शब्दांचे वेध : पुष्प शेहेचाळिसावे
आजचे शब्द : ब्लांडिग्ज आणि लंगोट
दुख की नदिया जीवन नैया
आशा के पतवार लगे
ओ नैया के खेने वाले
नैया तेरी पार लगे
पार बसत है देश सुनहरा
किस्मत छैल छबिली बाबा
दुनिया रंग रंगिली
‘धरतीमाता’ या १९३८च्या चित्रपटातलं कुंदनलाल सैगल, पंकज मलिक आणि उमा शशी या तिघांनी गायलेलं हे फार जुनं गाणं मला अतिशय आवडतं. ते जेव्हाही रेडिओ सिलोनवर लागतं, तेव्हा मी एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. हे गाणं मला थेट ‘वुडहाऊसिया’च्या अद्भुत जगात घेऊन जातं. वुडहाऊसिया हा स्वप्नभूमीतला देश आहे. आपल्या वास्तव जगातल्या दुःखांपासून, दैनंदिन मनस्तापांपासून, समस्यांपासून आपल्याला जर काही क्षण का होईना, सुटका हवी असेल तर प्रत्येकानं या वुडहाऊसियाला एकदा तरी अवश्य भेट द्यावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. वर उद्धृत केलेल्या ओळींमध्ये नमूद केल्याप्रमाणेच ‘पार बसत’ असलेला हा सुनहरा देश विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ विनोदकार म्हणून ज्याला ओळखलं जातं, अशा सर पेलम किंवा पी. जी. वुडहाऊसनं त्याच्या विलक्षण कल्पनाशक्तीतून निर्माण केला आहे. माझ्यासारखे जगभरातले करोडो लोक या ‘न–सत्य’ भूमीत वारंवार जाऊन येत असतात. हो, आहोत आम्ही escapist, पलायनवादी.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आज जो शब्द आपण बघणार आहोत, तो या वुडहाऊसिया देशातल्या एका भूभागाशी संबंधित आहे. हा शब्द आहे- Blandings (ब्लांडिंग्ज किंवा ब्लॅंडिंग्ज). वुडहाऊसिया देशात अनेक प्रांत आहेत. त्यातल्या एका प्रांताचं हे नाव आहे.
एखाद्या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेणं हे एखाद्या शेरलॉक होम्स, अर्क्युल प्वारो, मिस मार्पल किंवा गेला बाजार आपल्या एसीपी प्रद्युम्न यांच्यासारख्या विख्यात डिटेक्टिव्ह लोकांच्या कामगिरीपेक्षा कमी नसतं. वेगवेगळे सुगावे लागतात, पुरावे हाती येतात, अजीबोगरीब अनुमान काढले जातात, आणि मग या सगळ्या उपलब्ध सामग्रीवरून निष्कर्ष निघतात. बहुतेक वेळा तर्कशुद्ध निष्कर्षांवरून हाती आलेला निकाल खरा आणि अंतिम ठरतो.
पण कधी कधी असंही होतं की, हे तर्क तर्कच राहतात. कोणताही ठाम निर्णय आपण त्यावरून घेऊ शकत नाही. असं असू शकतं, या पलीकडे छातीठोकपणे काही सांगता येत नाही. पण शब्दशोधाचा हा अधुरा प्रवासही मोठा मनोरंजक आणि ज्ञानवर्धक ठरू शकतो. एखाद्या अनोळखी फुलाच्या लांबून येणाऱ्या सुगंधाचा वास घेत घेत आपण जात असतो, ते फूल जवळच आहे असं वाटत असतं, पण ते दिसत तर नाहीच आणि अचानक तो सुवासही येणं बंद होतं, तसंच काहीसं हे आहे. अर्थात या पाठलागात जी मजा येते, जो आनंद मिळतो, त्याचं वर्णन करणं कठीण आहे. आज मी ज्या शब्दाबद्दल लिहिणार आहे, त्याचं मूळ शोधण्यात मला अशीच मजा आली होती. माझा हा शोध अजूनही सुरूच आहे, कारण त्या वेळी जे काही हाती आलं होतं, त्यावरून काहीही निश्चित असं ठरवता आलं नाही. त्यामुळे त्या वेळी मी जी माहिती गोळा केली होती, त्याबद्दलच आज मी बोलणार आहे. पण मीदेखील काही काळासाठी ‘शब्दशोधक’ (word detective) झालो होतो, याचा मला अभिमान आहे.
ब्लांडिंग्ज हे एक विशेष नाम आहे; ते काल्पनिक आहे; आणि त्याबद्दल एक विशिष्ट प्रकारचा वाचकवर्ग सोडला, तर इतरांना फारशी माहिती असण्याची किंवा त्यात रस असण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण मुळांचा शोध घ्यायचा असेल तर आपण काय काय करू शकतो, हे मला सांगायचं आहे.
वुडहाऊसच्या ‘ब्लांडिंग्ज कासल’ कथामालिकेत या शब्दाचा वापर होतो. वुडहाऊसनं जन्म दिलेल्या शेकडो (काल्पनिक) पात्रांपैकी तीन पात्रं सर्वांत जास्त प्रसिद्ध आहेत- बर्टी वूस्टर, जीव्ह्ज आणि क्लॅरेन्स उर्फ नववा लॉर्ड एम्सवर्थ.
यातला क्लॅरेन्स हा एक खानदानी उमराव आहे, वंशपरंपरेनं त्याच्याकडे जहागिरदारी (अर्लडम earldom) चालत आली आहे. या जहागिरदारीचं नाव एम्सवर्थ असं असतं. इंग्लंडच्या श्रॉपशर परगण्यात कुठेतरी मार्केट ब्लांडिंग्ज या काल्पनिक गावाजवळ या एम्सवर्थ कुटुंबियांचा एखाद्या राजवाड्यासारखा भव्य, शेकडो वर्षांपूर्वी बांधलेला महाल आहे. त्याचं नाव ‘ब्लांडिंग्ज कासल’. या प्रासादात राहणाऱ्या क्लॅरेन्स आणि त्याच्या विस्तीर्ण कुटुंबकबिल्याभोवती आणि त्यांचे नोकर चाकर, मित्र, ओळखीचे आणि अनोळखी पाहुणे यांच्याभोवती या ‘ब्लांडिंग्ज कासल’ मालिकेतल्या कथा रचल्या
गेल्या आहेत. या ऐतिहासिक वाड्याचा सध्याचा मालक क्लॅरेन्स आहे. तो विधुर असतो, पण त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. एक अविवाहित भाऊ, दहा बहिणी, या प्रत्येकीची मुलंबाळं, दोन-तीन खंडीभर नोकर, त्यांच्यावर लक्ष ठेवायला असलेला बटलर (मुख्य सेवक), स्वीय सचीव, क्लॅरेन्सवर जळणारे काही असेच धनाढ्य शेजारी, आपल्या स्वार्थासाठी किंवा अन्य काही कामासाठी वाड्यात येणारे पाहुणे आणि तोतये, अशा नानाविध प्रकारच्या लोकांमुळे ‘ब्लांडिंग्ज कासल’ सतत गजबजलेला असतो. वाड्याभोवती खंदक नाही, पण सभोवती भला मोठा बगिचा, तसंच हजारो एकर शेतजमीन आणि वनराई आहे. आणि हो, मागच्या अंगणाच्या एका कोपऱ्यात एका छोट्या घरात राहते क्लॅरेन्सची लाडकी, गलेलठ्ठ डुकरीण ‘एम्प्रेस’. तिच्यावर तो जीवापाड प्रेम करतो. मीच काय पण माझ्यासारखे जगभरातले लाखो वाचक त्यांच्या आयुष्यातली पहिली ब्लांडिंग्ज कथा वाचली की, क्लॅरेन्सच्या प्रेमात पडतात.
आता यातले सगळेच वाचक माझ्यासारखे भोचक नसतात. मला मात्र शब्दांच्या मुळाशी जाण्याची खोड असल्यानं माझ्या पहिल्या-दुसऱ्या कथेनंतरच ‘ब्लांडिंग्ज’ या शब्दाचा काय अर्थ असावा, वुडहाऊसला हे नाव कसं सुचलं असावं, असे प्रश्न मला पडू लागले. स्वतः वुडहाऊसनं याबाबत कधीच खुलासा केला नव्हता. इतकंच नाही तर त्याच्या एकाही चरित्रात याबद्दल कोणताही अंदाज व्यक्त केला गेलेला नाही. उगीच डोक्यात आलं, ते कोणतंही नाव त्यानं निवडलं असावं, असं संभवत नाही. कारण त्यानं तयार केलेल्या बहुतेक विशेषनामांना काही तरी पार्श्वभूमी आहे, अर्थ आहे. उदाहरणार्थ, एम्सवर्थ हे इंग्लंडमधल्या एका गावाचं नाव आहे. काल्पनिक जीव्ह्जचं नाव जीव्ह्ज याच आडनावाच्या एका क्रिकेटपटूवरून घेतलेलं आहे. क्लॅरेन्सच्या पहिल्या मुलाचं, जॉर्जचं, सन्मानार्थी नाव Viscount Bosham (व्हायकाउंट बोझम) असं आहे. Bosham हेही मुळात एका गावाचं नाव आहे. समुद्राच्या लाटांना ज्यानं आपल्या आज्ञेनं किनाऱ्यापासून दूर लोटलं होतं, अशा आख्यायिका- प्रसिद्ध राजा कॅन्युटच्या मुलीची कबर या गावात आहे. या व्हायकाउंट बोझमवरूनच माझ्या वुडहाऊसप्रेमी मित्रमंडळीनं माझं टोपण नाव ‘बोझम’ असं ठेवलेलं आहे. (काही लोक ‘बोझम’ऐवजी ‘बोशॅम’ असा पण उच्चार करतात.) कारण क्लॅरेन्सचा मुलगा बोझम हा डोक्यानं जरा अर्धवट असतो, आणि मी पण तसाच आहे, असा त्यांचा समज आहे. असो.
आपला मुद्दा असा आहे की, वुडहाऊसच्या या अशा अनेक साधार विशेषनामांप्रमाणेच ‘ब्लांडिंग्ज’ या नावामागेही काही कारण असावं, असं मला राहून राहून वाटत होतं.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
मी माझी शंका अनेक जाणकार मित्रांना विचारली, तज्ज्ञांना विचारली, पण कोणालाही खात्रीपूर्वक काहीच सांगता आलं नाही. टेरी मॉर्ड्यू नावाच्या आमच्या एका (आता दिवंगत) विद्वान इंग्रज मित्रानं ‘tongue in cheek’ म्हणजे थट्टेच्या स्वरात वुडहाऊसला ब्लांडिंग्ज हे नाव कसं सुचलं असावं, याबद्दल आपला तर्क सांगितला. तो असा : पहिली ब्लांडिंग्ज कथा (‘Something Fresh’ या नावाची कादंबरी) १९१५मध्ये प्रकाशित झाली. १९०४पासून १९१४-१५पर्यंत वुडहाऊसनं अनेक वेळा अमेरिकेला भेटी दिल्या होत्या. त्या काळी हा सगळा प्रवास समुद्रमार्गे आगबोटींनीच केला जायचा. यातल्या बहुतेक जहाजांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी दोन प्रवेश/गमन द्वारं दिलेली असत. पहिल्या वर्गाचे प्रवासी जे द्वार वापरायचे, त्याला ‘A’ landing असं म्हणत, तर दुसऱ्या वर्गाचे प्रवासी जे द्वार वापरायचे, त्याला ‘B’ landing असं म्हणत. वुडहाऊसची आर्थिक परिस्थिती त्या काळात सर्वसाधारणच होती. त्यामुळे तो दुसऱ्या वर्गानं ये-जा करे. अशा वेळी त्याला ‘B’ landingचा वापर करावा लागायचा. ‘B’ landing ही पाटी बघून बघून ते शब्द त्याच्या डोक्यात फिट्ट बसले आणि पुढे एम्सवर्थच्या घराचं नाव काय ठेवायचं, यावर तो विचार करत असताना त्याला ते आठवलं आणि त्यानं पटकन त्यांची निवड केली. ‘B’ landingचं झालं Blandings. (बहुधा तो त्या वेळी एखाद्या आगबोटीतून चालला असावा.)
टेरीचा हा तर्क म्हणजे तर्कट आहे, हे त्यालाही माहीत होतं आणि आम्हालाही. त्यामुळे आम्ही हसून दाद दिली, पण त्याला गांभीर्यानं घेतलं नाही.
मग मी नॉर्मन मर्फीला विचारलं. लेफ्टनंट कर्नल एन. टी. पी. (‘स्पड’) मर्फी हा एक अत्यंत हुशार असा ब्रिटिश माणूस होता. आर्मीतली नोकरी करता करता त्यानं पी. जी. वुडहाऊसच्या जीवनावर आणि लेखनावर संशोधन केलं. काही वर्षांतच वुडहाऊस या विषयावरचा जगातला सर्वांत तज्ज्ञ माणूस (the highest authority on Wodehouse) असा नावलौकिक त्याला प्राप्त झाला. त्याला आम्ही ‘TMWKAE’ (the man who knows almost everything, जवळपास सर्वज्ञानी माणूस) या टोपणनावानं ओळखायचो. या मर्फीनं वुडहाऊसवर पाच-सहा पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे- ‘A Wodehouse Handbook’ हा दोन-खंडी संदर्भग्रंथ. आपल्या लेखनात वुडहाऊसनं खऱ्या आयुष्यातल्या ज्या हजारो गोष्टींचा वा व्यक्तींचा उल्लेख केला होता, त्यांची संक्षिप्त माहिती या ग्रंथात सापडते. अनेक सिद्धांत, परिकल्पना मांडून त्यानं वुडहाऊसचा अभ्यास करताना अनेकांना येणाऱ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे.
यात एका नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचाही समावेश आहे. हा प्रश्न म्हणजे ‘ब्लांडिंग्ज कासल’चं नक्की लोकेशन (स्थान) कुठे आहे आणि तो कोणत्या खऱ्या महालाला डोळ्यासमोर ठेवून तयार केला गेला आहे? बऱ्याच जणांनी आजवर यावर आपापले तर्क-कुतर्क मांडले आहेत. पण लेखनांतर्गत उपलब्ध पुराव्यांचा आणि अन्य बाबींचा विचार करून मर्फीनं यावर जो शोधनिबंध लिहिला आहे, तो सर्वांत जास्त तर्कशुद्ध आहे, त्याला नाकारावं असं त्यात काहीही नाही.
अशा या महान मर्फीनंही ब्लांडिंग्ज या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल त्याला काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. त्याच्या ‘Wodehouse Handbook’मध्ये ब्लांडिंग्ज कासलवर मोठा लेख आहे, पण व्युत्पत्तीबद्दल त्यानं कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही. त्याच्याशी यावर अधिक चर्चा करण्याची माझी इच्छा होती. पण तीन वर्षांपूर्वी त्याचं निधन झाल्यामुळे हे काम राहूनच गेलं.
दरम्यानच्या काळात मी इंटरनेटवर ‘ब्लांडिंग्ज’ या शब्दाबद्दल काही माहिती मिळते का, हे शोधून पाहिलं. वुडहाऊसचे उल्लेख सोडले तर एकच वेगळी बाब त्यातून कळली. ती म्हणजे कासवांच्या एका प्रजातीचं नाव ‘ब्लांडिंग्ज टरटल’ (Blanding's Turtle) असं आहे. हे वाचल्यावर माझं विचारचक्र पुन्हा सुरू झालं. या Blanding's मधल्या शेवटच्या ‘अपॉस्ट्रफी एस’वरून हा षष्ठी विभक्तीचा किंवा पझेसिव्ह केसचा प्रकार आहे, हे उघडच आहे. याचाच अर्थ ‘Blanding’ या नावाच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावरून या कासवाच्या प्रजातीला हे नाव देण्यात आलं. पण याचा आणि वुडहाऊसचा काय संबंध असावा?
पुढे असं कळलं की, Blanding's Turtle ही कासवांची प्रजाती अतिशय दुर्मीळ असून तिचं वैज्ञानिक नाव ‘एमिडॉइडिआ ब्लांडिगाय’ (Emydoidea blandingii) असं आहे. ही कासवं आपलं नैसर्गिक निवासस्थान सोडल्यास सहसा इतरत्र सहजतेनं दिसून येत नाहीत. अमेरिकेच्या मेन नावाच्या राज्यापासून नेब्रास्का राज्यापर्यंतच्या काही ठिकाणी आणि कॅलिफोर्नियाच्या काही ठिकाणी, तसंच दक्षिण कॅनडाच्या काही भागातच ही गोड्या पाण्यातली कासवं आढळून येतात. त्यांच्या गडद काळ्या किंवा अलिव्ह रंगाच्या पाठीवर छोटे पिवळे ठिपके असतात. या प्रजातीची फक्त सुमारे दोन अडीच हजार कासवं अस्तित्वात असून जगातल्या फारच थोड्या प्राणीसंग्रहालयांमध्ये तिचे काही नमुने लोकांना बघण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि यातलं एक प्राणीसंग्रहालय न्यू यॉर्क शहरात आहे. हे वाचल्यावर माझी बत्ती पेटली. १९०४ ते १९१४ या काळात वुडहाऊस बऱ्याचदा अमेरिकेत गेला होता. त्याचा मुक्काम न्यू यॉर्क शहरातच असायचा. त्यामुळे कधी तरी त्यानं तिथलं प्राणीसंग्रहालय बघितलं असणार, ही शक्यता नाकारता येत नाही.
माझा तर्क असा आहे की, १९१४मध्ये तो जेव्हा आपली Something Fresh (अमेरिकन आवृत्तीचं नाव ‘Something New’) ही पहिली ब्लांडिंग्ज कादंबरी लिहीत होता, तेव्हा तो एखाद दिवशी या प्राणीसंग्रहालयात गेला असेल. त्या वेळी तो या कथेच्या प्लॉटवर विचार करत असावा. किंवा असंही असू शकतं की, त्या दिवशी तो फार रोमॅंटिक मूडमध्ये असावा. ३० सप्टेंबर १९१४ रोजी त्यानं न्यू यॉर्कमध्ये एथेल वेमन या नावाच्या तरुण विधवेशी लग्न केलं होतं. (याच महिन्याच्या शेवटी त्यांची १०७वी wedding anniversary आहे.) आपल्या नव-परिणित पत्नीला घेऊन एकाद दिवशी तो प्राणीसंग्रहालय बघायला गेला असण्याची शक्यता आहे. ‘Blanding's Turtle’ ठेवलेल्या पिंजऱ्यासमोर उभं राहून त्या दोघांनी आईसक्रीम खाल्लं असेल किंवा तिथल्या बागेत फिरणाऱ्या एखाद्या फोटोग्राफरनं या पिंजऱ्यासमोर त्यांचा फोटो काढला असेल. कदाचित त्याला ते कासव दिसायला फार आवडलं असेल. कोण जाणे!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अन्य नावांपेक्षा जरा हटके हे नाव असल्यानं त्याला ते वैशिष्ट्यपूर्ण वाटलं असावं, हेही शक्य आहे. कासवांची ही प्रजाती शोधून काढणारा ‘Blanding’ हा एक प्राणीशास्त्रज्ञ होता. वुडहाऊस त्याच्या नावावर आणि ख्यातीवर तर भाळला नसेल?
काही का असेना; Blanding's Turtle हे नाव त्या दिवशी त्याच्या डोक्यात घुसून बसलं आणि पुढे क्लॅरेन्सच्या घराचं नामकरण करताना त्यानं त्यातल्या Blanding'sचं Blandings असं रूपांतर करून ते उपयोगात आणलं, असा माझा तर्क आहे. पटतो का तुम्हाला?
आधी सांगितल्याप्रमाणे माझा शोध अजूनही सुरूच आहे. पण जोवर आणखी काही नवी माहिती मिळत नाही, तोवर याच तर्कावर काम भागवावं लागणार आहे.
जाता जाता- Blanding's Turtleचा शोध घेता घेता मला Blanding या शास्त्रज्ञाचीही आणि इतरही काही माहिती मिळाली.
त्या विशिष्ट कासवासाठी Blanding हे नाव १८३८मध्ये पहिल्यांदा वापरात आणलं गेलं. सुरुवातीला ते Cistuda blandingii या नावानं ओळखलं जात असे. डॉ. विल्यम ब्लांडिग (१७७२-१८५७) या अमेरिकन प्राणीशास्त्रज्ञानं १८३०मध्ये इलिनॉय राज्यातल्या फॉक्स नदीत अगदी सर्वप्रथम या कासवांना बघितलं आणि त्यांचा एक नमुना आणि तपशील Holbrook या वरिष्ठ प्राणीशास्त्रज्ञाकडे पाठवला. या अशा मूळ नमुन्याला holotype असं म्हणतात. नंतर हॉलब्रुकनं याचा शास्त्रशुद्ध पाठपुरावा करून ही प्रजाती अन्य प्रजातींपेक्षा वेगळी आहे असं सिद्ध केलं आणि तिची स्वतंत्र वर्गवारी केली. डॉ. विल्यम ब्लांडिगच्या शोधाचं श्रेय त्याला मिळावं, यासाठी हॉलब्रुकनं या प्रजातीचं नामकरण Blanding's turtle (Cistuda blandingii/ Emydoidea blandingii) असं केलं.
डॉ. विल्यम ब्लांडिगच्या ‘ब्लांडिग’ या अत्यंत विचित्र नावाच्या मागेही एक कहाणी आहे. ती शोधून काढायला मला खूप पापड बेलावे लागले. पण शेवटी लागला पत्ता. फ्रान्स देशातल्या बोर्दो जवळच्या ब्लोंद्यां (Blondin) या गावात १४८०मध्ये जन्मलेल्या एका मुलापासून ही कथा सुरू होते. तो होता Baron de Blondin. अनेक वर्षांनी या मुलाच्या मुलानं आपलं आडनाव Blondin असं करवलं. त्याचा मुलगा नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आणि त्याच्या कुटुंबियांनी स्वतःला इंग्रजी धाटणीनुसार Blantine असं म्हणवून घ्यायला प्रारंभ केला. त्यांच्यातला एक जण William Blantine I इंग्लंडहून अमेरिकेत स्थलांतरित झाला. त्यामुळे त्याचा परिवार अमेरिकन नागरिक बनला. Blantine Iच्या मुलानं १६८०च्या आसपास आपलं नाव बदलून Blanding असं केलं. हा आपला पहिला ब्लांडिग. त्यानं स्वतःचं असं नामांतरण का केलं, हे एक रहस्यच आहे. पण तेव्हापासून ब्लांडिग नावाची वंशपरंपरा सुरू झाली. या मालिकेतला चौथा वंशज म्हणजे आपल्याला हवा असलेला शास्त्रज्ञ William Blanding VI.
या सर्वांशी संबंध नसलेला वेगळाच असा आणखी एक शोध मला याच वेळी लागला. तो असा की, नॉर्वे देशात भरतकाम-विणकामासाठी तिथल्या बायका जी लोकर वापरतात, त्यातल्या एका धाग्याचं नाव ‘blandingsgarn’ असं आहे. आता याचं आणि ब्लांडिग्ज कासलचं काही नातं असलंच तर ‘बादरायण गोत्रोत्पन्न’ असलं पाहिजे. तुमच्या जवळ फावला वेळ असेल तर तुम्ही तो शोधून काढू शकता.
या विषयावर माझ्याकडून सध्या तरी हे एवढंच.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आजची पस्तुरी (lagniappe) म्हणजे एक मॉरिशस देशातल्या क्रिओल भाषेतली एक म्हण आहे.
मूळ म्हण- Azourdi casse en fin; dimain tape langouti.
(Aujourd’hui bien mis; demain en langouti.)
तिचं इंग्रजी रूपांतर- “Well dressed to-day; only a langouti tomorrow.”
म्हणजेच ‘आज राव, उद्या रंक’. आजचा अमीर उद्याचा भिकारी असू शकतो.
(थोडक्यात, गर्व करू नका, परिस्थिती केव्हाही बदलू शकते.)
आता, या क्रिओल म्हणीतला langouti हा शब्द आपल्या भारतीय लंगोट/लंगोटीचा तिथला अवतार आहे, हे सांगायला नकोच. इंग्रजांनी ज्या हजारो भारतीय लोकांना परदेशी मजूर म्हणून नेलं होतं, त्यात मॉरिशस देखील होता. या स्थलांतरित मजुरांच्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या वाडवडिलांच्या मूळ भाषेतले अनेक शब्द आजही कायम ठेवले आहेत. हा langouti त्यातलाच एक आहे.
लंगोट/लंगोटी हा शब्द हिंदी मराठी सह अनेक भारतीय भाषांत सापडतो. त्याचा अर्थ ‘केवळ गुह्यभाग झाकला जाईल एवढ्या लांबी रुंदीचे पुरुषी अधोवस्त्र’. फारसी (पर्शियन) भाषेत ‘लंग’ या शब्दाच अर्थ पुल्लिंग किंवा शिस्न असा होतो. त्यापासूनच लंगोट हा शब्द बनला असावा, हे स्पष्ट आहे.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment