अजूनकाही
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. विजय बाणकर यांचे ‘स्वधर्मविचार’ हे पुस्तक नुकतेच सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करणारे हे प्रास्ताविक...
..................................................................................................................................................................
‘श्रीमद्भगवद्गीता’ व ‘श्रीमद्भागवत’ या दोन्ही धर्मग्रंथांमध्ये स्वधर्माची महती गायिली आहे. ‘उत्तम प्रकारे आचरिलेल्या परधर्माहून गुणरहित असला तरी आपलाच धर्म श्रेष्ठ व कल्याणकारक आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने ‘गीते’त दोन वेळा म्हटले आहे आणि ‘स्वधर्माचरण करताना आलेले मरणही श्रेयस्कर असून परधर्माप्रमाणे वागणे भयावह आहे’, अशी धोक्याची सूचनाही अर्जुनाच्या निमित्ताने त्याने आपल्याला देऊन ठेवली आहे.
‘स्वधर्म’ या शब्दातील ‘स्व’ म्हणजे नेमके कोण किंवा काय? दिवसेंदिवस वर्ण-आश्रम-जात-रहित होत चाललेल्या आपल्या भारतीय सामाजिक परिस्थितीत माझा वर्ण कोणता व माझी जात कोणती म्हणून सांगावयाचे? आपण सांगू त्या आपल्या वर्णानुसार, आश्रमानुसार वा जातिनुसार आपण खरोखरच वागत आहोत काय किंवा आपल्या वर्णाश्रमजातिनुसार वागणे आपल्याला शक्य आहे काय? असल्यास ते कसे? आणि नसेल, तर? यांसारख्या यक्षप्रश्नांमुळे प्रत्येक धार्मिक हिंदूला धर्मच्युतीची भीती वाटत असावी, असे मला वाटते. धर्मग्रंथांमधून सांगितल्याप्रमाणे वर्णविहित, आश्रमोचित व जातिनिष्ठ स्वधर्माचरण करणे शक्य नसेल आणि वर्तमान सामाजिक परिस्थितीत आपल्याकडून अपरिहार्यपणे परधर्माचरण घडणार असेल तर, त्याचे भयावह परिणामही आपल्याला भोगावे लागणार म्हणून मुमुक्षु मानव चिंतित होऊन जातात.
..................................................................................................................................................................
...............................................................................................................................................................
अशा मानवांना चिंतामुक्त होता यावे म्हणून आणि विद्यावाचस्पति (पीएच्.डी.) पदवीप्राप्त्यर्थ झालेले हे एक चिंतन आहे. या चिंतनाची सुरुवात, खरे तर, प्राथमिक शालेय जीवनातच झाली होती. त्या वेळी शाळेत घोकलेली ‘मी कोण’ या शीर्षकाची पुढील प्रश्नोत्तरे आजही आठवत आहेत :
प्रश्न : चाक फिरवितो गरागरा, मडकी करतो भराभरा, सांगा! मी कोण?
उत्तर : कुंभार!
प्रश्न : लाकूड कापतो, लाकूड तासतो, औत, गाडी करून देतो, सांगा! मी कोण?
उत्तर : सुतार!
त्या वेळी म्हणजे १९६२च्या दरम्यान या प्रश्नांच्या उलट अर्थाचे विचार मनात आले होते. ‘कुंभार’ असूनही जो चाकावर गाडगीमडकी वगैरे करत नाही, तो कोण? ब्राह्मण असूनही पौरोहित्यादि व्यवसायांशिवाय इतर व्यवसाय करतात, ते कोण? असे सर्वच जातितल्या लोकांबाबत प्रश्न उपस्थित झाले, थोडा वेळ मनात रेंगाळले आणि मग उत्तर न मिळाल्याने अंत:करणाच्या एका कोपऱ्यात निपचित पडून राहिले.
तत्त्वज्ञान हा विषय घेऊन १९७३-७५ या शैक्षणिक वर्षी पुणे विद्यापीठात एम. ए. करत होतो. अभ्यासक्रमात ‘आधुनिक तात्त्विक विचार’ नावाचा एक विषय (पेपर) होता. त्यासाठीच्या पुस्तकांमध्ये महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांचे विचार वाचावयास मिळाले आणि लहानपणी मला पडलेल्या त्या प्रश्नांनी पुन्हा उचल खाल्ली. या थोर विचारवंतांचे आंतरजातीय विवाहाबाबतचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी वर्णाश्रमव्यवस्थेबाबत व जातिसंस्थेबाबत अधिक सतर्कतेने विचार होत राहिला.
सुतारकी करण्याऐवजी शिकून शिक्षक होऊन चरितार्थ चालवणे हे माझ्याकडून होणारे परधर्माचरण तर नाही ना? वर्णाश्रमव्यवस्था हा सनातन धर्म आहे आणि वर्ण व आश्रम हे हिंदू धर्माचे आधारस्तंभ आहेत, असे गांधीजी म्हणतात. प्रत्यक्षात मात्र वर्णाश्रमव्यवस्था नामशेष झाली आहे. अशाही परिस्थितीत आपल्याला स्वधर्माचरण करणे शक्य आहे काय? आपण स्वधर्मनिष्ठ राहू शकतो काय? जर हो, तर ‘सनातन धर्मा’चे श्रेयस्कर स्वरूप नेमके कसे आहे, स्वधर्माचरण करावयाचे म्हणजे नेमके कसे वागावयाचे? ‘मी चातुर्वर्ण्य गुणकर्मविभागश: निर्मिले आहे’, या श्रीकृष्णाच्या गीतेतील विधानाचा नेमका अर्थ काय व तो कसा लावावयाचा, यासारख्या प्रश्नांचा गुंता उत्तरोत्तर वाढत गेला.
तो गुंता सोडवण्यासाठी झालेली सुरुवात म्हणजे जानेवारी १९९१मध्ये पालघर येथे झालेल्या महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या सातव्या अधिवेशनात मी सादर केलेला ‘स्वधर्म व स्वधर्मसाधनेचे स्वरूप’ हा शोधनिबंध होय. ‘वर्णव्यवस्थेच्या फारशा माहीत नसलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणारा हा निबंध आहे’, असा प्रतिसाद त्या वेळी त्यास लाभला होता. नंतर, पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘परामर्श’ त्रैमासिकातही (नोव्हेंबर १९९१मध्ये) तो प्रसिद्ध झाला.
त्यामुळे प्रेरित होऊन उपरोक्त सर्व प्रश्नांची सोपपत्तिक उत्तरे संतसाहित्यात शोधत राहिलो. महात्मा श्रीबसवेश्वर यांच्या अध्यात्मनिष्ठ सामाजिक कार्य-दर्शनाने आत्मज्ञानप्राप्तीसाठीचा स्वधर्ममार्ग हा ‘वर्ण-आश्रम-जात-लिंग-धर्म-निरपेक्ष’ असल्याचे लक्षात आले आणि, श्रीसद्गुरुवाणीतील सन्मार्गदर्शक सत्याची जणू खात्रीच पटली! श्रीमद्भगवद्गीता-ज्ञानेश्वरी-भागवतादि ग्रंथात आणि (विविध जातीत जन्मलेल्या) संतांना अभिप्रेत असलेल्या स्वधर्माचे व त्यांनी केलेल्या स्वधर्मसाधनेचे स्वरूप सद्गुरू समर्थ यांनी आपल्या ‘जीवनकलेची साधना’ या पुस्तकात अगदी थोडक्यात स्पष्ट करून ठेवले आहे हे लक्षात आले.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
याच दिशेने चिंतन व अभ्यास सुरू ठेवून पुणे विद्यापीठात ‘स्वधर्म : विश्वव्यापी मानवधर्म - एक चिकित्सा’ हा प्रबंध सादर केला. वर्णाश्रमांच्या चौकटीत शक्य होती ती स्वधर्मसाधना वर्ण-आश्रम-जात-रहित झालेल्या वर्तमान सामाजिक परिस्थितीतही व सदासर्वदा शक्य आहे, हा निष्कर्ष प्रतिपादित करणारा हा प्रबंध होता. याबद्दल पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पति (पीएच्.डी.) ही पदवीही १९९८ साली मला मिळाली.
विश्व व विश्ववासी आपण सारे मानव आत्म्यापासून (आत्मरूप देवापासून) उद्भवतो, आत्म्यातच राहतो व आत्म्यातच लय पावतो. अर्थात, आत्मा हेच आपले त्रिकालाबाधित असे मूळ स्वरूप आहे. आपल्या या सत्स्वरूपाचा विसर होणे म्हणजे अज्ञान होय आणि वर्ण, आश्रम, जात, लिंगभेद वगैरे सर्व गोष्टी अज्ञानजन्य ‘भ्रम’ आहेत. म्हणूनच, जीवरूपी ‘स्व’ला आत्मरूप देवापासून जणू दूर घेऊन जाणारे असे अहंकारयुक्त आचरण हे स्वधर्माचरण ठरत नाही; तर, ते परधर्माचरणच ठरते.
आत्मरूपाला विसरून माणसे देहासक्त, विषयासक्त म्हणजे परधर्मरत होऊन जातात. त्यामुळे देहमनचित्तबुद्धिपोषक विविध ज्ञाने (समर्थ श्रीरामदास यांच्या भाषत ‘पोटविद्या’) फोफावतात. परिणामी स्वधर्माला ग्लानी येते. त्या वेळी परमात्मा अवतरतो आणि देहोऽहंमन्यतेने उन्मत्त झालेल्या त्या त्या वेळच्या दुर्जनांचा नायनाट करतो, सज्जनांचे संरक्षण करतो, जीवांना आत्मस्वरूपाची गोडी लावून अध्यात्मविद्या पुनरुज्जीवित करतो. म्हणजे, जीवांना विषयाचरणरूप परधर्मापासून परावृत्त करतो व स्वधर्माची संस्थापना करतो. स्वधर्मसंस्थापनाचे हे कार्य संतही वेळोवेळी जन्म घेऊन करीत असतात.
मी अमुक, मी तमुक, हे माझे अन् हे मला हवे आहे, अशा प्रकारच्या ‘मी-माझे-निष्ठापूर्वक भूमिका जगणारा संकुचित देहधारी मानव यथासांग सोऽहंसाधना (=स्वधर्मसाधना) करून संत श्रीज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे ‘आपणचि चराचर’ म्हणजे ‘विश्वव्यापी मानव’ झाल्याचे अनुभवतो. या अर्थाने त्याचा तो सानुभव स्वधर्म हा विश्वव्यापी मानवधर्म होतो. आपल्या सर्वव्यापक ‘स्व’रूपाचे सदासर्वदा स्मरण राखत व कोणत्याही विशिष्ट भूमिकेचा दुराग्रह न धरता जनीं वंद्य ते इष्ट कर्तव्याचरण निष्काम भावनेने करत राहणे म्हणजे सर्वोत्तम स्वधर्माचे पालन करणे होय. ‘सकळ धर्मांमध्यें धर्म । स्वरूपीं राहणे हा स्वधर्म । ...’ या ‘दासबोधा’तील ओवीतून समर्थ श्रीरामदासांनी त्याबाबत कल्पना देऊन ठेवली आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
हा ‘स्वधर्म : विश्वव्यापी मानवधर्म - एक चिकित्सा’ या प्रबंधातील विचार संपादिका ऐश्वर्या कुमठेकर म्हणतात त्याप्रमाणे ‘सहजसोप्या शैलीत’ मांडण्याचा एक प्रयत्न म्हणजे ‘सकाळ प्रकाशन, पुणे -२’ यांनी नुकतेच प्रकाशित केलेले ‘स्वधर्मविचार’ हे पुस्तक होय. अनुक्रमणिकेतील १) धर्म व वर्णाश्रमोचित स्वधर्म, २) परधर्माचे स्वरूप, ३) जातिनिष्ठ स्वधर्माचे स्वरूप, ४) पुरुषार्थप्रणाली व स्वधर्माचरण, ५) वर्णकल्पनेचा अध्यात्मशास्त्रीय अर्थ, ६) स्वधर्म : विश्वव्यापी मानवधर्म आणि ७) सोऽहंसाधना हीच स्वधर्मसाधना या प्रकरण-शीर्षकांवरून पुस्तकाच्या आशयाची कल्पना यावी. मूळ प्रबंधातील काही भाग वगळून तर काही ठिकाणी नवमांडणी करत आशयात थोडीफार भर घातली आहे. अर्थात, प्रत्येक प्रकरण स्वयंपूर्ण व्हावे या दृष्टीने लिहिण्याचा प्रयत्न झाला असल्यामुळे प्रत्येक प्रकरण हे त्या त्या विषयावरील पुरेशी व स्वधर्माचे आचरण करावयास सन्मार्गदर्शक ठरेल अशी माहिती देणारे लिखाण झाले आहे, असे मला वाटते.
‘स्वधर्मविचार’ – डॉ. विजय बाणकर,
सकाळ प्रकाशन, पुणे,
मूल्य – २४० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment