भारतीय नृत्यासाठी ‘भारतीय संस्कृती’ची जाण असणं आवश्यक आहे, वाचन चांगलं हवं आणि मेहनतीची तयारी हवी. ते सगळं माधुरीमध्ये आहे.
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • ‘तेजाब’मधील ‘एक दो तीन’ या गाण्यांतील माधुरी दीक्षितची काही दृश्यं
  • Sat , 04 September 2021
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा माधुरी दीक्षित Madhuri Dixit तेजाब Tezaab एक दो तीन Ek Do Teen

“Dance, when you're broken open. Dance, if you've torn the bandage off. Dance in the middle of the fighting. Dance in your blood. Dance when you're perfectly free.” ― Rumi

२००३ साली ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ हा रामगोपाल वर्माचा सिनेमा आला होता. त्यात खेड्यातल्या एका मुलीला माधुरी दीक्षितसारखी प्रसिद्ध नटी व्हायचं असतं. एखाद्या हिंदी सिनेमातील नटीच्या नावानं असा सिनेमा निघणं ही पुरुषप्रधान बॉलिवुडसाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि ती नटी मराठी असणं हे आणखी मोठं अप्रूप होतं.

भारतात सिनेमाची सुरुवात मराठी माणसानं केली असली तरी हिंदी सिनेमात ठसा उमटवणाऱ्या नट्या सुरुवातीपासून प्राधान्यानं दाक्षिणात्य राहत आल्या आहेत. त्यातही नृत्य हा प्रकार फक्त दाक्षिणात्य नट्यांचीच मक्तेदारी होती. अगदी वैजयंतीमालापासून श्रीदेवीपर्यंत हे दक्षिणायन दिसतं. अशा हिंदी सिनेसृष्टीत १९८८ साली ‘तेजाब’मध्ये एका मुंबईच्या मराठी मुलीनं ‘एक दो तीन’ करत जो धुमाकूळ घातला, तो ‘न भूतो न भविष्यति’ असा होता. त्या सिनेमाचा नायक जरी अनिल कपूर असला तरी ‘तेजाब’ माधुरी होती. तिनं रंगवलेलं पात्र वडिलांच्या शोषणाला बळी पडलेलं व स्टेजवर पैशासाठी काम करणारं असतं. माधुरीनं या भूमिकेत कमालीची तीव्रता दाखवली आहे. उत्कृष्ट हिंदी उच्चार हे या सिनेमातलं नवख्या माधुरीचं मोठं वैशिष्ट्य आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एक चाहती म्हणून माधुरीचा हाच सिनेमा मला सगळ्यात जास्त आवडतो, कारण तो पाहूनच मी नाचायला शिकले. आमच्या ‘मिलेनिअल पिढी’तील जे लोक नृत्य करतात किंवा करायचे वा ज्यांना नृत्य आवडतं, त्यांना माधुरी दीक्षित व गोविंदा ही दोन नावंच सगळ्यात जास्त भावतात. नृत्यातील हालचाली, चेहर्‍यावरचे हावभाव व संगीताचा ताल एन्जॉय करत नृत्य करणं, हे माधुरी दीक्षित व गोविंदा सहज, सुंदररित्या करतात.

‘Puberty celebrity worship’ या प्रकारात वयात येणारी मुलं-मुली सिनेमा, खेळ यातील नट-नट्यांना बघून त्यांच्यासारखं दिसण्याचा व वागण्याचा प्रयत्न करतात. आपली ओळख प्रस्थापित करण्याचा तो एक प्रयत्न असतो. हा मोठं होण्याच्या प्रक्रियेचाही एक भाग असतो. मा‍झ्याकरता त्या वेळेला माधुरी दीक्षित व स्टेफी ग्राफ या दोघी ‘आयडल’ होत्या. माधुरीला बघत नृत्य करताना तिची छायाचित्रं विकत घ्यायची सवय लागली. मी त्या वेळेला खूपच लहान होते, पण मोठ्या जिद्दीनं अनेक वर्षं माधुरीची पोस्टकार्ड साईझ छायाचित्रं जमवली. त्याचबरोबर तिच्या वर्तमानपत्रं व नियतकालिकांत छापून आलेल्या मुलाखती जपून ठेवायचे.

मा‍झ्या घरच्यांना, विशेष करून बाबांना हे प्रकार अजिबात आवडायचे नाही. पण शाळेत, शेजारी व मित्रमैत्रिणींमध्ये ‘माधुरीची फॅन’ म्हणून मी अभिमानानं मिरवायचे. हे सुरू असताना मी नृत्यावर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवलं होतं. अर्थात ते घरच्यांना माहीत नव्हतं. अभ्यासात चांगली असल्यानं हे प्रकार निभून जायचे.

माधुरीची नृत्याची लय व हावभाव बघून एकलव्यासारखी माझी नृत्यसाधना सुरू होती, पण दहावीत चांगले मार्क मिळवून पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर ती कमी होत गेली. तिने १९९९मध्ये लग्न करून बॉलिवुडला अलविदा करेपर्यंत मी तिची १२०० छायाचित्रं जमवली होती. मा‍झ्यात उपजत असलेलं नृत्याचं टॅलेंट मला माधुरीमुळेच कळलं.

पुढे जाऊन मी भारतातील व जगातील अनेक नृत्य प्रकार अनुभवले, पण माधुरीसारखं नृत्य करणारे फार कमी आहेत, हे जाणवलं. टॅलेंटच्या मानानं तिला कमीच मिळाल, असं नेहमी वाटतं. कारण भारतात नृत्याला केंद्रस्थानी ठेवणारे सिनेमे मोजकेच आहेत. हॉलिवुडमधील ‘साऊंड ऑफ म्युझिक’, ‘मेरी पोप्पीन्स’, ‘द ग्रेटेस्ट शोमन सिंगिंग इन रेन’सारखे सिनेमे आपल्याकडे होणं अशक्य आहे. श्रीदेवीचा निस्सीम भक्त असलेला एक मित्र माधुरी श्रीदेवीपेक्षा कशी कमी आहे, हे सतत सांगत माधुरीने श्रीदेवीला मागे टाकलं, याचं दुःख नकळत व्यक्त करत असतो.

माधुरीने नृत्याशिवाय काहीच केलं नाही असं म्हणणार्‍या (विशेष करून मराठी) लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, शृंगार हासुद्धा अभिनयाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो अश्लील न वाटू देता पडद्यावर सादर करण्याचं बखुबी काम तिने केलं. मुख्य म्हणजे स्मिता पाटीलच्या दुर्दैवी अकाली निधनानंतर हिंदी सिनेमातला मराठी ठसा माधुरीमुळे कायम राहिला. मराठी लोकांना ‘घाटी’ म्हणत हिणवणाऱ्या हिंदीच्या साम्राज्यात श्रीदेवी व जुही चावलासारख्या मजबूत व चाणाक्ष प्रतिस्पर्धी असतानासुद्धा माधुरी ‘सुपरस्टार नटी’ झाली. त्याला तिची अंगभूत गुणवत्ता, पडद्यावरचा सहज वावर, मेहनत व प्रामाणिकपणा कारणीभूत आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अनेक वेळा तिची सिनेमाची निवड चुकली. ती श्रीदेवीपेक्षा ड्रेसिंग व मेकअपमध्ये कमीच पडायची. ‘मिस इंडिया’ जुही चावलासारखी ती व्यावसायिक नव्हती. माधुरीच्या घरचं वातावरण एखाद्या मध्यमवर्गीय मराठी घरासारखं अभ्यास, शिक्षण याला महत्त्व देणारं असताना आणि हिंदी सिनेमाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिने मिळवलेलं यश वाखाण्याजोगं आहे. माधुरीनंतर हिंदी सिनेमात मराठी मुली बोल्ड भूमिका करू शकतात, हे अगदी उर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रेपासून राधिका आपटेपर्यंत अनेकींनी सिद्ध केलं.

‘किनेस्थेटिक’ (Kinesthetic style of learning) म्हणजे शारीरिक हालचालींशी संबंधित शिकण्याची शैली असलेले लोक नृत्य या प्रकारात प्रावीण्य मिळवतात. शिकवून नृत्य करता येतं, पण नृत्यातील ‘ग्रेस’ ही नैसर्गिक देणगी आहे. माधुरी तिच्या कोणत्याही नृत्यातील कोणतीही स्टेप इतक्या वर्षानंतरही तंतोतंत तशीच स्टेप करते, ही तिच्या नृत्याविषयीच्या समर्पणाची साक्ष आहे. तिची बहुतेक नृत्यं (अर्थात हिंदी सिनेमाचा पॅटर्न तसाच असल्यानं) प्रेम व शृंगार या प्रकारात मोडतात. चेहर्‍यावरील अप्रतिम हावभाव व संगीताची चांगली जाण, यामुळे तिची सर्व नृत्यं (त्यात अगदी ‘तमा तमा लोगे’सारखं निरर्थक गाणंसुद्धा येतं) हिट झाली.

माधुरी हिंदी सिनेमातील शेवटची ‘डान्सिंग सुपरस्टार’ ठरली असं म्हणायला हरकत नाही. २००० सालानंतर हृतिक रोशनमुळे हिंदी सिनेमात काही चांगली नृत्यं बघायला मिळाली, पण एकही नटी माधुरीसारखं नृत्य करणारी झाली नाही. चांगल्या नृत्याला शास्त्रीय नृत्याचा भक्कम पाया हवा. तो माधुरीकडे आहे, मात्र दुर्दैवानं आताच्या नट्या चेहर्‍यावर एरवीही साधे हावभाव आणत नाहीत, तर त्यांना नृत्यातील ताल व भाव यांचा मेळ कसा जमणार? आताची नृत्यं ही शारीरिक कवायती जास्त वाटतात. शकिरा, जेनिफर लोपेझ व बियोंसेचे जगभरात चाहते आहेत, पण त्यांची नृत्याची शैलीही आक्रमकतेकडे झुकणारी असून त्यात नजाकततेची कमतरता आहे.

बॉलिवुडची पार्टी संस्कृती व त्यातील दिखावा, यापासून कोसो दूर असणारी माधुरी ‘धक धक करने लगा’ यांसारख्या अनेक बोल्ड गाण्यांवर नाचून सुपरस्टार होते (जे पार्टी करणाऱ्या प्रत्येकीचं स्वप्न असतं!) हेच मोठं आश्चर्य आहे. काम व कुटुंब यातील सीमारेषा तिने काटेकोर पाळली. हे तसं महा कठीण काम आहे. कारण आजकाल साधारण घरातील मुलीही ऑफिसच्या पार्ट्या टाळत नाहीत, त्यामुळे एका सुपरस्टार नटीनं असं करावं हे आठवं आश्चर्यच म्हणावं लागेल.

भारतीय नृत्यासाठी ‘भारतीय संस्कृती’ची जाण असणं आवश्यक आहे, वाचन चांगलं हवं आणि मेहनतीची तयारी हवी. ते सगळं माधुरीमध्ये आहे. आताची हिंदी सिनेमातील नृत्यं (नोरा फतेही, बादशाह, गुरु रंधवाची गाणी आठवा!) ही आत्मा नसलेल्या झोंबीप्रमाणे भासतात… नुसता वाद्यांचा कोलाहल, त्यात शब्द हरवतात, आणि हावभाव व ताल यांना तर जागाच नसते. अभिनय हा नृत्याचा भाग असल्यानं माधुरीच्या अभिनयात नेहमीच सहज, सुंदरता होती. तिचा आवाजदेखील उत्तम आहे. अनेक वेळा ती ‘कम्फर्ट झोन’मध्ये राहिली असं वाटतं. तिच्यात टॅलेंट व मेहनत करण्याची वृत्ती असूनही तिला फारसे आव्हानात्मक सिनेमे मिळाले नाहीत. कदाचित त्या काळी प्रेक्षक व सिनेमावाले दोन्ही त्यासाठी तयार नसावेत. तरीही माधुरीने जे काही केलं ते कौतुकास्पदच आहे.

‘हम आपके है कौन’साठी माधुरीला सलमान खानपेक्षा जास्त मानधन मिळालं आणि ‘राजा’ या सिनेमाचं नाव ‘राणी’ असायला हवं होतं, असे लोक गंमतीनं म्हणायचे… एवढा दबदबा दुसर्‍या कुठल्याही मराठी नटीला मिळाला नाही. ९०च्या दशकात महाराष्ट्रात जाती-पाती कलेला व कलाकाराला चिकटवलेल्या नव्हत्या. त्यामुळे माधुरीचं प्रचंड कौतुक होतं… अजूनही आहे.

हिंदी सिनेमाचं एकंदरीत वातावरण बघता माधुरीने लग्नाचा निर्णय योग्य वेळी घेऊन कामातून तात्पुरती निवृत्ती घेऊन कौटुंबिक जीवनाचा आनंद घेतला. करिअर करणाऱ्या मुलींना समजून घेणारा जोडीदार मिळणं कठीण जातं. त्या बाबतीतही माधुरी भाग्यवान ठरली. २०११नंतर भारतात परतलेल्या माधुरीनं आपल्या कारकि‍र्दीची दुसरी इंनिंग उत्तम रीतीनं सुरू केली आहे. आता युट्यूबवर माधुरीची गाणी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांचे आरोग्याबाबतचे वैज्ञानिकदृष्ट्‍या अत्यंत योग्य असे व्हिडिओसुद्धा तेवढेच लोकप्रिय आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

नृत्याच्या सवयीमुळे मला कधी वजन वाढीची चिंता करावी लागली नाही, मात्र मी फार कमी वेळा स्टेजवर डान्स परफॉर्म केला आहे. मला शक्यतो स्वतःच्या आनंदासाठी डान्स करणं आवडतं.

२०११मध्ये माधुरीला भेटून जमा केलेली तिची सर्व छायाचित्रं एका कार्यक्रमात भेट दिली. त्या वेळी तिच्याशी अगदी दोन मिनिटच बोलणं झालं, मात्र तिला एकदा परत भेटायची इच्छा आहे, आणि तिला बघून शिकले ते नृत्य तिच्यासमोर एकदा तरी सादर करायचं आहे…

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख