शैलेन्द्र : ‘गीतकार शैलेन्द्र ही सिनेसंगीताच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली.’
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सतीश बेंडीगिरी
  • कवी-गीतकार शैलेन्द्र
  • Mon , 30 August 2021
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा शैलेन्द्र Shailendra राज कपूर Raj Kapoor बरसात Barsat श्री ४२० Shree 420 गाईड Guide आम्रपाली Amrapali बसंत बहार Basant Bahar तिसरी कसम Tisari Kasam मधुमती Madhumati

हिंदी सिनेगीतांना उंची मिळवून देणारे गीतकार शैलेन्द्र यांची आज जयंती. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

..................................................................................................................................................................

१९४६ साली आयपीटीए (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) यांनी आयोजित केलेल्या कवितेच्या बैठकीत ‘मेरी बगियां में आग लगा गयो रे’ आणि ‘जलता पंजाब’ या कविता सादर करणाऱ्या शैलेन्द्र यांनी त्याच बैठकीला आलेले पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर या दोघांनाही शब्दशः मुग्ध केले.

त्या वेळी राज कपूर ‘आग’ या आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते. राम गांगुली यांना संगीतकार म्हणून करारबद्ध केल्यानंतर चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी नवोदित कवीच्या शोधात असणाऱ्या राज कपूर यांनी शैलेन्द्र यांना चित्रपटासाठी गीत लिहिणार का असे विचारले. त्यावर शैलेन्द्र यांनी ‘मी पैशासाठी लिहीत नाही आणि मला तुमच्या चित्रपटासाठी लिहिण्याचे काही कारण दिसत नाही,’ असे उत्तर दिले. ‘काही हरकत नाही. कधी भेटावेसे वाटले तर आपले नेहमीच स्वागत आहे’, असे सांगून राज कपूर यांनी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड शैलेन्द्र यांना दिले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

शैलेन्द्र यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२७ रोजी रावळपिंडी (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे वडील केसरीलाल आणि आई पार्वतीदेवी बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे बिहारमधून रावळपिंडीला स्थलांतरित झाले. या शहरात कठोर परिश्रम केल्यानंतर केसरीलाल लष्करासाठी एक यशस्वी कंत्राटदार म्हणून काम करू लागले. तथापि ही भरभराट फार काळ टिकली नाही. रेल्वेमार्गावर काम करणारे केसरी लाल यांचे भाऊ या कुटुंबाला मथुरा इथे घेऊन आले.

लहान वयातच शैलेन्द्र यांनी आपल्या आईला गमावले. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक रितेपणा भरून राहिला होता. ते अंतर्मुख स्वभावाचे बनले होते. मथुरा येथे शिक्षण घेत असताना इंद्र बहादूर खरे नावाच्या एका कवीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी कविता रचण्यास सुरुवात केली. आग्रा शहरात छापले जाणारे एक मासिक त्यांच्या कविता प्रकाशित करत होते. सुरुवातीला ‘शचीपती’ या टोपणनावाने त्यांनी या कविता लिहिल्या. नंतर त्यांनी हे  नाव बदलून शैलेन्द्र असे ठेवले. त्यांचे खरे नाव शंकरदास असे होते.

१९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात जाऊन आल्यावर त्यांच्या विचारसरणीत डाव्या विचाराचा पगडा बसला. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील परेलच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. रेल्वे क्वार्टरच्या खोलीत बसून कविता करणाऱ्या शैलेन्द्र यांच्या कविता सुप्रसिद्ध हिंदी लेखक प्रेमचंद संपादक असणाऱ्या ‘हंस’ या हिंदी मासिकात छापून येऊ लागल्या.

१९४८ साली नातेवाईकांच्या एका लग्नाला हजर राहण्यासाठी झाशी शहरात गेलेल्या शैलेन्द्र यांची दूरच्या नात्यातली शकुंतला हिच्याशी गाठ पडली. पुढे त्यांनी तिच्याशी लग्न केले. दोघे मुंबईला परतले. रेल्वेच्या नोकरीत मिळणारा तुटपुंजा पगार आणि अपत्याला जन्म देणारी शकुंतला अशा परिस्थितीत आर्थिक ओढाताण सहन करत असतानाच शैलेन्द्र यांना राज कपूर यांचे शब्द आठवले.

त्यांनी राज कपूर यांची त्यांच्या चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत भेट घेतली. राज कपूर यांनी ‘बरसात’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती आणि त्यासाठी शीर्षकगीतासह एक गीत शैलेन्द्र यांनी लिहावे, यासाठी पाचशे रुपये देऊ केले. शैलेंद्र यांनी दोन गाणी लिहिली- ‘बरसात में हम से मिले तुम सजन’ आणि दुसरे ‘पतली कमर हैं, तिरछी नजर हैं’.

या दोन गाण्यांना अनुक्रमे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी आवाज दिला. मुकेशनी गायलेल्या ‘पतली कमर हैं, तिरछी नजर हैं...’ या धुंद आणि बेहोशी आणणार्‍या स्वरांशी परिचय झाल्यानंतर शैलेन्द्रच्या शब्दांची मोहिनी केवळ राज कपूर यांना काय पण हिंदी सिनेसंगीत ऐकणाऱ्या तमाम रसिकांना पडली. ‘बरसात’ या सिनेमाने इतिहास घडवला. त्यानंतर हसरत जयपुरी, शंकर-जयकिशन, मुकेश यांच्यासह शैलेन्द्र आर. के. फिल्म्सचे अविभाज्य घटक बनले. ‘बरसात’पासून ‘मेरा नाम जोकर’पर्यंतच्या बऱ्याच चित्रपटांसाठी शीर्षक गीते व इतर गाणी शैलेन्द्र यांनी लिहिली.

१९५० आणि १९६०च्या दशकात भारतात तारुण्यावस्थेत असणारी आणि आज ज्येष्ठ झालेली मंडळी यांनी शैलेन्द्र यांची ‘आवारा हूँ’ आणि ‘मेरा जूता हैं जपानी’ ही मुकेश यांनी गायिलेली गाणी ऐकली नाहीत असे होणे केवळ अशक्य. तेव्हा सिनेमा भारताच्या अंतर्गत भागात पोहोचला नव्हता, पण रेडिओच्या लोकप्रियतेमुळे  लाखो लोकांनी त्यांची ही गाणी ऐकली आणि गुणगुणली. शैलेन्द्र यांनी लिहिलेल्या असंख्य गाण्यांपैकी ही दोन गाणी भारतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्वकाळातील सर्वांत जास्त ओळखली जाणारी हिंदी गाणी आहेत. ‘आवारा हूँ’ हे गाणे रशियन लोकांनी डोक्यावर घेतल्यानंतर शैलेन्द्र यांनी रशियन भाषेचाही अभ्यास केला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

शैलेन्द्रमध्ये कवी व गीतकार यांचा सुरेख संगम होता. त्यांच्या बोलण्यात गोडवा होता. नम्रता होती व त्याचबरोबर दांडगा आत्मविश्वास होता. त्यांनी कधी उडवाउडवी वा लपवाछपवी केली नाही. अहंकार दाखवला नाही. माटुंग्याच्या रेल्वेच्या कारखान्यात काम करत असताना त्यांनी गरिबी, दारिद्र्य काय असते याचे अनुभव घेतले होते. ते ट्रेड युनियनची कामे करायचे. घरदार नसलेले, फूटपाथवर झोपणारे, तेथेच संसार करणारे, दिवसरात्र भटकणारे, मिळेल ते काम करणारे, नाही मिळाल्यास उपाशी राहणारे, चोरीमारी करणारे शेकडो लोक त्यांनी त्या काळात पाहिले. स्वतःच्या लहानपणातल्या दारिद्र्याच्या ओळी त्यांनी ‘श्री ४२०’ या राज कपूरच्या चित्रपटातील ‘दिल का हाल सुने दिलवाला’ या गाण्यात अशा लिहिल्या –

“छोटे से घर में गरीब का बेटा,

मैं भी हूँ माँ के नसीब का बेटा,

रंजो गम बचपन के साथी,

आंधियों में जले जीवनबाती,

भूख ने हैं बडे प्यार से पाला.”

पण असं सांगतानाच स्वतःची दुःखं इतरांना सांगू नका, रडगाणे गाऊ नका, असा संदेश देताना ते लिहितात,

“सुनो मगर ये किसी न कहना,

तिनके का ले के सहारा ना बनना,

बेमौसम मल्हार ना गाना,

आधी रात को मत चिल्लाना,

वरना पकड लेगा पुलिसवाला.”

शैलेंद्र यांच्या जवळपास प्रत्येक गीतात एखादे तत्त्वज्ञान असतेच. ‘श्री ४२०’मधील ‘मेरा जुता हैं जपानी’ या केवळ साध्या मुखड्याने सुरुवात होणाऱ्या गाण्यात,

“ऊपर नीचे नीचे ऊपर लहर चले जीवन की,

नादाँ हैं जो बैठ किनारे पूछें राह वतन की, 

चलना जीवन की कहानी, रुकना मौत की निशानी”

असं सहज जाता जाता सांगणारे शैलेन्द्र ‘अनाडी’मध्ये म्हणतात,

“मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी, 

जले बहार के लिये वो ज़िन्दगी...”

देव आनंदच्या ‘गाईड’मधले बर्मनदानी गायलेले ‘वहां कौन है तेरा’ म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा अर्कच म्हणायला हवे.

“कहते हैं ग्यानी, दुनिया है फ़ानी,

पानी पे लिखी लिखायी, है सबकी देखी,

है सबकी जानी हाथ किसीके न आयी..

कुछ तेरा ना मेरा, मुसाफ़िर जायेगा कहाँ…”

‘सीमा’ चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले ‘तू प्यार का सागर है’ तर विसरणे शक्यच नाही.

‘इधर झूमके गाए जिंदगी, उधर है मौत खड़ी, 

कोई क्या जाने कहाँ है सीमा,

उलझन आन पड़ीऽऽऽ

उलझन आन पड़ी कानों में जरा कह दे,

कि आएँ कौन दिशा से हम...

(एकीकडे हवंहवंसं वाटणारं आयुष्याचं आकर्षण आणि तिथं कवेत लपेटून घेणारा मृत्यू उभा आहे. कसल्या कोड्यात टाकलंय तू मला? कुठं जाऊ मी नेमकं? जन्म-मृत्युच्या नेमक्या सीमा आहेत तरी कुठे? मी विनंती करतो की, तू कृपा करून माझ्या कानात सांग, मी कुठल्या दिशेनं यावं तुझ्याकडे!) अशी कल्पना केवळ शैलेन्द्रच करू शकतात.

‘आम्रपाली’ या चित्रपटातील ‘जाओ रे, जोगी तुम जाओ रे...’ यात तत्त्वज्ञान सांगताना,

‘‘जीवन से कैसा छुटकारा है नदिया के साथ किनारा, 

ग्यान कि तो है सीमा ग्यानी, 

गागर में सागर का पानी”

असं ते सहज लिहून जातात.

शैलेन्द्र यांनी त्या काळच्या जवळजवळ सर्व संगीतकारासाठी गाणी लिहिली. आशयगर्भ गीते लिहून चित्रपटगीतांना कलेच्या उंचीवर नेऊन बसवले. ‘मधुमती’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार सलील चौधरांना मिळाला, तेव्हा त्यांनी शैलेन्द्र यांचे आभार मानले. त्यांनी ‘मधुमती’साठी १) जुल्मी संग आँख लड़ी, २) आजा रे परदेसी, ३) चढ़ गयो पापी, ४) दिल तड़प तड़प के, ५) घड़ी घड़ी मोरा दिल, ६) हम हाल-ऐ-दिल सुनाएंगे, ७) जंगल में मोर नाचा, ८) सुहाना सफ़र, ९) टूटे हुये ख़्वाबों ने... ही गाणी लिहिली.

संस्कृत प्रचुर हिंदी शब्द वापरून लिहिलेली ‘बसंत बहार’ या चित्रपटातली गाणी बरीच गाजली. ‘भयभंजना सुन हमारी’ यातल्या ‘आजा मधुर स्वप्नसी मुस्कराती, मन के बुझे दीप हंसकर जलाती’ अशा प्रसन्न ओळी लिहिणारे शैलेन्द्र ‘बडी देर भई’ या गीतात ‘कहते है तुम हो दया के सागर, फिर क्यूं मेरी खाली गागर, झूमे झुके कभी ना बरसे कैसे हो तुम घनश्याम’ असे लिहिताना दुसऱ्या ओळीत घनश्याम शब्दाची ‘कधीही न बरसणारा काळा (श्याम) असा ढग (घन)’ असा  सुंदर श्लेष साधतात.

फणिश्र्वरनाथ रेणू यांच्या ‘मारे गए गुलफाम’ या पुस्तकावर आधारित ‘तिसरी कसम’ नावाचा चित्रपट काढावा असे शैलेन्द्र यांनी ठरवले. हिरामण गाडीवाल्याच्या भूमिकेत राज कपूर यांनी जान ओतली, तर नौटंकीवाली हीराच्या भूमिकेत वहिदा रेहमान यांनी कारकिर्दीतील सर्वोत्तम नृत्ये केली. शैलेन्द्रच्या ‘हाय गजब कहीं तारा टूटा’, ‘पान खाए सैंया हमार’, ‘आ आभी जा रात ढलने लगी’, ‘सजनवा बैरी होगए हमार’, ‘सजन रे झूट मत बोलो’ या गाण्यांनी कहर केला. परंतु पाच वर्षे चित्रीकरण चाललेला हा श्यामधवल रंगातला चित्रपट कोसळला. शैलेन्द्र भावूक झाले. ‘चिठिया हो तो हर कोई बाचे, भाग ना बाचे कोय’ असं याच चित्रपटासाठी लिहिणाऱ्या शैलेन्द्र यांना स्वतःचे भाग्य वाचता आले नाही. नशिबाने दगा दिला आणि शेवटी भाग्यविधात्याकडे राज कपूर यांच्या जन्मतिथीलाच म्हणजे १४ डिसेंबर १९६६ रोजी कायमचे गेले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

शैलेन्द्र यांना १) ‘ये मेरा दीवानापन है’ (चित्रपट- यहुदी), २) ‘सबकुछ सीखा हमने’( चित्रपट- अनाडी), आणि ‘मैं जागूं तुम सो जाओं’ (चित्रपट - ब्रह्मचारी) या तीन गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाली.

शैलेन्द्र फक्त ४३ वर्षांचे आयुष्य जगले. ‘ये रात भीगी भीगी’ या गाण्यातल्या दुसऱ्या कडव्यातल्या अंतर्मुख करणाऱ्या ‘जो दिन के उजाले में न मिला, दिल ढूंढे ऐसे सपने को, इस रात की जगमग में डूबी मैं ढूंढ रही हूं अपनेको’ या ओळी ऐकल्यावर गीतकार गुलज़ारचे शब्द आठवतात- “गीतकार शैलेन्द्र ही आमच्या गीतकारांच्या दुनियेत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट होती. चित्रपटगीतांना शैलेंद्रने साहित्याची उंची गाठून दिली.”

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

२०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण

विज्ञान-काल्पनिकांचा विस्तृत पट मला नेहमी खुणावतो. या वर्षी हा पट किती विस्तारला? काय नवीन अनुभवायला शिकायला मिळालं? या प्रश्नांची उत्तरं शोधावी म्हणून प्रस्तुत लेखात २०२४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्यून पार्ट टू’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘द वाइल्ड रोबॉट’ आणि ‘द सबस्टन्स’ या चार साय-फाय सिनेमांचं स्वैर रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच चार कलाकृती का? कारण कामाव्यतिरिक्त उपलब्ध वेळात एवढंच पाहू शकलो.......