अजूनकाही
शिवजयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारीला औरंगाबादमध्ये काही शाळकरी मुलांनी ‘बाल शिवाजी’ साकारला. हा अफजल खान वधाचा देखावा पाहण्यासाठी कोवळी मुलं मोठ्या संख्येनं हजर होती. या प्रयोगाबद्दल काहीच आक्षेप नाहीये. लेखणीद्वेषी इतिहास आहे म्हटल्यावर तो स्वीकारावाच लागणार. आणि तो पिढ्या न पिढ्या स्वीकारला जात आहे. इतिहासाची समाजमनात द्वेष निर्माण करणारी पात्रं साकारून काय साध्य करायचं असतं, हेदेखील सर्वांना ठाऊक आहे. शिवजयंती दिनी हिंदू-मुस्लीम द्वेष पसरवणारी अशी पोस्टरं शहर आणि गाव पातळीवर सर्रास पाहायला मिळतात. अशा द्वेषधारी पोस्टर्सनं अनेक पिढ्या बरबाद केल्या आहेत. अनेक ठिकाणी पोस्टर्सवरून तुरळक वाद होऊन दंगली झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांच्या कॉलममध्ये इतिहासजमा झाल्या आहेत.
असा द्वेष पसरवणाऱ्या मनोवृत्तींचा वेध घेतला असता अनेक गोष्टी पुढं येतात..
काल १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा उत्साह सोशल मीडियावर भरभरून दिसला. शिवराय मुस्लिमद्वेषी नव्हते, अशा स्वरूपाचे ग्राफिक्स, छायाचित्रं आणि अवतरणं शिवजयंती दिनी फिरतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिवरायांना कुळवाळी-कुळभूषणाचा टिळा लावतात, तर त्याच संख्येनं गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणारेदेखील दिसतील. तर यावर वाद-विवाद करणारेही मोठ्या संख्येनं ‘फेसबुकी विचारवंत’ही आपली अक्कल पाजळतात. दिवसभर शिवराय मुस्लिमद्वेषी नाहीयेत, अशा आशयाची पोवाडे सोशल कट्ट्यावर गायले जातात. प्रत्येकाकडून शिवराय मांडण्यासाठी ‘टाईमलाईन’ची वॉल रंगवली जाते. माहितीचा मजकूर, पुस्तकांचे उतारे, मोठ्या प्रमाणात टॅग, हॅशटॅग, ट्विट, रिट्विट कमेंट, लाईक्स शिवरायांचा जयजयकार करतात. मोठमोठ्या पुस्तकांचे संदर्भ दिले जातात. थोडक्यात दिवसभर ‘सोशल कट्ट्या’वर ‘महाराज मुस्लिम द्वेषी नव्हते’ हाच सुपर ट्रेंड होतो. गेल्या चार-पाच वर्षांपासून हेच पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षीही हे सर्व सुरू होतं, तर दुसरीकडे एक गट व्हर्च्युअल मीडियातून प्रत्यक्षात येऊन लातूर जिल्ह्यातील पानगांवच्या रस्त्यावर तांडव माजवत होता. व्हर्च्युअल शिवप्रेम दाखवणारा गट, प्रत्यक्षात मात्र शिवरायांच्या नावाला काळिमा फासत होता. संवेदनशील भागात झेंडे लावण्यास मनाई केल्यानं, पोलीस अधिकाऱ्याची मारहाण करत रक्तबंबाळ अवस्थेत धिंड काढली जात होती. तर, दरवर्षी प्रमाणे पुण्यात २९ उर्दू शिक्षण संस्थेतली सुमारे १० हजार ‘मुस्लिम’ मुलं पारंपरिक वेशभूषेत शिवरायांच्या अभिवादन रॅलीत सामील होते. दोन्हीकडं शिवरायांविषयी प्रेम होतं. एकीकडे सद्सदविवेकबुद्धीनं दिलेलं तर, दुसरीकडे राजकीय पक्षाच्या सोयीच्या राजकारणानं. प्रशासकीयदृष्ट्या ‘रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नये’ सांगणाऱ्या शिवरायांचे मावळे शासकीय अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयावर हल्ला करून अमानुष मारहाण करतात. अधिकाऱ्याचा दोष एवढाच की, तो त्याचं ‘नाव’ युनूस शेख होतं. बिचारा कुलकर्णी, कांबळे, भोसले असता तर कदाचित वाचला असता किंवा तो ‘व्हर्च्युअल’ असता तर, कमेंट बॉक्समध्ये एखाद-दुसरी घाण शिवी गिळून बसला असता.
पानगांवची ही घटना किंवा परवाची औरंगाबादचा बालशिवाजीचा प्रयोग मला शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात घेऊन गेला. पाचवी-सातवीतला देशपांडेबाई आणि घोंगडेमास्तरांचा रसभरीत व नाटकीय पद्धतीनं हॅमर केलेला इतिहास आठवला. स्वातंत्र्यता, राष्ट्रप्रेम, समरसता, बंधुता, सर्वधर्मसमभाव, लोकशाही मूल्य इतिहास शिक्षणातून मिळतात म्हणे, पण आमच्या पाठ्यपुस्तक मंडळानं असा इतिहास शिक्षणातून कधीचाच बाद केला होता. पण मास्तर-मास्तरीनबाईनं शिकवलेल्या धर्मद्वेषी आणि रंगद्वेषी इतिहासानं पानगावसारख्या कित्येक पिढ्यांना जन्म दिलाय.
शाहिस्तेखान आणि अफजलखानचा असलेला काळ्या इतिहासामुळे, वर्गातला मोहन कांबळे समस्त मुसलमानी भाषेवाल्यांना मात्र अफजल खानच्या अवलादी समजायचा. त्यामुळे ‘वर्गमित्र’ असलेला सलम्या इतिहासाचे आगामी धडे बघून सहसा शाळेतून गैरहजर राहायचा. दुसर्या दिवशी कांबळे म्हणायचा ‘कारे सल्ल्या, काल प्रतापगडावर लपून बसला व्हता का?’ मास्तर अफजल खानाचा कोथळा शाहिस्तेखानाची बोटे, मोगलांविरोधातली सत्तेची लढाई समस्त मुस्लिम आणि इस्लामविरोधी सिद्ध करुन रंजकपणे शिकवायचे. मास्तरचे प्रत्येक शब्द सलम्याच्या कोवळ्या बालमनावर प्रहार करायचे. मात्र, मोहनचा धर्मभिमानासह मुस्लिमद्वेष द्विगुणीत व्हायचा. खानाच्या धड्यानंतर सबंध वर्ग, सलम्याला खानच समजायचा, त्यांच्या नजरा बघून सलम्याला वाटायचं आता घेतीलच हे माझ्या नरड्याचा घोट. तोच सलम्या ‘जय भवानी’च्या घोषणेसह शेजारचा संभादादा रहीमकाकावर धावून जाताना पाहत होता. त्यामुळे सलम्या आणि मोहल्ल्यातील पोरांना शिवरायांचं नावंही ऐकू वाटत नसायचं. अशा भीतीदायक वातावरणात आमच्या पिढीनं इतिहासाचे द्वेषधारी धडे गिरवले. ‘जय भवानी...’च्या घोषणेसह ९३ साली दंगली घडल्या. सलम्या मात्र, दाराच्या फटीतून सर्व पाहायचा. त्यावेळी सलम्या तळहातावर मुठ ठोकत शिवरायांबद्दल द्वेष वाढवायचा. त्यांचं नाव घेऊन मुंबईत मुस्लिमांची संपत्ती जाळली गेली. दलितांवर अमानुष अत्याचार केले गेलं. शिवगर्जना देणार्यांनी दक्षिण भारतीयांच्या मनात धास्ती निर्माण केली. याच शिवगर्जनेतून पुण्यात मोहसीन शेखचा मर्डर घडवून आणला गेला. युनूस शेखसारख्यांना जिवाच्या आकांतानं आजही दोन-दोन तास पळावं लागतंय.
मात्र, शिवजयंतीला सोशल मीडियाचा गुळमुळीत कंटेट वाचून माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. शिवरायांच्या नावानं दंगली घडवताना कुठं गेली होती ही बहुजनप्रतिपालक शिवप्रजा आणि त्यांचं शिवप्रेम? ज्या शिवरायांनी प्रत्येक धर्माचा आदर केला, त्यांच्या नावानं मोठ्या प्रमाणात धार्मिक तेढ निर्माण केला गेला. ज्यांनी इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचं रक्षण आणि त्याचं जतन केलं, त्याच धार्मिक स्थळांना शिवप्रेमी म्हणवणारे मावळे गुलालानं रंगवू लागली. एकीकडे रयतेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या शिवरायांना आज मावळ्यांच्या फौजा मान खाली करायला भाग पाडत आहेत. दंगली घडवून माय-बहिणींची विटंबना करत आहेत. शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना हीच होती का? शिवरायांची बहुजनप्रतिपालक प्रतिमा एका जुनाट ग्रंथातून बाहेर यायला तयार नाही. मात्र दुय्यम संदर्भावर आधारित नव्या जनआवृत्ती समाजद्वेष पसरवत आहेत. महाराष्ट्रात विविध राजकीय संघटनांनी शिवरायांना हायजॅक केलंय. यांच्या पोसलेल्या इतिहासकारानं शिवरायांना इतिहासापुरतं मर्यादित न ठेवता भाषा, जात, धर्म, संस्कृतीमध्ये बंदिस्त करून खुळचट राजकारण्याच्या हवाली केलं. इतिहासकाराच्या अवकृपेनं शिवरायांना दैवत्व प्रदान करण्यात आलं. या देवाचा इतिहास नव्या पिढीला माहितीरंजनाच्या स्वरूपात सांगण्यात येऊ लागला.
कथा-कादंबर्यातून सोयीचे शिवराय साकारले जाऊ लागले. यात रंजकता तर आलीच, सोबत काही मिथकं व शौर्याच्या कहाण्या आल्या. हिंदू, क्षत्रिय, मराठा यांचे ब्रँड म्हणून कडवेपणाचं उदात्तीकरण करणं सुरू झालं. आणि बघता-बघता शिवराय पुस्तकातून बाहेर आले. पोस्टर्स, सिनेमा, व्याख्यानांतून आम्ही मिळेल ते शिवराय स्वीकारत गेलो. जागतिकीकरणानं शिवरायांचं ‘मटेरियल मार्केट’ उभं केलं. असा हा ‘कमोडिटी शिवबा’ थेट इंटरनॅशनल ब्रँडपर्यंत येऊन पोहचला. शिवजयंतीला ग्लॅमर प्राप्त झालं आणि डीजेच्या अश्लील ठेक्यावर मावळे ताल धरू लागले. कोथळा, मुजरा, हिंदूभिमानी स्लोगन्सची उत्पादने व्हॅन, चौका, ऑफिसमध्ये सजू लागली यातून मिळणारे शिवराय आजच्या पिढीनं स्वीकारले... त्यांची कट्टर हिंदूधर्माभिमानी, मुस्लिम द्वेष्टा, गोब्राम्हणप्रतिपालक, जातवर्णाभिमानी अशी प्रतिमा जनमाणसात रुजवली गेली. त्याचे परिणाम कळायला एक तप उलटावं लागलं. इतिहासाचा असा दुराग्रह कशामुळे झाला, हे आता नवीन सांगायची गरज नाहीये. याची उत्तरे सर्वांनाच ठावूक आहेत. राजकारण आणि सत्तेसाठी समाजात विद्वेषाची बीजे पेरणं हा एकमेव हेतू डोळ्यासमोर होता हे आता हळूहळू कळू लागलंय. खुळचट आणि विद्वेषी राजकारणाला बळी पडून हे सर्व आम्ही केलं, असं आता चाळीशीत असलेली पिढी म्हणत असली तरी, आपल्या पाल्याला आतातरी योग्य दिशा द्यावी असं त्यांना अजूनही वाटत नाहीये, ही मोठी शोकांतिका म्हणता येईल.
आता काळ बदलला, इतिहासलेखन बदललं. विशिष्ट कॅटेगरीतल्यांची बालभारतीची मक्तेदारी संपुष्टात आली होती, कांबळे, शिंदे, भोसले, शेख यांची तरुण पिढी इतिहास लिहू लागली वाचू लागली होती. त्यातून तरुण समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत उदयास येत आहेत. संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान याची नवी मांडणी बाहेर येऊ लागली. रामचंद्र गुहा, इरफान हबीब, एजाज अहमद, राजमोहन गांधी इत्यादी मंडळी जागतिक स्तरावर इतिहासाची सत्य माहिती, वेगळा दृष्टिकोन, आकलन आणि भाष्य बाहेर काढू लागले होते. महाराष्ट्रात कॉम्रेड शरद पाटील, मा. म. देशमुख, श्रीमंत कोकाटे, सदानंद मोरे इत्यादी मंडळीनं आत्तापर्यंतचा अगदी वेगळा इतिहास मांडला. हळूहळू खरा इतिहास दडब्यातून बाहेर येऊ लागला. महाराजांच्या सैन्यदलातही मुस्लिम होते. शिवाय अनेक अंगरक्षकही मुस्लिमच. महाराजांची लढाई धर्माविरुद्ध नसून सत्तेविरोधात होती अशी मांडणी बाहेर येऊ लागली. महाराजांचे गुरू कोण, भवानी तलवारीचं काय, तुकारामाचा खूनच झालाय, असा विचारप्रवण इतिहास बाहेर येऊ लागला. ‘शिवचरित्र आणि एक’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’सारखी नाटकं मास कम्युनिकेशन घडवू लागली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता’ या व्याख्यानाची सिरीज सुरू केली. तरुण पिढी आता नव्या इतिहासाची आणि वर्तमानाची मांडणी करू लागल्यानं माहितीचं जनरलायझेशन झालं आहे. त्यातून सत्य स्वरूपात प्रचंड माहिती समाजमनावर आदळू लागलीय. त्यामुळे येत्या एक-दोन दशकात राजकीय प्रवृत्ती सुधारेल का? याबाबत काही सांगता येणार नाही मात्र, सुशिक्षित समाज अफवांना आणि स्वार्थीय राजकारणाला बळी पडून मोहसीन किंवा युनूस शेख घडवू देणार नाही. मात्र, कोवळ्या बालमनावर प्रहार करणाऱ्या लेखणीबहाद्दरांना चाप बसवला पाहिजे. द्वेषधारित प्रयोग बंद करता येतील का, याकडंही थोडसं लक्ष द्यावं लागेल.
इंटरनेटनं व्हर्च्युअल का असेना पण जागतिक स्तरांवर संवाद घडवून आणलाय. आंतरजालातून अफाट माहितीचं दालन अचानक समोर आलं, त्यातून नवी विचारप्रणाली डेव्हलप होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रचंड माहितीजालात आजचा यंगस्टर्स भरकटलाय. हे काहीअंशी खरं असली तरी, पूर्णत: सत्य नाही. सोशल मीडियातून भरकटलेल्या वृत्तीनं कधी पुण्यात मोहसीन, दादरीत अखलाक तर दिमापूरचा शरफुद्दीन घडवलाय. मात्र, यातून तरुणाई मोठा धडा घेऊ शकते. भरकटणाऱ्या विखारी वृत्तींना ओळखता येऊ शकतं. आता कुठे युनूस शेख किंवा मोहसिन शेख घडणार नाही याची काळजी घेता येईल.
लेखक ‘महाराष्ट्र १’ या वृत्तवाहिनीमध्ये बुलेटीन प्रोड्यूसर आहेत
kalimazim2@gmail.com
Follow on Twitter @kalimajeem
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Mon , 27 February 2017
समोरच्या बाकावरून!
Amol Jarhad
Mon , 20 February 2017
कटुसत्य.... खुप छान लिहिलंय सर.... सामाजिक सूक्ष्मनिरीक्षण प्रत्येक परिच्छेदातून दिसून येते. हे बदलायला हवं... इतिहासाचं पुनर्लेखन व्हायला हवं... वादग्रस्त इतिहास टाळून "धार्मिक एकता " वाढविण्यासाठी सत्य असलेला पण वादग्रस्त इतिहास बदलायला हवा..... तत्कालिन इतिहासलेखकांनी त्यांना फायद्याचा इतिहास प्रसारित केला......असो. पण हे बदलायला हवं........