अजूनकाही
एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती पैशाचे घबाड लागले तर काय होईल? एका छोट्या गावात दोन-चार घरची धुणी-भांडी करणाऱ्या आणि रोज दोन रुपयाचे दूध घेणाऱ्या एका म्हातारीला एक हजाराची नोट मिळणे म्हणजे घबाड हाती लागणे. ही गोष्ट इथेच संपत नाही, तर इथूनच गोष्ट सुरू होते. श्रीहरी साठे दिग्दर्शित ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटाची हीच तर खासीयत आहे. आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध झालेला हा चित्रपट अनेक कारणांसाठी आवर्जून बघण्यासारखा आहे.
श्रीकांत बोजेवार यांनी लिहिलेली पटकथा इथल्या मातीशी नाते सांगणारी आहेच, शिवाय रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि बारीकसारीक गोष्टीत सुख मानणाऱ्या एका सर्वसामान्य महिलेच्या विश्वाचे अंतरंग कुठेही सिनेमॅटिक न करता दाखवणारी आहे.
बुढीचे (उषा नाईक) आता वय झाले आहे, तरीही ती तीन-चार घरची धुणीभांडी करून आपला एकटीचा खोपट्यातला संसार चालवत आहे. शेती करणाऱ्या तिच्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर तिची सूनही तिला सोडून गेली आहे. अशा परिस्थितीत शेजारी राहणारे जोडपे, विशेषतः सुदामा (संदीप पाठक) हा शेजारधर्म या नात्याच्या पलीकडे जाऊन तिची विचारपूस करत असतो. बुढी रस्त्यावरून चालत असते, त्या वेळेस जवळपास निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, याची कल्पना येते.
दोन प्रसंग जोडणे, विषयांतर न करता कथेशी इमान राखून दीड तास खिळवून ठेवणारे प्रसंग लिहिणे, हे पटकथाकाराचे कौशल्य आहे. ‘सह्याद्री’ वाहिनीवरच्या बातम्या, त्यावरून एका आठवणींचा फ्लॅशबॅक, लगेच त्यामधून सत्यात परत येताना आताच्या परिस्थितीवर त्याचा झालेला परिणाम, पूर्वीचे आणि आत्ताचे प्रसंग आणि त्यातला समान धागा याची कल्पना मर्यादित वेळेत प्रेक्षकांना करून देण्यात पटकथाकार बोजेवार यशस्वी झाले आहेत.
एकेक पात्रांची ओळख करून देताना त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याची जाणीव करून दिली आहे. चित्रपटाची नायिका बुढी एका छोट्याशा जागेत राहते आहे, दोन रुपयांचा गूळ, दोन रुपयांचे दूध विकत घेते, तुटलेल्या चपलेचा अंगठा तिला पन्नास पैशात दुरुस्त करून हवा आहे. अशा या बुढीला एकदा निवडणुकीच्या प्रचारसभेत हजार रुपयाची नोट मिळाल्यावर काय होते, हीच या चित्रपटाची कथा आहे.
चित्रपट बघताना पात्रांची मानसिकता कमीत कमी संवादामधून आपल्याला समजते, त्यांच्या विश्वात आपण रममाण होतो, हे प्रादेशिक चित्रपटांचे वैशिष्ट्य ‘एक हजाराची नोट’ बघताना आपल्याला ठायी ठायी जाणवते. कॅमेरामन मिंग काई लेउंग आणि दिग्दर्शक श्रीहरी साठे यांनी अनेक प्रसंग, त्यांच्या फ्रेम अशा दाखवल्या आहेत की, त्या अर्थपूर्ण वाटतात. बुढी एक हजाराची नोट कशी बघते तो प्रसंग खासच. अशी नोट यापूर्वी बघितली नसल्यामुळे ती खात्री करून घेण्यासाठी नोटेवर हात ठेवून धा रुपये बघते, एका शून्यावरचा हात मागे सारून त्याचे झालेले शंभर मोजते आणि त्यानंतर एका शून्यावरचा हात काढून एक हजार झालेले बघताच पटलेली खात्री आणि आनंद उषा नाईक यांनी असा काही दाखवला आहे की, कौतुक अभिनयाचे करावे की, कॅमेरामनचे की दिग्दर्शकाचे, असा प्रश्न पडतो.
निवडणुकीच्या प्रचारसभेला हजर राहिल्यावर मिळणारे जेवण हे उपस्थितांसाठी आकर्षण असते. जेवणाबरोबरच मिळणारे पैसे हा खुशीचा सौदा असतो. जेवण झाल्यावर उमेदवार हजर राहणाऱ्यांना शंभर-पाचशेच्या नोटा देतो. नायिकेचा मुलगा शेतकरी होता आणि त्याने आत्महत्या केली असल्याचे समजताच नेता ती संधी सोडत नाही आणि बुढीला हजाराच्या चार नोटा देतो. आता ते हजार रुपये सगळ्यांच्या नजरेत भरतात. पण बुढीला ते पैसे खर्च करायचे आहेत, मुलाच्या फोटोसाठी नवीन फ्रेम करायची आहे, शेजारीच राहणाऱ्या मुलाला (संदीप पाठक) कापड आणि त्याच्या बायकोला लुगडे घ्यायचे आहे.
पुढे काय होते हे बघण्यासारखे असली तरी त्यापेक्षा ती सादर कशी केलेली आहे, हे जास्त महत्वाचे आहे. प्रशांत बिडीकर यांचे कला दिग्दर्शन सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारे आहे. हिंदी-मराठी कौटुंबिक सिरिअल लख्ख प्रकाशात बघण्याची सवय झाल्यामुळे सत्यतेच्या जवळ जाणारे चित्रण आपण विसरून जाणार आहोत की काय, अशी भीती वाटते.
उषा नाईक यांनी बुढीची भूमिका अप्रतिमरीत्या साकारली आहे. ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सुशीला’पासून ‘गल्ली ते दिल्ली’, ‘गोंधळात गोंधळ’ अशा १५० चित्रपटांत अभिनय केलेल्या उषा नाईक यांच्या कारकिर्दीतला हा सर्वोत्तम अभिनय ठरावा.
‘हरिशचंद्राची फॅक्टरी’पासून ‘एक डाव धोबी पछाड’ अशा अनेक भूमिकांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनय केलेल्या संदीप पाठकचा या चित्रपटातील अभिनय नैसर्गिक आहे. प्रत्येक प्रसंगातील संदीप पाठकच्या चेहऱ्यावरील भाव पाहता तो त्या भूमिकेचा होऊन गेल्याचे जाणवते.
गणेश यादवचा हातखंडा असलेला निर्ढावलेल्या राजकारण्याची भूमिका, श्रीकांत यादवचा पोलीस इन्स्पेक्टर अगदी चपखल आहेत.
शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबद्ध केलेले ‘कृष्णा तीरी कऱ्हाड नगरी’ गाणे श्रवणीय आहे. आरती अंकलीकर यांनी हे गाणे शास्त्रीय गायिका या नात्याने गाण्याऐवजी भावगीत गायिका या नात्याने गायल्याचे जाणवते. अनेक शास्त्रीय कलाकारांना अशी वेशभूषा बदलणे, जमतेच असे नाही. अर्थात ‘दे धक्का’मधील ‘उगवली शुक्राची चांदणी’ ही लावणी ऐकताना त्याचे प्रत्यंतर आले होतेच.
हा चित्रपट दीड तासात आटोपशीरपणे चित्रित केला आहे. कुठेही विषय सोडून पाल्हाळ लावलेला नाही. संकलक या नात्याने दिग्दर्शक श्रीहरी साठे यांनी ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडली आहे. कमर्शियल यश मिळावे याकरता कुठेही विषयांतर वा तडजोड केलेली नाही. असे चित्रपट दुर्मीळ.
वेब चॅनेलवर मराठीला प्रेक्षक मिळाले तर त्याला जास्त किंमत मिळेल. त्यानंतरच आपल्याला मराठीतले उत्तम चित्रपट बघायला मिळतील. मल्याळम आणि तमिळ चित्रपटांना उत्तम किंमत मिळते, तशी किंमत मराठी चित्रपटांना मिळवून देणे आपल्याच हातात आहे. त्यासाठीच ही ‘हजाराची नोट’ बघायला हवी.
..................................................................................................................................................................
लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.
suhass.kirloskar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment