भारतीय पातळीवरील प्रयोगशील दिग्दर्शकांची ओळख करून देणाऱ्या मासिक सदरातील हा आठवा लेख...
..................................................................................................................................................................
‘यशाला प्रश्न विचारायचा नसतो’, सुकुमार बंद्रेद्दी या तेलुगू दिग्दर्शकाच्या ‘नन्नाकू प्रेमाथो’ या चित्रपटातील हे वाक्य त्याच्या वैयक्तिक आयुष्याला चपखल बसते. आंध्र प्रदेशातील मत्तापर्रू या खेड्यात जन्माला आलेल्या सुकुमारने आपण कधी चित्रपटाच्या झगमगाटी विश्वात प्रवेश करू, असा विचारदेखील केला नव्हता. गणित विषयाचं पदव्युत्तर शिक्षण घेऊन तो काकिनाडा येथील महाविद्यालयात गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांचे अध्यापन करू लागला होता. पण या चाकोरीबद्ध आयुष्याला तो लवकरच कंटाळला आणि लेखनाच्या आवडीमुळे चित्रपट-लेखनाकडे वळला.
भन्नाट कल्पनाशक्ती असलेल्या सुकुमारला तेलुगू चित्रपटसृष्टीने लगेचच स्वीकारलं. चित्रपट माध्यमाकडून केवळ मनोरंजनाची अपेक्षा करणाऱ्या या जगात सुकुमारचं बस्तान बसलं. व्ही. व्ही. विनायक राव यांच्या ‘दिल’ या चित्रपटाच्या निर्मितीत त्याने सहाय्यक म्हणून काम केलं. राव तेलुगूमधील मसाला चित्रपट दिग्दर्शित करणारे लोकप्रिय दिग्दर्शक. त्यांच्या चित्रपटनिर्मिताचा थेट प्रभाव सुकुमारवर पडला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्याच्या पहिल्याच ‘आर्या’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शंभर टक्के मनोरंजनाची हमी देणारा दिग्दर्शक म्हणून सुकुमारला त्याच्या पहिल्याच चित्रपटाने ख्याती मिळवून दिली. ‘आर्या’ने केवळ आंध्र प्रदेशमध्येच नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांच्या सीमा भागांतदेखील प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवली. २००४मध्ये प्रदर्शित झालेला ‘आर्या’ अजूनही त्या भागात गर्दी खेचतो आहे.
तेलुगू चित्रपटसृष्टीच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर लक्षात येते की, सुरुवातीच्या काळापासूनच या चित्रपटसृष्टीला भव्यदिव्यतेचा सोस आहे. ‘रोहिणी’, ‘विजयवाहिनी’ आणि आताची ‘रामोजी राव फिल्मसिटी’ या स्टुडिओमधून निदामार्थी बंधू, एस. एस. नारायण, बी. एन. रेड्डी, बी. नागी रेड्डी यासारख्या निर्माता दिग्दर्शकांनी असंख्य चित्रपटांची निर्मिती केली आहे. एन. टी. रामराव, ए. नागेश्वर राव या सुपरस्टार्सनी तेलुगू चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे.
पन्नासच्या दशकात ‘पाताल भैरवी’, ‘माया बाजार’, ‘मल्लेश्वरी’ हे चित्रपट लोकप्रिय झाले आणि त्यांनी चित्रपट माध्यमाकडे पाहण्याची प्रेक्षकांची एक विशिष्ट दृष्टी तयार केली. चित्रपटाच्या कलामूल्यांपेक्षा त्यातील मनोरंजनमूल्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. हिंदी व्यावसायिक तोडीचे किंबहुना त्यापेक्षा अधिक चांगल्या व्यावसायिक दर्जाचे चित्रपट तेलुगू चित्रपटसृष्टी निर्माण करू लागली. के. विश्वनाथ, के.एन. टी. शास्त्री या दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटातून कलात्मकता जपण्याचा प्रयत्न केला, पण बहुतांशी तेलुगू चित्रपट हे आपल्या चाकोरीतून बाहेर येऊ शकले नाहीत. एकविसाव्या शतकामध्ये ही चाकोरी अधिक घट्ट झाली. सुकुमारचा चित्रपट या चाकोरीतला चित्रपट आहे. ‘बाहुबली’ निर्माण करणाऱ्या एस. एस. राजामौलीच्या बरोबरीने तेलुगू चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून सुकुमारचं नाव घेतलं जातं.
व्यावसयिक चित्रपट निर्माण करताना प्रेक्षक सातत्याने त्यात गुंतून राहतील, याचं भान दिग्दर्शकाला ठेवावं लागतं. निर्मितीत मोठ्या प्रमाणावर गुंतवलेला पैसा दामदुपटीने वसूल होईल, याची हमी निर्मात्याला द्यावी लागते. मोठी स्टारकास्ट असल्याने त्यांचे नखरे सांभाळण्याचं अवघड कामही दिग्दर्शकाला करावं लागतं. इतकं सगळं करून जर तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला, तर दिग्दर्शकाच भवितव्य धोक्यात येतं.
सुकुमारच्या करिअरमध्येसुद्धा त्याची कसोटी पाहणारे असे काही प्रसंग आले, पण त्यावर मात करत त्याने आपली कारकीर्द झळाळती ठेवली. त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट तद्दन व्यावसायिक आहेत, पण त्यांच्या त्याने लिहिलेल्या रोचक कथा, खिळवून ठेवणाऱ्या पटकथा आणि चित्तवेधक चित्रीकरण, यामुळे त्याचे चित्रपट दखल घेण्याजोगे आहेत.
कथाकथनाची एक विशिष्ट शैली आपल्याला सुकुमारच्या चित्रपटात सातत्याने दिसते. अरेषीय पद्धतीची ही कथनशैली आहे. संपूर्ण कथानकाच्या मध्यावर असलेल्या प्रसंगातून त्याच्या अनेक चित्रपटांची सुरुवात होते. त्याच्या नायकांचा प्रवेश अत्यंत नाट्यपूर्णरित्या होतो. नायकाच्या व्यक्तिरेखेच्या तोलामोलाची भूमिका खलनायकाच्या वाट्याला आलेली असते. त्याच्या कपटकारस्थानांचं प्रेक्षकांना पटेल असं स्पष्टीकरण पटकथेत पेरलेलं असतं.
‘आपण सगळेजण नकाराच्या भीतीने आपल्या भावना दडपून ठेवतो, खरं तर आपल्या भावना व्यक्त करून मोकळ होणं, हा सुखी आयुष्य जगण्याचा मंत्र आहे’, सुकुमार आपल्या जगण्याचा हा मंत्र चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चित्रपटात आपल्या प्रेमभावना नायिकेपाशी व्यक्त करणारे नायक भेटतात. आपल्या प्रेमासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची त्यांची तयारी असते.
त्याच्या ‘आर्या’ या पहिल्याच चित्रपटात आपल्याला असा नायक भेटतो. आर्या (अल्लू अर्जुन) हा आपल्याच मस्तीत जगणारा कॉलेज युवक त्याच्या वर्गातील गीताच्या (अनुराधा मेहता) प्रेमात पडतो. गीता मात्र दडपणाखाली अजय (शिवा बालाजी) या स्थानिक आमदाराच्या उडाणटप्पू मुलाला प्रेमाचा होकार देऊन बसलेली असते. आर्या आपलं प्रेम व्यक्त करतो, मात्र वडिलांच्या विरोधात जाऊन गीताशी लग्न करू पाहणाऱ्या अजयला तिच्या बरोबर पळून जायला मदत करतो. या सगळ्याचा शेवट अर्थातच आर्या आणि गीताच्या मिलनाने होतो, पण या टप्प्यावर चित्रपटाला आणताना सुकुमार जे प्रसंग योजतो, ते आपल्याला गुंतवून ठेवतात. हे प्रसंग पडद्यावर पाहण्यात मजा आहे. हे प्रसंग नायकाची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा उभी करतात. त्याच्या अचाट आणि अफाट करतुती आपलं मनोरंजन करतात.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
आर्याच्या भूमिकेमुळे अल्लू अर्जुन या अभिनेत्याला सुपरस्टार पद मिळाले. त्याच्या या प्रतिमेच्या आणि चित्रपटाला मिळालेल्या यशाचा वापर करत सुकुमारने साधारण याच पद्धतीचे कथानक घेऊन ‘आर्या २’ या चित्रपटाची निर्मिती केली. यातील प्रमुख पात्रांची नावे सारखीच आहेत, मूळ आशय तोच आहे, मात्र कथानक वेगळे आहे. आर्या आणि अजय ही दोन अनाथ मुलं. मोठेपणी अजय (नवदीप) एका कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर लागतो. तिथे काम करणाऱ्या गीताच्या (काजल अग्रवाल) तो प्रेमात पडतो. आर्याला (अल्लू अर्जुन)सुद्धा आपल्या कंपनीत तो नोकरी मिळवून देतो. आर्या गीतावर प्रेम करू लागतो. गीताचे वडील मात्र तिचं लग्न गावातील एका मुलाशी ठरवतात. आर्या गीताच्या वडिलांबरोबर मैत्री करतो. ऐन लग्नाच्या वेळी गीताच्या भावी सासऱ्याबरोबर तिच्या वडिलांचे भांडण होते आणि ते गीताचे लग्न आर्या बरोबर लावून देतात. गीता जबरदस्तीने या लग्नाला तयार होते. तिच्या भावना ओळखून आर्या तिला आणि अजयला एकत्र आणण्याचे प्रयत्न करू लागतो.
या दोनही चित्रपटात नायिकेवर प्रेम करणारा, पण तिला दुसऱ्याच्या हाती सोपवू पाहणारा नायक आपल्याला दिसतो. त्याच्या समोर आलेल्या विपरीत परिस्थितीशी तो झगडतो आणि शेवटी नायिका त्याची होते. सामान्य युवकांची मानसिकता ओळखून सुकुमारने नायकाची व्यक्तिरेखा या चित्रपटात रेखाटली आहे. त्याला अचाट साहसे करायला लावताना त्याच्या मनातील प्रेमभावनेच उदात्तीकरण देखील तो करतो. आर्या सुपरहिट होण्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे. प्रेक्षकांची नस अचूक पकडून त्यांचे अपेक्षित मनोरंजन करण्याची किमया या चित्रपटातून सुकुमारला साधली.
‘आर्या’नंतर आलेला त्याचा ‘जगदम’ हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी ठरला, पण ‘आर्या २’ने त्याची गाडी पुन्हा रूळावर आली. ‘१०० टक्के लव्ह’ या चित्रपटात त्याने एक नर्मविनोदी प्रेमकथा मांडली. कौटुंबिक वातावरणात फुलणाऱ्या या कथेमध्ये प्रेमात अहंकाराला थारा देऊ नये, हा साधा सरळ संदेश त्याने दिला. ‘१०० टक्के लव्ह’च्या हलक्याफुलक्या हाताळणीनंतर पुन्हा सुकुमार त्याच्या आवडत्या थरारक शैलीच्या चित्रपटांकडे वळला.
‘१ : नेनोक्कडीने’ हा चित्रपट नायकाने आई वडिलांच्या खुनाचा घेतलेला बदला या अतिपरिचित सूत्रावर आधारित होता, मात्र त्यात नायकाला होणारे भास आणि त्यातून निर्माण होणारं नाट्य खिळवून ठेवणारं होतं. पटकथेत आलेली वळण धक्का देणारी होती. तेलुगूमधील सुपरस्टार महेश बाबूने गोंधळलेल्या नायकाची केलेली भूमिका लक्षवेधी होती. लंडनमध्ये शूट केलेले थरारक प्रसंग रोमांचक होते. सत्तर कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर भरघोस गल्ला कमावला.
या चित्रपटानंतर आलेल्या ‘नन्नाकू प्रेमाथो’ या चित्रपटाने पुन्हा एकदा सुकुमारला यशाची चव दिली. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने रचलेल्या कारस्थानांची वेधक कथा ‘नन्नाकू प्रेमाथो’मध्ये सुकुमारने सांगितली. सुकुमारच्या अॅक्शनपॅक्ड, थरारक कथानकांच्या मुळाशी कौटुंबिक धागा नेहमीच जोडलेला असतो. ‘नन्नाकू प्रेमाथो’मधील अभिराम हा यशस्वी उद्योजक वडिलांच्या प्रतिस्पर्ध्याला नमोहरम करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून ज्या क्लुप्त्या करतो, त्या अचंबित करणाऱ्या आहेत. एन. टी. रामराव यांच्या नातवाचा म्हणजेच एन. टी. रामराव ज्युनिअरचा हा पंचविसावा चित्रपट. अभिरामच्या प्रमुख भूमिकेत एन. टी. रामराव ज्युनिअर प्रभाव पडतो.
दिग्दर्शनाच्या बरोबरीनेच सुकुमारने ‘कुमारी २१ फ’ आणि ‘दर्साकुडू’ या चित्रपटांची निर्मितीसुद्धा केलीय. कारकीर्दीच्या या टप्प्यावर चित्रपटांच्या विषय निवडीमध्ये सुकुमार अधिक परिपक्व झाल्याचे लक्षात येतं. त्याच्या २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगस्थलम’ या चित्रपटाचा आशय आणि हाताळणी पाहताना ही गोष्ट ठळकपणे जाणवते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ऐंशीच्या दशकातील ‘रंगस्थलम’ या गावातील सहकारी संस्थेच्या भ्रष्टाचाराची गोष्ट या चित्रपटात सुकुमार मांडतो. कमी ऐकायला येणारा चिट्टीबाबू (राम चरण) हा ‘रंगस्थलम’चा नायक आहे. शेतात काम करणाऱ्या चिट्टीबाबूचं गावातील रमालक्ष्मी (समंथा अन्निकेनी) या सामान्य घरातील मुलीवर प्रेम असतं. दुबईत कामाला असलेला त्याचा धाकटा भाऊ कुमार (आदी पीनीशेट्टी) गावी परत येतो. गावच्या सहकारी संस्थेमध्ये होत असलेला घोटाळा या भावांच्या लक्षात येतो. ते न्याय मागण्यासाठी पंचायत प्रमुखाकडे जातात. पण या सगळ्या भ्रष्टाचारात त्याचाच हात असतो. हे लक्षात आल्यानंतर चिट्टीबाबू आणि कुमार संघर्षाचा पवित्र घेतात. त्यासाठी ते स्थानिक आमदाराला भेटतात. आमदार कुमारला निवडणूक लढवण्यास प्रोत्साहन देतो. दरम्यान त्या आमदारावर जीवघेणा हल्ला होतो. कुमारचीसुद्धा हत्या होते. चिट्टीबाबू आपल्या भावाच्या खुन्याचा शोध घेऊ लागतो आणि एक वेगळंच सत्य त्याच्या समोर येतं.
गावखेड्यातील स्थानिक राजकारण, तिथला वर्गभेद आणि त्यातून उभा राहिलेला संघर्ष याचं चित्रण सध्या दाक्षिणात्य चित्रपटातून सातत्याने येत आहे. ‘कर्णन’सारख्या चित्रपटातून ते भेदकपणे मांडलं गेलंय. ‘रंगस्थलम’मध्ये सुकुमारने प्रेमकथा आणि संगीत यावर अधिक लक्ष दिलंय. त्यामुळे त्यातील तीव्रता कमी झाली आहे. मात्र चिट्टीबाबूच्या व्यक्तिरेखेमुळे ‘रंगस्थलम’ला वेगळा आयाम मिळाला आहे. सामाजिक विषय हाताळताना प्रेक्षकांची आवड नजरेआड न करता कथेची मांडणी करण्याचं कौशल्य सुकुमारकडे आहे. यामुळे तेलुगू चित्रपटसृष्टीचा मनोरंजनाचा वारसा तो समर्थपणे सांभाळत आहे.
त्याच्या आगामी ‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फाजील, प्रकाश राजसारखे लोकप्रिय अभिनेते काम करत आहेत. सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता निर्माण झालीय. सुकुमारचा हा चित्रपटसुद्धा त्याच्या लौकिकाला साजेशा असणार!
..................................................................................................................................................................
या सदरातील आधीचे लेख
वेत्रीमारन : सामान्यांच्या जगण्याचा हुंकार टिपणारा कल्पक दिग्दर्शक
कौशिक गांगुली खऱ्या अर्थानं सत्यजित राय, मृणाल सेन, रित्विक घटक यांचे सांस्कृतिक वारसदार आहेत!
राजीव रवी : चित्रपटातून वास्तववादाच्या नावाखाली रोमॅण्टीसिझम न दाखवणारा दिग्दर्शक
नाग अश्विन : कला आणि व्यवसाय यांचा तोल सांभाळणारा दिग्दर्शक
डॉ. बिजू दामोदरन : समाजातील उपेक्षितांच जगणं तितक्याच भेदकपणे मांडणारा दिग्दर्शक
..................................................................................................................................................................
लेखक संतोष पाठारे सिनेअभ्यासक आहेत.
santosh_pathare1@yahoo.co.in
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment