अजूनकाही
१. नोटाबंदीच्या निर्णयात जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ देणारे योगगुरू रामदेवबाबा यांनी आता दोन हजार रुपयाच्या नोटेला विरोध दर्शवला आहे. दोन हजाराची नोट अर्थव्यवस्थेला उपयुक्त नसून यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल अशी भीती रामदेवबाबा यांनी व्यक्त केली आहे.
बाबा देशभर फिरतात. वारा कोणत्या दिशेला वाहतोय, हे त्यांना बरोबर कळतं. वारा वाहील तशी पाठ फिरवण्यात ते कुशलही आहेत. शिवाय व्यावसायिक आहेत. आता टूथपेस्ट, साबण, डिटर्जंट, बिस्किटं, नूडल्स अशा अदभुत स्वदेशी उत्पादनांचा प्रसार केल्याबद्दल पतंजली उद्योगसमूहालाही पतंजली योगपीठाप्रमाणेच प्राप्तिकरमुक्ती वगैरे मिळाली, तर कदाचित दोन हजाराच्या नोटा सुटसुटीत ठरू शकतील.
………………………………………………….
२. उत्तर प्रदेशात मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून ४०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केला आहे. बिहार निवडणुकीच्या काळात अमित शहा आणि ओवेसी यांच्यात गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत ओवेसी यांना पैसे दिले गेले, असं दिग्विजय म्हणाले.
हे पाहा, शहा यांच्या पक्षाचा कारभार अतिशय पारदर्शक आहे. शहा यांनी पेटीएममार्फत किंवा ‘भिम’ अॅपमार्फत किंवा अन्य कोणत्या कॅशलेस मार्गाने पैसे दिले, त्याची नोंद दाखवल्याशिवाय दिग्गीराजांच्या आरोपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. काळा पैसा हा शब्द ऐकला तरी सगळे भाजपेयी पांढरेफट्ट पडतात… काही कायमच तसे दिसतात, ते कशामुळे, असं वाटतं तुम्हाला?
………………………………………………….
३. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांच्या संदर्भातील कागदपत्रे संबंधित यंत्रणांकडे दिल्यास उद्धव यांची चौकशी करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
काय गंमत आहे पाहा. हे इकडे या फुसकुल्या सोडतायत; तिकडे यांचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष युती अभेद्य राहील असं सांगतायत. स्वत: मुख्यमंत्री निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पालिकेत युती होईल, असे संकेत देताहेत. म्हणजे उद्धव यांना क्लीनचिट देण्यासाठीच चौकशी करायची आहे का? की उगाच ब्लॅकमेलिंगचं एक हत्यार?
………………………………………………….
४. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील सभेत पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांवर सडकून टीका केली असून, आपण खोटय़ा बातम्यांचा अडथळा दूर सारून जनतेशी थेट बोलू इच्छितो, असे म्हटले आहे. प्रसारमाध्यमेच अमेरिकी जनतेची खरी शत्रू आहेत, असे वक्तव्य त्यांनी अलीकडेच केले होते.
लवकरच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर रेडिओच्या माइकसमोर बसलेल्या ट्रम्प यांचा फोटो आणि त्यांनी कशी भारतीय पंतप्रधानांची कार्यपद्धती आणि संवादपद्धतीही अवलंबली आहे, ते कसे मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून चालले आहेत, याच्या कौतुकचालिसांची पारायणं सुरू होणार तर.
………………………………………………….
५. सात मुस्लिम देशांतील नागरिकांवर अमेरिकेच्या प्रशासनानं घातलेल्या प्रवेशबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज न्यू यॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअर इमारतीजवळ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रॅली काढली होती. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकन नागरिकांनी 'आज आम्हीही मुस्लिम आहोत,' असा संदेश देणाऱ्या एका गाण्याच्या माध्यमातून आपण मुस्लिमांच्या सोबत असल्याचा संदेशही दिला आहे.
जस्ट एक उत्सुकता! तिकडचे ट्रम्पसमर्थक गोरे राष्ट्रवादी आणि देशप्रेमी अमेरिकन्स या ट्रम्पविरोधक उदारमतवादी, सेक्युलर, लिबरल, पुरोगामी नागरिकांना कोणत्या देशात जाण्याचा सल्ला देतात? पाकिस्तान की अफगाणिस्तान की सौदी अरेबिया की अन्य एखादा मुस्लिम देश?
………………………………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment