञांचे स्वतंत्र लेख आहेत. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मराठी भाषिक विविध मान्यवर तज्ज्ञांचे अनुभवकथनसुद्धा देण्यात आले आहे.
‘विदेशी भाषा’ या क्षेत्राकडे मराठी भाषिक लोक अद्याप गंभीरपणे पाहत नाहीत. खरे तर हा राज्य आणि राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. व्यापार-उद्योग, पर्यटन, राजकारण, संस्कृती या सर्वच क्षेत्रात विदेशी भाषा अवगत असणाऱ्या लोकांची अत्यंत गरज असते. परंतु अशा तज्ज्ञांची संख्या महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे. तेव्हा या एका महत्त्वाच्या क्षेत्राची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.
या पुस्तकातील ‘विदेशी भाषा शिक्षण : इतिहास आणि दिशा’ या लेखाचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
जगातील भाषा चित्र
जगामध्ये आज ७.९ अब्ज लोकसंख्येत ७१०२ जिवंत भाषा आहेत. त्यातील २३ भाषा या ४.१ अब्ज लोकांच्या मातृभाषा आहेत. म्हणजे जगातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक या २३ भाषांत बोलतात. त्यातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या प्रथम वा मातृभाषांत मॅंडेरीन-चीनी, स्पॅनिश, इंग्रजी, हिंदी, अरबी, बंगाली, पोर्तुगीज, रशियन, जपानी, पंजाबी या भाषा येतात. मराठी ही प्रथम वा मातृभाषा असणार्यांच्या लोकसंख्येनुसार जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. परंतु प्रथम, द्वितीय वा तृतीय भाषा म्हणून सर्वाधिक लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांत अर्थातच इंग्रजी प्रथम क्रमांकावर येते. जगातील या सर्व इंग्रजी भाषिक लोकांपैकी केवळ ३३ टक्के लोकांची ती मातृभाषा, तर ६७ टक्के लोकांची द्वितीय वा तृतीय भाषा आहे.
इथे स्वाहिली भाषेचं उदाहरणही घेता येईल. टांझानिया, केनिया, युगांडा आणि काँगो अशा अनेक आफ्रिकन देशांमध्ये स्वाहिली ही राष्ट्रीय किंवा अधिकृत भाषा आहे. स्वाहिली ही मातृभाषा असलेले मूळ भाषिक लोक केवळ १ कोटी ६० लाख आहेत, तर स्वाहिली भाषा बोलणाऱ्यांची एकूण संख्या ९ कोटी ८८ लाख आहे. याचा अर्थ स्वाहिली भाषा बोलणाऱ्या लोकांपैकी ८२ टक्के लोकांची ती द्वितीय भाषा आहे. त्याउलट मॅंडेरीन-चीनी भाषा बोलणाऱ्यांपैकी केवळ १७ टक्के लोकांची ती द्वितीय भाषा आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
जगातील भाषिक समृद्धीचा विचार करता सर्वाधिक भाषा असलेल्या पहिल्या दहा देशांत पापुआ न्यू गिनी (८००+ भाषा), इंडोनेशिया (७००+), नायजेरिया (५२२), भारत (४५४), अमेरिका (३२६), ऑस्ट्रेलिया (३१४), चीन (३०८), मेक्सिको (२९२), कॅमेरून (२७५) व ब्राझील (२२१) यांचा समावेश होतो. याचा अर्थ, जगभरात भाषांचा प्रसार असमान आहे. पापुआ न्यू गिनी या देशात बहुसंख्य स्थानिक लोक शेकडो भाषा बोलतात, तर अमेरिकेत बहुसंख्य स्तलांतरित लोक या विविध भाषा बोलतात. पापुआ न्यू गिनी या देशातील भाषांची संख्या ही संपूर्ण युरोपात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या दुपटीहून अधिक आहे.
जगातील ४३ टक्के लोक द्विभाषिक आहेत. इंग्रजी ५९ देशांत, तर फ्रेंच ३४, अरेबिक २५, स्पॅनिश २१, पोर्तुगीज १०, जर्मन ६, रशियन १०, स्वाहिली ५ देशांत बोलली जाते. अशा अनेक भाषा राष्ट्राच्या भौगोलिक व राजकीय सीमांत बंदिस्त न होता विविध राष्ट्रांत बोलल्या जातात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत. युरोपियन युनियनच्या २४ अधिकृत, तर तीन कामकाजाच्या भाषा आहेत.
जगातील सर्व प्रमुख भाषा या बहुसंख्य लोकांच्या मातृभाषांऐवजी व्यापक संप्रेषणाच्या, संवादाच्या भाषा आहेत. दुसरी भाषा शिकणारे लोक हे क्वचितच मातृभाषेचं अध्ययन करतात. लोक व्यापक संप्रेषणाच्या भाषा शिकतात, कारण त्यातून त्यांचा संप्रेषणाचा परीघ विस्तारण्यास मदत होते. भाषेची आर्थिक शक्ती ही तिच्या दुसर्या (आणि तिसर्या) भाषेच्या वापरकर्त्यांनुसार मोजली जाते. व्यापक संप्रेषणाची भाषा आणि मातृभाषा यांच्यातील विरोधपूर्ण संबंधासाठी सध्याची आर्थिक व्यवस्था जबाबदार आहे. भाषाभाषांमधील असा विरोधी संबंध हा काही बहुभाषिकतेचा नैसर्गिक गुण नसतो.
जगभरात विपुल भाषा वैविध्य व समृद्धता असूनही, दुर्दैवाने, आज अस्तित्त्वात असलेल्या भाषांपैकी जवळजवळ ३००० म्हणजे ४० टक्के भाषा मृत होण्याच्या प्रक्रियेत आहेत. २१व्या शतकाच्या अखेरीस आज जिवंत असलेल्या भाषांपैकी ९० टक्के भाषांचा अंत होईल, अशी चिंता भाषावैज्ञानिक व मानववंशशास्त्रज्ञांना सतावत आहे. जेव्हा एखाद्या भाषेचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्यासोबत एक विश्व मरण पावते. त्या भाषेच्या मानवी समूहाचा भूतकाळ, त्याची परंपरा, संस्कृती आणि त्याच्या विशिष्ट ज्ञानाचा आधार व जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या सर्व गोष्टी कायमच्या नष्ट होतात. आपल्याला त्या ज्ञानाशी जोडणारे माध्यम नाहीसे होते. भाषेची आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका असते. भाषेच्या अभावाचा एतद्देशीय लोकांच्या मूलभूत मानवाधिकारांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होतो. हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी २०१९ हे वर्ष ‘एतद्देशीय भाषेचं आंतरराष्ट्रीय वर्ष’ (International Year of Indigenous Languages) म्हणून घोषित केलं आणि या भाषांना चालना देऊन त्यांचे ज्ञान भावी पिढ्यांकडे देण्याचा ठराव केला.
कोणत्या भाषा मरणपंथाला लागतात, याचं विश्लेषणही महत्त्वाचं आहे. अमेरिकेत स्पॅनिश भाषा ही सर्वांत मोठी अल्पसंख्याक भाषा आहे. परंतु ती जगात इतर अनेक देशांत बोलली जात असल्यानं व सामर्थ्यशाली देशाची अधिकृत भाषा असल्यानं नष्ट होण्याची शक्यता नाही. आर्थिक व राजकीय वर्चस्व हा एखादी भाषा सामर्थ्यशाली वा क्षीण होण्यामागील महत्त्वाचा घटक आहे.
एका दृष्टीनं पाहिलं तर या जगात केवळ एकच भाषा बोलणारी वा समजणारी माणसं नसतातच. प्रत्येक मनुष्याला एकापेक्षा अधिक भाषिक विविधता, म्हणजे शैली, बोलीभाषा यांचं ज्ञान असतंच. खरं तर जगातील बोलली जाणारी प्रत्येक भाषा हे एका मानवी समूहाच्या संस्कृतीचा जिवंत इतिहास असतो. त्यामुळे एखादी भाषा श्रेष्ठ व एखादी भाषा कमी श्रेष्ठ असं म्हणणं अवैज्ञानिक व असांस्कृतिक आहे. परंतु तरीही जागतिक स्तरावर भाषांचे प्रभाव व महत्त्व ठरवण्याचे प्रयत्न सातत्याने होत असतात. एखादी भाषा पृथ्वीच्या किती मोठ्या भूभागावर बोलली जाते किंवा तिचा देश आर्थिक किंवा लष्करीदृष्ट्या किती बलाढ्य आहे, त्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय महत्त्व काय आहे, अशा निकषांवर पूर्वी भाषेचं महत्त्व जोखलं जात असे. त्या देशांच्या भाषा शिकणं व्यावसायिकदृष्ट्या लाभदायी आहे, असं मानलं जात असे. पण आता एखाद्या भाषेचं महत्त्व ठरवण्याचे मापदंड बदलले आहेत. समाजमाध्यमांमुळे विविध भाषांतील आंतरसंवाद अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जगातील विविध भाषांत काय घडतं आहे, हे जगासमोर येत असतं. अशा काळात नव्या निकषांवर भाषांच्या प्रभावाची माहिती समोर येते.
एखाद्या भाषेतील साहित्याचं जगातील इतर भाषांमध्ये झालेलं भाषांतर आणि इतर भाषांमधून त्या भाषेत अनुवादित झालेली पुस्तकं, त्या भाषेतील बहुभाषिक लोकांची संख्या व ट्विटर, विकिपीडिया अशा समाजमाध्यमांत उमटणारं भाषेचं प्रतिबिंब, यावर आधारित एका सखोल अभ्यासात प्रभावशाली जागतिक भाषांच्या यादीत इंग्रजी व त्यानंतर स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच आणि रशियन या भाषा येतात.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
चीनी, हिंदी, मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या जगात मोठी असली तरी वरील निकषांवर तुलनेने या भाषा प्रभावशाली गटात मोडत नाहीत. या अभ्यासानुसार आपल्या मातृभाषेशिवाय आणखी इतर भाषा, विशेषतः इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, रशियनसारख्या जगातल्या प्रभावी भाषा जाणणारी व्यक्ती तुलनेने इतर जगाशी अधिक जुळलेली असते. काही अभ्यास भाषांशी संबंधित इतरही घटक लक्षात घेतात. त्यामध्ये भाषेत ज्ञानार्जनाची क्षमता, उपजीविका मिळण्याची क्षमता, संवाद क्षमता, प्रसारमाध्यमांचा वापर करण्याची क्षमता, आंतरराष्ट्रीय संबंध हाताळण्यात मुत्सद्देगिरीची क्षमता व इतर कोणत्याही भाषेचं ज्ञान नसताना ती भाषा अवगत असल्यास त्या भाषेचा वापर करून माणसाला किती व्यापक प्रवास करता येईल, ती क्षमता अशा बाबींचा समावेश होतो. एखाद्या भाषेत दीर्घकाळ लिहिलं गेलेलं साहित्य, माणसाला आपल्या मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म भाव व विचार स्पष्टपणे व्यक्त करता येतील, अशा अर्थच्छटा असलेला विपुल शब्दसंग्रह, कालानुरूप नव्या शब्दनिर्मितीस खुलेपणा, असेही भाषा समृद्ध असण्याचे निकष मानले जातात.
इंग्रजी भाषा येत असेल तर आज जगातील कोणाशीही संवाद साधता येतो, असा एक गैरसमज लोकांच्या मनात आहे. जगातील साधारण १ अब्ज लोकांना इंग्रजी भाषा समजते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर जगात ८७.५ टक्के लोकांना इंग्रजी येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.
फार पूर्वीपासून जगातील सर्वच लोकांची एक सामूहिक भाषा असावी, असे प्रयत्न विविध स्तरांवर सुरू आहेत. त्यातूनच ‘एस्परान्तो’ ही जगातील सर्वांत जास्त प्रमाणात बोलली जाणारी रचित आंतरराष्ट्रीय सहाय्यक भाषा बनली. ही कृत्रिम भाषा अंदाजे एक लाख लोक सक्रियपणे बोलतात. युरोप, पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिकेत ‘एस्परान्तो’ बोलणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. युनिव्हर्सल एस्पेरांतो असोसिएशनचे १२० देशांमध्ये ५५०० पेक्षा जास्त सदस्य आहेत. अलिकडच्या काही वर्षांत एस्परान्तो इंटरनेटवरदेखील लक्षणीयरित्या उपलब्ध आहे. ड्यूओलिंगोसारख्या प्लॅटफॉर्मवर ती अधिक प्रमाणात प्रवेशयोग्य बनली आहे. परंतु ती मुख्यत: युरोपकेंद्री भाषा आहे. अशा कृत्रिम भाषेतून विश्वात मानवी परस्परसंवाद, सर्व भाषांना समन्याय व एकात्मता साधण्याची शक्यता अंधुक आहे.
द्विभाषिकता - बहुभाषिकता
मानवी इतिहासात स्थलांतर ही एक प्राचीन काळापासून चालत आलेली घटना असली तरी जागतिकीकरणानंतर जगात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागलं. त्याला नैसर्गिक आपत्ती, युद्ध वा आर्थिक, राजकीय अशी अनेक कारणे असली तरी शहरीकरण आणि स्थलांतर हे वर्तमानातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण वास्तव आहे. त्यातून जगभरात भाषा व संस्कृतीचे गुंतागुंतीचे प्रश्न तयार झाले आहेत. द्विभाषिकता व बहुभाषिकता ही २१व्या शतकातील माणसाची ओळख बनली आहे. म्हणूनच जागतिक स्तरावर परस्पर संवाद हा कधी नव्हे इतका महत्त्वाचा झाला आहे.
जागतिकीकरणाच्या युगात एकाच वेळी मातृभाषा, स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांचा वापर आणि विविध भाषिक लोकांचा परस्परांशी बहुस्तरीय संबंध ही एक साधारण बाब आहे. द्वि- किंवा बहुभाषिकतेचे फायदे केवळ व्यक्तीसाठीच नसतात, तर एकूणच समाजासाठी असतात. विदेशी भाषेचे ज्ञान हे २१व्या शतकाचे सामाजिक कौशल्य आहे. ते कौशल्य प्राप्त केलेल्या लोकांना जागतिक व्यापार, नोकरी, व्यवसाय, सांस्कृतिक आदानप्रदान व नवनव्या कल्पना-विचारांची देवाणघेवाण या सर्व क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.
द्विभाषिकता वा बहुभाषिकता आधुनिक मानवासाठी खरोखरच एक जैविक, नैसर्गिक वरदान आहे. नवी भाषा का शिकायची, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण नवनवीन विज्ञान संशोधनातून यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येते आहे. मातृभाषेपेक्षा वेगळी अशी दुसरी भाषा शिकणं, द्विभाषिकता वा बहुभाषिकता कौशल्य आणि त्याचा सातत्यानं वापर, यामुळे माणूस नक्कीच इतरांपेक्षा अधिक चांगले आयुष्य जगतो. भाषा शिकण्याचे आकलनात्मक किंवा संज्ञानात्मक (cognitive) फायदे खूप आहेत. भाषेच्या सक्रीय वापराने मेंदूची कार्यक्षमता वाढते. माणसाच्या ग्रहणशीलता व आकलन क्षमतेत, स्मरणशक्तीत कमालीची सुधारणा होते. विश्लेषण क्षमता सुधारते. स्वत:च्या मनातील सूक्ष्म विचार समजून घेता येतात. सृजनशीलता वाढते. इतर विषय, कौशल्ये शिकण्याची क्षमता वाढते. विविध स्तरांवरील कामांचं नियोजन, प्रश्न-समस्या सोडवणे, अमूर्त संकल्पना समजून घेण्याची क्षमता वाढते. दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्याची त्याची क्षमता वाढते. वयोमानाने होणारा आकलन वा संज्ञानात्मक क्षमतेचा ऱ्हास, स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होतो. एकभाषिक व्यक्तीपेक्षा बहुभाषिक व्यक्ती शब्दसंग्रह, वाचन व गणित विषयांत बहुधा अधिक निपुण असतात. सतत एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ‘स्वीच’ करण्याच्या सवयीने बहुकार्यप्रवणता क्षमता वाढते. व्यक्ती अधिक तर्कसंगत, विवेकी बनते. निर्णयक्षमता वाढते. बहुभाषिकतेमुळे अल्झायमर व डिमेन्शिया हे आजार होण्याची शक्यता एकभाषिक लोकांपेक्षा कमी होते.
विदेशी भाषा शिकताना भाषेबरोबरच त्या देशाचा भूगोल, इतिहास, समाज जीवन, जनमानस असं खूप काही समजत जातं. शब्दांमधून, पाठांमधून, वर्गातील दररोजच्या अभ्यासातून आपण हळूहळू एका नव्या संस्कृतीकडे पावलं टाकत असतो. यातून व्यक्ती एका नव्या संस्कृतीशी जोडली जाते. ही खरं तर देशाबाहेर डोकावण्याची एक खिडकी असते.
विदेशी भाषेचं ज्ञान माणसाला सांस्कृतिकदृष्ट्या विशाल दृष्टी देतं. अधिक सहिष्णु बनवतं. नव्या विचारांचा खुलेपणाने स्वीकार करायला शिकवतं. त्याला विश्वातील बहुविधतेचा आनंद अनुभवता येतो, तिचा आदर करता येतो. सांस्कृतिक विशुद्धतेचा गर्व किंवा दुराभिमान याच्या पलीकडे जाता येतं. आपलं जगणं समृद्ध, अधिक उन्नत, अधिक वैश्विक होतं. स्वत:च्या जगण्याकडे, स्वत:च्या संस्कृतीकडे परक्या, बाहेरच्या माणसाच्या दृष्टीकोनातून पाहता येतं. भाषा, वंश, प्रदेश या सीमारेषांच्या पलीकडे जाऊन मानवी भावभावना व व्यवहार आतून कसे सारखेच आहेत, याची जाणीव माणसाला सकल मानवजातीशी जोडते. तर त्यांच्यातील फरक खुलेपणानं स्वीकारून परक्यांबद्दलचे त्याचे पूर्वग्रह कमी होतात. भाषेद्वारे नवीन कला, संगीत, पाककला, चित्रपट, फॅशन, विज्ञान, तत्त्वज्ञान यापर्यंत पोहोचण्याचा दरवाजा खुला होतो.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
विदेशी भाषा शिकण्यातून आपलं मातृभाषेचं ज्ञान बहुमितीय, अधिक सखोल होतं. एकूणच भाषेचं तंत्र, रचना नव्याने समजू लागते. आपली मातृभाषा आणि एका दूरस्थ समाजाची वेगळी भाषा यांच्यातील साम्य व फरक याकडे लक्ष जातं. भाषा शिकताना आपण नकळत भाषांतर करू लागतो. आकलन, विचार आणि अभिव्यक्ती या मानसिक प्रक्रियांतही एक प्रकारचं भाषांतरच होत असतं. जेव्हा आपण व्याकरणिक चुका करत नव्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भाषेबाबत शुद्ध-अशुद्ध अशा कल्पना दूर करून संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आपल्याला एक नवा तौलनिक दृष्टीकोन मिळतो आणि आपली भाषिक जाणीव अधिक व्यापक, अधिक उदार होते.
विदेशी भाषा अध्यापन-अध्ययन
विदेशी भाषा अध्यापन व अध्ययनाच्या पारंपरिक पद्धतीला २१व्या शतकात नवनवीन माहिती-तंत्रज्ञान माध्यमांचे आव्हान मिळत आहे. पूर्वी शिक्षक-विद्यार्थी व व्याकरण-भाषांतर मॉडेलमध्ये पाठ्यपुस्तक व स्वाध्याय अशा संचावर आधारित व मुख्यत: त्या भाषेच्या वातावरणाच्या अभावात अध्ययन प्रक्रिया होत असे. वाचन, लेखन, श्रवण कौशल्ये प्राप्त करण्यावर भर असे. त्यानंतर अध्यापन हे संवाद कौशल्य केंद्रित बनले. अध्यापनात भाषा प्रयोगशाळेचा वापर होऊ लागला. परंतु आता ऑफलाईन अध्यापनाची पद्धतीही बदलते आहे. अलीकडे ऑनलाईन झूम वा गूगल मीट या आभासी मंचावरून व्यापक स्तरावर भाषा अध्ययन सुरू झाले आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाषा शिकण्यासही नक्कीच मर्यादा आहेत. तिथे एकतर इंग्रजी वा इतर युरोपियन भाषेच्या माध्यमातून अध्ययन प्रक्रिया होते. भारतासारख्या देशातील प्रादेशिक मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक स्तरांवर विदेशी भाषा व संस्कृती शिकताना स्थानिक शिक्षकाचे माध्यम आजही अत्यंत आवश्यक असल्याचा अनुभव आहे. तंत्रज्ञानाची नवी साधने इथे सहायक भूमिका बजावतात. तेव्हा बदलत्या काळात भाषा अध्यापन व अध्ययनाच्या नव्या पद्धती विकसित होत आहेत.
‘द मॅट्रीक्स’ (१९९९), ‘इन्सेप्शन’ (२०१०) सारखे विज्ञान चित्रपट जगभरात अतिशय प्रसिद्ध आहेत. माणसाचा मेंदू संगणकाला जोडता येईल अशा एका अद्भुत कल्पना विश्वाचं प्रवेशद्वार त्यांनी उघडलं. एलॉन मस्क यांची न्यूरालिंक कॉर्पोरेशन (२०१६) ही न्यूरो-टेक्नॉलॉजी कंपनी मानवी मेंदूत रोपण करता येईल अशी उपकरणे, ‘ब्रेन-मशीन इंटरफेस’ (BMI) विकसित करते. त्यांचा अंतिम उद्देश माणूस आणि सॉफ्टवेअर एकमेकांत विलीन करणं आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाच्या गतीबरोबर राहणं हे आहे. भविष्यात भाषा कौशल्य थेट माणसाच्या मेंदूत रोपित करता येईल का, हा एक रोचक प्रश्न आहे. परंतु त्याचे मानवी जीवनावर किती भयंकर परिणाम होऊ शकतात, त्याची कल्पनाही अभ्यासकांना आहे. भाषांतरासाठी अनेक सॉफ्टवेअर निर्माण झाले आहेत. अर्थातच ते आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मजकुराचं भाषांतर करण्यासाठी उपयुक्त आहेत. काळानुसार त्यातही प्रगती होत जाईल हे निश्चित. पण परस्परसंवाद आणि साहित्यिक भाषांतरामध्ये आज तरी मानवी मेंदूची जागा मशीन घेऊ शकत नाही.
विदेशी भाषा व करिअर
२१व्या शतकात जीवनाची बदलती गुणवत्ता दर्शवणारे अनेक समाजशास्त्रीय अहवाल नवं वास्तव समोर आणत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग जरी जवळ आलं असलं तरी सामाजिक जीवन कमी होऊन माणसं मानसिकदृष्ट्या एकाकी बनू लागली आहेत. जीवनाबद्दल असमाधान, व्यसनाधिनता, आत्महत्या व हिंसा वाढत आहे. घट्ट नातेसंबंध, आधार नेटवर्क व इतरांबरोबर वेळ घालवणं हे आजही सुखी जीवनासाठी आवश्यक घटक आहेत, हे स्पष्ट झालं आहे. यातून यशस्वी जीवनाच्या जुन्या व्याख्येचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षण व करिअर, बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी, असुरक्षितता व जीवघेणी स्पर्धा, अधिकाधिक स्थावर संपत्ती व ग्राहक संस्कृतीचा पुरस्कार, उच्चभ्रू जीवनशैलीचं अनुकरण, या भांडवली व्यवस्थेने प्रस्थापित केलेल्या कल्पना २१व्या शतकातील नव्या पिढीसाठी आदर्श असतील का, हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक तरुण याला पर्याय शोधू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आपण विदेशी भाषा करिअरचा विचार करत आहोत.
विदेशी भाषा शिक्षणातून अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. २१व्या शतकातील तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीची काही नवी वैशिष्ट्ये आहेत. ते देशातच नव्हे, तर जगात कुठेही रहायला व काम करायला तयार असतात, इच्छा होईल तेव्हा व इच्छा असेल तितका काळ प्रवास करू शकतात, स्वत:च्या आवडी व क्षमतेनुरूप कामाचं क्षेत्र व काम बदलतात, कमाई ही पगाराच्या आकड्यात मर्यादित न ठेवता कार्यक्षमतेचा पूर्ण आनंद घेतात, जगभरातील समान बौद्धिक-सृजनात्मक क्षमता असणाऱ्या लोकांशी जोडून घेऊन काम करतात, न आवडणारी कामे आउटसोर्स करतात, स्वतःचे कामाचे तास आणि कार्यालय निवड, याबाबत स्वत:च्या मनाचं ऐकतात इत्यादी. त्यातून नव्या पिढीचा जीवनाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन दिसतो. या वैशिष्ट्यांशी सुसंगत अशा करिअरमधील अनेक संधी आपल्यासमोर येतात. खरं तर भारतात आज विदेशी भाषा तज्ज्ञांची आत्यंतिक कमतरता आहे. अशा तज्ज्ञांची मागणी प्रत्येक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत आहे.
कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीशिवाय केवळ विदेशी भाषेचे ज्ञान, त्या भाषेचे संवाद कौशल्य यातून भाषांतर, दुभाषा या क्षेत्रात आपण काम करू शकतो. पर्यटन क्षेत्र, हॉटेल उद्योग, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रकल्प, निर्यात क्षेत्र, एअरलाईन्स, राजदूतावास, संरक्षण विभाग, विमान उद्योग, आंतरराष्ट्रीय बँका, प्रकाशन संस्था, जाहिरात क्षेत्र, प्रसारमाध्यमे अशा ठिकाणी फ्रीलान्स, शासकीय व खासगी क्षेत्रात संधी प्राप्त होतात. इंटरनेटवर जगभरातील ऑनलाईन भाषांतराची कामे करून आपण अर्थप्राप्ती करू शकतो. मात्र त्यासाठी चिकाटीने भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज असते. विदेशी भाषा शिकण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, चिकाटी, सातत्य व परिश्रम हे गुण हवेत आणि मळलेल्या वाटा सोडून अनवट पायवाटा चोखाळण्याची तयारी हवी.
विपणनाच्या क्षेत्रात भाषा तज्ज्ञांची मोठी गरज असते. त्यामध्ये विदेशी भाषेवरील प्रभुत्व महत्त्वाचं ठरतं. संभाषण नमुने आणि त्यांचा वर्तणुकीशी संबंध, लोकांच्या खरेदी निर्णयावर, त्यांच्या समाजमाध्यमांच्या वापरावर भाषेचा प्रभाव असे अभ्यास सुरू आहेत.
स्त्रियांच्या दृष्टीनेही विदेशी भाषा क्षेत्र हे एक महत्त्वाचं करिअर बनू शकतं. या क्षेत्रात खरोखरच स्त्रिया मोठ्या संख्येने काम करत आहेत. स्त्रियांची भाषा आत्मसात करण्याची उपजत जैविक क्षमता ही त्यांना इथे नवनव्या संधी देते. विदेशी भाषा शिक्षक व भाषांतरकार-दुभाषी म्हणून त्या प्रभावीपणे काम करतात. जागतिकीकरणाच्या काळात विविध उद्योगांत विक्री व सेवा क्षेत्रात प्रभावी संवादाची आवश्यकता असते. तिथे स्त्रियांनी विदेशी भाषा प्रभुत्व व संवाद कौशल्य या आधारावर अतिशय आत्मविश्वासानं स्वत:चं अवकाश निर्माण केलं आहे.
विदेशी भाषा अवगत असणारे लोक दोन देशांमधील सांस्कृतिक, राजकीय, व्यापारी दुवा बनतात. आपल्या देशाच्या सीमेबाहेरील लोक कसे जगतात, कसे विचार करतात हे समजून आणि समजावून देणारा महत्त्वाचा स्त्रोत बनतात. हा स्त्रोत सशक्त करायला हवा. समृद्ध करायला हवा.
विदेशी भाषा शिकत असताना एकदा का आपण स्वत:ला ‘जगाचा नागरिक’ मानायला लागलो की, आपल्याला दुसऱ्या लोकांच्यात, मग ते कुठूनही आलेले असोत, मानवता दिसू लागते. एकदा का आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांच्यातही आपल्याला मानवता दिसली की, आपोआप त्यांच्या जगण्याच्या, त्यांच्या विश्वाच्या प्रश्नांबद्दल समानुभूती (empathy), समवेदना जाणवू लागते, अगदी मग त्यांचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसला तरीही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
उदाहरणार्थ, अनेकदा जगात कुठे ना कुठे लोक नैसर्गिक आपत्ती, नागरी युद्ध वा आंतरराष्ट्रीय युद्ध अशा प्रश्नांचा सामना करत असतात आणि आपण त्यापासून दूर, अस्पर्शित असतो. परंतु अशा समानुभूतीतून आपल्याला त्यांच्या दु:ख-वेदनांप्रती आस्था, काळजी वाटू लागते. परकी भाषा शिकताना दुसऱ्यांचा परिप्रेक्ष्य कल्पनेने समजून घेण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते. त्यातून आपण माणूस म्हणून अधिक उदार, अधिक संवेदनशील बनतो. एक चांगला नागरिक बनणं, आपल्या सभोवतीच्या लोकांसोबत संबंध प्रस्थापित करणं आणि समाजाला सकारात्मकरीत्या योगदान देणं हे भाषा शिक्षणातून साध्य होऊ शकतं.
भाषांचं, शिक्षणाचं आणि विदेशी भाषांचं लोकशाहीकरण, त्यातून समतेकडे वाटचाल, विविध संस्कृतींना व लोकसमूहांना समन्याय आणि या बहुविधतेमधून देश, प्रदेश व जग यांच्यामध्ये खरीखुरी एकात्मता हे २१व्या शतकातील विवेकी समाजाचं ध्येय आहे. विदेशी भाषा शिकण्या-शिकवण्यातून हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने आपण पाऊल टाकतो आहोत.
‘विदेशी भाषा : शिक्षण आणि करिअर’ - संपादक : डॉ. मेघा पानसरे
विदेशी भाषा विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,
मूल्य - १२५ रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment