जयंत पवार गेले त्या वेळची गोष्ट (हात थरथर कापायला लागले. आपली कवचकुंडले कुणीतरी काढून घेतलीत, त्वचा सोलून काढली जात आहे, असा भास होत राह्यला…)
संकीर्ण - श्रद्धांजली
महेंद्र कदम
  • जयंत पवार आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Tue , 31 August 2021
  • संकीर्ण जयंत पवार Jayant Pawar

२९ ऑगस्ट. रविवारचा दिवस. नेहमीप्रमाणे सकाळी उशिरा उठलो. डोळे चोळतच बाजूचा मोबाईल उचलला. झोपाळी डोळे असतानाच चष्मा लावला आणि स्क्रीन लॉक काढून वाय-फाय ऑन केले. डोळ्यांतून पाणी येत होते, तरी आधी व्हॉट्सअ‍ॅप पाह्यलं. पाणी पुसतच पुन्हा फेसबुकवर गेलो. तोवर बायको ओरडली, ‘उठा, नऊ वाजल्या. तुमचा मोबाईल काय सुटायचा नाय. ते झाडांना पाणी घाला आधी, मी नाही घालणार’ असे म्हणत ती तणतणत निघून गेली. चादर पायानेच फेकून देत मी उठलो आणि मोटार चालू करून झाडांना पाणी देऊ लागलो. तोवर एक-दोन फोन येऊन गेले होते. बायकोनं रिंग ऐकूनही उचलले नाहीत. कदाचित फोनच्या नादात झाडं उपाशी राहतील असं वाटलं असणार. काम उरकून थेट मोबाईल न बघता मी आंघोळ करून आलो. रविवार असल्यानं निवांत होतो. तसं अलीकडच्या दोन वर्षांत आपण सगळे निवांतच आहोत!

तर पेपर घेऊन बसण्याआधी मोबाईल घेतला आणि फेसबुकवर गेलो, तर जयंत पवार गेल्याचं कळलं, आणि मी सुन्न झालो. एक हात आणि पाय लुळा पडल्याचा भास झाला. अंगाला कापरं सुटलं. काहीच सूचेना. हात थरथर कापायला लागले. आपली कवचकुंडले कुणीतरी काढून घेतलीत. त्वचा सोलून काढली जात आहे, असा भास होत राह्यला. दाट निबिड अरण्यात आपल्याला एकटे सोडून सगळे निघून आलेत आणि आपला रस्ता हरवला आहे. हो, खरंच रस्ता हरवला आहे. हे केवळ भावनिक नाही. त्यांच्या लेखनाने आणि सहवासाने माझ्यासह आमच्या पिढीला एक नवा मार्ग दाखवला आहे. तो वाटाड्याच आता आपल्यात राह्यला नाही. लेखक कसा असावा, याचा उत्तम आदर्श म्हणजे जयंत पवार होत. त्यांच्या कथांवर मी लेख लिहिल्यानंतर तो वाचून जी चर्चा झाली होती, ती मला अचंबित करणारी होती. आपल्या लेखनातील एकेका वाक्याबद्दल इतका सजग असणारा आणि दुसऱ्याचेही मन:पूर्वक वाचणारा भालचंद्र नेमाडे यांच्यानंतरचा हा एकमेव लेखक आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

कालच्या मार्च महिन्यातली गोष्ट आहे. राजू देसलेच्या आग्रहामुळे मी त्यांच्या ‘अधांतर’ची शैलीवैज्ञानिक चिकित्सा करणारा लेख लिहिला होता. तो राजूने त्यांना वाचायला पाठवला होता. मलाही त्यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती, म्हणून मी थेट फोन केला. तेव्हा त्यांना बोलता येत नसल्याने त्यांचा मला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला होता. त्यांच्या टंकलिखित मजकूराचा हा माझ्याकडे असणारा शेवटचा पुरावा -

१) ‘‘माफ करा. फोन घेऊ शकत नाही. तब्येत नाजूक झाली आहे. श्वासाला त्रास होत असल्याने घशात ट्युब बसवली आहे. त्यामुळे बोलता येत नाही. काही महत्त्वाचं काम होतं का?” 

२) “मी बरं वाटेल तसं वाचतो. धन्यवाद सर.”

३) “सर, लेख उत्तम झाला आहे. तुम्ही नाटकातील भाषिक वापराचा कमी अवकाशात फार सखोलपणे धांडोळा घेतला आहे. मला या समीक्षेच्या वाचनाने मोठं समाधान दिलं. काही शब्दांच्या चुका अनवधानाने झाल्या आहेत. त्या सुधारता येतील. अभ्यासपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.” (मार्च २१).

ही सगळी विधाने त्यांची आहेत. माणूस जाणार आहे, तो काही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. हे जरी खरे असले तरी त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या अगोदर नुकत्याच गेल ऑम्वेट गेल्या आहेत. बुद्धाशी नाते सांगत ‘बुद्धमय’ भारताचा हजार वर्षांचा इतिहास उजागर करून जगाला ‘बुद्धमय भारता’ची ओळख करून देणाऱ्या गेल मॅडम गेल्या. आणि आता जयंत पवार.

गेल्या दोन वर्षांत आपले सगळे वर्तमान विस्कटून गेले आहे. माणसाचा रोजगार गेला आहे. मानसिकदृष्ट्या माणूस पूर्ण खचला आहे. कौटुंबिक पातळीवर भयंकर हिंसाचार सुरू आहे. माणसाने  मधल्या काळात स्वत:साठी जी स्पेस निर्माण केली होती, तीच तो हरवून बसला आहे. त्यातून एक चिडचिड निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम नवरा-बायकोच्या नात्यावर झाला आहे. दुसरीकडे सगळी मुलं दोन वर्षे झाली घरात बसून आहेत. ऑनलाईन नावाच्या शिक्षणाचा जो काही बाजार उभा राह्यला आहे, त्यात त्यांचे विश्व हरवून बसले आहे. म्हणजे घरात काही मोकळा श्वास घ्यावा, असे वातावरण नाही.

बाहेर पहावे तर काय दिसते? राजकारणी गुंडांपेक्षा खालच्या पातळीवर येऊन साटमारी करत आहेत. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा केव्हाच निकाल लावला गेला आहे. अनेक लेखकांना तुरुंगात टाकले जात आहे. काही जण तेथेच शेवटचा श्वास घेत आहेत. तिकडे अफगाणिस्तान पेटला आहे. तालिबान्यांनी पूर्ण देश ताब्यात घेतला आहे. हाताला रोजगार नाही. बुद्धीला गंज चढत चालला आहे. शेतीमालाला भाव नाही. शेतकरी ट्रकच्या ट्रक टोमॅटो रस्त्यावर ओतून देत आहेत. भाजीपाला कवडीमोलाने विकला जातोय. पिकांवरील रोगांच्या साथी वाढत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. पंजाब हरियाणाचे शेतकरी कृषी कायदे रद्द करा म्हणून दिल्लीच्या सीमेवर सहा महिने उपोषण करत बसले आहेत, त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही.

सगळा अंधार दाटून आला आहे. कुणीच उजेड द्यायला तयार नाही. अशा काळाला आपल्या कवेत घेऊन त्याचा अन्वय लावताना अत्यंत दर्जेदार अशी कथा लिहिणारा, नाटकातून या आजच्या भयावह वर्तमानाला साकार करत भविष्यातील धोक्याच्या दिशा सूचित करणारा महत्त्वाचा नाटककार-कथाकार आज आपण हरवून बसलो आहोत.

काही माणसं सभोवती असली की, जगण्याला बळ येत जातं. भले ती आपल्यापासून कोसो मैल दूर असोत. त्यांच्याशी आपला संवाद फारसा होत नसला तरी ती आपली आहेत, आपण कधी तरी त्यांना भेटलो, बोललो तर जगण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते. अशा माणसांत जयंत पवार होते. पत्रकारितेत असूनही भाषण हा प्रकार त्यांनी कधीही जमवून घेतला नाही. बोलण्यापेक्षा लेखनावर भर देणारे असूनही ते कमी लिहिणारे लेखक होते. परंतु ते जे लिहीत असत, ते काळाच्या किती तरी पुढे जाणार होते.    

एखादा लेखक काळाच्या किती पुढचं पाहतो, याचा प्रत्यय देताना ‘काय डेंजर वारा सुटलाय’ असं सांगत त्यात आपण सगळे भरकटत जाणार आहोत, हे कितीतरी वर्षांपूर्वी जयंत पवार सांगून गेले आहेत. आणि ते आज अक्षरश: खरे ठरताना दिसत आहे. या डेंजर वाऱ्यात आपलं अस्तित्वाचं ‘अधांतर’ होऊ नये म्हणून हा लेखक सतत बोलत आला आहे. नुकताच शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केलेला ‘लेखकाच्या मृत्यू’चा कथासंग्रह मी बाजूला बेडच्या शेजारीच ठेवला होता. त्यातला लेखक मला सतत स्वप्नात येत होता. छोट्या-छोट्या कथांच्या माध्यमांतून जीवनाचे एक वेगळे आकलन मांडणारा हा लेखक भारतीय परंपरेतील लोककथांच्या रूपबंधांचा अत्यंत प्रभावी वापर करतो.  म्हणून त्या कथा मी पुरवून-पुरवून वाचताना माझ्यात मुरवण्याचा प्रयत्न करत होतो.

ह्या लेखकासारखं आपल्याला का लिहिता येत नाही, याचा मला सतत त्रास होत आला आहे. एका अर्थाने मी जयंत पवारांचा मत्सर करत आलो आहे. विशेषत: ‘टेंगशांच्या स्वप्नातील ट्रेन’, ‘वरन्भात लोन्चा कोन नाय कोन्चा’, ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ यांसारख्या कथा वाचताना मला सतत त्यांचा मत्सर वाटत आला आहे. आपल्याला का लिहिता येत नाही या माणसासारखं? या प्रश्नानं छळत राह्यल्यानं त्यांना मी पुन्हापुन्हा वाचत आलो आहे. त्याच्यासारखं नाही, किमान त्याच्याजवळ जाणारं तरी आपल्याला काही लिहिता यायला हवं, असं मला सतत वाटत राह्यलं आहे. म्हणून काल-परवा त्यांच्याशी आपण बोललोय आणि ते आजारी असले तरी आपल्या सोबत आहेत, असे सगळ्यांना वाटत असतानाच ते गेले आहेत.

लेखक म्हणून त्यांची जी काही भूमिका होती, ती अत्यंत पारदर्शी होती. मुंबईतील गिरणगाव आणि तेथील बहुजन विस्थापितांचे चित्र अधिक नेमकेपणाने मराठीत पहिल्यांदा आणताना कथा व नाटकाला एका उंचीवर घेऊन गेलेला लेखक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागतो. निम्नस्तरीय कामगार वर्गाला आपल्या आस्थेच्या ठिकाणी कायम ठेवून नवे साहित्यशास्त्र या लेखकाने मांडले आहे. लोकप्रिय आणि रहस्यात्मक साहित्याच्या रूपबंधांचा वापर करून नाटक आणि कथा अधिक सक्षम आणि प्रयोगशील करणारा मराठीतला एकमेव लेखक आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ते भालचंद्र नेमाडे यांच्याशी आपले वैचारिक नाते सांगत, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ‘बहुजनवादा’चा अधिक नेमका विस्तार करणारा विचारवंत म्हणून जयंत पवार यांचे नाव अजरामर राहील. 

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अत्यंत मितभाषी असणारा हा लेखक तितकाच स्पष्टवक्ता होता. आपल्या एकेका कथेसाठी आणि नाटकासाठी वर्षांनुवर्षं मेहनत घेणारा, सातत्याने चर्चा करणारा आणि स्वत:ला कोंडून घेणारा एकमेव लेखक म्हणजे जयंत पवार. साहित्यातील भाषेचा विस्तार करताना गाव ते महानगर आणि उच्चभ्रू ते फाटक्या माणसांच्या भाषेला कवेत घेऊन नवी शैली घडवणारा अद्वितीय लेखक म्हणजे जयंत पवार. महानगरातल्या गिरणगावाला चिकटून राहून त्यांच्या विस्थापनाच्या विरोधात उभा राहणारा आणि त्यांच्या समग्र शोषणाला नकार देणारा भूमिकानिष्ठ लेखक म्हणून मराठी साहित्यात त्यांचे नाव दिमाखाने घेतले जाते, घेतले जाईल.

यवतमाळ येथे पार पडलेल्या ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला लेखकाने  सत्ताधाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असे सांगताना ते म्हणतात, “आम्ही मराठी लेखकांनी आमचं स्वातंत्र्य सदैव गृहीत धरलं आणि ते कधीही नीट वापरलं नाही, ही गोष्ट खरी आहे. हे स्वातंत्र्य आम्हाला ज्यांच्या कृपेने मिळालं होतं, त्या चक्रधर-ज्ञानेश्वर-तुकारामापासून फुले-आंबेडकर आणि सर्व समाजसुधारकापर्यंत आम्ही साऱ्यांचे गोडवे गायले, पण त्यांनी झेललेले त्रास आणि उपसलेले कष्ट यांचे मोल जाणलं नाही. वाडवडिलार्जित कमाई बसून खावी, तसं हे स्वातंत्र्य काही न बोलता, कृती न करता आम्ही स्वस्थ बसून गंजवून संपवलं. आता ही पत संपल्यावर पुन्हा नव्याने पत निर्माण करण्याची पाळी आमच्यावर आली आहे. कारण संतांना, समाजसुधारकांना छळणारी सनातनी प्रवृत्ती जशीच्या तशी समोर आहे. ती संपलेली नाही, उलट ती आकार बदलत मोठी मोठी होत चालली आहे. तिने उभं केलेलं भयाचं बागुल कसं झुगारून द्यावं, हे लेखकांना कळेनासं झालंय अर्थात, हा प्रश्न ज्यांना डोळ्यांना दिसणारं, जाणवणारं आणि खुपणारं सत्य सांगायचं आहे, अशाच लेखक- कलावंतांबाबत आहे. पण असे लेखक-कलावंत मराठीत कमी नाहीत. नसावेत असं वाटतं.” (रसिक, दिव्य मराठी).

आपल्या परंपरेचे आकलन मांडताना त्यांनी कायम लेखकांच्या जीवनाचा त्यांच्या साहित्याचा आणि त्या-त्या काळाचा एकत्र विचार करून नवी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या आकलनाच्या पटावर आपण कुठे आहोत? असा सतत प्रश्न करत, शोषितांच्या बाजूने उभा राहत आलेला हा लेखक आहे.

रवींद्र लाखे यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, “मराठी रंगभूमीचा प्रवास मला नेहमी बुचकळ्यात टाकतो. मराठी रंगभूमी ही देशातली प्रागतिक रंगभूमी म्हटली गेली तरी ती सतत वाढत अथवा पुढेच गेली आहे असं दिसत नाही; किंबहुना ती दोन पावलं पुढे आणि चार पावलं मागे अशीच सरकताना दिसते. आजही ती कौटुंबिक परिघातच रमते. कौटुंबिकतेची चौकट शहरी, मध्यमवर्गीय आणि संवेदनशीलता ब्राह्मणी आहे. ही चौकट जराही खिळखिळी झालेली नाही. मूल न होणं हा आजही मराठी नाटकांसाठी महत्त्वाचा विषय असतो. ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’, ‘अवध्य’सारख्या नाटकांनी सेन्सॉरशिपच्या विरोधात लढा दिला तरी त्यानंतर पन्नास वर्षांनीही आम्हाला नाटकात शिव्या चालत नाहीत. लैंगिक संबंधावर बोललं किंवा ते दाखवले की आम्ही दचकतो.” (युगवाणी, जाफेमा २०२०). या साचेबंदपणाला ते सतत आपल्या लेखनातून नकार देत आले आहेत.

कष्टाने एखादे सुंदर चित्र निर्माण करायचे आणि त्याच्यावर क्षणात बोळा फिरवून टाकायचा हा धोका एखादाच कलावंत घेऊ शकतो. तो धोका जयंत पवार यांनी सतत आपल्या लेखनात पत्करला आहे आणि त्यात यश मिळवले आहे. ते यश मिळवताना भाषिक कौशल्याची कलात्मक उंची निर्माण करण्यात ते सतत यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे नाटक अथवा कथा कायम वेगळ्या उंचीवर गेली आहे. ही उंची गाठण्यासाठी भाषेशी खेळण्याची जी रिस्क ते घेत आले आहेत, ती पाहण्यासारखी आहे.

त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे कौशल्य आहे ते भाषिक इमारतीच्या रचनेचे. या इमारतीचे कौशल्य आणि व्याकरण त्यांना नीट कळलेले असल्याने, ‘आधी पाया मग कळस’ या पद्धतीने नकाराच्या भाषेचा टोकदारपणा ते वाढवत नेतात आणि शेवटी ज्या उंचीवर तिच्या क्रौर्याच्या सीमा पोचतात, त्या भाषिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात. शेवटी जे घडते ते पाहून आणि वाचून प्रेक्षक-वाचक ‘फ्रीज’ झाल्याशिवाय राहत नाही. तो केवळ फ्रीज होत नाही, तर त्याच्या विचार करण्याच्या सगळ्या शक्यता संपून जातात. एक मोठा डोंगर आपल्यावर कोसळत चालला आहे आणि आपण त्यात गुदमरून जात असताना काहीही करू शकत नाही, ह्याची तीव्र जाणीव त्यांची भाषा करून देते.

ही भाषा एका संभाषितामागे अनेक संभाषिते उभी करत जाते, ज्या संभाषितांचा मोठाच कोरस सतत वाचकांच्या मेंदूवर आदळत राहतो. त्या कोरसाची एक गुंगी वाचकाला सतत जाणवत राहते. ही भाषा इतकी जखडून ठेवते की, त्याला तिच्यातून बाहेर पडता येत नाही. कळसाच्या दर्शनाने माणूस शांत होत असतो, एक वेगळी आध्यात्मिक समाधी त्याला लागत असते. पण येथे भाषेचा नकार जो कळस गाठतो, तो सगळ्या मूल्यव्यवस्थेलाच प्रश्न विचारून भंडावून सोडतो.

यासाठी आपण त्यांच्या ‘अधांतर’ या नाटकातील एका प्रसंगाचा विचार करू. प्रसिद्ध भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की ज्याला ‘रचनांतरणाचे व्याकरण’ म्हणतो, त्या व्याकरणाच्या अनुषंगाने जेव्हा या नाटकाकडे आपण पाहू लागतो, तेव्हा न बोलली जाणारी वाक्ये, बोलल्या जाणाऱ्या वाक्यांच्या मागे कशी दडलेली आहेत, हे सहजपणे लक्षात येऊ शकेल इतका हा संवाद रचनांतरित वाक्यांना अधोरेखित करत राहतो. त्यामुळे दृश्य रूपातल्या संवादापेक्षा अदृश्य संवादाचाच एक परिणाम या नाटकांत सतत जाणवत राहतो. उदाहरण म्हणून एक नमुना पाहता येईल:

मंजू : झाली तुमची मिल चालू? (कसली सुरू होतेय मिल?)

राणे : नाही झाली तर जाळून घेईल गेटसमोर. आत्मदहन. (ती नाहीच होणार)

मंजू : आणि तिच्यामागे मी जिती जळत ऱ्हाईन. (जाळण्याशिवाय तुमच्या हातात दुसरे आहे काय?)

राणे : मग मी काय करू? इकडे ये ना. (जळायचं मरू दे. आधी शरीराच्या आगीचं बघ काय ते.)

मंजू : घरात माणसं आहेत. (मलाही हे सुख हवेच आहे ना!) (पान - १५).

या उदाहरणांत कंसात जे संवाद दिले आहेत ते मुळात नाटकात नाहीत. ते संवाद चॉम्स्की म्हणतो, त्या रचनांतरणाच्या अनुषंगाने लिहिलेले आहेत. असे संवादामागचे संवाद नाटकभर आहेत. एका अर्थाने हा सारा संवादांचा कोरस आहे. हा केवळ काही पात्रांचा संवाद नाही, तर तो संपूर्ण गिरणगावाला कवेत घेणारा संवाद आहे. ही अनेक आवाजीपणाची मोठीच ताकद या नाटकाला केवळ नव्हे तर त्यांच्या समग्र लेखनाला लाभली आहे. साहित्याच्या भाषेचे व्याकरण आणि साहित्यशास्त्र यांचे नेमके आकलन असल्याने त्यांची कथा अथवा नाटक जितके शोकात्म परिणाम साधतात, तितकेच त्यांचे साहित्य वाचनीयही होत जाते. त्यामुळे समग्र मराठीच्या मध्यमवर्गीय अभिरुचीला धक्के देत आपली स्वत:ची अभिरुची निर्माण करणारा मराठीतला हा अत्यंत महत्त्वाचा लेखक आहे. कथेला आणि नाटकाला त्यांनी जी उंची गाठून दिली आहे, ती मराठी साहित्याला दिलेली एक मोठी देणगी आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सच्चा माणूस, उत्तम मित्र, योग्य मार्गदर्शक, आतबाहेर नितळ पारदर्शी असणारा लेखक, सहृदय वाचक, कुटुंबवत्सल पालक म्हणून परिचित असलेला भारतीय पातळीवरील हा लेखक आपल्याच आधीच्या लेखनाची रेषा ओलांडून पुढे जात राहिला. ती रेषा ओलांडण्यासाठी सतत आपल्या कथेवर अथवा नाटकावर कष्ट घेत आलेला हा लेखक अशा संभ्रमाच्या काळात गेला आहे, हे फार नुकसानकारक आहे.

..................................................................................................................................................................

लेखक महेंद्र कदम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Kadam Mahendra

Tue , 31 August 2021

आभार


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......