‘विकीलिक्स’ नावाच्या वेब-साधनाचा वापर करून जागतिक स्तरावर भल्याभल्यांच्या पत-प्रतिष्ठेला गळती लावणाऱ्या जुलियन असांझचा गुन्हा कोणता असेल, तर सरकारने दडपलेल्या दु:ष्कृत्यांना त्याने प्रसिद्धी दिली आणि अजूनही तुरुंगातून देत आहे. प्रभावशाली संस्थांची काळजीपूर्वक लपवून ठेवलेली बिंगं तो फोडतो. तिथले कर्मचारीच जुलियनकडे त्यांच्या संस्थेची गुपितं घेऊन येतात. त्यामुळे उच्चपदस्थ लोकांची डोकी फिरतात. त्याने ‘विकीलिक्स’ २००६मध्ये स्थापन केली आणि काही वर्षांतच त्याची दहशत पसरली. लोकशाहीत अशा लोकांची गरज असते, असं ठासून सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात अशी माणसं क्वचितच असतात. प्रत्येक जण उच्चपदस्थांचं लांगूलचालन करून स्वत:ची प्रगती करण्यात मग्न असतो. कोणी असा जर चुकून अवतरला तर त्याची दुर्दशा काय होते, याची असांझवरून कल्पना करता येईल.
पर्दाफाश करण्यातली तत्त्वं
जुलियनच्या कामाचं एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रसिद्ध केलेली सर्व कागदपत्रं तो आधी डोळ्यांत तेल घालून तपासतो. त्यामुळे त्याची जाणूनबुजून फसवणूक करून त्याचं नाव बदनाम करणाऱ्यांचं त्याच्यापुढे चालत नाही. आतापर्यंत त्याने प्रसिद्धी दिलेल्या कागदपत्रांत एकदाही चूक सापडलेली नाही. आणि अशी लाखांवर कागदपत्रं आहेत. त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्याला ज्यांच्याकडून माहिती मिळते, त्यांची नावं तो फोडत नाही. त्यामुळे त्याला बातम्या पुरवणारे निर्धास्त असतात. तिसरं वैशिष्ट्य हे की, फोडलेली गुपितं कुठल्याही राष्ट्रहिताला धक्का आणणार नाहीत, याची तो काटेकोरपणे काळजी घेतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
जगातल्या अनेक सरकारांचा जुलियनने पर्दाफाश केला असला, तरी त्याचं सर्वांत जास्त उखडलेलं गिऱ्हाईक कोणतं असेल, तर अमेरिकन सरकार. त्याचं मुख्य कारण अमेरिकन सरकारचे उपद्व्याप फार असतात. त्यांतले काही भले असतात, काही बुरे. पण अमेरिकेला आपल्या प्रतिमेची काळजी असते-देशाबाहेर थोडी पण देशांतर्गत खूप. पण ती प्रतिमा आणि भूतकालीन व भविष्यात प्रायोजलेल्या कृती यांच्यात अनेक वेळा तफावत असते. अशा वेळी असत्याशी संग करण्याची गरज लागते.
अमेरिकेची बतावणी
अलीकडच्या इतिहासात याची भरपूर उदाहरणं आहेत. १९९१ सालचं पहिलं इराक युद्ध आठवा. अमेरिकन जनता मोठ्या प्रमाणात त्याच्या (८० टक्के विरुद्ध २० टक्के) विरोधात होती. त्यानंतर नसरिया नावाच्या कुवेतच्या नर्सने अमेरिकेतील संसदेच्या मानवाधिकार समितीसमोर हृदयस्पर्शी (अश्रू आणि हुंदक्यासहित) भाषण केलं आणि ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती, तिथं इराकी सैनिकांनी जन्मलेल्या अर्भकांना फरशीवर आपटून कसं निर्दयपणे ठार मारलं, याचं वर्णन केलं. दुसऱ्या दिवशी अमेरिकन जनता इराकवर आक्रमण करायला तयार झाली! यात ग्यानबाची मेख अशी होती की, ती कोणी साधीसुधी मुलगी नव्हती, तर कुवेतच्या अमेरिकेतील राष्ट्रदूताची पंधरा वर्षांची शाळकरी कन्या होती, आणि तिला हॉलिवुडमध्ये तयार करून आणली होती!
दुसरं इराक युद्ध खपवण्यासाठी अमेरिकेने असाच एक प्रकार केला. सद्दाम हुसेन अणुबॉम्ब तयार करतोय, एवढं कारण पुरणार नाही म्हणून की, काय अमेरिकेच्या यूनोमधील राजदूताने (कोलिन पॉवल) साबणाच्या पुडीनं भरलेली कुपी अँथ्रॅक्सची आहे, असं सांगून हवेत फडकवली. अमेरिकन जनता भाळली आणि युद्धासाठी तयार झाली. दहा वर्षांनी सिरियावर हल्ला करण्याच्या उद्देशानं त्या देशाचा अध्यक्ष आपल्याच लोकांना त्यांच्यावर विषारी रसायनं टाकून ठार मारतो, अशी आवई पसरवली. पण सिरियानं रशियाची मदत मागितल्यानं अमेरिकेनं पुढचं पाऊल उचललं नाही.
अफगाणिस्तानमध्ये असाच खोटारडेपणा केला आणि आता तो कसा अंगाशी येतोय, हे आपण पाहतच आहोत. मध्यपूर्व भागात अमेरिका आणि तिचे तिच्यासारख्याच गुंड प्रवृत्तीचे दोस्त वीस वर्षं ठिय्या मारून बसले आहेत. ते काही पाच-तीन-दोन पत्ते खेळायला नाही! त्यांची कृष्णकृत्यं हाही एक न संपणारा विषय आहे.
जुलियनपुढे आर्थिक घोटाळ्यांचं खाद्य
२००८मध्ये जुलियनने पहिलं धाडस केलं. त्याची पार्श्वभूमी अशी. १९९०नंतर बँका आणि इतर वित्तीय संस्थांना मुक्त-स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्यातली सुप्त गुन्हेगारी प्रवृत्ती अनेक वेळा प्रगट झाली. अशा वातावरणात जुलियन असांझसारख्या माणसाला भरपूर वाव मिळाला, यात नवल कोणतं! त्या काळात झालेले आर्थिक झोल, जेव्हा जेव्हा जुलियनच्या नजरेसमोर आले, तेव्हा तेव्हा त्याने त्यांचा योग्य तो परामर्श घेतला. आइसलंड या युरोपमधल्या छोट्या देशामधल्या बँकांनी मोठ्या भानगडी केल्या आणि देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. या बँकांना सोडवायला कोणी वाली नव्हता. तेव्हा सरतेशेवटी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं त्यांना सोडवलं. लोकांचे चांगले दहा वर्षं हाल झाले. अशा सर्व गोष्टी कायद्यानं अमेरिकेच्या संसदेला कळवाव्या लागतात. तशा त्या कळवल्या. या गोष्टी संसदेला अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवता येत नाहीत. पण संसदेनं त्या लपवल्या. तेव्हा तिथल्या काही लोकांनी याबाबतीतली सर्व कागदपत्रं जुलियनकडे पाठवली आणि त्याने त्यांना प्रसिद्धी दिली.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
पश्चिम गोलार्धात अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्याच्या तीनशे किलोमीटर दक्षिणेला केमन आयलंड्स नावाची साधारण दहा हजार वस्तीची तीन छोटी बेटं आहेत. इथं माणसांपेक्षा बँका जास्ती आहेत. त्यांमध्ये स्विस बँकांच्या शाखा तर आहेतच, आणि शिवाय, जगातल्या सर्वांत मोठ्या पन्नास बँकांपैकी पंचेचाळीस बँकांच्या शाखा आहेत. तिथं राहणाऱ्या प्रत्येक माणसामागे दहा अब्ज डॉलर्स या हिशेबानं त्या बँकांत पैसे आहेत. अर्थात, ते पैसे त्यांचे नाहीत. जगभरून माणसांनी आणि कंपन्यांनी चोरून आणलेले ते पैसे आहेत. तेथील जुलियस बँक अँड ट्रस्ट या स्विस बँकेच्या शाखेत काम करणाऱ्या मॅनेजरने अनेक खातेदारांची माहिती २००८मध्ये विकीलिक्सकडे पाठवली आणि जुलियनने ती छापली! विकीलिक्सच्या नावानं चौफेर बोंबाबोंब झाली.
आणि इथं त्याला दडपायचा पहिला प्रयत्न झाला. या सर्व प्रकरणात विकीलिक्सला भरपूर (कु) प्रसिद्धी मिळाली आणि त्याचा भरपूर दबदबा तयार झाला.
भ्रष्टाचाराची कीड उघड्यावर
त्यानंतर आयव्हरी कोस्ट आणि केनिया या आफ्रिकेतल्या राष्ट्रांतली भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली. जुलिअन असांझ जगप्रसिद्ध झाला २०१०नंतर. अफगाणी युद्धाला दहावं वर्ष लागलं होतं, आणि इराकच्या युद्धाला सहावं. या युद्धांची खासीयत ही की, ही युद्धं कमीत कमी तीन वेळा संपली, आणि एवढंच नव्हे तर ती संपली असं गाजावाजा करून अमेरिकेच्या अध्यक्षांनी जाहीरही केलं! अशी जगात किती युद्धं आहेत की, जी तीन-तीन वेळा संपतात? दुसरं वैशिष्ट्य हे की, या युद्धांत शत्रू कोण आहे तेच कळत नव्हतं. त्यामुळे त्या युद्धांना ‘War on Terror’ असं मोघम नाव दिलं होतं, आणि सगळ्या वाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी ते बिनतक्रार मान्यही केलं होतं.
युद्धखोर अमेरिकेचं बिंग फुटलं
२००७मध्ये काही अमेरिकन सैनिकांनी इराकमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसून करमणूक म्हणून पदचाऱ्यांवर गोळीबार केला. त्यात बारा लोक मेले. त्यात ‘रॉयटर’ या ब्रिटिश वृत्तसंस्थेचे दोन वार्ताहर होते. त्यानंतर गोळीबारात बळी पडलेल्यांना उचलून न्यायला एक गाडी आली. सैनिकांनी त्यातल्या लोकांवरसुद्धा गोळीबार चालू केला! त्यात दोन मुलं होती. एकेकाला टिपून मारल्यानंतर सैनिक खदाखदा हसायचे. ‘ती मुलं मध्ये आली, त्याला आम्ही तरी काय करणार!’, असं त्यांच्यातलं संभाषण! एवढंच नाही तर त्यांच्यातल्या एकानं त्याचं चित्रीकरण केलं. अर्थातच ते सुरुवातीला कूटबद्ध (War on Terror) होतं. ती चित्रफीत २०१०मध्ये असांझच्या हाती लागली. त्यानं तिच्यातली सांकेतिक भाषा (code) तोडली, आणि ती फीत प्रसिद्धीला दिली.
ज्या व्यक्तीनं ही चित्रफीत असांझला दिली, त्यानंच २००९मधल्या अफगाणिस्तानमधील घटनेची चित्रफीत त्याच वेळी असांझला दिली. यात अमेरिकेच्या वायूदलाच्या विमानानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात दीडशे नागरिकांचा बळी गेलेला दिसत आहे. या दोन्ही फिती असांझने २०१०मध्ये प्रसिद्ध केल्या. त्याचबरोबर परराष्ट्रखात्याच्या अडीच लाख गुप्त तारा त्याने उघडकीला आणल्या.
अमेरिकन परराष्ट्रखात्याच्या (राजधानी आणि जगभरच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकारी) तारांमधून त्या खात्याच्या अनेक गुन्हेगारी कृत्यांची वर्णनं होती. या तारा बाहेर पडल्या तर हिलरी क्लिटंनसकट अनेकांना हृदयविकाराचा झटका येईल, असं असांझला गुपितं पुरवणारी अमेरिकी सैन्यातून बाहेर पडलेली, ‘व्हिसलब्लोअर’ चेल्सी एलिझाबेथ मॅनिंग म्हणाली. तसं काही झालं नाही. उलट, सरकारने तिलाच देशाच्या सुरक्षेला धोका या गुन्ह्याखाली पस्तीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पुढचा प्रश्न असा होता, या सर्व गोष्टींना प्रसिद्धी देणाऱ्या असांझचं करायचं काय? तो काही अमेरिकन नागरिक नव्हता. तो होता ऑस्ट्रेलियन नागरिक. आणि त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवायची शिक्षा दिली असती, तरी अमेरिकेच्या भीतीनं त्याच्या मायभूमीच्या सरकारनं तोंडातून ‘ब्र’ही काढला नसता, हे जरी खरं असलं तरी तो त्या वेळी अमेरिकेत नव्हता. तेव्हा पहिली पायरी म्हणजे, काही ना काही क्लृप्ती वापरून त्याला अमेरिकेत आणणं.
मुलींच्या जाळ्यात अडकवलं
तसे अमेरिकन सरकारकडे हुकूमाचे पत्ते भरपूर असतात आणि हुकूमाचे ताबेदारही तितकेच मुबलक. अमेरिकेने स्वीडन या देशाला हाताशी धरलं. असांझनं माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप करणाऱ्या दोन स्वीडिश मुली पुढे आल्या. असांझवर केस झाली. तेव्हा तो लंडनमध्ये होता. स्वीडिश पोलीस त्याला पकडायच्या मागे लागले, आणि त्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारची मदत मागितली. असांझनं पळून जायचा विचार केला. पण जायचं कुठे? चीन किंवा रशिया इथं गेलं, तर देशद्रोहाचा आरोप अधिक दृढ व्हायला मदत होईल. क्यूबा आणि व्हेनेझुएला या दोन शक्यता होत्या. पण ते दोन्ही देश अगोदरच अमेरिकेच्या निर्बंधांच्या जात्यात भरडले जात होते. त्यांना आणखी त्रास कशाला? शेवटी राहिला, दक्षिण अमेरिका खंडातील इक्वडोर हा देश. इथं कोरेया नावाचा समाजवादी राष्ट्राध्यक्ष निवडून आला होता. त्यानं लंडनमधील आपल्या दूतावासात असांझला आश्रय दिला.
हिलरी क्लिटंनचा भांडाफोड
लंडनमधील दूतावासात असांझनं आपल्या हालचाली चालू ठेवल्या. आंतरराष्ट्रीय कायदा तोडून दूतावासात घुसायचं, हा विचार ब्रिटिश सरकारनं केला. पण इतर देश जशास तसं उत्तर देतील, या भीतीनं तो विचार अंमलात आणला नाही. २०१६मध्ये असांझला एक मोठं भक्ष्य मिळालं. राष्ट्राध्यक्षासाठी पक्षांचे उमेदवार ठरवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्राथमिक निवडणुकीचं ते वर्ष. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार हिलरी क्लिटंन ही जवळजवळ ठरल्यातच जमा होती. माजी सेनेटर, माजी परराष्ट्रमंत्री, देशाची माजी आद्य स्त्री वगैरे उपाध्यांची ती मालकीण! ती केवळ उमेदवारच काय, पण राष्ट्राध्यक्ष होणार, याबद्दल अनेकांना खात्री वाटत होती. पण व्हर्मांट नावाच्या सर्वसामान्यांना अपरिचित अशा एका छोट्या राज्यातला सेनेटर बर्नी सँडर्स झारीतल्या शुक्राचार्यासारखा अवतरला. हिलरीचं डोकं फिरलं. तिच्या आदेशावरून पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी सँडर्सविरुद्ध कारवाया चालू केल्या.
या सर्व कारस्थानांची ई-मेल तिथल्या एका कर्मचाऱ्यानं असांझला दिली. त्याने ती प्रसिद्ध केली. सर्वत्र गदारोळ माजला. असांझवर हिलरीचा २०१०पासून राग. तो आता आकाशात मावेनासा झाला. त्या ई-मेलमधल्या मजकुराच्या खऱ्या-खोट्याचं विश्लेषण न करता, ती रशियानं (खुद्द पूतीननेच!) चोरली आणि देशद्रोही असांझला दिली, असा त्या प्रकरणाला रंग दिला गेला. असांझच्या सुटकेची शक्यता पूर्वी शंभरात एक असेल, तर ती आता लाखात एक झाली.
२०१६ सालच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प अधूनमधून असांझचं कौतुक करत असत. असांझच्या आशा वाढल्या, पण निवडून आल्यानंतर ट्रम्पचे खरे दात दिसायला लागले.
असांझची सक्तीची कैद
बघता बघता इक्वडोरच्या लंडनमधील दूतावासातील असांझचं वास्तव्य आठ वर्षांचं झालं. एक प्रकारची कैदच! कुठे जाणं नाही, येणं नाही. माणसं भेटायला यायची, पण मोजकीच. तीही भीत भीत. लंडनच्या पोलिसांची सतत टेहळणी. एवढ्या कडेकोट बंदोबस्तात त्याला भेटायला ट्रम्पचे सहकारी आणि रशियाचे एजंट चोरून यायचे, अशी फुसकुली हिलरीचे लोक सोडायचे! एका दगडात अनेक पक्षी! असा वनवास किती वर्षं चालणार, हा प्रश्न असांझच्या हितचिंतकांना पडला होता. त्याचं उत्तर अमेरिकेनंच पण वेगळ्या पद्धतीनं दिलं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
इक्वडोरच्या आजूबाजूच्या अ-समाजवादी देशाच्या तुलनेनं इक्वडोरची प्रगती वाखाणण्यासारखी होती. हे अमेरिकेच्या कोष्टकात बसणारं नव्हतं. इक्वडोरचा अध्यक्ष कोरेया हा देशाबाहेर असताना इक्वडोरमधल्या एका न्यायालयानं त्याला विरोधकांचं त्याने अपहरण केलं, या आरोपावरून शिक्षा ठोठावली. त्याच्या वकिलांनी ती केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेऊन जिंकली. ती योजना फसल्यानंतर त्याच्यावर निवडणुकीत सौम्य भ्रष्टाचार (passive bribery) हा आरोप टाकला. (इंदिरा गांधींवरील खटले आठवा.) कोरेयाने पुढच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (२०१७) उभं न राहता आपला सहकारी आणि उपाध्यक्ष लेनिन मॉरेनोला उभं केलं.
लेनिन फिरला
मॉरेनो हा खानदानी समाजवादी कुटुंबातला. म्हणून तर त्याच्या वडिलांनी त्याचं नाव लेनिन ठेवलं! पण अध्यक्षपद मिळाल्यावर हा लेनिन फिरला. पक्षाच्या धोरणांना सोडचिठ्ठी दिली. २०१९मध्ये त्याने जुलियन असांझचा आसरा काढून घेतला. दुसऱ्या दिवशी ब्रिटिश पोलीस इक्वडोरच्या दूतावासात शिरले आणि जुलियनला अक्षरश: खेचून बाहेर काढलं. यापुढे उंदीर-मांजराचा खेळ चालू झाला. त्याची रवानगी अमेरिकेत करता कामा नये, म्हणून त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला. तो अर्ज फेटाळायचा, हा न्यायालयाचा पूर्वनिर्णय असला, तरी न्यायालय त्याच्याशी खेळ खेळत बसलं आहे. तोपर्यंत त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवलं आहे. बाकीच्या कैद्यांना त्याच्यापासून धोका म्हणून! आता तो अमेरिकेत आधी पोचतो की, स्वर्गात एवढाच प्रश्न बाकी आहे.
(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ सप्टेंबर २०२१च्या अंकातून साभार)
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. मोहन द्रविड फिजिक्समधील पीएच.डी. असून त्यांचे राजकारण, विज्ञान, इतिहास या विषयांवरील लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होतं. त्यांचं वास्तव्य अमेरिकेत असून त्यांचं ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन घडवणारं पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ने प्रकाशित केलं आहे.
mohan.drawid@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment