अजूनकाही
‘अ बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून गेल्या वर्षी सुरू झालेला ‘फुलपाखरू महोत्सव’ किंवा ‘सिटीझनस बटरफ्लाय सर्व्हे इव्हेंट’ या वर्षी एक सप्टेंबर २०२१ला सुरू झाला. याचं औपचारिक उद्घाटन आज, शनिवार, चार सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी सात वाजता ‘बटरफ्लाय मॅन ऑफ इंडिया’ श्री आयझ्याक किहीमकर यांच्या हस्ते होणार आहे.
भारतात फुलपाखरांच्या पंधराशेपेक्षा अधिक प्रजाती आढळतात. त्यांची सहा कुळांत (Family) विभागणी होते. तर नानाविध रंगांच्या, आकारांच्या या देखण्या फुलपाखरांची गणना या काळात केली जाणार आहे. या महागणनेत गेल्या वर्षीप्रमाणे बीएनएचएस, आयनॅचरॅलिस्ट, इंडिया बायोडायव्हरसिटी पोर्टल, तितली ट्रस्ट, बटरफ्लाय इंडिया, आय फाउंड बटरफ्लाय यांसारख्या पन्नासपेक्षा अधिक संस्था सहभागी होत आहेत. त्याचबरोबर फुलपाखरू अभ्यासक तसेच छायाचित्रकार, फुलपाखरू आणि पर्यावरणप्रेमीही सामील होत आहेत.
..................................................................................................................................................................
...............................................................................................................................................................
गेल्या वर्षी करोनाचं संकट समोर असतानाही मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता. भारतातील २७ राज्यं आणि ५ केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा सर्वांत मोठा फुलपाखरू महोत्सव साजरा झाला. या उपक्रमात पन्नासेक संस्था सामील झाल्या होत्या. निव्वळ एका महिन्यात विविध ठिकाणाहून, दिलेल्या संकेतस्थळांवर सुमारे ३१००० निरीक्षणं अपलोड केली गेली. यामध्ये सर्वांत जास्त संख्या चॉकलेट प्यांझी, कॉमन मॉर्मोन, कॉमन ग्रास यलो, ग्रेट एगफ्लाय आणि कॉमन क्रो या फुलपाखरांची होती. तसंच या महिन्यात ५९ फुलपाखरू तज्ज्ञांची इंग्लिश, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली. मल्याळम, काश्मिरी, लडाखी अशा नऊ भाषांमधून भाषणं आयोजित करण्यात आली होती. त्यात ९००० लोक सहभागी झाले होते. शिवाय वेगवेगळ्या शाळांमधून ७७ कार्यक्रम आयोजित केले गेले. त्याला पाचेक हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही हा महिना फुलपाखरांवरच्या भरगच्च कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यामध्ये फुलपाखरांविषयी माहिती देणारे अनेक ऑनलाईन कार्यक्रम आहेत. याही वर्षी वेगवेगळ्या भाषांतून फुलपाखरू तज्ज्ञांची भाषणे होतील. तसेच फुलपाखरांसाठी अधिवास कसे तयार करावेत, या संबंधीही कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. फुलपाखरांचे जीवनचक्र, छायाचित्रण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत छायाचित्रं पाठवता येतील.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सदस्यांनी आपल्या आसपासच्या आवारातील फुलपाखरांच्या प्रजातींची छायाचित्रं फोटो काढून त्यांची नोंद करायची आणि दिलेल्या विविध संकेतस्थळांपैकी एका स्थळावर ती नोंदवायची आहे. यामध्ये फुलपाखरांची छायाचित्रं अपलोड करताना त्यांची ओळख असणं आवश्यक आहे, असं नाही. त्यासाठी तिथं अनेक तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
जगभर फुलपाखरांना ‘पर्यावरण निर्देशक’ म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच आजच्या हवामान बदलाच्या काळात त्यांचा अभ्यास ही काळाची निकड आहे. अशा या उपक्रमातून देशाच्या विविध भागांतल्या फुलपाखरांच्या निरनिराळ्या प्रजाती, भौगोलिक स्थानानुसार त्यांचा आढळ, त्यांची वसतिस्थानं यांची माहिती मोठ्या प्रमाणात संकलित होते. या निमित्तानं देशभरचे फुलपाखरू-प्रेमी, अभ्यासक एकत्र येतात, जोडले जातात. माहितीची देवाणघेवाण होते. निसर्गासह सर्वांचं मिळून हवंहवंसं वाटणारं एक जाळं तयार होतं… वाढत राहतं.
निसर्गात जैवविविधतेच्या साखळीतला फुलपाखरं हा महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो. पक्षी, सरडे, चतुर, कोळी, म्यांटीस इ.इ. अनेकांचं ते खाद्य आहेत. जीवनचक्र पुरं होण्याचं त्यांचं प्रमाण अंदाजे दोन टक्केच आहे. म्हणजे जन्माला येण्यापूर्वीच ९८ फुलपाखरं कोणाचा तरी घास झालेली असतात. तसंच परागीभवनामध्ये मधमाशांप्रमाणे फुलपाखरंही तितकीच महत्त्वाची आहेत. (बंगालमध्ये तर फुलपाखराला ‘प्रजापती’च म्हणतात!) म्हणून त्यांचं जतन, संवर्धन करण्याचं भान लोकांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. अशा उपक्रमातून सर्व लोकांपर्यंत फुलपाखरांविषयी माहिती पोहोचते, लोकांमध्ये जागरूकता वाढते. फुलपाखरांचे अधिवास जपले जातात. लोक अधिक संख्येनं फुलपाखारांकडे आकृष्ट होतात.
आता तर देशभर निरनिराळ्या शहरी भागातूनही फुलपाखरांची उद्यानं तयार करण्याचे प्रयत्न होताना दिसतायत, ही आशादायी गोष्ट आहे. भारतात आता हा दुसरा ‘बिग बटरफ्लाय मंथ इंडिया’ साजरा होतोय, ही आनंददायी गोष्ट आहे. याची सुरुवात मात्र सर्वांत आधी युनायटेड किंगडममध्ये २०१० साली झाली. गेल्या वर्षी एका वेबिनॉरमध्ये जोएल अष्टोन याचं ‘बटरफ्लाईज कॉन्झरव्हेशन इन युके’ या विषयावर सुंदर भाषण आयोजित करण्यात आलं होतं.
फुलपाखरांच्या विश्वाबद्दल अधिकाधिक जाणून घेताना अशा अनेक संधी अशा उपक्रमातून सहज उपलब्ध होतात.
अधिक माहितीसाठी पहा -
https://indiabiodiversity.org/group/Big_Butterfly_Month_India_2021/show
https://www.ifoundbutterflies.org/big-butterfly-month
..................................................................................................................................................................
लेखिका रेखा शहाणे या कवयित्री व पर्यावरण अभ्यासक आहेत.
rekhashahane@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment