अजूनकाही
आपल्या सार्वत्रिक असंवेदनशीलतेमुळे समाज ज्या वेदना भोगतो, त्या व्यथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक होय. पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ हे अत्यंत संवेदनशील मनाचे लेखक आहेत. त्यांनी एक अधिकारी म्हणून आयुष्याच्या छळछावण्यात अडकलेल्या अनेक बालकामगारांना मुक्त करत त्यांचं निरागस बालपण त्यांना परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, नव्हे आजही त्यांची यासाठीची धडपड सुरू आहे. या कामात आलेल्या अनुभवांना त्यांनी ‘पोऱ्या’ या पुस्तकातून शब्दबद्ध केलं आहे. यात अनेक मुलांच्या कथा वाचायला मिळतात. अर्थात लौकिक अर्थानं हा कथासंग्रह नसून व्यथासंग्रह आहे. तो मनोविकास प्रकाशनाकडून नुकताच प्रकाशित झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांनी या पुस्तकाला लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
आपण जे पुस्तक हातात घेतलेले आहे, ते लौकिक अर्थाने ‘पुस्तक’ असले तरी प्रत्यक्षात ते निखारे आहेत. त्यामुळे ते वाचताना तुमचे मन भाजून निघणार आहे. लेखकाचा उद्देश तुम्हाला भाजल्याच्या वेदना व्हाव्यात हा नाही. कदाचित असेलही, कारण टीव्हीवर वा चित्रपटात पाहून आगीची धग आपल्यापर्यंत पोहोचत नाही. भाजल्याशिवाय जाळ समजत नाही. चटका बसल्याशिवाय त्वचेचा आणि वेदनेचा नक्की काय संबंध आहे, हे कळत नाही. विजेचा शॉक बसल्याशिवाय आपल्या काळजाचे ठोके ऐकू येत नाहीत. हे पुस्तक आगीचे चटके आणि विजेचे झटके देऊन वाचकाला त्याच्या निवांत कोशातून बाहेर यायला भाग पाडते. पण ज्याची संवेदनशीलता अजून टिकून आहे, त्यालाच या पुस्तकातील संवेदनांची वेदना कळू शकेल. हल्लीच्या ‘मोबाइल-फेसबुक-व्हॉट्सअॅप-ट्विटर’च्या जमान्यात संवेदना बर होऊ लागल्या आहेत. त्वचेची आणि मनाची संवेदना मेलेली असेल तर वेदना होत नाहीत. आपल्या समाजाने आपणहून स्वत:ला अॅनास्थेशियाचे इंजेक्शन टोचून घेतले आहे. या ‘मोबाइल अॅनास्थेशिया’ने समाज जर असाच गुंगीत राहिला, तर आपला सार्वत्रिक विनाश अटळ आहे. शैलेंद्र पोळ यांना तो विनाश अटळ वाटत नाही. त्यांना वाटते की, चटके किंवा शॉक देऊन समाजाची गुंगी उतरवता येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मी पोळ यांच्याएवढा आशावादी नसलो तरी या पुस्तकामुळे माझी झोप उडाली हे खरे. सुदैवाने मी गुंगीत नव्हतो! या पुस्तकात काल्पनिक कथा नाहीत. त्या अर्थाने हा कथासंग्रह नाही. हा व्यथासंग्रह आहे. त्या व्यथा आपल्या सार्वत्रिक असंवेदनशीलतेमुळे समाज भोगतो आहे. म्हणजेच आपण या वेदनांना, व्यथांना आणि हिंस्रतेला मूकसंमती देत आहोत. गुंगीचे औषध आपण स्वेच्छेने घेऊन इतरांना ते इंजेक्शन दिले जात असताना नुसते पाहत बसलो आहोत.
हे पुस्तक वाचताना सतत मला अपराधीपणाच्या भावनेने वेढलेले होते. हा ‘गिल्ट कॉन्शन्स’ तुमच्याही अंत:करणात उमलला तर पुस्तकाचा हेतू सिद्ध होईल.
आपण हिटलरच्या छळछावण्यांविषयी ऐकले आहे, वाचले आहे. टीव्हीवर वा चित्रपटांतून काही दृश्येही पाहिली आहेत. हिटलरच्या त्या छळछावण्यांत सुमारे आठ लाख लोक मारले गेले. जवळजवळ तेवढेच उद्ध्वस्त झाले, अपंग झाले, नातेवाईक, आई-वडील, मित्र गमावून बसले. जीवनापासून तुटले. जर्मनी हिटलरच्या हिंस्र मगरमिठीतून मुक्त झाल्यावर काही लेखक-पत्रकारांनी इतर जर्मन माणसांना विचारले, ‘त्यांना या छावण्यांविषयी काही माहिती होती की, त्यांना कल्पनाच नव्हती? माहिती होती तर ते गप्प का बसले आणि कल्पनाच नव्हती, तर का नव्हती?’ कारण त्यांच्याच शहरात ते अत्याचार होत होते - अगदी जवळपासच. फक्त ज्यू लोकच नव्हे तर इतरही अनेक लेखक, कवी, समाज कार्यकर्ते, अपंग, जिप्सी, असाहाय्य-अनाथ स्त्रिया, मुले या सर्वांचा छळ झाला होता. त्यांना कोंडून ठेवणे, उपाशी ठेवणे, बेदम मारणे, लहान मुलांना आई-वडिलांपासून तोडणे, त्यांच्याकडून १६-१७ तास काम करून घेणे, या बाबी तर नित्याच्याच होत्या. मग इतरांना त्या कळल्या कशा नाहीत? हा प्रश्न आपल्या देशात आपल्यालाच विचारायला हवा!
नाझींनी केलेल्या छळाच्या क्रूर कहाण्या, अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीच्या भीषण कथा, जपानने केलेले चीन-कोरियामधील अत्याचार, इंग्रजांनी त्यांच्याच देशात केलेल्या बालमजूर व महिलांच्या पिळवणुकीच्या अमानुष कथा; इंग्रज, फ्रेंच, डच, जर्मन वसाहतवाद्यांनी त्यांच्या कब्जात असलेल्या देशांमधील मजुरांवर लादलेली हिंस्र गुलामगिरी... अशी गेल्या अडीचशे वर्षांतील ‘प्रगती’ची दुसरी बाजू आहे.
परंतु हे सर्व ‘ऐतिहासिक’ आणि ‘इतर’ देशातील अन्याय्य वास्तव म्हणता येणार नाही - इतके भयानक वास्तव या घडीला आपल्या भारतवर्षात आहे. अक्षरश: लक्षावधी बालमजूर या चरकातून पिळवटून निघत आहेत. अन्नपाणी फक्त जगण्यापुरते आणि तेही निकृष्ट. शिक्षण नाही, आरोग्याचा संबंधच नाही, राहायला आठ बाय आठच्या झोपडीत १० माणसे, बेकार आणि दरिद्री जीवनात कसलीही आशा नाही, आस्था नाही आणि कुणाला पर्वा नाही. बालमजुरी बंद करण्यासाठी कायदे उदंड आहेत आणि तरीही ही आपल्याला शरम आणणारी बालमजुरी देशात राजरोस चालू आहे.
शैलेंद्र पोळ यांनी या पुस्तकात जळजळीत व अघोरी वास्तवावर फ्लडलाइट टाकलेला आहे. अजून त्यांच्यासारखे अधिकारी, आयुक्त, नोकरशहा आहेत म्हणून न्याय व करुणेचा कवडसा तरी दिसतो; पण तो असतो ‘फ्लडलाइट’ टाकल्यावरचा कवडसा! पोळ यांचे ‘भाग्य’ हे की, त्यांना रत्नाकर गायकवाड यांच्यासारखे आदर्शवादी, पण कार्यक्षम, न्यायप्रिय, पण अन्यायाविरोधात कठोर असे ज्येष्ठ साहेब मिळाले.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या पुस्तकातील व्यथांवर फुंकर घालून निदान काहींना तरी गायकवाड-पोळ यांच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा जीवनप्रवाहात येता आले. मग ती जन्नत या मुलीची विलक्षण जाचाची व धीराची कहाणी असो वा अफझलची अंगावर काटा येणारी शोकांतिका; राजस्थानातून आलेला शंभू असो वा यांच्यासारखे कोणी तरी हिंदू, मुस्लीम, बौद्ध बालमजूर म्हणजे कोण?
‘बालवय’ म्हणजे नक्की कोणते? पाच की पंधरा? अठरा म्हणजे प्रौढ! सध्या देशात चर्चा सुरू आहे की, १५-१६ वर्षांच्या मुलाला ‘प्रौढ’ का मानू नये? त्यांना सक्तमजुरी, जन्मठेप वा फाशीही का दिली जाऊ नये? एका बाजूने देशात बालवयीनांची, म्हणजे उद्याच्या तरुणांची संख्या कित्येक कोटी आहे म्हणून ‘गर्व से’ वल्गना करणारे राजकीय पुढारी देशाला ‘महासत्ता’ बनवू पाहात आहेत, तर दुसऱ्या बाजूला अफाट हलाखीत जीवन कंठणाऱ्या असंख्य मुलांना निर्दयपणे उपेक्षित ठेवले जात आहे.
राजकीय पक्ष आणि स्वयंभू पुढारी, पोलीस आणि नोकरशाही, अगदी कर्मचाऱ्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत, न्यायव्यवस्था आणि बालवयीनांना संरक्षण व आधार मिळावा म्हणून चालवल्या जाणाऱ्या संस्था-सरकारी वा बिगरसरकारी, एकूणच पत्रकार-टीव्ही किंवा वृत्तपत्रे-या सर्वांची एक भलीमोठी दगडी भिंत उभी केली गेली आहे.
एकोणिसाव्या शतकापासून युरोप-इंग्लंडमधील अनुभवांवर कायदे केले जात आहेत आणि तरीही ती दगडी भिंत जशीच्या तशी आहे. गायकवाड आणि पोळ यांच्यासारख्या संवेदनशील अधिकाऱ्यांना जर समाजाची, मीडियाची, सरकारची, पोलिसांची, नोकरशाहीची साथ मिळाली नाही, तर त्या दगडी भिंतींच्या आतल्या आवारात अनन्वित अत्याचार चालूच राहणार आहेत. अनेक निष्पाप मुलांना पळवून आणून त्या दगडी भिंत असलेल्या तुरुंगसदृश वाड्यात डांबले जाणार आहे. लहान मुलांना संघटित गुंडगिरीत जुंपले जाणार आहे. भीक मागणाऱ्यांच्या टोळ्या तयार केल्या जाणार आहेत.
ज्या वयात शिकायचे, खेळायचे, नवीन अनुभव घ्यायचे, कुटुंबवत्सल वातावरणात वाढायचे, त्या वयात या मुलामुलींना आपल्या आजूबाजूच्या या नरकात लोटले जाणार आहे. ‘स्लमडॉग मिलिनेअर’ या इंग्रजी चित्रपटात आलेली विदारकता जरी करमणुकीच्या कॅनव्हासवर चितारली गेली असली तरी त्यातील वास्तव लपून राहात नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
शैलेंद्र पोळ यांनी फक्त या व्यथांना वाचा फोडली आहे असे नव्हे; तर त्यांनी वाचकांचे प्रबोधनही केले आहे. यासंबंधातील कायदे कसे विकसित होत आहेत. (आणि तरीही स्थिती अविकसितच का राहिली) त्या कायद्यांच्या आधारे, मनात आणले तर प्रश्न सोडवता येऊ शकतो. करुणा आणि मानवता असेल तर बालमजुरीचा प्रश्न कायमचाही संपू शकतो (अगदी जगभर!) अशी आशा पोळ यांना आहे. इतके भयानक वास्तव पाहून ते निराशावादी कसे होत नाहीत, हेच मला वाचताना आश्चर्य वाटत होते. आपल्या निवांत, सुस्थित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत(?) मध्यमवर्गात एक वर्ग असतो- ‘काहीही होणार नाही’ असे म्हणणाऱ्या निष्क्रियतावाद्यांचा आणि दुसरा वर्ग असतो संवेदनाहीन झालेल्यांचा. दोघेही निराशावादाच्या विळख्यात स्वखुशीने जातात.
शैलेंद्र पोळ यांनी या वर्गाला चटका दिला आहे आणि चटका लावलाही आहे. प्रश्न आहे तो आपण काय करणार याचा!
‘पोऱ्या’ – शैलेंद्र पोळ
मनोविकास प्रकाशन, पुणे
पाने – १४४
मूल्य – १७० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment