ज्येष्ठ लेखक, कथा-कादंबरीकार मिलिंद बोकील यांचे ‘क्षितिजापारच्या संस्कृती’ हे नवे पुस्तक नुकतेच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात ऑस्ट्रेलिया, ब्रह्मदेश, आर्मेनया, अफगाणिस्तान अशा देशांविषयीचे लेख आहेत. त्यापैकी ‘आशेच्या वाटेवरचा अफगणिस्तान’ या दीर्घ लेखाचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
१.
माझा मित्र जॉर्ज चिरा एकदा सहज बोलता बोलता म्हणाला की, ‘अफगाणिस्तानमधल्या एखाद्या प्रकल्पाचं मूल्यांकन (इव्हॅल्युएशन) करायची वेळ आली तर तू ते करशील का?’ मी ‘हो’ म्हणालो आणि विसरून गेलो. मला वाटले जॉर्ज मस्करी करत असेल. कारण अफगाणिस्तान हा अत्यंत असुरक्षित देश. सुखासुखी तिथे कोणी जात नाही. तिथे जायची माझी तयारी आहे का, ते तो नुसते चाचपून बघत असेल. जॉर्ज माझा फार जुना मित्र. तो दीर्घकाळ पुण्यामध्ये ‘तेरे देस होम्स’ या जर्मन संस्थेचा दक्षिण आशियाई कार्यालयाचा प्रमुख होता. आता निवृत्त झाला असला तरी त्यांच्यासाठी तो सल्लागार म्हणून काम करत होता. मात्र एके दिवशी त्याने खरोखरच तसा प्रस्ताव आणला. तो म्हणाला की, ‘अफगाणिस्तानमध्ये ‘जेआरएस’ नावाची संस्था तिथल्या निर्वासित मुलांसाठी एक प्रकल्प राबवत आहे. त्या प्रकल्पाचे मूल्यांकन त्यांना करायचे आहे. या प्रकल्पाला जर्मन सरकार मदत करते. दहा-बारा दिवसांचे काम आहे. करतोस का?’
पूर्वी ‘हो’ म्हणून बसलो होतो. त्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. तयारी केली. प्रकल्पाची सगळी माहिती त्यांनी पाठवली. त्याप्रमाणे मूल्यांकनाचा आराखडा तयार केला. मुख्य मुद्दा व्हिसा मिळवण्याचा होता. अफगाणिस्तान आणि भारत यांचे संबंध चांगले असल्याने आपल्याला व्हिसा फी पडत नाही, पण तिथली परिस्थिती असुरक्षित असल्याने व्हिसा मिळायला अडचण येऊ शकते. मात्र, जेआरएसचे तिथल्या सरकारमध्ये वजन असल्याने ती समस्या आली नाही. दिल्लीत दोन दिवस थांबून व्हिसा घेतला आणि तिथूनच काबूलला गेलो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
जेआरएस म्हणजे ‘जेझुइट रेफ्युजी सर्व्हिस’. जेझुइट मिशनरी सर्व देशांमध्ये शैक्षणिक संस्था चालवतात हे बहुतेकांना माहीत असेल. आपल्याकडेही प्रत्येक मोठ्या शहरात जेझुइटांनी चालवलेल्या इंग्रजी शिक्षणसंस्था आहेत (सेंट झेव्हियर्स, सेंट व्हिन्सेंट, इत्यादी). त्यामध्ये श्रीमंत, प्रतिष्ठित कुटुंबांमधली मुले शिकत असतात. (जेझुइटांचा मूळ उद्देश खरे तर गरीब, उपेक्षित वर्गातील मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा होता; पण भारतातल्या इंग्रजी शिक्षणावर इथल्या उच्चवर्गीयांनी मिरासदारी मिळवल्याने आता या संस्थांमध्ये बव्हंशी श्रीमंत वर्गातलीच मुले असतात.) जेझुइटांच्या कामाचे स्वरूप मात्र फक्त शिक्षणापुरते मर्यादित नाही. जिथे अन्याय, शोषण, अवहेलना दिसते त्याविरोधातही जेझुइट फादर्स काम करताना दिसतात. त्यापैकीच एकाने व्हिएटनाम युद्धामधल्या निर्वासितांना मदत करण्यासाठी ‘जेआरएस’ ही संघटना काढली आणि नंतर तिचे काम जगातल्या अनेक देशांमध्ये, विशेषत: जिथे निर्वासितांचा प्रश्न होता, अशा विभागांमध्ये पसरले. अफगाणिस्तानमध्ये तर ते असणे आवश्यकच होते. कारण देशातल्या अंतर्गत यादवीमुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस सुमारे २५ ते ३० टक्के लोकसंख्या परागंदा झाली होती. ते गेले होते मुख्यत: इराण आणि पाकिस्तानमध्ये. तालिबान राजवटीचा बीमोड झाल्यानंतर साधारण २००५ पासून हे लोक अफगाणिस्तानमध्ये हळूहळू परत यायला लागले.
या निर्वासितांचे मुख्य प्रवाहात सामिलीकरण सुलभ व्हावे म्हणून जेआरएसने त्यांची वस्ती असलेल्या प्रांतांमध्ये पूरक शिक्षणकेंद्रे सुरू केली होती, ज्यामध्ये मुख्यत: इंग्रजी भाषेचे आणि त्याला जोडून विज्ञान-गणित, संगणकाचे शिक्षण दिले जात होते. सोबत काही ठिकाणी व्यवसाय प्रशिक्षणाचीही केंद्रे होती. आपल्याकडे जशी सीईटी असते, तशीच अफगाणिस्तानात ‘कॉन्कूर’ नावाची राष्ट्रीय परीक्षा असते. बारावी झाल्यावर ती देता येते. तिच्यामध्ये जर चांगले गुण मिळवले तर सरकारी विद्यापीठात प्रवेश मिळतो. शिवाय जे ‘टॉपर्स’ असतात, त्यांना परदेशी जाण्याची शिष्यवृत्ती मिळते. (भारत सरकार दरवर्षी अशा सुमारे १,००० शिष्यवृत्त्या अफगाण विद्यार्थ्यांना देते.) अफगाणिस्तानातली एक चांगली गोष्ट म्हणजे १२ वीपर्यंतचे शिक्षण तर सर्वांना मोफत आहेच, पण कॉन्कूर परीक्षा पास झाली, तर विद्यापीठातल्या अभ्यासक्रमालाही शुल्क भरावे लागत नाही. कॉन्कूरचे हे महत्त्व जाणून जेआरएस कॉन्कूरसाठीचेही विशेष वर्ग आयोजित करत होती. काबूल आणि इतर मोठ्या शहरांत कॉन्कूरचे खासगी क्लासेस असतात, पण गरीब-वंचित वर्गातील मुलांना त्याची फी परवडत नाही. अशांसाठी जेआरएसचे हे वर्ग फारच लाभदायी होते.
२.
काबूल विमानतळावर तेरे देस होम्सचा प्रॉजेक्ट ऑफिसर खालिद सदात माझी वाट बघत होता, कारण आम्हाला तिथून लगेच हेरातला जायचे होते. काबूल विमानतळ अगदी साधा आहे. देशाची गरिबी पाहताक्षणीच जाणवते. आंतरराष्ट्रीय टर्मिनलला लागूनच देशी टर्मिनल होते. आत जाताना संपूर्णपणे पुन्हा ‘तलाशी’ झाली. मात्र पोलिस हसतमुख होता. ‘इंडियन’ म्हटल्यावर त्याने बॉलिवुडची आठवण काढली.
हेरातला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. तिथे ज्या ‘सोअॅक्स’ नावाच्या संस्थेचे काम बघायचे होते, तिने वाहन पाठवले होते. विमानतळावरून सरळ हॉटेलला गेलो. हॉटेलला कडेकोट सुरक्षा होती. एके-४७ घेतलेल्या गार्डने भले मोठे पोलादी सरकते दार उघडले. आतमध्ये दुसरा तसाच दरवाजा होता. रिसेप्शनमधली माणसे मात्र विनम्र होती.
३.
जेआरएसने २००५ मध्ये आपल्या अफगाणिस्तानमधल्या कामाची सुरुवात हेरातपासून केली होती. आधी त्यांनी एक मोठी शाळा सुरू केली, नंतर एक तांत्रिक विद्यालय. पण मग त्यांच्या असे लक्षात आले की, ही कामे कायमस्वरूपी अफगाणी स्वयंसेवी संस्थांनी करायला पाहिजेत आणि म्हणून त्यांनी ‘सोअॅक्स’ (सपोर्टिंग ऑर्गनायझेशन फॉर अफगाण सिव्हिल सोसायटी) नावाच्या संस्थेकडे हे काम सोपवले होते.
सोअॅक्सची ती केंद्रे मी पाहिली. काम चांगल्या तर्हेने चालू होते. त्यांनी स्थानिक शिक्षक घेऊन आणि त्यांना प्रशिक्षित करून ही पूरक शिक्षणकेंद्रे चालवली होती. मुले-मुली वेगवेगळी बसवली होती, पण मुलींची संख्या जास्त होती. शिवाय अशिक्षित स्त्रियांसाठी खास साक्षरता वर्गही काढलेले होते. वर्गांचे निकालही चांगले होते. कॉन्कूर परीक्षेचे निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त होते.
जेआरएसच्या या पूरक शिक्षणामधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘पीस एज्युकेशन’ (अहिंसा आणि शांतीचे शिक्षण). ही शिकवण केवळ दोन गटांमध्ये किंवा जमातींमध्येच शांती व सलोखा कसा ठेवायचा, यापुरती मर्यादित नव्हती, तर घरामध्ये, शेजार्यांमध्ये, स्त्री-पुरुषांमध्येही शांतिपूर्ण, सलोख्याने आणि सौजन्याने कसे राहायचे आणि परस्परांचा आदर कसा करायचा हे सांगणारी होती.
या केंद्रांमध्ये येणारी बहुतेक मुले-मुली ‘हजारा’ या जमातीची होती. आपल्याला असे वाटते की, अफगाण लोक म्हणजे सगळे पठाण असतील; पण तसे नाही. अफगाणिस्तान हा आपल्याइतका नसला तरी बहुविध देश आहे. तिथेही निरनिराळ्या प्रकारचे लोक राहतात. ज्यांना पश्तू, पख्तून किंवा पठाण म्हटले जाते ते लोक बहुसंख्य आहेत, पण त्यांच्यासोबतच हजारा, ताजिक, उज्बेक अशाही जमाती आहेत. आणि त्या एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या आहेत.
अफगाणिस्तानबद्दलची एक मौजेची गोष्ट म्हणजे सगळा देश इस्लामिक असला तरी या वेगवेगळ्या जमाती आपले स्वतंत्र अस्तित्व मात्र इर्ष्येने टिकवून आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या अजूनही बव्हंशी जमाती किंवा टोळीरूपातच आहेत. सगळ्यांचे एकजिनसीकरण होऊन एकसंध समाज निर्माण झालेला आहे, असे दिसत नाही. अफगाणिस्तानातल्या विचारविश्वात अजूनही ही वेगवेगळी राष्ट्रे (नेशन्स) आहेत, असा सूर उमटत असतो.
हजारा जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याकडच्या तिबेटी किंवा लडाखी लोकांसारखे दिसतात. पूर्वीच्या भाषेत त्यांना ‘मंगोल’ वंशाचे म्हटले जायचे. अफगाणिस्तानच्या मध्यभागात असणार्या हिंदुकुश पर्वतरांगा काराकोरम आणि हिमालयाच्या पर्वतरांगांशी उत्तरेकडे मिळतात. त्या डोंगररांगांत हे लोक पूर्वापार राहत आलेले आहेत. मात्र, अफगाणिस्तानात त्यांना दुय्यम नागरिक समजले जाते. पख्तून जमाती स्वत:ला आर्य वंशाच्या समजतात. त्यामुळे या कमी उंचीच्या, लहान डोळ्यांच्या मंगोल लोकांना ते कमअस्सल मानतात (ते पूर्ण मुस्लीम आहेत असेही मानत नाहीत). शिवाय बहुसंख्य पख्तून हे सुन्नी पंथाचे आहेत, तर हजारा हे शिया पंथाचे. मुस्लिमांमध्ये सुन्नी आणि शिया हा भेद फार कडवेपणाने जपला जातो. त्यामुळे हजारा लोकांची बहुसंख्याकांकडून कायमच अवहेलना आणि हेटाळणी होत राहिलेली आहे. आपल्याकडे पूर्वी अस्पृश्यांची व्हायची तशी.
अफगाण सरकार त्यांची लोकसंख्या नेमकी सांगत नाही, परंतु ती २५ ते ३० टक्क्यांच्या आसपास असावी असा अंदाज आहे. पख्तून सुमारे ३५ ते ४० टक्के, ताजिक २० ते २५ टक्के आणि उज्बेक, ऐमाक, तुर्कमन, बलूच, नुरीस्तानी, ब्राह्युई हे इतर १० ते १५ टक्क्यांमध्ये मोडतात. तालिबान्यांच्या काळात हजारा लोकांचा अनन्वित छळ झाला (तालिबान बव्हंशी पख्तून होते). त्यामुळे अफगाणिस्तानातून जे लोक परागंदा झाले त्यामध्ये हजारा लोकांची संख्या सर्वाधिक होती. हजारा हे अशा रीतीने वंचित-उपेक्षित लोक असल्याने जेआरएस-सोअॅक्ससारख्या संस्था या प्रामुख्याने त्यांच्यासाठी काम करत होत्या.
४.
खालिद काबूलमध्येच राहणारा असल्याने तो कायम सोबत होताच. त्याचेही शिक्षण गुजरातमध्ये बडोद्याला झालेले. त्यामुळे भारताशी जवळचा परिचय. तो पख्तून, पण दिसायला कोणाही भारतीय माणसासारखा. त्याने एका ताजिक मुलीशी लग्न केलेले. अफगणिस्तानच्या स्थितीबद्दल त्याच्याशी कायमच चर्चा चालायची, विशेषत: अफगाणिस्तानची अशी अवस्था का झाली त्याविषयी. खरे तर हा शूर, दिलदार, स्वाभिमानी लोकांचा देश. अफगाणांची अशी कीर्ती सांगतात की, ते कधीच कुणाचे अंकित झाले नाहीत; ब्रिटिशांचेही नाहीत. आपल्या किती तरी आधीपासून म्हणजे १९१९पासून अफगाणिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र होते. दोन्ही महायुद्धांमध्ये त्यांनी स्वत:ला अलिप्त ठेवलेले होते. पन्नाशीच्या दशकात तुर्कस्तानसारखे एक आधुनिक राष्ट्र बनण्याकडे त्यांची वाटचाल सुरू होती. असे सांगतात की, त्या काळात काबूलच्या रस्त्यांवरून अफगाण स्त्रिया मिनीस्कर्ट घालून फिरत असत. पण नंतर महासत्तांच्या स्वार्थी राजकारणात तो भरडून निघाला. याच काळात तिथल्या राज्यकर्त्यांनी रशियाशी केलेली जवळीक त्यांना महागात पडली. रशियाला अरबी समुद्रात सामरिक प्रवेश तर मिळवायचा होताच, शिवाय शीतयुद्धाच्या काळात जास्तीत जास्त देश आपल्या वर्चस्वाखाली आणायची महत्त्वाकांक्षा होती. आधी त्यांनी आपले बाहुले असलेले कम्युनिस्ट सरकार काबूलच्या गादीवर बसवले आणि मग त्या सरकारला विरोध होतोय असे दिसताच १९७९ साली सैन्य घुसवून अफगाणिस्तान ताब्यात घेतला. या रशियन सैन्याला हुसकावून लावण्यासाठी मग अमेरिका-पाकिस्तान यांनी आधी मुजाहिदीन सैन्य तयार केले.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कम्युनिझम हा एक प्रकारचा धर्म होता. त्या धर्माचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी दुसर्या धर्माला जागवले- पारंपरिक इस्लामला. पण धर्म हा एक प्रकारचा भस्मासुरच असतो- कधी निद्रिस्त, कधी जागृत. त्यातूनच ‘तालिबान’ निर्माण झाले. त्यांना आवरणे अजूनही शक्य झालेले नाही. हे लिहीत होतो, त्याच्या अगोदर अमेरिकेने तालिबान्यांसोबत तह केलेला होता आणि अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून परत जाणार होते. भविष्यात काय घडणार हे कोणालाच माहीत नव्हते. या अंतर्गत यादवीमुळे देश मात्र पन्नास वर्षे मागे गेला होता.
दुसरी एक गोष्ट अशी, की अफगाण स्वतंत्र जरी राहिले असले तरी त्यांचे जगणे हे आदिवासी टोळ्यांच्या प्रकारचे होते. समाजाचा एक वरचा, छोटासा नागरी स्तर आधुनिक झाला, पण ग्रामीण, डोंगरी अंतर्भाग हा जुनाट, पारंपरिक राहिला होता. त्याची मानसिकता ही पुरुषी, पितृसत्ताक आणि टोळीजगताची होती. पारंपरिक पुरुषी मानसिकतेवर धार्मिक मूलतत्त्ववादाचे आरोपण सोपे होते. युरोपात किंवा काही प्रमाणात भारतात जशी प्रबोधनाची परंपरा सुरू झाली, तशी इथे कधीच झाली नाही. कोणत्याही समाजात प्रबोधन हे आतून व्हावे लागते आणि नागरी, सुसंस्कृत समाज अस्तित्वात येण्यासाठी वैज्ञानिकता, विवेकवाद आणि स्त्री-पुरुष समानतेची जाणीव मुळापासून व्हावी लागते.
शेवटच्या दिवशी ताकीही आम्हाला येऊन मिळाला. तो आणि मी बामियानमधून एकत्र परत येणार होतो. मात्र, २९ डिसेंबरला विमान रद्द झाल्याचे कळल्यावर तो म्हणाला की, एक दिवस नुसतेच थांबण्याऐवजी मी पुढे जातो; मला काही तातडीची कामे आहेत. तो काबूलला भाड्याची टॅक्सी करून गेला. मला म्हणाला की, ‘तुम्हाला मला नेता येणार नाही. प्रवास पाच-सहा तासांचाच आहे, परंतु वाटेत डोंगरात तालिबान इलाखा आहे. तिथे परदेशी प्रवाशांना सुरक्षितता नाही. मी स्थानिक असल्याने कसाही निघून जाईन, पण तुम्ही विमानानेच जा.’
मधल्या तीन दिवसांत काय केले असे मी विचारता त्याने सगळी हकीकत सांगितली. बामियानहून दुपारी निघून तो काबूलला रात्री पोहोचला. दुसर्या दिवशी सकाळी त्याने मोटारीने जलालाबाद गाठले. तिथून पाकिस्तानची सीमा ओलांडून तो पेशावरला गेला. तिथून त्याने दुसरी मोटार घेऊन लाहोर गाठले. लाहोरच्या जवळ एक आंतरराष्ट्रीय मंडई आहे. तिथे त्याने दहा ट्रक संत्र्यांचा सौदा केला. काही रक्कम आगाऊ दिली. ही संत्री जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात तिथून उचलायची होती. तिथून ती पेशावरला येणार. पेशावरला ती आंतरराष्ट्रीय परमिट असलेल्या ट्रकमध्ये भरली जाणार आणि मग तिथून सरळ ताजिकीस्तानमध्ये जाणार. या सगळ्या व्यवहारात त्याला सुमारे दहा हजार अमेरिकन डॉलर सुटणार होते. हे सगळे करून आणि तसाच परतीचा प्रवास करून तो दुपारी काबूलला पोहोचला होता.
ती हकीकत ऐकून मी थक्क झालो. ज्या दिवसांत मी निव्वळ पूरक शिक्षणकेंद्रे बघत होतो, त्या काळात या व्यापार्याने एवढी उलाढाल केली होती. माझ्या लक्षात आले की, ही खरी ‘रेशीम मार्गा’वरच्या व्यापार्याची जिगर. या व्यापारात धोका होता, पण असा धोका घ्यायची धाडसी व्यापार्यांची हिंमत असते. ताकी म्हणाला की, हा काही त्याचा खरा व्यवसाय नाही. ही केवळ हंगामी उलाढाल. खरा व्यवसाय म्हणजे त्याने ताजिकीस्तानात लीजवर घेतलेल्या दगडी कोळशाच्या खाणी. तिथे बामियान भागातले कामगार कंत्राटी पद्धतीने ठेवले होते. कोळशाचा व्यापार हा त्याचा मुख्य व्यवसाय. यातून जो नफा व्हायचा त्याचा काही एक हिस्सा तो सामाजिक कार्याला वापरायचा.
ताकी ही चर्चा करताना म्हणाला, की भारत-पाकिस्तान यांनी आपल्या सीमा जर खुल्या केल्या तर केवळ त्या देशांचाच नाही तर सगळ्या दक्षिण आशियाचा फायदा होईल. पाकिस्तान हा पाच नद्यांचा अत्यंत सुपीक प्रदेश असल्याने तिथे शेतमालाचे जोरदार उत्पादन होते. लाहोर मंडईला या जिनसांचे डोंगरासारखे ढीग लागलेले असतात, पण त्यांना ‘मार्केट’ मिळत नाही. भारतातल्या तर अनेक औद्योगिक उत्पादनांना मध्य आशियापर्यंत मागणी असते. एकदा ही सीमा खुली झाली की पार इराणपासून नेपाळ-बांगला देशपर्यंत मोकळ्या रीतीने व्यापार करता येईल. अनेक वस्तू स्वस्त होतील. तुम्हाला सुकामेवा तर निम्म्या किमतीत मिळेल.
तो म्हणत होता ती गोष्ट खरीच होती. मी हेरातमध्ये केशर घेतले होते ते काश्मिरमध्ये मिळणार्या केशराच्या एक चतुर्थांश किमतीत आणि तेसुद्धा अस्सल! पूर्वापारच्या रेशीम मार्गावर ही अशीच उलाढाल होत होती. कोणत्याही संस्कृतीला समृद्धी येते ती व्यापाराने. इतिहासातले सगळे दाखले असेच आहेत. निव्वळ शेती करून किंवा उद्योग करून कोणताही समाज संपन्न होत नसतो. या वस्तूंची देवाणघेवाण व्हावी लागते. राज्यसंस्थेचे काम हा व्यापार सुलभतेने होईल एवढेच बघायचे असते. एकदा ही मोकळीक मिळाली की प्रत्येक ठिकाणचे धाडसी व्यापारी पुढे येतात आणि आपल्या पद्धतीने जगाला जोडून घेतात. पूर्वी ज्या ज्या वेळी असे झाले त्या त्या वेळी भारत समृद्ध झाला, इथली संस्कृती समृद्ध झाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे असे झाले की शत्रुत्व राहत नाही. स्पर्धा होते, पण वैरभाव नाही.
शेवटच्या दिवशी काबूलमध्ये खालिदसोबत थोडेफार हिंडता आले. बर्फ पडत होता. त्यात पाऊसही सुरू झाला. दुकाने उघडी होती. हॉटेलांमधून कबाब भाजले जात होते. बेकर्यांमधून नान. वातावरण भारतातल्या कोणत्याही शहरात असावे असेच होते. मी एकटा फिरलो असतो तरी काही बिघडले नसते. खरे तर तशी भीती काहीच नव्हती. भारतीय माणसाला तर नाहीच नाही. अफगाणांना भारताबद्दल प्रेम आणि आदर आहे. त्यांचे मनोरंजन हे सगळे बॉलिवूडवर पोसलेले आहे म्हणूनच नव्हे, तर भारताने त्यांना अवघड प्रसंगी कायम मदत केलेली आहे म्हणूनही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
अशा कथा सांगितल्या जातात की, काबूलमधल्या दुकानांतून राष्ट्राध्यक्षांचा फोटो बदलतो, पण हेमामालिनीचा नाही. शेकडो अफगाण विद्यार्थी भारतातून शिकून गेलेले आहेत. सध्याही तसे येतात. पुणे, हैदराबाद आणि गुरगाव ही त्यांची शिक्षणाची मुख्य ठिकाणे. खरे तर पाकिस्तानने लक्षावधी अफगाण निर्वासितांना आश्रय दिला होता, पण या शिबिरांचा वापर अतिरेकी निर्माण करण्यासाठी केला गेला. आधी मुजाहिदीन आणि नंतर तालिबान. त्यामुळे सर्वसामान्य अफगाण पाकिस्तानविषयी साशंक असतो; त्यांचा निम्माधिक व्यवहार पाकिस्तानशी असूनही!
अफगणिस्तान हा लळा लावणारा देश आहे. तिथून निघताना पाऊल जड झाले. ती माणसे उमदी होती, पण अजूनही टोळ्यांच्या जगात जगणारी. आणि मुख्य म्हणजे अजूनही शस्त्रावर विश्वास असणारी. कुठलेही राष्ट्र जनतेच्या आत्मबळावर बनते, शस्त्रबळावर नाही. महात्मा गांधींचे मोठेपण पुन्हा एकदा लक्षात आले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भारतीय जनतेच्या हातात शस्त्रे येऊ दिली नाहीत. कायम अहिंसेचा पुरस्कार केला. आज भारत जो काही आहे तो त्यामुळे. कदाचित ही गोष्ट त्या लहानखुर्या हजारा मुलींना कळली आहे. उद्या ती पख्तून मुलींनाही कळेल.
त्या मुली देशाची सूत्रे आपल्या हातात घेईपर्यंत अफगाणिस्तानला वाट बघावी लागेल.
‘क्षितिजापारच्या संस्कृती’ - मिलिंद बोकील
समकालीन प्रकाशन, पुणे
पाने – २५४, मूल्य – ३०० रुपये.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा
तालिबान, अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, चीन आणि भारत… एक धावता दृष्टीक्षेप
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment