कॉम्रेड डॉ. गेल ऑम्वेट यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी सर्वप्रथम सोशल मीडियावरून समजली. मार्क्सवादी व आंबेडकरवादी विचारवंत, दलित-आदिवासी-महिला इत्यादी कष्टकरी समूहांच्या पक्षपाती आणि त्यांच्या चळवळीत वैचारिक व सक्रियरीत्या भागीदारी करणाऱ्या अशी त्यांची बहुविध ओळख होती. त्यामुळे कॉ. ऑम्वेट यांच्या निधनाने डॉ. भारत पाटणकर यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे वैयक्तिक नुकसान तर झालेच, पण त्याचबरोबर देशातील वरील जनसमूहांचेही अपरिमित नुकसान झाले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्या गंभीर आजारी असल्याचे समजत होते. त्यांचा अलीकडचा वाढदिवसही पाटणकर कुटुंबीयांनी अत्यंत भावनात्मक रीतीने साजरा केला होता. कॉ. ऑम्वेट यांना सर्वसाधारण हालचाली करणेही कठीण झाले होते, असे त्यावरून वाटत होते. शेवटी वयाच्या ८१ व्या वर्षी २५ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर अजूनही कष्टकरी चळवळीत सक्रिय असतात, त्याचबरोबर त्यांची मुलगी आणि जावई यांचे वास्तव्य अमेरिकेत असले तरी तेही तेथील चळवळीत सक्रिय असतात. ही या कुटुंबीयांनी केलेल्या त्यांच्यावरील संस्काराची मोठीच जमेची बाजू आहे.
महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक चळवळी’चा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतून भारतात आलेल्या कॉ. ऑम्वेट महाराष्ट्रातील ‘लाल निशाण पक्षा’च्या संपर्कात आल्या. सुरुवातीच्या काळात त्यांचे वास्तव्य या पक्षाच्या मुंबईतल्या दादर येथील ‘श्रमिक’वरच होते. त्यांनी ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ (कल्चरल रीव्होल्ट इन कलोनियल सोसायटी) हा आपला पीएच.डी.चा प्रबंध अमेरिकेच्या बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर करून डॉक्टरेट पदवी संपादन केली. इंग्रजीतून लिहिलेला त्यांचा हा प्रबंध लाल निशाण पक्षाच्या ‘शास्त्रीय समाजवादी शिक्षण संस्था’ या ट्रस्टने प्रकाशित केला आहे. डाव्या चळवळीत जगभर मान्यता पावलेल्या या अभ्यासपूर्ण प्रबंधाचे लाल निशाण पक्षाचे कोल्हापूर येथील पुढारी कॉ. पी.डी. दिघे यांनी मराठी अनुवाद केला, तो सुगावा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
डॉ. भारत पाटणकर हेही मुंबईत राहून लाल निशाण पक्षाशी संबंधित ‘मुंबई कापड कामगार संघटने’त गिरणी कामगार आघाडीवर काम करत होते. डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या १९८२च्या गिरणी कामगार संपातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
दरम्यानच्या काळात डॉ. पाटणकर व कॉ. ऑम्वेट यांचा विवाह लावून देण्यातही पुण्यातील लाल निशाण पक्षाचे कॉ. आप्पासाहेब भोसले व कॉ. लीलाताई भोसले यांचा सहभाग होता. त्यांच्याच घरी उभयतांचा विवाह झाला. रूढार्थानं ज्याला ‘कन्यादान’ म्हणतात, तसे कॉ. आप्पासाहेब भोसले यांनी कॉ. ऑम्वेट यांचे कन्यादान केले असल्याचे डाव्या चळवळीत सर्वश्रुत आहे.
पुढे चालून कॉ. भारत पाटणकर यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली ‘श्रमिक मुक्ती दल’ नावाची संघटना उभारली आणि मुख्यत: धरणग्रस्त व समन्यायी पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यातही कॉ. ऑम्वेट यांचा सहभाग राहिला आहे. त्याचबरोबर त्यांची भारतातील डाव्या चळवळीत योगदान करण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती चालू होती. त्यांनी आतापर्यंत डाव्या, दलित, महिला प्रश्नांशी व बौद्ध धर्माशी संबंधित पुस्तकरूपाने बरेच लिखाण केले आहे. विविध दैनिके व मासिकांतूनही त्यांचे बरेच लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या निधनानंतरचा हा ठेवा पुढील काळात या चळवळीला निश्चितपणे फलदायी होणार आहे.
अमेरिकन राज्यकर्त्यांनी जगभरातील विविध देशांत केलेल्या रक्तरंजित हस्तक्षेपामुळे, तसेच अनेक देशांवर लादलेल्या युद्धामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये अमेरिकेबद्दल एक प्रकारचा द्वेष तयार झाला आहे. बांगला देश निर्मितीच्या वेळेस पाकिस्तानला मदत म्हणून अमेरिकेने पाठवलेल्या सातव्या आरमारामुळे तर अमेरिकेबद्दलच्या द्वेषात आणखीच भर पडली.
पण अमेरिकन राज्यकर्ते व अमेरिकन नागरिक यांच्यात फरक आहे. एवढेच केवळ नव्हे तर ते परस्पर विरोधी आहेत, ही बाब अमेरिकेतील अनेक विचारवंत, साहित्यिक, लेखक व पत्रकारांनी कित्येकदा सिद्ध केली आहे. जॉन रीड, एडगर स्नो, हावर्ड फास्ट, नॉम् चॉस्की ही त्यापैकी काही नावे. या यादीत कॉ. ऑम्वेट यांचाही समावेश होतो.
अमेरिकन पत्रकार जॉन रीड यांनी ‘जगाला हलवून टाकणारे दहा दिवस’ हे रशियन क्रांतीवरचे पुस्तक प्रत्यक्ष तेथे हजर राहून लिहिले. रशियन कामगार क्रांती प्रत्यक्षात कशी झाली, याची ओळख जगातील तमाम जनतेला त्यांच्या या पुस्तकातून होते. त्यांच्या या पुस्तकाचा जगातील अनेक भाषांत अनुवाद झाला आहे.
चीनमधील कॉ. माओ-त्से-तुंग यांच्या नेतृत्वाखालील ‘लाँग मार्च’ही असाच जगप्रसिद्ध आहे. चिनी कम्युनिस्ट क्रांतीत त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एडगर स्नो यांनी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन, माओ-त्से-तुंग यांच्या मुलाखती घेऊन ‘रेड स्टार ऑन चायना’ (चीनवर लाल तारा) हे पुस्तक लिहिले. त्यातून ‘लाँग मार्च’मध्ये किती आणि कशा जीवघेण्या अडचणी होत्या, पण चिनी जनता त्या सर्व अडचणीवर मात करून कसा संघर्ष करत आहे व आपले भवितव्य घडवत आहे, याची माहिती एडगर स्नो यांनी जगाला करून दिली.
असे अनेक अमेरिकनांचे कर्तृत्व आहे. त्यात कॉ. ऑम्वेट यांनीही भर घातली आहे. त्यांनीही ‘कल्चरल रीवोल्ट इन कलोनियल सोसायटी- द नॉन ब्राह्मीण मूव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया’, ‘दलित अँड डेमोक्रेटिक रिवोल्यूशन’, ‘अंडरस्टँडिंग कास्ट : फ्राम बुद्ध टू अम्बेडकर अँड बियान्ड’, ‘न्यू सोशल मूव्हमेंट इन इंडिया’, अशी इंग्रजीतून एकंदर पंचवीसेक पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी काहींचा मराठी, हिंदी व इतर भाषांत अनुवाद झाला आहे. परंतु बऱ्याच पुस्तकांचा अनुवाद होण्याची गरज आहे. पुढील काळात तो होईल, अशी आशा करूया.
महाराष्ट्रात कॉ. ऑम्वेट यांच्याआधी अमेरिकन विदुषी डॉ. एलिनार झेलियेट या आल्या होत्या. त्यांनीही महाराष्ट्रात राहून आंबेडकरवादी चळवळीचा अभ्यास केला. बरेचसे लिखाणही केले. पुण्यातील दलित वस्तीतून, काही झोपडपट्ट्यांतून फिरून त्यांनी त्यांच्या प्रश्नाचा अभ्यास केला. त्यांच्याही लिखाणाची चळवळीला मदत झाली. वयाच्या अखेरीला त्या अमेरिकेत परत गेल्या व तेथेच त्यांचे देहावसान झाले.
कॉ. ऑम्वेट यांची त्यांच्याशी ओळख होती. भेटीगाठीही होत होत्या. पण कॉ. ऑम्वेट यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. आपल्या अभ्यासासाठी त्यांनी देशभरच्या विविध विद्यापीठांत, संशोधन संस्थांत काही वर्षे थांबून अभ्यास केला. व्याख्याने दिली. लेख लिहिले आणि शेवटी येथील मातीतच विलीन झाल्या.
थोडक्यात त्या ‘राष्ट्रवादी’ तर होत्याच, पण कम्युनिस्ट विचारसरणीप्रमाणे खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीयवादी’ ठरल्या. हे त्यांचे एक वेगळेपणच म्हणावे लागेल. अर्थात त्यामुळे इतरांच्या कामाचे महत्त्व कमी होत नाही.
डॉ. भारत पाटणकर यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे- ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’. त्यात त्यांनी भारतातील श्रमण (बौद्ध) व ब्राह्मण संस्कृतीत झालेल्या संघर्षाचे वर्णन केले आहे. कार्ल मार्क्स यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे- ‘आजपर्यंतच्या विचारवंतांनी जगाचा अर्थ लावण्याचा खूप प्रयत्न केला आहे, परंतु खरा प्रश्न आहे तो हे जग बदलण्याचा’. मार्क्सच्या या मार्गदर्शनानुसार कॉ. ऑम्वेट विचारवंत तर होत्याच, परंतु ‘हे जग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या’ सक्रिय कार्यकर्त्यासुद्धा होत्या.
कॉ. गेल ऑम्वेट व माझी प्रथम ओळख मुंबई येथील लाल निशाण पक्षाचे कम्यून असलेल्या ‘श्रमिक’वरच झाली. तिथे कॉ. एस. के. लिमये, त्यांची नात, नातू निला व संजय, कॉ. कमलाबाई फाटक, कॉ. यशवंत चव्हाण, विमलाबाई चव्हाण, कॉ. माधव चव्हाण, कॉ. लक्ष्मण मिस्त्री, कॉ. दत्ता देशमुख, कॉ. बाबुराव भोसले, कॉ. अक्रमभाई, कॉ. दीपक भालेराव, कॉ. दलाल, कॉ. दत्ता चक्रे, कॉ. कल्याण चोरगे, कॉ. चांगदेव शिंदे, तसेच सातारा जिल्ह्यातील महापुरे आणि नागपूरचे दत्ता चक्रे यांचे मित्र गजभिये, नंतर कॉ. कृष्णा केमुसकर इत्यादी कार्यकर्ते राहत असत.
आम्हा कार्यकर्त्यांची कॉ. ऑम्वेट यांच्याशी चांगलीच गट्टी जमली होती. त्याही सर्वांशी मिळून-मिसळून वागत. एव्हाना त्यांनी मराठी भाषाही बऱ्यापैकी अवगत केली होती. त्यांनी अमेरिकेतून भरपूर साहित्य आणले होते. त्यात खूप पुस्तके होती. त्यांचे सर्व सामान ‘श्रमिक’वरच होते. त्यात एक मूव्ही कॅमेरा, छोटेसा प्रोजेक्टर व त्यातून चित्रपट दाखवण्यासाठी लहानसा पांढरा पडदाही होता. तिकडील काही चित्रपट त्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना दाखवले होते. ‘आमची मराठी भाषा तुमच्या इंग्रजीपेक्षा शिकायला सोपी आहे’, असे आम्ही त्यांना म्हटल्यावर त्यांनी त्यास नकार दिला. मराठी भाषा शिकायला खूप कठीण आहे, असे म्हणून त्यांनी काही शब्दांतील फरकच कळत नाही, असा उल्लेख करून त, थ, द, ध, ड, ढ अशी उदाहरणे दिली.
मी जेव्हा माझ्या गावी परत गेलो, तेव्हा कॉ. ऑम्वेट यांचा शेतमजूर महिलांच्या मुलाखतीचा एक कार्यक्रम माझ्या घरी ठेवला होता. ऑम्वेट व जमलेल्या शेतमजूर स्त्रियासुद्धा जाम खुश होत्या. या मुलाखतीत त्यांनी शेतमजूर महिलांशी झालेली चर्चा त्यांच्या टेपवर रेकॉर्ड केली होती. मुलाखती संपल्यानंतर त्या त्यांनी जमलेल्या महिलांना पुन्हा वाजवून दाखवल्या. त्या वेळी साधे टेपरेकॉर्डरही कोणाच्या पाहण्यात नव्हते. ‘आपला आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येतो’ यामुळेच बहुसंख्य स्त्रिया हरखून गेल्या होत्या.
एनडीटीव्हीवर त्यांच्या निधनाचे वार्तांकन करताना रवीशकुमार यांनी आपल्या ‘प्राईम टाईम’च्या अखेरीस त्यांच्या कार्याची ओळख करून देत असताना, दलित महिलांच्या प्रश्नासंबंधाने ज्या कामिनीबाईंचा उल्लेख केला, त्या वरील कार्यक्रमातीलच एक महिला होत्या.
यवतमाळच्या नगर वाचनालयात त्यांच्या भाषणाचा एक कार्यक्रम ठेवला होता. आमच्या गावच्या शाळेतही विद्यार्थ्यांसमोर त्यांचा एक कार्यक्रम झाला. नंतर खामगावला मी त्यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. तो तेथील नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतीत आयोजित केला होता. कॉ. शालिग्राम सारसर हे स्वतः मेहतर समाजाचे व तेथील आमच्या पक्षाशी संबंधित युनियनचे पदाधिकारी होते. कार्यक्रमानंतर तेथेच त्यांचे जेवणही ठेवले होते. कॉ. ऑम्वेट कोणत्याही समाजाशी पूर्णपणे मिळून-मिसळून वागणाऱ्या होत्या.
पुढे मी औरंगाबादला स्थायिक झालो. कॉ. ऑम्वेट जेव्हा जेव्हा मराठवाडा विद्यापीठात, शहरात चर्चासत्रे व परिसंवादात सहभाग घेण्यासाठी येत, तेव्हा आमच्या भेटी होत असत. औरंगाबादला तिसरे विद्रोही साहित्य संमेलन झाले होते. त्यासाठीही त्या आल्या होत्या. त्या कोठे नव्हत्या? महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, महिला यांच्या जेथे जेथे चळवळी चालू असतील, तेथे तेथे त्यांची उपस्थिती असायची. मध्यंतरी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध डाव्या व आंबेडकरवादी पक्ष- संघटनांची मिळून ‘दलित अत्याचार विरोधी संघर्ष समिती’ स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या वतीने जातीअंताच्या परिषदाही राज्यातील अनेक शहरांतून घेण्यात आल्या. पुणे ते कोल्हापूर अशी ‘जातीअंत यात्रा’ काढण्यात आली. वरील सर्व कार्यक्रम आयोजनाच्या बैठकाही सतत चालू असत. कॉ. पाटणकर आणि कॉ. ऑम्वेट त्यास उपस्थित राहत असत.
इतकेच नव्हे तर देशभर गाजलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणी वरील समितीच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मी, कॉ. प्रतिमा परदेशी, कॉ. किशोर ढमाले, डॉ. भारत पाटणकर व इतर कार्यकर्ते गेलो होतो. या समितीच्या एक घटक म्हणून कॉ. ऑम्वेटही आमच्यासोबत होत्या.
मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात गाजलेल्या शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या आंदोलनातही त्या सक्रिय सहभागी होत्या. या संघटनेच्या कार्यकारिणीच्या त्या एक सभासदही होत्या. शेतकरी संघटनेचे एक अधिवेशन औरंगाबाद येथे झाले होते. त्यापूर्वी त्यांच्या कार्यकारणीची बैठक औरंगाबादेतील सुभेदारी गेस्ट हाऊसवर ठेवली होती. त्यालाही त्या आल्या होत्या. मी त्यांना भेटायला गेलो असता बैठक चालू असूनही वेळ काढून त्या मला भेटायला बाहेर आल्या होत्या. दुसऱ्या दिवशीच्या खुल्या अधिवेशनात त्यांचे जाहीर भाषण झाले.
शेतकरी संघटनेने महिलांच्या प्रश्नावर चांदवड येथे परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्रातील महिलांची ती एक मोठी चळवळ होती, असे म्हणायला पाहिजे. कॉ. ऑम्वेट या जशा परित्यक्त्या महिलांच्या परिषदांना हजर राहून त्यांचे प्रश्न समजून घेत, तशाच शेतकरी स्त्रियांच्या या हालचाली असल्याचे त्यांचे मत होते. म्हणून चांदवडच्या महिला परिषदेतही त्यांचा सहभाग होता.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
शेतकरी संघटनेचे हे आंदोलन श्रीमंत शेतकऱ्यांचे आंदोलन असून त्यातून गरीब-कष्टकरी शेतकऱ्यांचा फारसा फायदा होणार नाही. शेतीमालाच्या भाववाढीच्या आकर्षक मागणीतून गरीब-कष्टकरी शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक होत आहे, अशी लाल निशाण पक्षाची भूमिका होती. म्हणून पुढे चालून जागतिकीकरणाचे पुरस्कर्ते बनलेल्या या आंदोलनापासून लाल निशाण पक्ष चार हात दूरच होता. अशा मतभेदाबद्दलही त्या भेटीत आमची ओझरती चर्चा झाली होती.
बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीरामजी यांचे सुरुवातीच्या काळात पुण्याला बराच काळ वास्तव्य होते. कॉ. ऑम्वेट याही पुण्याला कॉ. आप्पासाहेब भोसले यांच्याकडे मुक्कामी असत. कांशीरामजी आणि कॉ. ऑम्वेट यांची आंबेडकरवाद व दलित चळवळीबद्दल बरीच गहन चर्चा होत असे. स्वतः कांशीरामजी या दोन्हीचे अभ्यासक होते. तरीही ‘कॉ. गेल ऑम्वेट यांच्यापासून मला बरेच काही शिकायला मिळाले’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. नंतर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कारही केला होता.
देशातील व राज्यातील दलित, शोषित, पीडित समूहांच्या आंदोलनात काही मतभेद ठेवूनही सक्रियपणे सहभागी होणे हा त्यांचा स्वभावधर्मच होता. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूबद्दल देशभरातील अनेक विचारवंतांनी, पत्रकारांनी, विविध लहान-मोठ्या पक्ष व संघटनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
कॉ. गेल ऑम्वेट आपले संपूर्ण कार्य, निसर्गक्रमाने थांबवेपर्यंत करत राहिल्या. त्या कार्याचाच भाग म्हणून त्यांनी जे लिखित स्वरूपात त्यांचे विचार पाठीमागे ठेवले आहेत, त्यानुसार आपण कार्य करत राहणे, त्यांच्या विचारांचा प्रसार करत राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. लाल निशाण पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या कुवतीनुसार हे कार्य पार पाडण्याचा प्रयत्न निश्चितच करतील.
कॉ. गेल ऑम्वेट यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रीय जीवनात व देशाच्या वैचारिक क्षेत्रात उमटलेला आहे…
..................................................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment