महाराष्ट्रातील ग्रामविकासाचे, विविध जलसंधारण योजनेचे प्रणेते फादर हार्मन बाखर (Hermann Bacher) यांचे आपल्या मायदेशी स्वीत्झर्लंडमध्ये काल, १४ सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या ९८व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्रातील ग्रामविकासाच्या चळवळीची साठ वर्षांपूर्वी पायाभरणी करणाऱ्या या मिशनरीबद्दल महाराष्ट्रात आज किती लोकांना माहिती असेल, याची शंकाच आहे. फादर बाखर यांच्यानंतर काही वर्षांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी येथील ग्रामविकासाचे काम सुरू झाले.
स्वीत्झर्लंडमधील आल्प्स पर्वताच्या पायथ्यापाशी असलेल्या एका छोट्याशा गावातील या तरुणाने येशूसंघीय मिशनरी होऊन सेवा करण्याचे व्रत घेतले आणि आपली कर्मभूमी म्हणून भारतातील महाराष्ट्राची निवड केली. त्यानंतर पन्नास वर्षे दुष्काळाने ग्रासलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण परिसराचा सामाजिक आणि आर्थिक कायापालट करण्यासाठी आपले जीवन वाहिले.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
काही महिन्यांपूर्वी प्रशांत केदारी यांच्या रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या वतीने भरवलेल्या ऑनलाईन परिषदेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. थोरात हे संगमनेरचे. महाराष्ट्रातील ख्रिस्ती नेत्यांच्या मेळाव्यात बोलताना ते फादर बाखर यांच्याविषयी बोलतील याची मला खात्री होती. आणि झालेही तसेच. फादर बाखर यांच्याविषयी मंत्रीमहाशय भरभरून बोलले. १९६०-७०च्या दशकांत फादर बाखर यांना वडील भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर ग्रामविकासाची वेगवेगळी कामे करताना पाहिले, याचा थोरात यांनी आवर्जून उल्लेख केला.
१९७२च्या भयाण दुष्काळात फादर बाखर यांनी भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर संगमनेरजवळील खेड्यांत जुन्या विहिरींमधील गाळ उपसणे, नव्या विहिरी बांधणे, शेतकऱ्यांना विविध कर्जपुरवठा करणे, अशा कितीतरी योजना राबवल्या.
या काळात ते आमच्या श्रीरामपूर पॅरिशचे म्हणजे धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू होते. भारतात मिशनरी कार्यासाठी येणाऱ्या युरोपियन धर्मगुरूंच्या काही शेवटच्या तुकडीमधील ते एक. माझ्या वडलांच्या ‘पारखे टेलर्स’ या दुकानात त्यांचे नेहमी येणे-जाणे असायचे. ग्रामीण परिसरात विविध सामाजिक कार्यक्रम हाती घेण्यासाठी त्यांनी श्रीरामपूरला ‘सोशल सेंटर’ची स्थापना केली, नंतर हे केंद्र अहमदनगरला नेण्यात आले.
श्रीरामपूर धर्मग्रामातील मुख्य धर्मगुरू म्हणून फादर बाखर यांनी ख्रिस्ती कुटुंबातील अनेक लहान बाळांचा बाप्तिस्मा केला असेल, मात्र एक मिशनरी म्हणून त्यांनी एकाही हिंदू प्रौढ व्यक्तीचे धर्मांतर केले असेल, असे मला वाटत नाही.
फादर बाखर यांचा जन्म स्वीत्झर्लंडमध्ये १२ ऑक्टोबर १९२४ रोजी झाला. तेथेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर धर्मगुरू होण्यासाठी त्यांनी येशूसंघ (सोसायटी ऑफ जिझस – जेसुईट्स) या संस्थेत प्रवेश केला. धर्मगुरूपदासाठी आवश्यक असणाऱ्या आध्यात्मिक शिक्षणासाठी ते १९४८ साली पुण्यातील डी नोबिली कॉलेजमध्ये दाखल झाले. धर्मगुरूची दीक्षा प्राप्त केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील ज्ञानमाता विद्यालयात आणि हरेगाव व केंदळ या खेडेगावातील शाळांत शिक्षक म्हणून काही काळ त्यांनी काम केले.
स्वीत्झर्लंडसारख्या प्रगत राष्ट्रातून येऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या फादर बाखर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाची ओळख करून घेतली. त्या काळी आजच्यासारखे गावोगावी रस्ते नव्हते, वाहनांची तर मुळीच सोय नव्हती. बैलगाडी हेच वाहतुकीचे मुख्य साधन होते. सायकल हे त्यातल्या त्यात अधिक प्रगत साधन. अहमदनगर हा दुष्काळी जिल्हा. त्यामुळे तेथील लोकांची आर्थिक स्थिती अधिकच हलाखीची होती.
फादर बाखर त्या वेळी पंचविशीत होते. ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून ते वावरत होते, तरी त्यांचे जीवन केवळ ख्रिस्ती समाजापुरते मर्यादित नव्हते. लोकांची सेवा करण्याचे आजन्म व्रत घेतलेल्या त्यांच्यासारख्या सेवाभावी वृत्तीच्या कार्यकर्त्याला हा ख्रिस्ती समाज, तो अ-ख्रिस्ती समाज असा भेदभाव करणे शक्यच नव्हते.
धर्मगुरू म्हणून काम करण्यासाठी त्यांना आसपासच्या खेड्यात फिरतीवर राहावे लागे. अनेकदा सायकल घेऊन फादर बाखर घराबाहेर पडत ते आठ दिवसांनंतरच परत येत. या अशा त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांचा ग्रामीण भागातील शेतकरी, मागासवर्गीय हिंदू आणि ख्रिस्ती समाजाशी जवळून संबंध आला. या लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटत असे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
१९६६मध्ये फादर बाखर मायदेशी गेले. तिथून परत आले, तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील लोकांसाठी कितीतरी योजना त्यांनी आणल्या. परतताच येशूसंघाने त्यांची अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख धर्मगुरू म्हणून श्रीरामपूर येथे नेमणूक केली.
त्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील नवकॅथोलिक समाजाच्या आध्यात्मिक गरजा भागवण्याचे काम केवळ येशूसंघ ही धर्मगुरूंची संस्था करत असे. जिल्ह्यातील विविध गावी शाळा वगैरे संस्था चालवणाऱ्या धर्मगुरूंचे वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली.
श्रीरामपूर येथे पदाची सूत्रे हाती घेताच फादर बाखर यांनी आपल्या मनातील विविध योजनांना मूर्त स्वरूप देणे सुरू केले. त्यांनी श्रीरामपूर येथे ‘सोशल सेंटर’ची स्थापना केली. जिल्ह्यातील सर्व अल्पभूधारक आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या शेतीसाठी विहिरी खोदणे, दुरुस्त करणे आणि बांधकाम यांसाठी अर्थसाहाय्य देणे, हे या सेंटरचे मुख्य उद्दिष्ट होते. पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या सामाजिक कार्याची ही मुहूर्तमेढ होती.
शेतकऱ्यांना शेताच्या कामासाठी थेट मदत पुरवण्याऐवजी बँकांसारख्या संस्थांमार्फत मदत केली जावी, असे फादर बाखर यांचे मत होते. ज्या शेतकऱ्यांना अपुऱ्या तारणामुळे कर्ज मिळू शकत नाही, त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी सोशल सेंटरमार्फत त्यांची हमी घेतली जाई. यासाठी अहमदनगर जिल्हा भूविकास बँकेशी या सेंटरने करार केला. बँकेच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केली. या योजनेद्वारे अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना नव्या विहिरी खोदणे, आहे त्या दुरुस्त करणे, वीज यंत्रे आणि तेल यंत्रे खरेदीसाठी साहाय्य केले गेले. या योजनेचा दोन हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला.
ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली, त्यांना सोशल सेंटरने व्याजामध्ये सवलत दिली. नैसर्गिक कारणांमुळे शेतीत उत्पादन न झाल्यामुळे अडचणीत आलेल्या अनेक थकबाकीदारांच्या मुद्दल रकमांची या सेंटरने बँकेला परतफेड केली. त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातूनही फादर बाखर यांनी अल्पभूधारकांना कर्जसुविधा उपलब्ध करून दिल्या. या योजनेसाठी त्यांनी ‘स्वीस डेव्हलपमेंट को-ऑपरेशन’कडून निधी मिळवला होता.
परदेशातून मिळालेला हा पैसा सहकारी माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा हा यशस्वी प्रयत्न म्हणजे एकप्रकारे अहमदनगर जिल्ह्याच्या सहकारी चळवळीचा गौरवच आहे, असे या जिल्ह्यातील एक ज्येष्ठ पत्रकार एस.बी. कुलकर्णी यांनी म्हटले आहे. सहकारी बँकेच्या माध्यमातून अशा प्रकारे कर्जपुरवठा करण्याचा हा निश्चितच नावीन्यपूर्ण प्रयोग होता.
१९७२-७४च्या दरम्यान महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. त्याचा फटका अहमदनगर जिल्ह्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात बसला. या काळात शेतकऱ्यांच्या हातात एकही पीक पडले नाही. त्याशिवाय शेतीकामावर अवलंबून असणाऱ्या हजारो मजुरांना रोजगारास मुकावे लागले. तेव्हा ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे दुष्काळी कामांची योजना हाती घेण्यात आली. या योजनेंतर्गत कच्चा रस्ता बांधणे, सामुदायिक विहिरी खोदणे वगैरे कामे सुरू झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना दैनंदिन निर्वाहाचे साधन मिळाले.
परंतु पाऊस पडल्यानंतर सरकारी नियमानुसार ही योजना बंद झाली. त्यामुळे बऱ्याच विहिरींची कामे अपूर्ण राहिली. अल्पभूधारकांच्या या विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी फादर बाखर यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास मंजुरी दिली.
या कर्जावरील व्याजासाठी मोठ्या प्रमाणात सोशल सेंटरमार्फत अनुदान दिले गेले. या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील १५० विहिरींची अपूर्ण बांधकामे पूर्ण करण्यात आली. या कामानिमित्त फादर बाखर यांनी जिल्ह्यातील अनेक अपूर्ण विहिरींची स्वतः पाहणी केली.
व्यक्तिगत कर्ज काढून विहिरी खोदण्याऐवजी चार-सहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक विहिरी खोदून, सामुदायिक लिफ्ट योजना राबवावी, यासाठी फादर बाखर यांनी प्रयत्न केले. या विहिरींमुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा कमी होतो, त्याशिवाय शेतकऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते, हे फादर बाखर यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.
पावसाळ्याच्या काळात भंडारदरा धरणाचे जादा पाणी कॅनॉलमधून वाहून जाते आणि नंतरच्या काळात शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागते. या जादा पाण्याचा उपयोग करून घेण्यासाठी फादर बाखर यांनी प्रवरा परिसरात जिरायती क्षेत्रात चार पाझर तलाव बांधले. त्यामुळे या परिसरातील अनेक विहिरींत वर्षातील बरेच महिने पाणी राहू लागले आणि शेतकऱ्यांना जिरायती शेतीचे बागायती शेतीत रूपांतर करणे शक्य झाले.
त्या काळात ग्रामीण भागात शेतीशिवाय रोजगाराच्या इतर संधी फारशा उपलब्ध नव्हत्या. शिक्षणाची साधने सगळीकडे उपलब्ध झाली, तरी ग्रामीण युवक शिक्षण घेऊन पुढे काय करणार, हा प्रश्न होता. थोडेफार शिक्षण घेतलेल्या गरीब कुटुंबातील युवकांना रोजगाराचे साधन देण्यासाठी फादर बाखर यांनी श्रीरामपूर येथे ‘इलेक्ट्रो टेक्निकल सेंटर’ सुरू केले. त्या काळात महाराष्ट्रात आजच्यासारखे आयटीआय, पॉलिटेक्निक वगैरे तांत्रिक शिक्षणसंस्था मोठ्या प्रमाणात नव्हत्या. या केंद्रात सुरुवातीला इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या पदांसाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले. या केंद्रातून शिकून अनेक युवकांनी नोकऱ्या मिळवल्या, तर काहींनी स्वतःचा रोजगार सुरू केला.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या केंद्राचा विशेष फायदा या जिल्ह्यातील दलित ख्रिस्ती समाजातील युवकांना झाला. दलित असूनही केवळ धर्मांतराच्या सबबीमुळे सरकारच्या आरक्षण धोरणापासून वंचित ठेवल्या गेलेल्या या समाजास कुणी वाली नाही. या उपेक्षित समाजातील उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या अनेक युवकांना या केंद्राने उपजीविकेची साधने मिळवून दिली.
श्रीरामपूरला हे तांत्रिक प्रशिक्षण केंद्र सुरू होण्याआधी या युवकांना अशाच प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण पुरवणाऱ्या येशूसंघातर्फे पुण्यात शंकरशेठ रोडजवळ चालवल्या जाणाऱ्या सेंट जोसेफ टेक्निकल स्कूलमध्ये शिक्षण घ्यावे लागे. श्रीरामपूरमधील हे केंद्र आज ‘झेविअर टेक्निकल ट्रेनिंग सेंटर’ या नावाने परिसरातील अनेक युवकांना प्रशिक्षण देत आहे. गेल्या काही वर्षांत या केंद्रातील अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जिरायती क्षेत्रात विहिरी खोदून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे शक्य असले तरी विहिरी खोदणे हा पाण्याच्या समस्येबाबत अंतिम उपाय नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत गेली, तर विहिरी कितीही खोल असल्या तरी त्यात पाण्याचा पुरेसा साठा राहत नाही. त्यामुळे या अडचणीवर मात करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकसित करण्यावर फादर बाखर यांनी पुढील काळात अधिक भर दिला.
१९८१मध्ये महाराष्ट्र सरकारने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम जाहीर केला. या योजनेअंतर्गत ८० टक्के खर्च शासनाने आणि २० टक्के खर्च लोकांनी करावयाचा होता. ही योजना राबवण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचे प्रयत्न फादर बाखर यांनी केले. या योजनेची माहिती पुरवणारी मराठी पुस्तिका छापून त्यांनी या योजनेचा प्रसार केला.
१९८३ साली फादर बाखर यांची ‘इंडो-जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटी’ (मिझेरिअर) या जर्मन संस्थेचे दिल्ली येथील प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली. आतापर्यंत प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात ग्रामविकासाची चळवळ राबवणाऱ्या फादरचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण भारत देश बनले. या काळात त्यांनी संपूर्ण देशभर दौरे केले. देशातील विविध दुष्काळी भागांना भेट देऊन तेथे कोणत्या योजना राबवता येतील, याचा अभ्यास केला.
देशातील दारिद्रय निर्मूलनासाठी विविध ‘डोनर एजन्सीज’मार्फत ज्या पद्धतीने कार्य केले जाते, त्यामुळे येथील दुर्बल घटकांच्या आर्थिक परिस्थितीत फारशी सुधारणा होणार नाही, त्याऐवजी देशात मुबलक असलेली जमीन, पाणी आणि मनुष्यबळ या नैसर्गिक साधनसामग्रीचे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या आधारे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे, असे त्यांचे मत होते.
त्यांनी आपला हा मुद्दा अनेक संस्थांच्या बैठका, परिषदा घेऊन ठामपणे मांडला आणि त्याचा पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक संस्थांनी आपली कार्यपद्धती बदलली.
फादर बाखर यांनी १९९१पर्यंत दिल्लीत मिझेरिअर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून काम केले. ‘कॅथोलिक एड’मार्फत दुर्बल घटकांच्या साहाय्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. या मदतीमध्ये फादर बाखर यांचे मोठे योगदान आहे.
पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास हा अंतिम उपाय आहे. फादर बाखर यांच्या ‘सोशल सेंटर’ने हे कार्य सुरू केले, तेव्हा याबाबत महाराष्ट्रातील सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांमध्ये फारशी जागृती झालेली नव्हती. राज्यात पाणलोट क्षेत्र विकासाचा जवळजवळ तीस वर्षांपूर्वी शास्त्रशुद्ध कार्यक्रम राबवण्यामध्ये सोशल सेंटरने आघाडी मारली.
अहमदनगरसारख्या दुष्काळी जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट करण्याचा फादर बाखर यांनी प्रयत्न केला. या जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कासारे, संगमनेर तालुक्यातील मेंढवण आणि अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा या गावांचे झालेले आर्थिक परिवर्तन फादर बाखर यांच्या कार्याची पावती आहे.
त्यामुळे या तिन्ही गावांतील पाण्याच्या टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला, ओलिताखालील क्षेत्र वाढले आहे. गावकऱ्यांनी गोपालनाबरोबरच मत्स्यव्यवसायही सुरू केला. एकेकाळी सतत दुष्काळाच्या छायेखाली वावरणाऱ्या क्षेत्रातील हे परिवर्तन क्रांतिकारक स्वरूपाचे आहे.
फादर बाखर येशूसंघीय धर्मगुरू. मात्र धर्मगुरूचे कार्य केवळ आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, असे त्यांनी कधीही मानले आहे. एक हाडाचा मिशनरी या नात्याने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी आपले कार्य कधीही केवळ ख्रिस्ती समाजापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी राबवलेल्या सर्व योजना या जिल्ह्यातील सर्व जाती-धर्मांतील दुर्बल घटकांसाठी होत्या. त्यामुळे त्यांना ख्रिस्ती समाजातील काही व्यक्तींचाही रोष पत्करावा लागला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
फादर बाखर यांच्या या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा ‘कृषिभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला. तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते २ ऑक्टोबर १९९४ रोजी हा पुरस्कार फादर बाखर यांना देण्यात आला. तर जर्मन सरकारने ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
फादर बाखर २००९पासून आपल्या मायदेशात राहत होते. मात्र भारतातील आणि महाराष्ट्रातील लोकांवर त्यांचे प्रेम कायम राहिले. दोन वर्षांपूर्वी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जर्मनीतील लूसन येथे जाऊन त्यांचा सत्कार केला होता. माझ्या ‘ख्रिस्ती मिशनरींचे योगदान’ (२००३) आणि ‘काँट्रिब्युशन ऑफ ख्रिश्चन मिशनरीज इन इंडिया’ (२००७) या पुस्तकांत फादर हार्मन बाखर यांच्यावर एकेक प्रकरण आहे.
युरोपात जन्मलेली एक व्यक्ती महाराष्ट्रातील एका दुष्काळी जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करते ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment