अजूनकाही
१८ ऑगस्ट २०११ रोजी माझा विद्यार्थी आणि कला दिग्दर्शक सिद्धार्थ तातूस्कर ह्याचा रात्री १०च्या सुमारास फोन आला. त्याने सांगितले, ‘सर, दादा गेला!’ ऐकताच मन सुन्न झाले आणि आयुष्यात एक पोकळी निर्माण झाल्यागत वाटले. ह्या भावना होत्या सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते समीर चंदा यांच्या निधनानंतरच्या. सिद्धार्थच्या शब्दांतून समीरदांचे त्यांच्या सहाय्यकांशी असणारे पितृत्वाचे नाते (father figure) दिसून येते. हे नातं केवळ त्यांचे सहाय्यकच नव्हे, तर आम्हा फिल्म इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांपर्यंत विस्तारलेले होते.
माझा आणि समीरदांचा सहवास साधारणपणे सात-आठ वर्षांचा. परंतु त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे एकमेकांवरील अधिकार दृढ व्हायला काळाची गरज नसे. फिल्म इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक परिषदेवर (academic council) तज्ज्ञ म्हणून नेमणूक करताना त्या व्यक्तीची परवानगी घेण्याची औपचारिकता असते. परंतु समीरदांबाबत ह्या औपचारिकतेच्या लक्ष्मणरेषा बिलकुल नव्हत्या. मी अगदी सहजपणे त्यांचे नाव विषयतज्ज्ञ म्हणून पुढे करून यथावकाश त्यांना कळवले. कोणत्याही क्षेत्रात पूर्णपणे झोकून देण्याची त्यांची वृत्ती, मग ते शैक्षणिक असो वा व्यावसायिक, त्या शैक्षणिक सभेत दिसून आली. तो दिवस होता ११ ऑगस्ट २०११. मीटिंग झाल्यावर मुंबईला परतताना FTIIमधील आमच्या कला-दिग्दर्शन विभागाच्या सर्व शैक्षणिक घडामोडींबद्दल दर १५ दिवसांनी अद्यतन ठेवण्याबाबत बजावून गेले. परंतु केवळ सात दिवसांत त्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त कळेल ह्याची तीळमात्र कल्पना नव्हती.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्यांच्या ह्या स्वभाववैशिष्ट्यांचे पैलू अधोरेखित करताना त्यांचा प्रमुख सहायक आणि आजचा आघाडीचा कला दिग्दर्शक सुब्रोतो चक्रवर्ती ह्याचा अनुभव अतिशय बोलका आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता ह्यांच्या ‘जानला’ ह्या बंगाली चित्रपटाच्या चित्रीकरणास समीरदा ‘दिल्ली-६’ व अन्य चित्रपटांतील व्यस्ततेमुळे पश्चिम बंगाल येथे प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते. परिणामतः प्रमुख सहाय्यक म्हणून कला दिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी सुब्रोतोने पार पाडली. यास्तव समीरदांनी त्यास कला दिग्दर्शकाचे संपूर्ण श्रेय दिले. परंतु सुब्रोतो याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होता. पुढे ‘जानला’ आणि ‘दिल्ली-६’ हे चित्रपट कला दिग्दर्शनाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकित झाले. स्वतःचे नाव स्पर्धेत पाहून सुब्रोतो आश्चर्यचकित झाला. ‘दिल्ली-६’ ह्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला असला तरी एकाच पुरस्कारासाठी गुरू आणि शिष्य दोघांचे चित्रपट नामांकित होणे, यानिमित्ताने दादांनी सुब्रोतोस दिलेली ही भावनिक भेट होती.
१९८३ साली कोलकाता येथील गव्हर्नमेंट आर्ट कॉलेजमधून ललितकला शाखेतून पदवी प्राप्त केल्यावर तत्कालीन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितिश रॉय यांचे सहाय्यक म्हणून समीरदांनी आपली कारकीर्द सुरू करताना ‘मंडी’, ‘खंडहर’, ‘पार्टी’, ‘तमस’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून कला-दिग्दर्शनाचे पाठ गिरवले. १९८८ साली सुभाष घई यांच्या ‘राम-लखन’ चित्रपटाद्वारे स्वतंत्रपणे कला-दिग्दर्शन करताना पुढील २३ वर्षांत चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि जाहिरातपट, अशा अनेक क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त केला.
‘दिल्ली-६’साठी चांदनी चौक उभारण्यासाठी राजस्थानातील ‘संभर’ या छोट्या शहरातील गल्ल्यांचा वापर
सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत कलादिग्दर्शनाचा त्यांचा अनुभव दीर्घ होता. त्या दोघांचे समीकरण इतके जुळले की, केवळ एकमेकांच्या दृष्टादृष्टीतूनच चित्रपटाशी निगडित आवश्यक गरजा समीरदा कशा ओळखत, हे ‘रावण’ या चित्रपटाच्या माळशेज घाट येथील लोकेशन शोध-अभ्यासादरम्यान आलेल्या अनुभवातून ते व्यक्त होत. मणिरत्नम यांच्याव्यक्तिरिक्त श्याम बेनेगल, गौतम घोष, सुधीर मिश्रा, राकेश ओमप्रकाश मेहरा, सुभाष घई, विशाल भारद्वाज यांसारख्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर कला-दिग्दर्शनाचा त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे.
ललितकलेतील ‘वास्तववाद’ (realism) हा समीरदांच्या कलादिग्दर्शनाचा विशेष. कथानुरूप वास्तुरचना, अंतर्गत सजावट, संपूर्ण चित्रपटाची रंग संकल्पना (colour palette), पोत (texture) या सर्वांतून वास्तववाद प्रतिबिंबीत होतो.
‘दिल्ली-६’साठी चांदनी चौक उभारण्यासाठी राजस्थानातील ‘संभर’ या छोट्या शहरातील गल्ल्यांचा वापर
समीरदा सदैव प्रयोगशील असत. विविध प्रकारचे रंगसाहित्य वापरून विविध प्रयोग करणे आणि आवश्यक परिणाम साधणे (aging and weathering), यात त्यांचा विशेष हातखंडा होता. आणि तो कला-दिग्दर्शनातील वास्तववादी कलाकृतीचा अविभाज्य भाग आहे.
समीरदांच्या प्रत्येक कलाकृतीतून उपलब्ध लोकेशन्सचा रचनात्मक वापर दिसून येतो. लोकेशन निवडताना कथेत उल्लेखलेल्या वास्तुरचनेशी ते काही प्रमाणात जुळतेमिळते असावे लागते. पुढे त्यात आवश्यक बदल करून अथवा जोड देऊन योग्य दृश्यपरिणाम साधताना केवळ वातावरण निर्मितीच नव्हे, तर कथेतील पात्रांचा व्यवसाय, मानसिकता प्रस्थापित केली जाते. ‘दिल्ली-६’ या चित्रपटासाठी चांदनी चौक उभारण्यासाठी राजस्थानातील ‘संभर’ या छोट्या शहरातील गल्ल्यांचा वापर समीरदांनी अतिशय खुबीने केला होता. त्यातून त्यांच्या रचनात्मकतेची प्रचिती येते. ‘रंग दे बसंती’ चित्रपटासाठी दिल्ली विद्यापीठ परिसर, तेथील उपहारगृह उभारण्यासाठी मुंबई चित्रनगरीतील एका पडक्या इमारतीचा आणि आसपासच्या परिसराचा वापर असो, तसेच ‘रुक्मावती की हवेली’, ‘रुदाली’ या चित्रपटांसाठी राजस्थानातील वेगवेगळी लोकेशन्स असोत, या सर्वांतून त्यांची रचनात्मकता दिसून येते.
‘दिल्ली-६’साठी चांदनी चौक उभारण्यासाठी राजस्थानातील ‘संभर’ या छोट्या शहरातील गल्ल्यांचा वापर
समीरदांची संशोधन वृत्ती अतिशय वाखाणण्याजोगी होती. वास्तुरचना आणि अंतर्गत सजावटीतील लहानात लहान बारकावे अभ्यासून वास्तववादी दृश्यपरिणाम साधताना दृश्यांचा अपेक्षित परिणाम प्रेक्षकांच्या मनावर ते उमटवत. ‘गुरू’, ‘नेताजी सुभाषचंद्र बोस - द फरगॉटन हिरो’ या चित्रपटांतील स्वातंत्र्यपूर्वकाळ, ‘ओंकारा’ या चित्रपटातील वाईजवळील धोम धरणाशेजारी उभारलेले उत्तर प्रदेशातील एक गाव या कलाकृतींतून त्यांच्यातील कुशल संशोधक दिसतो. ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटात शासकीय अनागोंदी परिणामकारकपणे दर्शवताना त्यास समीरदांच्या समर्थ कला-दिग्दर्शनाची जोड मिळाली आहे. या चित्रपटात दिसणारे संपूर्ण गाव, शासकीय कार्यालये त्यांनी रामोजी फिल्मसिटीत उभारली होती.
कलानिर्मितीची त्यांची ओढ कला-दिग्दर्शनापुरतीच मर्यादित न राहता ‘एक ती नदीर गोल्पो’ या बंगाली चित्रपटाच्या दिग्दर्शनातून दिसून येते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
समीर चंदा हे एक विद्यापीठ होते. त्यांनी घडवलेली कला-दिग्दर्शकांची एक पिढी आत्मविश्वासाने मोठमोठ्या चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन करत आहे. त्यातूनही दादांच्या कार्यशैलीची छाप उमटलेली दिसते.
२८ वर्षांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांसाठी, शेकडो जाहिरातपटांसाठी योगदान देणारे, तसेच ४ राष्ट्रीय पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणारे कला-दिग्दर्शक समीर चंदा यांच्या निधनास १८ ऑगस्ट २०२१ रोजी १० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने त्यांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली.
..................................................................................................................................................................
लेखक आशुतोष कवीश्वर भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था (FTII) इथं सहाय्यक प्राध्यापक (कला-दिग्दर्शन) आहेत.
kavishwarashutosh72@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment