अजूनकाही
२००७मध्ये मी जमीन घेतली आणि त्यात एक विंधन कोरून घेतले. खोल विंधन घ्यायचे नाही, असे ठरवले होते, मात्र प्रत्यक्षात एखाद्या नशा चढलेल्या जुगाऱ्याप्रमाणे पाणी लागेस्तोवर खोल गेलो. दोनशे फुटांवर पाणी लागले. मी सव्वादोनशे फूट खाली गेलो. नशा उतरल्यावर लक्षात आले की, या पाण्याचा उपयोगच करता येणार नाही, कारण ते उपसायला वीजेखेरीज पर्याय नव्हता. आणि सर्वांत स्वस्त म्हणजे औष्णिक वीज. ती तयार करताना दर युनिटसाठी साडेचार लिटर पाणी हवेत घालवावे लागणार आणि कोळसा जाळावा लागणार, कर्ब उत्सर्जन होणार. उपसलेल्या पाण्याचा वापर करून जी कोणती हिरवी वनस्पती वाढवता आली असती, ती ते कर्ब उत्सर्जन पिऊन घेऊ शकेल का, हेदेखील बघायला पाहिजे.
मी वाट बघितली. पाण्याची पातळी हळूहळू वाढत होती. रामनवमीच्या दिवशी सर्वोच्च पातळी गाठली गेली, जी जमिनीपीसून पन्नास फुटांवर होती. मी पाणी उपसण्यासाठी हापसा बसवला. पन्नास फुटांपेक्षा जास्त अंतरावर हापसा बसवणे व्यवहार्य ठरत नाही, हे मला त्या हापश्यावाल्याने प्रांजळपणे सांगितले होते. पण माझे पाणी तर पन्नास फुटांवर होते. पुरेसे पाणी मिळावे म्हणून मी दीडशे फुटांवर हापसा बसवला. उन्हाळा वाढत गेला, तसे पाणी कमी कमी मिळू लागले. जलधराची जास्त पाणी साठवण्याची क्षमताच नसणार. उपसा सुरू झाला, तसे पाणी संपत गेले. शेवटी अशी परिस्थिती झाली की, रोज केवळ वीस लिटर पाणी मिळायचे. तेवढे काढले की, पाणी यायचे बंद व्हायचे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
पाणी वाढावे म्हणून मी सलग समपातळी चर खणून घेतले. समपातळीवर ताली घातल्या. पण मी अजून एक गोष्ट केली. मला वाटते की, त्यामुळे अपेक्षा नसताना पाणी वाढले. विंधनाच्या शेजारी एक टाकी ठेवता यावी, यासाठी मी एक खड्डा उकरून घेतला जेसीबी वापरून. पण चारच फूट उकरल्यावर जेसीबीला पुढे उकरता येईना. गडी अनुभवी होता. त्याने सांगितले- “काका, या खडकात अजिबात सप नाही. असते तर पहारीने तो फोडता आला असता. पण याखाली जाता येणार नाही.” म्हणजे माझ्या विंधनाशेजारी चारच फूट खोलीवर असा खडक होता की, ज्यामधून पाणी जिरूच शकत नाही. तो खडक जिथवर पसरला होता, तेवढ्या जागेवर सीसीटी करून उपयोगच नव्हता. त्या खडकामुळे पाणी खोलवर जिरणारच नव्हते.
पण त्या खड्ड्याचा एक मी अपेक्षा न केलेला उपयोग झाला. पावसाळ्यात त्या खड्ड्यात पाणी साठू लागले. विंधनामुळे पाणी त्या अपार्य खडकाखाली जिरण्यासाठी मार्ग तयार झाला होता. त्यावाटे ते पाणी खाली जात होते. पुढील उन्हाळ्यांत असा अनुभव आला की, उन्हाळ्यातदेखील केवळ पन्नास फूट खोलीवर मला आता साधारण दीडशे लिटर पाणी रोज मिळू लागले. पाणी किती खोलीवरून मिळते हे मला समजायला लागले. कारण मी हापसा काढून टाकला होता. हापसेवाल्याने मला अगदी योग्य सल्ला दिला होता आणि मी मात्र ते प्रात्यक्षिकामधून शिकलो होतो.
मी आता त्या हापशाच्या पाइपांपैकी तीन पाईप वापरून एक तिकाटणे केले. त्याला एक कप्पी लावून घेतली. तळाशी झडप असणारा पोहरा तयार केला आणि हाताने पाणी उपसायला सुरुवात केली. गेली दहा वर्षे हाच क्रम चालू आहे. त्यामुळे पाण्याची पातळी समजते.
या क्रमात मला अजून एक अनुभव आला. चाळिसेक फुटांवर मध्येच एखादा दगड अडकायचा. प्रथम मला वाटे की, हा कोणाचा तरी खोडसाळपणा असेल. मी पहारीला एक कडी बसवून घेतली. तिच्या सहाय्याने ती पहार सोडून तो दगड फोडून वा खाली ढकलून मी मार्ग मोकळा करत असे. वितारान्ती माझ्या लक्षात आले की, तेवढ्या खोलीवर सप म्हणजे भेगा असणारा खडक असला पाहिजे. त्यामधील दगड ढासळून विंधनवाट अडवत असणार. म्हणजे तेवढ्या खोलीवर जलधर आहे आणि मी कोरलेल्या विंधनामुळे त्याच्यापर्यंत पाणी पोहोचते आहे. विंधनाशिवाय, शेजारच्या खड्ड्याशिवाय हे शक्य झाले नसते. आता इथून शेजारच्या वस्तीवरील कुटुंबाला उन्हाळ्यात पाणी मिळते. शेजारच्या माळावर गुरे चालणारे गुराखी, धनगर यांना तहान भागवता येते.
काही समजत नसताना माझ्याहातून अंधारात चाचपडत का होईना ऊर्जेचा योग्य वापर झाला होता. माझ्या हातून ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ निर्माण झाले होते, जे चिरकाल काम देऊ शकेल. खरे तर ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ची माझी व्याख्याच अशी आहे – ‘चिरकाल काम देणारी गोष्ट’.
पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त मी एक व्याख्यान ऐकले होते. विषय होता ‘समरांगण सूत्रधार’ नावाचा एक ग्रंथ. मी जे ऐकले ते बरेचसे बांधकामविषयक होते. त्यामधील एक मुद्दा माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे. त्या ग्रंथात काही मानके दिलेली आहेत- राजवाडा किमान अडीचशे वर्षे टिकला पाहिजे, दुर्ग किमान पाचशे वर्षे टिकला पाहिजे आणि मंदिरे किमान हजार वर्षे टिकली पाहिजेत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आताची मंदिरे. जे चिरकाल टिकणारे नाही, ते इन्फ्रास्ट्रक्चरच नाही.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
धरणांना इन्फ्रास्ट्रक्चर समजता येईल का? या अवाढव्य भितींमुळे जलप्रवाहात आपण मोठमोठे अडथळे उभे करतो. जे बुडीत क्षेत्र अपेक्षित असते, त्यापेक्षा कितीतरी जास्त क्षेत्रावर पाणी साचून राहते. आलमट्टी आणि नर्मदा दोघांचेही परिणाम अनुभवायला मिळत आहेत. आणि ही धरणे जशी गाळाने भरत जातील, तसे हे परिणाम जास्त जाणवणार आहेत. आणि फार तर दोनशे वर्षांत हे जलाशय गाळाने भरून जाणार आहेत हे निश्चित!
यांना इन्फ्रास्ट्रक्चर कसे समजावे? या उलट चोल राजांची कावेरीवरील योजना बघा. अठराशे वर्षे काम देते आहे. पुराचे जादा पाणी कालव्यांत साठवून ठेवते आहे. चीनमध्ये याहून भव्य प्राचीन योजना आहे.
हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे.
मुला पेरियर योजनेद्वारे केरळमधील घाटमाथ्यावर पडणारा पाऊस तेथेच अडवून पूर्वेकडील दुर्भिक्षग्रस्त प्रदेशाकडे वळवण्यात आला आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. एक युनिट वीज खर्च होत नाही. याला ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ म्हणावे की, अधूनमधून कोकणात वाहून जाणारे पाणी वीजेच्या साहाय्याने उचलून देशावर आणण्याच्या गर्जना होतात, त्याला ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ म्हणावे?
रस्त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर समजता येईल का? रस्ते लागतात कशासाठी? वाहतुकीसाठी. आताचा माणसाचा ऊर्जेचा जो खर्च आहे, त्यामधील सर्वांत जास्त वाहतुकीमध्ये खर्च होतो. ऊर्जासंकट अपेक्षित असेल तर वाहतूक कमी करण्यावर भर द्यावा की, वाढवण्यावर? दोन-चार पिढ्यांनंतर ज्या गोष्टी निरुपयोगी ठरतील, त्यांना ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ का समजावे?
नगर जसे मोठे होत जाते, तसतसे त्यांचा अन्नपुरवठा जास्त जास्त अंतरांवरून करावा लागतो. त्यांची घाण जास्त जास्त दूर वाहून न्यावी लागते. ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या व्ययाशिवाय महानगरे अशक्य आहेत. मग या महानगरांना त्यांच्या अंतर्गत वाहतुकीसाठी मेट्रो आणि मोनोचे, उड्डाण पुलांचे टेकू देणे हा ‘इन्फ्रास्ट्रक्चर विकास’ नाही, तर शहरी जमीनदारांचे बालहट्ट पुरवणे आहे (ज्यांच्या जमिनींमध्ये केलेल्या गुंतवणुकींच्या परिणामी महानगरे निर्माण होतात ते शहरी जमीनदार).
पाणी हा निसर्गामधील निर्णायक घटक आहे. पावसाची असमानता, जमिनीचा उंचसखलपणा, भूगर्भामधील खडकांचे बरे-वाईट गुण, यामधून पाण्याचे असमान वाटप होते. सजीवसृष्टीवर यामुळे मर्यादा पडतात. निसर्गाने केलेले असमान वाटप मोडीत काढणाऱ्या आणि तरीही चिरकाल टिकणाऱ्या रचना म्हणजे खराखुरा ‘इन्फ्रास्ट्रक्चर विकास’.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
माझ्या इवल्याशा मेंदूत एवढे सर्व विचार घेऊन मी काल जीएसडीएमध्ये गेलो. त्यांना सांगितले की, ‘माझ्या शेतामध्ये पाणी जिरण्यास अटकाव करणारे ‘झारीतले शुक्राचार्य’ म्हणावे असे खडक मला फोडून टाकायचे आहेत. (आणि ते फक्त माझ्याच शेतांत नाहीत बरे! पायऱ्या पायऱ्यांची रचना असणाऱ्या अग्निजन्य खडकांच्या सर्व प्रदेशांत ते आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या सर्व राज्यांमध्ये हा प्रदेश पसरला आहे!) तुमच्याकडे काही इलाज आहे?’ ते क्षमायाचनेच्या सुरात म्हणाले- ‘आम्ही ते हिवरे बाजारला केले होते हो! पण आता सरकारचे स्फोटकांविषयीचे नियम फार कडक झाले आहेत. आता नाही तसे काही करता येत.’
अर्थशास्त्री ज्याला ‘इन्फ्रास्ट्रक्चर विकास’ समजतात तो जोरात चालू आहे… माड्या विकणे चालू आहे. पण खऱ्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर विकासा’ची अशी बोंब आहे बघा…
..................................................................................................................................................................
लेखक हेमंत गोळे निवृत्त बँक कर्मचारी आहेत.
gole_hemant@yahoo.co.in
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment