ध्यानीमनी नसताना अचानक नवं, आगळंवेगळं असं जर काही गवसलं, दृष्टीस पडलं, ऐकू आलं, तर त्या वेळी मनाची जी अवस्था होते, त्याला इंग्रजीत ‘सेरेंडीपिटी’ असं म्हणतात!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 02 September 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध सायाटिका sciatica ह्युमरस Humerus सेरेंडीपिटी serendipity सिलोन Ceylon झेलिग Zelig

शब्दांचे वेध : पुष्प चव्वेचाळिसावे

आजचे शब्द : सायाटिका, ह्युमरस, सेरेंडीपिटी, सिलोन आणि झेलिग

गेले तीन-चार आठवडे ‘सायाटिका’च्या दुखण्यामुळे प्रचंड बेजार झालो होतो. खूप वेळ बैठक मारून लिहिता येत नव्हते. त्यामुळे या सदरात नवी भर घालू शकलो नाही. पण हा वेळ मी भरपूर वाचन करण्यात घालवला. सगळ्यात आधी मी डिक्शनरी उघडून ‘सायाटिका’ या शब्दाचं मूळ शोधलं.

‘सायाटिका’ (sciatica) हे ‘सायाटिक नर्व्ह’चं म्हणजेच शिरेचं किंवा मज्जातंतूचं दुखणं आहे. ही शीर कंबरेतून पायाच्या मागच्या भागानं टाचेपर्यंत जाते. ती अचानक का दुखू लागते, याचं कारण शोधणं आणि त्यावर उपचार करणं, हे वैद्यकीय तज्ज्ञांचं काम आहे. आपण फक्त या शब्दाच्या व्युत्पत्तीवर नजर टाकू या. इंग्रजीत हा शब्द चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात वापरात आला. मध्यकालीन लॅटिन भाषेतल्या ‘sciatica passio’ म्हणजे ‘सायाटिक आजार’ यापासून तो तयार झाला. लॅटिन भाषेतल्या ischiadicus (म्हणजे कुल्ल्यांमधली वेदना) याचं हे भ्रष्ट रूप आहे. मुळात ग्रीकमधून तो लॅटिनमध्ये गेला. ग्रीक भाषेत iskhion म्हणजे hip joint. त्यापासून बनला iskhias. त्याचा पुढे झाला iskhiadikos आणि तिथून निघाला ischiadicus. त्याचा शेवटी झाला sciatica. असा हा रूपपरिवर्तनाचा प्रवास आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘ह्युमरस’ (Humerus) या शब्दाबद्दल असलेल्या कुतुहलामुळे मी या वेळी त्याचीही माहिती काढली. ‘Humorous’ (विनोदी) या शब्दाशी त्याचं उच्चारसाधर्म्य आहे. आपल्या शरीरात Humerus नावाचं एक हाड असतं. दोन्ही हातांच्या खांद्यांपासून कोपरापर्यंत जाणाऱ्या हाडाला ही संज्ञा देण्यात आली आहे. लॅटिन भाषेत humerus किंवा umerus म्हणजे खांदा. टॉमस ब्लाउंट (Thomas Blount) या शब्दकोशकाराच्या ‘Glossographia’ या १६५६ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात या विशेषणाचा अर्थ ‘That hath great shoulders’ (भव्य खांदे असलेला) असा दिला आहे. १७०६ नंतर त्याला आजचा अर्थ प्राप्त झाला. भाषाशास्त्रज्ञांनी त्याचं मूळ प्रोटो इंडो युरोपियन या (अती प्राचीन) रचित भाषेतल्या *om(e)so – ‘खांदा’ या धातूमध्ये शोधलं आहे.

कोणताही शब्दकोश वाचण्यात किंवा नुसता चाळण्यातही एक वेगळीच मौज असते. आपल्याला हवा असलेला एखादा शब्द बघण्याकरता आपण शब्दकोशाची पानं उलटत असतो, आणि अचानक आपले डोळे भलत्याच एखाद्या शब्दावर स्थिरावतात. आपल्याला माहीत नसलेला, असा एखादा शब्द असू शकतो, याची सुतराम कल्पनाही नसताना, एखादा वेगळाच शब्द आपल्याला आकर्षित करतो. त्या वेळी नवीन काही तरी ‘डिस्कव्हर’ केल्याचं समाधान वा आनंद आपल्याला मिळतो. ध्यानीमनी नसताना अचानक नवं, आगळंवेगळं (आणि बहुतेक वेळी उत्तम, सुंदर, चित्ताकर्षक) असं जर काही गवसलं, दृष्टीस पडलं, ऐकू आलं, तर त्या वेळी मनाची जी अवस्था होते, तो जो एक उल्हसित वाटण्याचा क्षण असतो, त्याला इंग्रजीत ‘सेरेंडीपिटी’ (serendipity) असं म्हणतात.

म्हणजे असं पहा- तुम्ही एखाद्या ओळखीच्या, नेहमीच्या पाहण्यातल्या वाटेवरून चालला आहात. ती वाट एखाद्या जंगलातली, झाडीतली पायवाटसुद्धा असू शकते. सारा परिसर तुमच्या परिचयाचा आहे. नित्य पाहण्यातला आहे. पण विचारांच्या तंद्रीत बुडून गेल्यानं तुमचं लक्ष भलतीचकडे आहे. आणि अशा वेळी तुम्ही रस्ता चुकता. सरळ जायच्या ऐवजी तुम्ही त्या वाटेला फुटलेल्या एखाद्या छोट्या, अनोळखी गल्लीत शिरता. किंवा असंही होऊ शकतं की, तुम्ही एखाद्या अजिबातच न पाहिलेल्या रस्त्यानं चालला आहात. समोर काय आहे, ही वाट कुठे जाते आहे, हे तुम्हाला माहीतच नाही. काही तरी परिचित खुणा दिसतील या आशेनं तुम्ही जात आहात.

आणि अशा वेळी अचानक समोरचं दृश्य बदलतं. तुम्ही कधी न पाहिलेला, ज्याची तुम्हाला माहिती अथवा कल्पनाही नव्हती, असा एखादा नितांत सुंदर नजारा तुमच्या समोर उभा ठाकतो. एखादा धबधबा, विलक्षण सुवासाची फुलं असलेलं एखादं पठार, एखादी धुक्यानं भरलेली दरी, कधी कोणी न पाहिलेला सनसेट पॉइंट, काही पण. अशा वेळी तुम्ही नकळत थांबता, त्या अद्भुत दृश्यानं चकित होता, त्याचा आनंद घेता. हे असं काही, इतकं सुरेख असं निसर्गसौंदर्य या इथं असेल हे तुम्हीच काय, पण इतर कोणालाही आजवर ठाऊक नसू शकतं. ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा’ असं म्हणता म्हणता एक दिवस ती वाट खरंच तुम्हाला तिथे घेऊन गेली, तर? तर त्या वेळी तुम्हाला तो जो एक विलक्षण काही तरी अनुभवल्याचा, नवीन काही पाहिल्याचा जो क्षण अनुभवायला मिळतो, त्याला ‘सेरेंडीपिटी’ म्हणतात. Serendipitous हे त्यापासून निघालेलं विशेषण.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

असे सेरेंडीपिटस शोध लावण्याची काही लोकांजवळ उपजत शक्ती असते. काहींसाठी तो योगायोग असू शकतो. कधी कधी हे अपघातानंही घडतं. असे अपघात संगीताच्या क्षेत्रातही घडले आहेत. एका गिटारिस्टनं केलेल्या चुकीमुळे एक गाणं अजरामर झालं, हा किस्सा तुम्हाला माहीत आहे का? गाण्याच्या तालमीच्या वेळी त्याला जे काही वाजवायला सांगितलं होतं, ते न वाजवता त्यानं चुकून भलतंच काही तरी छेडलं. लगेच हातभर जीभ बाहेर काढून ओशाळा होऊन तो योग्य तो कॉर्ड वाजवायला निघाला. पण संगीतकारानं त्याला थांबवलं. तो म्हणाला, ‘हे पुन्हा वाजव’. त्याला ते खूप भावलं. आणि मग त्यानंतर त्या चुकीच्याच कॉर्डनं त्या गाण्याची सुरुवात करण्यात आली. असं म्हणतात की, हे गाणं अजरामर होण्याचं सारं श्रेय त्या प्रारंभिक कॉर्डकडे जातं. आपल्या सहायकाच्या चुकीतून ज्या प्रतिभासंपन्न संगीतकाराला हा ‘सेरेंडीपिटस’ अनुभव मिळाला, त्याचं नाव होतं आर. डी. बर्मन आणि ते अप्रतिम गाणं होतं ‘अमर प्रेम’ या सिनेमातलं ‘चिंगारी कोई भडके’. तुम्हाला ही कथा जर सविस्तर जाणून घ्यायची असेल तर या दुव्याला भेट द्या-

असेच आकस्मिक अत्यानंदाचे अनुभव शास्त्रज्ञांना येतात, लेखकांना येतात, संगीतकारांना येतात, संशोधकांना येतात, पर्यटकांना येतात, आणि अगदी निष्णात स्वयंपाककलातज्ज्ञांनाही येतात. ज्याची कल्पनाही केली नव्हती, असं काही तरी अचानक घडून येतं, होऊन जातं, अनुभवायला मिळतं, आणि मग ज्याला इंग्रजीत ‘pure bliss’ म्हणतात असा क्षण आयुष्यात येतो. हीच ती ‘सेरेंडीपिटी’.

शब्दकोशात ‘Serendipity’चा अर्थ असा दिला आहे - delightful discovery, or the faculty of making such.

या शब्दाच्या निर्मितीचं श्रेय होरेस वॉलपोल (Horace Walpole) या आंग्ल लेखकाकडे जातं. १७५४मध्ये त्यानं ‘The Three Princes of Serendip’ या नावाची एक कथा लिहिली होती. मुळात त्यानं हे ‘Peregrinaggio di tre giovani figliuoli del re di Serendippo’ या Michele Tramezzino नावाच्या इटालियन लेखकाच्या कथेचं केलेलं भाषांतर होतं. हा Tramezzino व्हेनिस शहरात रहायचा. १५५७मध्ये त्यानं ही कथा लिहिली होती. वॉलपोलच्या शब्दांत, (या कथेतली पात्रं) “were always making discoveries, by accidents and sagacity, of things they were not in quest of.”

त्याही पलीकडे जाऊन असं म्हणतात की, या कथेला एका जुन्या फारसी परीकथेचा आधार आहे.

हे सेरेनडीप आहे तरी कुठे? भारताला लागून हिंद महासागरात एक बेट किंवा द्वीप आहे, त्याचं नाव ‘सेरेनडीप’. आलं लक्षात? आपण त्याला ‘श्री लंका’ या नावानं ओळखतो. इंग्रज लोक त्याला ‘सिलोन’ म्हणायचे. (‘रेडिओ सिलोन’चे माझ्यासारखे जगभरचे लक्षावधी भक्तजन या रेडिओ स्टेशनला याच नावानं जन्मभर स्मरणात ठेवतील!)

‘सेरेनडीप’ या शब्दाचा प्रवास असा आहे - संस्कृतमधल्या ‘सिंहलद्वीप’पासून पाली भाषेत ‘सिंहलदीप’ बनलं. फारसी किंवा पर्शियन लोकांनी त्याचं ‘सरनदिप’ केलं. याचंच पुढे इंग्रजीत ‘सेरेनडीप’ झालं. द्वीप म्हणजे बेट. सिंहल जमातीचे लोक ज्या बेटावर राहतात, ते ‘सिंहलद्वीप’. त्यांच्या भाषेचं नावदेखील ‘सिंहल’ असंच आहे. इंग्रजीत ‘Siṃhala’ (सिंव्ह ला) असा उच्चार न करता ‘Sinhala’ (सिं हला) असा केला जातो.

सिंहलचं सिलोन होण्याच्या मागे एक खूप मोठी उच्चारबदलाची भाषिक प्रक्रिया आहे. शेकडो वर्षांपासून अगदी आत्ता आत्तापर्यंत हिंदी महासागरात युरोपियन समुद्रप्रवाशांनी, व्यापाऱ्यांनी आणि चाच्यांनी धुमाकूळ घातला होता. एके काळी बलाढ्य मानले जाणारे पोर्च्युगिज लोक यात आघाडीवर होते. या सर्व

युरोपियन लोकांनी सिंहलद्वीपाला भेटी तर दिल्याच असतील. तिथून त्यांनी ‘सिंहल’ हा शब्द आपापल्या देशात नेला आणि त्यांच्या त्यांच्या भाषेत त्यांना जमेल तसा ते त्याचा उच्चार करू लागले. इंग्रजीत तो ‘सिलोन’ (Ceylon) या रूपात तेराव्या शतकाच्या सुमारास प्रकट झाला, असा काही भाषातज्ज्ञांचा कयास आहे.

या उलट ‘हॉबसन-जॉबसन’वाले म्हणतात – ‘सिंहलद्वीपा’चं ‘Sielediba’ बनलं. पालीत तेच सिहलन (Sihalan) झालं. ‘सिलान’ (Silan) हे त्याचं लघु रूप. तामिळमधला ‘इलम’ (Ilam)देखील हेच दर्शवतो. यातूनच फारसीतले Sarandip आणि Sarandib तयार झाले. व्हॅन डर टुक यांनी Sailan/Silan या शब्दाचा संबंध इंडोनेशियातल्या जावानीज आणि मलय या भाषांतल्या ‘सीला’ (sela) या शब्दाशी जोडला आहे.

संस्कृतमधल्या शिला म्हणजे दगड या शब्दाचं हे तिथलं रूप. या दोन्ही भाषांमध्ये ‘sela’चा अर्थ रत्न (मूल्यवान दगड) असा होतो. श्री लंका/सिलोनला फार पूर्वी ‘रत्नद्वीप’ असं म्हटलं जात असे. (नवव्या शतकातल्या एका अरबी इतिहासकारानं तर या बेटाचं नाव ‘जझिरात-अल–याकुत’ म्हणजे ‘माणकांचं बेट’ असं ठेवलं होतं.) युरोपियन व्यापाऱ्यांप्रमाणेच एके काळी मलय लोकही मोठ्या प्रमाणात सागरी प्रवास करायचे. त्यांच्या प्रभावामुळेच मलय भाषेतल्या सीला/सीलान/सैलान या शब्दांतून ‘सिलोन’ हा शब्द तयार झाला असावा, असं मानायला हरकत नाही.

‘हॉबसन-जॉबसन’मध्ये दिलेल्या सन ३६२ मधल्या एक लॅटिन उताऱ्यात ‘सेरेनडिव्हिस’ असा उल्लेख सापडतो. त्यानंतर अगदी सन १८३० पर्यंत वेगवेगळ्या लेखांतून गोळा केलेले उतारे त्यांनी दिले आहेत. त्यामध्ये लेखकांनी ‘सेरेनडीप’ ते ‘झीलोन’ अशी नाना प्रकारची नावं (आणि स्पेलिंग) वापरली आहेत, असं लक्षात येतं.

या देशाचं सध्याचं नाव श्री लंका (Sri Lanka) असं आहे. त्याचा अर्थ ‘पवित्र भूमी’ किंवा ‘बेट’ असा काहीसा करता येतो. याचा आणि सिलोनचा काही संबंध नाही, पण काही लोक असाही बादरायण उच्चारसंबंध शोधतात.

सिंहल म्हणजे सिंह भूमी. बहुधा सिलोन किंवा श्री लंकेत कधी काळी सिंहांची वस्ती असावी. ब्रुस कॉकबर्न या कनेडियन गायकानं त्याच्या ‘Wondering where the lions are’ या गाण्यात सिंह कुठे आहेत, हा प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर शोधायला आता त्याला भारतात गीरच्या जंगलात नाहीतर आफ्रिकेत जावं लागेल. सिलोनमध्ये त्याला फक्त हत्तीच दिसतील! हे गाणं इथे जाऊन ऐका -

आफ्रिकेच्या स्वाहिली भाषेत सिंहाला सिंबा (simba) असं म्हणतात. पण हा शब्द संस्कृत ‘सिंहा’पासून तयार झाला आहे का, हे नक्की सांगता येत नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या काव्यात ‘प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी’ अशी एक ओळ लिहिली आहे. अगदी अशीच काहीशी भावना भारत आणि इतर पौर्वात्य देशांत नोकरी-धंद्यासाठी आलेल्या आणि मायभूमीला परत जाण्याची ओढ लागलेल्या इंग्रजांचीही असायची, हे १८३०मध्ये ‘बेंगॉल अ‌ॅन्युअल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका कवितेतून दिसून येतं. त्यात ‘सेरेनदीप’चा उल्लेख आहे. तो उद्धृत करून हे सिलोनपुराण थांबवतो.

“For dearer to him are the shells that sleep

By his own sweet native stream,

Than all the pearls of Serendeep,

Or the Ava ruby's gleam !

Home! Home! Friends -- health -- repose,

What are Golconda's gems to those?”

आजचा पस्तुरी (lagniappe) शब्द : झेलिग (Zelig)

हा एक खास अमेरिकन इंग्रजीतला इपनिम शब्द आहे. त्याचा अर्थ आहे, एखादा असा सामान्य, सर्वसाधारण, मामुली माणूस, जो वेगवेगळ्या प्रकारच्या बदलत्या परिस्थितीतही आश्चर्यकारकरीत्या तग धरून राहतो, लपून न बसता वारंवार नजरेला पडतो, स्वतःचा बचाव करतो, सरड्याप्रमाणे रंग बदलून नवीन वातावरणाशी जुळवून घेतो आणि जो बहुतेक वेळी संधिसाधू असतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक, आणि अभिनेता वुडी अ‌ॅलन याच्या १९८३ सालच्या ‘Zelig’ या चित्रपटात Leonard Zelig या नावाचा नायक असतो. तो खरा कसा आहे, हे एक गूढच असतं. त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधताच येत नाही. बरं, असतो तो एकदम आर. के. लक्ष्मणचा कॉमन मॅन. कुठलंही वलय, नावलौकिक नसलेला, कोणालाही माहीत नसलेला सामान्य माणूस. पण लोकांनी आपली दखल घ्यावी, आपल्याशी मैत्री करावी, उच्च दर्जाच्या माणसांच्या कळपातही आपल्याला सहजतेनं वावरता आलं पाहिजे, अशी त्याची इच्छा असते. त्यामुळे तो सतत आपल्या सभोवतीच्या बड्या, ताकदवान, शक्तीशाली लोकांचं अनुकरण करतो, त्याच्यासारखं वागतो. आणि मुख्य म्हणजे या प्रयत्नांत तो नेहमी यशस्वी होतो. एक काम आटोपलं की, पुढच्या वेळी तो कसा वागेल, याचा कोणालाच अंदाज बांधता येत नाही. पण नंतर नवीन आणि अगदी वेगळा असा काही प्रसंग आला की, त्यातही हा झेलिग स्वतःच्या अक्कलहुशारीमुळे, प्रसंगावधानामुळे, आणि संयोगक्षमतेमुळे स्वतःला तारून नेतो.

असा हा झेलिग. त्याच्या नावावरून अमेरिकन लोक अशा प्रकारच्या माणसांना आता ‘झेलिग’ असं म्हणू लागले आहेत. आपल्या भारत देशात असे हजारो ‘झेलिग’ आपल्याला सापडतील. पूर्वीही होते, आजही आहेत. इतिहास इसका गवाह हैं!

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......