ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के यांची ‘कलानगरीतील वळणवाटा’ आणि ‘किमयागार कलाकार’ ही दोन पुस्तके नुकतीच डिंपल पब्लिकेशनच्या वतीने प्रकाशित झाली आहेत. ‘कलानगरीतील वळणवाटा’मध्ये समीर पाटील, प्रेमानंद गज्वी, मंगेश देसाई, अजित केळकर, अजित भुरे, रीमा, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, डॉ. गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी, कुमार सोहोनी या ११ मराठी कलाकारांविषयीचे लेख आहेत. तर ‘किमयागार कलाकार’मध्ये शबाना आजमी, यशपाल शर्मा, ओम पुरी, सौरश शुक्ला, इरफान खान, राजेंद्र गुप्ता, राजकुमार राव, पंकज कपूर, हिमानी शिवपुरी, सीमा बिश्वास, अरुंधती नाग या अकरा अ-मराठी कलावंतांविषयीचे लेख आहेत. या दोन्ही पुस्तकांना प्रा. सोनटक्के यांनी एकच प्रस्तावना लिहिली आहे, मात्र ‘किमयागार कलाकार’मध्ये अगदी शेवटी पाच परिच्छेद जास्तीचे लिहिले आहेत (या लेखात ते इटॅलिक व लेफ्ट अलाईनमेंटमध्ये दाखवले आहेत). त्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
..................................................................................................................................................................
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्य-अभिनयाचं प्रशिक्षण देताना दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाप्रमाणेच ‘अॅक्टर्स ऑन अॅक्टिंग’ हा विषय आम्ही ठेवला होता. मात्र यात दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाप्रमाणेच लॉरेन्स ऑलिव्हिए, व्हिव्हियन ली, रिचर्ड बर्टन, एलिझाबेथ टेलर, पीटर ओ’टुल, पॉल स्कोफिल्ड या पाश्चात्य नटांसोबतच मी पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, बलराज सहानी, शंभू मित्रा, तृप्ती मित्रा, उत्पल दत्त, नानासाहेब फाटक या भारतीय अभिनेत्यांचाही समावेश केला होता. अर्थात, या अभिनेत्यांवरील साहित्य आणि सामग्री ही उपलब्ध साधनांमधूनच आम्हाला तयार करावी लागली. पण या उपक्रमामुळे स्टॅनिस्लावास्की शैलीबरोबरच अभिनयाच्या भारतीय वास्तववादी आणि किंचित अतिरंजित शैलीचं दर्शन आणि ओळखही विद्यार्थ्यांना करून देता आली.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
एवढी वर्षे उलटून गेल्यानंतरसुद्धा दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात किंवा भारतातील १८ ते २० विद्यापीठांमधील नाट्यशास्त्र विभागात शिकवण्यासाठी, अभिनेत्यांवरील नाव घेण्याजोगं पुस्तक माझ्या पाहण्यात आलेलं नाही. प्रस्तृत पुस्तकाद्वारे ही पोकळी भरून काढण्याचा माझा जराही विचार नाही. जे कलावंत माझ्या सहवासात आले, त्यांच्या कामाचा हा धावता आढावा रसिक वाचकांपर्यंत पोहोचवणं हाच माझा उद्देश आहे.
२०१७च्या सुमारास ‘न्यूटन’ या वेगळ्याच नावाचा चित्रपट बघण्याचा योग आला. हा चित्रपट तसा प्रायोगिक धाटणीचा होता. भारतीय लोकशाहीत निवडणुका या अगदी गाव-पाड्यांपर्यंत आणि नक्षलग्रस्त भागापर्यंत कशा घेतल्या जातात, त्यात काय काय अडचणी आणि मजेशीर प्रसंग उद्भवतात, यावर केलेलं हे अतिशय मिश्किल, उपरोधिक आणि रंजक भाष्य होतं. एक करारी तरुण शासकीय अधिकारी आपल्या जिवाची बाजी लावून नक्षलग्रस्त तांड्यांवरील एका दुर्गम केंद्रावर निवडणूक घेण्यासाठी आपल्या तीन साथीदारांसह अनेक अडचणींवर मात करून कसाबसा पोचतो आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतो हे वस्तुनिष्ठ पद्धतीनं दाखवलं आहे. या चार शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी सेनादलाची एक विशेष संरक्षक तुकडीही त्यांच्याबरोबर तिथे पोहोचते.
अनेक हाल-अपेष्टा आणि विचित्र परिस्थितीचा सामना करत ही निवडणूक कशी घेतली जाते, याचं वरकरणी थोडंसं मजेशीर वाटणारं, पण अंतत: गंभीर आणि परिणामकारक चित्रण या चित्रपटात केलेलं आहे. यात राजकुमार राव या युवा अभिनेत्याचा अभिनय हा खूपच वास्तवदर्शी आणि प्रभावी झाला होता. या चित्रपटात दिल्लीच्या आमच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील माझे दोन मित्रही काम करत असल्यामुळे मला या चित्रपटाविषयी अधिक आस्था होती. पुढे या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी नामांकन झालं, काही पुरस्कार मिळाले, खूप कौतुकही झालं. जमेची बाब म्हणजे राजकुमार राव हा सर्वसाधारण दिसणारा, परंतु अतिशय प्रभावी अभिनेता मला मनापासून भावला.
मी राजकुमार रावची थोडीशी माहिती काढून त्याच्यावर एक छोटेखानी लेख तयार केला आणि आमचे मित्र राम जगताप यांच्याकडे पाठवला. त्यांना तो खूपच रोचक वाटला. त्यांनी मला सुचवलं की, शक्य असेल तर अशा काही हिंदी कलावंतांची ओळख मी मराठी भाषेत करून दिली, तर त्यांना ते त्यांच्या ‘अक्षरनामा’तर्फे छापायला आवडेल. मी माझ्या परिचयातल्या हिंदी कलावंतांपासून सुरुवात करून यात ओम पुरी, पंकज कपूर, यशपाल शर्मा, शबाना आजमी, इरफान खान यांच्यापासून सुरुवात केली. या हिंदी कलावंतांबरोबरच माझ्यासोबत काम केलेल्या आणि हिंदी, मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रात वेगवेगळ्या वाटा चोखाळत वेगळं काही करू पाहणाऱ्या पुढील पिढीच्या अजित भुरे, अजित केळकर, डॉ. गिरीश ओक, प्रेमानंद गज्वी, मंगेश देसाई यांच्याशीही प्रत्यक्ष गप्पा मारून काही लहान-मोठे लेख लिहिले. यातील काही ‘अक्षरनामा’मध्ये छापून आल्यावर माझाही आणखी काही लेख लिहिण्याचा हुरूप वाढला.
या लेखांसाठी मी जाणीवपूर्वक किंवा विचार करून कलावंतांची निवड केली नाही. यात ज्यांचा माझा प्रत्यक्ष संबंध आला, अशा हिंदीतील कलावंतांची निवड मी अग्रक्रमाने केली. मात्र हे करताना त्यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करून किंवा त्यांच्या मुलाखती घेऊन मी या लेखांची बांधणी केली नाही. केवळ तेच केलं असतं, तर कदाचित मला अपेक्षित असलेल्या कलाविषयक गंभीर प्रश्नांसंबंधी त्यांचे विचार वाचकांसमोर आले असते. परंतु त्यांची समग्र वाटचाल, त्यांना आलेले बरे-वाईट अनुभव, त्यातून कदाचित व्यक्त झाले नसते, म्हणून मी माझा प्रत्यक्ष त्यांच्याशी असलेला ऋणानुबंध, त्यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चा, त्यांचं बघितलेलं काम, त्यांचं केलेलं आस्वादन आणि त्यांच्यावर आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून प्रसारित झालेल्या माहितीच्या आधारे मी या लेखांची बांधणी केली. हेतू हा होता की, कलावंतांच्या प्रत्यक्ष मुलाखतींमधून, त्यांच्या वार्तालापांमधून, त्यांच्यावर लिहिलेल्या अधिकृत लेखांमधून व्यक्त झालेल्या प्रत्यक्ष माहितीचे अधिकृत, उद्बोधक, रंजक, विचारप्रवर्तक सार मला माझ्या लेखात मांडायला मिळाले.
मराठी कलावंतांबाबत मात्र मी थोडासा अधिक चौकस होतो. माझ्या आत्मीय वर्तुळातील नवं काही करून बघणाऱ्या, नवीन वाटा शोधणाऱ्या तरुण कलावंतांची निवड करण्यावर माझा अधिक भर होता. प्रथितयश कलावंतांपेक्षा या नव्या पिढीतील कलावंतांबद्दल असलेलं माझं व्यक्तिगत कुतूहल, त्यांनी कलाक्षेत्रात येण्यासाठी केलेली धडपड, तसंच कलाक्षेत्रात आल्यानंतर स्वतःला स्थिर करण्यासाठी घेतलेले बरे-वाईट निर्णय, त्यात आलेल्या अडचणी, त्यांना भेटलेले हितचिंतक, कामासाठी त्यांच्या सोबत आलेले समविचारी सहकारी यांचा वेध घ्यायचा होता. या बरोबरच त्यांना आपल्या निवडीच्या क्षेत्रात मिळालेलं समाधान आणि यशापयश असा क्रम मला वाचकांसमोर मांडायचा होता.
तसं बघितलं तर कलाक्षेत्रातील यशापयश ही खूपच सापेक्ष संकल्पना आहेत. त्याचा कुठल्या तरी पूर्व निर्धारित वास्तवाशी तुलनात्मक संबंध असतो.
शिवाय यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या मानण्यावर अवलंबून असतं. कला क्षेत्रातलं यश हे त्या मानानं खूपच क्षणिक आणि क्षणभंगुर असतं. तुमचं एक नाटक यशस्वी होऊ शकतं, एखादा चित्रपट यशस्वी होऊ शकतो, एखादी भूमिका यशस्वी होऊ शकते. परंतु म्हणून ते यश सतत टिकून राहील, अशातला भाग नसतो. कारण तुमची पुढील कामं बदलत असतात, पुढील प्रकल्प बदलत असतात, परिस्थिती बदलत असते, येणारी आव्हानं बदलत असतात, तुम्ही हाती घेतलेल्या जबाबदाऱ्या बदलत असतात. तुमच्यासोबत काम करणारे लोक बदलत असतात, विषय-आशय बदलत असतात आणि त्यामुळे यशापयशाच्या शक्यताही बदलत असतात.
दुसरं म्हणजे सामान्य परिस्थितीतून आलेल्या या माझ्या मित्रांनी स्वतःच्या कठोर परिश्रमानं, यशापयशाची पर्वा न करता, विपरीत परिस्थितीवर मात करत कलाक्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निमार्ण केलं. त्यांच्याविषयीची रसिकांच्या मनातील उत्सुकता, त्यांच्याविषयीचं कुतूहल या लेखांमुळे थोडं तरी शमेल अशी अपेक्षा आहे.
या पुस्तकाचा उद्देश अगदी सरळ साधा आहे, ज्या कलावंतांवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि आजही करत आहेत, त्या कलावंतांनी कलाक्षेत्रासारख्या अनवट, अनिश्चित, थोड्याशा बेभरवशाच्या, वेगळ्या वाटेचा विचार आणि स्वीकार का आणि कशासाठी केला, यात त्यांच्या अंतर्गत ओढीचा, जिद्दीचा, ऊर्जेचा किती वाटा होता, त्यांच्या पालकांचा त्यांना कुठल्या प्रकारचा आधार होता किंवा विरोध होता, हेही युवा वाचकांच्या आणि आपल्या मुलांना जिवापाड जपणाऱ्या पालक वर्गाच्या दृष्टीनं कळणं मला अगत्याचं वाटलं. यातील बहुतेक कलावंतांनी कलाक्षेत्रात कुठलीही शाश्वती नसताना, इथं कुणाचाही आधार तर सोडा, साधी जुजबी ओळखही नसताना ही झेप घेतली. ही झेप केवळ अंतर्गत आवडीपोटी, कलेच्या ओढीपोटी, वेड्या साहसापोटी होती की, त्याच्यासाठी त्यांचं स्वतःचं असं निश्चित काही धोरण होतं, हेही कळणं महत्त्वाचं होतं.
या कलावंतांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी काय काय करावं लागलं, कुठल्या गोष्टींची तयारी करावी लागली, त्यांनी काही प्रशिक्षण घेतलं का, प्रत्यक्ष कुणाच्या हाताखाली कार्यानुभव घेतला का? त्यांना कुणी प्रत्यक्ष मदत केली, नेमक्या कुठल्या अडचणी त्यांना आल्या, त्या अडचणींच्या काळात त्यांनी नेमका कुणाचा आदर्श समोर ठेवला हे कळणंही महत्त्वाचं होतं. त्यांच्या कुठल्या अंगभूत गुणांचा त्या काळात त्यांना लाभ झाला. त्यांच्या धडपडण्याच्या, कष्टानं जगण्याच्या काळात त्यांना पराभूत झाल्याचा, चुकीच्या मार्गावर आल्याचा पश्चात्ताप कधी झाला का? हे सारं सोडून पुन्हा परत फिरावं, आपल्या पारंपरिक पद्धतीने जगून जीवन निर्वाह करावा, अशी पराभुताची भावना कधी त्यांच्या मनात आली का? आपल्या अडीअडचणींच्या काळात, आपल्यावर आलेल्या कटू प्रसंगात, दैनंदिन जगण्याच्या आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडल्यानंतर त्यांना आपल्या आईवडिलांची, आपल्या परिवाराची मदत घ्यावी असं कधी वाटलं का?
या आणि अशा कितीतरी गोष्टींची उत्तरं प्रत्यक्ष ओघात त्या कलावंतांकडून उत्स्फूर्तपणे येणं मला अपेक्षित होतं. मी जाणूनबुजून कुणालाही कुठले प्रश्न विचारले नाहीत. विचारले असते तर कदाचित त्या संवादाला कृत्रिमतेचा दर्प आला असता.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
बऱ्याच अंशी बहुतेक कलावंतांनी आपल्या या शोधाच्या प्रक्रियेतील अस्थिरतेच्या काळातील जीवघेण्या घालमेलीचा मनापासून कसा स्वीकार केला आणि त्यातून कसा मार्ग काढला, हे मनमोकळेपणाने सांगितलं. यात कुणीही खोट्या प्रतिष्ठेला किंवा जगण्याच्या बडेजावाला आड येऊ दिलं नाही. एक मात्र खरं, काही कलावंतांना योग्य संधी मिळाल्यामुळे, योग्य निर्माते-दिग्दर्शक, सहकलाकार मिळाल्यामुळे, त्यांचं कलाजीवन हे तसं सुकर आणि सोयीस्कर झालं. काही कलावंतांची निवड चुकीची ठरल्यामुळे ते आपल्या उद्दिष्टापासून अधिक दूर ठेवले गेले, तर काही जाणीवपूर्वक अधिक दूर फेकले गेले. पुन्हा योग्य मार्गावर येण्यासाठी त्यांना सुरुवातीच्या सोप्या अमिषांचा कसा त्रास झाला, हेही कळणं आवश्यक होतं.
कुठल्याही क्षेत्रात आपल्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला नेहमी जागरूक ठेवावं लागतं. सभोवतालच्या जगात आणि आपल्या क्षेत्रात कुठं काय लक्षणीय घडतंय, याची सदोदित जागरूकपणे जाणकारी ठेवावी लागते. आपला व्यासंग, अभ्यास आणि निरीक्षण सदोदित वाढवावं लागतं. मिळेल तो अनुभव घेण्याची तयारी ठेवावी लागते. आपल्या क्षेत्रात घडणारे नवे प्रयोग, नवीन अनुभव यांना सामोरं जावं लागतं. आपल्या क्षेत्रात जे जे म्हणून उत्तम आहे, उच्च श्रेणीचे आहे ते समजण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. या काळात तुमचा व्यासंग जर योग्य दिशेनं वाढवला गेला तर योग्य आणि चांगल्या संधी आणि त्या पाठोपाठ यश तुमच्याकडे स्वतःहून चालत येतं. अशा अनुभवाच्या गोष्टीही समोर येणं आवश्यक होतं.
सामान्यपणे प्रेक्षकांना कलावंतांचं यशस्वी झालेलं नाटक, यशस्वी झालेला चित्रपट, त्यात त्या कलावंतानं सादर केलेली उत्तम भूमिका, किंवा लेखकानं लिहिलेले उत्तम नाटक, केलेलं दिग्दर्शन हेच फक्त दिसत असतं. नाटकाचे होणारे प्रयोग, अनेक आठवडे चालणारा चित्रपट दिसत असतो. मिळणारी प्रसिद्धी दिसत असते. कलावंतांच्या गाड्या, दूरचित्रवाणीवरील मुलाखती दिसत असतात. या रचनात्मक बातम्यांबरोबरच काही कलावंतांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनातील खऱ्या-खोट्या वावड्याही भडकपणे प्रसिद्ध होत असतात. काही आंबटशौकीन त्या मिटक्या मारत ऐकत असतात, बघत असतात आणि त्यांना मीठमसाला लावून विघ्नसंतोषी वृत्तीनं अकारण पसरवत असतात. अशा भडक चहाड्यांचा बाजार वाढवत असतात. यातून त्या कलावंतांची आणि कलाक्षेत्रातील सदाचारी लोकांचीही अकारण बदनामी होत असते.
‘नटसम्राट’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मत्स्यगंधा’सारखी नाटकं वर्षानुवर्षे प्रत्यक्ष प्रयोगाची वाट बघत थांबून होती. मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणारं मालवणी नाटक ‘वस्त्रहरण’ हे नाटक ५ प्रयोगानंतर मच्छिंद्र कांबळींनी बंद करण्याचं ठरवलं होतं. पण रवींद्र नाट्य मंदिरातील प्रयोग बघून दामू केंकरे, माधव वाटवे, माधव मनोहर आणि मी अक्षरशः वेड्यासारखे हसत सुटलो. पुढे या सदाबहार नाटकाचा भाग्योदय झाला आणि पुढे या नाटकाने तीन पिढ्यांच्या कलावंतांबरोबर जागतिक विक्रम घडवून आणला. दूरदर्शनवरील ‘नाट्यावलोकन’ या कार्यक्रमानंतर अनेक दर्जेदार नाटकांचं भविष्य उजळून निघालं याचा मी प्रत्यक्ष सहभागी साक्षीदार आहे.
या पुस्तकासाठी निवडलेल्या बऱ्याच कलावंतांची आणि त्यांच्या काही साहसी कलाकृतींची गुणवत्ता खूपच वरच्या दर्जाची आहे. यातील बहुतांश कलावंतांची काळाच्या पुढचं, इतरांपेक्षा वेगळं देण्याची प्रामाणिक ऊर्मी होती. यशापयशाची पर्वा न करता ते जीव ओतून काही नवं, काही वेगळं, काही अर्थपूर्ण करण्यासाठी झटत होते. पदरमोड करून वेळप्रसंगी कर्ज काढून नवे प्रयोग करू बघत होते.
त्यांच्या प्रयोगांच्या यशापयशापेक्षा मला त्यांच्या जिद्दीचं, त्यांच्या चिकाटीचं मोल अधिक वाटतं. त्यांची ही चिकाटी, ही जिद्द आणि त्यांची त्याबद्दल व्यक्त केलेली प्रामाणिक कारणमीमांसा रसिक वाचकांसाठी आणि भावी युवा कलावंतांसाठीही प्रेरक ठरेल, असा मला विश्वास वाटतो.
कलावंत असो किंवा दिग्दर्शक असो, त्याचा प्रत्येक प्रयोग हा नवीनच असतो. प्रत्येक प्रयोगाला पहिल्यासारखीच दाद मिळेल, प्रतिसाद मिळेल अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. यशाचं कुठलंही गमक, कुठलंही निश्चित सूत्र असू शकत नाही. त्याचप्रमाणे अपयशाचंही नेमकं कारण कोणाला कळत नाही. काम करता करताच लोक सुबुद्ध, समृद्ध आणि शहाणे होत असतात. या निवडलेल्या कलावंतांचा हा शोधाचा, समृद्धीकडे चाललेला प्रवास जोखला जाणं, त्या प्रवासातले चढ-उतार शोधले जाणं, हे माझ्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचं आणि मोलाचं आहे, उद्बोधक आहे.
या कलावंतांच्या कार्याचा आणि त्यांच्या वाटचालीचा आढावा घेताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की, यातले कुठलेही कलावंत आपल्या यशानं कधीच हुरळून गेले नाहीत. त्यांनी अपयशाला जसं धैर्यानं पचवलं, तसंच यशालाही ते खूप संयमानं सामोरे गेले. त्यांच्या या संयमानंच त्यांचा भविष्यकाळ, भावी काळातील त्यांचं काम अधिक सुकर केलं. दीर्घकालीन केलं. या कलावंतांबरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांना, तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिक वर्गालासुद्धा ते दिलासा देणारं, आनंद देणारं सिद्ध झालं, असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल.
या संग्रहात निवडलेल्या बहुतेक कलावंतांनी कलाक्षेत्रात आपलं स्थान आपल्या कामामुळे निर्माण केलं. मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि आपला पुढचा मार्ग प्रशस्त केला.
निवडलेल्या कलावंतांची आणि त्यांच्या प्रत्यक्ष कामाची ही प्राथमिक ओळख अधिक तपशिलात जाऊन करण्याचा हा प्रयास आहे. या प्रयासात कलाविषयक गंभीर प्रश्न जाणीवपूर्वक विचारले नाहीत, किंवा या कलावंतांची बांधिलकी ही केवळ कलेशी आहे किंवा सामाजिक तत्त्वांशी आहे, किंवा कुठल्या चळवळीशी आहे, या बाबतीतही मी त्यांची मतं जाणून घेतली नाहीत किंवा त्यांच्याकडे तसा आग्रहही धरला नाही. नाटक आणि चित्रपटाच्या वेगवेगळ्या, जसं- कलात्मक, समांतर, व्यावसायिक, धंदेवाईक, गल्लाभरू या आणि अशा अनाठायी प्रश्नांच्या जंजाळात मी वेळ खर्च केला नाही.
प्रस्तृत पुस्तकाद्वारे या कलावंतांची आणि त्यांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख झाल्यानंतर या कलावंतांच्या कामासंदर्भात किंवा कलाविषयक जाणिवांच्या संदर्भात रसिकांना काही प्रश्न विचारावेसे वाटले, तर ते कदाचित पुढच्या एखाद्या पुस्तकात वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडून अधिक तपशिलात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा भविष्यात केला जाऊ शकतो.
‘किमयागार कलाकार’ या हिंदी चित्रसृष्टीतील कलावंतांच्या पुस्तकाबद्दल एक बाब नमूद करायला हवी. भारतीय रसिक प्रेक्षकांना त्यांचा परिचय खूपच हवाहवासा वाटत असला, प्रशंसनीय वाटत असला, तरी त्यातील प्रत्येक कलावंताची सुरुवात ही कुठेतरी चाचपडत, धडपडतच झालेली आहे. यातील बहुतेक कलावंत हे मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय परिवारातून आलेले आहेत. यातील अधिकतर कलावंत हे ग्रामीण भागातून किंवा कलादृष्ट्या अप्रगत भागातून आलेले आहेत हे विशेष. त्यांच्यापैकी कोणाच्याही घरात तसं कलात्मक वातावरण किंवा कुठली पूर्व परंपरा असल्याचं दिसत नाही. कुठल्यातरी आंतरिक वेडानं झपाटून हे लोक अभिनयाच्या क्षेत्राकडे ओढले गेले होते, असं दिसून येतं.
यातील बहुतेक कलावंतांनी मराठी रंगभूमीवरील कलावंतांपेक्षा अधिक हाल-अपेष्टा भोगल्या आहेत, हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मराठी कलावंत हा एखाद्या शहरात किंवा महानगरातसुद्धा आपलं जीवन कलेच्या आधाराने कसंतरी जगू शकतो. परंतु हिंदी भागातील कलावंतांना त्यांच्या शहरात किंवा त्यांच्या राज्यात असा कुठलाही कलात्मक आधार किंवा व्यासपीठ दुर्दैवानं मिळालं नाही, ते आजसुद्धा मिळत नाही, हे वास्तव आहे.
एका गोष्टीचा मात्र आवर्जून उल्लेख करायला हवा. यातील बहुतेक कलावंतांनी अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी नाट्य प्रशिक्षणाचा रीतसर आणि प्रखर मार्ग चोखाळला. यात राष्ट्रीय नाट्य विद्यालय हा आज राजमार्ग सिद्ध झाला आहे. पण त्याबरोबरच दिल्लीचं श्रीराम सेंटर, पुण्याचं फिल्म इन्स्टिट्यूट आणि इप्टासारख्या संस्थांचाही यात फार मोठा वाटा आहे. शबाना आजमी या इप्टाच्या कम्युनमधे वाढल्या आणि त्यांचा कलात्मक पिंड वैचारिकदृष्ट्या इप्टामध्येच पोसला गेला. नंतर त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटचा अभिनयाचा रीतसर अभ्यासक्रम पूर्ण केला.
राजकुमार राव यांनी दिल्लीच्या श्रीराम सेंटरमधून दोन वर्षांचा मेथड अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मेथड अॅक्टिंगनं भारावून या नटानं एका नाटकात एका भिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी डोक्यावरील केस सफाचट करून अक्षरशः दहा दिवस सडकेवर भीक मागून काढले. नंतर त्यानं पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षांचा अभिनयाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला हे विशेष.
हिंदी चित्रपटसृष्टी ही प्रतिष्ठेची मानली जात असली तरी तिथं चढाओढ ही फार जिकिरीची, अटीतटीची आणि जीवघेणी असते. तिथं आपलं नाणं सिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. वर्षानुवर्ष प्रतीक्षा करावी लागते. मात्र एकदा तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध केलं, की मग केवळ भारतीय चित्रपटसृष्टीच नाही तर जागतिक चित्रपट सृष्टीसुद्धा तुम्हाला आदरानं आपली कवाडं खुली करत असते. या संग्रहातील चार ते सहा कलावंतांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा नवनवे कीर्तीमान उभारले आहेत, हे विशेष.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
हे लेख लिहून पूर्ण होत असताना ते छापले जावेत अशी माझ्यावर नैतिक जबाबदारी होती. कुठलाही विचार न करता हे मराठी कलावंतांसंबंधींचे लेख ११ झाले आणि हिंदी कलावंतांवरील लेखही ११ झाले. हा जाणूनबुजून घेतलेला निर्णय नव्हता. हा केवळ एक योगायोग होता.
‘कलानगरीतील वळणवाटा’ - प्रा. कमलाकर सोनटक्के,
डिंपल पब्लिकेशन, मुंबई,
मूल्य – ४०० रुपये.
..............................................................................................
‘किमयागार कलाकार’ - प्रा. कमलाकर सोनटक्के,
डिंपल पब्लिकेशन, मुंबई,
मूल्य – ४०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment