ज्या देशात बहुतांश लोकांसाठी धर्मसंस्कार हे जन्माच्या आधीपासूनच सुरू होतात, त्या देशात धर्मचिकित्सेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या संस्कारात वाढायची संधी मिळालेले लोक अपवादच म्हणायला पाहिजेत! माझी केस अशीच अपवादात्मक आहे. या पार्श्वभूमीवर ‘धर्माने मला काय दिले?’ हे सांगण्याची सुरुवात अगदी माझ्या जन्मापासून किंवा त्याच्याही आधीपासून करायला हवी.
माझे दोन्ही आजोबा, म्हणजे ‘अच्युत दाभोलकर’ हे माझ्या वडिलांचे वडील आणि ‘गुंडोपंत तेंडुलकर’ म्हणजे आईचे वडील हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. देवभोळे म्हटले तरी चालेल अशी त्यांची वृत्ती होती. गमतीचा भाग म्हणजे माझ्या दोन्ही आज्या म्हणजे ‘ताराबाई दाभोलकर’ आणि ‘सुधा तेंडुलकर’ ह्या अत्यंत तर्कनिष्ठ होत्या. साधारण शंभर वर्षांपूर्वीच्या जन्मलेल्या दोन्ही आज्या अशा प्रवृत्तीच्या असणे हे तसे अपवादात्मक उदाहरण असेल. असे असूनही माझ्या दोन्ही आजी-आजोबांचे एकमेकांशी उत्तम जमायचे. त्यांचे संसार व्यवस्थित झाले. अतिशय कष्टपूर्वक, शक्यतो कुणाला त्रास न देता आणि ज्यांना चांगली मूल्ये म्हणतात अशा गोष्टींना धरून ते आपले आयुष्य जगले. ‘देवधर्म मानणे’ अथवा ‘न मानणे’ ह्या गोष्टी कधीच त्यामध्ये आल्या नाहीत!
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे वडील म्हणजे आमचे आबाआजोबा हे तर इतके देवभक्त होते की, त्यांच्या पाच मुलांची नावे देवांच्या नावावरून ठेवली आहेत. (देवदत्त, मुकुंद, दत्तप्रसाद, चारुदत्त, नरसिंह). माझ्या काकांच्या ह्या नावांपासून ते एका पिढीच्या टप्यात माझ्या ‘हमीद’ ह्या नावापर्यंतचा प्रवास म्हणजे बाहेरून बघणाऱ्या व्यक्तीला खूप मोठा टप्पा वाटू शकतो. प्रत्यक्षात आमच्या कुटुंबात असे कुणालाच वाटले नाही किंवा मलादेखील कोणी तसे जाणवून दिले नाही. आजच्या कालखंडात जेव्हा घराघरात आणि कुटुंबाकुटुंबात धर्माच्या नावावर ध्रुवीकरण झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर हा एकदम वेगळा म्हणावा असा अनुभव.
ह्याचे कारण शोधायचा मी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यामागे माझ्या आजी-आजोबांनी घालून दिलेले आणि पुढच्या पिढीने पाळलेले एकदम साधे-सोपे तत्त्व होते असे वाटते. ते तत्त्व असे की, ‘कुटुंब किंवा समाज म्हणून आपण एकत्र राहतो, तेव्हा विविध धारणा आणि विचार असलेली माणसे आजूबाजूला असतात आणि देव आणि धर्मविषयक धारणा तर अगदी खाजगी म्हणाव्या अशा असतात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडावा, असे अजिबात आवश्यक नाही.’
माझ्या वाढत्या वयात जे धर्माचे प्रारूप भेटले, ते असे उदारमतवादी आणि समंजस होते. शाब्दिक कीस न पडता अगदी व्यापक अर्थाने म्हणायचे झाले, तर वैयक्तिक धार्मिक धारणा आणि कुटुंबातील नातेसंबंध, व्यापक समाजकारण आणि राजकारण या गोष्टी वेगळे ठेवणाऱ्या या धर्माच्या प्रारूपाकडून मला खूप शिकायला मिळाले, अजून मिळते आहे.
हा सगळा कालखंड ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या पायाभरणीचा होता. ‘अंनिस’चे काम हे देवाधर्माच्या विरोधी आहे, असा एक जाणीवपूर्वक पसरवलेला समज खूप लोक बाळगून असतात. म्हणून हे सांगणे आवश्यक आहे की, माझी आई ही देवधर्म मानणारी असून आणि माझे वडील धर्मचिकित्सेचे काम करत असूनही त्याचा त्यांच्या नात्यावर किंवा आमच्या वाढण्यावर कोणताही नकारार्थी प्रभाव पडला नाही. अनेक वेळा माझे बाबा अगदी शांतपणे माझ्या आईसोबत साताऱ्याजवळ असलेल्या कुरणेश्वर मंदिरापर्यंत जायचे. ते बाहेर थांबायचे आणि आई आत जाऊन दर्शन घेऊन यायची!
बाबा पूर्ण वेळ सामाजिक काम करत असल्यामुळे आम्हाला आधार म्हणून माझ्या आईचे आई-वडील आणि माझा मामा अनिल तेंडुलकर हे आमच्याबरोबर राहत असत. ते रोज पूजाअर्चा करायचे. माझ्या आजोबांनी किंवा मामाने कधी मला देवाच्या पाया पड म्हणून सांगितले नाही, तसेच माझ्या बाबांनी कधी पडू नको असे सांगितले नाही.
आमच्या घराच्या समोरच्या मैदानात सार्वजनिक गणेशोत्सव व्हायचा. त्याच्या आयोजनात मित्रांसोबत मी हिरीरीने सहभागी होत असे. या आयोजनात आमचे अनेक मुस्लीम मित्रदेखील अग्रभागी असत. आमच्या घरात गणपती बसवला जात असे. बाहेर पाऊस खूप जोरात आला तर आमच्या मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या घराच्या हॉलमध्ये होत असत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘अंनिस’ने सुरू केलेला पर्यावरणपूरक गणपती उत्सव हळूहळू आमच्या मंडळात आणि घरीदेखील होऊ लागला. त्यामध्ये कुणाला काहीही वावगे वाटले नाही किंवा काही विरोधही झाला नाही. आज धर्मश्रद्धेने आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर अतिक्रमण करणे सुरू झाले आहे. ‘कुणी काय खावे, कुणी कोणते कपडे घालावेत, कुणाशी मैत्री करावी, कुणाशी लग्न करावे, कुणावर प्रेम करावे आणि कुणाचा द्वेष करावा’ असे सांगणारे हे प्रारूप आहे. माझ्या लहानपणी अनुभवलेल्या धर्माच्या स्वरूपापेक्षा हे खूपच वेगळे स्वरूप आहे. मला लहानपणी भेटलेल्या या धर्माशी माझे मतभेद जरूर होते, पण ते भांडण स्वरूपाचे नव्हते. अमच्या सहअस्तित्वातून, संवादातून, एकमेकांवरील प्रेमामधून या भिन्नता नक्कीच सुटणाऱ्या होत्या. अगदी पूर्ण सुटल्या नाहीत तरी ते वेगळेपण मान्य करून आम्ही एकमेकांसोबत आनंदाने राहू शकत होतो!
देवधर्म संपूर्ण नाकारल्याशिवाय विज्ञानाचे जग येणार नाही, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकणार नाही किंवा या दोन्ही संकल्पना पूर्ण टाकाऊ असल्याची जी भूमिका जगातील अनेक एथिस्ट किंवा विवेकवादी लोक घेतात, त्याविषयी माझी मनोभूमिका तयार होण्यास या अनुभवांचा मला फायदा झाला असे आता लक्षात येते.
धर्माने मला काय दिले? याचा विचार करताना माझ्या लक्षात आलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दैनंदिन जगण्यात असलेले धर्माचे संदर्भ आणि त्यांचा अर्थ हा माणसा-माणसाप्रमाणे मोठ्या प्रमाणात बदलत असतो. याचबरोबर कुठलेही धर्मविषयक चिंतन हे आपल्या आजूबाजूच्या माणसांना बाजूला सारून किंवा दूर लोटून करणे किती व्यर्थ आणि अयोग्य आहे, याची मनोमन जाणीवही मला अनुभवांमधून मिळाली.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
पुढे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रीय काम करू लागलो. त्यानिमित्ताने विचार-वाचन करू लागलो. विज्ञान आणि धर्म हे समोरासमोर उभे ठाकतात, असे अनेक प्रसंग दैनंदिन जीवनात येऊ लागले. अंनिसच्या कामामुळे ‘विधायक कृतिशील धर्मचिकित्सा’ हा कामाचा आणि जीवनाचा एक भाग झाला. या पार्श्वभूमीवर डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी मांडलेला आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा भाग झालेला देवधर्मविषयक विचार मला अधिक जवळचा वाटू लागला. या मांडणीनुसार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी किंवा धर्मसुधारणेसाठी देवधर्म नाकारण्याची गरज नसून या संकल्पनांची चिकित्सा करणे, त्यामधील चांगल्या गोष्टी स्वीकारणे आणि कालसुसंगत बदल करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक गणपती अथवा ‘फटाकेमुक्त दिवाळी’, ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ असे अंनिसने सुरू केलेले व आता शासनाने स्वीकारलेले उपक्रम, हे या दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करते.
पुढे जसे वाचन वाढले तसे कर्मकांडे, नीतिशास्त्र आणि अध्यात्म या धर्माच्या तिन्ही अंगांच्या दृष्टीने वाचन आणि विचार सुरू झाला. अंनिसच्या कामासोबतच माझे मनोविकारशास्त्रातील शिक्षणही चालू होते. मानसशास्त्राचा अभ्यास करताना मला डॉ.मोहन आगाशे, डॉ.वासुदेव परळीकर, डॉ.प्रसन्न दाभोलकर यांच्यासारखे गुरू मिळाले. मानवी मनावर संस्कृतीचा प्रभाव कसा पडतो, हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा विषय होता. त्यांच्याबरोबर काम केल्याचादेखील फायदा मला माझी भूमिका ठरवताना झाला. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून लोकांशी बोलताना धर्माचा मानवी मनावर असलेल्या प्रभावाचा एक खूप मोठा पट मला पाहायला मिळाला, अजूनही मिळतो आहे.
एका टोकाला भुताने झपाटले आहे असे समजून तीव्र मानसिक आजारी व्यक्तीला बाबा-बुवांच्याकडे घेऊन जाणारे नातेवाईक, कुटुंबात कुचंबणा होते आणि बोलता येत नाही म्हणून व्यक्त होण्याची एक पद्धत म्हणून अंगात देवी येणारी ग्रामीण महिला इथपासून ते आयुष्याचा अर्थ शोधताना धर्म-विज्ञान-अध्यात्म यांच्या गुंत्यात अडकलेले अनेक लोक असा हा मोठा पट आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करताना उत्क्रांतीचे शास्त्र, मेंदूविज्ञान या अनुषंगिक वाचनाचाही माझ्या विचारांवर प्रभाव पडला.
या पार्श्वभूमीवर कर्मकांडे, नीतिशास्त्र आणि अध्यात्म या तिन्हींविषयी माझी मते हळूहळू आकार घेत होती. त्याच काळात २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात ‘विठ्ठल रामजी शिंदे पुलावर’ डॉ.नरेद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला. याचा संबंध त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आणि खास करून धर्मचिकित्सेच्या कामाशी आहे, हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते. पुढे कॉम्रेड पानसरे प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचेदेखील खून झाले. आज या चारही खुनांमध्ये तपास एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे आणि आरोपपत्रांमधून हे अगदी स्पष्ट आहे की, धर्माच्या नावावर अधर्म पसरवू इच्छिणाऱ्या संघटित शक्तींनी हे केले आहे. दिशाभूल, असत्य, अज्ञान व द्वेष यावर आधारित हे धर्माचे प्रारूप आहे. याच स्वरूपाचे धर्माचे स्वरूप स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी वापरणारे संघटन आणि पक्ष हा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे.
हा लेख लिहून पूर्ण करत असतानाच अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याची बातमी आली. धार्मिक वर्तनाचा एवढा मोठा पट बघितल्यावर खरे तर कुठल्या मार्गाने जाऊ इच्छितो, हे निवडणे फार अवघड नव्हते. पण या पार्श्वभूमीवर कार्मकांड, नीतिशास्त्र आणि अध्यात्म या धर्माच्या तीन प्रमुख अंगांविषयी मी आज काय विचार करतो, ते मांडणे मला महत्त्वाचे वाटते.
त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे ‘कर्मकांड’. बहुतांश धर्मांमध्ये कर्मकांड हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग समजला जातो. शतकानुशतके वापरल्याने त्यांना एक प्रकारचे काठिण्य आणि पावित्र्य जोडले गेलेले असते. कर्मकांडे केवळ धर्मातच असतात असे नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण कर्मकांडांचा वापर करत असतो. प्रत्येक वेळी ती धार्मिक असतीलच असे नाही. मानवी मनाला आधार देण्यासाठी, एका रुटीनमध्ये बांधण्यासाठी त्यांचे जरूर महत्त्व असते. जसे एकमेकाला भेटल्यावर ‘जय श्रीराम’ म्हणणे किंवा ‘सलाम आलेकुम’ म्हणणे हे एक कर्मकांड आहे, तसेच ‘नमस्कार साथी’ किंवा ‘नमस्कार कॉम्रेड’ म्हणणेदेखील एक प्रकारची कर्मकांडे आहेत.
अगदी नास्तिक आणि निधर्मी लोकदेखील त्यांच्या आयुष्यात अनेक कर्मकांडे पाळत असतात. जोपर्यंत या कर्मकांडांच्या मानण्यामागचे मानवी मनाचे विज्ञान आपल्याला माहीत असते, त्यांची चिकित्सा करण्याची आपली तयारी असते, तोपर्यंत त्यांचा फायदेशीर वापर करता येतो. अनेक खेळाडू महत्त्वाच्या सामन्याच्या आधी एक ठरावीक रुटीन पाळतात. त्याच्यामागे तसे म्हटले तर काहीही लॉजिक नसते, पण आपले मन आणि शरीर एका ठराविक रूटीनमधून गेल्यामुळे चिंता थोडी कमी होते आणि सातत्य राहण्याची शक्यता वाढते. म्हणून कर्मकांडे पूर्णपणे नाकारण्यापेक्षा त्यांचे रूप विधायक आणि कालसुसंगत असावे, कुणाचे शोषण करणारे वा कुणावर दबाव टाकणारे नसावे, एवढे जरी पथ्य पाळले तरी खूप झाले असे मला वाटते.
‘सत्यशोधन या क्षेत्रात विज्ञानाने धर्माचा निर्णायक पराभव केला आहे’ असे डॉ.नरेंद्र दाभोलकर त्यांच्या मांडणीमध्ये म्हणत असत आणि हे अगदी खरे आहे, असे मला वाटते. कोण गुरू काय म्हणतो? किंवा कोणत्या ग्रंथात काय लिहिले आहे, याचा संदर्भ घेऊन लोकांच्या भावना भडकावता येऊ शकतात. आपणच कसे सर्वश्रेष्ठ असा दावा करता येतो, पण त्यामधून सत्य शोधणे आणि एखाद्या गोष्टीचे शास्त्रीय आकलन करणे दुरापास्त आहे. समाज म्हणून आपण हे वास्तव जवळजवळ मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या आजूबाजूंच्या जगाचे आकलन अधिकांत अधिक यथार्थ पद्धतीने व्हावे, ते सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारे असावे, यामध्ये धर्माला मानवी जीवनाला देण्यासारखे फार काही राहिले आहे, असे मला वाटत नाही.
तसेच नीतिशास्त्र म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय, हे ठरवण्यासाठीदेखील मानवाला स्वत:च्या कार्यकारणभावाचा वापर करून निर्णय घेता येतो. त्यासाठी धर्माची गरज नाही असे मला वाटते. पण धर्माची शिकवण म्हणून जर कोणी मानवी मूल्ये म्हणजेच स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि समता या गोष्टींविषयी बोलत असेल तर त्यांच्याशी आपले वैर असण्याचे काहीच कारण नाही, असे मला वाटते. उलट त्यांच्याशी आपली मैत्री असायला पाहिजे. कुठल्याही कारणाने माणसे मानवी मूल्याला धरून वागत असतील तर ते आपल्याला हवे आहे, अशीच ही धारणा आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ किंवा ‘सत्य हेच ईश्वर आहे’ हे गांधीजींचे विचार मला जवळचे वाटतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
शेवटचा भाग आहे अध्यात्माचा. विज्ञानवादी मनोभूमिका असल्याने, मृत्यूपश्चात आयुष्य आणि पारलौकिक कल्याण या धर्मातील गोष्टी मला कधीच पटल्या नाहीत. पण लोकांना त्यांचा आधार का हवासा वाटतो, हे मात्र मी समजू शकतो. त्यामुळे या अवैज्ञानिक गोष्टी मानणे योग्य नसले तरी समजून घेण्यासारखे आहे. मेंदू विज्ञान, मानसशास्त्र, उत्क्रांतीचे शास्त्र हे जसेजसे अधिक पुढे जाईल, तसतसे मेंदूमधील स्वत:पलीकडे जाण्याच्या मानवी प्रेरणेविषयी अधिक सत्याच्या जवळ जाणारे आकलन होईल, याविषयी मला जराही शंका नाही. मेंदू-आधारित अध्यात्म किंवा धर्मातीत अध्यात्म याविषयी सध्या विज्ञानाचा आधार घेऊन नव्याने जोमाने मांडणी केली जात आहे. त्यामुळे या गोष्टी आता नजरेच्या टप्प्यात आल्याचे दिसते आहे.
सरते शेवटी, जसे धर्मातील चांगल्या गोष्टी बाजूला करून केवळ स्वार्थासाठी संघटित धर्मकारण केले जाते आणि ज्यामधून शोषणाला सुरुवात होते, तेच विज्ञानाचा वापर करूनदेखील शक्य आहे, हे आपण अणुबॉम्बच्या निमित्ताने पाहिलेले आहे, म्हणून धर्माचे विज्ञान समजून घेताना विज्ञानाचे रूपांतर शोषणकर्त्या धर्मांत होऊ नये, याविषयी सजग राहणे धर्माच्या अभ्यासाने मला दिलेली शिकवण आहे.
‘साधना’ साप्ताहिकाच्या २८ ऑगस्ट २०२१च्या अंकातून साभार
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. हमीद दाभोलकर मनोविकारतज्ज्ञ असून ‘परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र’, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘साधना’ साप्ताहिक यांच्याशी निगडित आहेत.
hamid.dabholkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment