काल आमचा पोर्टेबल टीव्ही बंद पडला. दुपारी मुली कार्टुन पाहत असताना त्याने आमचा निरोप घेतला...
संकीर्ण - ललित
बळवंत मगदूम
  • लेखकाच्या टीव्हीचं एक छायाचित्र
  • Mon , 06 September 2021
  • संकीर्ण ललित टीव्ही TV बीपीएल BPL व्हिडिओकॉन Videocon ओनिडा Onida महाभारत Mahabharat डीडी नॅशनल DD National मोखाडा Mokhada जव्हार Jawhar क्विकर Quikr

२२ जुलै २०१४ रोजी खरेदी केलेला पोर्टेबल टीव्ही काल बंद पडला. दुपारी मुली कार्टुन पाहत असताना त्याने आमचा निरोप घेतला. या टीव्हीशी जोडलेला भूतकाळ आणि टीव्ही खरेदीची कथा मोठी रोचक आहे.

गल्लीत, भावकीत आणि घरात टीव्ही आहे, हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. बऱ्यापैकी उत्पन्न असणाऱ्या घरात टीव्ही असायचा. तो लग्न जमण्यात एकेकाळी महत्त्वाचा दुवा होता. बीपीएल, व्हिडिओकॉन, ओनिडा ही खेड्यापाड्याच्या ग्राहकांची पहिली पसंती. ‘आभाळमाया’, ‘कॅम्पस’, ‘जंगल बुक’, ‘चार दिवस सासूचे’ या मालिकांनी धुमाकूळ घातलेल्या काळात अनेकांना घरात टीव्ही असावा असं वाटायचं. या काळात अनेक घरात टीव्ही आले. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मी लहानपणी दर रविवारी सकाळी ‘महाभारत’ पाहायला मिळावं म्हणून शनिवारपासून सेटिंग लावत फिरायचो. गल्लीत जंगम, सुतार, अंबर्डेकर अशा काही मोजक्या लोकांच्या घरी टीव्ही होता. माझ्या गल्लीत एका निवृत्त सैनिकाची पत्नी राहत होती. आम्ही तिला ‘फलटणवाली’ म्हणायचो. तिचा नातू माझा मित्र. मग त्याच्याशी मैत्री. शनिवारी त्यांची म्हैस चरायला घेऊन जायचो. माझ्या गल्लीत शरद आणि संजू अशा दोन पार्ट्या. संजूच्या घरी टीव्ही नव्हता, शरदच्या होता. त्यामुळे आम्ही शरदच्या पार्टीत.

पोटासाठी मुंबईला गेल्यावर टीव्ही कायमचा सुटला. मी वाण्याच्या चाळीत बैठकीच्या खोलीत मुक्कामी. माझ्या रूममध्ये जवळपास सारेच मिल मजूर. त्यांच्या पाळ्या ठरलेल्या. रात्री साडेनऊनंतर रूममध्ये लाईट लावायला परवानगी नव्हती. त्यामुळे जनरलशिफ्टवाल्यांच्या खोलीत टीव्हीची जी चंगळ होती, ती माझ्या रूममध्ये नव्हती. खानावळीत टीव्ही होता, पण रूमवर डब्बे आणून जेवण्याचा प्रघात. कामावर जाताना, सकाळी खानावळीत भाजी-पोळी खाताना टीव्ही पाहायला मिळाला तर मिळाला, नाहीतर तोही नाही. कारण टीव्ही पाहत लोक जेवणासाठी अधिक वेळ लावतात, हा खानावळवालीचा निष्कर्ष. त्यामुळे तिचा टीव्ही सदा बंद अवस्थेत असायचा.

पुढं शिकावं म्हणून मुंबई सोडून कोल्हापूरला आलो. वेटर-रूमबॉयच्या नोकरीत तसा टीव्ही वाट्याला आलाच नाही. विद्यापीठाच्या वसतिगृहात राहायला गेल्यावर डीडी नॅशनल हे एकच चॅनेल पाहायला मिळायचं. त्यावर दर बुधवारी रात्री एक तासाचा चित्रपट लागे. असे एक एक तास करत तीन आठवडे एक चित्रपट पाहणं. वसतिगृहातला मुक्काम संपल्यावर मी जागृती नगरात राणी अपार्टमेंटसमोर चौगले अण्णाच्या घरी मुक्कामी आलो. त्यांच्या घरी जुना टीव्ही. तोही मोडकळीस आलेला. त्याचा टूनर खराब झालेला. अशा टीव्हीच्या अनेक आठवणी मनात फेर धरू लागल्या.

त्या वेळी मी मोखाड्याला तासिका तत्त्वावरील नोकरी करत होतो. स्टाफ क्वार्टरमध्ये मुक्काम. मी वगळता जवळपास सर्वांच्या घरी टीव्ही. मिळणार्‍या पगारात जगण्याचाच मेळ घालावा लागायचा. त्यामुळे माझ्या लेखी टीव्ही तशी चैनीची गोष्ट. घरी टीव्ही नसल्याचा फायदा असा झाला की, बायकोची पुस्तकाशी गट्टी जमली. मध्ये मध्ये कधी तरी टीव्हीचा विषय निघाला की, मी बायकोला वाचनाचे फायदे सांगायचो. तर कधी पंधरा–पंधरा दिवस सूर्यदर्शन न देणारा, मोखाड्याला चार महिने कोसळणारा धुवांधार पाऊस, त्यामुळे गायब होणारे डिशचे सिग्नल, अर्धा अधिक पावसाळा चालणारा विजेचा लपंडाव याचाही दाखला द्यायचो. बायकोला आतून चीड येत असावी, पण तिनं कधी बोलून दाखवलं नाही. त्यामुळे मोखाड्यातील पहिली तीन वर्षं टीव्हीशिवाय निघाली. पण पुढे तिला आपल्या घरी टीव्ही असावा असं वाटू लागलं. मात्र ज्या ज्या वेळी टीव्हीचा विषय अजेंड्यावर यायचा, त्या त्या वेळी तो बजेट अभावी बाजूला पडायचा.

उन्हाळी सुट्टीत पीएच.डी.च्या अभ्यासासाठी कोल्हापूरला मुक्कामी असताना २०१४च्या उन्हाळ्यात कोकणात कुडाळला नोकरीस असलेल्या मित्राने, अर्जुन माळीने घरी टीव्ही आहे का, अशी विचारणा केली. मी नाही म्हटलं. त्याचं त्याला आश्चर्य वाटलं. ‘अरे, मग घ्यायचा ना. त्या आदिवासी भागात मनोरंजनासाठी काही तरी घरी नको का?’ ही त्याची भूमिका. मग त्यानेच ‘टीव्हीचं बजेट काढ, मी पाठवतो तेवढे पैसे’ म्हटलं. पुढे मी उन्हाळी सुट्टी संपवून कॉलेजवर गेल्यावर टीव्हीचा शोध सुरू केला. भेटला रिकामा वेळ की, करा सर्च, असं काही दिवस चाललं. त्यात जून गेला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मोखाड्याजवळ जव्हार हे बऱ्यापैकी मोठं गाव. एक दिवस त्या गावातल्या दुकानांना भेटी दिल्या. मी जव्हारला गेलो की, बायकोला वाटायचं आज टीव्ही येणार. पण याही गावात तसे टीव्ही माझ्या बजेट बाहेर. मी मग ‘क्विकर’वर एखादा सेकंड हँड टीव्ही मिळतोय का, याची चाचपणी सुरू केली. नाशिक, त्र्यंबकेश्वर, जव्हार आणि कल्याण ही मला सोयीची ठिकाणं. मी या गावांना प्राध्यान्य देऊन ‘क्विकर’वर माझा शोध सुरू ठेवला. माझ्या बजेटमध्ये कल्याणला ओनिडाचा एक टीव्ही भेटला. मी त्याला संपर्क साधून टीव्ही विकत घेण्याची इच्छा असल्याचं कळवलं. अर्जुनला टीव्हीबाबत कळवल्यावर त्याने खात्यावर चार हजार पाठवून दिले. दोन दिवसांनी पनवेलच्या सहसंचालक कार्यालयात कॉलेजचं पगारपत्रक द्यायचं काम निघालं. मग त्या दिवशी कल्याणचा तो टीव्हीही आणायचं ठरवलं.

पावसानं बऱ्यापैकी जोर धरलेला होता. टीव्ही भिजू नये यासाठी आवश्यक तेवढा प्लॅस्टिक कागद, सेलो टेप, टीव्ही बांधायला बेडशीट या साऱ्या सामग्रीनिशी ‘बायकोला टीव्ही घेऊन येतो’ असं सांगून सकाळी साडेपाचची पहिली बस पकडून पनवेलला गेलो. काम झाल्यावर पनवेल स्टेशनवरूनच कल्याणच्या व्यक्तीला फोन लावून टीव्ही घ्यायला येतोय, असा निरोप दिला. तसा मी सकाळपासून त्याच्या संपर्कात होतो. ‘सकाळी या’ म्हटले, पण आता फोन केल्यावर त्यांनी ‘टीव्हीचं चित्र हलतंय, येऊ नका’ म्हटलं. मी काही क्षण हिरमुसलो. पण त्याचा भलेपणा पाहून बरंही वाटलं.

टीव्हीचा हा पर्याय संपल्यावर मी पनवेल स्टेशन परिसरातील मोठ्या शोरूमला भेट दिली. पण एलसीडीचा जमाना आलेला. जुन्या पद्धतीचे टीव्ही औषधालाही उरले नव्हते. जे होते ते माझ्यासारख्या गरिबाच्या बजेट बाहेर.

कसाऱ्यावरून शेवटीची बस पकडून रात्री आठ वाजता घरी आलो. मला रिकाम्या हातानं आलेलं पाहून बायको हिरमुसली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा टीव्हीची शोध मोहीम गतिमान केली. पुन्हा एक दिवस जव्हारला जाऊन टीव्हीची चौकशी करून आलो. आज-उद्या करत जुलै संपायला आला. घरी नाराजी वाढायला लागली. आपण घरच्यांचं हे साधं स्वप्नही पूर्ण करू शकत नाही, याचं दु:ख वाटू लागलं. जाऊदे गेलं तर थोडं बजेट बाहेर, पण टीव्ही खरेदी करूयात, या विचारापर्यंत आलो.

२२ जुलै रोजी कॉलेज शिपाई गोविंदमामा यांना सोबत घेऊन त्यांच्या दुचाकीवर जव्हारला गेलो. परवा कल्याणची मोहीम फसल्यानंतर बायकोनं मुलांच्या शिकवण्या घेऊन साठवलेले चौदाशे रुपये माझ्याकडे देऊन किमान पोर्टेबल टीव्ही येईल इतपत बजेट आणून ठेवलं होतं. गेलो दुकानात. पण परवा पसंतीला उतरलेला टीव्ही विकला गेला होता. त्याऐवजी मार्कसन नावाच्या दिल्ली मेड कंपनीचा टीव्ही तिथं मांडून ठेवलेला. दुकानदार म्हटला, ‘हाही चांगला आहे. घ्या.’  रक्कम विचारली. पुन्हा बजेट कोसळू लागलं. कारण केवळ टीव्ही नाही तर त्याला डिशही घ्यावा लागणार होता. बार्गेनिंग करून अर्जुनने पाठवलेले चार हजार आणि घरच्यांनी दिलेले चौदाशे असे करून डिशसह पाच हजार चारशे रुपयात तो टीव्ही घेऊन आलो.

त्या टीव्हीनं जुलै २०१४ ते आजपर्यंत चांगली साथ दिली. हल्ली त्याची रंगाची तक्रार सुरू झाली होती. पण आम्ही आहे तो रंग गोड मानून घेत होतो. माझ्या आजूबाजूला स्मार्ट, अँन्ड्रॉइड, 4 के टीव्हीचा जमाना आलेला. माझी तासिका तत्त्वावरील नोकरी कायमस्वरूपी झाल्यावर अनेकांनी टीव्ही बदलण्याचा सल्ला दिला, पण मी तो बदलला नाही. कारण हा टीव्ही ज्या प्रतिकूलतेत घरात आणला होता, त्या दिवसांची आठवण आम्हाला त्याच्या दिवाणखान्यात असण्यामुळे होत होती. मित्रानं केलेली मदत, मी आणि पत्नीने पाहिलेलं एक मोठं स्वप्न या टीव्हीच्या रूपात सत्यात आलं होतं. त्याच्यामुळे माझा भूतकाळ जिवंत होत होता. या साऱ्या अपरिहार्यतेसाठी तो जसा होता, तसाच मला हवा होता.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

दुसऱ्या दिवशी कॉलेज वरून आल्यावर टीव्ही दुरुस्तीला घेऊन गेलो. माझा पोर्टेबल टीव्ही बघून दुरुस्तीवाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं. मी जणू ‘बाबा आझम’च्या काळातला टीव्ही दुरुस्तीला घेऊन गेल्यासारखा तो माझ्याकडे पाहू लागला. केवळ मनोरंजनाच्या पलीकडे गेलेल्या टीव्हीच्या सध्याच्या काळात मी माझा टीव्ही दुरुस्तीसाठी त्याच्या दारात घेऊन गेलो होतो. तिथं अनेक टीव्ही रचून ठेवलेले होते. त्याने माझ्या समोर टीव्हीची खोलाखोली करून ‘सर, याला खर्च करण्यापेक्षा नवा घ्या. तुम्हाला लाईट बीलही कमी येईल’ असा सल्ला दिला. ‘दुरुस्ती केली तरी किती दिवस चालेल हे सांगू शकत नाही’ अशी धमकीही दिली.

एका टीव्हीच्या बंद पडण्यामुळे एक काळ कालबाह्य होऊ पाहत होता. त्या टीव्हीच्या निमित्तानं मी माझ्या भूतकाळाशी जोडला गेलो होतो. गावापासून नोकरी, शिक्षण आणि पुन्हा नोकरीच्या निमित्तानं या टीव्हीच्या रूपानं जपलेला काळ आता संपणार होता. त्याचं बोलणं ऐकून घेत मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो… आणि मला टीव्हीच्या वाटेला नजर लावून बसलेल्या मुलींचे चेहरे आठवले…

..................................................................................................................................................................

लेखक बळवंत मारुती मगदूम श्री. आर. आर. पाटील महाविद्यालय, सावळज ता. तासगाव येथे शिक्षक आहेत. त्यांनी मुंबई, कोल्हापूर इथं कुरिअर बॉय, हेल्पर, रूमबॉय, वेटर म्हणून नोकरी केलेली आहे.

balvantmagdum2020@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......